STORYMIRROR

Vrushali Sungar

Tragedy

3.8  

Vrushali Sungar

Tragedy

A Mother of Hopes

A Mother of Hopes

12 mins
23.4K


नेहा लहानपणापासून हुशार, दिसायला गोरीपान व सुंदर होती. अभ्यासात हुशार असलेल्या नेहाला शिकण्याची जिद्द होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे भरपूर पैसे कमवून घरच्यांना  सुखी करणे हा एकच  मानस तिचा होता. आईसोबत लहान बहीणही लोकांच्या घरची धुणी भांडी करायची. लोकांच्या घरी जाऊन आपली आई आणि छोटी बहीण हे सर्व काम करत होत्या हे नेहाला आवडत नव्हते.नेहा शिक्षणसाठी बाहेर गावी असल्याने दर महिन्याला तिची आई तिला कसे बसे होतील तेवढे पैसे पाठवायची. Graduation नंतर घरच्यांना आर्थिकदृष्ट्या कश्याप्रकारे मदत करता येईल या विचारत असतानाच तिची नजर नोटीस बोर्डवर असलेल्या एका कागदावर गेली. ‘Hurry UP change your dreams' 

असंच काहीतरी लिहलेलं दिसलं. तो कागद एका लघुपटाच्या ऑडिशनची नोटीस असल्याचे तिच्या लक्षात आले.  हा कागद आपल्या कामाचा नाही असा विचार करत ती पुढे जायला निघणार तेवढ्यात तिची नजर शेवटच्या ओळीवर वर जाते. "निवड झालेल्या कलाकारांना आकर्षक मानधन दिले जाईल". हे सर्व बघून तिच्या डोक्यात चक्र चालू झाले होते. प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार ती करत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुली makeup करून auditorium hall मध्ये जमल्या. एकएक जण पुढे येऊन आपली ओळख करून देऊ लागल्या. बाकींच्या मुलींसोबत नेहाने हि तिला जमेल तशी पण संपूर्ण आत्मविश्वासने acting केली. जवळ जवळ 100 मुलींचे ऑडिशन झाल्यावर दोन तासांनी selected मुलींची नावे नोटीस बोर्ड वर लागली. आपण सिलेक्ट होणार नाही याची खात्री मनात बाळगून नेहा परत रूमवर जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला पळत येऊन सांगितले ," कि तू सिलेक्ट झाली आहेस". रूमकडे जाण्यासाठी वळलेली नेहा आश्चर्याने लिस्ट पाहण्यासाठी notice board च्या दिशेने धावू लागली. लिस्टमधील तिच्या नावाच्या स्वरूपात तिला तिची पहिली कमाई दिसू लागली. 

दुसऱ्या दिवशी नेहा त्या निर्मात्याला भेटायला गेल्यावर प्रशांतने तिला स्क्रिप्ट वाचायला दिली. तिला ती स्क्रिप्ट आवडली. नेहा नव्यानेच सर्व काही अनुभवत असल्यामुळे ती खूप खुश होती. प्रशांतने नेहाला शूटिंग कधी, कुठे आणि किती टप्यात होणार याची माहिती सांगितली. लघुपटाची शूटिंग सुरु झाली. प्रशांतच्या सल्याने नेहा तिच्या acting मध्ये सुधारणा करू लागली. लघुपटाच काम हे अंतिम टप्यात आलं होतं. लघुपाटातून मिळणाऱ्या मानधनातून तिचे काही दिवस तरी सुखात जाणार होते. नेहाला ह्या क्षेत्रात आता रुची वाटू लागल्यामुळे ह्याच क्षेत्रात जीव ओतून काम करायचं असं तिने ठरवलं होतं.लघुपटानंतर नेहाला काही छोट्या मोठ्या संधी मिळाल्या पण या क्षेत्रातील कमी अनुभवामुळे तिला म्हणावे तसे काम मिळत नव्हते आणि त्याचबरोबर तिला आर्थिक चणचण हि भासू लागली. काम नसल्यामुळे नोकरीच्या शोधात ती होती. पैश्यांमुळे आईचे घरकाम वाढले आणि बहिणीच्या शिक्षणाबाबतीत हि अनिश्चितता दिसू लागली. पुढे काय करायचे हा विचार चालू असतानाच तिला परत प्रशांतचा कॉल आला. यावेळी त्याने तिला एका सिरीयलसाठी विचारले आणि याच संधर्भात त्याने तिला चर्चेसाठी घरी यायला सांगितले. नेहाने लगेच होकार दिला. सेरिअलच्या बातमीने ती खुश होती पण शंकेची पाल तिच्या डोक्यात चुकचुकली ती म्हणजे त्याने घरी का बोलावले ?. ह्या आधी त्याने कधीच चर्चेसाठी ‘घर ’ निवडले नव्हते. 

नेहा प्रशांतच्या इमारतीच्या खाली उभी होती.गावाकडे राहणाऱ्या नेहाने कधीच एवढे मोठे प्रशस्त, हवेशीर घरे जवळून बघितले नव्हते. भोवतालचा परिसर न्याहाळत न्याहाळत ती एकदाची दरवाज्यासमोर पोहचली.केस आणि खांद्यावरची ओढणी नीट करतच एक मोठा श्वास सोडून तिने दारावरची bell वाजवली. हसत हसत प्रशांत आणि मेघनाने तिचे स्वागत केले.  त्यांनी तिच्या पहिल्या लघुकथेच्या आठवणींना उजाळा देत चहा पाणी घेत बराचवेळ गप्पा गोष्टी केल्या. नेहा आता बऱ्यापैकी बोलती झालेली त्यांना वाटत होती. मनात संकोच ठेवतच मेघना नेहाकडे बघत तिला सांगू लागली,“मूल होणं हे स्त्रीजन्माचं सार्थक मानलं जातं. मातृत्व हे देवाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे. आई होणे हे स्रियांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. आई होत असताना तिच्यामध्ये शाररिक, मानसिक बदल होत असतात. मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो. आपल्याच हाडामांसाचा गोळा जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा तिला आकाशही ठेंणग वाटू लागते. जर एखाद्या बाईला मुल होत नसेल तर आपला समाज हा तिला एक तर वाळीत टाकतो किंवा पांढऱ्या पायाची म्हणून तिची अवहेलना करतो.कधी वारंवार होणारे गर्भपात पचवून,तर कधी वंशाचा ‘दिवा’ पेटेपर्यंत एका पाठोपाठ मुलींना जन्म देत राहते. ”

आजवर हृदयात दाबून ठेवलेली आईची माया आणि समाजाने स्त्री जातीवर केलेले घात मेघनाच्या शब्दांतून बाहेर पडत होते.त्यांचे लग्न होऊन ६ वर्ष झाले होते पण त्यांना मुल बाळ होत नव्हते. सर्व टेस्ट करून झाल्या होत्या. एक उत्तम आयुष्य जगताना त्या दोघांना बाळाची उणीव नेहमीच भासत होती. त्या भावनेने दोघेही कासावीस होत असे. एकमेकांना घट्ट मिठी मारून रडण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते. त्यांनी बाळ दत्तक घायचा हि विचार केला होता पण काही कारणाने ते शक्य झाले नव्हते. त्यांना नेहाचा एकमेव आधार दिसत होता. नेहाला संपर्क करण्यापूर्वी त्याने तिची सर्व माहिती काढून ठेवली होती.ते तीच सर्व काही करायला तयार होते जर ती मानसिकरीत्या तयार झाली तर. सर्व गोष्टी ह्या गुलदस्त्यात राहतील अशी हमी देखील त्यांनी नेहाला दिली. डॉक्टरांच्या सल्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत.पोटाच्या खळगी भरायला नवीन काम मिळेल गरज भागेल अश्या विचारत नेहा प्रशांतच्या घरी गेली होती. पण क्षणार्धात तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मेघना आणि प्रशांत तिच्याकडून एका बाळाची अपेक्षा करत होते. हा सर्व काय प्रकार आहे हे तिला समजण्याच्या पलीकडचे होते.  

तापलेल्या शिसासारखे तिचे शरीर गरम झाले होते. डोकं भणभण करू लागले होते. सोफ्यावर बसलेली नेहा डोळे विस्फारून, कपाळावर आठ्या आणून प्रश्नार्थक मुद्रेने प्रशांतकडे बघू लागली.त्यामुळे तिचा प्रचंड संताप होत होता. जाणाऱ्या नेहाला मेघना शांतपणे आणि धीराने बोलली कि,"विचार करून तुझं उत्तर सांग". मेघनाकडे वळून बघण्याची तसदी देखील न घेता नेहा घराबाहेर पडली. जाणाऱ्या अपेक्षांना खिन्नपणे बघण्याशिवाय मेघना आणि प्रशांत काहीच करू शकत नव्हते.

रूमवर यायला तिला उशीर झाला होता.कुणाशी हि काही न बोलता फ्रेश होऊन नेहा बेडजवळ असलेल्या खिडकी जवळ उभी होती.तिचं सगळं अवसान गळून पडलं होतं. ती भयाण शांतात तिला खायाला उठली होती. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याखाली किड्यासारखी वळवळ करणारी काही माणसं तिला दिसत होती,जवळच असलेल्या मंदिरात देव ही शांत झोपी गेला असावा असं तिला भासत होते. तिला खूप एकटं वाटत होतं. आईच्या कुशीत डोकं घालून खूप रडावसं तिला वाटत होतं तसं तिने आलेला आवंढा गिळला आणि बेडवर पाट टाकली. रातकिडे किरकिर करायला लागली होती,आभाळ गच्चं चांदण्यानं भरलं होतं आणि ढगांच्यासोबत त्या चंद्राचा लपंडाव चालू होता. ती आता शांत डोक्याने मेघनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करत होती. यामध्ये तिला फक्त पैसे दिसत होते जे तिच्या आईला आणि बहिणीला सर्व कष्टातून मुक्त करणार होते. नेहाला काही केल्या झोप लागत नव्हती. तिला चांदण्याने भरलेल्या काळ्या ढगांत आई,बहीण आणि मेघनाचा चेहरा दिसत होता. तशी ती बेचैन झाली.मध्यरात्रीपर्यंत सारखी कूस बदलत होती.

घरच्यांसाठी बघितलेले स्वप्न, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा तयार झाली आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तिने मेघनाला call केला आणि विचारले कि,“ हे सर्व माझ्यामुळे कसं काय होईल?”.काही दिवसांनी शूटिंग संपल्यावर ते तिघेही हि त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले होते. प्रशांतने डॉक्टरांना पूर्वकल्पना दिलेली होती. डॉक्टरांसोबत औपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी थेट विषयालाच हात घातला.मेघना आणि प्रशांतने निवडलेला पर्याय म्हणजे ‘सरोगसी’.मराठीमध्ये त्याला' पर्यायी माता' किंवा ' पोशिंदा ' असे हि म्हणले जाते. ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भाशय नसते,गर्भ तयार होण्यात अडचणी किंवा एखादे आजारपण ,स्त्रीला प्रस्तुती दरम्यान जीवाला उदभवणारा धोका, हृदयरोग किंवा किडनीच्या आजारांमुळे महिलेच्या प्रसूतीत अडचणी येण्याची शक्यता असल्यास अश्या सर्व परिस्थितीत डॉक्टर सरोगसीचा पर्याय सुचवतात. सरोगसीचे दोन प्रकार असतात. एक ट्रॅडिशनल सरोगसी म्हणजे– जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणूंचे पर्यायी मातेच्या बीजांडाशी मीलन घडवून आणून ते त्याच महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. तर दुसऱ्या म्हणजेच गेस्टॅशनल सरोगसीमध्ये - जोडप्यातील स्त्रीचं बीजांडं आणि पुरुषाच्या शुक्राणूंचं प्रयोगशाळेत मीलन घडवून आणलं जातं आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो. तिच्या शरीरात तो गर्भ रुजला कि नऊ महिन्यांच्या काळानंतर मूल जन्माला येतं आणि त्याचा मोबदला त्यांना देऊ केला जातो.

डॉक्टर जे काही सांगत होते त्याबद्दल तिला आता थोडे थोडे उमगू लागले होते.ते तिघेही आता आपल्या वाटेने निघाले. मेघना आणि प्रशांत हे आता नेहाच्या कॉलची वाट बघत होते. रूमवर आल्यावर चहा घेत ती खिडकीच्या बाहेर डोकावू लागली. डॉक्टरांचा एक एक शब्द तिला आठवत होता.हा पर्याय निवडणे तिच्यासाठी खूप अवघड होते. नेहाचे अजून लग्न झाले नव्हते. कुमारी माता हे ऐकल्यावर तिच्यासोबत कुणी लग्न करायला तयार होणे म्हणजे तिचं नशिबाचं.उराशी मोठी स्वप्नं बाळगून नेहा शहरात आली होती. व्यसनी बापाच्या कचाट्यातून आई आणि बहिणीला तिला सोडवून आणायचे होते. शहरातील गमतीजमती तिला त्या दोघींसोबत बघायच्या होत्या. इज्जतीने कमावलेल्या चार पैश्यातून आईसाठी तिला साडी घ्यायची होती. तिच्या मनात अपराध

ीपणाची भावना जन्माला येत होती.त्या वेगातच तिने फोन हातात घेतला. मेघनाला call करून सांगावे कि ,"मी ह्या कामासाठी तयार नाही". पण नेहाची हिंमत झाली नाही. नेहाने फोन बेडवर फेकून दिला. परिस्थिती समोर तिला झुकावे लागणार होते.  

कोणत्यातरी स्त्री, पुरुषाचा अंश आपल्या गर्भात ९ महिने वाढवणे हि छोटी गोष्ट नाही. एखाद्या स्त्रीला जो आनंद त्या स्थितीमध्ये होत असतो तो आनंद इथे कुठे येणार? आपल्या बाळाची स्वप्न रंगवत ती स्त्री भविष्यामध्ये जाते, बाळाची कल्पना करणे, मुल कसं दिसेल आणि त्याचबरोबर शरीरामध्ये बदल होत असताना एक रोमांच उठणे,असह्य वेदना हि ती हसत हसत सहन करत असते ते फक्त तिच्या येणाऱ्या बाळासाठी. जन्माला आलेला बाळाला ती कुठे ठेऊ आणि कुठे नको करत असते , त्याचं कोडकौतुक करण्यात ती अजिबात थकत नाही. पण नेहाच्या case मध्ये ह्या सर्व भावनिक कल्पनांना काहीच जागा नव्हती. पर्यायी मातृत्वासाठी त्या बाईला मानसिक,शाररिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक पैलूतून जावे लागते. जास्त विचार न करता नेहाने शेवटी मेघनाला होकार कळवला. तिला हे पटत नसून देखील नेहाने आपली तयारी दर्शवली होती.

शूटिंगच्या कामासाठी काही दिवस तरी बाहेरच असणार आहे तर काळजी करू नको असे तिने आईला सांगितले.एका मोठ्या चिंतेतून ती बाहेर पडली होती. घरच्यांच्या सुखासमोर तिला काहीच दिसत नव्हते. पर्यायी मातेच्या रक्ताची तपासणी,एड्स तपासणी,तिला इतर काही आजार आहेत का हे सगळं पडताळलं जातं.या शारीरिक तपासणीबरोबरच तिचं काऊन्सेलिंग हि होतं. ती सरोगसीसाठी शारीरिक तसच मानसिकदृष्टय़ा फिट आहे हे त्यातून स्पष्ट झाल्यावरच गर्भ सोडला जातो.आयुष्यात कधीही रुग्णालायची पायरी नेहाने चढली नव्हती. कधी साधी सर्दी किंवा ताप आला तर घरगुती उपचारावरच ती बरी व्हायची. पण मेघनासोबत नेहाच्या रुग्णालयातील वाऱ्या सुरु झाल्या. नेहाच्या हि या चाचण्या चालू झाल्या. इंजेक्शन्स देण्यासाठी डॉक्टरांनी सुई काढली तसं नेहाला घाम सुटला आणि रडायला आले. घाबरून नेहाने मेघनाचा हात घट्ट पकडला होता. मेघना बहिणीच्या मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला धीर देत होती. सततच्या तपासण्या व गोळ्या घेत असताना नेहा शाररिकरित्या दमून जायची तेव्हा मेघना सतत तिच्या सोबत राहून तिला आधार द्यायची. नेहाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहा होती.

डॉक्टरांनी ठरवलेल्या दिवशी ते तिघे रुग्णालयात दाखल झाले. फलित झालेल्या बीजाचे तिच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले गेले. तिची मानसिक अवस्था मेघनाला समजत होती. नेहाला वाटले तितके सोपे नव्हते सर्व. मेघना मनातून घाबरली होती. आज परत एकदा तिला नेहाला घेऊन डॉक्टरांकडे जायचे होते. ती मनोमन देवाचा धावा करत होती. गर्भ पूर्णपणे नेहाच्या गर्भाशयात रुजला कि नाही हे बघण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती. नॉर्मल रिपोर्ट्स बघून मेघनाने मोठा सुस्कारा सोडला.नेहा आणि मेघना आता प्रत्येक दीड महिन्यांच्या अंतराने सोनोग्राफी तपासण्या करण्यासाठी जाऊ लागल्या . 

नेहाच्या शरीराचा आकार बदलत चालला होता. तिच्या पोटात काही तरी असल्याचा अनुभव तिला येत होता. कधी कधी मेघना नेहाच्या पोटावरून हात फिरवत बाळाचा स्पर्श अनुभवत होती. नेहाला मात्र कधी एकदा ह्या सर्वांमधून तिची मुक्तता होते असं वाटायचं. त्यानंतर काही महिन्यामध्येच तिने एका गोंडस अश्या मुलीला जन्म दिला. मेघना आणि प्रशांतला जग जिंकल्या सारखं वाटू लागले. नेहाने बाळाला त्यांच्या हाती सोपवले.नेहाच्या एका होकारामुळे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण आले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला पैसे दिले. एवढे पैसे दिले कि ते कमवायला तिला खूप वर्ष गेले असते. एक भाड्याच घर नेहाने घेतले.एकट्या असलेल्या आपल्या आईला आणि बहिणीला तिने आपल्याकडे बोलावले.

नेहा आता घरीच होती. आई आणि बहिणीला शहरात बोलावून घेतल्यामुळे तिची जबाबदारी वाढलेली त्यामुळे तिला आता काम हवे होते. तिच्या कामात बराच खंड आल्यामुळे कामाचा ओघ हि कमी झालेला. तिच्याकडे असलेले पैसेही संपत आले होते. प्रशांतच्या बहिणीला बाळाबद्दल माहिती होते. तिच्या बहिणीच्या ओळखीतील एका बाईला बाळ होत नव्हते. म्हूणन तिने नेहाबदल तिच्या भावाला विचारले. ती बाई तिला आदीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार होती. प्रशांतने नेहाला परत विचारले तेव्हा नेहा कोणतेही आढेवेढे न घेता तयार झाली. पण त्या बाईची एक अट होती कि नेहाने तिच्या घरी येऊन राहायचे. नेहाने विचार केला कि पैसे मिळत आहेत तर काय हरकत आहे तिच्या घरी राहायला.

परत एकदा नेहाने शूटिंगचं कारण पुढं केलं. नेहा तिचं सामान घेऊन त्या बाईकडे राहायला गेली. दिवस जात होते.नेहाला ती बाई रोज कीर्तन ऐकायला घेऊन जायची . नेहाला ते मुळीच आवडत नव्हते आणि त्याची सवय पण तिला नव्हती. तिला त्या बाईचा राग यायचा. मूड नसताना हि नेहा रोजच जाऊन बसू लागली. नेहाच्या हि नकळत तिच्यात आता बदल होत होते. कीर्तनावरून आल्यावर ती पोटात असलेल्या बाळासोबत गप्पा मारू लागली. मागचा एक अनुभव असला तरी या वेळेस ची pregnancy तिला काही तरी वेगळीच भासू लागली. यावेळी पैश्याची जागा मात्र मायेने,वात्सल्याने, मातृत्वाने घेतली होती. आता तिला पैश्यापेक्षा हि आईपण जास्त मोलाचं वाटू लागलं. आई होणे म्हणजे काय असते?नेहाला आता मेघनाच्या शब्दांचा सूर गवसला होता. दिवसागणित बाळाचं आणि तिचं नातं वरचेवर बोलकं होऊ लागलं.

नेहा आता आपणहुनच कीर्तन, भजनला जाऊ लागली.सर्व काही ठरलेलं असताना हि नेहा पोटातल्या बाळामध्ये गुंतत चाली होती. देवासमोर नेहा जेव्हा हि उभी असायची तेव्हा तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत असत. पण त्या दोघंमध्ये तिला त्या बाईची अडचण वाटत होती. बाळाशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे कधी कधी तिला वाटत होते कि,’हे बाळ माझं आहे मी का देऊ कुणाला?’.कुणाशीच काही घेणे देणे नसल्यासारखी नेहा आता वेड्यासारखी तासन्तास बाळासोबत गप्पा मारायची.

काही दिवसांनी एका झळझळीत सत्याला तिला सामोरे जायचे होते. ह्या गोष्टीचा जणू तिला विसरच पडला होता. एक असे सत्य कि विज्ञानाच्या युगात केल्या गेलेल्या प्रयोगामध्ये तिच्या भावनांची राखरांगोळी होणार होती. अखेरीस तो दिवस आला.नेहाने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला होता. माझं बाळ करीत करीत ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यावर नेहाने बाळाला डोळ्यात साठवून घेतले. काळजावर दगड ठेवतच बाळाला त्या बाईच्या हाती सोपवले होते. पण त्या घरातून तिचा पाय निघत नव्हता. बाळाच्या रडण्याचा आवाज तिला कावारा बावरा करून सोडत होता. त्या बाईला कळकळीची विनंती करून नेहाने तिथेच काही दिवस राहण्याची अनुमती मिळवली. बाळाला पळून घेऊन जाण्याचा तिने प्लॅन केला. पैश्यांची भरलेली बॅग नेहाने बाळाच्या झोपाळ्याजवळ कधीच ठेवून दिली होती आणि काळोख्या रात्री ती बाळाला घेऊन घराबाहेर पडली. काही अंतर चालत चालत आल्यावर नेहा भानावर आली. काय करत आहोत आपण हे? आज माझ्यामुळे कुणाला तर आई होण्याचं सुख मिळत आहे आणि तेच मी ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भानावर आलेल्या नेहाने मागे वळून बघितले तर घरापासून आपण खूप लांब चालत आलोत हे तिच्या लक्षात आले. बाळाकडे परत डोळे भरून बघत ती भरभर बाळाचे मुके घेत असतानाच पावसाच्या थेबांमध्ये अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचं पावलांनी ती घरी आली. तिच्या कुशीत झोपलेल्या बाळाला तिने अलगतच झोपाळ्यात ठेवले. परत एकदा बाळाला तिने डोळे भरून बघितले आणि मुसळदार पावसात झाप झाप पावले टाकीत तिने आपला मार्ग निवडला. 

नेहासारख्या अनेक मुली/बायका आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी नसल्यामुळे , गोरगरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या असल्यामुळे या महिला सरोगसीसाठी नाईलाजाने तयार होतात.सरोगसी नंतरच्या दुष्परिणामांना तिलाच चार हात करावे लागतात.यात नैसर्गिक काहीच नसल्यामुळे मातेला मोठ्या दिव्यातून जावे लागते. सरोगसीसाठी गरजू महिलांना तयार केले जाते. तिच्या येणाऱ्या पैस्यांवर संपूर्ण कुटुंब पोसले जाते. या सर्व गुत्यांमध्ये कधी कधी ती बाई त्या बाळावर आपला हक्कही दाखवू शकते. काही माता पोटातील बाळासोबत भावनिकरित्या नकळत बांधल्या जातात अश्या मातेला ते बाळ दुसऱ्याच्या हाती सोपवताना अपार यातनांना सामोरे जावे लागते. 

‘ सरोगसी तंत्रज्ञानांचा नेमका वापर कुणी करावा ?’ या बदल वारंवार प्रश्न उपस्थित होत असतात.सरोगसी शब्दावरून अनेक मोठी वादळे नेहमीच सुरु असतात. श्रीमंत लोकांसाठी ,ज्यांना एकल पालकत्व हवे आहे, ज्या बायकांना पैसे देऊन स्वतःच्या प्रस्तुतीच्या वेदना दुसऱ्या स्त्रीच्या माथी मारायच्या असतात किंवा आपला शाररिक बांधा ढळू द्यायचा नसतो अश्या लोकांमुळेच 'सरोगसीचे बाजारीकरण' झाले आहे. गरीब मातेचे गर्भ भाड्याने घ्यायचे हा नियम फक्त अश्या जोडप्यांना लागू होतो ज्यांना मुलं होऊ शकत नाहीत. पण आता तीच गोष्ट शौक बनत चालली आहे.

१९७८ ला स्त्रीचे बीजांड शरीराबाहरे काढून एखाद्या प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रक्रियाकरून मग ते त्याच किंवा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात सोडले जाते त्याचा शोध लागला आणि ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरली गेली होती. काही लोक ह्या अविष्काराचा योग्य तसा उपयोग करत ही आहेत आणि जे करत नाही त्यांच्यासाठी कायदा आहे. एखाद्या बाईला मुल होत नसेल तर दुसरी बाई म्हणजेच -पोशिंदा त्या बाईला  मातृत्व देऊन जाते. बुद्धीच्या बळावर मानवाने आतापर्यंत अनेक संशोधने केली आहेत आणि पुढे हि चालत राहतीलच. कुणे एकेकाळी वाटायचं कि हे सर्व काल्पनिक आहे. असे होणे शक्यच नाही . पण मातृत्व किंवा आईपण ह्या काही भाड्याने घायच्या गोष्टी नाहीत. मातृत्वा सारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गर्भाचे बाजारीकरण ह्या पुढे करू नये.' आई थोर तुझे उपकार' आपण अभिमानाने तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा अश्या मातांचा निःस्वार्थ त्याग समाज निसंकोच मनाने स्वीकारेल. हीच खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली तर पैसे , कायदा या पेक्षा माणुसकी नकीच श्रेष्ठ ठरेल.




Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy