निर्मला
निर्मला
शांत झोपलेल्या कविताच्या चेहऱ्याकडे पाहून मला थोड्या वेळापूर्वीचं तिचं बोलणं आठवलं. ती म्हणाली होती, "आज्जी! किती उतार चढावांनी भरलेलं आयुष्य आहे गं तुझं.... तुझ्या आयुष्यावर एक कादंबरी किंवा चित्रपट तयार करता येईल." शंभर टक्के खरं आहे तिचं म्हणणं...होय....खरंच... माझं आयुष्य नाट्यमय घटनांनी पुरेपूर भरलेलं आहे.
सप्टेंबर 1927 ते डिसेंबर 1947
माझ्या मोठ्या बहिणीच्या, कुसुम च्या पाठोपाठ माझ्या आईला माझ्या जन्माची चाहूल लागली, तेव्हा ती खूप आनंदात होती. या वेळेला नक्की मुलगा होईल, असं तिला वाटत होतं. पण... म्हणतात ना, माणसाला भविष्यात काय होणार आहे ? याची गंधवार्ता असती, तर त्याला वर्तमानात जगणे देखील असह्य झाले असते. अगदी तसंच आमच्या लहानश्या, सुखी कुटुंबात घडलं.
चार दिवसांच्या तापाचे निमित्त होऊन माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी माझ्या आईला वैधव्य आले. तिच्यावर जणू आभाळ कोसळले. दोन - तीनदा तिनं अंगणातली विहीर जवळ करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या मागे दीड वर्षाच्या लहानग्या कुसुम चे काय होईल? आणि होणारं बाळ मुलगा असला तर? (त्यावेळच्या समाजमान्य विचारानुसार) या विचाराने तिने माघार घेतली.
दुःखाच्या सावटातच माझा जन्म झाला. कोणालाही माझ्या जन्मामुळे आनंद व्हायचं काही कारण नव्हतं. तशी परिस्थिती देखील नव्हती. आईच्या पुढे प्रश्न उभा राहिला, पुढे काय? वीस वर्षांचे वय, अपुरं शिक्षण, पैशांचा किंवा माणसांचा आधार नाही... स्वतःच्या आणि दोन मुलींच्या उदरनिर्वाहा साठी काहीतरी करणं भाग होतं. त्यावेळेस आईच्या पाठीशी माझी आत्या खंबीरपणे उभी राहिली.
काहीतरी कारण झाले आणि तिने आपल्या चार मुलांसह सासरचं घर सोडलं. ती मुलांसह आईजवळ येऊन राहिली. तिने आईला पुढचं शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त केलं. आईने एम.ए. केलं. दोघींनी मिळून वाराणसीला शाळा काढली. आई आणि आत्या दोघींनीही आम्हा सहा भावंडांचा (आम्ही दोघी बहिणी आणि आमची चार आत्तेभावंडं) व्यवस्थित सांभाळ केला. आम्हाला उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. आजही त्या दोघींनी काढलेली शाळा, वाराणसीतील एक नावाजलेली शाळा आहे.
जानेवारी 1948 ते सप्टेंबर 1965
फेब्रुवारी 1948 मध्ये सैन्यदलातील अधिकारी कॅप्टन विजय कुमार यांच्याशी माझे लग्न झाले. माझं लग्न फार वेगळ्या तऱ्हेने ठरलं. लहानपणापासून मला लिखाणाची प्रचंड आवड. इंग्लिश विषय घेऊन बीए केल्याने माझं इंग्लिश चांगलं होतं. सैन्यदलात नुकत्याच रुजू झालेल्या माझ्या मोठ्या आत्ते भावाला मी नेहमी पत्र लिहून वाराणसीतील आणि आमच्या घरातील खबरबात कळवत असे. त्याला इंग्लिश मध्ये लिहिलेलं असंच एक पत्र, विजयकुमार त्याच्याकडे आले असताना त्यांनी वाचलं. प्रायव्हसी, स्पेस या कल्पना तेव्हा आता सारख्या रुजल्या नसल्याने एकमेकांची पत्र लोक सर्रास वाचत असत. पत्र वाचून त्यांच्या मनात आलं, 'जी स्त्री इतकं सुंदर पत्र लिहू शकते, ती मनाने, विचाराने, बुद्धीने नक्कीच श्रेष्ठ असणार'
त्यांच्या घरच्या मंडळींना सांगून, त्यांना सोबत घेऊन, ते माझ्या आईला भेटले आणि त्यांनी माझ्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. अशा तऱ्हेने विजय कुमारांशी माझी लग्नगाठ बांधली गेली. कुसुमताई चे लग्न माझ्या दोन वर्षे आधीच मुंबईतील एका मोठ्या कारखानदार कुटुंबात झाले होते. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने माझी आई दोन्ही मुलींच्या जबाबदारीतून मोकळी झाली.
लग्नानंतरची बरीच वर्षं विजयकुमार यांची जिथे पोस्टींग असायची,.तिथे मी त्यांच्यासोबत जात असे. त्यामुळे श्रीनगर, धरमशाला, कन्नूर अशा बऱ्याच ठिकाणी राहण्याची, तेथील भाषा, पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळाली. माझे पती विजय कुमार अतिशय देखणे, उमद्या स्वभावाचे, काहीसे हट्टी आणि उदारमतवादी होते. त्यांच्या हट्टाखातर मी घोडेस्वारी, नेमबाजी, पोहणे, कार ड्रायव्हिंग अशा बऱ्याच गोष्टी शिकले.
1949 मध्ये पद्मजाचा जन्म झाला. त्यानंतर दोन-तीन वर्षांच्या अंतराने शैलजा, प्रमोद आणि नीरजा झाले. पद्मजा एक दीड वर्षांची असतानाची एक विचित्र घटना माझ्या आजही चांगलीच स्मरणात आहे. त्यावेळी आम्ही धरमशाला येथे वास्तव्यास होतो. एके दिवशी दुपारी घरी मी एकटी असताना दारावरची बेल वाजली. लगतच्या खिडकीतून कोण आहे ? ते मी पाहिलं. सभ्य दिसणारा एक गृहस्थ दरवाजाबाहेर उभा होता. मला वाटलं, यांचा कोणीतरी परिचित असेल. मी दार उघडलं. तो घरात आला. मला काही कळण्याच्या आत त्याने माझ्या कडेवरील पद्मजाला बळेबळेच स्वतः जवळ घेतले. अचानक त्याचा पवित्रा बदलला. दरडावून तो म्हणाला,
"अगर आप की बेटी सहीसलामत वापस चाहते हो, तो अभी के अभी पांच हजार रुपये मुझे ला कर दो. नही तो मै बच्ची को लेकर जा रहा हूं." त्याचं बोलणं ऐकून भीतीने मी अवाक झाले. मोठ्या प्रयासाने मी स्वतःला सावरले. त्या काळाच्या मानाने पाच हजार ही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती. एवढे पैसे एका सैन्य अधिकाऱ्याच्या घरात कसे असणार? शक्य तितक्या शांतपणे, मी आत जाऊन पैसे घेऊन येते असं त्याला सांगितलं. आत येऊन आमच्या बेडरूममधील कपाटातून यांचे पिस्तूल काढून ते घेऊन बाहेर आले. मोठ्या हिमतीने पिस्तूल त्याच्यावर रोखत मी त्याला म्हटलं, "खैरियत चाहते हो तो बच्ची को नीचे रखो और चलते बनो." अनपेक्षित प्रतिकाराने तो घाबरला आणि पद्मजाला खाली ठेवून चुपचाप घराबाहेर पडला. मी सुटकेचा निश्वास टाकला. यांनी शिकवलेल्या साहसी खेळांमुळे मुळातच असलेल्या माझ्या आत्मविश्वासाला खतपाणी मिळाले होते. त्यामुळेच कुठल्याही प्रसंगाला न घाबरता तोंड द्यायला मी शिकले होते.
मुलं मोठी झाल्यावर मात्र त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नाही, म्हणून मध्यप्रदेशातील रेवा या आमच्या मूळ शहरात मी राहण्याचे ठरवले. माझ्या सासूबाई देखील तेथेच होत्या. त्यामुळे आम्हा दोघींना एकमेकींची सोबत आणि मुलांना आजीचा सहवास मिळणार होता. रेव्याला मी आणि मुलं बर्यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर विजय कुमारांनी मला पुढील शिक्षण घेण्यास सुचवले. तसा त्यांचा हट्टच होता. आता मागे वळून पाहताना असं वाटतं, 'त्यांना भविष्यकाळाची नक्कीच चाहूल लागली असणार.' मी इंग्लिश मध्ये एम ए केलं. सासुबाईंची घर आणि मुलं सांभाळण्यासाठी मला खूपच मदत झाली. एम ए झाल्याबरोबर रेव्यातील महिला महाविद्यालयातील इंग्लिश प्रोफेसर ची नोकरी मला लगेच मिळाली. हे त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी एकटेच राहत असत. अधून मधून आम्हाला भेटायला रेव्याला येत असत.
सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण म्हणतात ना, जेव्हा सगळं आलबेल असतं, तेव्हा नियती आपल्याला एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असते. एक दिवस ड्युटीवर असताना विजयकुमार चक्कर येऊन पडले. त्यांचे ब्लड प्रेशर कमालीचे वाढले होते. त्याकाळी उपलब्ध असलेल्या कुठल्याही ट्रीटमेंट ने त्यांचे ब्लड प्रेशर नियंत्रित होईना, तेव्हा त्यांना रेव्याच्या एनसीसी ऑफिस मध्ये ट्रान्सफर मिळाली.
यांचा ब्लडप्रेशरचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. अशातच तो काळा दिवस उगवला 26 सप्टेंबर 1965. त्यादिवशी डोके दुखत असल्याने हे रजा घेऊन घरी आराम करत होते. मुलं शाळेतून आल्यावर यांना बरं वाटावं म्हणून सोबत पत्ते खेळण्याचा मुलांनी आग्रह धरला. मी कॉलेज ला गेले होते. दुपारी तीन च्या सुमारास कॉलेज सुटल्यावर मी घरी आले. तब्येत बरी नाही, हे विसरून यांना मुलांबरोबर हसता खेळताना पाहून मला फार बरं वाटलं. तेवढ्यात कुठल्यातरी विनोदावर हे जोरात हसले. हसता हसता यांचा जीव घाबरा झाला. छातीवर हात ठेवून चेहरा वेडावाकडा करत हे खाली कोसळले. मी धावत जवळ जाईपर्यंत सर्व संपलं होतं.
अवघ्या पस्तीस वर्षांच्या वयात वैधव्य आल्याने, मी एकटी, एकाकी झाले. पदरी चार मुलं, सासूबाईंची जबाबदारी. माझ्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. यांना जाऊन महिना झाला तरी माझे दुःख काही केल्या कमी होत नव्हतं. मुलांच्या नाजूक मनांवर परिणाम होऊ नाही, म्हणून त्यांच्यासमोर रडता देखील येत नव्हतं.
अशातच कुसुमताईने मला तिच्याकडे बदल म्हणून मुंबईला नेले. मी आणि मुलं तेथे साधारणतः महिनाभर होतो. मुंबईत असताना मी ज्या कॉलेजमध्ये नोकरीला होते, तेथील प्राचार्य आणि माझे हितचिंतक शर्माजी यांनी मला सांत्वनपर पत्र पाठवलं. त्या पत्रातील त्यांचे एक वाक्य माझ्या मनात कोरले गेले, "Mother of four kids can't afford the luxury of the grief" (चार मुलांच्या आईला दुःखात रमणं परवडणारं नाही.) या एका वाक्याने माझ्यातील जबाबदार आई खडबडून जागी झाली. मी ताबडतोब रेव्याला परत येण्याचा निर्णय घेतला. मला मुलांसाठी तरी खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं भाग होतं.
जानेवारी 1966 ते एप्रिल 2002
माझे पती, विजयकुमारांच्या प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी वगैरेचे बरेच पैसे मला मिळाले. ते सर्व पैसे माझ्या मेव्हण्यांच्या (बहिणीच्या पतीच्या) सल्ल्याने मी एका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले. दुर्दैवाने ती कंपनी पुढे दिवाळखोरीत निघाल्याने ते सर्व पैसे बुडाले.
इंग्लिश विषयाची विभागप्रमुख म्हणून रेव्याच्या सरकारी कॉलेज मध्ये नोकरीला असल्याने मला चांगला पगार होता. तसेच सैन्य अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना, त्या अधिकाऱ्यांच्या मरणोपरांत बऱ्यापैकी पेन्शन भारत सरकार देत असते. त्यामुळे, मुलींच्या लग्नांच्या वेळेस झालेली थोडीफार ओढाताण सोडल्यास आर्थिक अडचणींचा कधी मला सामना करावा लागला नाही.
फेब्रुवारी 1968 मध्ये, इंदोर मधील आमच्या परिचितांच्या मध्यस्थीने, पद्मजा चे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील एका मोठ्या जमीनदार कुटुंबात लग्न झाले. लग्नानंतर तिने माझ्या आग्रहाखातर ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शैलजा डॉक्टर झाली. कालांतराने ती नेत्ररोगतज्ञ म्हणून नागपूरात स्थिरावली. तिचे पती देखील डॉक्टर असून भारतीय वायुसेनेत मोठ्या पदावर आहेत. नीरजा माझ्यासारखीच इंग्लिश विषय घेऊन एमए झाली आणि लग्नानंतर भोपाळमध्ये शिक्षण विभागात उच्च पदावर पोहचली. प्रमोदने पदव्युत्तर पदवी घेऊन माझ्याजवळ रेव्यातच राहून व्यवसाय करणे पसंत केले. मार्च 1987 मध्ये प्रमोदचे लग्न होवून सुनीता आमच्या घरात आली.
माझी मुलं आयुष्यात व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्याच्या समाधानात मी मजेत जगत होते. एक मोठा जबाबदारी चा डोंगर मी पार केला होता. माझे तिनही जावई अतिशय शांत, सज्जन आणि सालस माणसं. माझ्या सुनेने, सुनिताने तर आमच्या घराला जणू स्वर्ग बनवलं. 1988 मध्ये मी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वाचन, लेखन, रेडिओ, दूरदर्शन या सगळ्यांत मन रमवते. एक संधिवात सोडला तर मला दुसरं कुठलंही दुखणं नाही. माझी आठही नातवंडे पत्राद्वारे, फोनवर माझ्या संपर्कात असतात, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.
एप्रिल 2002 मध्ये मला पुन्हा एक मोठा दुःखद धक्का बसला. माझ्या मोठ्या मुलीचे, पद्मजाचे जेमतेम वयाच्या पन्नाशीत सेप्टिसिमियाचे निमित्त होऊन अकाली निधन झाले. तिच्या वडिलांसारखी ती देखील अल्पायुषी ठरली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या अपत्याचा मृत्यू, यापेक्षा भयंकर दुःख दुसरं कुठलंच नाही. तिच्या मृत्यूने मी खचून गेले. माझं संधीवताचं दुखणं जास्तच बळावलं. पण म्हणतात ना, काळ हे दुःखावरचे एकमेव औषध आहे. मागे राहणाऱ्यांना इच्छा असो वा नसो, कुडीत प्राण असेपर्यंत जगावेच लागते. पद्मजा गेली तरी तिचे पती आणि मुलं मला आवर्जून भेटायला येतात. फोनवर संपर्कात असतात.
डिसेंबर 2014 - जानेवारी 2015
आता आयुष्य पुर्णपणे जगून झालंय. संधीवाताने हैराण झालेय. चालणं देखील कठीण झालंय. सुनीताला माझी खूप सेवा करावी लागतेय. यांच्या पश्चात संसार रथ एकटीने चालवत आणल्याने थकून गेलेय. यांना जाऊन आता पन्नास वर्षं व्हायला आलीत. आता मात्र पैलतीराची ओढ लागलीय.
मागच्या आठवड्यात पलंगावरून उतरून उभं राहण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडले आणि मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन करून जोडण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला पण माझ्या आजूबाजूला जमलेल्या आप्तांच्या चेहऱ्यावरूनच मला समजलंय की, ऑपरेशन यशस्वी झालेलं नाहीये. काहीतरी कॉम्प्लिकेशन झालंय.
आज १ जानेवारी २०१५. नवीन वर्षाची सुरुवात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला हव्या. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतेय... पण... माझ्या तोंडून शब्द फुटत नाहीये... डोळ्यांपुढे अंधार... त्या अंधारातून एक दिपवून टाकणारा प्रकाश... आणि त्या प्रकाशातून माझ्या दिशेने चालत येताहेत माझे पती, विजयकुमार... त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली बहुतेक... त्यांनी त्यांचा उजवा हात माझ्या दिशेने पुढे केलाय... मी आनंदाने त्यांच्या हातात हात देऊन डोळे मिटले... कायमचे...