ऑपरेशन पारध
ऑपरेशन पारध
नाम्याने पोझिशन घेतली. आता सगळे श्वास रोखून बघू लागले सगळीकडे शांतता झाली. नाम्याने बंदुकीचा चाप ओढला. मोठ्याने ठो करून आवाज झाला. सगळीकडे धूर झाला... पण पारध काही झाली नव्हती. झालं असं होतं की...
मार्च महिना नुकताच संपला होता आणि एप्रिल महिन्याची सुरवात झाली होती. माझी बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि मी मामाकडे कोकणात गावाला आलो होतो महिनाभर राहण्यासाठी, त्या दिवशी मी सकाळी मस्त पैकी लोळत बिछान्यावर पडलो होतो. आजी मला उठण्यासाठी ओरडत होती. मामाने दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. त्यासाठी त्याला भटजीं कडे जायचे होते पूजेचे सामान पण बाजारात जाऊन घ्यायचे होते.
आजीला मला मामाबरोबर पाठवायचे होते त्याला मदत करण्यासाठी. मी उठलो आणि माझ्या तयारीला लागलो. माझी तयारी आटपून मी बाहेर ओसरीवर आलो. तर मामा गावातल्या काही लोकांबरोबर बोलत होता. ते सगळे गावच्या वार्षिक डुकराच्या पारधीबद्दल बोलत होते. माझे कान एकदम तिकडे लागले. आलेली माणसे सांगत होती सारंगवाडीची माणसे चार दिवस जंगलात देवाच्या पारधीसाठी फिरत होती पण डुकरं काय त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे आज ते देवळात पारधीचो कौल परत करुक जाणार होते. आणि त्यानंतर मामाच्या सावंतांच्या वाडीला पुढचे चार दिवस पारधीची संधी मिळणार होती. आणि मग कदाचित आजच मामाच्या वाडीतील लोकांना पारधीला निघावं लागणार होतं.
मामाच्या गावी अशी प्रथा होती की प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात देवासाठी डुकराची शिकार करायची आणि ज्या वाडीला ती शिकार मिळाली त्या वाडीतील लोकांनी ते मटण वाडीतल्या लोकांना शिजवून खायला घालायचं. त्यासाठी प्रत्येक वाडीतल्या लोकांनी दरवर्षी वर्गणी द्यायची तसेच शिकार झाल्यावर गावच्या शाळेतल्या पटांगणात ते मटण शिजवायचं. त्यासाठी वाडीतल्या लोकांनी जेवणाला लागणार सामान प्रत्येक घरातून द्यायचं. तसेच मटण खायला जाताना आंपल्याला लागणाऱ्या भाकऱ्या घेऊन जायच्या. थोड्या जास्त घेऊन जायच्या त्या बाहेरच्या इतर मान्यवर लोकांना खायला द्यायच्या. या सगळ्या प्रकाराला ते देवाची पारध म्हणायचे. एकप्रकारे ती प्रत्येक वाडीची नॉनव्हेज पार्टीच असायची. नाव फक्त देवाचं. मी आणि मामा भटजीकडे निघालो. पुढच्या दरवाजाने निघालो इतक्यात मामाच्या लक्षात आले इथून गेलो तर उशीर होईल. आपण मागच्या दरवाजाच्या रस्त्याने गेलो तर लवकर भटजींकडे पोचू म्हणून आम्ही मागच्या झाडीतल्या रस्त्याने निघालो. मागच्या रस्त्यावर बरंच जंगल असे आणि झाडंझुडपंही बरीच.
आम्ही मागच्या रस्त्याच्या पायवाटेवरून निघालो. मामा पुढे आणि मी मागे असे आम्ही पायवाटेवरून जात होतो. घरापासून थोड्याच अंतरावर गेलो होतो. इतक्यात बाजूच्या झाडीतून आवाज आला. त्यामुळे पुढे चालत असलेला मामा थांबला. मी मामाला विचारल काय झाले. तो बोलला थांब. कसलातरी आवाज बाजूच्या झाडीतून येतोय. आम्ही थांबल्यावर तो आवाजपण थांबला. आम्ही परत निघालो. त्याबरोबर परत आवाज सुरु झाला. आता मामाने मला थांबून गप राहायला सांगितलं. झाडीतून आवाज येत होता. मामाने मला ज्या झाडीच्या दिशेने आवाज येत होता त्याच्या बाजूला राहायला सांगितलं. त्याने बाजूला पडलेली झाडाची मोठी काठी घेतली. आणि हळूहळू सांभाळून आवाज येणाऱ्या दिशेच्या झाडाची पाने काठीने बाजूला केली त्याबरोबर मोठ्याने आवाज करत व जमिनीवरील माती उडवत एक मोठा रानडुक्कर जोरात पुढे आला.
आम्ही दोघेही घाबरून बाजूला झालो. पण डुक्कर होता तिथेच उभा होता तो मोठ्याने आवाज करत पुढेमागे होत होता मातीचा धुरळा उडवत होता. पाच मिनिटे आम्हाला काही समजत नव्हते.
डुक्कर पळायचा तर प्रयत्न करत होता पण तो पुढे जाऊन मागे येत होता. आता मामाच्या लक्षात सगळा प्रकार आला. पावसात वाडीतल्या पोरांनी डुकरं, भेकर पकडण्यासाठी झाडीत काही सापळे लावले होते. ते त्यांनी काढले नव्हते आणि नेमका हा डुक्कर त्यात अडकला होता. डुकराचा एक पाय त्यात अडकला होता.
मामाने मला लांब उभे राहून डुकरावर लक्ष ठेवायला सांगितले आणि तो धावत घराकडे गेला. घराजवळ जाऊन मामाने बाजूच्या मंग्याला कुकारे घालायला सुरवात केली. मामाच्या कुकाऱ्याने मंग्या ताबडतोब आला. त्या दोघांनी ताबडतोब आमच्या शेजारी राहणाऱ्या पोलीस पाटील बालीला कुकारे घालून बोलावून घेतले. तिघेही ताबडतोब मामाबरोबर मी जिथे उभा होतो तिथे आले. डुकराला फासकीत अडकलेला बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. मामा बोलला आपण डुकराला मारू या. त्याबरोबर डुकराला बघून आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या मंग्याने उड्या मारायला सुरवात केली.
तो बडबडायला लागला मला कोणीतरी कुऱ्हाड आणून द्या मी डुकराक मारतंय. तो असा बडबडत डुकराच्या समोर जाऊ लागला त्याबरोबर डुक्कर जास्तच जोर काढून पळायचा प्रयत्न करू लागला. ते बघून बाली मंग्यावर ओरडला. "अरे मेल्या आधी डुकराच्या समोरून बाजूक हो."
"मेल्या फासकीतून डुक्कर निसटलो आणि त्याने तुका फुटबॉलसारखो उडवल्यानं तर खंयच्या झाडयेत तुझो गोल होईत तुका कळुचो पण नाय." मंग्या बाजूला झाल्यावर डुक्कर थोडा शांत झाला. मग बाली बोलू लागला, "डुक्कर काल रात्रीच फासकीत अडकलेलो दिसता. काल रात्री त्याचो ओरडण्याचो आवाज येत होतो."
मामाने त्याला विचारलं आता याला मारायचं कसं? बाली बोलला आपण याला मारू शकत नाही. सारंगवाडीवाले पारधीला गेलेले आहेत ते जोपर्यंत कौल देवळात परत करत नाही तोपर्यंत आपण याला मारू शकत नाही. आपण मारलं तर त्यावर सारंगवाडीवाले हक्क सांगतील. आयती शिकार त्यांना मिळेल. आपण ते देवळात कौल परत करेपर्यंत थांबू. पुढच्या तासाभरात ते कौल परत करतील. त्यांनी कौल परत केला रे केला की आपण इथे बार काढू या डुकरावर.
बालीने ताबडतोब कुकारे घालून आजूबाजूच्या घरातील ४-५ पोरांना बोलावून घेतलं. सगळ्या पोरांना प्लॅन समजावून सांगितला. कोणीही डुक्कर फासकीत अडकल्याची बातमी सारंगवाडीवाले कौल परत करेपर्यंत फुटायला द्यायची नाही. कुठेही बोंबाबोंब व्हायला द्यायची नाही. एकदम नॉर्मल राहायचं म्हणून सांगितलं. बातमी फुटली आणि डुक्कर हातचो गेलो तर वर्षभर देवळात दिले जाणाऱ्या बळीतल्या एकापण मटणाचो वाटो वर्षभर बातमी फोडणाऱ्याक मिळूंक देणार नाय असा दम द्यायला तो विसरला नाही.
आणि मग सुरु झालं "ऑपेरेशन पारध..."
आता बालीने मंग्याला सांगितले तू देवळात जाऊन ताबडतोब बस. सारंगवाडीवाल्यानी कौल परत केल्याबरोबर तू इथे येऊन ताबडतोब आम्हाला सांगायचं. कोणालाही डुक्कर फासकीत सापडलो हा या कळूक देवचा नाय. असं सांगून त्याने त्याला देवळाकडे पिटाळलं. त्याने मामालाही सांगितलं कोणालाही फासकीत डुक्कर अडकलो हा या इतक्यात सांगायचा नाय.
पोरांनी आपल्याबरोबर आणलेल्या जाड दोरांनी डुकराला चांगलं बांधलं. जेणेकरून तो आतां हलू शकत नव्हता. डुक्कर आता पळू शकत नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी डुकराच्या समोर काही काजूचे बोन्ड त्याला खायला टाकून बाजूच्या झाडाच्या सावलीत प
त्ते खेळत ते बसले. बालीने एका मुलाला गपचूप बंदूकवाल्याला बोलवायला पाठवले.
आता सगळी तयारी झाली होती. फक्त कौल परत केल्याच्या निरोपाची सगळे वाट बघत बसले. मी आणि मामा भटजीकडे निघालो. भटजींकडे पोचलो आणि त्यांची वाट बघत खळ्यात बसलो. भटजी थोड्या वेळाने आले. मामाशी पूजेच्या साहित्याबद्दल बोलून झाल्यावर त्यांनी नेमका विषय पारधीवर काढला.
भटजींनी मामाला विचारलं “मग पारध झाली की नाय? आम्ही सर्द. डुक्कर सापडल्याची बातमी भटजींना समजली की काय? मामाने जणू आपल्याला काही माहीत नसल्यासारखं दाखवलं. भटजींनी मामाला विचारलं, आज तुमचे लोक जातील ना पारधीला? मामाने फारशी माहिती नसल्याचं सांगितलं. आम्ही काम झाल्यावर भटजींकडून निघालो.
भटजींच्या घराबाहेर आल्यावर मामा बोलला, सामान आपण संध्याकाळी आणू आता डुक्कर मारला की नाही ते जाऊन पाहू. मलाही उत्सुकता होती पारध कशी करतात ती बघायची. नंतर मामा रस्त्यात म्हणाला या भटजीला काय पडलीय पारधीची. उगाच आपला खोदून खोदून विचारत होता. मटणाचा एक वाटा लपवून मागून खात नाही ना भटजी? आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो.
इथे देवळात मंग्या जाऊन पोचला. सारंगवाडीतले देवळात कौल परत करायला जमले होते. इतक्या सकाळी मंग्याला बघून नाना सारंग हडबडला. त्याने मंग्याला विचारले, काय रे इतक्या सकाळी देवळात इलस तों? मंग्याने दर्शनाक इलंय म्हणून सांगितलं. तरी नाना सारंग बोलला. “मेल्या आंघोळ तरी केलंस काय? दर्शनाक इलंय म्हणून सांगतस तो.” मंग्या काहीच बोलला नाही गुपचूप देवळात बसला. नानाला त्याचं येणं वेगळंच वाटत होतं. तो काही त्याला विचारणार इतक्यात नानाच्या बरोबरच्यानी त्याला कौल परत करायला बोलावलं. सारंगवाडीवाले कौल परत करून देवळाबाहेर आले. नाना सारंगाने मंग्या कुठे दिसतो काय बघितलं पण मंग्या देवळात कुठेच नव्हता. कौल परत केल्याचं बघितल्याबरोबर मंग्याने सरळ धूम ठोकली होती.
मंग्या डुक्कर बांधलेल्या जागी पोचला त्याने सारंगवाडीवाल्यांनी कौल परत केल्याची आणि आता डुक्कर आपण मारू शकतो ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली. सगळ्यांचे चेहरे मटण खाऊक मिळतला म्हणून टवटवीत झाले होते. आजूबाजूच्या घरातील काही म्हातारी माणसे, पोरं, बायकापण डुकराची लाईव्ह पारध बघण्यासाठी उत्सुकतेने आले होते. मी आणि मामापण तोपर्यंत तिथे पोचलो.
बंदूकवाल्याने आपली बंदूक तोपर्यंत साफ करून घेतली. बंदुकीत दोन मोठे बार भरले. बालीने सगळ्यांना डुकरापासून लांब उभं राहायला सांगितलं. बंदूकवाला नाम्या डुकराच्या एकदम समोर उभा राहून त्याच्यावर बार काढणार होता. नाम्याने डुकरावर नेम धरला. सगळीकडे शांतता झाली. नाम्या डुकरावर नेम धरून बार काढणार इतक्यात "थांबा" म्हणून आवाज आला. काय झालं म्हणून सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने बघितलं. तर दिप्याचो बापूस थांबा म्हणून बोलत होतो. "काय झाला?" बालीने पिकल्या पानाला विचारलं. दिप्याचो बापूस बोललो "मेल्यानो पारध करता हास गारानो कोण करतालो? आधी गारांना घाला." सगळ्यांनी व्हय बरोबर आसा म्हणून संमती दिली. दिप्याच्या बापाने गारांना घातल्यानं.
परत नाम्याने बंदूक घेऊन पोझिशन घेतली. नाम्या बार काढणार इतक्यात परत मोठ्याने "थांबा" म्हणून दिप्याचो बापूस ओरडलो.
"शिरा पडली, आता काय झाला?" नाम्या वैतागला. दिप्याचो बापूस बोललो अरे देवाची पारध करतास ती अशी कुत्र्याक बांधतत् तशी काय करतास? डुकराक सोडा आधी आणि मग त्याच्यावर काय तो बार काढा. झाला आता लोकांमध्ये दोन गट पडले. एक डुक्कर सोडून पारध करा बोलू लागला. दुसरा बांधून पारध करू बोलू लागला. आरडाओरडा वाढला. काय करायचं काही कळेना.
इतक्यात बालीने ओरडून सगळ्यांना गप केलं. तो बोलला “डुकराक सोडून पारध करूक गेलाव तर डुकराचा नखपण दिसूचा नाय.” “सारंगवाडीवाले डुक्कर शोधून कंटाळले चार दिवस पण त्यांका गावुक नाय.” “आपल्याक आयतो गावलो हा तो असोच सोडूचो काय? पारध डुकराक बांधूनच होतली.” सगळ्यांना ते पटलं.
नाम्याने परत पोझिशन घेतली. आता सगळे श्वास रोखून डुकराकडे बघू लागले. सगळी शांतता झाली. नाम्याने बंदुकीचा चाप ओढला. मोठ्याने ठो करून आवाज झाला. सगळीकडे धूर झाला. थोड्या वेळाने धूर कमी झाला. सगळ्यांना वाटलं डुकराला गोळी लागली डुक्कर मेलं. पण डुक्कर होतं त्याच जागी जिवंत उभं होतं. लोकांना समजेना असं कसं झालं? डुक्कर जिवंत कसं गोळी लागून?
नंतर समजलं बंदुकीतून फुसका बार उडाला होता. फक्त धूर आणि आवाज. गोळी लागलीच नाही. ते पाहून लोक नाम्यावर वैतागले त्याची मस्करी करू लागले, "काय मेल्या तू. डुक्कर तुका कुत्र्यासारखो बांधून दिलाव. पण तरी तुका इतक्या जवळून डुक्कर मारूक जमाक नाय. कसलो रे तू बार काढणारो." "तू आणि तुझी बंदूक दोघांका गंज चढलो हा." असे बोलत सगळे त्याच्यावर हसू लागले.
लोकांच्या अशा बोलण्यामुळे नाम्या चिडला. बालीला बोलला मी जातो तुम्ही दुसऱ्याला बोलवा. माझी मस्करी केलेली मला चालणार नाही. बालीने लोकांना शांत राहायला सांगितलं. नाम्यालापण समजावलं.
नाम्याने परत पोझिशन घेतली. सगळे शांत झाले. नाम्याने परत डुकरावर बार काढला. आता मात्र गोळी बरोबर डुकराच्या डोक्यात घुसली. डुक्कर थोडा थरथरला. ओरडला आणि शांत होऊन पडला. पोरांनी मोठ्याने "हर हर महादेव" म्हटले. डुकराला काठीला उलटे बांधले आणि बोंबाबोंब करत देवळाच्या दिशेने फटाके वाजवत गेले.
पारध झाली होती. वाडीतल्यांनी ताबडतोब आपल्या नातलगांना रात्री मटण खायला यायची आमंत्रणं पाठवली. रात्री मी आणि मामा रिकामा डबा घेवून काळोखातून चालत शाळेच्या पटांगणात गेलो. तिथे मोठमोठ्या चुली करून त्यावर मोठे टोप ठेवून मटण शिजवत ठेवलं होतं. काही पोलीसपण आले होते. त्यांच्यासाठी वेगळी टेबलावर जेवणाची सोय केली होती. मटणाच्या जेवणापूर्वी गावातली म्हातारी माणसे आणि तरुण पोरं झाडांच्या मागे काळोखात आपापला ग्रुप करून गुपचूप पेयपानाचा आनंद घेत होती. एका झाडामागे आमचे माननीय पोलीस पाटील बालीपण पेयपानाचा आनंद घेत होते.
मी आणि मामा मैदानातच इतर गावकऱ्यांबरोबर बसून मटणाचं जेवण घामाघूम होऊन जेवलो इतकं ते झणझणीत आणि तिखट केलं होतं. मामाने घरच्या बायकांसाठी डबा भरून मटण घेतलं.
दोन दिवसांनी मी आणि मामा रस्त्याने संध्याकाळी जात असताना बाली आणि काही पोरं दिसली. मामाने त्यांना कुठे चाललात म्हणून विचारलं. बालीने सांगितलं पारधीचो कौल घेवूक देवळात चाललाव आणि ते गेले.
मी मामाला विचारलं अरे पारध तर झाली ना? मामा बोलला अरे हे लबाड लोक आहेत पारधीची वार्षिक वर्गणी फुकट जाईल म्हणून परत पारधीला चालले आहेत रिकामटेकडे कुठचे. त्यांना काय फुकटची दारू प्यायला मिळते लोकांच्या पैश्यावर.
जाऊ दे आपल्याला काय पारध झालीच तर आपल्याला स्वस्तात भरपूर मटण खायला मिळते ना बस झालं. आपल्यालापण आणखी काय हवं? आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो.