Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Suresh Kulkarni

Tragedy Others


4.4  

Suresh Kulkarni

Tragedy Others


प्रल्हाद!

प्रल्हाद!

12 mins 487 12 mins 487

'त्यात काय अवघड आहे?' हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली. 

गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी 'आमची' नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी 'पासबुक रायटर' म्हणून टेम्पररी(आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. गाव छोटस होत, येथेच मी लहानाचा मोठा झालो होतो, शाळा कॉलेज इथलंच.


बँकेतल्या एका कोपऱ्यात, मला एक जुनी टेबल, खुर्ची आणि टेबलची दोन्ही ड्रॉवर भरून पासबुक (अपडेट करण्यासाठी) दिली होती. आमच्या बँकेतल्या लोकांचं आणि त्या काळच्या डॉक्टरांचं अक्षर सारखंच असायचं! ('सुरश्या, तुझ्या बँकेच्या पासबुकात पाहून केमिस्ट औषध देताना मी काल पाहिलं! आई शपथ!' शाम्या एकदा मला, टॉवर जवळ चहा पिताना म्हणाला होता. श्याम्या डॅम्बीस आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष्य देत जाऊ नका.) काय सांगत होतो तर -बँकेतल्या लोकांचं अक्षर. मला त्यांनी लिहलेले फक्त टू आणि बाय इतकंच समजायचं. त्यामानानं माझं अक्षर खातेदारांना 'मोत्या सारखं' वाटत असे. अस्तु. 


दोन एक महिने हे पासबुक लिखाण सुरु असताना, हळूच ट्रांस्फर स्क्रोल, मग बिलाचे गट्ठे (तेव्हा बँकेत बिल आणि हुंड्याचा खूप मोठा व्यवसाय होता.) माझ्याकडे आमचे सहकारी पास करू लागले.(म्हणजे चेपू लागले.) मला B.Sc.ला लॅब मध्ये थांबून काम करायची सवय होती. मी तक्रार केली नाही. तसही फार काळ मला येथे काम करता येणारच नव्हते. नवीन क्लार्क आला कि मला माझं चंबू-गबाळ उचलावंच लागणार होत. 

आणि तो दिवस अचानक उगवला. 

"मॅनेजर कुठाय?"

मी मुंडी खाली घालून एका कॅश-क्रेडिट खात्याचा लाल शाईने बॅलन्स काढताना मला कोणी तरी म्हणाले. 

"कशाला?" मी डोकवर करताना विचारले. 

"जॉईन व्हायला आलोय!" 


मी त्या रापलेल्या पण, किंचित बोबडा वाटणाऱ्या आवाजाच्या मालकाकडे पहिले. टोन उस्मानाबादी! पाच फुटी लाकडाला खारफुटी सारखे हातपाय फुटलेले. चौकोनी डोकं खपटाच्या खोक्या सारखं. राठ -दाट कुरळेस्ट केस! पण अंगावरची सफारी मात्र आमच्या मॅनेजर पेक्ष्या भारी! ओठ, पोपटाच्या चोंची सारखे काळपट लाल! तोंडात पान आणि सुगंधी तंबाखूचा उग्र वास! माझ्यापेक्षा दोन एक वर्षांनी मोठा असावा.

सगळंच संपलं! माझे दिवस संपलेच होते. 

मी त्याला मॅनेजरच्या केबिन मध्ये घेऊन गेलो. 

"एस आर.?" तेव्हा इनिशियलने हाक मारायची पद्धत होती. आजही पन्नास वर्षानंतर, मला माझे बँकेतील मित्र याच नावाने ओळखतात! फक्त एक अपवाद आहे!

मॅनेजरच्या डोळ्यातला प्रश्न मला कळला. 


"हे जॉईन होण्यासाठी आले आहेत!"तोवर त्याने, खिशातले चुरगळले पोस्टिंगचे पत्र, साहेबांच्या टेबलवर ठेवले. माझी चुळबुळ साहेबांच्या नजरेतून सुटली नाही."का रे, काही बोलायचंय का?" त्यांनी मला विचारले."सर, हे आता आले आहेत, तेव्हा आता मी घरी जाऊ का?""नको! याला तुझ्या टेबलचा काम जरा शिकू दे, मग बघू!"माझी धागधुग जरा कमी झाली. अजून आठ पंधरा दिवस माझी नौकरी तग धरू शकत होती. म्हणजे महिनाअखेर पर्यंत. "हे पहा, प्रल्हाद, ---""मला पी.पी. म्हणत जा. प्रल्हाद नको!""ठीक पी.पी. एस आर. कडून सगळं शिकून घे. म्हणजे त्याला डिसकटेन्यू करता येईल.""त्यात काय औघड? आपनाला काय, सगळंच येतंय! दोन दिवसात जमवतो! एस.आर.ला कधी पण काढून टाका. मी घेतो बघून!"साहेबानी एक वार त्याला बुडापासून शेंड्यापर्यंत निरखून घेतला."पूर्वी बँकेत काम केलंय?""नाही. पण असून असून असं काय असलं? मला बाबूरावांनी सांगितलंय कि बँकेत सगळं सोप्प असतं म्हणून!""हे, बाबूराव कोण?""ते तुळजापूरला असतेत. युनियन लीडर आहेत! माझ्या मोठ्या बंधूचे मित्र आहेत!"म्हणजे हा युनियनजॅक-वाला दिसतोय! म्हणजे याची सीट,अन आपली छुट्टी, पक्की! माझ्या मनात येऊन गेलं. आणि तसही मला या बँकेच्या नौकरीत फारसा स्वारस्य नव्हतंच. पण पैसे चांगले मिळायचे. "या आता. एस आर, याला नीट सगळं सांग." साहेब मला म्हणले आणि कामात बुडून गेले.हा प्रल्हादाचा पहिला प्रवेश.                                                                                               

०००


चार दोन दिवसात हा बँकेच्या कर्मचाऱ्याच्यात चांगलाच रुळला. तसा जवळपास माझ्याच वयाचा, पण माझ्याशी तुटक वागायचा. मी तात्पुरता घेतलेला क्लार्क होतो, तो प्रोबेशनवर होता. त्यामुळे तो, आल्या दिवसापासून मला जुनियर समजू लागला. तो उमरगा-निलंगा भागातला होता. सध्या मुक्काम तुळजापुरात मोठ्या भावाकडे होता. त्याच्या मोठ्याभावाचे मित्र बाबुराव हे तुळजापूरच्या शाखेतले मोठे 'प्रस्थ' असल्याचे कळले. "पी.पी., या लेजरमधील, पासबुकावर असलेल्या नंबरचे खाते काढायचे आणि नाव चेक करून पासबुकात, लेजरमधील जमा -नावे च्या एंट्री करायच्या. आज पंधरा पासबुक तयार करायची आहेत, असे साहेबानी सांगितलंय. तुला किती देऊ?""मला कशाला? आज काय आपला मूड नाही! कर ना तूच.""मला साहेबानी रिकंसिलेशनच काम दिलंय. खरं तर हि पंधराच्या पंधरा पुस्तक तुझ्या साठीच आहेत!""हे, भलतंच! हा अन्याय आहे! मी युनियनमध्ये तुझी तक्रार करतो! तू साहेबांच्या नावाखाली माझ्याकडे काम चेपतोस!" तो भडकला. आणि स्टाफच्या युनिट सेक्रेटरीकडे निघून गेला. त्याने दिवसभर कामाला हात लावला नाही. सात वाजून गेले होते. साहेब केबिनचा लाईट बंद करून बाहेर आल्याचे मला कळलेच नाही. बाकी बँक कर्मचारी साडेपाचलाच निघून गेले होते. "का रे, काय करतोयस इतका वेळ? आटोपलं नाही का अजून? थोडा स्पीड वाढवायला हवास!""झालाच सर. शेवटचं पासबुक आहे.""पासबुक? पी.पी. ला पासबुक दिली नाहीस का?""दिली होती. त्यानं नाही केली! सर, एक विनंती, त्याला तुम्हीच काम सांगत जा. मी सांगितलं तर, त्याला ते कमीपणाचं वाटत!""ठीक. पण काही शिकतोय का?"मी गप्प बसलो. त्यांनी काय ते समजून घेतलं. प्रल्हादाचे कामात लक्ष्य नव्हते. चहा पिऊन पानाचा तोबरा भरायचा. घडी-घडी उठून बँकेच्या बाहेर जाऊन पिचकाऱ्या मारायच्या, घाणेरडा चोथा कुठंही टाकायचा. पुन्हा चहा प्यायचा! पण बोलायला मात्र पोपट!"काय, एस.आर.? आमच्या तुळजापुरात मंदिराच्या रस्त्यावर एक पानाचा ठेला आहे. तो ठेलेवाला आपला यारच आहे. सक्काळ सक्काळ तिथं सहाला उभं राहिलं का? एक से एक मॉडेल दिसत्यात! निस्ती, फॅशन परेडच! गचक गचक!"मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. पण 'तसल्या' गोष्टीतला त्याचा रस हळूहळू उघड होऊ लागला. माझे शाळा, कॉलेज परळीतलेच, त्यामुळे ओळखीचे लोक त्यांची कामे घेऊन माझ्याकडेच येत. त्यात बरेचदा वर्गमित्र, मैत्रिणी, शिक्षिका या ही असत. त्यांची कामे किरकोळच असत. खात्यात चेक जमा झाला का?पहाणे, शिल्लक विचारणे. पेन्शन कधी जमा होणार? अशी. एखादी बरी दिसली कि, हा लगेच मध्ये टपकायचा. नाहीतर ती गेल्यावर 'काय भारी मॉडेल होत राव? कोण होती रे ती?' याच्या चौकश्या सुरू व्हायच्या. मी अर्थात, सांगायचे टाळायचो.पण त्यामुळे प्रल्हादाला द्वेषाची उबळ यायची. 


आमच्या परळीला तेव्हा दोन सिनेमा थियटर होते. आणि एक कला-मंदिर होते. कलामंदिरात रोज रात्री दहा ते कितीही वेळ तमाशाचा खेळ (आणि इतर अलाईड ऍक्टिव्हिटी) चालत. तेव्हा तशी 'रसिकता' परळीत भरपूर होती, आत्ताचे माहित नाही.एक दिवस असाच बिल नोंदवत बसलो होतो. शेजारच्या काउंटरवर, प्रल्हाद 'डाळिंबाचं दान, पिळलं गं ओठावरी' असली काहीतरी, गाण्याची ओळ गुणगुणत, काम सोडून बॉलपेनचा ठेका टेबलावर वाजवत बसला होता. तेवढ्यात 'ती' बँकेत माझ्या समोर उभी राहिली.प्रल्हादाचा ठेका थांबला. चांगली चापून-चोपून नेसलेली साडी, मॅचिंग बिन बाह्यांचा ब्लाऊज, डोळ्याला गॉगल, सिनेमा नटीसारखी एक बाई होती ती.  "बोला?""मला न, पोरीच्या नावानं पैसे टाकायचेत!" तिने गॉगल काढत सांगितले. आवाजावरून झकपक कपड्यातली अशिक्षित बाई होती हे उघड होत होत.एरव्ही बाई दिसली कि, गरज नसताना टपकणारा पी.पी. या क्षणी मात्र सटकला होता."या, काउंटरच्या आत या. काही फॉर्म भरावे लागतात."तिला काउंटरच्या आता, एका खुर्चीत बसवून, तिच्या मुलीच्या नावाने पाच हजाराची मुदत ठेव करून दिली. तिचा फॉर्म भरताना ती कलामंदिरातली कलावंत असल्याचे माझ्या लक्षात आले."प्रकाश साहेब कोण आहेत?" तिने खालच्या आवाजात विचारले. "आमचे मॅनेजर साहेबांचं ते नाव आहे. त्यांना भेटायचंय का?"तिने मान हलवली.मी तिला घेऊन साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. "सर, या शकुंतलाबाई. याना तुम्हाला भेटायचं आहे. यांनी आपल्याकडे पाच हजारच दामदुप्पट योजनेखाली मुदत ठेव केली आहे. अजूनही डिपॉजिट देणार आहेत." तेव्हा पाच हजार म्हणजे मोठी रक्कम होती.शकुंतलाबाई आमच्या साहेबाला पाहून गोंधळ्या होत्या. "हे, ते नव्हतं! आमच्याकड येत्यात ते पान खात्यात! त्यांनी 'मी बँकेत मॅनेजर हाय!' मनून सांगितलं व्हतं!" ती पुरती बावचळली होती.'पान खात्यात!' या तिच्या वाक्यांनी मी आणि साहेब दोघेही हादरलो होतो. प्रल्हाद! दुसरं कोण असणार?साहेब चटकन सावरले. "धन्यवाद शकुंतलाबाई. आमच्या बँकेत ठेव ठेवल्याबद्दल. बँकेच्या कामात काही अडचण असेतर मला सांगत चला.""जी!" म्हणून ती साहेबांसमोरून उठली. "बँकेत पानाचा शौकीन कुनी हाय का? गाडग्यावनी डोक्याचा!" माझ्या डोळ्यासमोर पी.पी. उभा राहील."का? त्याच काय?""छिनाल भडवा! खोटं बोलला! उधारीत" आपण चार चौघात बँकेत उभे आहोत हे तिच्या लक्ष्यात आले असावे. डोळ्याला गॉगल लावून ती आली तशी निघून गेली. 


"गेली का रे ?" पी.पी. हळूच स्टेशनरी रूम मधून बाहेर आला. "पी.पी. ही काय भानगड आहे?"" काही नाही, नेहमीचंच आहे! एस. आर. आपुन एकदम बिन्धास आहोत. आमच्या तुळजापुरातपण तशी सोया होती. पण बंधूंच्या घरात राहून, कनातीत जाता यायचं नाही बघ. इथं मस्त जमलंय. कलामंदिरात रोजच्या बारीला ह्या मर्द हजर असतो!" पी.पी. पोकळ छातीवर हाताची मूठ आपटत अभिमानाने सांगत होता. "पी.पी. तुझं वय किती?"

"वय? 'कामा'चं आहे! जवानी रोज उतू जातीय!""एक सांगू. तू जे करतोस ते चांगलं नाही. तुझ्यासाठी, बँकेसाठी, तुझ्या कुटुंबासाठीसुद्धा!""ओ, मला शानपन नको शिकवू! आपण असल्या कामासाठी सगळ्याला फाट्यावर मारतो!" तो माझ्यावरच भडकला. आणि ताडताड घरी निघून गेला! मला खरे तर राग यायला हवा होता. पण का कोण जाणे वाईट वाटले. हा, ज्या वाटेवर आणि ज्या पद्धतीने जात होता, ते भयानक होत. माझा एक शाळकरी, गोड मित्र, याच वासनेच्या खाईत पडून बरबाद झाला होता. मला त्याची आज प्रखरतेने आठवण झाली. 


दुसरे दिवशी शनिवार होता. तीन वाजता बँक बंद झाली. मी घरी निघालो. तर समोरून रामदास येताना दिसला. रामदास हा एका फर्मचा मुनीम होता. फर्म लातूरची होती. परळीचा कारभार रामदास पाहायचा. वयस्क असलेला तरी नम्र होता."कुलकर्णी साहेब, ते पी.पी. साहेब कुठं रहातात?""नाही, मला काही कल्पना नाही. तसाही तो माझ्यापासून फटकूनच असतो. काही काम आहे का? म्हणजे बँकेतील असेल तर, मी करतो.""तस नाही. जरा खाजगी आहे. आता तुमच्यापासून काय लपवू? पी.पी.ना अडचण होती म्हणून मी पेढीच्या पैशातून थोडी उचल दिली आहे. लातूरला कळवलं आहे म्हणा, मालक म्हणाले बँकेचा माणूस आहे. द्या त्याला. पण महिन्याच्या अखेरपर्यंत वसूल करा. आता चार दिवसात महिना संपेल. आमच्या खतावणीत त्यांच्या नावे नोंद करता येणार नाही. पैसे मागायचे होते. "बापरे! हे प्रकरण हात पाय पसरत होत. परळीत येऊन उणेपुरे दोन-तीन महिने झाले नसतील तो हा प्रकार. "किती आहेत?""किरकोळ रक्कम आहे. पाचशे फक्त!"किरकोळ? या प्रल्हादाची डी ए सगटची पगार रु. एकशे पंचाहत्तर होती! हा पाचशे कसे फेडणार?"रामदास, तुम्ही हा प्रकार साहेबांच्या कानावर घातलात का? नसेल तर घाला. अहो हे खूप गंभीर दिसतंय.""अजून नाही. खाजगी व्यवहार कस सांगायचं साहेबाला, हो? ते म्हणतील 'मला विचारून दिलते का?' म्हणून गप्प बसलोय""अहो, यात खाजगी -सरकारी आणि पैश्याचा प्रश्न नाही. बँकेचे नाव गुंतायला लागलंय!""विचारतो लातूरला अन मग भेटतो साहेबाना! तोवर ते तुमच्यापर्यंतच ठेवा." नमस्कार करून रामदास दूर झाला.


रविवारी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे वैद्यनाथ मंदिराच्या लांबलचक पायऱ्यावर बसलो होतो. चार दोन मास्तरकीच्या नौकरी साठी अर्ज पाठवले होते. हातात काहीही नव्हते. बँकेची नौकरी, मॅनेजरच्या भरोश्यावर चालली होती. पण खरे नव्हते. अश्या विचारात होतो, तो समोरच्या बाजूला काही तरी गडबड उडाली. कोणालातरी लोक गराडा घालून उभे असलेले दिसले. त्या कोंडाळ्यातून, एक भडक मेकअप केलेली बाई, ताडताड पावले टाकत दूर निघून गेली. कलामंदिराच्या आल्यापासून, या भानगडी परळीत सुरु झाल्या होत्या. मारामारी, बायकांची लफडी. नवी नव्हती. मी जवळ जाईपर्यंत, कोणीतरी खाली मान घालून घाईत सायकल रिक्शात बसून निघून गेले. मी त्याच्या सफारीवरून ओळखले. तो प्रल्हाद होता! तमाशा बघणारे विखुरले."काय झालं?" त्यातल्या एकाला मी विचारलं. "लफडं! त्या 'कानातीतल्या पोरीनं 'रात्रीचे पैशे कोन देणार? तुझा बा?' असं म्हणून, सफारीवाल्याच्या कानसुलात लगावली! मायला, कसले लोक असतात नाही का? बाईकड पण उधारीत?"त्या काळी मोबाईलची सोय नव्हती. नसता या प्रल्हादाचे चाळे याच्या घरापर्यंत नक्की गेले असते. प्रल्हादाची दुर्गंधी हळूहळू पसरू लागली.आणि एक दिवस आमच्या डिव्हिजनल मॅनेजरची जीप बँकेच्या दारात उभी राहिली. मॅनेजर साहेब लगबगीने त्यांना सामोरे गेले. ही त्यांची भेट, अनापेक्षित होती. एक शिपाई चहा सांगायला पळाला. थोडे स्थिरावल्यावर डी एम साहेबानी मला बोलावले. "प्रकाश, अरे तुला नवीन क्लार्क देऊन दोन महिने होऊन गेले. अजून हा टेम्पररी माणूस किती दिवस ठेवणार? त्याला आत्ता माझ्यासमोर डिसकंटिन्यू कर! एव्हाना नवा हॅन्ड तयार झाला असेल ना?" हे अपेक्षित होतंच, तरी मला धक्का बसलाच."तुझं काम त्या नव्या पोराला सोपव. पुन्हा जरूर पाडली तर तुला बोलावू तुर्तास तुझी बँकेला गरज नाही!" त्यांनी मला सडेतोडपणे सांगून टाकले. "सर, पण आज पी.पी. आलेले नाहीत." मला हाताने जाण्याचा इशारा करत मॅनेजर साहेबानी परस्पर उत्तर दिले. "का? प्रोबेशनमध्ये कसल्या सुट्या देतोस?""सर, तो आजारी आहे. उद्या आला कि एस आर ची ऑर्डर काढतो.""नको. आजच उद्याच्या तारखेची ऑर्डर काढ अन् कॉपी मला दे!"टायपिंगचा खडखडाट सुरु झाला. 


बँक बंद झाली. मला घरी जावे वाटेना. सगळे कर्मचारी निघून गेले होते. मी एकटाच बंद बँकेच्या पायऱ्यांवर बसलो होतो. दिवे लागणी झाली होती. रस्त्यावरचे दिवे लागले होते. आता पुढे काय? नौकरीच्या अर्जांचे उत्तरे नव्हती. बँकेचं काम संपलंच होत. M.Sc साठी औरंगाबादला जावे, हा एक मार्ग होता. पण त्याला मे-जून पर्यंत वेळ होता. अजून सहा महिने. तोवर? घरचे खायचे अन घरीच बसायचे. विचार करून कंटाळलो, जागेवरून उठण्याच्या बेतात होतो, तो समोरून प्रल्हाद येत होता. माझ्याच दिशेने. त्याचा चेहरा उतरला होता. डोळे सुजले होते. जवळ येऊन बसला. "काय झालं? असा उदास का दिसतोयस?"माहित नाही मी त्याला कोणत्या टोनमध्ये विचारलं होत. तो एकदम गळ्यात हात घालून रडायलाच लागला. भलतंच. आता काय झालं याला?"पी.पी. शांत हो. काय झालं ते सांग. त्या शिवाय कस कळलं मला?""एस.आर. आता काय करू?""काही नको. शांत बस. अन कशाचं 'काय करू?' म्हणून विचारतोयस ते सांग.""अरे, चारचौघात माझी आब्रू गेली!""कशी?कधी?""रविवारी. मंदिरासमोर!""ते होय? ते माहित आहे! पुढे बोल!""तुला कळलं?""अख्या परळीला माहित झालाय!""माझी नौकरी त्या मुळे जाईल का रे?""माहित नाही. पण तू बँकेत लक्ष देऊन काम करत नाहीस, त्यामुळे मात्र नक्की जाईल! आजच डीएम आले होते!""बापरे! मग? ""मग काही नाही. मी उद्यापासून तुला काही सांगायला नसेन तुझी तुला कामाचं बघावं लागेल. मला त्यांनी डिसकंटीन्यू केलं आहे." "ते होईल रे! मला या लफड्यातून बाहेर पडायचंय. या शांतीच्या भानगडीतून. दोन एकशे लागतील! देतोस?" "पैसे देणार नाही! तो रामदासपण तुला पहात होता! मायला रंडीबाजी आमच्या पैश्यावर करणार का?" मी उखडलो."हे बघ, काय शिव्या द्यायचे ते दे. पण पैसे दे! मला यातून बाहेर पडायचं. आणि मला चंगल पण वागायचंय. खूप घाणेरडा गाढवपणा आजवर झालाय माझ्याकडून.""अरे इतकं शेण खाण्यापेक्षा लग्न का करत नाहीस?""लग्न? ते झालाय की!"


"काय? पण तुला तर आत्ता नौकरी लागली आहे. त्याच्या आधीच लग्न केलंस?"" काय करणार? इलाज नव्हता.""का?""तिला आधीच दिवस गेले होते! पैशानं मिटलं नाही, मग केलं लग्न!""बायको कोठ आहे?""माहेरी. बाळंतपणाला गेली आहे!"मी कपाळावर हात मारून घेतला. "मग एस. आर. देतोस ना पैसे?""नाही!""ठीक. मी येथून रेल्वे रुळाकडे जाणार! आत्महत्या करणार! मला एक संधी हवी होती. एक चांगला माणूस होऊन जगायचंय! फक्त एक संधी हवी. मला इतर जागी पैसे मागायला तोंड नाही. तू दिले नाहीस तर, तर माझ्याकडे वेगळा मार्ग नाही!" तो खूप भावूक होऊन बोलत होता. मनापासून. किमान मला तरी त्या क्षणी वाटले. "तू पुन्हा त्या बाईकडे जाणार नाहीस? बँकेत लक्ष देशील?""मी लक्ष देईन. मला ही नौकरी सांभाळीच पाहिजे. तंबाखू सुटणार नाही. पण शांतीकडे मात्र फक्त एकदा जाऊन येईन! पुन्हा मग बंद! तुझी शप्पथ!""आता एकदा तरी का, त्या वाटेला जातोस?" इतकं होऊनही हा काही सुधारणार नाही, असे दिसत होते. "नको जाऊ? मग तिचे पैसे, तू देणार का नेवून?" त्याने माझे तोंड बंद केले. मी त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि पैसे दिले. त्याला दोन करणे होती. एक तर त्या क्षणी तो खूप डिप्रेस्ड होता. काहीही करू शकला असता. अगदी आत्महत्यासुद्धा! आणि दुसरे असे की, खरेच त्याला पश्चाताप झाला असेल तर, माझे दोनशे रुपये एक आयुष्य बदलू शकणार होते! धोका फक्त एकच होता, दोनशे रुपयाला चंदन लागणार होते! दुसरीच शक्यता जास्त होती.


मला एक दिवसाचा ब्रेक देऊन, बँकेने मला पुन्हा महिन्यासाठी कामावर बोलावले. प्रल्हाद एक दिवसात कमालीचा बदलला होता. कामाचा उरक नव्हता पण, त्याची धडपड जाणवू लागली. चार दिवसात त्याला क्रेडिट, डेबिट समजू लागले. ट्रांसफर स्क्रोल बिनचूक लिहू लागला. मला समाधान वाटू लागले. "पी.पी. जमतंय राव तुला. बेरजाकडे जरा लक्ष दे. तुला सांगतो बँकेत या क्रेडिट - डेबिटच्या पलीकडे काही नसते. ते एकदा समजलं कि झालं.""असं म्हणतोस? मग झालं तर. मला बँकिंग आलंच म्हण कि!" तो खुश होता. 'आपणाला काय? सगळंच येतंय! त्यात काय आवघड आहे!' हे वाक्य आता त्याचे परवलीचे झाले. "एस. आर., आता मला सगळंच येतय बँकेतील! काल तर ओबीसी नोंदवल्या आणि बिनचूक व्हाउचरपण सोडले! तू बघ रिटायरमेंट पर्यंत, ह्यो गब्रू जनरल मॅनेजर होतो का नाय ते!"


तो सुधारतोय हे मला आणि बाकीच्यांना दिसत होते.पण --पण-- काळाच्या उदरात काही तरी वेगळंच दडलं होत. त्याने केलेल्या कृत्याच्या बियांना धुमारे फुटू लागले होते. रामदासाच्या मालकाने प्रल्हादाच्या विरोधात आमच्या केंद्रीय कार्यालयात लेखी तक्रार केली होती! प्रल्हादाने चुकून त्यांची एक हुंडी मुदतीपूर्वीच परत केली होती. पण खरा राग, वेळेवर पैसे न दिल्याचा होता. त्याच्या बायकोने फसवणुकीचा, घटस्फोटाचा आणि पोटगीचा दावा केला होता! शिवाय काही निनावी तक्रारी केंद्रीय कार्यालयात पोहंचल्या होत्याच! याचा परिणाम म्हणून दोन गोष्टी झाल्या. कामात अपेक्षित प्रगती नाही म्हणून, त्याचे प्रोबेशन वाढले. खातेदाराच्या विरोधास धार होती म्हणून, त्याची बदली झाली होती! आणि मला बॅकडेटेड प्रोबेशनरी क्लार्कची ऑर्डर मिळाली!


बरीच वर्ष झाली प्रल्हादची खबर नव्हती. नंतर कळले ते फारसे चांगले नव्हते. त्याला औरंगाबादला कंट्रोलिंग ऑफिसमध्ये घेतले होते. तेथे काम जमेना, कोणी मदत करीन. एक दिवस डीएम नी राजीनामा लिहून घेतला. मोठ्या शहराने तंबाखूसोबत, दारूचे व्यसन लावले! ओरल कॅन्सरने गेल्याचे समजले! खूप वाईट वाटले. 'फक्त एक संधी हवी!' म्हणाला होता. मी ती माझ्या परीने दिलीही होती. पण मी दिलेले खूप तोकडे पडले असावे. तुम्ही म्हणाल घरचे संस्कार कमी पडले. पण कोणतेच घर वाईट संस्कार करत नाही. आणि संस्कारात फक्त आई -वडील -कुटुंबच नसत तर शिक्षक आणि समाजही असतो. किशोरवयातील सांगत, खूप मोठा फॅक्टर असतो. येथेच प्रल्हाद कमनशिबी ठरला असावा. सुधारतेय असे वाटत असताना एक मित्र, माझ्यासमोर न परतण्याच्या वाटेवर निघून गेला!


Rate this content
Log in

More marathi story from Suresh Kulkarni

Similar marathi story from Tragedy