कॉस्ट बेनिफिट अनालिसिस!
कॉस्ट बेनिफिट अनालिसिस!
सासूची कटकट कोकणात रवाना करण्यात स्वीटीला यश आल्याने, ती मोठी खुशीत होती. म्हातारीची नुसती पिरपिर असायची. आता सगळ्या कामाला एक बाई लावली, कि मग सोशल ऍक्टिव्हिटीजसाठी सवड मिळणार होती. सोशल म्हणजे तेच, कधी किटी पार्टी, कधी बियर पार्टी अँड सो सो! म्हातारी असताना या गोष्टी, घरी करता यायच्या नाही. हॉटेलात खूप पैसे लागतात. कॉस्ट -बेनिफिट अनालिसिस केलं, तर नुकसानीतच पडतात असले इव्हेन्ट! आता तुम्हाला पण, कल्पना असेलच कि! वेगळं काय सांगायचं? शाम्भवीने परवाच एक स्मार्ट, चुणचुणीत पोरगी सजेस्ट केली होती. पोक्त बाया मिळतात, पण त्या डिशेश घेऊन आल्याकी, खूप लो वाटत! म्हणून त शाम्भवीला सांगून ठेवलं होत!
आणि आज ती मेड येणार आहे. तिचीच वाटच पहात होती.
डोअरबेल वाजली. तिने दार उघडलं. वॉव! कसली क्युट आहे?
"ये! तुझीच वाट पहात होते."
"थँक्स मॅडम!" म्हणत ती ग्रेसफुली दारातून आत आली.
"बोला, काय- काय काम करावं लागेल?"
"मोलकरणीस जी करावी लागतात ती सगळी!"
"तस मोघम नका! स्पष्ट बोललेलं बर असत!"
"ते हि ठीकच आहे. पुन्हा कटकट नको!"
"तेच तर!!"
वुड बी मोलकरणीने मोबाईल काढला. त्यातील कॅल्क्युलेटर ऑन केला!
"धुणी -भांडी, झाडू पोछा!"
"पोछा रोज? दोन दिवसाला? का विकली?" तिने विचारले.
"म्हणजे? रोजच!"
"नाही म्हणजे त्यावर माझे चार्जेस अवलूंबून असतात! पोछा रोज! ओके! पुढे?" तिने कॅल्कुलेटरवर आकडा ऍड केला.
"स्वयंपाक येतो?"
"एस! भारतीय कि कॉंटिनेंटल लागेल? व्हेज का नॉनव्हेज?"
"म्हणजे? सगळंच येत तुला?"
"नाही! पण मी मॅनेज करीन! कोण करतंय, या पेक्षा काय खायचं, हे फक्त तुम्ही सांगा!"
"दॅट्स रियली स्मार्ट! ओके! रोज व्हेजच. प्रसंगी नॉनव्हेज, त कधी चायनीज!मी सांगेन."
"मॅडम, त्या 'प्रसंगीक जेवणाचे' चार्जेस आपण वेगळेच ठेवू. कारण ते कधीतरी लागणार. तेव्हड्या पुरत करता येईल. तश्या प्रसंगी, रोजच्या व्हेज चे चार्जेस मी कमी करत असते! माणसानं कस, व्यवहाराला स्वच्छ असावं!"
वा! क्या बात है? स्वीटीला त्या पोरीचा मुक्का घ्यावासा वाटला! काय सालस आहे? तुलाच फायनल करते ग बाई!!
"चालेल!"
"जेवण म्हणजे, लंच का डिनर?"
"दोन्ही आणि ब्रेक फास्ट सुद्धा!"
ती भरा भरा आकाडे ऍड करत होती. तेव्हड्यात स्वीटीला काही तरी आठवले.
"काय ग, तू आमच्याकडेच जेवणार ना?"
"नाही मॅडम! माझा डब्बा मी घरूनच आणणार! येथे जेवलेतर त्याचे, पुन्हा तुम्ही पैसे कट करणार!"
या पोरीला आपल्या मनातलं, कस कळालं असेल? याचे स्वीटीला नवल वाटले.
"आग, तस नाही! पण आमच्या सोबत जेवलीस, तरी हरकत नाही, असं मला म्हणायचं होत!"
"हो, तर मला ते माहित आहे! मॅडम, अजून एक, रविवार सुट्टी असेल. आणि शनिवारी लंच करून निघून जाईन. आजारपण, किंवा इतर कारणांनी, नाही आले तरी डेली मिनिमम चार्जेस पाचशे चालू रहातील. ह्या माझ्या काही 'रिक्वेस्ट', आपण मान्य कराल हि आशा आहे!"
"आग मान्य आहे! इतकी काही आम्ही माणुसकी सोडलेली नाही, हो! पण सकाळी तू किती वाजता येणार? मला न सकाळी नऊला ब्रेकफास्ट लागतो!"
"
मॅडम, मी शार्प नऊला दारात असेन! नऊवीसला ब्रेकफास्ट आणि कॉफी तुमच्या टेबलवर असेल!"
"ठीक! पण तूच साडे आठला ये ना! म्हणजे बर होईल!"
"सॉरी! नाही जमायच, मॅडम! माझ्या सासूला पॅरालिसिस झालाय! तीच सगळं करून, सकाळचा माझा, मुलांचा आणि नवऱ्याचा डब्बा करून, मला घरून निघायला आणि येथे पोहचायला हीच वेळ होईल!"
"ये! ये! काढीन कशीबशी वेळ! वीसच मिनिटाचा तर प्रश्न आहे! पण किती घेशील महिन्याला?"
"दहा हजार जेवणाचे, पाच हजार ब्रेकफास्ट आणि चहा/कॉफी, भांडी एकहजार, झाडू -पोछा पंधराशे, कपडे धुणे- अर्थात वॉशिंग मशीन मध्ये पाचशे, इतर नॉनव्हेज आणि प्रासंगिक, वेगळे चार्जेस! असे महिन्याला फक्त, आठरा हजार!"
स्वीटीच्या तोंडाला कोरड पडली!
"मॅडम! काळजी करू नका! बावळटपणा करणार नाही. तुमचं स्टेट्स, असं संभाळीन कि तुमच्या मैत्रिणी तुमचा हेवा करतील! एक संधी देऊन पहा. मी माझे चार्जेस तुम्हाला फॉरवर्ड केलेत. आता निर्णय तुमच्या हाती आहे! माझी हि ऑफर बहात्तर तास ओपन असेल. त्यानंतर या अटीवर, मी अव्हेलेबल असेलच असे नाही. तेव्हा तुमच्या निर्णयाची मी वाट पाहीन! हवे ए नाईस डे!"
ती, जशी ग्रेसफुली आली होती, तशीच ग्रेसफुली निघून गेली!
स्वीटीने मोबाईलवर तिने पाठवलेला चार्जेसचे आकडे तपासून पहिले. ज्यास्तीचा एक पैसाही, तिने लावला नव्हता. आजूबाजूला याच रेंजचे चार्जेस चालू होते!
स्वीटीने कॉस्ट - बेनिफिट अनालिसिस केलं.
आणि शेवटी स्वीटीने निर्णय घेतला!!
तिने मोबाईल काढला. फोन लावला.
"आई, मी बोलतीयय! अहो, कधीची तुम्हाला फोन करीन म्हणतीयय, पण मेली रेंजच मिळत नाही! तुमची शेतीची काम झाली का? आहो, बिट्ट्या तुमची खूप आठवण काढतोय! 'आजी कधी येणार?' म्हणून धोसरा काढलाय! नाही तरी, त्याला तुमचा लहानपणा पासूनच लळा आहे, हो! तुमच्या सारखा बेसनाचा लाडू करून दे, म्हणून काल किती तरी वेळ रडत होता!"
"अग, मग दे कि करून? किचन ओट्या खालच्या कप्प्यात बेसनाचं पीठ आहे. तुपात परतून---"
"अहो, नाही जमायचं मला! आणि तुमच्या हातची चव पण नाही यायची! वेलची घातलेला बेसनाचा लाडू तुम्हीच करू जाण!"
"तस काही नाही. तू कर प्रयत्न, जमेल कि तुला हि!"
"नकोच! तुम्हीच सांभाळा ते किचन! आता, या बघू परत! बिट्ट्या ऊण खातोय! लेकरू रात्री चांगलंच तापलं होत! झोपेत 'आजी -आजी करतंय! मी परवाच तिकीट काढती आहे. दिन्याच्या सायबर कॅफेतून प्रिंट घ्या काढून! शेखरला पाठवतीयय स्टेशनवर तुम्हाला घ्यायला!"
म्हातारी 'होय' 'नाही' काही म्हणायच्या आत तिने फोन बंद केला!
म्हातारी, कॉस्ट - बेनिफिट अनालिसिसच्या आकडेवारीनुसार, त्या स्मार्ट कामवालीपेक्षा परवडणारी गोष्ट होती! बिट्ट्याचं, म्हणजे नातवाच आमिष तिला, कोकणातूनच काय, मसणातून खेचून आणायला पुरेसा होत! वर 'आम्ही तुम्हाला संभाळतोय!' या उपकारच ओझं तिच्यावर पडू द्यायचं! नाही, म्हणजे तस आधन मधनं टच करायचं असत म्हणा! बाकी छछोर सूनांन सारखा, हेकटपणा करून, सासू तोडून टाकण्यात काय 'बेनिफिट' असतो?
आता तुम्हाला तर सगळं माहीतच आहे म्हणा! वेगळं काय सांगायचंय?
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.