Rishikesh Murgunde

Drama Thriller Others

3.9  

Rishikesh Murgunde

Drama Thriller Others

कासरा

कासरा

9 mins
2.8K


दिवस पहिला 

“किसना, अरं ए किसना, उठ की रे आता. सूर्य पार डोक्यावर आला तरी उताणा पडलायस अजून.’’ सकाळचे दहा वाजले होते. किसनाची आई अंगणात झाडू मारत होती. थोडयाच अंतरावर त्यांच्या घरातली एकुलती एक म्हैस बांधली होती आणि गोठ्याच्या बाजूला असलेल्या खाटेवर साखरेंच्या घरातला एकुलता एक रेडा - किसना पहुडला होता. त्याच्या आईने त्याला सकाळपासून कमीतकमी दहावेळा हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला होता. पण किसना प्रत्येकवेळी फक्त कूस बदलून झोपून रहायचा.  

“आता उठतोस का ओतू पाण्याची बादली अंगावर?” आईचा आवाज एव्हाना वाढला होता. आईने दिलेली धमकी ऐकून किसना खाडकन जागा झाला. 

“काय धमक्या देत असत्यास गं सारखी? तुझ्या धमक्यांच्या नादात एकदिवस जीव जाईल माझा.” – किसना डोळे चोळत म्हणाला. 

“अरं काय वेळ-काळ असत्या का न्हाई झोपायला?’ – आईने पाण्याची बादली म्हशीसमोर ठेवली. 

‘’रातभर पाटलाच्या शेतावर होतो रखवालीला. पहाटं येउन झोपलो. जरा कुठं डोळा लागला होता तवर तुझी बोंबाबोंब सुरु झाली. 

“हम्म. पैसं दिलं का रे पाटलानं?” – आई म्हशीचा कासरा हातात घेत म्हणाली. 

“कुठल्या तोंडानं मागणार पैसा? आधीच देणं हाय पाटलाचं, अडीच हजार. रखवालीची हाजरी मागितली असती तर पाटलानं पायतानानं केस काढले असते.”

किसनाची आई दोन मिनिटं गप्प बसली. ती एकटक त्या म्हशीच्या कासऱ्याकडे बघत होती. किसना उठून मोहरीजवळ तोंड धुण्यासाठी गेला. 

“किसना, म्हशीचा कासरा पार झिजलाय की रं.” – आई काळजीने म्हणाली. 

“हम्म ...” किसनानी आईचं बोलणं फारसं काही गांभिर्यानी घेतलं नाही. 


“मी काय म्हणते, आज नवीन कासरा घेउन ये की. कासरा तुटला आणि म्हैस पळून गेली तर? या म्हशीवर तर पोट चालतंय आपलं. दोन वेळ दूध देत्या ही माय म्हणून दोन वेळची भाकरी मिळत्या, न्हाईतर काय झालं असतं आपलं काय म्हाईत.” – आई म्हशीच्या पाठीवर हाथ फिरवत म्हणाली. तोंड पुसून किसना म्हशीजवळ आला आणि त्याने आईच्या हातातून कासरा घेतला. 

“हम्म, झिजलाय की चांगलाच. बघतो, आणतो आज जमलंतर.” एवढं बोलून किसना बाहेर जायला निघाला. 

“आता कुठं चाल्लायस?” आईनी किसनाला विचारलं. 

“देवळात पूजा घालतंय कोणतरी. काल बामण म्हणाला होता, महाप्रसाद वाडायला मदत कर म्हणून. जाऊन येतो. पैसे काय मिळायचे न्हाईत. जेवायला मिळल चांगलं, गोड-धोड. तू दुपारचा स्वयंपाक नको करू आज.” आईने मान डोलावली आणि उरलेलं आंगण झाडू लागली. किसना देवळाकडे निघाला. 

म्हशीचा झिजलेला कासरा बघितल्यापासून किसनाच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता. आणि तिची चिंता साहजिकच होती. बऱ्याच वर्षांपूर्वी किसनाचे वडील वारले. म्हणायला काही एकर शेती मागे ठेवून गेले होते, पण त्याच्याच सोबत कर्जाचं डोंगरही वारश्यात देउन गेले होते किसनाला. कर्ज फेडायला शेत विकावं लागलं. तसं किसना ह्याच्या-त्याच्या शेतात मजुरी करून थोडे पैसे कमवायचा, पण घर चालायचं ते म्हशीचं दूध विकून. जर कासरा तुटला असता आणि म्हैस कुठेतरी निघून गेली असती, तर खरंच त्यांचे हाल झाले असते.

“येवढी कशापाई काळजी करायची? ३०-४० रुपयाला मिळत असल लईतलई कासरा. आणल की किसन्या.” – किसनाच्या आईनी स्वतःची समजूत घातली आणि म्हशीला आंघोळ घालायला नदीवर घेउन गेली. 

दुपारी ३ च्या आस-पास किसना देवळातून परत आला. अंगणात म्हैस नव्हती. “च्यायला, खरंच कासरा तोडून पळून गेली का काय?” किसना मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात त्याला समोरून आई येताना दिसली. त्याचा जीव भांड्यात पडला. 

“कुठं गेलतीस म्हशीला घेउन?” – मंदिरातून आणलेलं महाप्रसादाचं गाठोडं आईकडे देत किसना म्हणाला. 

“म्हैस बांध, मी पाणी पिते जरा.” – आईनी म्हशीचा कासरा किसनाच्या हातात दिला आणी मडक्यातून पाणी घेउन दोन घोट पिले. 

“नदीवर गेले होते म्हशीला आंघोळ घालायला. तिथंच मग जाधवांची शांता भेटली. बसले गप्पा मारत. तुझ्या लग्नाचं इचारत होती. म्हंटलं बघू, उरकून टाकू या वर्षी.’’ 

“मी जेवलो तिथंच. तू खाउन घे. पडतो जरा मी.” - किसनानी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

“संध्याकाळी लवकर उठ खरं. दूध काढून डेरीवर पोचतं भी करायचंय.” – आईनी किसनाला बजावलं.

सहा वाजता किसनाचा डोळा उघडला. आवरून, चहा घेउन त्याने म्हशीचं दूध काढलं आणि दुधाचे कॅन घेउन तो डेअरीकडे जायला निघाला. 

“कासरा आण रं येताना.” – आई 

“हा...आणतो.” – किसना 

आई म्हशीला कुरवाळू लागली. 

“तुझ्यामुळच माझं घर चालतंय ग बाई. अशीच राहा बघ आमच्याजवळ.” 

 डेअरीवर पोचल्यावर नवले शेठकडून पैसे मागावे असं त्याच्या मनात आलं होतं, पण शेवटपर्यंत त्याचं धाडस झालं नाही. जाऊदे, वाटेत भेटेल कोणीतरी, मिळतील पैसे असा विचार करून तो तिथून निघाला. वाटेत त्याने दोन-तीन जणांना पैसे मागितले, पण त्याच्या हाती निराशाच लागली. शेवटी तसाच हाथ हलवत तो घरी गेला.  

“आलास? बस बाबा, दमला असशील. जेवायला वाडते तुला.” – आईनी चुलीवरची भाजी उतरवली आणि भाकऱ्या थापायला घेतल्या. किसना हात-पाय धुवून जेवायला बसला. 

“कासरा आणला का रं?” – आई तव्यावर भाकरी टाकत म्हणाली. 

“न्हाई. विसरलो. उद्या आणतो नक्की.” किसना 

“विसरला? असा कसा विसरला बाबा? कासरा तोडून म्हस निघून गेली कुठं तर? “उद्या आण बघ नक्की.” – आई 


दिवस दुसरा 

दुसऱ्या दिवशी सकाळी किसनाला अडगेपाटलांच्या घरातनं बोलावणं आलं. आख्खा दिवस त्याचा घरातली आणि मळ्यातली कामं करण्यात गेला. त्याला वाटलं सरपंच देतील ४०-५० रुपय, पण कुठलं काय. त्याची कामं आवरेपर्यंत सरपंच काही कामासाठी तालुक्याला निघून गेले होते. संध्याकाळी ६ च्या आसपास तो घरी परतला. दूध काढून पुढच्या १० मिनिटात किसना डेअरीवर पोचला. तो तिथं पोचला तेव्हा बरीच गर्दी होती. तो थोडावेळ लांबच थांबला. सगळ्यांसमोर नवले शेठकडून पैसे मागायची त्याला लाज वाटत होती. बराच वेळ झाला तरी तिथली गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. कंटाळून शेवटी तो नवले शेठजवळ गेला आणि त्याने दुधाचे कॅन जमिनीवर ठेवले.  

“शेठ, जरा काम होतं.” – किसना 

“ओतून घे दुधाचे कॅन.” – शेठ 

“जरा पैश्यांची मदत पाहिजे होती.” – किसना 

“आरं ए म्हमद्याsss, ये की जरा पळत-पळत. दिवस लावतो का इथंपातुर यायला?” – शेठ 

“जास्त नको, ५० रुपय द्या फक्त. म्हशीसाठी नवा कासरा घ्यायचा हाय.” – किसना 

कासरा घ्यायसाठी पैसे उसने पाहिजेत म्हंटल्यावर आस-पासची लोकं हसू लागली. 

“काय किसन्या, कासरा घ्यायला ५० रुपयभी न्हाईत व्हय तुझ्याकडे? खरं सांग, कासराच घ्यायचा हाय, का शंभर मिली मारायची हाय शरणाप्पाच्या गुत्थ्यावर?” – भास्करमामा. 

“तसला नाद न्हाई मला. कासराच घ्यायचा हाय. आणि असते पैशे तर उसने कशाला मागितले असते?” – किसना चिडला. 

भास्करमामांशी बोलूपर्यंत नवले शेठनी टेम्पोला स्टार्टर मारला होता. 

“शेठ, ओ शेठ.” – किसना 

“आधीचे पैशे परत करा आधी. पुढचं पुढं बघू.” – एवढं बोलून शेठ तालुक्याला निघाले. किसना हताश होऊन घरी परतला. नेहमीप्रमाणे आईला त्याला जेवायला वाढलं. 

“कासरा आणलास?” – आईनी जरा गंभीरपणे विचारलं. 

“नवले शेठकडं मागितले पैशे. न्हाई दिले. आधी आधीची उधारी चुकती कर, मग देतो पैसे म्हणाले.”

“असं किती पैशे लागत्यात रे कासरा आणायला?” – आई चिडून म्हणाली. 

“तेवढं तरी नको व्हय जवळ?”

आईनी हातातला घास पुन्हा ताटात टाकला आणि न जेवताच निघून गेली. किसना दोन मिनिटं तिथं तसाच बसून राहिला. 

“आई, ए आई, जेवणावर का राग काढायचा? ये, जेव. मी आणतो उद्या कासरा.” – किसनाने आईला आवाज दिला. आईने काहीच उत्तर दिलं नाही. ताटात असलेली एक भाकरी कशी-बशी खाऊन किसना खोलीत जाऊन आडवा झाला. उद्या कासरा नाही आणला तर आपलं काही खरं नाही हे किसनाला कळत होतं. पण गावात एवढ्या जणांकडून पैसे उधार घेतले होते, आता कोणीही त्याला एक रुपया उधार दिला नसता. जाऊ दे, उद्या होईल काही ना काहीतरी जुळणी, असा विचार करून किसना झोपी गेला. 


दिवस तिसरा 

आज काहीही करून कासरा आणायचाच हा निर्धार करून किसना घराबाहेर पडला. सगळ्यात आधी त्याने फावड्याचं घर गाठलं. 

“सोपानराव, सोपानराव.” त्याने फावड्याच्या वडिलांना आवाज दिला. काही वेळाने फावड्या बाहेर आला. 

“तुझा बा कुठं हाय रे?” किसनाने विचारलं. 

“बा, शहरात गेलाय कालच. माझ्या चुलत्याच्या घरी पूजा हाय ना, त्यासाठी.”

“असं व्ह्य? बर, फावड्या, लेका घरात एखांदा कासरा हाय का बघ की पडलेला. म्हशीचा कासरा पार तुटायच्या घाईला आलाय बघ.” किसना म्हणाला 

“आलोच बघून.’’ एवढं बोलून फावड्या आत पळाला. चला, ह्याच्याकडे कासरा मिळाला तर बेस्ट काम होईल या विचाराने किसनाचा जीव भांड्यात पडला. 

“न्हाई रं दादा कासरा. सगळीकडं बघितलं घरात. मिळालं तर देतो आणून.” – फावड्या बाहेर येउन म्हणाला. 

किसना निराश झाला. 

“चालतंय. बघ तेवढं खरं नक्की.” एवढं बोलून किसना तिथून निघाला. वाटेल दिसेल त्याला किसनाने पैसे किंवा कासरा मागून बघितलं, पण सगळीकडे त्याला नकारच मिळाला. आज पण घरी मोकळ्या हाताने परतणार आणि आज परत आई शिव्या घालणार या विचाराने किसना हिरमुसला. 

“किसना, ए किसन्या.”

किसनाने मागे वळून बघितलं. पांडू न्हावी सायकलवरून किसनाच्या दिशेने येत होता. किसनाजवळ येउन थांबताच त्याने विचारलं,” तंबाखू हाय का?” किसनानी खिश्यातली तंबाखूची पुडी आणि चुना काढला. 

“थांब, डबल घेतो. मला पण लई ताण आलाय.” किसना तंबाखू चोळत म्हणाला. 

“का रे? काय झालं?” पांडू 

“म्हशीचा कासरा पार तुटायच्या घाईला आलाय. सगळ्यांकड कासरा, पैशे मागून बघितले. पण कोणीभी मदत न्हाई केली. तुझ्याकडं हाय का रं कासरा?” – किसना 

“हाय की.” पांडूचं हे उत्तर ऐकताच किसना खुश झाला. 

“पण देऊ शकणार न्हाई बघ.” – पांडू 

“का?” कासरा असूनसुद्धा पांडू कासरा देण्यास नकार का देतोय हे किसनाला कळेना. 

“मागच्या वर्षी भाऊरावकडून अडगळेचा इश्वास असंच कासरा घेऊन गेला. त्यानं त्याच कासऱ्यानी गळफास लावून घेतला. तू भी असलं काही केलं तर ती लडतर कोण निस्तरायची बाबा?” – पांडूनी कारण सांगितलं. 

“येडा हाय का? मी कशाला गळफास घीन? खरंच, आईची शप्पथ, म्हशीसाठीच पायजे कासरा.” – किसनानी समजवायचा प्रयत्न केला. 

“न्हाई बाबा. कासरा सोडून बोल.” – पांडू ठामपणे म्हणाला. 

“पन्नास रुपये दे मग?” – किसना 

“माझ्याकड पैसे असते तर तुझ्याकडून तंबाखू मागितली असती का? आत्ताच पोरीची शाळेची फी भरून आलोय. तरीभी बघतो काही जमतंय का? चल, येऊ का?” – पांडू तिथून निघून गेला. 

गावातल्या जवळ-जवळ सगळ्यांना कासरा मागून झाला होता. आता घरी गेल्यावर आपलं काही खरं नाही हे किसनाला माहीत होतं. तो घरी जाता-जाता काय कारण सांगावं याचा विचार करू लागला. पण घरी जाईपर्यंत त्याला काही सुचलं नाही. 

आईनी आज एकाच ताट वाडलं होतं. हाथ-पाय धुवून किसना जेवायला बसला. 

“तू जेवलीस?” 

“कासरा आणलास?” – आईनी विचारलं. किसना काहीच बोलला नाही. 

“या म्हशीच्या जीवावर घर चालतंय आपलं. कासरा तुटला, आणि म्हस कुठं निघून गेली, तर मी व्हिरीत उडी मारून जीव देईन बघ.” किसना काही बोलायच्या आत आई उठून निघून गेली. किसनाला सुचायचं बंद झालं. त्याला जेवण गेलं नाही. खोलीत गेल्यावरपण त्याच्या डोक्यात आईचं तेच वाक्य फिरत होतं. कासरा तुटला, म्हैस निघून गेली, आणि आईनी खरंच विहिरीत उडी मारून जीव दिला तर? 


दिवस चौथा 

पहाटेच किसनाचा डोळा उघडला. त्याच्या खोलीच्या बाहेर असलेल्या खाटेवर त्याची आई गाढ झोपली होती. किसना तोंड धुवायचं म्हणून आंगणाकडे जायला निघाला. गोठ्याकडे बघतोय तर म्हैस जागेवर नव्हती. किसनाला धस्स झालं. त्याला काय करावं काही सुचेना. तो सैरावैरा पळत सुटला. त्याची नजर फक्त म्हशीला शोधत होती. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो म्हशीबद्दल विचारत होता. त्याने आख्खं गाव पालथं घातलं पण त्याला म्हैस काही सापडली नाही. किसना म्हैस शोधून शोधून एव्हाना दमला होता. गुढघ्यावर दोन्ही हात ठेवून तो धापा टाकू लागला. या म्हशीच्या जीवावर घर चालतंय आपलं. कासरा तुटला, आणि म्हस कुठं निघून गेली, तर मी व्हिरीत उडी मारून जीव देईन बघ, म्हस कुठं निघून गेली, तर मी व्हिरीत उडी मारून जीव देईन बघ. आईची ही वाक्यं पुन्हा किसनाच्या डोक्यात फिरू लागली. एवढ्यात – “ढपाक्कssss!” पाण्यात भलं-मोठं काहीतरी पडल्याचा आवाज आला. किसना खाडकन जागा झाला. त्याला घाम फुटला होता. त्याने घाम पुसला. आपल्याला स्वप्न पडलं होतं, म्हैस कुठेही गेली नाही, आईने विहिरीत उडी मारली नाही या विचाराने किसनाचा जीव भांड्यात पडला. 

“किसना दादा, ए किसना दादा.” – फावड्यानी हाक मारली. फावड्याचा आवाज ऐकून किसना बाहेर आला. 

“काल फादर घेऊन आलं शहरातनं. एक जास्त होतं. फादर म्हणलं तुला दे म्हणून.”- फावड्या हातातला कासरा पुढं करत म्हणाला. कासरा पाहताच किसनाचा चेहरा फुलला. 

“लई भारी काम झालं बघ. तुझ्या वडलांना सांग नंतर येऊन भेटतो म्हणून.” किसनाने फावड्याचे आभार मानले. फावड्या जाताच तो म्हशीच्या गोठ्याकडे गेला कासरा बदलायला. गोठ्यात पाहतो तर म्हैस जागेवर नव्हती. किसनाला धस्स झालं. त्याला काय करावं काही सुचेना. तो सैरावैरा पळत सुटला. त्याची नजर फक्त म्हशीला शोधत होती. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो म्हशीबद्दल विचारत होता. त्याने आख्खं गाव पालथं घातलं पण त्याला म्हैस काही सापडली नाही. किसना म्हैस शोधून शोधून एव्हाना दमला होता. गुढग्यावर दोन्ही हाथ ठेवून तो धापा टाकू लागला. या म्हशीच्या जीवावर घर चालतंय आपलं. कासरा तुटला, आणि म्हस कुठं निघून गेली, तर मी व्हिरीत उडी मारून जीव देईन बघ, म्हस कुठं निघून गेली, तर मी व्हिरीत उडी मारून जीव देईन बघ. आईची ही वाक्यं पुन्हा किसनाच्या डोक्यात फिरू लागली. मग त्याला ते सकाळी पडलेलं स्वप्न आठवलं. त्या स्वप्नात पण असंच झालं होतं. म्हैस गेली. आता आपली आई विहिरीत उडी मारणार या विचाराने किसना घाबरला. हताश होऊन तो घरी परतला. तो विचारात गुंग होता. इकडं-तिकडं न बघता तो सरळ आपल्या खोलीत गेला आणि त्याने खोलीचं दार लावून घेतलं. त्याने कासरा छताला आधार देणाऱ्या आडव्या बांबूला बांधला आणि गळफास लावून घेउन त्याने आपला जीव दिला. 

  “किसना, अरं ए किसना, उठ की रे आता.” – म्हशीला आंघोळ घालून आई घरी परतली होती. ती किसनाच्या खोलीकडे बघत त्याला आवाज देत होती. पण ना एक ना दोन. नवीन कासरा रग्गड होता. तुटला नाही...


Rate this content
Log in

More marathi story from Rishikesh Murgunde

Similar marathi story from Drama