Prakash Patil

Crime Horror Thriller

4.0  

Prakash Patil

Crime Horror Thriller

समुद्र किनार्‍यावरची गडबड

समुद्र किनार्‍यावरची गडबड

6 mins
2.0K


परीक्षेचे दिवस होते. गणेश बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला होता. परीक्षेला एक आठवडा बाकी असताना कॉलेजचे लेक्चर्स बंद होते, म्हणून गणेश वसईतून छोट्या काकांकडून त्याच्या गावी-पालघर शिरगावला आला होता. रात्रीच्या शांततेत अभ्यासात चांगले मन लागत होते म्हणून तो रात्री जागून अभ्यास करायचा. अशाच एका रात्री तो अभ्यास करत होता. पहाटे दीडच्या सुमारास त्याला लघवीला आले म्हणून तो मोरीत गेला. मोरीच्या खिडकीतून त्याची नजर बाहेर रस्त्यावर गेली आणि तो दचकला! समोरचे दृष्य पाहून तो थरथरला. एक बाई डोक्यावर घमेले घेऊन चालत होती आणि त्या घमेल्यातून आगीच्या ज्वाला निघत होत्या. मिट्ट काळोख होता. पण रस्त्यावरील विजेच्या खांबावर छोटा दिवा होता. त्याच्या प्रकाशात तिचे पांढरेफटक शरीर त्याला स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच ती अमानवी वाटत होती. इतके दिवस गावात रात्री एका बाईचे भूत फिरत असल्याची वदंता होती. म्हणून रात्री-अपरात्री गावातील लोकांनी बाहेर फिरायचे बंद केले होते. गणेशसुद्धा त्या भुताबद्दल ऐकून होता आणि आज त्याला प्रत्यक्ष ते भूत दिसत होते. तो घाबरून मोरीतून बाहेर आला. खुर्चीवर बसून त्याने पुस्तक उघडले. पण आता त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर ती सफेद कपड्यातली, सफेद शरीराची बाई दिसत होती. त्याने पुस्तक मिटले व तो झोपायच्या खोलीत गेला. अंगावरून चादर घेतली तरी त्याच्या डोळ्यांसमोर ती बाई येत होती. कसाबसा तो झोपी गेला. 


सकाळी उठल्यावर तो मोठ्या काकांना रात्री पाहिलेल्या भुताबद्दल सांगू लागला. 

"काका, गावात ज्या भुताबद्दल चर्चा आहे ते भूत रात्री मला दिसले!"

"बाप रे ! पण त्या भुताने पाहिलं नाही ना तुला?" काकाने काळजीने विचारलं. 

"नाही काका, मी मोरीत होतो. मोरीच्या खिडकीतून मी त्या बाईचं भूत समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जाताना पाहिलं!"

"तसा त्या भुताने अजून कुणाला त्रास दिला नाही आणि त्या भुताच्या वाटेलाही कुणी गेलं नाही! आपणही त्याच्या वाटेला न गेलेलंच बरं! नशीब तूला लांबूनच दिसलं म्हणून!"

"खूप भयंकर दिसत होती ती बाई... आणि तिचं शरीर सफेद होतं. मी झोपतानासुद्धा डोळ्यांसमोर येत होती. खूप घाबरलो होतो मी." गणेश म्हणाला.

"तू रात्री अभ्यास करत बसत जाऊ नको. उगीच दचकलास तर ताप-बीप यायचा!" 

"नाही काका, मी आजही बसणार आहे. मी रात्री घाबरलो होतो, हे खरं आहे. पण सकाळी उठल्यावर मी विचार केला. भूत-बित काही नसतं. हा काहीतरी वेगळा प्रकार असावा." गणेश ठामपणे म्हणाला. 

"पण असं कोण का करील? भुताची भीती दाखवून अजून कुणाला लुटलं गेलं नाही. कुणाला काही त्रास झाला नाही. हा, फक्त लोक घाबरून रात्री बाहेर पडायचे बंद झालेत!" असं म्हणत काकांनी त्याच्या म्हणण्याला असमंती दर्शवली. 

"काका, तुम्ही काय म्हणालात- रात्री लोक बाहेर पडायचे बंद झालेत. बरोबर?" त्यांच्याच बोलण्याचा धागा पकडून गणेशने विचारलं. 

"हो, मग?"

