कुटुंब!
कुटुंब!
शांतारामने समोरच्या आरश्यात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली. अंगावरचा सफारी, त्याच्या पोक्त वयाला शोभून दिसत होता. त्याने समाधानाने मान डोलावली. या सफारीच काम तंबाकूसारखं असत, तंबाकू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसणवट्यापर्यंत कुठेच वर्ज्य नसते, तसेच सफारीच असतं. सफारी घाला डोक्याला, फेटा बांधून वरातीत नाचा, नाहीतर टापशी बांधून मयतीत सामील व्हा! सगळीकडे शोभून दिसते. म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो.
तसे शांताराम आणि 'काम' यांचं व्यस्त प्रमाण आहे. पण पोटाची 'आग' आणि घशाची 'कोरड' त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पडते. शांताराम सडाफटिंग माणूस, बायको असती तर, चार घरची धुणीभांडी करून, त्याच्या पोटा'पाण्या'ची सोय तिने केली असती. पण दैव आड आलं, त्याच्या 'कामगिरी'च्या लौकिकाने, लग्नाची दार बंद करून टाकली होती! पोटापाण्यासाठी बिचाऱ्याला चोऱ्या कराव्या लागायच्या, आणि चोराला बायको कोण देणार? पण त्याला त्याचे आता काहीच वाटत नव्हते. घर-बार, बायका-पोरं, संसार, यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता.
कोणीतरी धनदांडगा, काही गरीब कुटुंबातील काही पोरींचे लग्न लावून देण्याच्या निमित्ताने, स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे, गावभर लागलेले फ्लेक्स बोर्ड सांगत होते. शांतारामला ही संधी खुणावत होती, आणि ती तो सोडणार नव्हता! काही माल तर हाती लागणार होताच, वर गोडाचे जेवण! बोनस.
०००
भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मट चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कटआऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी... वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीनघाई, माणसांची वर्दळ, तेच ते. फेटे बांधणारा, वन बाय टू करून फेटे बांधत होता. बगलेत कोऱ्या फेट्याच्या चावडी घरून जवळच एक पोऱ्या उभा होता. शांतारामने लगबगीने फेटेवाल्यासमोरची खुर्ची गाठली.
"कोण?" फेटेवाल्याने विचारले.
"मामा!"
"पर कुणाचा?"
"गौरीचा!" बाहेरच्या बोर्डावर वधूवरांची नावे होती. त्यातलं एक नाव शांतारामाच्या लक्षात आले.
फेटेवाल्याने टरटर एक फेट्याचे कापड फेडलं, आणि फरफर त्याच्या डोक्याला गुंडाळले. त्या गुलाबी फेट्यात शांताराम ऐटबाज दिसत होता! चला, हा फेटा एकदा का डोक्यावर चढला की, माणूस व्ही आय पी सारखा मांडवभर फिरू शकतो! हे शांतारामला ठाऊक होते. प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू असलेल्या कनातीत मारली. मोठ्या जर्मनच्या पातेल्यात, चार बोटं तेलाचा तवंग असलेली वांग्याची रस्सा भाजी रटरटत होती. आसमंतात त्याच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता. त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला! तो तेथून बाहेर आला. त्या कनातीला लागूनच काही खोल्या सारखे आडोशे उभारले होते. बहुदा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी. एका आडोशाच्या खोलीत त्याने डोकावून पहिले. कोपऱ्यात एक लोखंडी पत्र्याची ट्रंक होती. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो थरारला! मायला काहीच न करता पकडलो गेलो!
"मामा, बबिता दिसली का वो?" त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले.
"बबिता! हो-हो, आत्ताच तिकडं किचनकडं दिसली होती!"
ती पोरगी उड्या मारीत निघून गेली. आणि एक दांडगा माणूस त्याच्याच रोखाने आला. त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या फक्क खळीच्या शर्टावरून, तो या कार्यक्रमातील एक कार्यकर्ता असावा, हे शांतारामाच्या लक्षात आले.
"पाव्हणं, हित काय करताय, तिकडं लगीन लागायची दंगल उसळली हाय! चला!"
"आहो, इथं कोणीतरी पाहिजे. सगळे लग्नात गुंतले तर, या सामानाकडे कोण लक्ष ठेवणार?"
"हा! ते बी खरंच की! असल्या पब्लिकच्या कारेक्रमात चोट्टे घुस्त्यात! तुमी ठिवा नजर. मी जातो मांडवात!"
तो टोणगा दूर गेला तसे शांतारामला हायसे झाले. ट्रंकेच्या किरकोळ कुलपाने शांतारामला फारशी आडकाठी केली नाही! आत चार साड्याखाली, एक चार बांगड्या, कानातले आणि एक आंगठी त्याच्या हाताला लागली. बस झालं! फार हाव करण्यात मतलब नव्हता. वाहातं ठिकाण होतं. कधीही कोणीही टपकू शकणार होते. सटकावे हे उत्तम. तो झटक्यात बाहेर पडला.
मांडवात लग्नाचे विधी चालू होते. एका ओळीत चार सहा नवरा - नवरी समोरच्या हवनकुंडात, गुरुजी सांगतील त्या गोष्टीची आहुती देत होते. तो एका जोडप्यापाशी थांबला. त्याचे लक्ष जमिनीकडे गेले. त्याच्या पायाजवळ नव्याकोऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस पडली. जी बाई ते सांभाळत होती. ती जरा बावळट असावी. समोर दागिने ठेवून मागे तोंड करून, मागच्या बाईस, आपला नवरा कसा नालायक आहे, हे पटवून देत होती. अलभ्य लाभ! शांतारामने तेथेच बसकण मारली.
"कन्यादानासाठी कोण आहे?" गुरुजींनी चौकशी केली.
आसपास कुजबुज वाढली. कोणी पुढे येईना. बहुदा मुलीला बाप नसावा. कोणाचे तरी, जवळच बसलेल्या शांतारामकडे लक्ष गेले.
"हे, हे काय, हे करतील कन्यादान. ओ, सफारीवाले या असे म्होरं! घ्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून!"
सगळ्यांच्या नजरा शांतारामाकडे वळल्या. नाईलाजाने शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला. मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं. कुंदाचा मामा आडवा आला नसता तर, आपलेही लग्न झाले असते, आणि आज आपलीही मुलगी, या समोरच्या नवरीच्याच वयाची असती. असेच तिचे कन्यादान मी केले असते! अंगाखांद्यावर खेळलेलं कोकरू, कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हाती सोपवताना... त्याचे डोळे भरून आले. ओल्या डोळ्याकडे हात नेताना, तो मध्येच थांबला.
"गौरे! तुझं मंगळसूत्र?" ती मघाची बाई नवरीकडे पाहात किंचाळली!
ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिश्याकडे पहात होती!
शांतारामने खाली मान करून खिश्याकडे पहिले. त्यातून, मघाशी घाईत वरच्या खिशात सरलेल्या दागिन्यातल ते मंगळसूत्र, अर्धे खिश्याबाहेर लोंबत होते. खिसा खालून उसवल्याचे शांताराम विसरला होता!
क्षणात गलका झाला.
"चोर! चोर!!"
लोक शांतारामवर तुटून पडले. लाथा -बुक्क्या -पुरुष -बाया जमेल तो, मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागला.
"थांबा! समदे थांबा!" नवरी जिवाच्या आतंकाने ओरडली.
क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले.
"आता जीव घेता का तेचा? पोलिसांना बोलवा!"
"असल्या भाड्याचा मारून भुगा कराया पायजेल!"
"आर, कायदा हाती नगा घिवू! मी मनते तेच करा!"
तोवर पोलीस आलेच! पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले. त्याचा मघाचा फेटा दूर विस्कटून पडला होता. सफारीच्या चिंध्या अंगावर लोंबत होत्या. त्यातून त्याची कळकट, भोकपडकी बनियान दिसत होती. तो खाली मान घालून उभा होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली. सगळे दागिने जप्त केले.
"या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का?" त्यांनी गौरीला विचारले. तिने एकदा त्या दागिन्यांकडे निरखून पहिले.
"व्हय! माझेवालेच हैत!"
"तुमचे आज लग्नविधी झाल्यावर, ठाण्यावर येऊन या भामट्याच्या विरोधात तक्रार नोंदवा. तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो! लग्न येथे लागलंय, आहेर आम्ही याला देतो!"
"तेचि गरज नाही! माझी कायपन तक्रार नाही! सोडा त्यास्नी!" गौरी निग्रहाने म्हणाली, तेव्हा शांतारामसगट सगळेच जण बुचकळ्यात पडले.
'काही तक्रार नाही! मुद्देमाल सापडून!'
"आता तुमची काही तक्रारच नसेल तर, याला सोडावे लागेल. तुमच्या अशा भेकड वागण्यानेच, या चोरांची हिम्मत वाढते! हे मात्र लक्षात घ्या!" पोलीस निघून गेले. मांडवभर भयाण शांतता पसरली.
"पोरी, का वाचवलंस मला?" अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामने गौराला विचारला.
"बाबा, मी अनाथ पोर हाय! 'बाप' काय ऱ्हायतो ठाव नव्हतं! तुज्या डोळ्यातला वलावा बघितल्याव, उमगलं मला बापाचं काळीज! त्या घडीपुरता का व्हईना तू माझा बा व्हतास! त्या तुज्या डोळ्यातला 'बाप' खरा व्हता, घटकाभर मी तुझी लेक झाले व्हते! तुजे उपकार फिटायचं न्हाईत मज्यान! एक लेक मनून माजं जे काय, कर्तव्य व्हतं ते म्या केलंय! काय लयी मोठ उपकार नाय केलेत! आता, जा बाबा तू तुज्या वाटंनं!"
शांताराम खाली मान घालून निघाला. चार पावलं गेला नसेल.
"गौरे! दिवाळसनाला ये! जावायला घेऊन! ह्यो बाप वाट बगन!" मान मागे वाळवून शांताराम म्हणाला.
...आणि तेथे एक 'कुटुंब' जन्मास आले!