भावबंध नात्यांचे... धागे ऋणानुबंधाचे
भावबंध नात्यांचे... धागे ऋणानुबंधाचे


आजही भांडणाचा दिवस ठरला. गेले दोन आठवडे काहीतरी कुरबुर होऊन एखादे भांडण होतंच असायचे. कधी झोपेतून लवकर उठवले नाही म्हणून, तर कधी नाश्त्यात पोहेच केले म्हणून. कुठलंही कारण भांडणाला होत असायचे. अद्याप चारच महिने लग्नाला झालेले. नवे लग्न झाल्यासारखे मात्र वागणे नव्हते. जणू दहा वर्षे उलटलीत, अन् एकमेकांची इतकी सवय झाली की भांडले नाहीतर चुकचुकल्याप्रमाणे वाटावे. पण, त्यांचे तर नवंच बिऱ्हाड होते. तरी भांड्याला भांडे लागून संबंध ताणले जाऊ लागले होते. पुसटशा गोष्टींचे रूपांतरही मोठ्या कलहाच्या विषयात होत होते. शब्दांनी शब्द दोघांचाही वाढत जायचा. अन्, मग दिवसा भांडण लागले असेल तर संध्याकाळी तो अबोला सुटायचा. अन्, संध्याकाळच्या कलहाच्या निरगाठी रात्री कधीतरी सुटायच्या. या, सगळ्यांत एक जीवाला मात्र नाहक त्रास भोगावा लागत असे. तोच मी.
“नाही, हो अनय भावजी. मला कुठे तुम्हाला सतत त्रास द्यायला आवडते का ? पण, हा माणूस माझं काही ऐकतच नाही. आता, इथे जवळचे एक तुम्हीच, म्हणून तुमच्याकडे येते. किती मोठा आधार, बाई तुमचा...” सरिताची ही नेहमीची सवय होती. असे बोलून ती मला आपलेपणात गुंतवून टाकायची अन् चहा द्यायची. अन्, तिचे वागणे चुकतही नव्हते. माहेर दक्षिण टोकावर तर सासर उत्तर अन् हे दोघे राहायचे राज्याच्या मध्यबिंदूवर. जिथे मित्र म्हणून मीच होतो. नातेवाईक आजूबाजूस होतेच. पण, अशावेळी नातेवाईकांच्यात चर्चा झाल्या तर घरी कळणारच अन् मग, व्याह्यांमध्ये उगाच गैरसमज पसरायला नको म्हणून मीच त्यांचे वाद सोडवायला, भांडण मिटवायला मदत करत होतो.
“अजित, अरे तू जेव्हा मार्केटिंग करत हिंडतोस. तेव्हा किती समजून घेतोस समोरच्याला. मग, सरिताला समजून घेण्यात तुला त्रास का होतो ? तिला नाही रे, चार गोष्टी लक्षात येत तेव्हा तू, एकदा नाही, तर दोनदा सांगत चल म्हणजे मग, भांडणाचा प्रश्न येणार नाही. त्या बघ, चांगल्या मार्कांनी पदवी घेऊन तुझा संसार डोलारा सांभाळते आहेच ना. कोणती तरी तक्रार त्यांनी बाहेर जाण्याबद्दल केली आहे का? आज जगातील स्त्रियांकडे बघ, एकदा. तू स्वतःला भाग्यवान समजायला हवंस”. मी, कितीही समजावले तरी त्याच्या पचनी हे पडणारे नव्हते हे मला माहीत होते. एव्हाना, मलाच या सगळ्यांची सवय झालेली होती. पण, न थकता मला हे कायमच करावे लागणार होते. तितके उपकार या दोन्ही दाम्पत्याने माझ्यावर करून ठेवले होते. अन्यथा पूर दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब गमावल्यावर मागे उरलेल्या माझ्यासारख्या एकट्या पडलेल्या जिवाला सहजच कुणी आधार देत नसते. कॉलेज काळात जुळली गेलेली मैत्री दोघांनीही माझ्याशी घट्ट बांधली होती. दोघांत जरी कधी वाद झाले तरी मला काही लागलेच तर दोघे पटकन भांडण बाजुला ठेवून एकत्र येत. या अशा त्यांच्या वागण्याने माझं एकल आयुष्य मात्र गोतावळ्याने भरून गेल्यागत मी जगत होतो. दोघांचे एकमेकांच्या आयुष्यात येणं, यामागे कारण त्यांच्या वडिलांचे ऋणानुबंध होय. दोघेही, घट्ट मैतर, मात्र जेव्हा नोकरी निमित्ताने त्यांना एकमेकांपासून दूर जावे लागले. तेव्हा मात्र, एकमेकांचे व्याही बनण्याचं स्वप्नवचन त्यांनी एकमेकांना दिले. अन्, आपापले आयुष्य जगले. हीच या व्याह्यांची माया आटून जाऊ नये किंवा त्याची चिंता जाणवू नये म्हणून हा अल्पसा पण मेटाकुटीला आलेला संसार सरिता, अजित कसातरी सांभाळत होते.
“सरूला काही बोलायला गेले, पहिलाच आपला नकार असतो. इथे जाऊ नका, हा कोण, ही कोण. सतत आपले प्रश्न-प्रश्न. कधी म्हणून पहिल्या उत्तराने समाधान होणार नाही. पुन्हा तिचे प्रतिप्रश्न असतातच. ठीक आहे, प्रेम करते अगदी जीव ओतून प्रेम करते माझ्यावर. पण, इतकं कंबरेलाच बांधून ठेवून कसं चालेल. घर चालवायचं. वैताग आलाय, नुस्ता. तिकडं त्या अनयला तरी कितीदा बोलवायचं, यावर आता अखेरचा एकच उपाय करायलाच हवा. येस्स ! हाच मार्ग बरोबर आहे.
अजितने शोधलेला उपाय पहिल्यांदा मलाच सांगितला. सोशल मीडियावर त्याला म्हणे कोणी काऊन्सिलरचा पत्ता मिळाला होता. तो आधी तिच्याकडे जाऊन आला होता. मग, आता सरितालाही तिथे नेण्याचे त्याच्या मनात पक्के झाले होते. त्याने मला सांगितले तेव्हा मी, जे करशील ते विचारपूर्वक कर असाच सल्ला दिला. याचे कारण सरिताला दोघांत कुणी तिसरा बोललेलं खपलं नसतंच. थोड्याच वेळात मी ही त्याची काऊन्सिलर कोण हे पाहिले. स्वाती, म्हणून होती. तिची प्रोफाईल चेक केली. अन्, मी उडालोच. या दोघा माझ्या मित्राने माझ्याच एका मैत्रिणीला भेटायला जायचं ठरवलं होतं. स्वाती अन् मी शाळेत एकत्रच शिकलेलो.
स्वाती अन् मी अगदी लहानपणी एकत्र शिकलेलो. चौथी ते सातवीपर्यंतचं मला आठवते. पण, त्या शाळेत दोघेही पहिलीपासूनच असणार हे खरेच. एके दिवशी शाळेत पुष्परचना स्पर्धा होती. मी घरूनच फुलदाणी न्यायचे विसरलो. तेव्हा तिच्या घरच्यांनी मला त्यांच्याकडची दुसरी फुलदाणी दिली होती. अन् त्यावेळी स्वातीला मी मैत्रीण केले होते. बालवयातील आम्ही निरागस सवंगडी बनलो होतो. एकत्र अभ्यास, खेळ हे रोज चालायचे. अख्खा वर्गच तेव्हा एकत्र खेळत असे.
मला स्वाती नाव मिळाल्याचा नक्कीच आनंद होतो. मी स्वत: जळून इतरांना उजेड देणारी ठरो, यासाठीच माझा कायम प्रयत्न राहिला आहे. आज मात्र जे जोडपं उपचार करून घेण्यासाठी आलं होतं त्यांच्यापुढे मी थोडीतरी थिटी पडतेय की काय, असंच मला जाणवतं आहे. खरंतर, यांची गाठ अशी काही अचाट करणाऱ्या गोष्टीने बांधली गेली आहे की त्यानंतरही एकमेकांशी एवढं कसं हे भांडू शकतात हाच एक प्रश्न सतत यांच्या आजूबाजूच्या लोकांना पडावा. एकमेकांच्या वडिलांनी दिल्या वचनाला जागत यांनी लग्न केलं. चांगली गाडी सुरळीत सुरू झालेली, संसाराची. मात्र, काही दिवसांनी यांच्यात छोट्या-छोट्या मुद्द्यांना शब्दांचे गुद्दे पडायला लागले. मग, मीच त्यांना एक उपाय सांगितला आहे, भांडणाचा. यदाकदाचित मनसोक्त भांडण करूनच त्यांच्यात एकप्रकारचे समजुतीचे नाते निर्माण होण्याची शक्यता उरली आहे. कोणत्याही कारणाशिवाय उगाच भांडण करायला लागलेत म्हटल्यावर, एका खोलीत दोघांना बंद करून भांडू देणंच इष्ट. नवरा-बायको आहेत ते, एकमेकांना बघणार नाही, एकमेकांवाचून राहणारही नाही, अशी त्यांच्या नात्यातली नाजूक घडी. ती थोडी रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी विस्कटली जाते. मग, असे प्रत्येकच मुद्दे त्यांना भांडणालाच पुरून उरायला सुरूवात होते. मी सांगितलेला उपाय नक्कीच त्यांना आयुष्याचा रसास्वाद देईल, अशीच खात्री आहे.
स्वातीने त्यांना एकमेकांशी भांडण्याचा अनोखा उपाय सांगितला. अन् त्याचा उभय दाम्पत्याला यायचा तोच प्रत्यय आलादेखील. दोघेही एका हॉटेलच्या रूममध्ये उतरले. स्वाती यांची अटच होती. आपल्या घरात थांबायचे नाही, बाहेर रूम घेऊन त्यांनी हे सगळं करावं. यामुळे भांडण झालं तरी ते लगेच एकमेकांपासून तोंड लपवू शकले नाहीत. अन् मग काय, विषम्य मतभेदांचे मनोमिलन मात्र त्याचवेळी झाले. तारसप्तकांचे सूर वातावरणात निनादले गेले. आकाशातील चंद्र परसभर वाढला. जाईचा दरवळ झरोक्यातून आत येत खोलीत पसरला. दूरवर पसरलेल्या अथांग सागराने कळवळून धरणीला साद घातली. अन् मनातील भावना उंचच खळाळल्या. मग भांडणांमध्येच गुंतून राहिल्याने ओढीची मिणमिणती भावना पुन्हा एकवार चेतून उठली. नात्यांचे भावबंध जे तुटू जात होते ते पुन्हा एकदा जोडले गेले. हे जे ऋणानुबंध परस्पर संमतीने तयार झालेले असतात त्यांचे तुटणे सहजासहजी शक्य नसतेच. ते जरी कधी ताणले गेले तरी काहीही निमित्त ठरतं अन् ते जुळले जातातच. जितका ताण जास्त तितके पुढच्यावेळी अधिक घट्ट निरगाठ त्यांना बसणार.
सरू, आता मला फारच आवडायला लागली आहे. मी कधी नव्हे ते रोजच तिच्यासाठी झुरतो. खरंतर, स्वाती मॅमने योग्यच ओळखलं. आमचं लग्न झालं तरी फारच लवकर आम्ही रोजच्या आयुष्याला पुन्हा बिलगलो. त्यातून एकमेकांना हवा तसा वेळच देऊ शकत नव्हतो. पण, त्याची भर काढायला एकच निवांत रात्र पुरी ठरली. अन् मग आता सगळं आयुष्य नव्याने कळायला लागलं आहे. आप्पांनी त्यांच्या मित्राच्या मुलीशीच लग्न लावले, पण आता आम्हीच एकमेकांचे खूप घनिष्ट मित्र आहोत. प्रेमी झालो आहोत. इतके दिवस आमच्या सगळ्याच गोष्टींना अनय, माझ्या मित्राने खूप सांभाळून घेतले त्याचे आभार कसे मानावे मी?
अनय भाऊजींच्याबद्दल सख्ख्या भावाइतकीच माया मला तयार झाली आहे. अजितइतकेच जवळचे नातेवाईक झालेत ते माझे. गेले काही दिवसांत मात्र, फिरकलेच नाहीत घरी. घरी आता, काही अनपेक्षित घडत नाही तोपर्यंत ते येणारच नाहीत का? कुठे बरं असतील ते, त्यांना तर सतत आमचीच सवय. अजितशी या विषयावर बोलायला हवंच.
त्या दोघांचंही आयुष्य सुरळीत झालंय आता, माझा जीव निर्धास्त आहे. इतकंच कशाला, आपलंपण एकाकीपण संपलंच आहे की, स्वाती आता लहानपणीची मैत्रीण पण आनंदाने माझ्यासोबत राहतेय. कोणतंही प्रतीक न लावता. नाते निखळपणे दोघेही जपतो आहोत, सांभाळतो आहोत. समाजालाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यांना तसाही फारसा रस नसतो. म्हणजे सुरवातीला प्रचंड विरोधात जाणारा समाज आपण नमतं घेतलं नाही तर मग स्वतःच विरोध करणं कमी करून टाकतो.
बस्स... फक्त ज्या दोन जीवांना सोबतीने जगायचंय त्यांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वासार्ह अन् इतरांच्यापुढे खंबीर राहता यायला हवं...