"तर मला असं वाटतं, जो कुणी हे करतो आहे त्याचा उद्देश हाच असावा, की लोकांनी रात्री घराबाहेर पडू नये. म्हणजे त्यांना त्यांचे काम सुरळीत पार पाडता यावं!" गणेशने संशय व्यक्त केला. 

"पण रात्री त्यांचं असं काय काम असावं?" काकांनी प्रश्न केला. 

"तेच तर आपल्याला शोधायचं आहे!"  

"आपल्याला म्हणजे?"

"तुम्हाला आणि मला!" गणेश उत्तरला. 

"नाही, नाही! आपण कशाला उगीच खाजवून खरूज काढायची! त्यांना काय करायचं ते करू दे!" काकाने गणेशचा विचार एकदम झिडकारून लावला. 

"आणि हा केवळ तुझा संशय आहे. ते जर खरोखरच भूत निघालं तर!" ते पुढे म्हणाले. 

"काका, आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर जागे राहा! हवं तर तुम्ही लवकर झोपा. मी तुम्हाला एक वाजता उठवतो. पहाटे एक ते दोनच्या सुमारास ती बाई इथून जाते. आपण तिच्या नकळत तिच्या मागे मागे जायचं!" गणेश त्याच्या विचारावर ठाम होता. 

"ठीक आहे, रात्रीचं रात्री ठरवू!" असं म्हणत काकांनी वेळ मारून नेली आणि ते स्वयंपाकघराच्या दिशेने चहा घेण्यासाठी वळले. 


रात्री जेवल्यानंतर गणेश अभ्यासाला बसला. पण त्याला एकेक मिनिट एकेक तासासारखा वाटत होता. कधी एकदाचा एक वाजून जातो असे त्याला झाले होते. काकांच्या घोरण्याचा अस्पष्टसा आवाज त्यांच्या खोलीतून येत होता. एक वाजल्यावर तो काकांना उठवणार होता. आज काही करून त्याला त्या भुताच्या रहस्याचा शोध घ्यायचा होता. मात्र काकांचे सकाळचे म्हणणे आठवून त्याला एक अनामिक भीतीही वाटत होती - जर ती बाई खरोखर भूत असली तर काय होईल, म्हणून! समजा, ती बाई जर भूत नसेल, तरीही तिच्या मागेपुढे कुणीतरी असण्याची भीती होतीच! त्यामुळे अत्यंत सावधगिरीने पाळत ठेवत तिचा मागोवा घ्यायला हवा, हे त्याने ठरवले होते. स्वयंपाक घरातील एक धारदार चाकू कापडात गुंडाळून त्याने हाफ पॅन्टच्या आत दडवून ठेवला होता. एक मसाल्याची पुडीही त्याने खिशामध्ये तयार ठेवली होती. मामा हातात जाडजूड भरीव दंडुका घेणार होता. इतकी सारी तयारी झाली होती. पण वेळ काही पुढे सरकत नव्हती.


कंटाळा आला म्हणून त्याने पुस्तक मिटून ठेवले. घड्याळात पाहिले. साडेअकरा वाजले होते. अजून अवकाश होता. त्याने टीव्ही ऑन केला. सोनी टीव्हीवर नेमकी कुठलीशी हॉरर सीरीयल सुरु होती. एका बाईचे भूत रस्त्याने जाताना दिसते. तिच्या मागेमागे एक माणूस लपतछपत चाललेला असतो. अचानक तो ओरडतो. त्याला पाठून कुणीतरी अलगद उचललेले असते. त्याचवेळी गणेशला त्याच्या मागेही काहीतरी हालचाल जाणवली. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने घाबरून मागे पाहिले. ते काका होते. गणेशला हायसे वाटले.

"काका, काय घाबरलो मी!" गणेश अजून थोडा कापत होता.

"इतकं दचकायला काय झालं?" 

"या टीव्ही सीरीयल मधला माणूस एका भुताच्या पाठीपाठी चालला होता. त्याला मागून दुसर्‍या भुताने अलगद वर उचलले. ते बघा!" म्हणत गणेशने टीव्हीकडे बोट दाखवले. काकाही इंटरेस्ट घेऊन पाहू लागले. 

"गणेश, साला आपल्या बाबतीत तर असं होणार नाही ना?" काकांनी शंका काढली. 

"नाही काका, हे सीरीयलवाले असेच दाखवतात काहीबाही. प्रत्यक्षात भूत नसतेच!"

"तरीही तू घाबरलास ना!"

"शेवटी माणूसच आहे मी. हॉरर टीव्ही शो पाहण्यात गुंग असताना तुम्ही अचानक मागून आलात, तर दचकायला होणारंच ना! पण आपण दोघे एकत्र असताना भीती नाही वाटणार. माणसाला एक-दुसऱ्याचा आधार असतो!"

"हे बाकी खरं आहे गणेश तुझं!" म्हणत काकाने त्याची पाठ थोपटली. 


बरोबर बारा वाजता ती भुताची सीरीयल संपली. हॉलमधल्या अजंटा घड्याळात बाराचे ठोके पडले. त्याचवेळी काकांना खिडकीतून बाहेर काहीतरी हालचाल दिसली. "गणेश..." काका दबक्या आवाजात म्हणाले. गणेशने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी खिडकीतून बाहेर बोट दाखवले. एक बाई रस्त्याने जाताना दिसत होती. तिच्या डोक्यावर घमेले आणि घमेल्यात आगीच्या ज्वाला... 

"काका ही तीच बाई आहे, जी मला काल दिसली होती. चला चला लवकर तिचा पाठलाग करू या." म्हणत तो काकांना घेऊन घराबाहेर पडला. तिला दिसणार नाही अशा रीतीने ते दोघे तिच्यामागून चालत होते. एक बरे होते, की चालताना ती बिलकुल मागे पाहात नव्हती. समुद्र किनार्‍यापासून काही अंतरावर एक पडका किल्ला होता. आता ती त्या किल्ल्याजवळ पोहोचली होती. किल्ल्याच्या बाजूने समुद्र किनार्‍याकडे जाणार्‍या रस्त्याने ती निघाली. चालतचालत ती समुद्र किनार्‍यावर पोहोचली. गणेश आणि काका तिच्यापासून थोडे अंतर राखून चालत होते. किनाऱ्यावर एक जुनी मोडकी होडी होती. ते दोघे त्या होडीच्या आडोशाला वाकून उभे राहून समोर पाहू लागले. त्यांना तिथे काहीतरी हालचाल दिसत होती. त्यांना एक कार दिसली. एव्हाना ती बाई त्या कारजवळ पोहोचली होती. तिने ते आगीचे घमेले खाली ठेवून विझवले आणि ती कारमध्ये बसली. त्यांना समुद्रात किनाऱ्यालगत एक बोट उभी असलेली दिसत होती. किनाऱ्यावरून काही माणसे त्या बोटीच्या दिशेने छोट्या बोटीतून जाताना दिसली. पाचच मिनिटांनी मोठी बोट सुरू झाल्याचा आवाज आला. समुद्र किनार्‍यावरुन ती कार पुढच्या बाजूने निघून गेली. 


त्यानंतरची रात्र.

वेळ : पहाटेचे दोन वाजलेले. ठिकाण : तोच समुद्र किनारा, पात्रे : कालचीच! 

पण या वेळेस अचानक धावपळ सुरू होते. किल्ल्याच्या व पलीकडच्या अशा दोन्ही बाजूने पोलीस निरीक्षक पुंडलिक ताठे यांची टीम व सागरी पोलीस पथक त्या सर्वांना घेरते. कारमधून आलेले तीन इसम, ती बाई या सर्वांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. बोटीच्या दिशेने पळून जाणार्‍या इसमांनाही पकडले गेले. अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांच्या तीन जीप समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाल्या. पोलिसांनी एका जीपमधे सर्वांना कोंबले. ही सगळी कारवाई इतकी पटापट झाली, की त्या इसमांना सावध व्हायला वेळच मिळाला नाही. गणेश आणि काकाही पोलिसांच्या चपळाईने अवाक झाले. 


निघता निघता पोलीस निरीक्षक ताठे गणेश व काकांच्या जवळ आले. त्यांनी दोघांशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, 

"आभारी! नागरिकांनी अशी सतर्कता दाखवली तरच गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळते. तुम्हा दोघांचे खूपखूप आभार! तुमच्यामुळेच ही मूर्ती तस्करी रोखता आली. यात सोने, चांदी, अष्टधातू, तांबा-पितळेच्या अनेक मूर्ती आहेत. तुमचा योग्य तो सन्मान करण्याची शिफारस मी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे करणार आहे. सकाळी पोलीस स्टेशनला या. आपण निवांत बोलू!"

त्यांनी गणेशाची पाठ थोपटली. पुन्हा एकदा दोघांना नमस्कार केला आणि ते जीपच्या दिशेने वळाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime