मैत्रीचे बंध
मैत्रीचे बंध


टीक टीक टीक टीक, अलार्म वाजला, वाजतच राहिला.. बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली. त्याने घड्याळात बघितले ९ वाजायला फक्त ९च मिनिटे शिल्लक होती, आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती. तूर्तास शक्य तेवढं लवकर उरकून घ्यावं म्हणत, तो बाथरूममध्ये शिरला, फिस्स करत गरम पाण्याचा शॉवरखाली तो आंघोळ करु लागला. मग त्याने साबणाने अंग छान घासून काढले, पाण्याने धुवून काढले तर स्वच्छ अंघोळ केल्याच्या अविर्भावात कानात थोडा साबणाचा फेस तसाच राहून बाहेर आला, बाथरुमच्या. प्रचलित असे गाणे अर्जित सिंगला गायला लावून त्याने, नाचायला सुरुवात केली. हा त्याचा रोजचाच वॉकिंग डान्स होता, म्हणजे आंघोळ झाल्यानंतरची सगळी कामे ज्यामुळे माणूस स्वतःचा व्यवस्थित आणि टापटीपपणे वावरतो ती करायला सुरुवात केली, अन त्यावर तो झिंगायलाही लागला. मग नाष्टा-पाणी करुन, घरच्यांना सगळ्यांना प्रेमाचा बाय म्हणत सुदेश घराबाहेर पडला, पण तीच झिंग त्याने कायम ठेवली होती. अन त्याला बस थांब्यावर एक तरुण सुंदर मुलगी उभी दिसली. खरे-खोटे कसेही बोलता वागता, कुणी डोळ्यातही बघता बरे वाटते.. कधी डायरीत शेवटच्या पानावर लिहलेला शेर त्याला स्मरत राहिला.
गाडी तिच्यापाशी थांबवून, तुम्हाला कुठे जायचं आहे का ? मी सोडून देवू ? हा प्रश्न विचारण्याच्या आतच, ती मुलगी झपझप पाऊले टाकीत बसमध्ये चढून निघूनही गेली. इतक्या निबर मनाची होती की जाताना त्याच्याकडे वळूनदेखील बघितले नाही. हिरमुसल्या तोंडाने सुदेश त्या फरफर जाताना वाकुल्या दाखवणाऱ्या बसकडे बघत राहिला.. आजचा दिवसच घाण म्हणत कोसत असतानाच, त्याच्यावर उन्हाची तिरीप आडवी पडली, सुर्यानेही त्याला जास्तच तापून विचारले होते, तुझं नशीब फुटके त्यात, दिवसाचा काय दोष ? भिंगभिंग करत सुदेशची बाईक पुढे जावू लागली, तोच त्याला सिग्नलचा रस्ता दिसला. आयुष्यभर लाखो चुका करणारी लोक नेमक्या याच सिग्नलवर कसे काय थांबून राहतात बरे, जिथे जास्त ट्राफिकही नसतो, असा विचार करतच रोजच्या शिरस्त्याप्रमाणे चार गाड्या ओलांडून तो पुढे निघून गेला, अनन्य एखाद्या दिवसाप्रमाणे काहीच न होता, भून भून भून करत त्याच्या भरधाव गाडीचे पेट्रोल संपून ती आता फक्त गरीब साव बनून त्याच्या पुढ्यात उभी राहिली. रोज लवकरात लवकर म्हणजे ९, १० ला उठणाऱ्या सुदेशला पंपावर जावून पेट्रोल भरण्यापेक्षा संध्याकाळी त्या नेपाळी पोरांच्या गाडीवर जावून अंडा-चिकन रोल खाण्यात जास्त धन्यता वाटत असे, आणि मग तीच वाढलेली, फुगलेली चरबी ही अशा पद्धतीने कमीही होत असे.
आज मात्र दिवस वेगळा होता. त्याच्यामागून एक रानावनात राबणारा हात आला. शेतकरी असलेला एक भला माणूस, त्याच्या मागे मोटरसायकलवर आला, अन टोचण देत देत त्याला पंपापर्यंत घेवून गेला. रस्त्यावरील गर्दीत त्या भल्या माणसाने रानातल्या कळपात वासरू सोडून द्यावं अन निघून जावं तसे सुदेशला नेवून सोडलं अन चाललाबी केला, याचं मन उगाच पेट्रोलच्या रिकाम्या टाकीसारखं झालं. ‘कुणी माणूस भेटावा असे वाटते, जरा माणूसकीने ही बरे वाटते, त्याच्याच कवितेतील या ओळी नळीतून पेट्रोल टाकीत उतरत असताना त्याच्या मनात खळखळून येत राहिल्या. कार्ड स्वाईप करुन तो निघाला. निघतानाही त्या अवलिया मदतकाराचे आभार पण मानता न आल्याची रुखरुख सारखी मनात ट्रिंग ट्रिंग करत राहिली.
ओझे मनावरीचे हलकेच होत नाही, मुग्धाळ चांदण्यांचा का मोह होत नाही, असे काहीसे नवीन मनात रचत असताना, तंद्री तोडणारी शिट्टी वाजली, पण यावेळी त्याला गाडी थांबवावी लागली. पोलिसांनी त्याला कागदपत्रांची घडी दाखवायला सांगितली. मात्र याने भलतीच अट टाकली. असा काही निरागस भाव त्याला जमला, की फिल्मफेर अवार्ड जिंकणारा अभिनेता पण त्याक्षणी फिका पडला असता. थेट पाकीट उघडं करुन पैसेच नसल्याचे दाखवलं. भोळा-भाबडा कोणीतरी तरुणच पोलिसाने त्याला अडवले होते तर सोडूनही दिले. विचारांच्या धुमश्चक्रीत गुरफटून जात त्याने ऑफिस गाठले. ऑफिसमध्येही विचार त्याचा पाठलाग सोडत नव्हते. शाळेतील जुन्या मित्रांच्या आठवणीत तो असतानाच, लंच ब्रेकमध्ये त्याच्या कलीगला भेटायला आलेल्या एक सावळ्या मुलीला धडकला, गोबरे गाल, लाल चुटूक ओठ, कोरीव भुवया, मत्स्यचक्षू असणारी तिने, जाड काड्यांचा चष्मा ठीक करुन, कुरळ्या केसांना जरा पक्के बांधून घेतले, एक बट तशीच गालावर रेंगाळत ठेवत, तिने सुदेशच्या खनखणीत कानाखाली वाजवली, सगळ्या ऑफिसचा मूडच दोघांनी रिफ्रेश करुन टाकला, जोरदार हशा पिकला.. आणि आपला हिरो मात्र हिरमुसत ऑफिसच्या बाहेर पडला, ती मुलगी त्याच्याच कलीगसोबत मजा करताना त्याच्यावर खुन्नस खावून दिसली.
संग्राम वेदनांचा अंगास झणझणीला पाठीस सुखाचा का स्पर्श होत नाही. डायरीच्या, विशेषकरुन ऑफिसच्या डायरीच्या मागच्या पानांवर कवितेच्या ओळींचा चीरखडा उतरवायला त्याला नेहमीच आवडत असे. ऑफिसमधून संध्याकाळ व्हायच्या आधीच तो बाहेर पडला. उद्दास खिन्न त्याला सगळा परिसर पार विचित्र नजरेने आपल्याकडे बघतोय असे वाटू लागले. एके ठिकाणी जत्र होती, तिथे तो शिरला. अन एकामागोमाग एक योगायोग घडायला सुरुवात झाली.
सगळ्यात आधी तो शिरला भुताटकी आरसे दाखवणाऱ्या तंबूत, तिथले आरशाला तडे जायला लागले, त्याला पाहून आरसे थरथरत बसलेले, इतका उदास, तोंडावर साडे बारा वाजलेला चेहेरा बघून अजून काय होणार होते. पण त्याला मग तिथेच ती मुलगी दिसली, जी बस थांब्यावरून त्याचे भलेमोठे वाक्य बोलण्याच्या आतच निघून गेली होती, जत्रेत आली पण पैसेच सुट्टे करुन न आणल्याने तिला जत्रेत हरवल्यासारखे वाटत होते, चेहेऱ्यावर अपार करुणा वाहायला लागणारच होती की सुदेशाची नजर तिच्याकडे गेली. आणि ओळख काढण्याची नामी संधी साधत त्याने सुट्टे पैसे देवू केले, अन त्या मुलीशी मैत्रीची नॉटही त्याने बांधली, चेहऱ्यावर थोड्डे आलेले गुलाबीपण सुदेश कसेबसे लपवत होता. तो पुढे चालायला लागला.
आपल्या कुटुंबाला घेवून आलेला त्याला तो माणूस दिसला, ज्याने त्याच्या गाडीला टोचण लावून पंपापर्यंत धाडण्यात त्याला मदत केलेली. गरीब सर्वसाधारण परिस्थितीचा तो, मुलांचे हट्ट पुरवून पुरवून मेटाकुटीला आल्यासारखा वाटत होता. सुदेशला त्याला बघून जणू आकाशाला खाली ओढून घेवून त्याच्याकडून मुठभर चांदण्या तोडून त्या माणसाच्या पदरात घालण्याचे सुचले. त्याने बघितलं की त्याचा मुलगा फारच रडतोय, धावत हा गेला, अन पुडक्यात खाऊ बांधून घेवून आला. त्या माणसाचा चेहेरा आनंदाने फुलून आला. याच्याही मनाची रुखरुख मिटली.
तिथं एक पोलिसांची चौकी उभी केली होती, जिथे सतत सुरक्षिततेच्या सूचना सांगत होते. जी लहान मुले रडताना सापडत होती, त्यांना तिथं आणण्याचे काम काही पोलीस करत होते. सुदेशने जावून तिथंही घुटमळला. त्याला दिसलं की सकाळी आपल्याला सहज सोडून देणारा हवालदार मुलाची पण तिथेच ड्युटी लागली होती. सुदेश त्याच्यापुढे जावून उभा राहिल्यावर, यानेच सकाळची आठवण करुन दिली, एक झकासशी स्माईल दिली, हात वर करुन सलाम ठोकला. दोघांनी चांगली ओळख करुन घेतली, एकमेकांची.
ए,ए, शुक शुक करत एक मुलगी सुदेशला खुणेने बोलवत होती. तेजस्वी कांती अन रात्रीतही तिच्या सावळ्या गालांवरचा ग्लो, सुदेशला आकार्षित करत होता. तो तिच्या जवळ पोहोचल्यावर मात्र तिने काहीच ण बोलता, फक्त त्याला चहाचा कप दिला, तिनेही सोबत घेतला. दोघेही एकमेकांकडे बघून हसले, सुदेशवर ऑफिसमध्ये उगाचच डोकं सडकवून वागलो हे तिला जाणवलं असणार.
टीक टीक टीक टीक, अलार्म वाजला, वाजतच राहिला.. बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली. त्याने घड्याळात बघितले ९ वाजायला फक्त ९च मिनिटे शिल्लक होती, आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती. सुदेश उठला खरा, पण पुन्हा मनशांततेच्या गर्भारातून केशरी,लाल रंग उधळत एक विचार उगवून आलाच, की आजचा दिवसही कालसारखाच असेल का ? निराशेच्या गर्तेत हिरमोडाच्या वळणवाटा घेत नव्या लोकांच्या ओळखी करत, नवे मैत्रीचे बंध बांधणारा असा ? की असेन आयुष्यातील अनुभवाचा आणखीन एक चाप्टर ..