Prakash Patil

Thriller

3  

Prakash Patil

Thriller

हॉस्टेल

हॉस्टेल

6 mins
16.1K


संध्याकाळी हॉस्टेल मधल्या रुममध्ये नम्रता हॉरर कादंबरी वाचत बसली होती. वाचता वाचता वेळ कसा गेला कळले नाही अंधारून आले होते. तिने लाईट लावला व ती पुन्हा वाचत बसली. अजून एखादा तास उलटला असेल. तिला कुणीतरी रडतंय असं वाटलं. तिने आवाज नीट ऐकण्याचा प्रयत्न केला. पण आवाज बंद झाला होता. तिने पुन्हा पुस्तकात डोके खुपसले. त्या शांततेत तिला डोअर बेलचा आवाज इतका कर्णकर्कश वाटला की ती दचकलीच! तिने भीतभीतच दरवाजा उघडला. समोर सुषमा उभी होती. "काय गं, किती घाबरवलंस?" तिने चिडून सुषमाला विचारले.

"नाही गं, वरून कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला, मी घाबरले म्हणून तुझ्याकडे आले!"

"अगं आवाज मी पण ऐकला, पण नंतर बंद झाला. " ती असे म्हणतांनाच पुन्हा रडण्याचा आवाज आला. कुणी तरी दबक्या आवाजात हुंदके देत होते. दोघीही स्तब्धतेत आवाज ऐकू लागल्या.

"एक काम करू या, आपण वर जाऊन बघू या कोण आहे ते." नम्रताने मनाची तयारी केली. पण सुषमा खूप घाबरलेली होती.

"वेड्यासारखं काही पण नको करूस, नम्रता .. तुला माहित आहे ना त्या योगिताचा आत्मा वर फिरतोय ते! "

"सुषमा, ती अफवा असू शकते, भासही असू शकतो.. "

"नम्रता, मला नाही खात्री करायची.. "

"पण मी आज करणार आहे .. आर या पार!" नम्रताचा निश्चय पक्का होता. "तू येतेस कि मी जाऊ?" तिने सुषमाला प्रश्न केला.

"मी नाही येणार, नम्रता! प्लीज तू पण नको जाऊस , मला एकटीला इथेही भीती वाटेल." सुषमा रडवेली झाली होती.

"गप्प गं, काही नाही होत. मी वर जातेय "असं म्हणत नम्रता तिला तिथेच सोडून रूम मधून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेर पडली.

एकदा सुषमा बरोबर बोलता बोलता नीलमचा विषय निघाला तेव्हा नम्रताने सुषमाला विचारले, "सुषमा, तू का इतका द्वेष करतेस नीलमचा?"

"नम्रता, तिच्यामुळेच मी माझी जिवलग मैत्रीण योगिता गमावली आहे.. "

"अरे हो, तू मला योगिता बद्दल सांगणार होतीस ना, सांग ना प्लीज… "

नम्रताच्या विनंती वरुन सुषमाने सांगण्यास सुरुवात केली.

"योगिता तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. दोन वर्षांपूर्वी विक्रम उर्फ़ विक्कीवर तिचे प्रेम जडले होते. पण काही दिवसांपासून तो तिला टाळू लागला होता...अणि एफ. वाय.ला नुकताच प्रवेश घेतलेल्या सोनम सोबत तो तिला नेहमी दिसत होता. एक दिवस तिने त्याला त्याबाबतीत स्पष्ट विचारले. पण त्याने उड़वा उडवीची उत्तरे दिली. वर तिलाच सुनावले, “मी कोणाबरोबर बोलायचे, कोणाबरोबर फिरायचे हे तू मला शिकवू नकोस..आणि यापुढे मला भेटायचा प्रयत्न करू नकोस..”

योगिता पूर्णपणे कोलमडली. ती तिथून तड़क हॉस्टेल मधल्या रुमवर गेली. एकांतात हमसाहमशी रडली. दोन दिवस ती कॉलेजमधे दिसली नाही म्हणून मी तिच्या रुमवर गेले. तिने दरवाजा लावून मला सर्व हकीकत सांगितली व ती रडू लागली. मी तिचे सांत्वन करीत तिला गप्प केले आणि “अभ्यासात लक्ष दे, उद्यापासून कॉलेजला ये.” म्हणून समजावले.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला आली. शेवटचे लेक्चर संपले तेव्हा कॉलेज बाहेर पडली तर नेमका त्याचवेळी नीलमच्या हातात हात घालून विक्की समोरून येतांना दिसला. तिला ते सहन नाही झाले. ती रुमवर रडत राहिली. तिच्या बाजूच्या रुम मेट्सनी तिला समजावले. पण तिने विक्की पासून दूर होणे फारच मनावर घेतले होते. रात्रभर ती रडत होती.... आणि पहाटे तीनच्या सुमारास तिने हॉस्टेलच्या टेरेसवरून उड़ी मारली. दुसऱ्या दिवशी मी कॉलेज मधे आले तेव्हा मला कळले. मी हॉस्टेलच्या दिशेने धाव ठोकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या मृतदेहावर सफ़ेद कापड टाकलेले... बघ्यांचा गराडा … त्यांना आवर घालणारे पोलिस..… हे सारं पाहून मी सुन्न झाले. मला तेव्हापासून त्या नीलमचा तिरस्कार वाटतो. त्यानंतर अजूनही रात्री हॉस्टेलवर अधे मध्ये योगिताच्या रडण्याचा आवाज येतो. कुणा कुणाला रात्री-अपरात्री ती हॉस्टेलच्या passage मध्ये दिसते. त्यामुळे तेव्हापासून रात्रीच्या वेळेला हॉस्टेलच्या परिसरात कुणी एकटे फिरत नाही."

"ओह. खूप वाईट झाले, पण मला ती हॉस्टेल मध्ये दिसते हे मात्र पटत नाही." नम्रता स्पष्टच म्हणाली.

"मलाही आधी नाही पटायचे. पण आता हॉस्टेल मधे राहाणारे म्हणतात, तर विश्वास ठेवला पाहिजे बाय्.. निघते मी"

"बाय्.." म्हणत नम्रता हॉस्टेलच्या दिशेला वळली...

त्यानंतर दोन तिन दिवसांनीच नम्रताला सुषमाच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असं वाटू लागलं होतं. वरच्या मजल्यावर रात्री कुणीतरी रडल्यासारखे आवाज यायचे. तिने एक दोनदा वर जायचा विचार केला, पण तिची हिम्मत नाही झाली. पण आज तिने विचार केला होता. काही झालं तरी आज वर जायचंच...

....आणि आज नम्रता वर जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढत होती. सुषमा घाबरून खालीच थांबली होती. वरुन थांबून थांबून हूंदक्यांचा आवाज येत होता. ती दोन चार पायऱ्या चढली असेल तोच पाठून कुणीतरी तिला खेचले. तिच्या छातीत धस्स झाले. दचकून तिने मागे मान फिरवली तर ती सुषमा होती. "सुषमा, तू ना! किती घाबरवलंस आता पण!" ती वैतागून पण दबक्या आवाजात पुटपुटली.

"मग मी काय करू..? मला एकटीला अजून भीती वाटत होती.." सुषमाही तितक्याच दबक्या आवाजात म्हणाली.

"ओके. ठीक आहे..काही बोलू नकोस..माझ्या बरोबर चल." म्हणत नम्रता वर चालू लागली. सुषमाही तिच्या बरोबर चालू लागली. शेवटच्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना टेरेसवर मोठा आवाज झाल्यासारखा वाटला. दोघीही दबक्या पावलांनी वर चढत होत्या. सुषमा घाबरत होती. नम्रता तिला पाठीवर हात ठेऊन धीर देत होती. पण तीही थोड़ी घाबरली होतीच. आता त्या टेरेसच्या दरवाजा जवळ पोहोचल्या होत्या. टेरेसच्या दरवाजाला असलेले कुलूप तोडले गेले होते. दरवाजा उघडाच होता. दरवाजातून त्यांनी काळोखात पाठमोरी पाहिली सफेद चूड़ीदार मधील एक स्त्री.. हळू हळू चालत ती पुढे जात होती. नीता जागेवरच धप्पकन् बसली. तिची बोबडीच वळली. योगिता आता त्यांच्या समोर पुन्हा टेरेसवरुन उडी मारणार होती. ती स्त्री उड़ी मारण्यासाठी टेरेसच्या कठडयाच्या दिशेने चालली होती. ती कठड्याजवळ पोहोचली. तोच नम्रताने हिम्मत केली. धावत जावून तिने तिला पकडले. अंग झटकून त्या स्त्रीने मागे मान फिरवली आणि नम्रता चक्रावून पहात राहिली....ती नीलम होती..

"सोड मला..सोssड..मला योगिता बोलावतेय..." म्हणत ती उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. पण नम्रताची पकड मजबूत होती. नीलम असहाय्य पणे हमसाहमशी रडू लागली...

"कूल..कूल...नीलम..तू आधी खाली चल पाहू" म्हणत नम्रताने तिला जबरदस्तीने मागे ओढले. टेरेसच्या दरवाजाजवळ असलेली सुषमा आता जरा सावध झाली होती. पण अजून ती संभ्रमातच होती. निलमला घेऊन नम्रता खाली उतरत होती...आणि सुषमा गोंधळून त्यांच्या मागून उतरत होती…

"का वाचवलंस मला....मला जगण्याचा काही अधिकार नाही..." नीलम हुंदके देत होती.

"मला नीट सांग…..काय प्रकार आहे...?" तिच्या खांद्यावर सहानुभूतीने हात ठेवत नम्रताने विचारले.

"योगिता आणि विक्कीचे प्रेम होते याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. विक्कीबरोबर माझे नाते जुळल्याचे योगिताला माहीत पडल्यावर विक्कीने तिला उडवून लावले. ती विक्कीच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की विक्कीने केलेली प्रतारणा ती सहन करू शकली नाही म्हणून तिने टेरेसवरुन जीव दिला. तिच्या आणि विक्कीच्या संबंधा बाबत तिच्या आत्महत्येनंतरच मला कळलं. तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या विक्कीशी असलेले संबंध मी त्याच दिवसापासून तोडले. पण माझं मन मला खाऊ लागलं. मला तिचा मृत्यु आठवून रडू येऊ लागलं. मला रात्री अपरात्री तिचे भास होऊन मी दचकून उठू लागली. कधी कधी ती मला passage मधे दिसू लागली. टेरेसवर बोलावू लागली...आजही ती मला दिसली..मला टेरेसवर बोलावत होती..मी तिच्या मागे मागे टेरेसवर गेली.." असे म्हणता म्हणता तिने रुमच्या बाहेर पाहिले."ती बघ..ती बघ ..योगिता मला बोलावतेय..." म्हणत ती बेडवरुन उठली. रुमबाहेर निघायचा प्रयत्न करू लागली. नम्रताने तिला गदागदा हलवले.

"शांत हो नीलम, शांत हो..कोणी नाहीय तिथे..कळलं?" नम्रताने तिच्या पाठीवरून सहनुभूतीने हात फिरवला.

"हे बघ नीलम,जे काही घड़लं त्यात तुझा काही दोष नव्हता..तू मनाला जास्त लावून घेतल्याने असं होतयं..दिवसरात्र तू तोच तोच विचार करत बसल्याने तुला आजुबाजुला योगिताच दिसतेय..."

नीलम आता भानावर आली होती. तीने नम्रताला मिठी मारली आणि ती पुन्हा जोराजोरात रडू लागली. आता तिने कोंडलेल्या आसवांना वाट मोकळी करुन दिली होती. तिच्या आसवांनी नम्रताची पाठ ओली होऊ लागली होती. एव्हाना सुषमाही तिथे पोहोचली होती.

"नीलम, मला समजलंय सगळं.. तुझा यात काही दोष नाही.." असं म्हणत सुषमाही तिची समजूत काढू लागली


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller