The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

vishal lonari

Romance Fantasy

5.0  

vishal lonari

Romance Fantasy

'ब्रँडेड' आठवणी

'ब्रँडेड' आठवणी

6 mins
3.3K


शाळेत असताना माझं एका मुलीवर खूप प्रेम होते. नाही, म्हणजे आजही मी त्या मुलीवर तितकाच भाळलेलो आहे आणि आजन्म तसाच भाळलेला राहीन . तसं पाहायला गेलं तर आपल्यातील अनेकांच्या आयुष्यात शाळेत कुणी न कुणी आवडत असतेच. ते दिवस खूप अल्लड वागण्याचे असतात. आपण प्रत्येकजण तेव्हा निरागसच असतो. त्यावेळी कदाचित मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे, पण माझं नाही आमचं या आकर्षणाच्या पलीकडेच होतं, खरेच ती मला,मी तिला(माझा पक्का अंदाज) खूप अवडायचो, आमच्यातील नजरानजर तासंतास चालत होती.

हम आपके है कोन, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है हे चित्रपट बघत माझं बालपण सुरू झाले. त्याकाळापासून माझ्यावर चित्रपट गारूड घालत आहेत. याच कारणामुळे असेल कदाचित पण अगदी शालेय जीवनापासून रोमॅंटिझमचा मानसिकतेत गुरफटून गेलेला जीव आहे. मला आठवतं मी तिसरी, चौथीच्या वर्गात होतो. आमच्या शाळेत एक स्पर्धा होती. पुष्परचना स्पर्धा, फुलांनी परडी सजवायची ज्याची छान सजेल त्याला बक्षीस मिळणार होते. तेव्हा काय कारण होते माहीत नाही, पण मी घरून कोणतीच रिकामी फुलदाणी आणली नव्हती. मग कशी स्पर्धा खेळणार, असा सगळा प्रश्न माझ्या पालकांना, शिक्षकांना पडला होता. तेव्हा एका मुलीने अन तिच्या घरच्यांनी एक मातीची, काळ्या रंगाची फुलदाणी जास्तीची आणली होती, ती मला देण्यात आली. बस्स, हा एक क्षण त्यावेळी घडला तो आजवर लक्षात राहण्याजोगा मोठा परिणाम घडवून गेला. त्यावेळपासून मला भाग्यश्री खूप आवडायला लागली. हो, तिचे नाव भाग्यश्री होते. आडनाव मुद्दाम सांगत नाही, ती आता कुठे आहे, मला अजिबात काहीच कल्पना नाही.

त्यावेळपासून तिच्याबद्दल काहीतरी वाटायला सुरूवात झाली. विश्वास बसला नाही तरी हेच मी अनुभवलं आहे. मला माहीत नाही, मग तिच्यासाठी मी काय काय उपद्व्याप नसतील केले, तेव्हा आमच्या कोडीलकर बाईंनी एक नाटक बसवायला घेतलेलं. मराठीच्या पुस्तकात एक खूप मिश्कील धडा होता, ज्यात अनेक पात्र होती, संवाद होते, त्यात मी केवळ ती होती म्हणूनच भाग घेतला होता. पुढे मग हायस्कुलला आलो. जसे वय वाढत गेलं तसे तिच्याबद्दल वाटणारी अल्लड हुरहूर थोडी थोडी करत वाढायला लागली होती.

मग सहावी, सातवीत असताना आम्हा सगळ्या मुलांचे डाव होते. हो, आपल्या वर्गात किंवा शेजारच्या तुकडीत पण मुलांनी त्यांच्या आपापले डाव जाहीर करून टाकले होते. जर एखाद्याच्या डावकडे दुसरा पाहील तर मग दोघा मित्रांमध्ये भांडण हमखास व्हायचे. या डावाच्या नावाची चीड त्या मुलाला आपसूक पडलेली असायची मलाही पडली होती. माझ्या मित्रांत मला 'बीडी' अशी विचीत्र हाक मारली जायची. पण आठवीत असताना तिची तुकडी बदलून 'अ' झाली अन मी मात्र 'क' तुकडीत बसायला लागलो. माझ्या तिच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र प्रेम हे शाबूत होते. ते काहीतरी वेगळ्या पातळीवर पोहोचले होते.

सहावीला असताना आमचा खूप भारी वर्ग होता. मला एकच प्रसंग धूसर आठवतो,का कुणास ठाऊक पण या सगळ्या आठवणी खूप धूसर होत चालल्या आहेत. जग जसे पुढे जातेय, अनेक बदल घडताय त्यामुळे नव्या आठवणींना जागा म्हणून जुन्या आठवणी पुसल्या जात आहेत. असो, तर आठवते त्याप्रमाणे भाग्यश्री एकदा माझ्याकडे बघत होती, हाहाहा. मीच तिच्याकडे बघत होतो, तेव्हा मला कळले की अरे तिचे डोळे पण आपल्याचकडे आहेत. बऱ्याचवेळ मग मी बाकावर डोके ठेवून टक धीना धीन टक वाजवत तिला बघत होतो. इतरवेळीही मला मित्रांनी सांगितले होतेच की ती माझ्याकडेच बघत असते. शाळेत मित्र म्हटलं की अगदी जीव की प्राणच ! त्यामुळे ते सांगतील ते सगळं अगदी खरं असायचं. त्यानंतरही अशा प्रकारच्या प्रसंगात आम्ही एकमेकांना नजरेने भिडलो असूही, पण ते फारसं आठवत नाही. एकदा सातवीत असताना लंगडी पळी खेळाच्या स्पर्धा होत्या, त्यावेळीही आम्ही एकमेकांना अखंडपणे बघत होतो, हे मला लख्ख आठवते. त्यावेळी मी गंगापूररोडला एसटी कॉलनीत राहत होतो. गोमंतक हॉटेलच्या इमारतीत तिचे घर होते. कधीतरी मग तिला बघायला माझी सायकल, नवश्या गणपतीकडे धाव घ्यायचीच.

मग, पुढे आठवीत असताना तिने सेमी इंग्लिश घेतले, अ तुकडीत ती बसायला लागली. मध्यंतरी सातवीत एका मुलीशी मी भयंकर प्रकरण केले होते. त्यावेळी आमच्या कुलकर्णी बाईंना बुद्धी सुचली, कुणास ठाऊक पण मुलगा आणि मुलगी अशी जोडी प्रत्येक बेंचवर बसवली होती. माझ्या शेजारी तेव्हा आमच्या शाळेतील ऐश्वर्या रायच बसायला आली होती. गोरा शब्द पण चुकार वाटेल इतका चिकना पांढरा रंग, घारे घारे मोठे डोळे आणि चक्क लाल भडक रंगाची लांब जीवनी. सौंदर्याचा अटॉम बॉम्ब असणारी मुलगी, शाळेत इयत्ता सातवीत माझ्या शेजारी माझ्या बाकावर बसायची. पोरगी स्वभावाला एकदम बिनधास्त, पोरांशी उद्धट बोलणारी, शहाणपणा शिकवणारी, कुठल्याही विषयात फारशी हुशार नसणारी, जराशी टॉम बॉईश, तिचे दात असे सरळ होते, ती हसली की माझ्या दिलात भडकाच व्हायल लागला. अशी काही तिचो मोहिनी व्हायला लागली की मी भाग्यश्रीला सोडून सुकन्याचाच विचार करायला लागलो. त्यात तिची काहीच चूक नव्हती, पण ती लवकरच चांगली मैत्रीण झाली. छान बोलायला लागली. तिला सुरुवातीला मी घाबरायचो, तिची एक मैत्रीण होती, मला 'फावड्या' करून चिडवायची. मात्र ती छान बोलत होती. मी ही तितकाच मनमुराद आनंदाने तिच्याशी मिसळत गेलो. तिला मी हात धरून, आय लव्ह यू पण बोललो होतो, त्यापूर्वी कितीकदा वहीच्या शेवटच्या पानावर व्हिएस, काढलेलं तिने बघितलं होतं. तेव्हा तिने आख्या शाळेत हे प्रकरण गाजवलं, मुख्यध्यापकांकडे कुलकर्णी बाईंनी या प्रकरणी खटला दाखल केला. सुकन्याची बाजू ऐकून घेण्यात आली, मी आरोपांचा इन्कार करत होतो. शेवट मला सज्जड दम भरून माफ केले गेले, पण त्या दरम्यान सुकन्या जेव्हा मुख्याध्यापिकाकांडे घेऊन जायला आली तेव्हा पाण्याने तिचे डोळे पूर्ण डबडबले होते, मला आज त्याबद्दल स्वतःला शिक्षा द्यावीशी वाटते. त्यानंतर दहावीपर्यंत सुकन्या माझी चांगली मैत्रीण होती. अकरावीत एकदा कॉलेज रोडवर भेटली, त्यानंतर कधीच दिसली पण नाही.

तेव्हा, समोरच्या दोन मोठ्या दातांत भली उभी फट असणारा मी, हँडसम वगैरे आपण नाही आहोत अशी दुर्भावना वगैरे मनात बिलकुल बाळगून नव्हतो. मित्र चिडवायचे तेव्हा सॉलिड यायचा, लागेल असे बोलणं सहन व्हायचं ना जमायचं, मग मित्र दगडांचा मार खायचे, ते ही माझ्याकडून बदडून, मला पण खूप मारत होते.आठवीत मी पूर्ण संस्कृत हा विषय घेतला होता.दोन कारणे होती, घरून सांगण्यात आले होते आणि त्या विषयाला शिकायच्या निमित्ताने मला 'अ' तुकडीचा सभासद व्हायला मिळणार होते. मी बिनधास्त तिला बघायला जात होतो. तेव्हा आमच्या वर्गावर इंग्लिश शिकवणाऱ्या रोहिणी बाई संस्कृतचे धडे गिरवून घेत होत्या. शाळेत रोज येण्यापासून ते मग पुढे घडणाऱ्या सर्वच कार्यक्रमांत मी संधी मिळेल तेव्हा तेव्हा भाग्यश्रीला बघत होतो. बोलण्याचा प्रसंग येण्याचा प्रश्नच नव्हता. सातवी, आठवीपासून मुले, मुली जरा आकर्षणापायी बोलत, हसत असे, त्याकाळी पिवळी पुस्तकेही आम्ही वाचायचो, अनेक परिणामही आम्हावर त्याचे झाले होते. आता ते सांगणार नाही. पण आतापेक्षा जास्त निरागस निर्लज्जता तेव्हा होती, किंवा निरागसता ते निर्लज्ज होण्याचा, मानसिक खळबळ होण्याचाच तो काळ होता, त्यातून लैंगिक आकर्षण ही गोष्ट आमच्या कोवळ्या मनावर सावकाशपणे बिंबली जाऊ लागली होती. इतका सगळा आमच्यात मनोवैज्ञानिक बदल घडल्यानंतर कुठं नऊवीत मुले मुली एकमेकांशी विशेष खास हितगुज करू लागली होती. पण मुला-मुलींची भांडणे ही रोजचीच होती. मला आठवतं नऊवीत मी कीर्तीच्या झिंज्या पकडल्या होत्या.

कितीतरी गोष्टी आहेत, मनात फ्रेम केल्या आहेत. जेव्हाही कधी असे वाटते की आपली माणसे आपल्यावर रुसलीत, जगात एकटे स्वतःच्या दुःखासह उरलो आहोत, तेव्हा शाळेच्या आठवणी काढत बसायचे. दुःख पचायला मनाला आधार मिळतो, भूतकाळ जगल्यासारखे वाटते.

आज हे पुन्हा आठवण्यामागेही असेच एक कारण आहे. त्याशिवाय भाग्यश्रीची मला खूप आठवण येत होती, झोप येईच ना, शाळेत असताना आरकेवर दोन शेजारील दुकानांची नावे, 'विशाल, भाग्यश्री' असे होते, जेव्हाही त्या पाट्या बघायचो, अजूनच तिच्या प्रेमात वेडा व्हायचो. काही वर्षांपूर्वी तिला उत्कृष्ट चित्रकार, मिस ब्युटीफुल वगैरे पुरस्कार मिळालेत, मला ती कशी दिसते हे पण माहीत आहे. तिच्यावर तितकंच निष्पाप प्रेमही आहे, पण ती आता कुठे आहे हे काहीच माहीत नाही. कदाचित आम्ही एकमेकांचे होऊ, किंवा ती कुणा दुसऱ्याची झालीही असेल, पण माझे तिच्यावरच्या प्रेमाला मी अमरत्व देऊन ठेवलं आहे, दशकापूर्वीच.


Rate this content
Log in