STORYMIRROR

Prakash Patil

Tragedy Romance Drama

3.8  

Prakash Patil

Tragedy Romance Drama

दिशा

दिशा

11 mins
1.7K


दिशा-एक असं प्रसन्न व्यक्तिमत्व, जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा, तिच्या हालचाली डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्याव्यात. कुणाशी बोलताबोलता ती समोर आली की आपोआप संभाषण थांबवून एकटक तिच्याकडे पाहावेच असं तिचं रूप! "एफ.वाय.बी.एस्सी" च्या वर्गात तिच्याइतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कुणी नव्हती. या पूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिनधास्तपणा जाणवत होता. पण त्या बिनधास्तपणात जराही उच्छृंखलपणा नव्हता, की अहंपणा नव्हता. तिचे आत्मविश्वासपूर्वक वावरणे तरूणाईच्या काळजाचा ठोका चुकविणारे ठरायचे.


कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून कौतूक तिला पाहात होता. वर्गात, वर्गाबाहेर, कॅन्टिनमध्ये, लायब्ररीमध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभिरत राहायचा. ती जरा नजरेआड झाली की बेचैन व्हायचा. तसा तो अधेमध्ये काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही. पण तेवढ्यानं त्याचं समाधान होत नव्हतं. किती दिवस आतल्या आत असं भावना दाबून राहायचं. आज काहीही करून तिला मनातलं सांगायचंच असा निश्चय त्याने केला होता. तो कॉलेजबाहेर एका कोपऱ्यावर थांबला होता. समोरून ती येताना दिसत होती. महत्वाचं म्हणजे एकटीच होती. इतकी चांगली संधी त्याला दवडायची नव्हती.

"हाय!" ती जवळ येताच तो उदगारला!

"हाय! कुणाची वाट पहातोयस?" तिने विचारले.

"कुणाची नाही, actually तुझीच…वाट पहात होतो… " तो कसाबसा अडखळत पुटपुटला.

हे काय! आपण इतके अडखळलो कसे? साधे सरळ वाक्य होते… तो गोंधळला होता.

"माझी? का ?" तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच, तरी तिने मुद्दामहून आश्चर्य व्यक्त केले.

"दिशा, मला... मला काही बोलायचं आहे तुझ्याशी" अजूनही तो अडखळतच होता. असं का होत होतं ते त्याला कळत नव्हतं.

"मग बोल ना ! इतका काय गोंधळतोयस" त्याचं अडखळणं तिच्या लक्षात आलं होतं.

"इथे नाही, अं, लायब्ररीत जाऊ या?" त्याने विचारलं.

"ठीक आहे. चल!" तो जितका गोंधळला होता, तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती. ती माघारी फिरली. लायब्ररीच्या दिशेने वळली.

लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते.

"बोल! काय सांगायचं आहे तुला?" तिनेच सुरुवात केली.

"अं, त्याचं काय आहे, दिशा…." तो पुन्हा अडखळत होता. "मी... मी… "

"तुला सांगायचं तरी काय आहे? माझ्या प्रेमा-बिमात तर नाही ना पडला" तिने थट्टेने विचारले.

तो उडालाच! अगं आईss! ही थट्टेत विचारतेय, तेच तर मला सांगायचं आहे.

"हो हो!" त्याने एका दमात म्हटलं, तशी ती खळखळून हसली. तिचे शुभ्र दात चमकले. तिच्या दोन्ही गालांवर खळ्या उमटल्या. तिच्या हसण्यानं त्याचा गोंधळ अजून वाढला.

"तू हसतेस..?" काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं.

"हसू नको तर काय करू! मला कुणी 'तुझ्याशी काही बोलायचं आहे' म्हणून म्हटलं की आधीच शंका येते, हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना म्हणून !"

"म्हणजे तुला या आधी... "

"भरपूर जणांनी!" त्याचं वाक्य मधेच तोडत ती म्हणाली, "हे बघ, सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते. मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे. माझं, माझ्या कुटुंबाचं स्वप्न पुरं करायला आली आहे. आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही, आणि यापुढेही कायम ठेवणार आहे. ही दोनचार वर्षे करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे. पण या प्रेमा-बिमापासून मी दोन हात लांबच आहे. इज धिस क्लिअर?"

"पण.. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर..."

"माझं ऐक, तुझी एनर्जी माझा विचार करण्यात, मला इम्प्रेस करण्यात घालवू नकोस, वाया जाईल! त्या ऐवजी अभ्यासात लक्ष घाल. हे वय शिकायचं आहे. तू एक हुशार मुलगा आहेस. खूप अभ्यास कर, आणि टॉप टेनमध्ये ये, मग भेटू, बोलू! माझ्यासाठी एवढं करशील?"

"चालेल. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे"

"गुड, पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आहे. बाय्, भेटू या रिझल्टच्या दिवशी!" असं म्हणत दिशा लायब्ररीबाहेर पडली.

•••


"पप्पा, मला आज आपली जग्वार घेऊन कॉलेजला जायचं आहे.." लकी पपांना मस्का मारत होता.

"नो! नो! not at all ! कॉलेजमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं नाही. तू तुझ्या बाईकवरूनच जा!"

"पपा प्लीज, मला प्रौढी मिरवायची नाहीय.. माझ्या मित्रांना जग्वार पाहायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी.. फक्त आजचा दिवस.." लकी पुन्हा विनवणी करू लागला.

"ठीक आहे, आज घेऊन जा, पण लक्षात ठेव, पुन्हा कधीही नाही!"

"येस पप्पा, Thanks !" असं म्हणत लकीने पपांच्या हातातून गाडीची चावी घेतली. बंगल्याच्या पोर्चमधून ५००० CC ची F type जग्वार बाहेर काढताना लकी आनंदात शीळ घालीत होता. मनातल्या मनात तो पपांवर फार खूश होता. आज जग्वार कॉलेजला घेऊन जाण्याचं त्याने पपांना सांगितलेलं कारण आणि खरं कारण वेगळं होतं. कॉलेजमधल्या दिशावर छाप पाडण्यासाठी तो ही कार घेऊन निघाला होता. रोज ज्या रस्त्याने दिशा पायी चालत जात असते, त्या रस्त्याने तो जग्वार कारने निघाला होता. त्या रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवर बसण्याची विनंती केली होती. पण ती अजून एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती. पण आज कसंही करून तिला आपल्या कारमध्ये बाजूच्या सीटवर

बसायला भाग पाडायचंच असा निश्चय त्याने केला होता. त्याने घड्याळावरून नजर फिरवली. रोजचीच वेळ होती. दोन किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर किंवा त्यापुढे दिशा चालताना दिसणार होती. तो त्या वळणावर पोहोचला. दिशा पुढे चालत होती. त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली. हॉर्न मारला. दिशाने मागे वळून पाहिले. त्याचवेळी त्याने ग्लास खाली घेतली.

"हाय, दिशा.. ये ना! मी सोडतो तुला.. " त्याने म्हटले.

"नाही.. नको! मी जाईन चालत... " तिचं नेहमीचंच उत्तर.

"प्लीज दिशा! आज नाही म्हणू नकोस! मी पुन्हा कधी ही गाडी घेऊन येणार नाहीय!"

तो इतका आर्जवाने बोलत होता. त्यामुळे "नाही" म्हटलं तर त्याला अपमान झाल्यासारखे वाटेल म्हणून दिशा निमूटपणे त्याच्या बाजूला बसली.

"खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला. पण आमच्या घरापासून walkable distance आहे, म्हणून मी चालत निघते रोज!" गाडीत बसताबसता ती म्हणाली.

"माहित आहे मला…" तो म्हणाला.

"आज मी खूप खूश आहे, दिशा!" कार थोडी पुढे गेल्यावर लकीने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

"हो, मला माहित आहे… का खूश आहेस ते!" दिशा त्याच्याकडे पाहात म्हणाली.

"अच्छा! सांग का खूश आहे ते!" त्याने प्रश्न केला.

"कारण मी तुझ्या बाजूला बसले आहे.. "

"अरे वा! कसं ओळखलंस?"

"मला कळतेय, तुझं वागणं... "

"मग का अशी वागतेस, दिशा?"

"उलट मी तुला विचारायला हवं, तू का असा वागतोयस ते !"

"म्हणजे?"

"म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस.. आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असशील.. पण एक लक्षात ठेव, ही कार तुझ्या कमाईची नाहीय, तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे! मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनून दाखव! निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप टेनमध्ये येऊन दाखव! तुझं हे शेवटचं वर्ष आहे. खूप महत्वाचं. तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बर होईल."

"दिशा, तुला माहित नाही, मी तुझ्यावर किती प्रेम करतोय ते!"

"पण मला सध्यातरी असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीय! मी उतरू ...?"

"ओके. सॉरी. बस मी नाही पुढे बोलत... "

कारमध्ये मौन पसरलं. दिशा विचार करत होती. या मुलांना झालंय तरी काय! जो तो उठतो, आणि म्हणतो, "माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे! कॉलेजमध्ये शिकायला येताहेत की प्रेम करायला!" कॉलेजच्या पार्किंगमध्ये कार थांबली. दिशा जशी निमूटपणे कारमध्ये शिरली होती तशीच निमूटपणे उतरली.

कौतुकने लकीच्या जग्वारमधून दिशाला उतरताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं. अच्छा, म्हणजे असं आहे तर! आपल्याला शिकवत होती, 'अभ्यासात लक्ष दे, मी इथे फक्त शिकायलाच आली आहे’ म्हणून आणि स्वतः लकीबरोबर फिरते. त्याच्याबरोबर हिचा रोमान्स सुरु आहे म्हणून आपल्याला भाव देत नाहीय. तो अशा विचारात असतानाच ती त्याच्यासमोरून झपाझप निघून गेली. गाडी पार्क करून लकी समोरून येत होता.

"नावाप्रमाणेच लकी आहेस.." लकी त्याच्या जवळून जात असतानाच तो पुटपुटला.

लकीने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले, "ए यु! काय म्हणालास?"

कौतुक गोंधळला. "अं, काही नाही.. तू तू नावाप्रमाणे लकी आहेस..."

"का?'

"अं, नाही म्हणजे, जग्वार गाडी, आणि दिशाची मैत्री!"

"दिशाबरोबर तर तुझीही मैत्री आहे ना?"

"हो, पण ती प्रेम तर तुझ्यावर करते ना?"

"एवढं कुठे नशीब, मित्रा!"

"म्हणजे?"

"अरे, एक तर किती प्रयत्नांनी आज माझ्या गाडीत बसली, म्हटलं, आज बोलू तर उलट माझीच बोलती बंद केली. अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेली."

"अस्सं!" कौतुकने सुटकेचा श्वास सोडला. नशीब! आपण समजत होतो तसं काही नाहीय...

•••


बोर्ड मीटिंग संपल्यावर थकलेल्या चेहऱ्याने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या कौतुककडे ती कौतुकाने पाहत बसली होती. त्याने डोळे उघड

ले तेव्हा ती एकटक आपल्याकडे पाहतेय हे त्याच्या लक्षात आलं.

"काय पाहतेस?

"कौतुक, हॅट्स ऑफ टू यू... आजच्या मीटिंगमधील विषय तू किती कौशल्याने हाताळलेस... कौतुक, तुझं कौतुक करावं तितकं कमीच!"

"थँक्स!"

"कौतुक, आता खूप झाले, कामाच्या मागे धावणे..."

"मग काय, आता आराम करायचा?"

"तसं नाही रे, पण... तू काही ठरवलंयस, लग्नाचं?"

"खरं सांगू? मी करिअरच्या, कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की, या बाबतीत विचार करायला फुरसतच नाही मिळाली. बाय द वे, तुझं काय म्हणणं आहे?"

"मला वाटतं, आता लग्नाची योग्य वेळ आहे.."

'"कुणी मुलगा आहे का नजरेत..?"

"अं, आहे पण त्याच्या मनात काय आहे, ठाऊक नाही..ते जाऊ दे, तुझं बोल, तुझ्या लक्षात आहे का एखादी मुलगी..?"

"खरंच, मी त्या दृष्टीने विचार नाही केला, घरून अधेमधे टोचत असतात, पण मी उडवून लावतो... बरेच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय... गेल्या आठवड्यात मी यू एस मध्ये असतांना एका Innovative प्रोजेक्टसाठी माझी गुगलच्या हेडक्वार्टरमध्ये मीटिंग झाली होती."

"हो तू म्हणाला होतास.. "

"It was just formal discussion... पण त्यांच्या CEO ना ती कल्पना आवडलीय. कालच त्यांचा मेल आलाय. त्यांनी पुढच्या महिन्यातली तारीख नक्की केलीय next मीटिंगसाठी. त्या प्रोजेक्टसाठी ते इतके excited आहेत की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरु करायचीही त्यांची तयारी आहे! दिशा, अशी भन्नाट कल्पना आहे ना! त्यासाठी गुगलच perfect आहे. ती जर work out झाली तर मला इथून राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू, दिशा?"

"कौतुक, तू खूप दूर निघून गेलायस..? तुला वाटत नाही लग्न करून settle व्हावंसं... ?"

"नो, नो दिशा! मला क्षितिजापलीकडे झेप घ्यायची आहे. त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचे नाहीय मला…"

"ठीक आहे, मीच तुला उपदेश केला होता. माणसाने आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून मीच तुला हिणावत असे.. पण तू इतकंही निर्दयी व्हावंस, भावनाशून्य व्हावंस असं मला अभिप्रेत नव्हतं, कौतुक.." तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता.

कौतुकला हे अनपेक्षित होतं.

"तुला काय म्हणायचं आहे, दिशा...मला नाही समजलं.."

"सगळं शब्दांत सांगायला हवं का? तुला कळत कसं नाही रे,..? तुझ्या प्रगतीचा आलेख जसजसा वर चढत गेला, तसतसा तू माझ्या मनात घर करत गेलास... तुझी मेहनत, तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वांत जास्त आनंद मला होत होता. पण तुझं हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जातेय की काय अशी अनाहूत भीती मला वाटायला लागलीय... मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तीळतीळ तुटतेय...पण तुझ्या ते लक्षात येत नाहीय... एकांतात काही बोलायला जातेय, तर तू फाईलीत डोकं खुपसतोयस... मी 'वातावरण किती छान आहे' म्हणते तेव्हा तू बिझनेसची चर्चा सुरु करतोस..."

आणि ती चक्क हमसाहमसी रडत केबिनच्या बाहेर पडली. कौतुकच्या डोक्यात काही शिरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या

बाहेर पडलीदेखील! त्याने मोबाईल लावला, पण तिने डिस्कनेक्ट केला. खुर्चीवर डोळे मिटून पडल्यापडल्या त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले..

•••


रिझल्टचा दिवस होता. कौतुक मार्कशीट घेऊन थेट ब्लॉक नंबर 10 कडे वळला. तो टॉप टेनमध्ये तर होताच, शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पहिला क्रमांक अर्थातच दिशाचा होता. दिशा रिझल्टच्या दिवशी ब्लॉक नंबर 10 मध्ये भेटणार होती, म्हणून तो कमालीचा खूश होता. शर्टाच्या आत तिला देण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फुल लपवून ठेवलं होतं. पण तो त्या रूममध्ये शिरला आणि त्याला धक्काच बसला. रुममध्ये त्याच्या आधीच काही मुलं हजर होती. हा काय प्रकार आहे? तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहात असतानाच दिशाने ऐटीत एन्ट्री घेतली. आता सारे जण दिशाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागले.

"हाय फ्रेंड्स! फर्स्ट ऑफ ऑल, आय वूड लाईक टू कॉंग्रेच्युलेट एव्हरी वन! All of you had done a very good job having stood among the top ten!.”

"धीस इज नथिंग, बट चिटींग ओन्ली...यु हैव चिटेड अस" एक मुलगा चिडून म्हणाला.

"काय चिटींग केलेय मी?" दिशाने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारले.

"तू मला म्हणाली होतीस, 'आधी टॉप टेनमध्ये येऊन दाखव, मग तुझा विचार करेन'.. आता मी चौथा आलो आहे. पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहे..."

"होय, मी सर्वानाच असा शब्द दिला आहे, पण मी "विचार करेन" एवढंच म्हटलं होतं... तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू होता माझा! त्यात काय चुकलं माझं? काय चीटिंग केली मी?"

कौतुक फार हळव्या मनाचा. त्याने स्वतःला दिशासाठी अभ्यासात झोकून दिल होतं. टॉप टेनमध्ये आल्यावर दिशाचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजूत होती. पण तिने तर सर्वांनाच तसं सांगितलं होतं. दिशा अजून काहीकाही बोलत होती, ते त्याला ऐकू येत नव्हतं. तो तिला न भेटता निमूटपणे तिथून निघाला. शर्टात लपवलेलं गुलाबाचं फुल त्याने बाहेरच्या डस्टबीनमध्ये कुस्करून टाकलं. त्याने मनाशी निश्चय केला. यापुढे कुणाच्या मागे लागायचं नाही. खूप शिकायचं.

खूप मोठं व्हायचं, मग आपल्याला कुणाच्या मागे लागायची गरजच लागणार नाही...

•••


कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या. वेगवेगळ्या कंपनीत मोठं मोठ्या हुद्द्यावर काम केले. एक दिवस एका कंपनीत त्याने "सीईओ"च्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू दिला.

"Congratulations! You have been appointed!" , कंपनीच्या एम.डी. नी त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हटले. त्याचवेळी केबिनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहातच राहिला. ती व्यक्ती होती, दिशा!

"Meet our Chairman, Disha" एम.डी. तिची ओळख करून देत म्हणाले. कौतुकने हात पुढे केला.

"मी ओळखते यांना! He is my classmate" कौतुकशी हात मिळवत दिशा हसतमुखाने म्हणाली.

"पण या कंपनीचे चेअरमन तर किरण कानेटकर आहेत." कौतुकने तिच्याकडे शंका उपस्थित केली.

"होते, आता मी आहे. ते माझे पपा, पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चेअरमन पदाची सारी सूत्रं माझ्या हातात सोपवलीत... या पूर्वी मी फक्त डायरेक्टर होते.

"पण काय रे कौतुक, कॉलेजनंतर तू एकदम गायबच झालास...?"

कौतुक काही न बोलता मंदपणे हसला.

•••


त्या दिवसापासून कौतुक त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला. अवघ्या दोन वर्षात त्याने कंपनीची भरभराट केली. कौतुकची एम. डी. नी केलेली निवड सार्थ ठरली होती. या धावपळीत दिशाचं मन त्याच्यात गुंतलं होतं, ते त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं... आणि आज तिने त्याच्यासमोर ते उघड केलं होतं, ते ही अशा पद्धतीनं की त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही. तो सुन्नपणे टेबलच्या ग्लासवर पडलेल्या स्मार्टफोनकडे पाहात होता. पुन्हा फोन करावा की करू नये अशा विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलच्या स्क्रीनवर दिशाचा चेहरा झळकला.

"बोल, दिशा..."

"सॉरी, कौतुक... मी जरा जास्त इमोशनल झाले होते, पण काही जबरदस्ती नाहीय, कदाचित तुला मी टॉप टेनच्यावेळी अपमानित केले असे वाटले असेल, म्हणून तू बदला घेत असशील.." तिचा आवाज थोडा कापरा होता.

"नाही दिशा, असं काही एक नाही. तू कुठे आहेस? भेटून बोलू या..."

"मी खाली गाडीतच आहे.."

"म्हणजे तू इतका वेळ गाडीतच आहेस... वेट वेट मी आलोच" असं म्हणत त्याने कॉल कट केला. तो घाईघाईत केबिनमधून बाहेर पडत असतानाच अकाउंट्स मॅनेजर फाईल घेऊन आत येत होता. "सर..." अकाउंट्स मॅनेजर काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला, "नंतर!"

धावपळीत तो लिफ्टजवळ पोहोचला. लिफ्ट खाली गेलेली होती. त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्ट वर येईपर्यँतही त्याला धीर धरवत नव्हता. एक एक सेकंद त्याला महत्वाचा वाटत होता. लिफ्टमधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला. पार्किंगमध्ये ब्ल्यू कलरची मर्सिडीज त्याने लांबूनच पाहिली... तो कारजवळ पोहोचला. दरवाजा उघडून आत बसला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तेव्हा रडूनरडून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू सुकल्याचे स्पष्ट समजत होते.

"आर यू ओके, नाऊ?" त्याने संभाषणाला सुरुवात करण्यासाठी विचारले.

"ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे..."

"दिशा, माझ्या मनाला कधी असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी ही प्रेमा-बिमात पडेल... खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस ते ही मी एक कामाचीच औपचारिकता समजत होतो. "

"का? मला मन नाही? भावना नाहीत?"

"नाही तसं नाही, पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं... मी अभ्यास सोडून तुझ्यामागे लागलो होतो तेव्हा तूच मला हा यशाचा मार्ग दाखवला... अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं. पण योग्यवेळी त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत हे ही तितकंच खरं आहे. यशाच्या मागे धावताना आता कुणाची तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत, हे माझ्या लक्षातच नाही आलं... आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारी दिशाच जर माझी सोबत मागत असेल तर माझ्यासाठी याहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते.?'

"कौतुक...."

दिशाने भावनावेगाने त्याचा हात हातात घेतला.

त्याने तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवले.

आता काही बोलण्याची गरजच नव्हती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy