कातिल पाऊस
कातिल पाऊस
हातात वाफाळलेला चहा आणि डोक्यात धूसर विचार. घरातील खिडकीच्या ऐका कोपऱ्यात उभा राहून चहाचा एक एक घोट घेत पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या त्या चिमुकल्या मुलांना बघत असताना नकळतच त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य रेखाटले. कधी त्या मुलांना तो निरखत होता तर कधी आकाशाकडे बघत होता. जमिनीवर अचानक पडलेल्या गुळाला जश्या मुंग्यांनी घेरा घालावा तसं आकाशात ढगांनी दाटी केली. काही क्षणापूर्वी पांढरं शुभ्र वाटणारा आकाश आता काळकूट दिसू लागलं .
खिडकीतूनच त्याची नजर बस स्टॊपवर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गेली. तिने बहुदा छत्री विसरली असावी. त्याला ती खिडकीतून अंधुक दिसत होती म्हणून त्याने खिडकीचा दरवाजा अजून थोडं खुला केला. आता मात्र त्याला ती नीट दिसू लागली. तिची प्रत्येक हालचाल त्याला अगदी व्यवस्थित दिसतं होती. अचानक आलेल्या सरींनी तिला पुरते नाहू घातले होते. त्यामुळे ती थोडीशी त्रासलेली भासत होती. पाऊसाचे दिवस चालू असताना छत्री जवळ ठेवायची एवढी साधी गोष्ट समजत नाही असं तो मनातल्या मनात बोलत होता. पण भिजलेली ती आणि तिला भिजवायला मागे पुढे न बघणारा पाऊस आणखीन जास्तच कोसळत होता. एका हाताने बॅग सांभाळत तर दुसऱ्या हाताने केसातील पाणी काढण्यात ती मग्न होती. तिच्या केसातून पडणारा प्रत्येक थेंब हा त्याच्या हृदयावर जाऊन पडत होता. इकडे तिकडे बघत असताना तिच्या मानेवरून नागिणीसारखे फिरणारे तिचे लांब केस त्याला घायाळ करत होते. कपड्यावरील पाणी झटकताना पुढे मागे होणारे तिच्या कानातील झुबे आणि कोरीव भुवया खाली असणारे हरणी सारख्या तिच्या पाणीदार डोळ्याची होणारी कातिल उघड झाप. कपाळावरून ओघळणारे पाऊसथेंब आता तिच्या गालावर येऊ लागले. हातावरील नाजूक मनगटावर असलेले नाजूक घड्याळाची काच अलगद पुसणारी ती न थांबणाऱ्या पावसाकडे काहीतरी अपेक्षेने बघत होती. निसरड्या रस्त्यावर चालताना पाय घसरणार तर नाही आणि आपल्याकडे कुणी बघत तरी नाही ना म्हणून नजरेनेच एक कटाक्ष सगळीकडे ती टाकत होती. काही अंतर कापल्यावर पावसाने परत जोर धरला तशी ती मागे वळली. रिमझिम पावसात तिचे अर्धे अधुरे भिजलेले शरीर. हा पाऊस कधीच थांबू नये अशी त्याची कामना होती. मात्र त्या जुलमी पावसाला हे मान्य नव्हते. एव्हना त्याच्या कपातील चहा संपलेला म्हणून तो परत एक कप चहा घ्यायला आतील खोलीत जाऊन येईपर्यंत त्याची ‘ती’ नाहीशी झाली. जाणाऱ्या बसकडे तो खिन्नपणे बघत राहिला. प्रत्येक वर्षीच्या पावसात तिचे ते पाणीदार डोळे त्याला आठवतात. त्या दिवशी तिच्या सोबत पावसात तो ही भिजला देहभान विसरून.
आभाळ भरून आलं,
वाऱ्याला कोणी आमंत्रण दिलं?,
हवेतला गारव्यानं मला जखडलं,
मुसळधार पाऊस पडणार, असं वाटलं,
आणि तो पाऊस, हो तोच पाऊस,
तुला माझ्यापासून दूर वाहवत नेणार,
हे मला ठाऊक नव्हतं....
त्या संध्याकाळी,
माझ्या मनाचं आभाळ भरून आलं,
मला गहिवरून आलं,
थंडीचं अंगभर काकडं भरलं,
माझ्याच अश्रूंच्या थेंबानी,
मला चिंब-चिंब भिजवलं,
तुला "निरोप" देताना,
डोळ्यांसमोर धुकं साचलं,
"तुझ्या-माझ्यात",
सातासमुद्राचं अंतर पडेल,
हे मला ठाऊक नव्हतं....