Suresh Kulkarni

Drama Inspirational

4.3  

Suresh Kulkarni

Drama Inspirational

रघूअण्णांचा उद्योग!

रघूअण्णांचा उद्योग!

6 mins
454


कोकणच्या एका आडबाजूच्या वाडीतील, रघु नाईकचा वाडा आज मोठा प्रसन्न दिसत होता. अन का दिसू नये? चार दिवस झाले होते, त्याची लेक, जावई आणि बिट्ट्या, गोड नातू आले होते. एरवी गोदाआक्का आणि रघुआण्णा दोघेच राहायचे. त्यामुळे एक उदासवाणी शांतता तेथे नांदायची.

हिरव्या पोपटी शालूवर, एखादी केशरी आंगठी ठेवावी तसं वाड्याचं कौलारू छत, लांबून दिसत होतं.

सकाळची कोवळी उन्हं, रघु नायकाच्या चौपस वाड्याच्या ओसरीवर पसरत होती. साठी पार केलेले रघुआण्णा नुकतेच पूजा आटोपून, अंगात धोतर कोपरी घालून ओसरीवरच्या बंगईवर मंद झोके घेत, जावई उठायची वाट बघत होते. पूजा नुकतीच आटोपल्याने, त्याच्या गोऱ्यापान कपाळावरचा, दुबोटी गंधाचा टिकला अजून ताजाच होता. घरभर दाटलेला उदबत्त्यांचा सुगंध आता ओसरीवर झिरपु लागला होता. वातावरण प्रसन्न होतं.


"दिनू, अरे तुझं आवरलं की जरा एखादा नारळाचा घड काढून ठेव. अन, विहरी जवळची चार आळूची पानं पण खुडून घे. गोदाला नेवून दे." अंगणात काम करणाऱ्या सालगड्यास रघुअण्णांनी बसल्या जागेवरून ओरडून सांगितले.


"आण्णा, नारळ कालच उतरवलाय. रखमानं आळु अन केळीची पानं सकाळचं सयपाकघरात नेलीत."

दिनू अंगणात नारळाच्या पडलेल्या झावळ्या शेजान झाडाचा बुडाजवळ जमा करून ठेवत म्हणाला. त्याची बायको, रखमा गोदाआक्काला स्वयंपाकघरात मदत करत होती.

तेवढ्यात गोबऱ्यागालाचा बिट्ट्या डोळे चोळत, रघूआण्णाच्या बंगई समोर येऊन उभा राहिला.

रघूअण्णांनी पायाच्या रेट्याने बंगई थांबवली आणि बिट्ट्याला आपल्या मांडीवर घेतले.


"बिट्ट्या, अरे किती उशिरा उठलास? माझी तर पूजापण झाली. काल कसा लवकर उठून, माझ्यासोबत पूजेला बसला होतास? आज किती वाट पहिली तुझी? रात्री जागलास की काय?"


"आजोबा. आज संडे आहे. आम्ही संडेला लेट उठायचं असतं! पण, तू मला सोडून पूजा का केलीस? देवाच्या डोक्यावर मिल्क टाकायचं, आज तुझ्यामुळे मिस झालं माझं!"


"अरे, बापरे! बिट्ट्या, आमच्या देवाला संडे माहित नसतो ना! ते सकाळीच उठून बसतात! बरं, आता दात घसा आणि आज्जीकडे जा. दूध तापवून ठेवलं असेल. पी, मग तुला आमराईत नेतो. जा पळ." बिट्ट्या अण्णांच्या मांडीवरून उतरला आणि घरात पळाला. पण मधेच परतला.

"का रे? काय झालं? माघारी का आलास?"


"आजोबा, ते तुझ्या कानावर तू लाल हिरवं काय घातलास?"


"ते होय? त्याला भिकबाळी म्हणतात."


"ओके! मला पण दे! तुझ्यासारखी मलापण मस्त दिसल!"


"हो तर! देतो. आता पळा. दात घासायला."


"अन ते आमराई? मीन्स काय?"


"म्हणजे 'मँगो ट्री पार्क!'"

बिट्ट्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने रघु पाहात असताना, माडीवरून श्रीधर खाली उतरून अण्णांच्या बंगई समोरच्या खुर्चीत बसला.


"रखमा, जावई उठलेत चाई येऊ दे!" रघुअण्णांनी घरात हाळी दिली. आणि आपला मोर्च्या श्रीधरकडे वळवला.


"काय जावईबापू, झोप लागली का नाही?"


"आण्णा, झकास झोप झाली. इथलं वातावरणच इतकं मोहक आहे की छान करमतं. पायी फिरावं लागतं पण त्याचा शीण वाटत नाही. त्यामुळं झोपसुद्धा गाढ लागते."

तेवढ्यात दिनू विलायची घातलेला, घट्ट दुधाचा चहा घेऊन आला. श्रीधरने आज, आण्णा सारखा बशीत ओतून चहा पिला. तसे त्याला करताना पाहून, आण्णा आपल्या मिशातल्या मिशात हसले.


"जावई, बशीतल्या चहाने चहाची खरी चव कळते, कपाने पिले तर, फक्त त्याचा गरमपणा घश्यात फिरतो! असा आमचा अनुभव आहे. चहा कसा झालाय?"


"अण्णा, चहा फक्कड झालाय. म्हणजे, नेहमीच तसा असतो. आईच्या हाताला वेगळीच चव आहे. त्यांनी नुसतं पाणी दिल तरी, गोड लागतं!"


"आहो गोदावरी, ऐकलंत का? जावई तुमचं कौतुक करायला लागलेत!" मोठ्याने हसत रघुआण्णा म्हणाले.


"अण्णा---- आज जेवण करून निघावं म्हणतोय."


"काय? निघायचं म्हणताय?" राघुअण्णांचा चेहरा खर्रकन उतरला.


"अ, हो. सोमवारपासून बिट्ट्याची शाळा सुरु होईल. माझ्या ऑफिसची कामंपण खोळंबली असतील."

राघूअण्णा गप्प बसून राहिले. श्रीधर इकडचं तिकडचं बोलून निघून गेला.

गोदाक्का दाराआडून ऐकत होत्या.


"अहो, शकू, कालच म्हणाली होती 'उद्या निघते' म्हणून! कामाची माणसं आहेत. अडवण्यात अर्थ नाही. ते बिट्ट्यासाठी ---"


"हो. आहे लक्षात. सोनाराला सांगून ठेवलंय. येतो घेऊन! शकुची साडी, धोतरचं पान आहे का घरा?"


"साडी धोतरचं पान आहे घरात. पण, जावयाला का धोतर देणार?"


"आगं, त्यांनी परवा धोतर नेसायचं शिकून घेतलं माझ्या कडून. त्यात त्यांना रुची वाटत होती. म्हटलं आता हेच द्यावं! कसं?"


"बाई! हे नव्हतं हो माहित मला."

राघूअण्णा अंगात कोट अन डोक्यावर काळी टोपी घालून वाड्याबाहेर पडले.


————


पाटाभोवती रांगोळी काढून, उदबत्या लावल्या होत्या. गव्हल्याची खीर, कुरड्या - पापड्या, आळूच्या वड्या. वांग्याची खमंग रस्सा भाजी, रस्स्यावर खोबऱ्याच्या किसामुळे आलेला तेलाचा तवंग, पाहणाऱ्याच्या तोंडाला पाणी सोडत होता. हातसडीचा तांदळाचा भूक वाढवणारा भात अन पिवळं धम्मक तुरीचं वरण, असा साधाच बेत केला होता.


शकू, श्रीधर आणि बिट्ट्या, कसे बसे आपापल्या पाटावर बसले होते. कधी पाटावर बसून जेवायची सवय नव्हती ना? रघुअण्णांनी त्यांची अडचण जाणून दिनूला खूण केली. त्याने ताटासाठी एकएक पाट लावला. जेवणं शांतपणे उरकली. शेवटच्या भाताच्या वेळेस गोदाक्कानी सगळ्यांना मुरडीचे कानवले वाढले.


"हे काय?" श्रीधरने विचारले.


"जावई, लेक सासरी जाताना, हा मुरडीचा कानवले मुद्दाम जेवणात वाढतात. पुन्हा माहेरी लवकर येणं व्हावं म्हणून."


जेवणं झाली. वामकुक्षी घेऊन श्रीधर, शकू, बिट्ट्या, माडीवरून खाली आले. त्याच्या मागे दिनू त्यांच्या बॅगा घेऊन पायऱ्या उतरत होता.


श्रीधर आणि शकूला जोडीने बसवून गोदाक्कानी शकुची ओटी भरली. रघुअण्णांनी श्रीधरला कुंकाचा टिळा लावला. टॉवेल, टोपी, धोतराचे पान आहेर केला. शकूला साडीचोळी दिली. बिट्ट्याच्या हातात रघुअण्णांनी एक छोटी डब्बी दिली.

बिट्ट्याला कसला दम निघतोय? त्याने ती उघडली. आत पाहातो तर काय? आजोबाच्या कानात आहे तशीच भिकबाळी! पिल्लू लगेच आजोबाच्या गळ्यात पडलं. त्याला पोटाशी धरताना म्हाताऱ्याच्या डोळ्यात ओलावा झिरपला.

श्रीधर आणि शकुनं एकवार एकमेकांकडे पाहिले आणि मग नजरेने सहमती झाल्यावर जोडीने गोदाक्का आणि रघूअण्णाच्या पाया पडले.


"चार दिवस सवड काढून आलात, आमच्या सोबत राहिलात, आमचा हा नाईकांचा वाडा, आनंदानं भरून टाकलात, बिट्टू सोबत, तर मी पुन्हा लहानपण अनुभवलं! उद्यापासून, देवपूजेच्या, वेळेस बिट्टू डोळ्यासमोर दिसेल! सवड काढून येत जा. आम्ही आहोत तोपर्यंत तुमची वाट पाहू!" रघूअण्णांचा गळा नकळत दाटून आला.


दिनूने बॅगा श्रीधरच्या गाडीच्या डिक्कीत टाकल्या. शकू श्रीधर गाडीत बसले. पण बिट्ट्या मागेच थांबला.


"आजोबा, मँगो ट्रीच्या पार्कमध्ये जायचं राहिल की?"


"बिट्ट्या, उन्हाळ्यात ये, मँगो जूस अन पुरणपोळी खायला. मग, त्या पार्कातच जेवायला जाऊ!" रघूअण्णा म्हणाले. 


बिट्ट्या मागून पळत जाऊन गाडीत बसला. टाटा करून हात हलवत मंडळी निघून गेली. 

पहाता पहाता श्रीधरची गाडीसुद्धा नजरेआड झाली.


————


उन्हं उतरणीला लागली होती तरी, गोदाक्का ओसरीच्या पायरीवर आणि रघूअण्णा बंगईवर बसून होते. वाडा ओस पडल्यासारखा उदास झाला होता.

"चार दिवस लेकरु घरभर हुंदडलं, घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. बिट्ट्या खरच गोड पोरगं होतं, नाही का?" गोदाक्का म्हणाल्या.


"लहान लेकराचं असंच असतं, चटकन लळा लागतो. बरं गोदा, पुढं काय?" सुपारी कातरत अण्णांनी सवाल केला.


"अहो, तुम्हाला सांगायचंच राहीलं, तुमच्या त्या 'अनुदाना'च्या डब्ब्यात, शकू काहीतरी टाकून गेलीयय! बहुदा पैसे असावेत."


"असू दे! ते तसेच अपेक्षितच होत! तर मी मघाशी काय विचारत होतो? हा, आता पुढं काय?"


"मी काय म्हणते? नारळी पौर्णिमा जवळ आली आहे. एखादा 'दादा वहिनी' आहेत का पाहा!"


"आगं, तू फक्त कोणतं नातं जगायचं ते सांग! आपल्या 'कुटुंब पर्यटन!' या योजनेला खूप छान प्रतिसाद मिळतोय!"


"तुमचं डोकं मात्र अफलातून चालतं हो! आपला एकुलता एक अजय अमेरिकेत रमला, रिकामं घर खायला उठायचं. नात्याचा ओलावा एकदम आटल्यासारखा झाला होता. इतर नातेवाईक, कशाला या आडबाजूच्या कोकणी खेड्यात येतात? यावर तुमचा 'कुटुंब पर्यटन' हा उत्तम तोडगा आहे!"


"गोदा! कुटुंब विस्कटत चालली आहेत. तरी माणसाला नाती हवी आहेत. कुणाला आजोबा हवा, कोणाला आई हवी, कोणाला भाऊ हवा! तर कोठे आजोबा - आजी एकटे पडलेत, कित्येक पोरी 'बाबा'साठी झुरत आहेत, तुझ्यासारखी बाई, भावाच्या मायेला पारखी झालीयय! नात्यांची ही पोकळी कमी करता येईल का? या विचारातून या, 'कुटुंब पर्यटन' कल्पनेचा जन्म झाला. आता हेच पाहा ना, शकूला चार दिवस का होईना 'माहेर' मिळालं! तुलाही लेक -जावई-नातू हे नातं जगून पाहाता आलं. आपल्याला प्रेम आणि सोबत मिळाली. नाही त्या पेक्षा थोडं तरी पदरी आलं, हेच समाधान! बरं, ते अनुदानाचा डब्बा आण, ठरल्या प्रमाणे त्यातली निम्मी रक्कम दाते मास्तरांच्या हवाली करून येतो. शाळेला एक वर्ग बांधायचाय म्हणत होते."


गोदाक्का 'अनुदानाचा' डब्बा आणायला घरात गेल्या.

रघुअण्णांनी बंगई सोडली. डेस्कासमोर बैठक मारली. डेस्कच्या खणातून पोस्ट कार्ड काढले. आणि लिहायला घेतले.


'श्री रा.रा. दत्ता भाऊ,

आपले दिनांक १० चे पत्र पावले. आपण केलेल्या विनंतीस मान देऊन, आपणा उभयतांस सौ गोदावरी (माझ्या सौभाग्यवती) याचे 'दादा -वहिनी' होऊन येण्याची प्रार्थना करतो.


आपल्या गोदाक्कास, आपण निराश करणार नाहीत याची खात्री आहे.

आपली नारळी पौर्णिमेस आम्ही वाट पाहात आहोत. 


तुमच्यासारखेच आम्हीही मायेला आणि प्रेमाला भुकेली माणसे आहोत, 'कुटुंब पर्यटनाच्या' निमित्याने या पवित्र नात्याला उजाळा देऊ!


काय फुल ना फुलाची पाकळी असेल ती जाताना 'अनुदान' डब्ब्यात टाकावी. शाळा बांधणीसाठी ही रक्कम आम्ही वापरतो.

आपला,

रघु (अण्णा) नाईक.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama