एक जिद्द
एक जिद्द
मैदानावर खेळाचे प्रशिक्षक खेळाडूंकडून धावण्याचा सराव करुन घेत होते. अनेक खेळाडू यंदा आंतरशालेय क्रीडा महोत्सवासाठी प्राण पणाला लावून तयारी करत होते. दरवर्षी भरत आलेल्या या महोत्सवात शहरातील सर्व नामांकित शाळांचा सहभाग असे. ज्या शाळेचा गौरव होई, त्यांना राज्यस्तरावर जाण्याची संधी मिळत होती. याचमुळे यंदा विद्यानिकेतन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरित केले होते. स्पर्धेत बाजी मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला जात होता. या खेळांमध्ये पळणे, तीन पायांची शर्यत, लंगडी, गोळाफेक, थाळीफेक आणि क्रिकेटचा समावेश होता. अभ्यासात कधीही मागे न राहिलेल्या विद्यानिकेतन विद्यालयाला यंदा आपण खेळातही अव्वल आहोत याची सिद्धता करून द्यायची होती. यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. मंदार गोळेसर हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. मंदार, हेदेखील उत्तम धावपटू आणि फलंदाज होते. धावपटू असल्याने मैदानी कवायतींत त्यांचे प्राविण्य होतेच. यामुळे आपल्या शाळेलाही राज्यस्तराच्या स्पर्धेत खेळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनीही अपार मेहनत घेण्याचे ठरवले होते. या स्वप्नासाठी त्यांना शाळेकडून वेगळे मानधनही दिले जाणार नव्हते, मात्र सच्चा खेळाडू असलेल्या गोळेसर यांच्या जिद्दीला कोणतेच मोल नव्हते.
सकाळी लवकर उठणे, घर झाडलोट करणे, तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाच्या विहीरीवरून पाणी आणण्यासाठी लांब पावले टाकत, धावत जाऊन पाणी आणणे, मग स्वतःचा, डबा करुन शाळेत पोहोचणे, अशी होती 'मीना' हिची रोजची धावपळ. लहानपणीच आईचे छत्र हरवून बसलेली, आईच्या मायेला पारखी होऊ नये म्हणून रिक्षा-चालक वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र, सावत्र आईला स्वतःच्या मुलांची आस होती, त्यामुळे त्यांनी कधीच मीना'शी आईचे नाते ठेवले नव्हते. मीनाकडून घरातलं अधिकाधिक कामे त्या करून घेत होत्या. एक दुपारचे जेवण, रात्रीचा स्वयंपाक सोडला तर बाकी सगळं घर मीना सांभाळून घेत असायची. जन्म झाल्यावर फार काही कळत नसताना तिला फार समजून-उमजून वागण्यास भाग पडले, वेळेने शिकवले होते. आपल्या वडिलांच्या चेहेऱ्यावर कायम हासू असावे, आपल्यामुळे त्यांच्या गौरवात भर पडावी यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची. मीनाची जीवनात एकच महत्वकांक्षा होती, खेळाबद्दल तिला अतूट प्रेम, जिव्हाळा होता. आपण खेळून आपल्या बाबांचे नाव मोठं करावे यासाठी वाट्टेल तितकी मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, या विचाराने तिला पूर्ण झपाटले होते. पण या सगळ्यांत एकच अडचण होती. त्याचमुळे कधीच तिला कोणी खेळायला घेत नसे, मात्र ती जिद्द सोडत नव्हती आणि खेळायचीच. मीना आज शाळेत जाणार होती. मीनाही विद्यानिकेतन विद्यालयातच शिकायला होती. खोल गेलेले डोळे, पातळशी वेणी होईल, इतके खांद्यावर रुळणारे केस, कृश नसले तरी अतिशय वाळकुटे शरीर अशी मीनाची शरीरयष्टी होती. ती देखील विद्या निकेतन विद्यालयात शिकत होती.
शाळेत क्रीडा-सराव सुरू झाला असल्याचे तिला मैत्रिणींकडून समजले होते. त्यामुळे आपला सहभाग नोंदवण्यासाठी ती आता मैदानावर दाखल झाली होती. सर्व खेळाडू सराव करत असताना ती मैदानाच्या एका कोपऱ्यात व्यायाम करत होती. काही वेळानंतर जेवणाची सुट्टी झाली, त्यावेळी व्यायाम करुन उर्जित झालेली मीना खेळाच्या सरांना जाऊन भेटली. आंतरशालेय स्पर्धेत तिलाही धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता. मुलींसाठीही १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पहिला क्रमांक पटकावून मीनाला आपलं खेळातील नैपुण्य तिला दाखवून द्यायची होती. मात्र, ती उत्तमप्रकारे धावू शकेल यावर क्रीडाशिक्षक गोळेसर तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सौ. करंडे यांचाही विश्वास बसत नव्हता. याऊलट इतक्या कृश वाटणाऱ्या, अर्धवट पोषित मुलीला खेळायला उतरवल्याबद्दल शाळेचीच नाहक बदनामी होईल की काय, अशी भीती शाळा प्रशासनाला वाटली. मात्र मीना, तिचा हट्ट सोडायलाच तयार नव्हती. १६ वर्षाची मीना इरेला पेटली होती. ते पाहून मीनाला स्वतःची क्षमता सिध्द करण्याची एक संधी देण्यात यावी, असे गोळेसरांचे मत पडले. यासाठी करंडे बाईंना त्यांनी राजी केले. त्यामुळे मीनाला तिच्या सर्वोत्कृष्ट धावपटू होण्याच्या ध्येयाकडे जाणाऱ्या वाटेवरील पहिल्या स्पर्धेला सामोरे जायचे होते. शाळेतील क्रीडांगणावरील दोन टोकांना दोन खड्डे करण्यात आले. एका बाजूच्या खड्ड्यात शाळेची पताका असणारा बांबूचा खांब रोवून, लक्ष्यस्थानी उभ्या असणाऱ्या मुलापर्यंत धावत जायचे, त्याच्याकडून दुसरी तशीच पताका घ्यायची आणि तिथे केलेल्या खड्ड्यात ती रोवायची, आणि हे सर्व करण्यासाठी मीनाला एक मिनीट इतका अवधी देण्यात आला होता, जर तिला त्याहून जास्त वेळ लागला, जो लागण्याची शक्यताच अधिक होती, तर मीना पुन्हा स्पर्धांचे नावही घेऊ शकणार नव्हती. इशाऱ्याची शिट्टी फुंकली गेली. तशी मीनाने धावण्यास सुरूवात केली. पहिल्यापासूनच तिने धावण्याची गती जोरदार वाढवायला सुरूवात केली. त्यामुळे काही अंतर कापल्यानंतर तिच्या डाव्या टाचेला लचका बसला, त्यामुळे कसाबसा मीनाने आपला तोल सावरत धावणे सुरूच ठेवले. शेवटची पंधरा सेकंद बाकी होते. मीनाचे लक्ष्य अजूनही ५० फुटांवर होते. मात्र, तिथेच मीनाने जमीनीवर लोळण घेतली. तिचा पाय घसरला, मात्र कोणाला काही कळण्याच्या आतच ती पुन्हा उठून उभी राहिली, आणि धावायलाही लागली. सगळेच आता अगदी आनंदाने तिचा खेळ पाहण्यात दंग होते. आतापर्यंत गोळेसरांच्या चेहेऱ्यावर आनंद उमटला होता. ५८व्या सेकांदातच मीनाने तिचे लक्ष्य पार केले होते. पताका खड्ड्यात रोवेपर्यंत एक मिनीट होऊन गेला होता. मात्र ज्यावेळी तिने पताका रोवली, त्यावेळी धाडकन तिथेच ती कोसळली, तिची शुद्धच हरपली. एकाएकी मुख्याध्यापिका, गोळेसर यांनी तिच्याकडे धाव घेतली. प्रथमोपचार पेटी आणली गेली, तिला सरबतही पाजण्यात आले, काही मिनीटातच मीना शुद्धीवर आली. अशाप्रकारे मीना क्रीडास्पर्धांत खेळणार या
वर शाळेने शिक्कामोर्तब केले.
इथून पुढे मीनाचा प्रवास खडतर होता. आपल्या अपोषित राहिलेल्या शरिराला क्रीडा कारकिर्दीत तिला बाधा बनू द्यायचे नव्हते. यासाठी तिने गोळेसर यांची विशेष मदत घेण्याचे ठरवले. यासाठी मीनाने स्वतःमध्येच प्रचंड उर्जास्त्रोत निर्माण करण्याचे ठरवले. कोणताही नकारात्मक विचार काढून टाकून केवळ कुठल्याही प्रश्नावर होकारार्थी समाधान मिळवण्याचे, सकारात्मक, चिकाटीने प्रयत्न करण्याचे तिने सुरू केले. यासाठी ती रोज सकाळी पाणी आणायला जातानाही धावतच जात असे. त्यानंतर सकस पोषक आहार म्हणून दूध प्यायला सुरूवात केली. त्यासोबत फलाहारही सुरू केलाहोता. यानंतर ती रोजच्या वेळेपेक्षा लवकर शाळेत येत असे, इतर मित्र-मैत्रिणींसोबत तिने योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम करू लागली. यानंतर तिला धावण्याच्या विशेष सरावासाठी शाळेजवळील जॉगिंग पार्कवर जाण्याची मुभा देण्यात आली होती. तिथे रोजच्या सकाळ संध्याकाळ ती धावण्याचा, चालण्याचा सराव करत असे, तिथे असलेल्या ग्रीन जीमद्वारे व्यायाम करून शरिराला सुयोग्य, आकार, भरपूर पोषण मिळावे यासाठी अथक परिश्रम घेणे सुरू केले. याचसोबत रोज संध्याकाळी ती गोळेसरांच्या घरीही जात असे. सुरूवातीचे काही दिवस शाळेतील शिक्षक, शिपाई यांना हे समजल्यावर काहीही वाटले नाही, मात्र नंतर त्यांना संशय येऊ लागल्यावर त्यांनी मुख्याध्यापकांचे कान भरण्यास सुरुवात केली.
अशाप्रकारे सर्व काही सुरळीत पार पडत होते. मीना सकाळी शाळेत यायची, अभ्यास आणि शारिरीक कवायती, धावण्याचा सरावही करायची. तर जॉगिंग पार्कवर जाऊन, चालणे, धावणे, शोल्डर बिल्डर, तसेच इतर ग्रीन जीमच्या उपकरणांचा पुरेपूर वापर करून घेत तिने व्यायाम करायला सुरूवात केली होती. वाढत्या वयातील शरिरानेही तिला योग्य असा प्रतिसाद द्यायला सुरूवात केली होती. चाचणी परिक्षा शाळेत होऊन गेल्या होत्या. आता सहामाही आणि मग तिसऱ्या हिवाळी सत्रात स्पर्धा होणार होत्या, त्यामुळे नाही म्हटले तरी आठ, नऊ महिने सहज तिच्याकडे होते. यामुळे पार्कातील व्यायामावर तिने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केले. तिची होणारी प्रगती पाहून गोळेसर यांनाही एक खेळाडू घडवत आणि घडत असल्याचे समाधान लाभत होते. याचमुळे इतर काही सहशिक्षकांना त्यांच्याबद्दल मत्सर जागा झाला, आणि त्यानंतर त्यांनी मुख्याध्यापिकांकडे मीनाच्या रोज संध्याकाळी सरांच्या घरी जाण्याकडे कान फुंकायला सुरूवात केली. करंडे बाईंनाही त्याबद्दल शंका आली पण स्पर्धेनंतर त्यांनी याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. असेच सराव करता करता मीनाचे आठ नऊ महिने निघून गेले.....
आठ नऊ महिन्यात मीना पूर्णपणे बदलली होती, म्हणजे पूर्वीप्रमाणे कृश दिसत नव्हती. तिच्या हातापायांचे स्नायू बळकट झाले होते. शरिराने चांगली कसवट धरली होती. चेहेऱ्यावर तजेला तर नजरेत भेदकता दिसू लागली होती. तारुण्यात येऊ घातलेल्या मीनाचे यौवनही उफाडायला सुरूवात झाली होती. त्यात ही खेळाडू असल्याने तिच्यात एक भरदारता होती, ज्याकडे बघून आता अनेकांनाच भुरळ पडायची. मात्र या त्यांच्या वाखलेल्या नजरेला तिचीही तेवढीच खुन्नशी नजर असायची, या सगळ्या गोष्टी, त्या नजरा भेडसावायला लागत असल्या तरी तिने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तिचे ध्येय गाठण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. अन तो दिवस येऊन ठेपलाच.
स्पर्धेच्या दिवशी अनेक शाळा आंतरशालेय स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सर्वप्रथम धावणाऱ्यांचीच शर्यत ठेवण्यात आली होती. दिवसभर चालणाऱ्या स्पर्धेच्या फेऱ्यांत अगदी सहज प्रतीस्पर्धींवर मात करत मीना अंतिम फेरीत पोहोचली होती. या अंतिम फेरीत मीना अगदी नवखी होती. तर, इतर ४ खेळाडू मात्र गतवर्षाचे विजेते, उपविजेते राहिलेले होते. त्यामुळे मीना आणि त्यांच्यातली ही लढाई अतिशय चुरशीची होती. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे बिगुल फुंकले गेले. सगळ्यांनी धावायला सुरूवात केली. मीनाने लवकरच प्रथम क्रमांकावर धावणाऱ्याच्या सोबतीने धावण्यास सुरूवात केली. आता लक्ष्य काही फुटांवर राहिलेले होते. वेळेचे बंधन या फेरीत नसले तरीही लक्ष्य प्रथम क्रमांकाने पार करणे गरजेचेचे होते, तरच विजेतेपदाला गवसणी घालता येणार होती. मीना जिंकणारच होती तेवढ्यात तिच्या प्रतीस्पर्धेने तिला पाडायचा पुरेपूर प्रयत्न केला. मीनाच्या पायात पाय अडकवून तिला खाली कोसळवण्याची शर्थ प्रतिस्पर्धीकडून करण्यात आली. पण, अशा संकटांवर मात करून जिंकायला मीना कधीच शिकली होती, यामुळे ज्यावेळी ती पडतेय असे तिच्या लक्षात आले, तेव्हा एक मोठा श्वास घेऊन तिने उडी घेतली, आणि तिची विरोधक धावत असतानाच, ती हवेत झेपावत अगदी लक्ष्याच्या सीमेवर येऊन पोहोचली, त्यानंतर अपेक्षित तेच घडले, अगदी सहज आंतरशालेय धावण्याच्या शर्यतीत मीना जिंकली होती. तिची जिद्द, चिकाटी आणि कष्टाचे फळ तिला मिळाले होते. तिचा चेहेऱ्यावर आता अभिमानाचे हास्य उमटले होते. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस, मेडल आणि शाळेसाठी ढाल तिने स्वीकारली. त्यावेळी तिने प्रोत्साहन दिल्याबद्दल आपल्या पालकांचे ऋण मानले. संधी दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांच्याबद्दलही तिने आदरभाव आपल्या बोलण्यातून प्रकट केले. मात्र आपल्या मनोगतात शेवटी तिने विशेष आभार श्री.मंदार गोळेसर यांचे मानले. रोज व्यायाम, सराव करून घेणे. अभ्यासही चुकू नये म्हणून संध्याकाळी त्यांच्या घरी मीनाचा अभ्यास घेणे, पायांना मालीश करण्यासाठी, तसेच इतर औषधोपचार, प्रोटीन्स पावडर, या सगळ्यांसाठी सौ. गोळेसर यांनी मीनाला जी मदत केली होती, त्याबद्दल ती आयुष्यभर त्यांची ऋणी राहू इच्छित होती. या क्षणानंतर गोळेसर आणि मुख्याध्यापिका करंडे बाई यांच्या डोळ्यात मीनाबद्दल, शाळेबद्दल गर्व दाटून आला होता. मात्र मीना आणि सर यांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांच्या डोळ्यात प्रचंड लाज होती, स्वतःबद्दलची !