कविता दातार

Thriller Others

3.3  

कविता दातार

Thriller Others

आक्रीत

आक्रीत

6 mins
321


डोअरबेल वाजली तशी वैदेही दार उघडायला धावली. अपेक्षेप्रमाणे विराज दारात उभा होता.

"गिझर लावलाय. आंघोळ उरकून घे. मग मी जेवायला वाढते. तुझ्या आवडीची काजू पनीर मसाला केलीये." त्याच्या हातातली बॅग घेत तिने हसत म्हटलं.

"आज ऑफिसला नाही गेलीस?" विराजने तिला विचारलं. "अरे ! आज मी सुट्टी घेतली. तू पंधरा-वीस दिवसांनी घरी आला आहेस, म्हटलं तुझ्यासोबत निवांत वेळ घालवावा. या वेळची टूर फारच लांबली रे..."

"हो..ना... यावेळेस अगदी कंटाळा आला. बरं केलंस तू सुट्टी घेतलीस. जेवण गरम कर, मी दहा मिनिटात फ्रेश होऊन येतो."


बर्‍याच दिवसांनी दोघांना निवांत वेळ मिळाल्याने जेवताना त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. विराज नाशिक मधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत डेप्युटी मॅनेजर होता, तर वैदेही एका मोठ्या कोचिंग क्लास मध्ये सेंटर मॅनेजर होती. तीन वर्षांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही एकमेकांचे लहानपणापासूनचे शेजारी आणि वर्गमित्र. बारावीनंतर विराज इंजीनियरिंग ला गेला आणि वैदेहीने मॅनेजमेंट साईड घेऊन एमबीए केलं. नोकरीच्या निमित्ताने दोघेही नाशिकमध्ये स्थायिक झाले. प्रवासाच्या थकव्यामुळे विराजला जेवण झाल्यावर गाढ झोप लागली. झोपून उठल्यावर विराज चा चेहरा वैदेहीला थोडा सुजल्यासारखा वाटला. पण जास्त झोपल्यामुळे असेल, असा विचार करून तिने त्याकडे दुर्लक्ष केले.


आज रविवार... सुट्टीचा दिवस...बऱ्याच दिवसांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला नसल्याने वैदेहीने सिनेमा ला जाण्याचा बेत आखला. ऑनलाइन सीट्स बुक करून, काउंटर वरून तिकिटं कलेक्ट करून, दोघं सिनेमा हॉल मध्ये येउन बसले. कॉमेडी सिनेमा असल्याने वैदेही खूप एन्जॉय करत होती. मधूनच तिचे लक्ष विराज कडे गेले. तो सिनेमा बघण्या ऐवजी हॉलच्या छताकडे एकटक, शून्यात नजर लावून बसला होता.

"काय झालं विराज? बरं वाटत नाही का??" तिने काळजीने विचारले.

"कुठे काय? मी ठीक आहे.." तो उत्तरला.


सिनेमा संपल्यावर थिएटरमधून बाहेर पडताना विराजचा कलीग आणि खास मित्र प्रसन्न आणि त्याची बायको सीमा भेटले. विराज पार्किंग मधून बाईक बाहेर काढत असताना, प्रसन्न-सीमा वैदेही शी बोलत उभे राहिले.

"वहिनी विराज ठीक आहे ना?"

प्रसन्न ने विचारले.

"हो...का? काय झालं??"

"नाही... परवा मीटिंग चालू असताना, कुठल्यातरी विनोदावर सगळे हसले. पण...पण... विराजचं हसणं थांबतच नव्हतं. तो सलग पाच मिनिटं हसतच बसला होता. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण त्याला एखाद्या सायकियाट्रिस्टला दाखवा."


तेवढ्यात विराज बाईक घेऊन आला आणि त्यांचं बोलणं थांबलं. वैदेहीच्या डोक्यात मात्र काळजीचा किडा शिरला. आठवडा सुरू झाल्यावर कामाच्या गडबडीत तिला या गोष्टीचा विसर पडला. त्यानंतर काही दिवस विशेष काही न घडता नेहमीसारखे गेले. शनिवारचा दिवस होता. विराजला कसलीशी सुट्टी होती. वैदेही ऑफिसला जायच्या गडबडीत होती. कामवाली मीनाबाई शनिवारी लवकर यायची आणि वैदेही घरात असेपर्यंत सगळी कामं आवरून निघून जायची. वैदेही किचनमध्ये आवरासावर करत होती. विराज ब्रेकफास्ट संपवून किचन बाहेरच्या वॉशिंग प्लेसमध्ये असलेल्या बेसिनशी हात धुवायला गेला. बराच वेळ झाला तरी तो आत आला नाही, म्हणून वैदेहीने बाहेर जाऊन पाहिले आणि तिला धक्का बसला. वॉशिंग प्लेसमध्ये मीना भांडी घासत होती. कपडे ओले होऊ नये म्हणून तिने साडी मांडीपर्यंत वर खोचली होती. आणि... बेसिनपाशी उभा असलेला विराज, हात न धुता एकटक तिच्या उघड्या पायांकडे आ वासून बघत होता. वैदेहीने हाताला धरून त्याला आत ओढलं.

"काय बघत होतास विराज?" हलक्या आवाजात पण जरबेने तिने विचारलं.

"कुठे? काय??"

काही न समजून विराज साळसूदपणे म्हणाला. ऑफिसला उशीर होत असल्याने वैदेहीने तो विषय वाढवला नाही. पण दिवसभर ती विराजच्या विचित्र वागण्याचा विचार करत राहिली. आजकाल त्याला बऱ्याचदा काही गोष्टींचा विसर पडतो हे देखील तिच्या लक्षात आले. लवकरात लवकर त्याला सायकॅट्रिस्टकडे नेण्याचं तिनं ठरवलं.


दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लवकर उठून आवरायची घाई नव्हती. तरी नेहमीप्रमाणे वैदेहीला जाग आली. गॅसवर चहासाठी पाणी उकळत ठेवून, तिने विराजला उठवलं. डायनिंग टेबलवर त्याच्यासमोर चहाचा कप ठेवताना, खुर्चीचा धक्का लागून, कपातला थोडा चहा बशीत आणि आजूबाजूला सांडला.

"अरे! सॉरी..." वैदेही असं म्हणेस्तोवर, विराज ने रागाने झटकन खुर्चीतून उठून तिच्या जोरदार थोबाडीत मारली.

"यूजलेस... असा कसा चहा सांडला?" तारस्वरात ओरडत तो म्हणाला. वैदेही अवाक होऊन त्याच्याकडे पाहात राहिली. आजपर्यंत चढ्या आवाजातदेखील कधी तिच्याशी न बोलणाऱ्या विराजने चक्क तिला मारलं होतं. डोळ्यातलं पाणी पुसत, गाल चोळत वैदेही बेडरूममध्ये निघून गेली.


'काय झालं असेल विराजला? असा या अगोदर कधी तो वागला नाही. नक्कीच त्याला मोठा सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असणार...का कोणी झपाटले आहे त्याला???" विचार करून वैदहीचं डोकं दुखायला लागलं. तिने तिच्या ओळखीतल्या डॉक्टर कश्यप यांना फोन लावून सगळं सांगितलं. डॉक्टर कश्यप तिच्या बाबांचे जवळचे मित्र होते. ते यावर काहीतरी तोडगा काढतील, याची तिला खात्री होती. डॉक्टर कश्यपांनी विराजला सायकॅट्रिस्ट कडे नेण्याआधी न्यूरोलॉजिस्ट ला कन्सल्ट करावे असं सांगितलं. शहरातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुक्ला यांची शक्य तितक्या लवकरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी डॉक्टर कश्यप स्वतः त्यांना कॉल करतील, याची त्यांनी वैदेहीला हमी दिली.


त्याच रात्री विराजला जोरदार फिट आली. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या वरच्या बाजूला स्थिर झाल्या. हातपाय वाकडे झाले. तोंडातून फेस येऊ लागला. त्याची ती अवस्था पाहून वैदेही घाबरली. तरीही शांत राहून तिने त्याला पलंगावर एका कुशीवर निजवले. त्याचे कपडे सैल केले. पंखा फुल स्पीड वर केला. तीन चार मिनिटांत तो नॉर्मल झाला. त्याला गाढ झोप लागली. झोपेतसुद्धा तो असंबद्ध बडबड करत होता, हसत होता. आता मात्र वैदेहीची खात्री पटली, की विराजला कुठलाही मानसिक त्रास नसून मेंदू संबंधित काहीतरी समस्या आहे. डॉक्टर कश्यप यांनी तिला व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे हे तिच्या लगेच लक्षात आले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुक्ला यांची अपॉइंटमेंट मिळाल्याचा डॉक्टर कश्यपांचा तिला फोन आला. बारा वाजता शुक्लांच्या क्लिनिकला पोहोचायचे होते. तिने विराजच्या ऑफिसला फोन करून त्याची तब्येत बरी नसल्याने तो येऊ शकत नाही, असे कळवले. तिच्याही ऑफिसला फोन करून सुट्टी घेतली. विराजला उठवून आवरायला लावले. आज विराज व्यवस्थित वाटत होता. तिने त्याला विश्वासात घेऊन वस्तुस्थितीची कल्पना दिली. तो कधी कधी कसा विचित्र वागतो आणि त्याला उपचारांची कशी गरज आहे, हे सौम्य शब्दांत सांगितले.


तिच्यासोबत डॉक्टर शुक्लांच्या क्लिनिकमध्ये यायला विराज लगेच तयार झाला. डॉक्टर शुक्लांनी त्याची पूर्ण तपासणी केली. त्याची बदललेली वागणूक, वैदेहीला प्रश्न विचारून नीट समजून घेतली. काही टेस्ट करायला सांगितल्या. त्याचा एम आर आय आणि इ इ जी केला. संध्याकाळपर्यंत सगळे रिपोर्टस् आले.


विराजला ब्रेनमध्ये पुढच्या डाव्या बाजूला (left side of frontal lobe) ट्यूमरचे निदान झाले. ब्रेन ट्यूमर हे शब्द ऐकताच विराज-वैदेही दोघेही चरकले. वैदेहीच्या डोळ्यांसमोर तर अंधारून आलं. पण तेथील काउन्सेलरने त्यांना धीर दिला. डॉक्टरांच्या असिस्टंटने त्यांना वेगवेगळ्या आकृत्यांच्या, फोटोंच्या माध्यमातून सगळं काही नीट समजावून सांगितलं.


मानवी मस्तकात कपाळाच्या मागे फ्रंटल लोब असतो. मस्तकाचा हा भाग स्मरणशक्ती, स्पर्श, कार्यकारण भाव, भावनांच्या अतिआवेगावरील नियंत्रण या व्यतिरिक्तही काही कामांसाठी जबाबदार असतो. फ्रंटल लोबवर झालेल्या आघातामुळे, त्या भागात असलेल्या ट्यूमरमुळे किंवा क्वचित जन्मतः त्याचे काम बिघडते. अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व काही प्रमाणात किंवा पूर्णपणे बदलते. विराजच्या डोक्यात असलेला ट्यूमर मस्तकातील याच ठिकाणी असल्याने फ्रंटल लोबवर ट्युमरचा दाब वाढून, त्याचे काम बिघडून, त्याचा परिणाम विराजच्या वागण्यावर झाला होता. तो स्वतःच्या भावनावेगावर नियंत्रण ठेवू शकत नव्हता, विसरत होता. ज्यावेळेस ट्यूमर फ्रंटल लोबवर दाब वाढवत होता. त्यावेळेस विराज जास्त विचित्र वागत होता.


या आजारावर सर्जरी हा एकच उपाय होता. ट्यूमर छोटा असल्यास नाकावाटेदेखील ऑपरेशनने काढून टाकता येतो. पण विराजच्या डोक्यातील ट्यूमर बऱ्यापैकी मोठा असल्याने ब्रेन ओपन करूनच सर्जरी करावी लागणार होती. ब्रेन सर्जरी म्हणजे फारच मोठे ऑपरेशन. त्यात त्याच्या जीवाला धोका होता. पण ट्युमर निघून गेल्यावर विराजचा त्रास संपणार होता. त्यामुळे हा धोका पत्करावा लागणार होता.


वैदेहीला कमालीचे टेन्शन आले. तिने तिच्या आई-वडिलांना आणि सासू-सासर्‍यांना बोलावून घेतले. विराजच्या ऑपरेशनची तारीख ठरली. आदल्या दिवशी त्याच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकण्यात आले. विराज मात्र शांत होता. त्याला ऑपरेशनची अजिबात भीती वाटत नव्हती. ऑपरेशन आधी डॉक्टरांनी संमतीपत्रावर वैदेहीची आणि विराजच्या आई-वडिलांची सही घेतली. विराजला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. चार तास ऑपरेशन चालले. मात्र ऑपरेशन यशस्वी झाले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. विराजच्या डोक्यातून निघालेल्या ट्यूमरची बायोप्सी झाली. सुदैवाने ट्यूमर malignant म्हणजे कॅन्सरचा नव्हता. पंधरा दिवस विराजला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्यानंतर जवळजवळ दोन महिने त्याला पूर्ण बरा होण्यास लागले. या दरम्यान डोकं दुखणं, कानातून आवाज येणं, निद्रानाश असे त्रास त्याने सहन केले. आता सर्व काही सुरळीत सुरू होते. आक्रीत घडून गेले होते. एका मोठ्या संकटातून त्यांचे कुटुंब सहीसलामत बाहेर पडले होते.


आज वैदेही-विराजच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस. दोन दिवसांपूर्वीच वैदेहीला नव्या पाहुण्याची चाहूल लागली होती. आज ही गोड बातमी विराजला सांगून ती आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करणार होती.


***********************************************


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller