Poonam Wankar ( पूरवा )

Comedy

4.8  

Poonam Wankar ( पूरवा )

Comedy

आबा झाडावरून पडला..!

आबा झाडावरून पडला..!

14 mins
1.4K


        वऱ्हाडातील एक छोटंसं गाव..! अगदीच पन्नास साठ घरांची वस्ती असलेलं. पण गाव भारी सुंदर. चारही बाजूनं गर्द हिरवीगार झाडें, गावातून वाहणारा ओढा, वाऱ्याच्या झोतान नाचणारी शेते.. सुंदर स्वच्छ हवा. शिवाय हागणदारी मुक्त गाव असल्याने तिथला निसर्ग ही शुद्ध होता. शेणा मातीन लिपलेल्या घरांच्या भिंती, अंगणात शेणाचा सडा, दारापुढ पांढऱ्या चुणखडीन ओढलेल्या रेषा प्रत्येक घराची शोभा वाढवीत होते.


            गावाच आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे भाऊराव शिर्के, तसा माणूस मोठा दिलदार. अगदी कोणाचही कुठलंही काम असू द्या आधी हजर असतो . त्यामुळं माणूस घरात कमी अन बाहेर जास्त राहतो . लोकांच्या पंचायती सोडवण्यात त्याचा मोठा हातगंड . अगदी गावापासून तर तालुक्यापर्यंत लोक नुसत्या नावानंच ओळखतात. लोकांच्या पंचायती सोडवणार, म्हणजे लोक सुद्धा तेवढाच मान पान देतात. कधी कोणी सकाळीच चहा प्यायला बोलावणार.., तर कोणी न्याहारीला. सुपारीचा सुद्धा कधी खर्च पडला नाही त्यांना. सगळं काही बाहेरच होऊन जायचं माणसाचं. घरात बायको शांताबाई, मुलगा शंकर, सून राधा आणि सात वर्षाचा एक नातू श्याम. श्याम खूप बंड असल्याने सगळे त्याला लाडाने बंडया म्हणायचे.


              घरात इनमीन पाच माणसं. पण पाचही मोठीच कलाकार होती. भाऊराव तर तुम्हाला कळलेच असतील. सारा गाव म्हणजे माझे लेकरं. असा त्यांचा बाणा... त्यामुळे सारा गावचं त्यांना आबा म्हणायचा.


             शांताबाई तशा स्वभावाने प्रेमळ होत्या पण कुठल्याही गोष्टीला ओढून ताणून सांगायची त्यांना सवय. ' सुतावरून स्वर्ग गाठण्याची सवय. ' कपाळावर ठळक लाल कुंकू, अंगावर नवारी, हातभर बांगड्या, डोक्यावर शेला असा त्यांचा पेहराव.


              मुलगा शंकर नावाप्रमाणेच शंकरा सारखा भोळा होता. कोणी काही सांगितलं की, त्या गोष्टीची कुठलीही चौकशी न करता विश्वास ठेवणे असा त्याचा स्वभाव. त्याच्या या स्वभावामुळे राधा बरेचदा त्याच्यावर चिडायची. पण गडी काही सुधारेना!!


              राधा हळव्या मनाची होती. कुणाच्या डोळ्यात अश्रू पाहिले की, हीच आधी रडायला सुरवात करायची. स्वतः च्या लग्नात म्हणे लोळण घेऊन रडत होती. शेवटी भाऊरावांनी तिच्या पूर्ण कुटुंबालाच राधाच्या पाठवणीच्या वेळी सोबत आणलं होत.


                आता राहिला लहान श्याम. तर पठ्ठा मोठाच इबलीस होता. स्पष्ट बोलता येत असून मुद्दाम बोबडे शब्द बोलायचा. क च्या जागी त वापरायचा. आंब्याला आबा आन चिंतेला चिता करायचा. लाख समजावून देखील त्याचा बंडपणा काही कमीच होत नव्हता. उलट तो ही या साऱ्यांची मजा घेत असायचा. शब्दांच्या काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार... भुईमूगाच्या शेंगा सोलल्यागत खाऊन टाकायचा. सारा गाव त्याच्या या स्वभावामुळं त्याला बंड्याच म्हणायचं. तर असे हाताच्या पाच बोटाप्रमाणे वेगवेगळे व्यतिमत्व असलेले.., हे त्या गावाचे पाच रत्नच होते. आणि त्यातही बंड्या म्हणजे जणू काही कोहिनूरच होता. शाळेतही त्याच्या उचापती एवढ्या होत्या की, आठवड्याला कोणी ना कोणी त्याच्या नावाचा डंका पिटत घरी यायचा. तो कधी काय करेल याचा कुणालाही काही नेम नसायचा.


              काही दिवसांपूर्वीची गोष्ट. काही साहेब मंडळी शाळेची पाहणी करायला शाळेत आली. मुख्याध्यापकांनी सगळ्या शिक्षकांना ताकीद दिली की," पाहणी करते वेळी कुठलीही गडबड होता कामा नये. " सगळ्यांनी त्यांचे त्यांचे वर्ग नीटनेटके केले. कधीही वर्गात न शिकवणारे डुचके गुरुजी हातात भूगोलाच पुस्तक घेऊन वाचन करत होते. आणि सगळी पोर शांतपणे बसून ऐकण्याचा आव आणत होती. कोणी इकडे तिकडे बघत सुद्धा नव्हते. कारण डुचके गुरुजींनी आधीच वर्गात सांगितलं जो कोणी शांत बसेल त्याला पेपरमिंट च्या गोळ्या वाटण्यात येईल. त्यामुळे सगळे तोंडात गूळ कोंबल्यागत गप्प बसले होते. साहेब मंडळी पाहणी करत प्रत्येक वर्गखोलीत जाऊन निरीक्षण करत होते.


                  काही वेळाने ते डुचके गुरुजींच्या वर्गात आले. त्याआधीच गुरुजींनी मुलांची बैठक व्यवस्था बदलवून घेतली होती. साहेब लोक शेवटी बसणाऱ्या मुलांना प्रश्न विचारतात असा त्यांच्या अनुभव असल्याने.., त्यांनी शेवटी बसलेल्या बंड्याला रांगेत समोर बसवला. आणि वर्गातील हुशार असणारी मुले मागे बसवली. सगळी मुलं उभी होऊन एका सुरात हात जोडून म्हणू लागली , " एएएक साSSSथ नमस्तेSSSSSS गुरुजीईईईईईई ". गुरुजींच्या हातातलं भूगोलाच पुस्तक बघून त्त्या साहेबांनी बंड्यालाच उभा करून प्रश्न विचारला. " सांग बाळा.., पृथ्वी चा आकार कसा आहे?" आता गुरुजींना घाम फुटला.. कारण याआधी त्यांनी काही शिकवलेलं नव्हतं. त्यात बंड्या ला प्रश्न विचारला म्हणजे मोठी बिकट परिस्थिती. त्या साहेबांच्या मागे उभ्या असलेल्या डुचके गुरुजींनी लगेच त्यांच्या पायजाम्याच्या खिशातून त्यांची आयाताकृती तंबाखाची डब्बी काढली आणि... दुरूनच बंड्याला दाखवू लागले...! बंडयान लगेच साहेबाला उत्तर दिल.., " पृथ्वीचा आकार डुचके गुरुजीच्या तंबाखाच्या डब्बी सारखा आहे. " बिचारे डुचके गुरुजी... घामान तर भिजलेच होते... पण लाजेन ही पाणी पाणी झाले होते. त्यानंतर डुचके गुरुजींची बदली झाली आणि बंड्याच्या बंडपणापासून त्यांची कायमची सुटका झाली. तर असा हा बंड्या. कधी कोणाला तोंडघशी पाडेल याचा काहीच नेम नाही.


             एके दिवशी संध्याकाळचे जेवण आटोपून शंकर बाहेर वऱ्हाड्यात सुपारी चघळत, तेथील लाकडी खांबाला टेकून..,डोळे मिटून शांत बसला होता. बाहेर थंड वारा वहात होता. त्यामुळे त्याचे डोळे झोपी येत होते. दिवसभर शेतात राबणारा हा गडी तसाही लवकरच निद्रेच्या आहारी जात होता. त्याला डुलक्या येत होत्या. इतक्यात तिथं बंड्या येतो..

बंड्या : " बाबा..! ओ बाबाजी..! डुलत्या देऊन रायले ता तुमी?? अंद्र जाऊन झोपा न!! उता इथून... मले खेडाच हाय!!"

शंकर : " आरं... थांब गा!! मी डुलक्या नाही देऊन रायलो...! विचार सुरु हायेत डोस्क्यात!! थांब जरासा... मंग येजो.. जा तिकडं जाऊ खेळ.. " ( त्याला पळवून लावण्यासाठी शंकर त्याला अस सांगतो )

बंड्या : " इचार....! तायचे इचार करून रायले जी तुमी?? माया लग्नाले लई टाइम हाय..!"

शंकर : " आरं... गप की!! मी तुया वागण्याची चिंता करून रायलो.. आन तुले लग्नाची पडली होय... आरं लेका.. आजून बी अंथरून वलं करतोस तू... आन लग्नाच्या गोष्टी करून रायला का बे...!! चाल हो!! पळ इथून..!!

            आपले वडील चिडले हे बघून बंड्या पळत माचघरात जाऊन बसतो. राधा आवरासावर करत असते. बंड्याला रुसलेला पाहून ती त्याला विचारते...

राधा : " काऊन गा बंड्या.. का झालं?? आन तुहा बा काय करतूया??

बंड्या : " आता का सांगू व तुले... बाबा माही चिता करून रायले..!" ( शंकर ओरडल्यामुळे रडक्या आवजत )

राधा : " ( डोक्यावर हात ठेवत ) आरं देवा!!! आता का करू मी ह्या माणसाचं... कुठं जाऊन डोकं फोडू रे विठ्ठला??? असा कसा र दादाला बांधला माह्या गळ्यात...??? ( तोंडानेच मोठ्याने रडण्याचे आवाज काढत ) माह सोन्या सारख लेकरू आन त्याची चिता मांडून रायला हा माणूस..!! धाव र बाबा धाव...!!

             अस म्हणतं म्हणतं ती बंड्याला घेऊन बाहेर वऱ्यांड्यात पोहचते. शंकर सुद्धा तिचा आवाज ऐकून हडबडून जागा होतो. घरातून शांताबाई आणि आबा देखील बाहेर येतात.

आबा : " आवो सुनबाई.. काहून...? काय झालं?? असा गळा कायले काढून रायली??

राधा : " आव आबा... माह नशीबच फुटकं...?? कोण्या जन्माचे कर्म होय तर..?? ह्या माणूस माह्या गळ्यात बांधला!. "

शांताबाई : " आवं ... पण का झालं थे सांगशीन का न्हाई...?? का माह्या पोराच्या नावानं बोटंच मोडशीन...?? का केल का त्यांना?? "

राधा : " आवो आत्याबाई आता का सांगू तुम्हास्नी.. ह्या माणूस माह्या पोराची चिता करून रायला म्हणे..!! ( मोठ्याने रडत )

शंकर : " ( डोक्यावर हात ठेवत ) आता...! येडी का खुळी तू??? मी मह्या लेकराची चिता करीन होय??? त्या पोट्ट्यानं अनुस्वार गिळला..!!. म्या चिंता करून रायलो अस म्हणलं अन हे 'उब्बार पोट्ट ' चिंता ले चिता करून टाकली ह्यांन!!!"


               राधा बंड्याच्या पाठीत एक लावून देते. बंड्या मोठ मोठ्यानं रडत त्याच्या आजी आजोबा जवळ जातो.. ते त्याला प्रेमाने समजावतात. अस तोतड बोलू नये अस सांगतात. बंड्याच्या मूर्खपणावर सगळे हसायला लागतात.

               उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले होते. बंड्याची शाळा संपून सुट्ट्या लागल्या होत्या. बंड्या आणि त्याची मित्र मंडळी दिवसभर उनाडक्या करत गावभर फिरायचे. कधी चिंचा वेचायला जायच, तर कधी गावच्या ओढ्यावर पोहायला. कधी सायकली घेऊन गावचे रस्ते हुंदाडायचे तर कधी सायकलीचे टायर घेऊन गल्लो गल्ली पळवत असायचे. ऊन जास्त वाटलं तर एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत पहुडायचे. पॅन्टाच्या दोन्ही खिशात भुईमूगच्या शेंगा, शर्टच्या खिश्यात चिंचा भरून दिवसभर यांच्या माकडचेष्टा चालायच्या. एकदाचे घरातून खाऊन पिऊन बाहेर पडले की एकदम संध्याकाळी ही घराचं तोंड बघायची. मधे काही भूक लागली की, मग एखाद्याच्या शेतात जाऊन फळे तोडणे, शेताच्या धुऱ्यानं फिरून रानमेवा गोळा करणे..., किंवा एखाद्या च्या अंगणातील वाळवनीचे पापड घेऊन पळणे. अन चुकून एखाद्याच्या हाती सापडली तर मग मात्र, त्यांच बुढ सुजल्या शिवाय राहायचं नाही. एखाद्या सरकारी नळावर किंवा विहिरीवर त्यांची तहान भागून जायची. त्यामुळे सगळी पोरं दिवसभर बाहेर असायची त्यामुळे त्यांच्या घरच्यांची तोंड जरा कमी वाजायची.. कारण..बंड्या सोबत राहून राहून सगळी पोरं सुध्दा त्याच्या सारखीच इबलीस झाली होती.


                 उन्हाळा म्हटला की, साऱ्यांच्याच कामाला जोर येतो. शेतकरी शेतात व्यस्त होतो, तर घरातील बाया मंडळी शेवळ्या, पापड, कुरड्या, लोणची, करण्यात व्यस्त होतात. तशीच बंड्या आणि त्याची फौंज माकडचेष्टा करण्यात. सकाळी सकाळी राधा हातावरच्या शेवया करत होती. आणि शांताबाईची देवपूजा सुरु होती. बंड्या अंगणात मातीचे खेळणे बनविण्यात मग्न होता. इतक्यात शांताबाई त्याला हाक देतात...., " बंड्या... आरं... बापू का करून रायला मा?? उलिसा इकडं ये जो रे बापू...!" त्यांच्या आवाज ऐकून बंड्या आत जातो...

बंड्या : " ता व आजे..? ता झालं..??? तायले बोलावलं मले?? खेडून रायलो मी!!"

शांताबाई : " बापू... थोडसा हे पाणी शेवंती ते देऊन दे रे बापू.. जा मा!! ( त्याच्या गालावरून हात फिरवत ) मोठा गुणाचा हाय व माय लेकरू.. "

बंड्या : " मले न्हाई आवडतं शेवंती... मी न्हाई देत तिले पाणी-गिणी.. " ( चिडक्या स्वरात )

शांताबाई : " आता व बाया!! हिच्यात आवडण्याचं का हाय?? हे भांड न्याच अन पाणी फेकून वापीस याच... त्याच्यात का मोठ कष्ट लागून रायल तुले?? जा मा... गुणाचा हाय माया बंड्या..!!"


              बंड्या शांताबाई च्या हातून पाण्याचं भांडं घेतो आणि सरळ बाहेर निघतो. फाटका बाहेर निघून शेजारच्या घरी जातो. " शेवंते..... आवं ए.. शेवंते...!" मोठ मोठ्याने ओरडत शेजारच्या शेवंती ला हाक मारू लागतो . बंड्याच्या आवाजान शेवंती धावत बाहेर येते. ती जशीच दारात येते तोच बंड्या भांड्यातलं पाणी तिच्या अंगावर फेकतो. बिचारी शेवंती डोक्यापासून तर पायापर्यंत भिजून जाते.. आणि मोठयाने भोकाड पसरते. घरातून शेवंतीची माय लेकीचा आवाज ऐकून बाहेर येते . लेकीची अशी अवस्था बघून तीही चिडते आणि वसकन बंड्यावर खेकसते.. " आरं ये बैताड्या..!! कायले माया पोरीच्या अंगावर पाणी फेकलं गा?? तुले का आज होळी वाटली होय?? " " माही आजी म्हणली शेवंतीले पाणी फेक... म्या मोठ्याईच आयकतो..!" बंड्या म्हणाला. त्यांचं हे बोलण ऐकून राधा आणि शांताबाई घरातून बाहेर येतात आणि त्यांना बंड्याचा प्रताप कळतो.

शांताबाई : " आरं... अकलीच्या कांद्या...!! तुले म्या शेवंतीच्या झाडाले पाणी फेकाले लावल..., आन तू... बिचाऱ्या शेवंतीले वली केली का र..?? "


            त्या दिवशी बिचारा बंड्या बिन फुकट धुतल्या गेला. बंड्याच्या करामतीच एवढ्या होत्या. मे महिना सुरु होता. ऊन खूप कडक होत. पाऊस पडायच्या आधी शंकरला शेतीची काही हत्यार विकत घ्यायची होती. त्यालुक्याच्या ठिकाणी हत्यार नसल्याने त्याला शहराच्या ठिकाणी जाव लागणार होत. आता आणायसे शहराला जाणारच तर मग दोन तीन दिवस तिथे मुक्कामी राहून शहरात असणाऱ्या नातेवाईकांना भेटूनच परत ये अस आबांनी शंकर ला सांगितलं. त्यामुळे शंकर आता दोन दिवसांनी परत येणार होता. त्यामुळे शेतात आबा जाऊन दोन दिवस काम पाहणार होते. पण आबा म्हणजे गावचे करते धरतेच होते. त्यामुळे त्यांना कधी कोणाची अडचण सोडवायला जाव लागेल काहीच सांगता येत नव्हतं. एक दिवस कसा बसा गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी करून आबा शेतात जायला निघाले. बंडयाचे सवंगडी त्यांच्या मामाच्या गावी गेल्याने बंड्या ही एकटाच पडला होता. आबांना शेतावर जाताना पाहून बंड्या ही त्यांच्या सोबत जायला त्याच्या मागे लागला. आता पोरगा घरात कंटाळतो म्हणून आबा ही त्याला बरोबर घेऊन जातात.

               

शेतात सध्या विशेष काम नसल्याने आज आबा आणि बंड्या दोघेच शेतात होते. आबा त्यांच्या कामात मग्न होते आणि बंड्या त्याच्या माकडचेष्टांमध्ये. शेतात आंब्याला मस्त आंबे आले होते. झाड सुद्धा खूप मोठ आणि मस्त बहरलेलं होत. त्याची सावली सुद्धा थंडगार पडली होती. बंड्या बराच वेळ त्या सावलीत खेळत होता. इतक्यात त्याच लक्ष झाडाला लटकलेल्या आंब्यांकडे जातं. आंबे खाण्याचा मोह काही त्याला आवरला नाही. त्यामुळे तो दगड मारून आंबे पाडण्याचा प्रयत्न करू लागला. लहानसा बंड्या..., पण त्याचे दगड काही केल्या आंब्यांना लागतंच नव्हते. इतक्यात गावातील संतोष, आबांना शोधत शोधत शेतावर येतो आणि दुरूनच हाक मारतो....

संतोष : " आबा..! ओ... आबा...!!! "

आबा : " आरं.. संतोष...! कायले वरडून रायल गा??? आन आता हिथं कसा...?? "

संतोष : " ( घाम पुसत ) आवं आबा..! आज तारीख हाय वावराची..! कचेरीत जाव लागण.., म्हणलं तुम्ही बी संग आलात तर बेस व्हईल. "

आबा : " आरं लेका सकाळपासून झोपीत व्हता का काय?? आता वाजलेत पाय किती??? येत वरी टाइम व्हईल.. आनं एस टी भेटली नाई तर तिथंच रात्र काढावी लागण. घरी बी काई सांगितलं न्हाय..! काळजी करतील मंडळी. "

संतोष : " रात्रीची फिकीर करू नका आबा. माह्या साळ्याच्या इथं व्हईल येवस्था. आनं ह्या बंड्या हाय की.., त्याच्या हातानं घरला निरोप धाडा. "


                 आबा संतोषशी अडचण समजून त्याच्या बरोबर जायला तयार होतात. आणि आंबे तोडण्यात व्यस्त असलेल्या बंड्या ला हाक देत सांगतात...., " बंड्या....! मी तालुक्याला जातोय.. संतोष संग.., तू बी घराकडं निघ. आनं तुया आजिले सांगजो जमलं तर येतो रातच्याला.. न्हाई तर सकाळच्याला पोहचतो. जा निघ तू बी. " अस म्हणून आबा संतोष बरोबर तालुक्याला निघून जातात. मात्र आंबे तोडण्यात व्यस्त असलेल्या बंड्याच्या सगळंच डोक्यावरून जातं. कारण तो पूर्ण नेम धरून दगड आंब्याला मारण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र यश काही मिळत नव्हतं. पण ते म्हणतात ना..,

        ' प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे '


आणि नेमका एक दगड चुकून एका आंब्यावर बसतो आणि उंचावर असलेला तो आंबा फांदीपासून वेगळा होऊन खाली येताना, तो अचूक झेलावा म्हणून बंड्या ही प्रयत्न करून लागला. आणि तो आंबा त्याच्या हाती येण्या आधी जोरात त्याच्या डोक्यावर पडला. एवढ्या उंचावरून तो हिरवा कंच मोठा आंबा त्याच्या डोक्यावर पडल्या बरोबर बंड्या दोन्ही हात डोक्यावर ठेऊन खाली बसतो. त्या आंब्याचा मार त्याला काही सहन होत नाही. ऊन म्हणावं तर अस... आजू बाजूनं कोणी धावून मदतीला येईल तर तसही नाही. त्या दुखण्याने विव्हळून तो तसाच घराच्या दिशेने पळत सुटतो. उन्हामुळे घामाझक्कळ झालेला, पाण्याने घश्याला कोरड पडलेली, डोळ्यात आसवांच्या धारा, रडून रडून श्वास भरून आलेला...., अश्या अवतारात तो घरी पोहचतो आणि बाहेरच्या पडवीवर जाऊन मोठ मोठयाने रडू लागतो. त्याचा आवज ऐकून राधा लगेच बाहेर येते....

राधा : " काऊन गा बंड्या??? कायले गळा काढून रायला?? "

बंड्या : " ( हुमसून हुमसून ) आये.... आबा झाडावरून पडला आये...!!! डोत्यावर पडला आये... आबा गेला आये... "


            बंड्या आंबा डोक्यावर पडल्याची आणि आबा बाहेर गेल्याची दोन्ही गोष्टी एकत्र करून सांगतो आणि त्याच्या शब्दांमुळं सगळा घोळ होऊन बसतो. हे ऐकताच राधा चा बांध फुटतो. बंड्या असा रडतोय म्हणजेच नक्की काहीतरी अभद्र घडलंय याची तिला कल्पना येते. आबा घरातील करते, त्यामुळे ते नाही म्हंटल्यावर काही खर नाही. घराचा कणाचं मोडला अस तिला वाटलं. ती डोक्यावर हात घेऊन तिथेच बसते आणि मोठयाने रडायला लागते. या माय लेकाच रडणं ऐकून शांताबाई घरातून बाहेर येतात....,

शांताबाई : " आरं देवा..! आता व बया ! अस भरल्या घरात कायले गळा काढून रायले तुम्ही दोघ..??? आवं सुनबाई!! काऊन व का झालं..???

राधा : " ( रडत रडत ) आत्याबाई....... आपले आबा..... आपले आबा गेले....!!!"


            हे ऐकताच शांताबाई देखील खचून जातात. कुठल्याही गोष्टीची शहानिशा नं करताच दोघीनीही आबांना एका क्षणात मृत घोषित करून दिल होत. शांताबाई लगेच दोन्ही हातातील बांगड्या फोडतात, कपाळावरच कुंकू पुसतात आणि मोठयाने हंबरडा फोडतात..., " धनी.......!!! आवं माया धनी गेला व... अस कस केल र देवा तून??? काऊन अस केल रं?? मला स्वाशीन नेता...??. काऊन अस केल..?? का कसूर झाला तुया सेवेत..?? काऊन अस केल गा??? " यांच्या घरातला रडण्याचा गोंधळ ऐकून शेजारचे लोक जमा व्हायला लागतात. नक्कीच काहीतरी झालाय म्हणून शेजारची आजी शांताबाईला विचारते.., " शांते...! काऊन माय?? काऊन लडून रायली व???? "

शांताबाई : " माहा धनी गेला व... मले एकटा सोडून गेला.. "


               आता पर्यंत आबांच्या जाण्याची खबर वाऱ्यासारखी गावभर पसरते आणि बघता बघता सगळा गाव तिथं जमा होतो. सगळा गाव आपल्या दुःखात सामील झाला याच बंड्याला मोठ कौतुक वाटायला लागत. सगळ्या लोकांचं काय चाललंय.., याच्याशी त्याच काहीच देण घेणं नव्हतं. पण मी रडतोय म्हणून सगळी लोकं रडत आहेत असा त्याचा समज झाला, आणि तो परत आपलं डोकं दाबून अजून अजून जोर देऊन रडू लागला . एव्हाना त्याचा त्रासही थोडा कमी झाला होता..पण लोकं आपलं सांत्वन करताहेत हे त्याला खूप भारी वाटतं होत. आणि त्यात या दोघींचं काही तरी वेगळं चाललेल..., त्यात आजू बाजूची लोक.. " आवं माय..! लई बेकार झालं व माय!! चांगला माणूस व्हता.. आज सकाळच्याले माह्या घरी च्या पेला व आबान.. " दुसरी लगेच.., " माय..! तुह्या घरून च्या पिऊन माह्या घरी सुपारी खाल्ली व..!! " आता काही लोक लगेच शेतावर गेले पण त्यांना आबा कुठंच जवळपास दिसलें नाही. आता आबाच शव गेलं कुठे?? असा प्रश्न निर्माण झाला?? त्याच निराकरण करत एकाने गर्दीतून सूर काढला..., " आरं देवा जंगली श्वापदान तर नसण नेलं न गा?? " आता मात्र शांताबाई सहन करू शकत नाही... " आरं देवा विठ्ठला... मले तोंड बी नाई दावलं माया धन्याचं... काऊन गा अस केल गा..?? " शेजारच्या काकू समजावत म्हणतात..., " शांत व्हय मा!! नियतीपुढं कुणाचं बी न्हाई काई चालत.. नग रडू!! ज्याचं जेवढं लिहिलंय थो तेवढाच जगतुय.. एक दिस बी जास्ती न्हाई जगत कुणी बी...!! शांत हो माय..!!"


               सारा गाव हळहळ व्यक्त करू लागतो. आबा आणि त्यांचे कार्य, लोक त्यांच्याविषयी आपले मन अभिव्यक्त करू लागतात. बघता बघता संध्याकाळ होते. आबा आणि संतोष चे काम सुद्धा वेळेत पूर्ण होते आणि ते गावी पोहचतात. आबा घरापाशी पोहचतात. घरासमोरची गर्दी बघून त्यांच्या मनात कालवा कालव सुरु होते. काय झालं असेल? घरीची मंडळी बरी असेल ना?? बंड्या.. बंड्या बरा असणं का न्हाई..?? सगळे प्रश्न मनात घेऊन गर्दी चिरत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. एवढ्यात कुणाचं तरी लक्ष आबांन कडे जाते आणि एकच खळबळ उडते... " आवं.... माय..... बाई.... भूत......!!!"

सगळे इकडे तिकडे पळायला लागतात. आबांना काहीच लक्षात येत नाही. काय चाललंय त्यांना समजण्याला काहीच मार्ग नसतो. एवढ्यात एक माणूस आबांना भीत भीत म्हणतो..., " आबा... तुम्ही त मेले व्हते नं.. इथं कसे आले..? " आता मात्र आबांच्या तळपायातली आग मस्तकात जाते. " आरं ए... मुरद्या... तुया जिभेले काई हाड?? अजून म्या जित्ता हाओ..!! ह्या भाऊराव शिरक्या असा तसा न्हाय जायचा. " अस म्हणतं आबा घरात शिरतात.. आणि सगळ्या लोकांना पळवून लावतात. आबांचा आवाज ऐकून राधा आणि शांताबाई धावत आवाजाच्या दिशेने बघतात. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही...!

शांताबाई : " आरं देवा..!! तुम्ही त जितेच हाय व... पांडुरंगा.. माया धनी वापस धाडला गा... लई आभार गा तुये..!"

आबा : " आवं.. शांते... गप की...! म्या मेलो म्हणून कोण सांगतल तुम्हाले?? "

राधा : " आवो आबा..! ह्या बंड्या म्हणला का तुमी झाडावरून पडले आनं गेले..!!( रडायच्या सुरात )

आबा : " म्या तालुक्याले गेलतो..! आनं ह्या बंडयाले घरी धाडला. निरोप सांगाले.. कारं.. ये.. पोट्ट्या... का गोंधळ घालून ठेवला बे...??? ( बंड्या वर रागवत )

राधा : " आरं ये.. दलिद्दर... काऊन अस सांगतल..?? का आबा पडला... झाडावरून पडला..., डोक्यावर पडला..., तुह्या जिभेले काई हाड बीड हाय का न्हाय?? "

            डोक्यावर हात ठेऊन बसलेल्या बंड्याला बघून आबा त्याच्या जवळ जातात आणि विचारतात.., "काऊन गा?? का झालंत..??? " बंड्या रडत रडत आबांना सांगू लागतो.. "आबा म्या दगड मारला त आबा पडला... माह्या डोक्यावर पडला... झाडावरून..! आबा आता डोक्यावरच हात ठेवतात.., " आवं बायायव्हा... त्याच्या डोक्यावर आंबा पडला झाडावरून...!!


              त्या दिवशी बंड्याला जन्मात कोणी धुतला नसन इतका साऱ्यांनी धुवून काढला..! त्या दिवसानंतर बंड्याचा तोतडेपणा कुठल्या कुठं पळून गेला. त्याची काना, मात्रा, विलांटी, महत्वाचं म्हणजे... अनुस्वार गिळण्याची सवय मोडून पडली. आता बंड्या गावात सगळ्यात स्पष्ट आणि शुद्ध उच्चारण बोलणारा म्हणून ओळखला जातो. बंड्या आता मॅट्रिक पास झाला असून, त्याच्या गावातल्या लहान, हुल्लड बाज पोरांना शुद्ध शब्द कसे बोलावे याचे वळण लावण्याचं काम करतो. आता बंड्याच्या गावातील लोकं सुद्धा शुद्ध मराठी बोलतात. आता बंड्या, बंड्या राहिला नसून श्याम म्हणून ओळखला जातो. लहान मुलांना शिकवताना श्याम त्यांना आवर्जून अनुस्वार खाल्ल्याने काय होत याविषयीं सांगत असतो. त्याच्या शिकवणीच्या वर्गाला दरवर्षी येणारी मुलं ' आबा झाडावरून पडला ' ही कथा त्याच्या तोंडून ऐकतात आणि पोट धरून हसत असतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy