Nagesh S Shewalkar

Drama Tragedy

4.3  

Nagesh S Shewalkar

Drama Tragedy

तगमग नि तळमळ!

तगमग नि तळमळ!

10 mins
1.1K


  मी नुकताच रात्रभर लांबचा प्रवास करून आलो होतो. खूप थकलो होतो. झोपही येतच होती. स्नान, नाष्टा, चहा झाला आणि बायकोला म्हणालो,

"अग, मी आता मस्तपैकी ताणून देतो. मला जाग येईपर्यंत उठवू नको. झोपू दे."

"मी नाही उठवणार हो, पण माझी सवत तुम्हाला बरी झोपू देईल?" बायको हसत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव ओळखूनही मी आश्चर्याने आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत असताना ती हसत म्हणाली, 

"अहो, असे पाहताय का? माझी सवत... अहो, मोबाईल तुमचा. आत्ता एका मागे एक फोन सुरु होतील..." बायको तसे बोलत असताना माझा भ्रमणध्वनी वाजल्याचे ऐकून ती म्हणाली,

"झोपा आता. तो कोंबडा तरी एकदाच बांग देतो. कुणी उठो का न उठो पुन्हा आरवत नाही पण या कोंबड्याचे तसे नाही. याची आपली कुकू च कू सारखी चालूच राहते. बघा. कोण आहे ते..." अस म्हणत बायको तिथून प्रस्थान करीत असताना मी भ्रमणध्वनी उचलला. अनोळखी क्रमांक होता. मी उचलून म्हणालो,

"हॅलो...."

"कोण बोलतेय?" पलीकडून उलट प्रश्न आला. वास्तविक असा उलट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचा मला नेहमीच खूप राग येतो कारण जो कुणी फोन लावतो तो कुणाला लावायचा हे ठरवूनच फोन लावतो ना. 'उचलला फोन, जुळवला क्रमांक' असे तर होत नाही. स्वतः फोन करून असा उलट प्रश्न विचारणाऱ्या अनेकांना अनेकदा फोनवर झापत असतो, खरडपट्टी काढत असतो पण त्यादिवशी आलेल्या फोनवरील माणसाचा मला राग आला नाही कारण त्या आवाजातील कंप, थरथर मला स्पष्ट जाणवत होती. त्यावरून मला एक गोष्ट लक्षात येत होती की, बोलणारे गृहस्थ निश्चितपणे म्हातारे आहेत त्यामुळे मी त्यांच्यावर नेहमीप्रमाणे रागावलो नाही, चिडलो नाही उलट का कोण जाणे मला त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर निर्माण झाला. मी एक क्षण विचार करत असताना पुन्हा आवाज आला,

"माफ करा. कदाचित आपली ओळख नाही पण एका दिवाळी अंकात तुमचा पत्ता पाहिला. महत्त्वाचे म्हणजे मीही त्याच भागात राहतो, ज्या भागात तुम्ही राहता म्हणून वाटले, बोलावे. परिचय करून घ्यावा. चालेल न?" त्या आवाजातील विनयशीलता आणि कुठेतरी मला जाणवणारी एक अंतरीची भावना यामुळे मी पटकन म्हणालो,

"काका, असे का म्हणता? बोला की. मोकळेपणाने बोला."

"मग हरकत नाही. कसे झालेय बघा, आजकाल कुणाशी बोलणेही अवघड होऊन बसले आहे. माझे वय ऐंशी वर्षाचे आहे. म्हणजे मी म्हाताराच ना! त्यामुळे जो कुणी भेटतो तो टाळायला पाहतो. आजकाल म्हाताऱ्यांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे सारेच जण टाळत असतात निदान मला तरी तसे जाणवते. मी चुकत असेल पण हा माझा अनुभव आहे. आता हे बघा ना, एकमेकांचा परिचय करुन घेण्याआधीच मी माझेच ऐकवतो आहे. मला सारे अण्णा या नावाने बोलवतात. मी सरकारी नोकरीत होतो. साधारण बावीस वर्षापूर्वी निवृत्त झालो आहे. आपण काय करता?"

"मी पण निवृत्त शिक्षक आहे. दोन वर्षे झाली निवृत्त होऊन ...."


"म्हणजे तुम्ही साठीत... मी ऐंशीत.... वीस वर्षाचे अंतर आहे म्हणायचे. आपण फोनमित्र झाले तर तुम्हाला चालेल का?"

"काका, मलाही आवडेल की. नक्कीच आपण बोलत जाऊ. आपल्या घरी कोण-कोण असते? म्हणजे ऐंशी वर्षे वय म्हणजे नातू-पणतु असतील की..."

"पणतु नाही. पण नातू आहे. एक वर्ष झाले तोही शिक्षणासाठी नोएडा येथे गेला आहे. तो इथे होता तोवर खूप करमत होते. तो जाता येता आस्थेने, मायेने चौकशी करायचा, मधूनच विनोद करायचा, खळखळून हसवायचा पण तो शिक्षणासाठी गेला आणि मग मी खूप एकटा एकटा पडलो हो...."

"पण मग आपले चिरंजीव....


""आहे ना. एक मुलगा आहे, सूनबाई आहे. दोघेही नोकरीला असतात. दोघेही डबे घेऊन जातात. सकाळी साडे सहाला उठतात. गडबडीत सारे काही आटोपतात. ते उठले की, स्वयंपाकाला बाई येते. ती त्यांचे डबे आणि माझा सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण करून देते. सात वाजता दोघेही घराबाहेर पडतात आणि मग दिवसभर मी एकटाच असतो. रात्री दोघेही आठनंतर येतात. मग कशाचे आलेय बोलणे, चौकशी, विनोद वगैरे. दोघांनाही रविवारी तेवढी सुट्टी असते पण आठवडाभराची तुंबलेली, खोळंबलेली कामे करण्यात त्यादिवशी त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही."

"पण काका, म्हणजे मी विचारु नये पण काकू....."


"काकू? आमची बायको. पंधरा वर्षांपूर्वी गेली सोडून. ती देवाघरी गेली आणि माझ्या जीवनातील राम संपला. रोज उठून त्या रामापुढे क्षणभर हात जोडून उभा राहतो आणि मनापासून त्याला आळवतो की, बाबा रे, एकदाचे शेवटचे 'राम' वदवून घे आणि मोकळे कर पण कशाचे काय माझ्या सारख्या म्हाताऱ्याचे तो का ऐकेल?"


"काका, असे म्हातारा- म्हातारा म्हणवून घेऊ नका. मी सांगू का, म्हातारा हा शब्द आपण थोडा वेगळ्या प्रकारे समजून घेऊया. म्हातारा नव्हे तर महातारा! अर्थात महातारा एकच तो म्हणजे सूर्य! ग्रहमंडळातील एक अत्यंत महत्त्वाचा तारा! ज्याच्याभोवती सारे ग्रह-उपग्रह फिरतात आणि जो साऱ्या सृष्टीला प्रकाशमान करतो. तसेच स्वतःचे कुटुंब प्रकाशमान करणारा, सुख-दुःखाचे अनेक पावसाळे पाहिल्यानंतर अनुभवाची शिदोरी पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करणारा असा महातारा!"


"कविकल्पना आहे. अर्थात तुम्ही लेखक असल्यामुळे अशा कल्पना तुम्ही करु शकता पण वास्तव वेगळे आहे. अहो, आजच्या पिढीला सूर्यदर्शनच होत नाही त्यांना तुमची कल्पना काय कळणार? कसे आहे, शहरातल्या या सिमेंटच्या जंगलात सूर्याचे दर्शन तसे दुरापास्त! एकतर आजची पिढी म्हणजे उशिरा उठणारी! उगवत्या सूर्याचे आकर्षक, मनोहारी दर्शन यांच्या नशिबात नाही हो आणि ज्यांना सकाळी लवकर उठून जावे लागते त्यांना सूर्याकडे पाहायलाही वेळ नसतो. अक्षरशः कुत्रा पाठीमागे लागल्याप्रमाणे सारे काही क्षणातच आवरावे लागते. जे स्वतःच्या वाहनात जातात त्यांना तर इकडून तिकडे मानच वळवता येत नाही. त्यांचे सारे लक्ष रस्त्यावरील खड्डे चुकवण्याकडे असते. बरे, जे वाहनात बसून जातात त्यांचे लक्ष कानात यंत्र लावून गाणे ऐकण्यात किंवा हातातील डबड्यावर! मग कसे घेणार सूर्यदर्शन?"


"पण काका, आपण म्हातारी माणसं या पिढीला मार्गदर्शन तरी करू शकतो ना?"

"मार्गदर्शन? खूप छान कल्पना आहे. पण या पिढीला आपल्या म्हणजे म्हाताऱ्यांच्या सो कॉल्ड मार्गदर्शनाची गरजच नाही हो. आपले विचार यांच्यासाठी बुरसटलेले, अठराव्या शतकातले. यांचा देव, गुरु म्हणजे एकच.... हातातील मंदिरात वसलेला गुगल! आली अडचण विचारा गुगलला! पूर्वी आपण गोष्टीत ऐकायचो ना तो दिव्यात राहणारा आणि कथानायक असलेला अल्लाउद्दीन! आदेश करताच दुसऱ्याच क्षणी प्रकट होऊन 'हुकूम मेरे आका' असे विनयाने म्हणणारा! आजच्या युगातील अल्लाउद्दीन म्हणजे गुगल! काहीही विचारा. एका क्षणात सारी माहिती पुरवणारा, एकूणएक शंकांचे निरसन करून अचूक मार्ग दाखवणारा गुगल!..."


"काका, खूप माहिती आहे हो तुम्हाला! स्मार्टपणे स्मार्टफोन वापरता वाटते. कमाल आहे तुमची या वयात तुम्ही इतकी माहिती मिळवलीत..."

"मी कसला स्मार्ट आलोय. हां थोडाबहुत जे काही हे नवीन तंत्रज्ञान शिकलो त्यासाठी माझा गुरु म्हणजे माझा नातू! त्यानेच दोन वर्षांपूर्वी त्याच्या बापाजवळ हट्ट धरला आणि हा फोन मिळवून दिला. एक-एक करीत यातले सर्व समजावून सांगून या चक्रव्यूहात दिले सोडून. आत तर शिरलो आणि आता बाहेर तर पडता येत नाही उलट अजून खोलवर शिरतोय."


"काका, किती चांगले आहे हो.नुसती करमणूकच नाही तर त्यासोबत माहिती, ज्ञानाचा खजिना आहे हो. वेळ कसा जातो ते कळत नाही."


"खरे आहे तुमचे. पण मी आहे, माणूसघाण्या इसम! मला हे असे, एकांतात, कोंडून, बंदिस्त जीवन आवडत नाही. कुणाला तरी भेटावे, गप्पा माराव्यात, खळखळून हसावे हा माझा स्वभाव! तुम्हाला सांगतो, नोकरीत असताना आणि निवृत्त झाल्यावरही मी असंख्य माणसं जोडली पण कालौघात काही हे जग सोडून गेली काही संपर्कात नाहीत. तर काही जण माझ्या म्हातारपणामुळे मला टाळतात किंवा स्वतःलाच वृद्धत्वामुळे जगापासून दूर नेतात. काय करावे सुचत नाही. दिवसभर टिव्ही नाही तर हा फोन नुसता कंटाळून गेलोय बघा. स्वभाव मुळात चौकशी करण्याचा, नवीन काही जाणून घेण्याचा आहे पण इतरांचे सोडा पोटच्या मुलालाही मी केलेली चौकशी पटत नाही, आवडत नाही. 'नसत्या चौकश्या' असे लेबल लावून मोकळा होतो. दिवसभर तर दोघे घराबाहेर असतात पण घरी आले की, दोघेही खोलीत कोंडून घेतात. जेवण्यापुरते डायनिंग टेबलवर एकत्र येतो, तेही जणू एखाद्या हॉटेलमध्ये अनोळखी माणसांनी एका टेबलवर बसल्याप्रमाणे! फारतर 'काय म्हणता? कशी आहे तब्येत?' बस्स! एवढाच काय तो संवाद! बोलण्यावरही सेंसॉरशीप! कंटाळा आलाय हो. आपण एखादा- दोन शब्द बोलावा तर मान हलवून किंवा हां-हूं करून प्रतिसाद देणार! आमची बायको होती ना, त्यावेळी तिला ऐकवत होतो,माझे प्रवचन! तीही बिचारी न कंटाळा करता, न थकता माझी बडबड ऐकून घेत होती. अर्थात तिचाही नाइलाज होता. तिला तरी दुसरी काही करमणूक नसायची. मला देवधर्माची जास्त आवड नसल्यामुळे ती पण जास्त देवदेव करीत नसे. ती गेली आणि माझ्या करमणुकीवर, बडबडीवर निर्बंध आले हो."


"काका, मला वाटते, काही निर्बंध तुम्ही स्वतःच स्वतःवर घालून घेतलेले दिसत आहेत. अहो, पोटचा मुलगा आहे तो. आजच्या या जीवघेण्या, विकृत स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला दिवसभर स्वतःला गुंतवून घ्यावे लागते. मला सांगा, दिवसातले बारा-चौदा तास घराबाहेर राहिल्यानंतर त्यांची शारीरिक, मानसिक स्थिती कशी असणार? हे सर्वत्रच घडते आहे. त्याला नाइलाज आहे. हेही एक चक्रव्युहच आहे. त्यात जाता तर येते पण नंतर इच्छा असूनही बाहेर पडता येत नाही. पडू शकत नाही. विकृत असले तरीही आजचे जीवनमान हे असे राहणारच आहे..."


"ते बरोबर आहे हो. मलाही समजते पण उमजत नाही हो. काय करणार? असे बंदिस्त, कैद्याप्रमाणे जीवन नाही जगू शकत हो. जाऊ देत. आपली ओळख नसतानाही मी तुमचा खूप वेळ घेतला. ते म्हणतात ना, 'जान ना पहचान, मै तेरा मेहमान!' बरच काही बोललो. पण काय करणार हो. खूप दिवसांनी कुणीतरी ऐकून घेणारा भेटला. राहवले नाही हो. शक्य झाले तर मला माफ करा. कुणाचा फोन आला होता हेही विसरुन जा. जाता जाता एक विनंती करू का?"


"काका, असे काय ...."


"एक-एक मिनीट हं. आपल्या वयात वीस वर्षांचे अंतर आहेच शिवाय तुम्ही मला काका म्हणताच आहात तर एक काम करता का?"

"काका, निःसंकोचपणे सांगा ना...."


"आनंद झाला. तुमच्याशी चर्चा करून. माझी एक विनंती आहे, एकदा केवळ एकदाच मला काका न म्हणता.... काय झाले बघा, बाबा ही हाक ऐकून खूप वर्षे झाली हो..."

"म्हणजे?" मी विचारले.


"वर सांगितल्याप्रमाणे माझा आणि मुलाचा संवादच थांबलाय हो. नाही. मी इथे खरेच सुखी आहे हो. कशाचीही कमतरता नाही. त्याच्या धावपळीत, गडबडीत तो एखादा-दुसरा शब्द बोलतो. त्याच्याही मनात माझ्याबद्दल नक्कीच प्रेम आहे. पण मी 'बाबा' ही हाक ऐकण्यासाठी तळमळतोय हो. ज्या काळात त्याचे लग्न झाले त्या काळात सासऱ्याला आजच्याप्रमाणे बाबा म्हणायची पद्धत नव्हती. त्यामुळे सूनबाईही बाबा म्हणत नाही हो. तेव्हा एकदा मला बाबा म्हणून हाक मारा ना. प्लीज माझी एवढी मागणी पूर्ण कराल. प्लीज..."


"काका..... ब.. बाबा... बाबा...." मी म्हणत असताना अचानक पलीकडून हुंदका दिल्याचा आणि 

"ध...ध...धन्य झालो..." असे म्हणत ते एकदम शांत झाले आणि दुसऱ्याच क्षणी कशाचा तरी आवाज ऐकू आला. मला वेगळीच शंका आली. मी पाच-सहा वेळा 'हॉलो...हॉलो...' करत राहिलो.


मी भ्रमणध्वनी बंद करून अस्वस्थपणे सोफ्यावर बसून राहिलो. काही क्षणातच बायको तिथे येत म्हणाली,

"काय झाले हो? झोपणार होतात ना, म्हणे ताणून देणार होतात ना? आता काय झाले..." बोलताना तिचे लक्ष माझ्या चेहऱ्याकडे गेले आणि तिने काळजीने पुन्हा विचारले,

"काय झाले? तुमचा चेहरा असा का झालाय? कुणाचा फोन होता?"                                          

 " सारे ठिक आहे ग..." असे म्हणत मी तिला आलेल्या फोनबद्दल सारे काही सांगितले. ते ऐकून ती म्हणाली,

"अहो, विसरून जा. नात्यातला ना गोत्यातला त्याचा काय एवढा विचार करायचा?"


"नाही ग. असेल दूरचा, नसेल नात्यातला पण होता प्रेमाचा, हक्काचा! होय! काही क्षणातच त्याने प्रेमळ हक्काने माझे मन तर जिंकलेच पण माझ्याकडून बाबाही वदवून घेतले. काय ऋणानुबंध असतील कळत नाही पण कशी वेगळीच मनस्थिती झालीय ग. झोपच उडाली माझी. अग, अग, असे तर नसेल ना ग, बोलताना त्यांना अत्यानंदाने चक्कर तर आली नसेल....ते...ते..." 


"अहो, असे काही नसेल. जाऊ द्या. तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा कडक चहा करून आणते..." असे म्हणत ती आत गेली आणि मी सोफ्यावर मान टेकवून बसलो. बाबासोबत झालेले संभाषण मनातल्या मनात पुन्हा पुन्हा ऐकत होतो, जणू शब्द न शब्दाचे रवंथ करत होतो.....


       चहा घेऊन मी लोळत पडलो. झोप तर लागली नाही पण एका अस्वस्थ अवस्थेत मी तळमळत पडलो होतो. कदाचित शेवटी थोडा वेळ डोळा लागला असेल पण लगेच भ्रमणध्वनी वाजला. त्यावरील क्रमांक ओळखीचा वाटला आणि पाठोपाठ माझ्या तोंडातून आवाज आला,

'बाबा....बाबाचा फोन! थँक्स गॉड! माझी शंका खोटी ठरवलीस...' म्हणत मी फोन उचलला. मी काही म्हणण्यापूर्वीच तिकडून आवाज आला,

"कोण बोलतय?..." तो आवाज ऐकून मी भ्रमणध्वनीवर आलेला क्रमांक बघितला. क्रमांक तर तोच होता. काका...बाबा, याच क्रमांकावर बोलत होते पण हा आवाज? नक्कीच बाबांचा नव्हता. मग कोण बोलत होते? तितक्यात पुन्हा आवाज आला.


"काय झाले? बोलत नाहीत. तुमच्याशीच दुपारी बाबा बोलले काय? बराच वेळ बोलत होते."

"होय. काका, मलाच बोलत होते. पण काय झाले? तुम्ही कोण बोलता?"

"मी त्यांचा मुलगा बोलतोय. आज बाबांनी मला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला आणि इतरांना जवळपास पन्नास वेळा फोन केला पण कुणीही त्यांचा फोन उचलला नाही. शेवटचा फोन तुम्हाला केलेला दिसतोय आणि ते तुमच्याशी जवळपास तासभर बोलल्याचे समजले म्हणून फोन केला. तुमच्याशी त्यांची कधीपासून ओळख होती..."


"नाही. त्यांची आणि माझी यापूर्वी कधीच भेट झाली नाही. त्यांनीच एका मासिकातून माझा क्रमांक मिळवून मला फोन केला. आम्ही प्रथमच फोनवर बोललो. पण झाले काय? माझ्याशी बोलता बोलता ते अचानक थांबले...."

"अचानक थांबले आणि कायमचेच थांबले. बाबा,हे जग सोडून गेले आहेत...."

"काssय ? ..." विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो.....                                          


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama