Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

पोस्टातील गंमत

पोस्टातील गंमत

7 mins
173


      पोस्टातील गंमत!

   सकाळचे आठ वाजत असताना मी तयार होत असल्याचे पाहून बायकोने विचारले, "अहो, एवढ्या सकाळी निघताय? मॉर्निंग वॉक बंद केलाय ना?" 

"अगं जरा जाऊन येतो."

"ते ठीक आहे हो. एवढ्या थंडीत जाणे गरजेचे आहे का?" 

“हो, आवश्यकच आहे. तुलाही माहिती आहे, तिथे याच वेळी जावे लागते. शिवाय, उद्या रविवार आणि नंतर दोन दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजे, सगळीच बोंबाबोंब. मी आलोच.." असे म्हणत, पत्नीला पुढे बोलायची संधी न देताच मी मोटारसायकलला किक मारून निघालो. थंडीचे दिवस असल्याने १५-२० किक मारल्यावर ती बया एकदाची सुरू झाली. रस्त्याला लागतो लागतो तोच थंडीने असे गाठले म्हणता...विचारूच नका. अंगात भारीचे वुलनचे स्वेटर असूनही एका क्षणात शरीराचा जणू बर्फ झाला. हाताची बोटे कडक झाल्याने एक्सीलेटरवरचा दाब अचानक वाढला आणि ब्रेक मारताना पाय बधीर झाल्यामुळे ब्रेक करकचून दाबला गेला. काय होतंय हे कळण्यापूर्वीच पाय टेकल्यामुळे गाडी स्लीप होता होता वाचली. अशी तारेवरची कसरत करीत करीत मी इच्छित स्थळी पोहोचलो. नेहमीच्या ठिकाणी गाडी लावून मी बोळात शिरलो. लहान मुले व रस्त्यावरची घाण चुकवीत खो-खोच्या खेळाडूप्रमाणे मार्गक्रमण करीत असताना अचानक एका घरातून काहीतरी थंडगार अंगावर पडले. ते थंडगार खरकटे पाणी झटकण्याचा प्रयत्न करीत मी आत पाहिले. एक स्त्री माझ्याकडे पाहात निर्लज्जपणे हसत होती. मी लगबगीने पुढे जात समोर पाहिले. त्या इमारतीपुढे २०-२५ माणसे गटागटाने उभी होती. एका खोलीच्या बाजूला काही लोकांनी जाळ केल्याने माझी पावले थबकली. एकाला विचारले,

"काय हो, काय झाले?"

"कुठे काय? काहीच नाही." तो माणूस त्रासिकपणे म्हणाला.

"नाही पण, ही माणसे अशा अवस्थेत जमलीत. रात्री उशीरा कुणाचा जीव गेला तर आसपासच्या लोकांना कळावे म्हणून सकाळी अशी शेकोटी करतात."

"नाही. तसे काही नाही. इथे रोजचेच आहे." 

"अरे बाप रे!सॉरी!" म्हणत मी काढता पाय घेतला. तिथे पोहोचताच मी त्या गर्दीचा एक भाग बनलो. त्या बंद दाराकडे मी आशेने पाहिले. किती तरी दिवसात दाराला झाडू लावल्याचे दिसत नव्हते. दारावर एका बाजूला 'डाक घर... वेळ-सकाळी ८.३० ते ९.३०' अशी रंग उडालेली पाटी होती.  

"पावणे नऊ वाजलेत. अजून आले नाहीत!" मी विचारले. 

"त्यांची वेळ होईल तेव्हा ते येतील. मनाचा कारभार. त्यांना कोण विचारणार?"

   काटा सव्वा नऊच्या दिशेने सरकत असताना एक मोटारसायकल तिथे येऊन थांबली. मी तिकडे पाहिले. फ्रेंच कट दाढी, डोळ्यांवर चष्मा, काखेत शबनम होती. अंगात जाकीट. हा माणूस नक्कीच साहित्यिक असावा असे वाटल्याने मी विचारले, 

“आपण कवी आहात काय?" 

"हो..." तो माणूस माझ्यावर उपकार केल्याप्रमाणे हुंकारला. 

"काय नाव?" मी विचारलेला प्रश्न न आवडल्याने कपाळावरील आठ्यांचे जाळे घट्ट करीत त्रासिक आवाजात ते म्हणाले, 

“आनंद गप्पे."

"अरे व्वा, मी ओळखतो तुम्हाला आनंदजी. मी गणेश शेवाळे. साहित्यिक-कथाकार आहे. यंदा जवळपास ११० दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत." 

"हो का? नाव ऐकल्यासारखे वाटते."

    साधारणत: ७-८ वर्षांपूर्वी सिनेमाचे तिकीट ऑनलाईन बुकींग करता येत नव्हते त्या काळात थिएटरवर जशी तिकीट काढण्यासाठी गर्दी होत होती आणि तिकीट खिडकी उघडल्यावर जसा झालेल्या लोकांच्या जीवात जीव येत होता, त्या प्रमाणे सायकलच्या हँडलवर गाठोडे व कॅरियरला पोते लावून एक बुटका माणूस सायकल ढकलत येत असताना पाहून सर्वांच्या जीवात जीव आला. आत्तापर्यंत त्याच्या नावाने शिव्या घालणाऱ्यांचे चेहरे त्याला पाहून शांत झाले. वाहने व माणसाच्या गर्दीतून वाट काढत त्या गृहस्थाने नेहमीच्या जागेवर सायकल लावली. दोन्ही गाठोडे जमिनीवर ढकलले. इतका वेळ त्रासिकपणे उत्तर देणाऱ्या गप्पेंचा चेहरा खुलला. 

"नमस्कार हो पोस्टमन साहेब..." गप्पे मोकळ्या आवाजात म्हणाले. 

"नमस्कार, नमस्कार!..." म्हणताना पोस्टमनने दाराचे कुलूप काढले. तोपर्यंत इतर २-३ पोस्टमनही पोहोचले. छोट्याशा खोलीत पोस्टमनने यंत्रवत काम सुरू केले. एका जण गाठोडे फोडून आतले टपाल बाहेर खाली टाकत होता. एक जण टपालावर शिक्के मारत होता. 

"साहेब, तलाठीपदाची परीक्षा आहे. कॉल आलाय का माझा?" 

"माझे चेक बुक येणार होते, साहेब पाहा ना जरा...."  

"माझ्या पोराची एम.ओ. येणार होती, आली का हो?" 

तिथे उपस्थित असणारा प्रत्येक जण काहीना काही प्रश्न विचारत होता. प्रत्येकाचा प्रश्न पोस्टमनच्या कानावरही जात नव्हता. अनेक प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत काहीना ठराविक उत्तरे देत होते.

"नाव काय म्हणालात?... अंऽऽ अंss तुम्ही म्हणता त्या नावाचे काही नाही. आल्यावर घरी आणून देतो. निश्चिंत राहा. तुमचे घर माहिती आहे."

"परवा मी पोस्टात आलो तेव्हा तुम्ही मला एक लग्न पत्रिका दिली होती."

“दिली ना? आलेले टपाल आम्ही देतो हो." 

“अहो साहेब, दिली हे खरे. पण केव्हा? काल त्या जोडप्याच्या बाळाचे बारसे होते..."

"आँ! लग्नापूर्वी एकत्र राहात होते काय? लिव्ह इन रिलेशनशीप?" पोस्टमनने हसत हसत विचारले.  

    बाहेर मी, गप्पे आणि इतर दोघे-तिघे उभे होतो. 

"काही खरे नाही हो या पोस्टाचे. इथे हे लोक असतातच अर्धा- पाऊण घंटा. तसा हा वेळ काहीच कामाचा नाही."

"अहो, ते तरी काय करणार? हे पोस्टच मुळात अर्ध वेळ आहे. यांना पगारच मिळतो ३-४ हजार. इथे तास दीडतास बसतात मग गल्लोगल्ली जाऊन वाटतात..." 

"कशाचे वाटतात? मला या भागात राहायला येऊन तीन वर्षे झाली पण, एकदाही पोस्टमनचे दर्शन झाले नाही." 

"साधे पत्र तर सोडाच...आत बघा ना. साध्या टपालाने पोतेच्या पोते भरून पडलेत. रजिस्टर, मनिऑर्डर आदि टपालाची काय वाट लावलीत पाहिलीत का? नीट बटवडा करीत नाहीत. पत्ता बरोबर नाही, घर बंद आहे असे ठराविक शेरे मारून टपाल परत पाठवतात. न चुकता दिवाळीची पोस्त मागतील पण, आपल्याला येणारे दिवाळी अंक मिळत नाही, वरचे पाकीट फक्त हातात येते. याचा अनुभव कमी वेळा आलाय का?"

"खालून वरपर्यंत सगळेच एक असतात हो. त्यांच्या संघटनाही जागरूक असतात." 

"पण, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे न वाटलेल्या टपालाचे ते करतात तरी काय?" 

"घरी नेऊन पाणी तापवायला बंबात घालत असतील."

"तुम्हाला सांगतो, मी एका खेड्यात नोकरीस होतो. त्या खेड्यात व आजूबाजूच्या खेड्यासाठी मिळून एकच पोस्टमन असे. मोठा बिलंदर होता तो! वेगवेगळी कारणे दाखवून तो टपाल परत पाठवायचा. काही पत्रे फाडून नदीच्या पाण्यात फेकायचा. त्या काळात नद्यांना पाणी बरेच असायचे. हे लोकांच्या लक्षात येताच १०-१२ जणांनी त्याला खडसावलेही. तो पोस्टमनही विक्षिप्तच होता. त्या नंतर त्याने महिना दीड महिना टपालच वाटले नाही. स्वत:च्या पिशवीत ठेवून दिले. नंतर सर्व टपाल पिशवीत घेतले व प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणायचा,

"हे तुमच्या मुलाखतीचे पत्र....ही तुमची लग्नपत्रिका...हे तुमचे टेलिफोन बिल..." असे प्रत्येकाला पत्र दाखवायचा व त्यांच्या समोर टराटर फाडून टाकायचा व निर्लज्जपणे हसायचा. 

"बाप रे!ऽऽ एवढे डेअरिंग? त्याची वरिष्ठाकडे तक्रार?"

"झाली. तक्रार झाली. पेपरमधून बातम्याही झळकल्या. नंतर त्याला सस्पेंडही केले गेले."

"बरे, पोस्टापेक्षा कुरियर बरे म्हणावे तर तिथेही आनंदीआनंद! अनेकदा 'नो सर्व्हिस' म्हणून पत्र परत करतात नाहीतर सरळ फोनवर सांगतात की, ऑफीसला येऊन घेऊन जा. काय म्हणावे याला?"

"अहो, दिवाळी अंकाचा माझा अनुभव अतिशय वाईट आहे हो. पोस्ट आणि कुरियर मिळून या वर्षी माझे १५-२० अंक मिळालेच नाहीत. अंकासोबत मानधनही परत गेले हो." 

"मलाही असेच अनुभव आले. अहो, पोस्टमनवर ओरडता तरी येते. काही होवे न होवो, पण, स्वत:च्या समाधानासाठी तक्रार तरी करता येते. कुरियरवाल्यांची दादागिरी असते..." गप्पे जरा रंगात येऊन बोलत होते.

   "आमच्या धोतरे पोस्टमनचे चांगले उदाहरणही आहे हो. मी येथे स्थलांतरित झालो. येताना त्यांना माझा इथला पत्ता देऊन आलो. त्यांनी येणारी सर्व पत्रं या पत्त्यावर पाठवून दिली. कसे झालंय, आजकाल पोस्टमनची कामेही वाढलीत हो. मोबाईलच्या जमान्यात पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्रांची संख्या घटलीय. परंतु, त्याच बरोबर एटीएम कार्ड, चेक बुक, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, मुलाखतीची पत्रे आदि अनेक कामे वाढली आहेत." "बरोबर आहे. शिवाय लोकसंख्या तर वाढतेच आहे, पण, त्या प्रमाणात पोस्टमनची संख्या वाढली नाही. गेल्या अनेक दशकांत नवीन भरतीच नाही. त्यामुळे पोस्टमनला तरी दोष का द्यायचा?"     तितक्यात, एक मोटारसायकल तिथे आली. रागारागाने पाय आपटत तो गृहस्थ दारातल्या इतरांना ढकलत पोस्टमनवर खेकसला, 

"माझे एटीएम येणार होते." दुसऱ्या पोस्टमनने नाव विचारले. नाव सांगताचा पोस्टमन म्हणाला, "आले. पण कालच परत पाठवले."

"परत? का?" 

"अपूर्ण पत्ता होता..."

"माझ्या भावाचा व माझा पत्ता एकच आहे. त्याचे चेकबुक दिले आणि माझा पत्ता चुकीचा?" 

"अहो, तुमच्या भावाने पोस्टात येऊन चेकबुक नेले."

"का? घरी आणून देणे तुमची ड्युटी नाही?"

"आहे हो, पण, पत्ता बरोबर नसल्यावर काय करणार? दोन दिवस ठेवून परत पाठविले."

"दोन दिवस? सात दिवसांचा नियम आहे ना?" 

"शहरात सात दिवस आणि खेड्यात दोन दिवस."  

"असे कसे? तुम्हाला नोकरी करता येत नसेल तर द्या सोडून?"

“हे पाहा. तुम्हाला तुमच्या बँकेत २-३ दिवसांत एटीएम मिळेल."

“मी बँकेत जाणार नाही. पोस्टात आलेय. पोस्टातच मिळाले पाहिजे.

"एक काम करा. आज मोठ्या पोस्टात जा. मिळून जाईल."

"मी कुठेही जाणार नाही, तुमची तक्रार करेन."

"करा. नक्की करा. थांबा.." असे म्हणत पोस्टमनने एका बॅगेतून एक छापील कागद त्या माणसाला देत म्हणाला, 

"हा तक्रार अर्ज. लोकांना लिहिण्याचा त्रास नको म्हणून छापूनच ठेवलाय. तो भरून त्याच्यावरील पत्त्यावर पाठवा. नाही तर माझ्या बरोबरच चला मोठ्या पोस्टात म्हणजे साहेबही..."

"काय पण मग्रुरी आहे. मी कोण आहे दाखवू का ?" 

"ओ साहेब, तुम्हाला काय दाखवायचेय ते तिकडे दाखवा. दोघेही तिकडे जा. आमचा वेळ घेऊ नका. सकाळपासून बसलो आहोत.” एक गृहस्थ चिडून म्हणाले.

  पोस्टमनची तोंड दिसतील एवढी गर्दी कमी होताच मी गप्पेंना म्हणालो, 

"पोस्टामध्ये थोर पुरुषांची विटंबना होते हो!" 

"आँ! ती कशी?" गप्पेंनी विचारले.

"थोर पुरुषांच्या स्मरणार्थ तिकीटे काढली जातात. आपण ती पाकिटावर लावतो. आणि पोस्टमन त्यावर काळा ठप्पा मारुन त्यांचे चेहरे काळेभोर करून टाकतात. आहे ना विटंबना?" मी बोलत असताना पोस्टमन म्हणाला,

"अरे, गप्पे साहेब, खूप थांबावे लागले. थांबा, तुमचे काही तरी पाकीट आले आहे." असे म्हणत समोरच्या ढिगाऱ्यातून पोस्टमनने नेमके पत्र काढून गप्पेंना दिले. ते घेताना गप्पेंचा आनंद गगनात मावेना. पण, लगेचच म्हणाले, 

"अहो यात काहीच नाही." त्यावर पोस्टमन म्हणाला, 

"या ढिगाऱ्यात असेल तर बघा. " 

मरता क्या न करता असे चरफडत गप्पे ढिगारा पाहू लागले. दुसरे पाकीट हातात घेत ते म्हणाले, "शेवाळे साहेब, तुमचा दिवाळी अंक आलाय..." 

मी आनंदाने ते पाकीट हातात घेतले. पाकीट चारही बाजूंने सुस्थितीत व आत अंकही सुरक्षित पाहून मला भन्नाट आनंद झाला. १५-२० मिनिटांत आम्ही बाहेर येताच गप्पे म्हणाले,

"शेवाळे साहेब, आत्ता आलेल्या अनुभवावर मला एक चारोळी सुचलीय. ऐका...

'हनिमूनच्या दुसऱ्याच दिवशी

पोस्टमन गुणगुणला

आधीच फुटलेले सील

परत करावे लागेल पार्सल."

"व्वाह!" असे म्हणत मी नेहमीप्रमाणे दाद दिली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy