शाम-शामली
शाम-शामली
गाडी धावत होती प्रत्येक प्रवाशाला ज्याच्या त्याच्या इप्सित स्थळी पोहचविण्यासाठी. पण माझे मन मात्र धावत होते गतकाळात. अनेक प्रश्नांची आवर्तने उठत होती. का? कशाला? कशासाठी? कोणासाठी? अशी एक ना अनेक प्रश्नांची न संपणारी मालिका तयार होत होती. जर आपण आपले नशिब घेऊन जन्माला आलेले असतो, आयुष्य जगत असताना जे काही वाट्याला येते ते आपलं प्राक्तन असं समजून येणा-या प्रत्येक संकटाला एकट्याने सुख-दुःखाला सामोर जात असतो मग तरीही का? कशासाठी? समाजातील काही मोजक्या संकुचित लोकांच्या जोरजबरदस्तीला बळी पडत असतो. का नाही विद्रोह करून ऊठत? का लढायच्या आधीच तह करून मोकळे होतो? ह्या प्रश्नांनी अक्षरश: मन पिळवटून निघत होते.
खरंतर त्याला त्या वेषात बघून कुठेतरी धस्सं झालं होतं. शाम, एक उंच, गोरा, सफेद टीशर्ट आणि खाकी बर्म्युडा अशा पेहरावात पुण्याच्या डेक्कनमध्ये समस्त स्त्री वर्गाचे लक्ष वेधून घेणारे अनेकविध कानातल्या आणि गळ्यातल्या आभुषणांनी भरलेल्या प्लॅस्टिकचे चौकोनी डबे घेऊन चढणारा साधारण १७-१८ वर्षाचा युवक. डोळे खुप बोलके होते त्याचे. कुठले कानातले कोणत्या स्त्रीला शोभून दिसतील हे पटवून देताना तो आधी ते स्वत: घालून दाखवायचा. एखादं मंगळसुत्र एखाद्या स्त्रीने खरेदी करावं म्हणून तिला तिच्या जोडीदाराच्या स्वभावाचं विश्लेषण विचारून मग आपल्या पेटा-यातून एखादं नाजूक वा भारदस्त दिसणारं मंगळसुत्र काढून द्यायचा. त्याने विकायला आणलेली प्रत्येक आभुषणे ही त्याच्या बायकी मुरडत बोलण्याच्या लकबीमुळे हातोहात विकली जायची.
आभुषणे विकताना त्याच्याही कळत नकळत तो त्या गाडीतून प्रवास करणा-या कित्येक महिलांचे प्रश्न सोडवत असायचा, त्यांना हसवत असायचा. कधी एखाद्या नविनच लग्न झालेल्या मुलीला सासूशी कसे वागवे ते सांगे तर कधी आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने बेजार झालेल्या एखादीला इतर मुलांच्या बाबतीतले कीस्से सांगून हसवायचा. त्याला कष्टाने कमविणे फारच आवडायचे आणि त्याचा बायकांमधला वावरही अतिशय प्रेमळ असायचा. मला नेहमी एक गोष्ट खटकायची, ती म्हणजे त्याच्या पेहरावाच्या अगदी विरूध्द त्याचे बोलणे असायचे. स्वत: कष्टाने कमविलेली मिळकत चांगल्या ठिकाणी गुंतवावी म्हणून कधी मला तर कधी वत्सला काकूंना ज्या स्टॉक एक्सेंजमध्ये कामाला होत्या त्यांच्याशी बोलून आपल्या कमाईचे व्यवस्थापन करायचा.
एकदा अशाच एका प्रवासात बोलताना शाम म्हणाला, “मलाही वाटते की सर्व सामान्य लोकांसारख मला ही जगता यावं ते जगता येत नाही म्हणून तुम्हा बायकांशी बोलले की समाधान मिळते”. माझ्या स्वभावानुसार समोरचा जोपर्यंत आपल्याबद्द्ल स्वत:हून काही सांगत नाही तोपर्यंत मी कधीच काही विचारत नाही. माझे काम संपत आल्यामुळे माझं पुण्याला जाणं बंद झालं. एक महिन्यापूर्वी जेव्हा पुन्हा पुण्यास जायला निघाले तेव्हा त्याच डब्यातील पुढच्या जागेत अगदी त्याच चेह-याची एक स्त्री दिसली. मला हसू आलं. मी खिडकीतून बाहेर बघण्यास सुरूवात केली. बाहेर छान पाऊस पडत होता. तरी पुन्हा पुन्हा तिच्याकडे लक्ष जात होतं आणि आमची नजरानजर झाली. ती स्त्री छान हसली आणि उठून माझ्या बाजूला येऊन बसली. मला म्हणाली, “ओळखलसं का ताई?” तोच आवाज. पण मनात एकदम चर्र झालं. ती म्हणाली, “ नाही ना ओळखलस, मी शाम, बघ त्यांनी शेवटी माझी शामली केलीच.” हे सांगताना त्याचे म्हणावे की तिचे, डोळे पाणावले होते. नकळत मी त्याला हातावर थोपटले. कसं असतं ना कधीकधी शब्दापेक्षाही स्पर्श खूप बोलून जातो. आता शाम आपल्या शामली होण्याच्या निर्दयी प्रवासाबद्दल सांगत होता.
"ql-align-justify">एका गरीब कुटूंबात एक बाळ जन्माला आलं. त्या जिवाचा आयुष्यात येण्याचा आनंद साजरा होण्याआधीच त्या बाळाला जन्म देणा-या स्त्रीवर त्या बाळामुळेच नवरा आणि घर सोडण्याची वेळ आली होती. पण ती स्त्री एक आई होती. म्हणून तिने त्या इवलाश्या जीवासाठी आपल्या सर्व स्वप्नांना तिलांजली दिली होती. कोणी कुठे जन्माला यावं, कसं जन्माला यावं हे कोणाच्या हातात असतं का? त्या बाळाचंही तसंच होतं. ते बाळ ना मुलगा होतं ना मुलगी. एका गरीब आईच्या पोटी एक किन्नर जन्माला आला होता. पण ती आई खचली नव्हती. तीने त्याचे नाव शाम असे ठेवले आणि त्या निलवर्णी शामाचे आशिर्वाद घेऊन तिने शामला वाढवायला सुरवात केली. तिने त्याला माणूस म्हणून घडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच्यावर चांगले संस्कार केले. शाम नावाने वावरणारा हा कीन्नर खरंच कर्तुत्ववान होता. आईच्या एका शब्दाखातर तो खूप मेहनत घ्यायचा. गाडीत भिक मागत वावरणारे इतर किन्नर त्याला त्रास द्यायचे, त्याने कानातले विकण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्याला त्रास द्यायचे. पण त्याची आई खंबीर उभी असायची. थोडे पैसे जमविल्यावर उल्हासनगरमधे इमिटेशन ज्वेलरीचं दुकान घालायचे असे त्याने ठरविले होते. तो फक्त अठरा वर्षाचा होता आणि त्याची आई गेली. तो हवालदील झाला. त्याला आईच्या आधाराची एवढी सवय झाली होती की आईच्या जाण्याने तो भावनिकरीत्या कोलमडला होता. त्याच्या त्या परिस्थितीचा फायदा किन्नर समाजातील इतर लोकांनी घेऊन त्याला त्यांच्यासारखेच जीवन जगायला मजबूर केले. खरे पहाता एखाद्या व्यक्तीला ताठ मानेने जगू न देणारे समाजातील घटक नपुंसक विचाराने बरबटलेले असतात. नपुंसकता ही शरीराची विकृती नसून विचारांची विकृती आहे.
शाम वा शामली नाव काहीही असो पण एक व्यक्ती म्हणून मला ती खूप भावली जेव्हा निर्धाराने स्वत:चे डोळे पुसत ती म्हणाली,” ताई, एक नक्की त्यांनी माझ्या ह्या नश्वर देहावरचे कपडे बदलायला लावून शाम म्हणून जगू पहाणा-या शामची शामली केली. पण माझ्या तत्वांचा, माझ्या महत्वाकांक्षेचा त्यांना कायापालट करता आला नाही. आजही माझी खूप इच्छा आहे की माझे स्वत:चे इमिटशन ज्वेलरीचे दुकान असावे. पण माझे किन्नर असणे आड येते.”
माझ्याही नकळत मी त्याच्या आयुष्यात त्या क्षणी गुंतले होते. त्याचे प्रश्नं मला महत्त्वाचे वाटत होते. मी माझ्या मैत्रिणीला फोन लावून त्याचे हे स्वप्नं जगविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज दोन महिन्यांनी त्या शाम(शामली)च्या दुकानाच्या उद्घाटनाला अतिथी म्हणून जाण्याचा योग येत आहे. त्याच्या आईच्या जन्मगावी त्याच्या आईच्या नावानेच शाम-शामली ने दुकान चालू केले आहे. किती आनंद असतो नाही, कोणाच्यातरी आनंदात सहभागी होण्याचा. जसा जातीभेद हा चांगला समाज घडण्यातला अडथळा असतो तसाच लिंगभेदही असतो. जगात असे कित्येक शाम असतील, शामली असतील सतत स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात भटकणारे. जगू द्यावं त्यांना त्यांच्या स्वप्नांसकट. त्यांनाही मन आहे. गगनभरारीची त्यांचीही स्वप्ने असतीलच. मग का रोखावे? उडू द्या त्यांनाही मोकळ्या आकाशात. मदत करणे जमत नसेल तर निदान त्यांच्या मनाला, स्वप्नांना पायदळी तरी तुडवू नका.
आज शामलीच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. मला बघताच तिने वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “आजही कुठेतरी आई माझ्यासाठी आहे. कोणाच्या ना कोणाच्या रुपाने ती सतत भेटते.” मलाही समाजाने नाकारलेल्या एका जीवाचे स्वप्नं पूर्ण करण्याचे समाधान होते. माझ्या तोंडून पण अगदी मनापासून शाम-शामलीसाठी आशिर्वाद निघाला “यशस्वी भव:”. आताही शाम-शामलीच्या पापण्या ओलावल्या होत्या. पण ते अश्रू आनंदाचे होते.