अलकगंगा
अलकगंगा
टेडी डे
अलक
' मला 50 टेडी हवेत, असा तिने हट्टच केला. आजच्या दिवशी तिला नाराज करायचे नाही म्हणून त्यानेही तिचा हट्ट पुरविला . परंतु इतक्या टेडींचे ती काय करणार असा प्रश्न त्याला सतावत होता.
टेडीने भरलेला रिक्षा तिने अनाथाश्रमाकडे घेतला. आश्रमातील बालगोपालांना टेडी दिल्यानंतरच
तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
' टेडी डे असाही साजरा करता येतो 'हे बोलून तिने गोड स्मित करत त्याचा हात हातात घेतला.
----------------------------------------
अबोला
अलक
परधर्मीय सुन सुलोचनाबाईला नकोशीच होती पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालेना. सुन घरात आली खरी पण सासुबाईंनी मात्र तिच्याशी एका अक्षरानेही बोलत नव्हत्या.
अशीच दोन वर्षे लोटली . सुलोचनाबाईंना अर्धांगवायु झाला .सुनेने त्यांची खुप सेवा केली. तिच्या प्रेमळ स्पर्शाने आणि मधाळ वाणीने सुलोचनाबाईचे मनपरिवर्तन झाले. परंतु हाय रे दुर्दैव!!!! आजारामुळे तोंड वाकडे झालेले. आता इच्छा असूनही त्यांना सुनेचे कौतुक करता येईना.हाच अबोला सुलोचनाबाईस मरणप्राय वेदना देत होता.
-,------------------------ -----------
मिठी (हग डे)
(अलक)
" मनू , तयार झाली नाहीस तू .आज शाळेत जायचे नाही का?" बाबांनी पोळ्या लाटतच विचारले.
"नाही" म्हणून मनू तशीच बसून राहिली.
बाबा सगळे आवरून तयार झाले . तिला कपभर दूध आणून दिले.ऑफिसला जाताना तिच्या हातात एक बॉक्स व चिठ्ठी दिली.बॅग उचलून बाय म्हणत वळले.
मनूने घाईने बॉक्स उघडला. आत सैनिटरी पैड्स व माहितीपुस्तिका होती. तिने लगेच चिठ्ठी वाचायला सुरुवात केली-मनू बेटा,मला आई तर होता येणार नाही पण काळजी मात्र नक्कीच घेऊ शकतो. दुपारी आत्या अन मावशी येतील. त्या तुला सगळे समजाऊन सांगतील.
बाबा दार उघडून बाहेर पडायच्या आत मनू धावतच गेली आणि बाबांना घट्ट मिठी मारली.
--------------------------------------
प्रपोझ डे
(अलक)
खुप दिवसांपूर्वीच त्याने ठरवले होते की आज 'त्या' दोघीनांही प्रपोझ करायचे.
पहिलीने गोड हसून त्याचा स्वीकार केला अन त्याला मिठी मारली.सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तो तिच्यासह घरी आला .
घरी ती त्याचीच वाट बघत दारातच उभी होती.एका हातात पुष्पगुच्छ आणि दुसऱ्या हाताने पहिलीचा हात धरून त्याने तिला विचारले,"माझ्या या चिमण्या परीची आई होशील का?"
होकार म्हणून तिने त्या दोघांनाही गच्च मिठी मारली.
निसर्गालाही 'हे' प्रपोझ आवडले असावे.त्याने एका झोतासह 'ते' रिपोर्ट घराबाहेर काढून दिले.
---------------------------------------
(रोज) रोझ डे
अलक
'हैप्पी रोझ डे' म्हणत तिने वाफाळलेली कॉफी सागरच्या हातात दिली.दिवसभरात त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू त्याच्या बेडजवळ ठेऊन ती कामावर जायला निघनार तोच त्याने तिचा हात धरून थांबवले.दोन्ही पायांनी अधू असलेला सागर बोलू लागला,"माझ्यासाठी तर रोजच रोझ डे आहे. सगळ्या जवाबदाऱ्या सांभाळून तू टवटवीत गुलाबासारखी हसतमुख राहून माझंही सगळं करतेस."
"तीन वर्षापूर्वी उत्साहाच्या भरात तू मलाच रोझ डे विश करायला येत होतास आणि........" तिने
"बाय, टेक केअर " असे म्हणत पर्स उचलली व ऑफिसला जायला निघाली.
---------------------------------------
प्रॉमिस डे (अलक)
टिव्ही सिरियल मधील वृद्ध सासूचा सुनेकडून होणारा छळ पाहून साठीच्या लताबाईंच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या. त्यांनी पदराने हळूच पाणी टिपले.त्याचवेळी प्रिया चहा घेऊन आली. तिने टिव्ही बंद केला.तशा लताबाई जरा घाबरल्याच.
सुनेने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला .किंचित हसून परत स्वयंपाकघरात निघून गेली. केवळ नजरेतून लताबाईला विश्वास दिला ,' सासुबाई, तुम्हाला कधीच दुःखाची झळ लागू देणार नाही.'
----------------------------------------
चॉकलेट डे (दे)
अलक
महागडी चॉकलेट्स का आणली नाहीत म्हणून तिने त्याने आणलेली सगळी चॉकलेट्स रस्त्यावर फेकून दिली आणि आय हेट यू असे म्हणत निघून गेली.बिच्चारा तो उदास होऊन त्या चॉकलेट्सकडे पाहू लागला.
दूर बसलेली एक गरीब आई आपल्या रडणाऱ्या बाळाला समजावयाचा निष्फळ प्रयत्न करत होती की रस्त्यावर पडलेली वस्तू घेऊ नये.बाळ मात्र तिकडे बोट दाखवून हट्ट करत होते.
---------------------------------------
काही अलक माझे
शीला अंभुरे बिनगे
(साद)
परतूर, जालना