मिशाजीराव
मिशाजीराव
वडाची साल पिंपळाला लावून, वड्याचं तेल वांग्यावर काढून, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होवून, तूप खाल्लं की रूप येत नाही हे माहीती असूनही, राजा विलासी अन दासी पलंगापाशी असं जगताना, घरची म्हणती चोळी शिवा अन बाहेरचीला शालू हवा, हे वागणंच जर एक ना धड भाराभर चिंध्या असलेल्या माणसाच्या जगाची रीत आसंल, तर असं जगत राहणं म्हणजी हरभारं खाल्लं अन हात कोरडं अशी गत होत असताना, तळं राखील त्यो पाणी चाखील हे माहीत असूनबी कुंपनच शेत खात राहतं, तवा गरिबाला, धरण उशाला अन कोरड घशाला घेवूनच जगावं लागत असंल, अन पोटाला चिमटा घेवून अडली गाई काटं खाई म्हणत, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी ? असं म्हणताना ही जाफराबादी म्हस कुरण फस्त करीत असंल ,तेंव्हा वैतागून हिकडं आड आन तिकडं विहीर बघून, उचल राजकारणी टाक हिरीत असं करावं वाटतं, पण गरीबाची मरू नये गाय हे समजतं तेंव्हा,उचल करंजी टाक भाकरी म्हणताच शेतकर्याची गरीब गाय कामाला लागती पण गोड धोडाचा घास खायचं शेतकरी नाकारतो, अन कोंड्याचा मांडा करत खपत राहतो, तेंव्हा कसायाला गाय धारजीण असं न म्हणता लबाडाला सत्तेचं आवातनं अन चोराला उचलू लागणं, आसलं प्रकार, मतदान करून आपणच करत असतो, मग गरीब गुणाचं अन रेडकू ताणतंय उन्हाचं आसं वागणारेच पुढारी आपण निवडून दिल्यावर, आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी ही म्हण जरी काळाआड गेली असली, तरी जखम मांडीला अन मलम शेंडीला किंवा ताप रेड्याला अन ईन्जेक्शन पखालीला अासलं उपाय करणारे डॉक्टर होण्यापेक्षा, किंवा येरं उद्योगा बस खांद्यावर, न्हायतर येरं बैला घाल शींग अशी गत कुणी करून घ्यावी ? उगंच डोंगर पोखरून उंदीर निघायचा, साधली तर शिकार नाहीतर भीकार असं व्हायचं, न्हाई तर कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाय सगळ्यांनाच माहिती असतं पण कुत्ता जाने अन चमडी जाने असा प्रकार सगळीच करत असत्यात, उगाच उंटाच्या पाठीचा मुका कुणी घ्यावा, फट म्हणता ब्रम्ह हत्या व्हायची. उगं गाढव मरायचं वझ्यानं अन शिंगरु मरायचं येरझाऱ्यानं , पोलीस स्टेशन अन कोर्ट कचेरीनं सगळं घर धुवून निघतं, माज मोडतो,काटा बसतो, अख्खा गाव मामाचा आन कुणी न्हाय कामाचा, हे माहिती असून पण, घरचं खावून लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उद्योग कुणी करायला सांगीतलाय ? आपण भलं अन आपलं काम भलं असं म्हणून फक्त पायापुरतं बघायचं, सरळ नाकासमोर चालायचं, वाकड्यात शिरायचं नाही, हिशोबात राहायचं, तब्बेतीत जगायचं, बाकी मग नडला की तोडला, आमच्याशी वाकडं त्याची नदीला लाकडं, एक घाव अन अन शंभ्भर तूकडं, शेंडी तूटो न्हायतर पारंबी तूटो, मग जहागीरी गेली तरी चालेल पण फुगीरी जावू देणार नाही, हे आपलं ब्रीद……
तर ह्यो झाला माझा परिचय. आता नमनालाच घडाभर तेल जाळलंय, तरी रातभर वाचली गीता अन रामाची कोण रं शीता ? अशी तुमची गत झाली आसलं, कारण आजून म्या माझं नाव सांगीतलंच न्हाय ना ! तर आता लय ताणून न धरता मुद्द्याला येतो. तर म्या मिशाजीराव म्हणाडे. आता हे बी काय माझं खरं नाव न्हायीच. सुर्यभान तिरपागडे या नावानं मला आता गावात कुणी वळखंत नाही. आपल्या अक्कडबाज मिशामुळं आपल्याला सगळी मिशाजीराव म्हणत्यात . मिशाच्या आकड्यावर लिंबू ठीवून कोसाभराची रपेट मारू शकतो आपण. आता तुम्ही म्हणाल ही तर लय दणक्या आसामी दिसतीय ! पण तसं नाह्य, आपलं मजी एक नूर आदमी आन दस नूर कपडा आसं काम हाय. बोलणंपण एक हात लाकूड तर दस हात ढलपी आसं हाय. बोलायला लागलं की म्हणीचा पूर येतो, म्हणून सगळी म्हणाड्या मिशाजीराव म्हणत्यात आपल्याला.
आता आमचं घर! तर बडा घर आन पोकळ वासा आसला प्रकार हाय. जहागिरी गेली अन फुगीरी राहिली,असली आमची तऱ्हा. आमची कारभारीन तिकडली मुधोजी राजाच्या संस्थानिक घराण्यातली. आजून स्वत:ला राणीसाहेब म्हणवून घेते. आमचा पोऱ्या स्वतःला युवराज समजून घेतो.त्यांच्या विंग्रजी शाळेचा नाद आम्ही केला. स्पेशल गाडी काय, ड्रायव्हर काय, शहरातल्या बंगल्यात रहात होते युवराज. दिमतीला एक केरटेकर का काय म्हणत्यात ?, तसली, आया पण ठेवली होती. पण कापं गेली अन भोकं राहिली. कुळ कायद्यात जमीनी गेल्या, आई जेवू घालीना आन बाप भिक मागू देईना आसं झालं, तरी चलाखी करून खातेफोड करून पन्नासेक एकर बागाईत कसं तरी आमच्या बापानं वाचवलं. वाडा हाय भला दांडगा, जणू भुईकोट किल्लाच. चारी बाजूंनी तटबंदी हाय. ट्रक फिरंल येवढ्या तटाच्या भिंती रुंद आहेत.खिळे ठोकलेला मोठा मजबूत लाकडी दरवाजा आहे. पण आता पडझड व्हायला लागलीय. बापजाद्यांचं सोनं नाणं होतं तोवर चाललं होतं नीट, पण सुंभ जळला तरी पिळ जळतूय व्हय ? दर सणावाराला वाड्यातलं सोनं, सराफ कट्ट्यावर जावू लागलं, शेतातला माल मार्केट मध्ये अन् मार्केटमधल्या नोटा, डायरेक्ट राणीसाहेबांच्याकडे जावू लागल्या. इंग्लिस स्कुलात युवराजांनी मॅट्रिकची मजल मारेपर्यंत आम्ही पार घायकुतीला आलो. वाड्याला अखेरची घरघर लागायची पाळी आली .सोनं नाणं संपलं होतं, नोकर चाकर गेलं. युवराजांची गाडी गेली, ड्रायव्हर,आया, दिवाणजी, सगळ्यांनी हात धुवून घेतलं . हापापाचा माल गपापा असं वाटलं त्यांन्ला. त्यांचं तरी काय चूकलं ? तळं राखील त्यो पाणी चाखंलंच ना ? ड्रायव्हर आता व्याजानं पैसे देतो म्हणत्यात, आया शहरातच फ्लॅट घेवून राहतीय .दिवाणजींनी स्वतःचं दुकान टाकलंय.
खंक होवून राणीसाहेब आता युवराजांना घेवून जुन्या वाड्याच्या आश्रयाला आल्यात. युवराजांना जुगाराचा खानदानी षौक लागलाय, राणीसाहेबांचं महिला मंडळ दिवसभर वाड्यातच चरत असतं, अजूनतरी वाणी उधार सामान देतो. बॅंका शेतीवर कर्ज देत्यात . उसाचं बील आलं की वाण्याचं बिल फेडायचं, कपडेवाल्याची बाकी चुकती करायची, बॅंकांचं कर्ज नवं जुनं करायचं ! चाल्लय, पण पहिल्यासारखा थाट न्हाय राह्यला आता, पण फुलं वेचली तिथं गवऱ्या वेचायची वेळ आली न्हाय आजून.या दोघांचा खर्च कमी होत न्हाय म्हणून वाईच जीवाला घोर लागतोय अजून, बाकी काय न्हाय. युवराजांना मटका बसतो कधीमधी, पण देवीचंच कुंकू देवीलाच व्हायचं,असला कारभार! युवराज आता लग्नाला आल्यात. राणीसाहेबांच्या नात्यातलीच एक पोरगी हाय. जुनं सरदार घराणं हाय आमच्यासारखंच. पोरगी हळदीच्या खांडासारखी पिवळी धमक आहे.परिस्थिती आमच्यासारखीच बेताची हाय पण नागड्याशेजारी उघडं गेलं अन रातभर गारठून मेलं , येवढीपण आपदा होण्यासारखी वेळ न्हाय. पन्नासातली चार एकर काढायची,आन जंगी लगीन लावायचं युवराजांचं, असा मानस हाय. आज ना उद्या युवराज रांकेला लागतीलच, आमच्या माघारी सगळं त्यांचंच तर हाय !
युवराजाच्या मागं आमदार लागलेत. वाडा पाडू, टोलेजंग हायस्कूल बांधू. गावाची सोय व्हयील, पोरांची सोय व्हयील. बदल्यात आमदार शहरातल्या जागेत मोठ्ठं कॉम्प्लेक्स बांधून देणार हायीत .निम्मी निम्मी भागीदारी, सगळा खर्च आमदारांचा. युवराजांना गावचं सरपंचपद. युवराज तर आत्ताच हुराळली मेंढी आन लागली लांडग्याच्या नादी आसं करंत गुडघ्याला बाशींग बांधून बसलेत. सोबतीला राणीसाहेबांची मसलंत हायेच. दोघांनी मिळून डोकं उठवलंय.
आता आमचा गाव !
सगळी माणसं एका पेक्षा एक बेरकी. घोड्याला प्येल्याली, इरसाल. ह्या मिशाजीराव कडून इतकं उसणं पासणं न्हेलंय की ते जर गोळा झालं तर मिशाजीरावची कायमची ददात मिटून जायील, पण घर फिरलं की घराचं वासं फिरत्यात. “ मिशाजीराव ...तुम्हाला काय कमी हाय ?" म्हणून हरभाऱ्याच्या झाडावर चढवून आपटत्यात. नाव सोनूबाई आन हाती कथलाचा वाळा अशी गत झालीय. फकिर झालोय पण अजून भिकार झालो न्हाय. आजूनही सव्वीस जानेवारी, पंधरा ऑगस्टला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत बोलावत्यात. आपुण आजूनही बाकी गावकऱ्यांपेक्षा जास्तच गोळी पुडे , बिस्किट पुडे शाळेला देत आसतो. गावच्या जत्रेला पण सगळ्यात मोठी पावती आपलीच असते. झेपत न्हाय पण काहीतरी जुगाड करून काडी मोडीचं औत करून चालवावं लागतंय. सातबारा तर बोज्याने खचाखच भरून गेलाय. जमिन जप्तीची वेळ येवू न्हाय म्हणजे झालं. माझं काय न्हाय मी कपाळाला अंगारा लावून कुठंपण लांब निघून जाईन. त्यानं चोच दिलीय तर दाण्याची सोय पण त्योच करील ना ? ह्या दोघायची काळजी वाटते. पण मी हाय तोवर ती येळ येत नसती, खात्री हाय आपल्याला.
तर गावात आजूनही मान आहे आपल्याला.आता आपल्यापेक्षा शिरीमंत घरं हायेत गावात. काही राजकारणातून शिरीमंत झाली तर काही सहकारातून. काहींची पोरं नवकरीला लागली. त्यायनी आयबापाचे पांग फेडले. पोरान्ला शिक्षणासाठी मदत केली, काही मान ठेवतेत, काही छाती काढून चालतेत. एक शिकेल पोऱ्या तर म्हणला, “तुम्ही संरंजामी लोकांनी आमच्या पिढ्यांचे शोषण केले.” मी त्यायले म्हणले, “बाळा आपल्या बापाले विच्यार तुझ्या शिक्षणाला मदत कुणी केली ?" तवा खाजील होवून पुढे गेला.
गावाची तऱ्हाच न्यारी. माणसे एका पेक्षा एक भारी. हिथं राजकारण्याला किंमत हाये. हिथं तलाठी भाऊसाहेब गावचा नवरा बनून ऱ्हातो, ग्रामसेवक गावचा सासरा आसतो. हिथं पोरान्ला शिकून शहाणं करणाऱ्या मास्तरांन्ला किंमत नाही. हिथं पुढारी गावचा मालक आसतो. गल्लीतला निवडून आलेला पंच हिथं रूबाब चोदवत राहतो. सरपंच तर गावचा राजाच की ? सरपंचाशिवाय गावाचं पान हालत न्हाय, परत्येक कार्याला सरपंचच लागतो.
तर आता हवा बदललीय, हे माझ्या पक्कं ध्यानात आलंय. आता राजकारण, पुढारपण, समाजकारण हे नव्या युगाचं मंत्र हायेत. शिक्षणाला आता कुणी हुंगून विचारत नाही. शिरीमंत होण्यासाठी शिक्षणाची गरज आता लागत न्हाय.शिक्षण न झालेला, आडाणी, पैसेवाला हॉस्पिटल काढून शिकेल डॉक्टरान्ला कामाला ठेवू शकतो. शिक्षणसंस्था काढून पीएचडी वाल्या प्राध्यापकांन्ला नोकरीला ठेवू शकतो. तर मी ठरवलंय,आता राजकारणात पडायचं !
मी आसं म्हणल्यावर तुम्ही तर चकितच झाला असाल न्हायी ?
हे म्हंणजी आसं झालं, खिश्यात न्हाय ढेला आन म्हणतोय जालन्याला चला, न्हाय तर खिशात न्हाय दमडी आन म्हणतो खातो का कोंबडी ! तर करूण कहानी सांगता सांगता मिशाजीराव फाफलले, किंवा जुनं दिवस आठवून मिशाजीराव भंजाळले आसं तुम्हाला वाटत आसंन तर तुम्ही चूकताय राजेहो !
ह्यो मिशाजीराव कच्चा खिलाडी न्हाय ! माझ्या बापानं मला सगळे संस्थानी पैतरे शिकवले हायेत. फक्त शिक्षण द्यायचा राहिला त्यो. त्याला वाटलं राजे रजवड्यांना कशाला शिक्षणाची गरज लागतीय ? आपल्याला काय कुठं नोकरी करायची हाय का ? सात पिढ्या बसून खाल्लं तरी सरायचं न्हाय येवढं ठेवलंय ! वाड्यावर येणाऱ्या पंतोजीनं लिहा वाचाय पुरतं शिकवलं , पण छप्पन साली कुळकायदा आला तेंव्हाच माझ्या बापानं बदलती हवा वळखली. पन्नास एकर जमिन वाचवली, सिलिंगचा तडाखा बसायच्या आधी काही जमीनी विकून सोनं नाणं केलं. जमिनी गेल्या पण वाड्यातले रांजण गच्च भरले. मरताना बापानं बंद खोलीत, एकांती सांगीतलं , “ नव्या पिढीचं काय खरं न्हाय, आपलं दिवस सरलं , वाडं जातील,जमिनी जातील,आहे ते पुरवून खा, नव्या धंद्यात गुंतवणूक करा, नविन राज्य आलंय, रावाचा रंक व्हायला वेळ लागणार न्हाय. वाडा विकू नको,जमिन विकू नको. पैशाच्या मागं धावू नको. मोप हाय, पण तुझं तुलाच शोधून काढावं लागंल.” आसं म्हणून झाला खुडूक. मरताना कसल्यातरी खाणाखुणा केल्याली चोपडी हातात दिली.
तवापासनं जीवापाड जपलीय ती चोपडी. ह्या दोघांनी सोन्या नाण्या पायी फडताळं धुंडाळली, राजंणं उपसून काढली, ट्रंका उचकाटल्या. खोदाखोदी केली. मी, ही चोपडी कशी कशी संभाळली ? माझी मलाच माहिती. पिवळी पडलीय, शाई उडून चाललीय, पानं मोडायला झालीत. शहरात जावून, पान अन पान लॅमिनेशन करून आणलंय .उन्ह, वारा, पावसाची आता भिती न्हाय.
कुठनं कुठं गेलो ना ? हे आसंच होतं.तर सांगत होतो , मी राजकारणात पडणार हाय. गावचं सरपंचपद सर्वसाधारण राखीव झालंय . युवराजांना सरपंच करणार हाय. पंचायत समितीला मी स्वतः उभारणार हाय ! मग झेड पी, मग आमदार, खासदार, मंत्री ! युवराज येत्यातच मागं मागं. आजकाल राजकारणात, राजघराण्याला किंमत हाय. जनता प्रेम करती. काही अडचण येणार न्हाय. अडचण हाय ती फक्त पैशाची.
येवढा मोठा शेतीचा पसारा हाय, कधी न्हाय ते फेरफटका मारायला गेलो, एकटाच. सायकल घेवून रिंगी रिंगी करत. झाडाला सायकल लावली. घूसलो आत.नजर जायील तिथवर ह्ये उसाचं प्लॉट च्या प्लॉट. वावरात दुसरं पिकच नाही. उस हे आळश्याचं पिक, तेवढंच जमतं आपल्याला.
पार उंबराच्या विहरीपर्यंत चालत गेलो. किती पिढ्यांची, सदैव पाण्यानं डबडबलेली ही विहिर, घडीव बांधणीची. अजून एक चिरा सुद्धा निखळला न्हाय. एका चिऱ्यावर दगडात कोरलंय, १७९७ . बापरे दोनशे सव्वादोनशे वर्षापुर्वी बांधलेली ही विहीर. हा उंबरही तेवढाच जूना. ह्या विहरीला बळी दिला होता असा इतिहास हाय . ह्या विहरीकडं सहसा कुणी फिरकत न्हाय. उंबराच्या सावलीमुळं पाणी अंधारं , काळं कुट्ट दिसतं. घडीव दगडांच्या कपारीतून सापाच्या काती दिसतात. भेसूरच दिसतं सगळं. युवराजांच्या लग्नासाठी आपण ह्याच उंबराच्या विहरीचं चार एकर विकणार होतो ना ?.....
मनात विचार आला तसा बापाचा चेहरा समोर आला. “मोप हाय, काही झालं तरी जमिन, वाडा विकू नकोस. “ मरताना बाप म्हणला होता. का म्हणला आसंल आसं ? काय आर्थ असेल त्या चोपडीतल्या खुणांचा ?....
खिशात चाचपडून पाहिलं तर चोपडी होती. उघडून बघीतलं. काहीतरी ओळखीचं दिसत होतं पण लक्षात येत नव्हतं.
दिवसभर मोटार सुरू होती. पाण्याची पातळी खाली गेली होती. घडीव बांधणीचं चिरं उघडं पडलं होतं. उंबराचं झाड, चिऱ्यांना लगटून एक मुळी विहरीत उतरली होती. एका चिऱ्यावर दगडात कोरलेली एक खूण होती, चोपडीतल्या सारखी. तिन्ही सांज होत आलीय.
“ मोप हाय ...काही झालं तरी वाडा विकू नको, जमिन विकू नको.”
बापाचा आवाज कानात घूमतोय. नक्की त्या दगडाच्या आत काही तरी असणार ! लपवून ठेवलेला खजिना, जड जवाहिर, सोनं नाणं, हिरे माणके. हे घबाड घावलं तर सात पिढ्याची दादात मिटेल. वाड्यातपण आसंल…. , घाईगडबडीचा उपयोग नाही, खुणांचा अर्थ लावावा लागंल. खजिना गुपचुप शोधावा लागंल.
घबाड घावल्यावर मात्र शांत डोक्याने विचार करावा लागेल. मोदीचं सरकार हाय, सगळं सरकारजमा होवून जाईल. बॅंका सुरक्षित नाहीत, पॅनकार्ड, आधार कार्ड सगळं लिंक केलंय.ही संपत्ती कायदेशीर मार्गाने, योग्य त्या ठिकाणी गुंतवावी लागेल. हायस्कूल बांधू, शिक्षण संस्था काढू. हॉस्पिटलं, पेट्रोलपंप टाकू, झालंच तर विजय मल्ल्याची कंपनी विकत घेवू. राजकारणात उतरलं की सगळं जमतंय. काळा पैसा पांढरा होतोय. जमलंच तर मोदीलाच पंतप्रधान पदासाठी टशन देवू. पंतप्रधान मिशाजीराव म्हणाडे, नाहीतर पंप्र.सुर्यभानजी तिरपागडे.
तर आपलं हे आसं आहे. एक हात लाकूड तर दस हात ढलपी. साधली तर शिकार, न्हायतर भिकार ! स्वप्नंच बघायचं तर मग साधं सुधं कशाला ? डायरेक्ट पंतप्रधानाचंच स्वप्न बघतो हा मिशाजीराव !