गरज
गरज


उन्हाळ्याचा भयंकर उकाडा, आणि गर्दीने खचाखच भरलेल्या बसेस. मला उभा राहायला तरी जागा मिळते का याच विचारात असतानाच माझ्या सुदैवाने मला एका सीटवर बसण्यासाठी जागा मिळाली. 'हुश्श' करत आणि मनात हसत मी पटकन बसलो. पुढच्या स्टॉपवरुन एक गरोदर महिला बसमध्ये चढली. ती नेमकी माझ्या बाजुलाच येऊन उभी राहिली. जागा द्यावी लागेल म्हणून मी डुलकीचे सोंग घेतले. इतक्यात आधीपासूनच माझ्या बाजूला बसलेली एक तरुणी उठून उभी राहिली व त्या गरोदर बाईला म्हणाली, "ताई तुम्ही इथे माझ्या जागेवर बसा. तुम्हाला जास्त गरज आहे."
ती तरुणी कुबड्या घेऊन दुसऱ्या सीटच्या आधाराने उभी राहिली.