Nagesh S Shewalkar

Romance

4.3  

Nagesh S Shewalkar

Romance

इलक्शन असं विलक्षण!

इलक्शन असं विलक्षण!

11 mins
4.1K


                     •••• इलक्शन असं विलक्षण ! ••••                                                                तालापूर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि सारेजण खडबडून जागे होत कामाला लागले. तालापूरपासून जवळ असलेली एक छोटी वाडी तालापूर गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट होती. या ग्रामपंचायतमधून वाडी वेगळी झाली आणि तिला पूर्ण ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. त्यानंतर प्रथमच वाडीची स्वतंत्र निवडणूक होत होती. गावातील मातब्बर व्यक्ती रामजी पाटील हे स्वतःचा पँनॉल उभा करण्याच्या विचारात असताना गावातील एक तरुण जगनने गावातील लोकांची बैठक स्वतःच्या लहानशा घरापुढे आयोजित केली होती. बैठकीला माणसे जमलेली पाहून जगन म्हणाला,

"तर गाववालेहो, आज म्या बलीवल हाय त्यामांघ येक कारण हाय. तुमाला ठाव झालच आसल की, आपल्या वाडीची गराम पंचायतीची निवडणूक लागली हाय. मी ईच्चार केला की, तुम्हा सर्वांचा तयारी आसल तर आपून बी येक प्यानल उभा कराव का?"

"गराम पंच्यातीची निवडणूक म्हंजी रामजी पाटील उभं राहील की."

"बापू, त्याच आस्स हाय, पाच सालात पाटलानं वाडीचा आसा कोणता ईकास केला ते तर सांगा.

गट पंचायत व्हती तव्हा आपली वाडी लहान व्हती. आपल्या वाडीच्या नावानं आलेल्या समद्या योजना तालापुरला गेल्या. तालापूर वाडीच्या नावानं आलेल्या पैक्यातून गाव कोन्त सुधारलं तर तालापूर. वाडीला आस काय मिळालं? आसा सवतीसुभा कावून? आजपस्तोर आपून त्येंच्या तालावर नाचलो..."

"जगन,तालापूर म्हंजी मोठ्ठं गाव. बडे बडे लोक तिथ राहत्यात. त्येंच्या म्होर पाटलाची डाळ शिजली नसल. कस हाय बघ, मोठ्या डेरेदार झाडाखाली दुसरं ल्हान रोपटं वाढत न्हाई. दिसागणिक सुकत जाते..."

"तस न्हाई काका, पाटलानं आवाज का न्हाई उठवला? ह्येंच काही चाललं नसल तर त्येंनी वाडीतल्या लोकांना का नाही सांगलं? आपून तालापुरला जावून भांडलो आस्तो."

"आरं, भांडणानं का ईकास व्हतो रं? दुश्मानकी मातर वाढते."

"भांडण म्हंजी काय मारामारी न्हाई तात्या. आपून समद्यांनी आवाज उठवला तव्हा कुठ आपली वाडी गट गराम पंचायतीतून आलग झाली. आपून सारे याबाबत भांडत व्हतो तव्हा बी रामजी पाटील आले काय? न्हाई आले. आपल्या वाडीचा ईकास कराया आसा गुळमूठ माणूस चालायचा न्हाई. वाडीतून सात मेंबर निवडायचे हात. त्यात दोन बायाबी हाईता."

"मंग तर लै झ्याक झालं राव."

"म्या आस्स आयकिल हाय की, रामजी पाटील त्येंच प्यानल तैयार करणार हाईत."

"घ्या मंग. पाटलानं प्यानल तयार करताना समद्या गावाला इचाराय फायजेत का न्हाई? म्हणून म्या ही मिटिंग बोलावली हाय. म्हन्ल आपली बी मान्स फायनल करावी."

"आर, सुका समाधानात राहणाऱ्या वाडीत दुश्मानकी करू नका."

"म्या कुठ दुश्मनी करतो काका? लै साल झाले रामजीमामा, मेंबर हाईत. त्येंनी काय कामं केली? तालापुरला चार पाच खोल्या साळंसाठी बांधल्या पर वाडीला येक तर बांधली? तालापुरला पंद्रा-ईस हापशे केले. वाडीला एक तर...आवशदीला. नळयोजना मंजूर झाली वाडीसाठी पर झाली कुठं तालापुरला..."

"बराबर हाय, जगन्याचं. तालापुरच्या नाल्यातून पाणी बी वाहाय लागल पर वाडीत गटारगंगा पसरतीया. ईथं म्हैना, म्हैना लैट नसती पर तालापुरच्या नळ्या दिसभर चालूच. तालापुरला गुळगुळीत डांबरी रस्ते आन आपल्या इथं हात हात खोल खड्डे."

"घरपट्टी माघाय मातर नेमानं यायचे. म्हणून माझा आसा इचार हाय की, या वक्ती उभं राहायचं. निवडून आलो की, ईकास कसा आसतो त्यो पाटलास दावायचं."

"जगन्या, आस वार पेवू नगस. रामजी पाटील लै मोठा माणूस हाय. वक्ता-बेवक्ताला त्योच धावून येतो. त्यापरी आस करा, त्ये काय म्हणतात ते ईरोध न करता निवडणूक घ्या."

"म्या तैयार हाय. बिनविरोध निवडणुकीला. पर रामजी पाटील? घटकाभर आस समजा रामजीमामा तैयार झाले न्हाई तर आपून आपले मेंबर तैयार करून ठेवू."

"ठिक हाय. तुमच्या मनाजोगत होऊ द्या. पर येक ध्यानात ठिवा, दुश्मनी वाढवू नका."

"तर मंग सांग जगन्या, फुड काय करायचं?"

"म्या काय सांगणार?"

"च्या मारी, मैदानात उतरायच्या पैलैच आवसान गळालं का?"

"सात सिटात दोन सिटा बायास्नी. तव्हा पैले बाया ठरवा."

"वाडीत कोणी हिरोणीबी न्हाई."

"कार बाबा, तुहा डोळा हिरोणीकडं कावून रं?"

"आजकाल समदे हिरोणीला तिकिट द्यायलेत. आपून कावूं मांघ राहायचं? गल्लीपासून ते दिल्लीतक तेच हाय. मंग आपून बी तसंच करुत की."

"आरे, आपली शांती का कोण्या हिरोणीपेक्शा कमी हाय."

"शांती? ती येश्शा ? आर, गावाचा ईकास कराया ती कहापायी?"

"तात्या, गावाचा ईकास कराया तशीच बाई फायजेत."

"म्हंजी ?" तात्याने विचारले.

"अव्हो तात्या, उंद्या गावात सायेब या आमदार-खासदार आला ना की, त्याच्या म्होर ईकासाचं परपोजल घिवून खास दारानं जाणारी बायच फायजेत."

"तर मंग शांती ठरली का?"

"ठरलीच. आता दुसरी बाय बघा."

"दुसरी...आं आं ... आर, काखत कळसा, गावाला वळसा...मैनी हाय की."

" येक शांती आन दुसरी मैना... वाडीच्या इकासाला चार चाँद लागणार."

"आता गडी ठरवा. पैला जगन...दुसरा सका पैलवान."

"बापो ,त्यो पैलवान कहापायी? राजकारण म्हंजी काय कुस्तीचा आखाडा व्हय रं?"

"आखाडाच हाय जी. समजा उंद्या तालुक्याला मोर्चा नेयाची पाळी आली तर संग पैलवान गडी आसला म्हंजी बरं..."

त्यांची चर्चा चालू असताना ग्रामपंचायतचा नोकर धापा टाकत तिथं पोहोचला आणि म्हणाला,

"जगन... जगनबाबू, तुमास्नी रामजीमामानं बिगीनं बलीवलय. सम्दा गाव जमलाय."

"काय काम हाय रे?" जगनने विचारले.

"मला ठाव नाय. म्या सांगकाम्या. चला. जल्दी चला."

"जगन्या, रामजी लै समजदार हाईत. बलीवल का नाही तुला? आता तू बी जास्ती ताणून धरू नगस. पाटील देतील तेवढच गुमान घे."

"बर..बर. चला." असे म्हणत जगन निघाला. पाठोपाठ सारे पाठीराखे ही निघाले. तो लवाजमा काही क्षणात रामजीच्या घरी पोहोचला. त्यांना पाहताच रामजी म्हणाले,

"या. या. बसा."

"पाटील, कशापायी बलीवल?" तात्यांनी विचारले.

"तात्या, आपल्या वाडीची निवडणूक लागलीय. दोन दिवसात फारम भरायचे आहेत. तव्हा म्हणल गावातल्या जुन्या-जाणत्या लोकांचा विचार घ्यावा."

"पाटील, ते ठिक हाय. या वक्ती वार जरा निराळच हाय. तरणीताठी पोरं म्हणत्यात की, पाटलानं पोरांना पुढी करावं."

"त्यासाठी तर मी समद्यांना बोलावलंय. ठिक हाय, मी माघ राहतो. कोण पुढे येणार आहे?"

"पाटील, आस करा, वाडीचा पैला सरपंच म्हणून जगन्याला गुलाल लावा."

"जगन्या, तू तैयार आहेस का?" पाटलांनी विचारले.

"समदे म्हणत असतील तर मी तैयार हाय." जगन म्हणाला.

"झालं तर मग. जगन्या सरपंच आन् बाकी सहा माणसं माझी." रामजी म्हणाले.

"रामजीमामा, लै न्हाई, पर थोड राजकारण मला बी कळतं" जगन म्हणाला.

"यात राजकारण ते कोणते? सरळसरळ आहे की."

"न्हाई पाटील, न्हाई. ग्यानबाची मेख हाय. मी सरपंच झालो पर बाकी मेंबर तुमचे आसले म्हणजे कव्हाबी अविश्वासाचा ठराव आणून मला काढून टाकायची सोय केली हाय की...." जगन बोलत असताना एक म्हातारा म्हणाला,

"सरपंच कुणी बी व्हा. पर व्हणाऱ्या सरपंचाने एका कामाची हामी भरावी."

"ती कोणती?"

"समोर बघा, मारूतीराया, उघडाबोडखा बसलाय. ऊन, पाऊस, थंडी समदं सोसतोय. तव्हा ज्याला कोन्ला बिनविरोध सरपंच व्हयाचं हाय त्येन मंदिरावर तारस घालावं"

"व्वा! व्वा! काका, लै जोरदार नाटक हाय की."

"नाटक ते कसं काय?"

"पाटील, समद्या गावाला ठाऊक हाय की, जगन्या रातच्या भाकरीला मोताज हाय. "

"निवडणुकीचे रंग उधळायला निघाला न्हव, मग उद्या मतदारास्नी पैसा द्यायला कोठून आणणार आहेस?"

"मी त्यासाठीच ऊभा राहणार हाय. एक मत विकू देणार न्हाई की विकत घेणार न्हाई."

"आर, आस तुला न मला घाल कुत्र्याला करू नका. आस्स करा, रामजीमामाला सरपंच आन जगन्याला उप-सरपंच करा. मेंबरचं म्हणाल तर येक बाई रामजीची आन् दुसरी बाई जगन्याच्या गटातली घ्या. एक-एक गडी दोघायचा घ्या आन् राहिला एक मेंबर तो टॉस करून घ्या."

"न्हाई. न्हाई. आस जमणार नाही. जगन्याची जास्ती माणसं घ्यावी लागतील."

"आस्सा हाट्ट करू नका. लै ताणून धरू नका."

"ताणून न्हाई. आमचं मंजूर नसल तर ..." जगनला मध्येच थांबवून रामजी म्हणाले,

"जगन्या, बोल तुला किती रुपये पाहिजेत? हजार.. दोन..पाच..दहा हजार..बोल."

"रामजीमामा, ह्यो लिलाव नाही."

"ठिक हाय. आस्सी गुर्मी हाय तर होऊन जाऊ द्या इलक्शन. ज्येची जागा त्याला दिसलच." रामजी पाटील रागारागाने म्हणाले.

"हां. हां. दिसलच. न्हाई जिरवली येकेकाची तर जगन्या नाव न्हाई लावणार."जगन म्हणाला.

"फुकून टाकील एकेकाला. म्हणं सरपंच व्हयाचं हाय. जा. चालाय लाग. फातोच कोण ऊभे राहते ते." रामजी रागारागाने ओरडले.

"पाटील, आमचा प्यानल तैयार हाय." म्हणत जगन त्याच्या माणसांसोबत निघून गेला.

"कोण हाईत रे ह्यांची माणसं? शोध घ्या जरा. दाखवू इंगा." रामजी चिडून म्हणाले.

"पाटील, जरा दमानं घ्या. आक्रोस्ताळपणाची ही येळ न्हाई. जे करायचं ते थंड डोस्क्यानं करा. कायद्याच्या चौखटीत बसल आस." कुणीतरी रामजींना समजावले.

"बरोबर आहे. आता फा तर गंमत..." असे म्हणत रामजींनी फोनवर आकडे जुळवले.......

   फॉर्म भरावयाचा दिवस उजाडला. तशी वाडीत निराळीच धांदल सुरु झाली.         "आर, जा. त्या मैनेला आन् शांतीला बोलावून आणा. नखरा करू नका म्हणून सांगा. फारम भराय जायचं हाय, नाचाय न्हाई. पैलवान बी कुठवर आलाय ते बघा."

"जगन्या, मला शोधायची गरज न्हाई. मी एक सांगाय आलो की, मी काही फारम भरणार न्हाई."

"पैलवान, काय म्हणलास तू? फारम भरणार न्हाईस ? पर कामून?"

"जगन्या, भल्या सकाळीच पाटलाची मान्सं आलती. फारम भरशील तर याद राख. तुकडे गावायचे न्हाईत आसा दम भरून गेली..." पंचक्रोशीतील कुस्तीचे फड गाजवणारा पैलवान थरथर कापत म्हणाला.

"जगनबाबू, इलक्शन कव्हा हाय वो?"

"मे म्हैन्याच्या दोन तारकेला."

"घोटाळा झाला की राव, दोन मे ला तर मह्या लग्नाची तारीख धरली हाय."

"मग त्यात काय झालं? पुढी ढकल की तारीख?"

"कसं जमायचं ? पत्रिका छापल्या आन् मुळ बी धाडलीत. जगन्या, आस कर की, सायेबाला कायबाय खारीमुरी देऊन इलक्शन जरासं पुढी ढकल की..." पैलवान बोलत असताना जगनने निवडलेला दुसरा उमेदवार म्हणाला,

"मह्या जागी बी दुसरा माणूस बघा राव."

"का रं बाबा ?"

"त्याचं आस झालं पिढ्यानपिढ्या रामजीमामाकडे गिरवी आसलेली मझी जिमीन पाटलानं सम्दं कर्ज निल करून मझ्या ताब्यात दिली. तसा कागुदबी केला हाय."

"बर. आस्स हाय काय. आजुक कुणाला काही सांगायचं हाय का?" जगनने विचारले. तसे देशमुख म्हणाले,

"कसं सांगू जगन, पाटलानं मह्या नातीची सोयरीक त्येंच्या पुतण्यासाठी पक्की केलीय. रातीच लगीन बी धरलय."

"आस्सा डाव खेळलात का पाटील? पर म्या इलक्शन लढवणारच. मझे मान्स फोडता काय? बघतो आता येकेकाला."

"जगन्या, आजूकबी येळ हाय. माझं ऐक. राजकारण येड्या गबाळ्याचं काम न्हाई. सरपंच सोड पर उप-सरपंच तर व्हशील. जाय. पाय धर रामजीमामाचे."

"न्हाई. ते जमणार न्हाई. सरपंचच व्हणार मी. आणा ते फारम.." असे म्हणून जगनने फार्म हातात घेऊन त्यावर सरसरी नजर टाकत म्हणाला,"हे फारम भरायचे कसे?"

"घ्या. समदं मुसळ केरात. भरता येईना फारम आन् निघलाय सरपंच व्हयाला." कुणीतरी म्हणालं आणि तिथे खसखस पिकली.

"गावात पैलेच इलक्शन तव्हा कोन्लाबी फारम भरता येणार न्हाईत."

"आर, रामजीमामाच्या प्यानलचे फारम कोण भरतेय ते बगा तर...." जगन बोलत असताना जगनच्या घरासमोरून एक वकील जात होते. त्यांना पाहताच जगनला काहीतरी सुचले. जगन त्या वकिलांकडे धावत जाऊन म्हणाला,

"सायेब, रामराम. एक काम व्हतं. इलक्शनचे फारम भरायचे व्हते."

"त्याच काय आहे, रामजी पाटलांच्या गटाचे फॉर्म भरायचे आहेत. त्यांच्याकडेच जातो. पहिले ..."

"ठिक हाय. तसे..." म्हणत जगनने त्यांच्या कानात काही तरी सांगितले. ते ऐकून मुरक्या मुरक्या हसत वकील निघून गेले........

   वकिलाच्या भेटीने आणि कानगोष्टीने आनंदित झालेल्या जगनने ताबडतोब दोन एक्कर शेत गहाण टाकले. रामजींनी फोडलेल्या माणसांच्या जागेवर दुसरे माणसं निवडून सर्वांना नजर कैदेत ठेवल्याप्रमाणे घरातच ठेवले.... थोड्या वेळात रामजी पाटलांकडून मोठ्या खुशीत परतलेले वकील म्हणाले,"चला. आता तुमचे फॉर्म भरूया. प्रथम महिला उमेदवार... स्त्री मुक्ती..."

ते तसे म्हणताच मैना पुढे आली. तिला पाहताच वकिलांना आश्चर्याचा धक्का बसला . हसतहसत त्यांनी विचारले,

" वहिनी, सांगा तुमचे वय?" 

हसत-लाजत मैना म्हणाली, "लिवा की ईस...बाईस."

"वीस....बावीस? " वकिलांनी विचारले तसे मैना मान हेलावत म्हणाली,

"लै व्हतय का? मग लिवा पंद्रा-सोळा."

"अहो, तुमचं वय यादीत चाळीस लिहलय."

"चाळीस? न्हाई व्हो. लय झालं तर पंचवीस लिहा. पण यादीत वय टाकल कुणी? त्या मास्तरड्यान यादी केली ना. थांबा. ये म्हणाव मग सांगते. "

   काही वेळात दोन्ही गटाचे फॉर्म भरून वकिलसाहेब बॅग छातीशी धरून कारमध्ये बसून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ रामजी पाटलांचा गट तर त्यांच्या मागोमाग जगनही त्याच्या पाठीराख्यांसह तालुक्याच्या दिशेने निघाले.

   तालवाडीत निवडणुकीचं वारे वाहू लागले. लोक गटागटाने चर्चा करू लागले. शांता-मैनाकडे लोकांची रीघ लागली. जगन व त्याच्या लोकांनी गावात फेरी मारून लोकांशी चर्चा करताना प्रचारात आघाडी घेतली. त्या मानाने रामजी पाटलांच्या गोटात शांतता होती. त्यांचं अवसान गळालं अशी समजूत करून घेऊन जगनच्या गटात उत्साह पसरला. निवडणूक जिंकल्याच्या आनंदात सारे नाचत असताना वाडीतील जुने-जाणते लोक सावधपणे म्हणू लागले,

"आसं माकडावाणी नाचू नका. त्यो रामजी हाय. कव्हा तिरकी चाल खेळल त्येचा पत्ता लागायचा न्हाई. .."

"मामा, आता चालीबिली इसरा...." जगनचा साथीदार म्हणाला. चर्चे-चर्चेत मध्यरात्र झाली तरीही जगनकडे बैठक चालूच होती. कुणीतरी म्हणाले,

"आता समदेच हाईत तर ते चिन्नांचं ठरवा की."

"उंद्या फारमायची छाननी हाय तर उद्याचा दिस थांबा की."

"छाननीत काय व्हणार? आपले मान्स आन फारमबी फिट्ट हायेत. फारम मी येऱ्यागबाळ्यानं न्हाई तर वकिलानं भरलेत.

"त्यात ठरवायचं काय? शांतीला द्या आंबा..." 

"योक न्हाई तर दोन आंबे..." कुणीतरी म्हणाले आणि त्यावर पिकलेली खसखस थांबते न थांबते तोच दुसरा म्हणाला,

"मैनीला द्या राघो.....चोचीत चोच अडकलेला."

"जगन्या, तू घे बाबा, छत्री! सरपंच झालाच तर तारस तर न्हाई पण छत्री धरशील मारोतीच्या डोक्यावर...."

"आणिक सखारामला द्या कंदील... रातभर गावात हिंडून उजेड तर पाडल." 

अशा गप्पा टप्पा करताना रात्री उशिरा बैठक संपली आणि सारे घरोघरी परतले....

   दुसरे दिवशी निवडणूक लढवणारे दोन्ही गट लव्याजम्यासह तालुक्याला पोहोचले. तिथे एक-एका गावाची छाननी चालू होती. बरेच गट त्यांनी ठरवून भरलेले मुख्य फॉर्म कायम राहिल्यामुळे आनंदाने घोषणा देत तर काही गटातील प्रमुख उमेदवारांचे फॉर्म बाद झाल्यामुळे नाराजीने, मान खाली घालून बाहेर पडत होते. काही गावातून बहुतांश उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरीही काही उमेदवारांच्या हट्टीपणामुळे केवळ एका जागेसाठी निवडणूक घ्यावी लागत होती. तालापूरसारख्या मोठ्या गावची निवडणूक बिनविरोध झाली होती. छाननीसाठी येतांनाच तालापुरकरांनी कुणाकुणाचे फॉर्म मागे घ्यायचे ते ठरवून त्याप्रमाणे ते सारे फॉर्म मागे घेतले. रामजी आणि जगन या दोन्ही गटाचे लोक तहसीलच्या पटांगणात एकत्रच बसले . निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तालापुरचे भावी सरपंच आणि इतर लोक वाडीचे लोक बसले होते तिथे आले. भावी सरपंच म्हणाले,

"पाटील, वाडीची पैलीच निवडणूक आहे. बिनविरोध करायला हवी होती."

"तसं न्हाई सरपंच, माजलेल्या बैलाची मस्ती, रग जिरवावीच लागते."

"हां...हां....समजलच कुणाची रग जिरणार हाय ते.." जगन वेगळ्याच मस्तीत म्हणाला.

"जगन्या, तुहे दोन मेंबर फोडले रे..." मैना-शांतीकडे बघत रामजी म्हणाले.

"रामजीमामा, तुमच्या जीपीत आल्या हाईत पर फारम तर आमच्याकडून भरले हाईत की."

"तर मग तुच इचार की. हातच्या कागणाला आरसा कश्याला?" रामजीने विचारले.

"व्हय ग..सांगा जरा, तुम्ही कोणाच्या पार्टीत?" जगनने विचारले. 

"जगन, आमच काय जी, पैसा फेकल त्येचीच रात...." मैना ठसक्यात बोलत असताना पुकार झाली.....

"तालवाडीची छाननी सुरु होत आहे."......

दोन्ही गटाचे लोक लगबगीनं कार्यालयात गेले. त्यांना पाहताच अधिकारी म्हणाले,

"प्रथम महिलांची छाननी. काढा महिलांचे फॉर्म काढा...."

कारकुनाने दिलेल्या फॉर्मवर एक नजर टाकून शांता-मैनाकडे बघत साहेब म्हणाले,"हे काय? दोन्ही गटाकडून तुम्हीच दोघी...." ते ऐकून रामजी आणि जगनने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. हे कसे आपल्या लक्षात आले नाही हा प्रश्न दोघेही स्वतःलाच विचारत होते. ते काही बोलण्यापुर्वीच शांता आणि मैना तोंडाला पदर लावून म्हणाल्या,

"जी..जी..व्हय जी..."

"तुमचे दोघींचेही फॉर्म रद्द होत आहेत...." ते ऐकून त्या दोघींसह अनेकांनी विचारले,

"क...क...का? असे का?"

"त्याच काय झालय यादीमध्ये नाव आहे, शांताबाई! पण फॉर्ममध्ये सांताबाई असे लिहिलय. फॉर्ममध्ये मैनाबाई लिहिलेले नाव यादीत मैयनाबाई असे लिहिले आहे. शिवाय शांताबाई यादीतील वय तीस तर फॉर्ममध्ये चाळीस टाकलय. जे शांताबाईचे तेच मैनाबाईचे. यांचे मतदार यादीनुसार वय अठ्ठावीस तर फॉर्ममध्ये अडतीस वर्षे टाकले आहे म्हणून ह्या दोघींचेही फॉर्म रद्द करण्यात येत आहेत...." अधिकारी म्हणाले. त्यावर कुणी काही बोलण्यापूर्वी तेच अधिकारी पुढे म्हणाले, " आता बाकीचे फॉर्म... कुणाचे काही ऑब्जेक्शन?"

मैना-शांताने दिलेल्या धोबीपछाडामुळे सारेच जणू शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाच्या मनःस्थितीत होते. कुणी काही बोलणार त्याआधीच अधिकारी म्हणाले,

"ठिक आहे. तुमचे कुणाचे काही आक्षेप नसतील परंतु आमचे आहेत. हे रामजी पाटील गटाचे फॉर्म... यापैकी एकाही उमेदवाराचे लिंग म्हणजे स्त्री का पुरुष लिहिलेले नाही."

"अव्हो, सायेब त्ये समदे आस्से आसतील..." कुणीतरी टाळी वाजवत म्हणाले आणि जगनच्या सहकाऱ्यांमध्ये जिंकल्याची आस निर्माण होत असताना अधिकारी पुढे म्हणाले,

"रामजी पाटील, तुमचा काही आक्षेप?"

"येक नाही. पाच आब्जेक्शन आहेत. " निवडणुकीपूर्वी कागदोपत्री झालेल्या पराभवाने चिडलेले पाटील म्हणाले,"जगनचे वय फारमात एकोणचाळीस तर यादीमध्ये तीस वर्षे. ह्यावर बघा, सखाराम जमातीचा असून त्येची जात मराठा लिहिली आहे. ...." क्षणभर थांबून रामजी पुढे म्हणाले,"तुकारामाकडे ग्रामपंचायतीची सतराशे साठ रुपये बाकी आहेत. हे ते प्रमाणपत्र. आब्जेक्शन ह्यावर... पुन्हा तेच...एस. टी. राखीव सीटवर मराठा माणूस...... ह्या चार उमेदवारांची नावे यादीतच न्हाईत......"

"बरोबर आहे. रामजी पाटलांनी घेतलेले सारे आक्षेप बरोबर आहेत. अशारीतीने दोन्ही गटातील सारे फॉर्म फेटाळण्यात येत आहेत. ...." साहेब बोलत असताना जगन म्हणाला,

"प...प..पण सायेब, ह्ये बराबर न्हाई. ...." जगनला अडवत अधिकारी पुढे म्हणाले,

"हे पहा, ही तुमची वाडी नाही. मी नियमानुसार निर्णय दिला आहे."

"साहेब, ह्यो तुमचा डाव हाय. म..म..मी कोर्टात जाईन..."

"जा. कुठेही जा. परंतु आता याक्षणी मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल..." साहेबांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती खोली रिकामी झाली. विजय कुणाचा? पराभूत कोण झाले? अशा वेगळ्याच परिस्थितीत बाहेर पडलेले दोन्ही गट तहसीलच्या प्रांगणात उभे राहिले. जगन मनाशीच विचार करीत होता,'हे काय झाले? रामजीच्या गटाचे समदे फारम चूक भरण्यासाठी म्या त्या वकिलाला चार हज्जार रूपये दिले आन त्यानं मझेच समदे फारम चुकवले. काय तरी काळंबेरं हाय...'

दुसरीकडे रामजी पाटील ही मनाशीच संवाद साधत होते,

'ह्ये काय झालं? जगन्याच्या गटाचे समदे फारम चूक भरण्यासाठी मी वकिलाला आठ हजार रूपये दिले होते. कुछ तो काला है।'

जगन आणि रामजी दोघेही एकमेकांचे पाय ओढत असताना दोघेही साफ उताणे पडले होते. त्यासाठी दोघांकडून सुपारी घेऊन वकिलांनी दोघांचीही घरे पेटवून दिली होती.....

_____________________________________________________________________

                                  नागेश सू. शेवाळकर,

                                  ११०, वर्धमान वाटिका फेज ०१,

                                  क्रांतिवीरनगर, लेन ०२

                                  संचेती शाळेजवळ, थेरगाव 

                                  पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)

   


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance