Milind Rane

Tragedy Others

4  

Milind Rane

Tragedy Others

"गोडाचा शिरा"

"गोडाचा शिरा"

15 mins
521


रविवारची मस्त सकाळ होती . हवेत छान गारवा होता . मी पेपर वाचत बसलो होतो. बायको चहा आणि नाश्ता कधी देतेय याची वाट पाहत होतो .

स्वयंपाक घरातून छान साजूक तुपात शिरा बनवत असल्याचा वास येऊ लागला . मी त्या वासाचा आनंद घेत होतो . इतक्यात आमचे चिरंजीव समोर येऊन बसले. मला आश्चर्य वाटलं. रविवारी इतक्या लवकर उठून आंघोळ वगैरे करून तो माझ्या समोर बसलाय याच्यावर माझा थोडावेळ विश्वासच बसेना .

इतर दिवशी तो कामावर खूप बिझी असतो . रविवारचा उशिरा पर्यंत लोळत पडलेला असतो . त्यामुळे आज सकाळी लवकर उठून माझ्या समोर तयार होउन बसलेला बघून मला थोडं आश्चर्यच वाटलं. मी त्याला विचारलं काय रे आज रविवारचा सकाळीच उठलास ? कुठे बाहेर जाणार आहेस का ? तो थोडा घाबरलेला आणि गोंधळलेला वाटला . मला म्हणाला बाबा थोडं तुमच्याशी बोलायचं होतं .

मी त्याच्या कडे थोडं रोखून बघितलं . "बोल काय बोलायचंय ". तो थोडा गोंधळत मला बोलला "बाबा मला माझ्या लग्ना बद्दल तुमच्याशी बोलायचंय".  मी आश्चर्य चकित झालो . मी बायकोला हाक मारली . ती बाहेर आली . मी तिला म्हणालो " ह्याला त्याच्या लग्ना बद्दल बोलायचंय ". बायकोने मला सांगितलं तिला सगळं माहीत आहे . “आपल्याच बिल्डिंग मधल्या अक्षदा बरोबर त्याला लग्न करायचंय”. तिच्या घरातले तयार आहेत . मी तिला म्हणालो “तुला पसंत आहे का ?” बायको म्हणाली “मुलगी चांगली आहे . तिला आणि तिच्या घरातल्याना आपण चांगले ओळखतो” . " ते हि आपल्याला चांगले ओळखतात ". मुलगी शिकलेली आहे, नोकरी ला आहे . स्वभावाने चांगली आहे. करू देत लग्न . बाकी त्याला पसंत आहे ना ? मग झालं .

मी बायकोला विचारलं अग पण ती news चॅनेल मध्ये काम करते. तिच्या कामाच्या वेळा नक्की नसतात. जास्त वेळ काम करावं लागते . रात्री उशीर होतो . तूच मागे म्हणाली होतीस. मग हे चालेल का तुला ?

"हो चालेल ". जितके दिवस चालवता येईल तितके दिवस. जेव्हा तिला किंवा मला वाटेल आता एकत्र जमणार नाही तेव्हा त्यांनी वेगळं राहावं . मी शशांक ला हे आधीच सांगितलंय .

तो आणि ती याला तयार आहेत. उगाच एकत्र भांडत का राहावं . त्यांना त्यांचं आयुष्य आहे आपल्याला आपलं . मी बायको कडे पाहतच राहिलो .

सगळ्यांचा होकार होता लग्नाला . मी हि होकार दिला . मुलगा खुश झाला . बायकोने तिने केलेला तुपातला हळद घालून केलेला गोडसर शिरा आम्हाला दिला . मी म्हटलं आज हा शिरा केलास . ती म्हणाली हो तुम्हाला आवडतो म्हणून केला . " तुमचा मुड चांगला होउन शशांकच्या लग्नाला तुम्ही होकार द्यावा म्हणून ". बायको आणि मुलगा हसला .

मी प्लेट मधल्या त्या "गोडाच्या शिऱ्या " कडे पाहू लागलो . मला हा गोडाचा शिरा खूप आवडतो. त्या शिऱ्या कडे पाहिल्यावर मला मानसीची आठवण झ्हाली . माझं मन ३५ वर्ष मागे भूतकाळात गेलं . ……..

मला आमची बैठी चाळ आठवली . आमच्या चाळीत आमचे बरेचसे शेजारी हे कोकणातलेच होते . आमची १० बाय दहाची खोली होती . त्यात मी माझे आई वडील माझ्या पेक्षा वयाने ४- ६ वर्षांनी लहान असले दोन भाऊ आणि माझ्या पेक्षा वयाने ८ वर्षांनी लहान असलेली एक बहीण होती . मी तेवीस वर्षांचा होतो . नुकताच बी ए करून एका चांगल्या कंपनीत जुनियर क्लार्क म्हणून अकाउंट डिपार्टमेंट मध्ये लागलो होतो . वडील पोष्टात कामाला होते . आणि वर्ष भराने निवृत्त होणार होते . मोठ्या बहिणीचं लग्न झाले होते. भावजी चांगले बँकेत ऑफिसर म्हणून कामाला होते. आई दिवस रात्र आम्हा सगळ्यांचं करत होती. वडील स्वभावाने गरीब होते. शांत स्वभावाचे होते. जास्त बोलत नसत. आई मात्र सारखे बोलत असे . सारखी कामात असे . तिला आमच्या सगळ्यांच्या भवितव्याची काळजी लागलेली असे . वडिलां पेक्षा आम्ही भावंडे आईलाच जास्त घाबरत असू . घरातले बरेच से निर्णय आईच घ्यायची . आमची आर्थिक परिस्तिथी गरीबच होती . वडील सेवानिवृत्त होणार याची आईला काळजी लागलेली होती .

ती मला सांगत असे " सुनील घरात आता तूच मोठा आहेस " घराची सगळी जवाबदारी तुझीच आहे " . भावंडांचं शिक्षण तुला पूर्ण करायचं आहे . तेव्हा आता घरा कडे जास्त लक्ष दे . तुझं लग्न हि करायचं आहे .


"मानसी " माझी चाळीतली बाल मैत्रीण खूप सुंदर होती . गोरी गोरी पान , लांब केस . सडपातळ बांधा . लहान पणा पासून आम्ही दोघे एकमेकांना ओळखत होतो . ती आमच्या समोरच्या खोलीतच राहायची . तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती . तिचा मोठा भाऊ , तिचे वडील आणि ती आमच्या समोरच्या खोलीत राहत . तिचे वडील  बीएमसी मध्ये कामाला होते . भाऊ माझ्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता . आणि एका खासगी कंपनीत नुकताच कामा ला लागला होता .

मानसी १९ वर्षांची होती . बारावी पास होती . घरातली सगळी काम करायची . शिवण काम फावल्यावेळेत करायची. तिला बोलायची खूप आवड , स्वतःहून लोकांशी ओळख करून घेण्याची मैत्री करायला तिला आवडायचं . सगळ्यांना मदत करायला पुढे . चाळीतल्या गणेशोत्सव , नवरात्रोस्तव , हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात स्वतःहून भाग घ्यायची . चाळीतल्या मुलांन बरोबर तिची ओळख आणि मैत्री होती . तिच्यात उत्साह खूप , सदैव हसरा चेहरा . आपलं म्हणणं ती सगळ्यान समोर मांडायला घाबरायची नाही . तिला नवीन पद्धतीचे कपडे वापरायला आवडायचं . तिच्या वडिलांच आणि भावाचा ती जीव कि प्राण होती . तिचे वडील तर बऱ्याचदा म्हणायचे तिला चांगलं सांभाळणारा आणि तिच्या वर प्रेम करणारा मुलगा तिला नवरा म्हणून मिळाला कि आमची चिंता मिटली .

तिच्या घरातल्यांच आणि आमच तिच्या घरी येणं जाणं होतं . शेजार पाळ एक मेकांना देणं घेणं होतं .ती माझ्या आवडीचा गोडाचा शिरा कधी तरी रविवारची करायची . आमच्या घरी आणून द्यायची . पण घरात आम्ही इतके जण असायचो कि मला तो जास्त खायला मिळायचा नाही . आमची आई तिला म्हणायची " अग महागाई किती वाढलीय असा तुपातला शिरा करायला कुठे परवडतोय आम्हाला" . तुमचं ठीक आहे तिघेच जन आहात . भाऊ हि आता कामाला लागलाय तुझा . आमच्या कडे खाणारी माणसं जास्त . सुनील च्या वडलांच्या पगारात कुठे परवडतंय . " .

मानसी काही बोलायची नाही . जाताना मला म्हणायची तिच्या बाबांनी बोलावलंय लवकर ये आमच्या कडे . तिला माहीत झालं होत . मला गोडाचा शिरा खूप आवडतो . मी तिच्या घरी गेलो कि माझ्यासाठी बशीत तिने शिरा काढून ठेवलेला असायचा . मला खायला द्यायची . कसा झाला ? आवडला का तुला म्हणून विचारायची . तिच्या वडिलांशी आणि भावाशी माझे चांगले संबंध होते . आम्ही राजकारणावर , क्रिकेट वर तासनतास बोलत असू . मानसी पण आमच्या बोलण्यात भाग घेत असे .

हळू हळू कळत नकळत आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो . मग ती रोज मी कामावर जायच्या वेळेला त्यांच्या खिडकीत उभी राहायची . मी कामावरून घरी आलो कि काही तरी काम काढून आमच्या घरी यायची . तिच्या वडलांनी किंवा भावाने मला त्यांच्या घरी बोलावलंय सांगून जायची . मी त्यांच्या घरी गेलो कि मला तिने केलेला पदार्थ खायला द्यायची . कुठ्लाणा कुठला विषय काढून माझ्याशी बोलत बसायची . आम्हा दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता हवा हवासा वाटू लागला होता .

इतक्यात मला एके दिवशी आई कडून कळाले कि मानसीला आमच्या शेजारच्या शिर्के काकूंनी आपल्या नितीन साठी मागणी घातली होती . पण मानसीच्या भावाने त्यांना नकार दिला कारण तो थोडा व्यसनी होता म्हणून . शिर्के काकी खूप रागावलेल्या त्यांच्या मुलाचं स्थळ नाकारल्या मुळे .

मानसीच्या घरी माझं जाणं येणं चालू होत . आईला आणि बाबाना एका नातेवाईकांच्या लग्ना साठी चार पास दिवसासाठी गावी जावं लागलं . आणि मला आणि मानसी ला एकमेकांचा जास्त सहवास मिळू लागला . मानसीचा त्या दिवशी वाढदिवस होता . मी मानसीला संध्याकाळी बाहेर भेटायला बोलावलं . तिला छानसा ड्रेस व तिच्या आवडीचे उंच टाचांचे सॅंडल तिला घेऊन दिले वाढदिवसाची भेट म्हणून . तिला हॉटेल मध्ये पार्टी दिली . आम्ही बागेत फिरायला गेलो . बागेत हातात हात घालून फिरलो , एकमेकांच्या जवळ बसलो . तिने माझ्या खांद्यावर तीच डोकं बराच वेळ ठेवलं होतं . मी तिला सांगितलं मी माझ्या आई वडलांची लग्नाला परवानगी घेतो . तिच्या घरी काहीच प्रश्न न्हवता . तिच्या भावाला वडलांना मी पसंत होतो . ती संध्याकाळ छान मजेत गेली तिच्या बरोबर . आम्ही दोघे हि एकत्रच वाडीत आलो . त्या दिवशी तिने माझ्या आवडीचा गोडाचा शिरा केला होता . मी आणि माझ्या भावंडांनी पोटभर खाला . तिला वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या .

४ दिवसानंतर आई बाबा गावा वरून परत आले . अनपेक्षित पणे शेजारच्या शिर्के काकूंनी घात केला . त्यांच्या मनात आपल्या मुलाला मानसीच्या भावाने नकार दिल्याचा राग होता . एके दिवशी सकाळी शिर्के काकू आमच्या आईला गहू साफ करून देण्याच्या निमिताने आल्या . आणि तिने विषय मानसीवर काढला . "मानसीच आणि सुनील च लग्न ठरवलास कि काय? " आई या प्रश्नाने गोंधळ ली . तिने नाही म्हणून सांगितले आनी असे का विचारले म्हणून शिर्के काकूंना विचारले . झालं काकूंनी आगीत हळू हळू तेल ओतायला सुरवात केली . “नाही त्या दिवशी मानसीचो वाढदिवस होतो . माका कळला कि ते हॉटेलात गेलेले . सुनील ने तिका एक महागांतलो ड्रेस , सॅंडल घेऊन दिल्यानं . दोघे एकत्रच त्या दिवशी इले बाहेरसुन ". बरेच दिवस चलला ह्या ? तिच्या घरच्यांची संमती असा . माका वाटला तुमका पसंत हा ती” .

“पोरगी वाईट नाय . पण उधळी हा . खाना पिना करण्यात, देण्यात हात मोठो हा तिचो . नवीन ड्रेस , चपला वापरता , सिनेमा बघुक पण जाता” . “हा आता तरुण वयात ह्या करतलेच . पण आता सुनील चे वडील रिटायर्ड होवूक इलेत . भावांची बहिणीची शिक्षणा बाकी हतं . उद्या हि अशी लग्ना नंतर पैसो उधळूंक लागली तर ? दुसरा वेगळा घर घेऊन राहूया म्हणून म्हणाली तर तुमचा आणि या पोरांचा कसा हॊताला ?” “परत ते तुमच्या पेक्षा जातीनं थोडे कमीच असत . तुम्ही वरच्या जातीतले . गाव वाले , भाऊबंदकी वाले काय बोलताले ?”.

शिर्के काकू आईची बरीच वर्ष्यापासूनची मैत्रीण होती . एकमेकांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी दोघीना माहीत . शिर्के काकूंनी आपल्या बोलण्यानी आईच्या वर्मावर बोट ठेवलं. काकूंच्या बोलण्याने आईच्या रागाचा पारा चढला .शिर्के काकूंनी आता शेवटचा घाव घातला . “वाडीतल्या पोरांबरोबर पण बोलत किंवा फिरत असता . उद्या तुमच्या ओळखीच्यांनी नको तो अर्थ ह्यातून काढल्यानी तर ? तुमची किती बदनामी होईत .” काकूंनी हे बोलायला आणि नेमकी मानसी तिथे आली . 

तिने आईची विचारपूस करायला सुरवात केली . लग्न कस झालं म्हणून विचारलं . पण आता आईचा रागाचा पारा चढला होता . आई मोठ्याने मानसीवर ओरडली . “तुझी जी थेरं चालली आहेत ती ताबडतोब बंद कर . सुनील बरोबर लग्न करायची स्वप्न बघू नकोस . तो चांगला शिकलाय . चांगला नोकरीला आहे म्हणून फुकटात गळ्यात पढू नकोस त्याच्या . तुम्ही आमच्या पेक्षा कमी जातीचे आहात हे लक्षात ठेवा “. “तुझ्या सारख्या नखरेल पोरी खूप बघितल्या आहेत मी . किती पोरानं बरोबर बोलत असतेस फिरत असतेस ते बघितलंय मी . माझ्या पोराला नादाला लावायचा प्रयत्न केलास तर याद राख .”

आईच्या अशा मोठं मोठ्याने ओरडून बोलण्याने आजूबाजूचे शेजारी जमा झाले . मानसीच आईने काही हि ऐकून घेतलं नाही . ती तिला मोठं मोठ्याने सगळ्यांच्या समोर बडबडतच होती . आई ने तिला घरातून चालती व्हायला सांगितलं . परत आमच्या घरात पाऊल टाकू नको म्हणाली . मानसीला खूप वाईट वाटलं. सगळ्या लोकांच्या समोर असा अपमान झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटलं तिच्या चारित्र्यावर पण एक प्रकारे आईने शिंतोडे उडवले होते . ती रडतच त्यांच्या घरी गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला . आई बराच वेळ तिला आणि तिच्या घरातल्यांचं नाव घेऊन बडबडत होती .

संध्याकाळी ६ वाजता ऑफिस सुटण्याच्या वेळी भावजी माझ्या कामा वर आले . त्यांना असं अचानक माझ्या कामावर आलेलं पाहून मी आश्चर्य चकित झालो . मी त्यांना विचारलं . “अरे भावजी तुम्ही आज इथे कुठे आलात .? तेही असे अचानक ?.” ते म्हणाले काही नाही रे इथे कामासाठी आलेलो . चल आमच्याकडे तुझ्या बहिणीने बोलावलंय . मी बोललो असं अचानक ? ते काही बोलले नाही चल म्हणाले” . आम्ही ताईच्या घरी गेलो . ताई रोजच्या सारखी वाटत न्हवती . तिचा चेहरा उतरल्या सारखा वाटत होता . मी तिला विचारलं "काय झालं "? ती काही नाही बोलली बस म्हणाली . मला चहा नाश्ता आणून दिला .


मला बोलली तू दोन तीन दिवस इथंच राहा . मी आई बाबाना सांगितलंय . मी थोड्या काळजीने विचारलं “काय झालं ? राहायला असं का सांगते आहेस ?” ताई ने दुपारी आई आणि मानसी मध्ये काय झालं ते सांगितलं . "मी म्हणालो आई अशी का वागली ? मी जातो घरी आईला समजावतो . "ताई ने माझा हात पकडला मला म्हणाली . तुला माझी शपथ आहे . मी आता जे सांगेन त्याने तू डोक्यात राख घालून घेऊन स्वतःच बरं वाईट करायचं नाही ?

मी ताईला म्हणालो असं काय बोलते आहेस ? झालं काय आहे ? ताई म्हणाली आईच्या बडबडण्यामुळे मानसीला मानसिक धक्का बसला . सगळ्यान समोर जो अपमान झाला . तिच्या चारित्र्यावर जे आरोप केले त्यामुळे तिने त्यांच्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली .

ताई च्या या वाक्याने माझ्या डोळ्यानं समोर अंधारी आली . मला भोवळ आल्या सारखं झालं . ताई जे सांगतेय ते खोट आहे आणि मी ऐकतो ते वाईट स्वप्न आहे असं मला वाटू लागलं . मी थोडा वेळ डोकं धरून बसलो . भावजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला . "स्वतःला सांभाळ सुनील " असं मला म्हणाले .

माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले मी जोरात किंचाळलो " मानसी " ....

मानसी ….. मानसी …. .तू असं का केलंस ... मला एकटं सोडून का गेलीस .. इतकी घाई का केलीस ... माझ्याशी बोलायचं तरी होतंस . आता मी कसा जगू .... मी रडू लागलो .मला जगण्यात रस उरला नाही . मला मरावस वाटू लागलं .

थोड्या वेळाने मी सावरलो आणि ताडकन उठलो मला घरी जायचंय म्हणून सांगितलं आणि दरवाज्या कडे निघालो . ताई ने आणि भावजींनी थांबवलं . घरी न जाण्याबद्दल ताई ने शप्पथ घातली . मला काहीच समजत न्हवतं . मी त्यांना म्हणालो मला तिला शेवटचं बघू द्या . भावजी म्हणाले तू नको जाऊस . पोलीस आले होते . उगाच आपल्या मागे लागतील . सगळ्यांना त्रास होईल . मानसी ने चिठी लिहून ठेवली होती . कोणाला माझ्या मृत्यूसाठी जवाबदार धरू नका म्हणून लिहून ठेवलं होतं म्हणून बरं . तिच्या भावाने आणि वडलांनी खूप समजूतदार पणा दाखवला , त्यांनी हि कोणाला जवाबदार धरलं नाही . तू आता महिना भर तिथे जायचं नाही . इथेच राहायचं आमच्या फ्लॅट वर . मी पण सुट्टी घेतली आहे महिनाभर . स्वतःला सांभाळ.

मानसी ने घाईत जसा निर्णय घेतला . तुझ्हा , तिच्या घरातल्यांचा विचार केला नाही. तसं कृपया तू काही करू नकोस . आम्हा सगळ्यांना तू हवा आहेस. तू कुठल्या प्रसांगातुन जातो आहेस त्याची कल्पना आहे आम्हाला . पण सावर स्वतःला . काही काळाने सर्व ठीक होईल .

मला काही सुचत न्हवतं . मी झोपायच्या खोलीत गेलो आणि अंथरुणावर पडलो . सारखा डोळ्यानं समोर मानसीचा हसताना , बोलतानाचा चेहरा येत होता . रात्रभर मी रडत होतो . पहाटे , पहाटे माझा डोळा लागला .

पंधरा दिवस मानसीच्या आठवणीने मी सारखा रडत होतो . आयुष्यात काही उरलं नाही असं वाटत होतं . काही खात पीत नव्हतो . मानसीचं कार्य झालं . पिंडाला कावळा बराच वेळ शिवत न्हवता असं भावजी म्हणाले . शेवटी तिचे वडील म्हणाले "आमच्या कोणाची काळजी करू नकोस . शांतपणे पुढच्या प्रवासाला जा ". तेव्हा कावळ्याने पिंड उचलला . मला माहीत होत . तिला माझी काळजी असणार . म्हणून तिचा आत्मा तळमळत होता .

भावजी आणि ताई मुळे मी हळू हळू बिल्डिंग च्या कंपाऊंड मध्ये सकाळ , संध्याकाळ फिरू लागलो . बरोबर ताई किंवा भावजी असायचे . वेग वेगळे विषय काढून माझं मन रमवायचा ते प्रयत्न करत होते .

मानसी ला जाऊन महिना झाला . महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मी चाळीत परतलो . चाळीत पाय टाकण्याची माझी हिम्मत होत न्हवती . घरी आलो . मानसीच्या घरा कडे लक्ष्य गेलं . माझे पाय आपसूकच तिच्या घराकडे जाऊ लागले . मी घरात पाऊल टाकलं . समोरच मानसीचा हार घातलेला फोटो बघितला आणि माझा कंठ दाटून आला . डोळ्यातून अश्रू निघाले . मी तिच्या फोटो कडे पाहतच राहिलो . असं वाटलं ती माझ्या कडे बघून हसते आहे. मला विचारते आहे . किती दिवसांनी आलास . विसरलास वाटत मला . बस तुझ्या आवडीचा शिरा करते .

मला बघून तिच्या वडलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला . त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले . मला बोलले . “आलास बर झालं” .तिच्या भावाने मला बसायला सांगितलं . मी बसलो . थोडा वेळ आम्ही सगळेच शांत होतो . तिचे वडील मग म्हणाले "झालं गेलं ते विसर " , आमच्या पोरीने भावनेच्या भरात निर्णय घेऊन कृती केली " . चुकलंच तिचं . झालं ते झालं . तू मात्र स्वतःला सांभाळ . कुठलहि चुकीचं पाऊल उचलू नकोस . त्यांनी हात जोडले . "आमच्या सारखी वेळ तुझ्या आई वडिलां वर आणू नकोस ". मी त्यांचा हात हातात घेतला . त्यांना म्हणालो तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात . कृपया माझ्या आईला माफ करा . त्यांनी डोळे पुसले . माझ्या खांद्यावर थोपटले . मला म्हणाले उद्या सकाळी आम्ही गावी जाणार . हि खोली आम्ही विकतो आहोत . आता इथे राहणार नाही . ह्याची बदली पुण्याला झाली आहे . ह्याच लग्न आम्ही जमवलं होत . तो लग्न झाल्यावर पुण्याला राहील . मी स्वतःहून कामावरून निवृत्ती घेतलीय . मी गावी माझ्या नातेवाईकांन बरोबर राहणार आहे. इथे मानसीची आठवण येत राहते. आता इथे परत येणं नाही.

मी जड अंतःकरणाने मानसीच्या घरातून निघालो . आमच्या घरी आलो . भावंडे, वडील घरात सगळे शांत पणे बसले होते. ताई ने आणि भावजींनी झालं गेलं आम्हा सगळ्यांना विसरायला सांगितलं . आई आतल्या खोलीत बसली होती .

मानसीचे वडील व भाऊ पहाटेची एसटी पकडून गावी गेले . मानसीच्या घराला टाळे लागले . मला खूप उदास वाटू लागले . सारखी तिची आठवण येऊ लागली .

दुःख कितीही मोठं असलं तरी घरच्या जवाबदाऱ्यांमुळे ते बाजूला ठेवून रोजच्या समस्यांना सामोरं जावंच लागते. माझे वडील निवृत्त व्हायला आले होते . त्या मुळे घराची जवाबदारी मला माझं दुःख बाजूला ठेवून घ्यावी लागली . मी कामाला जाऊ लागलो . ओव्हरटाईम करत कामावरच जास्त वेळ थांबू लागलो . आता मानसी ला जाऊन दोन महिने झाले होते . एके रविवारी संध्याकाळी कामा वरून घरी आलो . घरात फक्त आई होती . मानसी गेल्या पासून मी आणि आई एकमेकांशी बोलत न्हवतो . त्या दिवशी मी घरात बसलो होतो . आई चहा घेऊन आली . मी चहा घेतला . आई मला म्हणाली मला तुझ्या बरोबर थोडं बोलायचं आहे

मी काहीच बोललो नाही . चहा पीत बसलो . आई माझ्या समोर बसली मला म्हणाली “मला माहीत आहे तू माझ्यावर रागावला आहेस . माझ्या कडून चूकच अशी घडलीय . पण खर सांगू बाळा माझा पोरीवर राग न्हवता . पोर खूप चांगली होती” . मी चमकून आई कडे बघितलं . मी रागानेच तिला बोललो “तू हे आता बोलतेस तिने जीव दिल्या नंतर” . ती थोडा वेळ गप बसली मला म्हणाली . “माझं पूर्वी पासूनच तिच्या बद्दल मत चांगलं होत . मला ती सून म्हणून आवडत होती . पण ते आपल्या जाती मध्ये बसत न्हवते . म्हणून मी तिचा विचार सोडलेला” . “आम्ही खूप गरिबीत जगलो . आमच्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या . तू शिकलास चांगला नोकरीला लागलास . तुझ्या भावंडांना शिकवशील . आपली परिस्तिथी सुधारेल असं वाटलं . पण अचानक तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकलं आणि मला भीती वाटली रे.  तू जर तिच्याशी लग्न केलं असतंस आणि वेगळा राहू लागला असतास आणि तुझ्या भावंडांची आमची जवाबदारी घेतली नसतीस तर कस झालं असत आमचं या भीती मुळे मी त्या दिवशी रागाने तिला नाही नाही ते बोलले . नंतर मलाच त्या गोष्टीच खूप वाईट वाटलं . पण ती अशी जीवाचं काही बर वाईट करून घेईल असं वाटलं न्हवत रे . पोरीने मनाला खूप लावून घेतलं . मी सगळं बोलले ते घराच्या काळजी पोटीच बोलले रे “. आईने डोळ्यात ले पाणी पुसले आणि ती आतल्या खोलीत कामाला गेली .

माझी आई खूप चांगली होती हे मला माहीत होतं . तिने खूप सोसलं होतं . खूप गरिबीत दिवस काढलेले होते . तिची घराबद्दलची कळकळ मला समजत होती.


मी घराची जवाबदारी घेतली . सगळं विसरून घराची परिस्तिथी सुधारण्याच्या मागे लागलो . आमची चाळ एका बिल्डर ने इमारत बांधण्यासाठी घेतली . तिथे आम्हाला मोठं घर मिळणार होत . इमारत बांधे पर्यंत आमची दुसरी कडे सोय करण्यात आली . चाळ सोडून जाताना खूप वाईट वाटलं . मानसी बरोबर घालवलेले चाळीतले ते दिवस मला आठवायला लागले . दुसऱ्या ठिकाणी राहायला आल्यावर मी स्वतःला कामात झोकून दिलं .

भावंडं शिकली . कामाला लागली . आमची आर्थिकस्तिथी सुधारायला लागली . आम्हाला बिल्डिंग मध्ये नवीन मोठी जागा मिळाली . आईने माझ्या साठी शिकलेली, नोकरी करणारी आमच्या परिस्तिथीशी जुळवून घेणारी मुलगी बघून माझं लग्न लावून दिलं . माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी मानसीच्या आठवणीने खूप रडलो . तिची मनातल्या मनात माफी मागितली .

माझी बायको स्वभावाने शांत होती . तिने आमची परिस्तिथी सुधरवण्यासाठी मला खूप मदत केली . आम्ही स्वताची दुसरी मोठी जागा घेतली . बरीच वर्ष आई बाबा तिथे आमच्या बरोबर राहिले . भावंडे हि स्थिरस्थावर झाली . आईने माझं व भावंडांचं सगळं व्यवस्तीत सगळं झालेलं पाहून या जगाचा निरोप घेतला . त्या आधी मधल्या काळात वडील हि गेले . 

नंतर प्रपंचाच्या रामरगाड्यात मी गुंतून गेलो . स्वतः साठी वेळच मिळेना . कधी तरी कश्यावरुन तरी मानसीची आठवण येई आणि माझं मन विषन्न होई . उदास वाटत असे .

आज मुलाच्या लग्ना मुळे अचानक मानसीची आठवण ताजी झाली . मनात विचार आला. माझा मुलगा खूप नशीबवान आहे . त्याच ज्या मुलीवर प्रेम आहे ती त्याला मिळाली . काळ किती बदलला आहे . आमच्या घरच्या परिस्तिथी मुळे मला माझं ज्या मुलीवर प्रेम होत त्या मुलीशी लग्न करता आलं नाही . परिस्तिथीच्या दबावाखाली मन मारून जगावं लागलं .

आता मात्र एकच आनंदाची गोष्ट होती, मला नाही पण माझ्या मुलाला त्याच प्रेम असलेल्या मुली बरोबर लग्न करायला मिळतेय .

मी समोरच्या बशीतला गोडाचा शिरा तोंडात घातला आज त्याला मानसीच्या गोडाच्या शिऱ्या सारखी चव लागत होती . .....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy