Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

प्रमोशन फंडा!

प्रमोशन फंडा!

14 mins
196



           'बेचना है अपना माल कंडा तो अपनाओ प्रमोशन का फंडा!' अशी आजची स्थिती आहे. जाहिरातीचे एक आगळेवेगळे क्षेत्र म्हणजे प्रमोशन! अर्थात हा प्रकार सध्या चित्रपट, हॉलीवूड, बॉलीवूड या क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नवीन सिनेमा येण्यापूर्वी त्या चित्रपटाशी संबंधित सारे मनुष्यप्राणी विविध वाहिन्यांवरील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावून स्वतःच्या सिनेमाचा डंका जोरजोराने वाजवतात त्यामुळे जाहिरातींना कंटाळलेला मानव प्रमोशनच्या फंडामध्ये अडकून 'प्रमोशन नको जाहिरात बरी!' अशा स्थितीत येतो आहे 'भिक नको कुत्रा आवर

याप्रमाणे!' तसा हा प्रमोशन फंडा मानवजातीस नवीन नाही. प्रत्येकाने स्वतःच्या घरात, मित्रमंडळ, नातेवाईक या परिवारांमध्ये डोकावले तर प्रत्येकालाच त्याच्या आजूबाजूस हा प्रकार दिसून येईल. नसेल आठवत आणि डोळे चोळचोळून बघितल्यावरही जर आमच्या म्हणण्याचे प्रत्यंतर येत नसेल तर मग ही कथा वाचल्यावर लक्षातयेईल, की हा प्रमोशन फंडा प्रत्येकानेच अनुभवला आहे...

     रविवार असल्यामुळे अमित त्यादिवशी घरीच होता. सकाळचे अकरा वाजत होते. त्याचे कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे तो एकटाच होता. रविवारची सुट्टी घालवावी कशी हा प्रश्न त्याला सतावत असताना त्याच्या भ्रमणध्वनीने त्यास साद घातली. 'कुणाचा असेल?' प्रश्नार्थक नजरेने त्याने त्यावरील नाव त्यावर सुधीरचे नाव दिसताच तो म्हणाला,

"हॅलो, सुध्या, बोल...'

"काय करतोस रे?"

"बायको घरी नसलेला जीव काय करणार? बसलो आपला हातावर हात देवून..."

"तुझी बायको घरी नाही.. म्हणजे दात आहेत पण चणे नाहीत परंतु इथे दातही आहेत आणि चणेही आहेत परंतु माझी बायको घरी असूनही मला नुसते तिच्या थोबाडाकडे पाहत बसावे लागते. वहिनी गावाला गेल्या हे तुला निमित्त तरी आहे पण माझी सुंदर बायको माझ्यासमोर मला खिजवत बसलीय... अरे, ती 'चोवीस बाय तीन' अशा सुट्टीवर आहे. वरती बघ, कशी दाताड वेंगाडुनी मला थम्सअप करतीय. ये अम्या, येतोस का रे इकडे? मारू या जरा गप्पा..."

"नको यार, आज जरा आरामाचा मूड आहे. नंतर कधी..."

"काय हे, शट! ऐक तर तुला एक नवीन खरेदी दाखवायची आहे."

"कार-बीर घेतलीस की काय?"

"घेईन रे कारही घेईन. आत्ताच कंपनी फोन आला होता, ते माझ्यासाठी व्हेरी व्हेरी स्पेशल कार बनवत आहेत, केवळ आमच्यासाठी एकमेव जणू ताजमहल! तर त्या माझ्या कारसाठी जे नट लागणार आहेत ना त्यातला एक नट तयार झालाय. तो पाहून पसंत करण्यासाठी बोलावलेय.."

"सुध्या, तू एका बायकोचा नवरा झालाय पण..."

"काय फरक पडणार? तुझ्यामध्ये पडला? मला एका बायकोचा नवरा म्हणतोस आणि तुला काय दहा बायका आहेत? अम्या, अरे डासांसाठी नवे बिस्किट आलेय ते तुला दाखवायचे होते. फारच मस्त आहे रे..."

"खाऊन पाहिलेस का?"

"माझ्या एकुलत्या एक बायकोच्या कपाळावर काळी टिकली पाहायची आहे का तुला? अरे हो, आजकाल बायका सुद्धा नवऱ्याच्या मरणोत्तर लाल टिकलीच लावतात. ते जाऊ दे. मी आणलेले बिस्किट एवढे विषारी आहे म्हणशील तुला काय सांगू? अरे, घरामध्ये ठेवून आठ दिवस झाले, एक तरी डास दिसावा? मुळीच नाही. त्याच्या वासाने हजार चौरस फुटापर्यंत डास फिरकत नाही. धिटावलेला एखादा चुकून आलाच ना तर दुसऱ्याच क्षणी बिस्किटाच्या वासाने बाहेर पळून जातो आणि मग त्याच्या आसपास येणाऱ्या साऱ्या डासांना यमसदनी घेऊन जातो. पहिल्याच दिवशी काय धम्माल झाली म्हणून सांगू...अगं, थांब ग. सांगू दे. त्याचा नि माझा फ्री नंबर आहे. दिवसभर बोललो तरी एक पैसाही लागत नाही... अम्या, हिने लिंक तोडली रे कुठे होतो रे मी?"

"बिस्कीट खावून बायकोसंगे धमाल करत होतास."

"ओ अमितजी, का टपलात असे? तर पहिल्याच दिवशी सारे डास आत आल्यावर मी ते बिस्किट काढून खिडकीत ठेवले. तुला त्याची पॉवर काय सांगू दोस्ता, एका क्षणात हजारो डासांची फलटण... अगदी कोपऱ्या कोपऱ्यात दडून बसलेले डाससुद्धा घाबरून बाहेर गेले. त्यारात्री काय मस्त झोप लागली म्हणून सांगू. सकाळी उठून अंगणात पाहतो तर काय प्रेतांचा सडा...

"सांगतोस काय? अरे, कॉलनीत काही राडा झाला होता की डाकूंचा..."

"अरे बाबा, तसे काहीच नव्हते रे. तो डासांच्या प्रेतांचा खच होता. एखादा लाख डास नक्की असतील... हा प्रताप त्या बिस्किटाचा होता. पंधरा दिवस झाले एकही डास घराच्या आसपास फिरकत नाही रे. वा रे, बिस्किट! अशी मस्त झोप लागते म्हणून सांगू. अगोदर रात्री बेडरूममध्ये असे काही अडथळे यायचे ना पण आता बिनाब्रेक सारे मस्तीत चालू आले. वा! वा! काय रंग आहे, बिस्किटांचा! लहान मुलांच्या दृष्टी पडले ना तर एका मिनिटात पुडा फस्त करतील. अम्या, खरे सांगू का, मलाही अनेकदा ती बिस्किटे खाण्याची तीव्र इच्छा झालीय. तुला सांगतो, कधी बायकोसोबत कडाक्याचा वाद झाला ना तर मात्र नक्की त्या बिस्किटाची चव घेईन. अगं...अगं...थांब... हे...काय करतेस? अम्या, ठेवतो नंतर करतो. अरे, तुझी वहिनी लागलीय पाठी, घेऊनी काठी..." म्हणत सुधीरने फोन बंद केला. सुधीरच्या तशा वागण्यावर हसावे की रडावे हे अमितला कळतच नव्हते. एखादी गोष्ट पटली, आवडली तर सुधीर त्याची एवढी स्तुती करायचा ना, की समोरच्या व्यक्तिस वाटायचे, की आत्ताच उठावे आणि बाजारात जाऊन ती वस्तू घेवून यावी. एखादी गोष्ट त्याला आवडली नाही तर तो तितक्याच जोरकसपणे त्याची निंदा, अपप्रचार करायचा. त्याने केलेली निंदा ऐकून ऐकणाराकडे ती वस्तू असेल तर तो रागारागाने उठेल आणि ती वस्तू दुकानदारास वापस करील. मात्र माणसाची निंदा, त्याने केलेल्या पदार्थांवर मात्र तो कधीच टीका करायचा नाही. एकदा एका आंघोळीच्या साबणाची प्रत्येक वाहिनीवर सर्वच वर्तमानपत्रातून जोरकस जाहिरात सुरू होती. ती पाहून सुधीर म्हणाला,

"अम्या, यार या जाहिरातीचे रवंथ पाहून-ऐकून वैतागलो यार. चल, एक-एक साबण आणून तर बघू."

"सुधीर, अशा जाहिरातबाजीला बळी पडू नये रे."

"अरे, आपण कुठे हजार-लाखो रूपयांचा माल खरेदी करणार आहोत? इनमीन पाच रुपयांची तर गोष्ट. काही सांगता येत नाही, असा मालही नंबर वन निघू शकतो." सुधीर म्हणाला आणि दोन साबण घेऊनही आला. अमितने दुसऱ्या दिवशी स्नान करताना तो साबण वापरला. साबण तितका चांगला नसला तरी तसा टाकावूही नव्हता. तो स्नान आटोपून बाहेर आल्याबरोबर सुधीरचा फोन आला,

"हॅलो अम्या, साबण वापरलास का? नाही ना? मग चांगलेच झाले. निदान तुझी वडी वापस करून पाच रूपये तर वाचतील. अरे, मी वापरली रे. बिन वासाचा साबण आहे रे. शिवाय अशी कडक आहे ना की दगड तरी बरा. अर्धा तास अंगाला रग-रगडला पण एक थेंब तर फेस यावा? घासघासूनी अंग नुसते लालभडक झालेय यार. अरे बाप, हे काय सुरू झालेय रे? अरे, अंगाची नुसती आग-आग होतेय आणि खाज पण सुटलीय रे... अमित, आपण नंतर बोलू रे..." म्हणत सुधीरने फोन बंद केला. तितक्यात अमितजवळ त्याची पत्नी अमिता आली. अमितला टॉवेलवर पाहताच रोमांटिक आवाजात म्हणाली,

"वा! काय मस्त सुगंध येतोय. काल आणलेला साबण आहे ना? सुरेख! खरेच सुधीरभावोजींची पसंती म्हणजे ना, अगदी दाद देण्यासारखी. आता आपण हा साबण नेहमी आणू या.”

       सुधीरची आणि अमितची मैत्री तशी फार जुनी. अगदी लंगोटीयार नसले तरी त्यापेक्षा कमी नव्हते. अमितला सुधीरची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक धम्माल आठवत होती. दोघे कॉलेजमध्ये असताना एक दिवस सुधीर सकाळीच अमितच्या घरी गेला आणि म्हणाला,

"अम्या, बघ तर बाबांनी मला ही सायकल घेवून दिली. काय पिकअप आहे म्हणशील. पायडलवर पाय ठेवायला उशीर...शंभरपेक्षा जास्त वेगाने पळते. आत्ता तुझ्याकडे येताना तर रस्त्यात ट्रक, कार, बस काय, जीप नि कार काय... मोटारसायकल आणि स्कूटरला तर असे बघता बघता मागे टाकले. खड्ड्याचा धक्का जाणवला नाही, की चढ चढताना दम लागला नाही. तुला सांगतो, विमानाच्या धावपट्टीवर या सायकलवर बसून धावलो ना तर ही सायकल विमानालाही मागे टाकेल. बरे येतो. अजून खूप जणांना सायकल दाखवायची आहे..." म्हणत सुधीर सायकलवर स्वार होवून निघाला. तितक्यात शेजारच्या छोट्या सुनीलची मिनी सायकल सुधीरला मागे टाकून पाहता-पाहता दूर निघूनही गेली.

    कॉलेजमध्ये सुधीरने एकदा सर्वांची घेतलेली फिरकी अमितच्या कायम लक्षात होती. त्यादिवशी सलग दोन तास रिकामे होते म्हणून त्यांच्या वर्गातले सारे विद्यार्थी बाहेर होते. कुणी वाचनालयात,

अभ्यासकक्षात, कुणी मैदानावर तर काही बागेमध्ये गटागटाने गप्पा मारत असताना सुधीर प्रत्येकाजवळ जात सांगू लागला,

' यानंतरचा तास रिकामा नाही कारण नवीन आलेल्या प्राध्यापिका वर्गावर येणार आहेत. त्याचबरोबर त्याने हाही प्रचार केला की, नवागत मॅडम ह्या तरुण असून खूप सुंदर आहेत. अर्थात ही गोष्ट त्याने कॉलेजच्या भाषेत 'फाकडा' आहेत.' अशी पसरवली. मग काय विचारता, प्रत्येक विद्यार्थी वर्गाकडे धावत सुटला. अवघ्या काही क्षणात त्यांचा वर्ग 'फुल्ल' झाला मात्र मॅडमला पाहताच आपले 'एप्रिल फुल' झाल्याची जाणीव प्रत्येकाला झाली कारण 'त्या'पन्नाशीच्या होत्या.

      शिक्षण संपताच दोघांनाही नोकरी लागली पण त्यांची मैत्री कायम टिकून राहिली. सुधीरच्या आग्रहामुळे दोघांनी एकमेकांशी 'फ्री' असे भ्रमणध्वनीचे दोन कार्ड घेतले. कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली, की सुधीर अमितला ती वस्तू दाखवताना तिची मुक्तकंठाने स्तुती करायचा. त्याची 'प्रमोशन एक्सप्रेस' सुसाट धावायची.

     एके दिवशी सकाळी-सकाळी सुधीर अमितला फोनवर म्हणाला, "अम्या, पंधरा मिनिटात मी तुझ्याकडे पोहचतोय. बाहेर जायचे आहे..."

"अरे, पण झाले काय? सारे ठीक आहे ना? आज रविवार..."

“मग? रविवारी आपण बाहेर जात नाहीत का? अच्छा! आले लक्षात. आता तुझे लग्न झालेय, वहिनीच्या हाताने उटणे लावून स्नान..."

"सुध्या, जिभेला काही हाड? काय काम आहे ते सांगा?"

"ते एक सरप्राईज आहे. तुला तिथे गेल्यावरच समजेल आणि मी येईपर्यंत वहिनीला छान गरमागरम खमंग पोहे आणि फक्कड चहा करायला सांग..." म्हणत त्योन फोन ठेवला.

     बरोबर विसाव्या मिनिटाला त्याची स्कुटी अमितच्या घरासमोर थांबली. आत आल्याबरोबर तो ओरडला,"अम्या, कुठे आहेस रे? झाले का जोडीने स्नान करून? वहिनी, पोहे आणा बरे लवकर..." सुधीर बोलत असताना अमितच्या पाठोपाठ अमिता पोहे घेवून आली.

"वा! वा! पोहे खावेत तर वहिनी तुमच्या हातचे."

"भाऊजी, अजून पोह्याची प्लेट माझ्याच हाती आहे. "

"वहिनी, त्यासाठी खानदानी खवय्याची नजर, वासावरून स्वाद ओळखणारी जीभ असावी लागते शिवाय ज्या दमदार चालीने, आत्मविश्वासाने आणि चेहऱ्यावर समाधान घेऊन तुम्ही पोहे घेऊन येत होतात ना त्यावरूनच मी ओळखले, की पोहे चविष्ट, खमंग, खुसखुशीत, झक्कास झाले असणार. आणा. पटकन आणा. म्हणत त्याने अमिताच्या हातातली पोह्याची प्लेट हिसकावून घेतली. ती दोघे पोहे घेताहेत की नाही हे न पाहताच लगबगीने पोह्याचा एक घास तोंडात टाकून पुढे म्हणाला, "वाटलेच होते मला, वहिनीच्या हातची चव न्यारीच असणार, मजा आया, भाभी मेरी हजार साल जियो और आम्हाला नेहमी असेच..."

"बिन मिठाचे पोहे खायला मिळो..."अमितने अमिताच्या हातावर टाळी दिली आणि पुढे म्हणाला, "बघ, मी जिंकलो ना?"

"म्हणजे ?" सुधीरने विचारले.

"भाऊजी, यांचे म्हणणे असे होते, की मी कसेही पोहे केले तरी सुधीर त्याची तोंड भरून स्तुती करणार. यावर आम्ही पैज लावली होती. त्याच शर्यतीचा भाग म्हणून तुमच्या हातातल्या पोह्यामध्ये मीठ टाकलेच नव्हते. थांबा. दुसरे मीठ टाकलेले स्पेशल पोहे आणते." असे म्हणून हसत हसत अमिता आत गेली. पोहे आणि चहा घेताना त्यांच्या स्तुतीची अनेक आवर्तनं झाल्यानंतर सुधीरच्या स्कुटीवर दोघेजण निघाले. घरापासून थोडे पुढे जाताच अमित म्हणाला,

"सुध्या, खरंच तुझी कमाल आहे रे. अरे, पोह्यामध्ये धडधडीत मीठ नसतानातू एका अक्षराने ते न सांगता तशा पोह्याची स्तुती करत होतास?"

"अमित, मी जर पोह्यामध्ये मीठ नाही हे सांगितले असते तर वहिनीस वाईट वाटले असते अर्थात तो प्रयोग तुम्ही मुद्दाम केला होता म्हणून वहिनी नाराज झाल्या नसत्या पण अजाणतेपणे तसे घडले असते आणि मी ते सांगितले असते तर? अरे, या धावपळीच्या जमान्यात अगोदरच का दुःख कमी आहेत म्हणून आपण अजून त्यांचे दुःख वाढवावयाचे? कसे आहे, माझी विचारधारा जी तू जाणून आहेस, अशी आहे, की जर कुणास काही द्यायचेच असेल तर आनंद द्यावा. दुःख हे पदोपदी, जागोजागी पडलेले आहे..."

"खरे आहे तुझे. जीवनात आनंद फार महत्त्वाचा आहे."

"हे बघ, पोह्यामध्ये मीठ नव्हते हे तुम्हास माहिती असूनही मी त्या पोह्याची स्तुती करत असताना क्षणभर वहिनी ती गोष्ट विसरून गेल्या. त्यांचा चेहरा, डोळे कसे आनंदाने चिंब झाले होते. ते पाहून मलाही खूप आनंद झाला मग चार-पाच शब्द पेरून असे अनोखे समाधान मिळत असेल तर ते तसे अळणी पोहेही मला खमंग लागतील. अमित, तुला एक सांगू का, सध्या जे जाहिरातीचे युग आलेय ना तेही असेच फसवे आहे हे सर्वांना माहिती असूनही सारे जाहिराती पाहतातच ना? कारची जाहिरात पाहताना ती कार आपल्या आवाक्याबाहेरची आहे हा विचार क्षणभर बाजूला पडतो आणि त्या कारचालकाच्या आसनावर मध्यमवर्गीय माणूस स्वतःस पाहतो हे समाधान अवर्णनीय आहे रे."

"बरोबर आहे तुझे.." ते दोघे बोलत असताना नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांची स्कुटी थांबली.

"सुध्या, हे.. हे..इथे कशासाठी आलोत?..."

"अमितमहाशय, हा आपल्या शहरातला सर्वात जलद गतीने विस्तारित होणारा भाग आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी इथे मळे होते. परंतु आज शेतीचा कुठे अवशेष नाही. शहरालगतच्या इतर सर्व बाजूंचा विकास ठप्प झालाय त्याचवेळी या भागास प्रचंड महत्त्व आलेय. प्लॉट, फ्लॅट, रो-हाऊसेस, बंगलोज तसेच कॉलेजेस, विद्यापीठ, दवाखाना, बँका आणि आय टी क्षेत्रातील कंपन्यानी हा भाग पादाक्रांत केलाय. इथे आज लाखोंची गुंतवणूक केली ना तर पुढच्यादोन वर्षात कोटीत लोळशील. आहेस कुठे?" बोलता बोलता दोघे एका मोठ्या प्रकल्पाच्या बांधकामाजवळ पोहचले तसा सुधीर म्हणाला,

"हा बघ. मी बुक करू पाहतोय तो हाच बंगला. या योजनेत हाच एकमेव बंगला असा आहे, ज्यास चारही बाजूंनी रस्ते आहेत. ती बघ ड्रेनेज लाईन.. हे बघ स्ट्रीट लाईट... माझ्या बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूस केवढी मोठ्ठी बाग तयार होतेय. त्या बाजूला गणेश मंदिर होणार आहे. माझ्या बंगल्याच्या समोरच्या रस्त्याला लागूनच खेळाचे मैदान आहे तर त्या बाजूस बघ शाळेचे बांधकाम सुरू आहे..."

“पण सुधीर, एवढ्या चांगल्या लोकेशनच्या बंगल्याचा भाव..."

"अगदी माफक! आज सायंकाळी डिल पूर्ण करावयाची आहे. अरे हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेचे बांधकाम सुरू असलेल्या बाजूस पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू झालेले आहे. अगदी चोवीस तास पाणी मिळणार आहे. आहेस कुठे? शहरात, तुझ्या माझ्या वसाहतीत पाण्याची केवढी टंचाई आहे अगदी पाणी विकत घ्यावे लागते. तू करतोस का एखादा बंगला बुक ?"

"नाही रे. वर्षापूर्वीच कर्ज काढूनच तो फ्लॅट घेतलाय."

"अरे, तो टाकू विकून. असे कर, या रविवारी मी माझ्या आई-बाबांना आणणार आहे. तू वहिनीस घेवून ये."

"ठीक आहे." म्हणत अमित-सुधीर परतले... रविवार पर्यंत सुधीरशी संपर्क झाला नाही म्हणून अमित फोनवर म्हणाला,

"सुध्या, बंगल्याचे काय झाले रे?"

"अम्या, नाही रे फार मोठ्या फसवणुकीतून वाचलो."

"म्हणजे? पैसे भरले की काय?"

"सुदैवाने नाही. आपण त्यादिवशी घरी आलो आणि वर्तमानपत्र बघितले तर त्या योजनेचा सारा पर्दाफाश वाचावयास मिळाला. अरे, ती सारी जमिन सरकारी मालकीची आहे. सारेच भंकस होते यार. तुला सांगतो, ड्रेनेज आहे पण टँक नाही, पाण्याची टाकी होतेय पण पाणी येणार कुठून हे नियोजन नाही. अरे काहीही विचारू नको. वाचलो यार..."

   असेच दिवस जात होते. अमितच्या लग्नास सहा महिने होत असताना सुधीरचे लग्न ठरले. त्याने जास्त नाही परंतु वीस पंचवीस मुली नक्कीच पाहिल्या असणार. त्यातला एक अनुभव तर फार गमतीशीर होता. सात-आठ तासांचा प्रवास करून सुधीर आणि कंपनी त्या मुलीच्या घरी पोहचली. मुलीच्या वडिलांनी अगोदरच सांगितले होते, की तुम्ही फार दुरून येताहात म्हणून आम्ही 'कांदा पोहे' च्या ऐवजी जेवणाची व्यवस्था करतो. सारा स्वयंपाक अगदी चटणी, लोणचेही माझी मुलगीच करेल. त्यामुळे तुम्हाला तिच्या हातची चव हे लक्षात येईल. सारे जेवायला बसले आणि मुलीच्या आईने स्वयंपाकाचे 'प्रमोशन' सुरू केले. अगदी समालोचकाने क्रिकेटचे एक-एक बारकावे सांगावेत त्याप्रमाणे! मुलगी जो पदार्थ वाढण्यासाठी घेई तशी ती माऊली त्या पदार्थाची स्तुती करताना मुलीच्या सुगरणपणाचे कौतुक करताना म्हणाली,

"हे लोणचे आमच्या ताईने खास स्वतः परवाच्या दिवशी अगदी बाजारातून कैऱ्या आणून बनवलेय. अहो, लोणचे करण्यात जन्म गेलेल्या बायकांनी केलेले लोणचे मुरायला कैक दिवस लागतात पण आमच्या ताईचा हातगुण तर बघा, एकाच दिवसात लोणचे कसे मुरलेय आणि किती खमंग झाले."

  मात्र त्याचवेळी ती मुरलेली बाई 'प्रवीण' लोणच्याच्या बरणीतून लोणचे काढत होती. अशा ‘वधू-स्वयंपाक पुराणात' जेवणे होत आली असताना एक मुलगा तिथे आला. पोषाखावरून तो वेटर वाटत होता. तो म्हणाला,

"काका, मालकांनी विचारले की अजून काही पाठवू का? काही नको असेल तर बील घेवून येतो."

   अशा गमतीजमतीत दिवस जात असताना त्यादिवशी सायंकाळी सुधीरचा अमितला भ्रमणध्वनी आला.

"अमित अरे, फार मोठ्ठी भानगड झालीय रे..." त्याचा चिंतायुक्त स्वर ऐकून अमितने विचारले,

"का रे काय झाले? काही टेंशन आहे का?"

"अरे, कसे सांगू यार? मला शिक्षा झालीय रे."

"काऽ य ? शिक्षा? त-तुला? का?"

"काहीही विचारू नकोस, परंतु या महिन्याच्या पंधरा तारखेस मला तुरुंगात जावे लागेल."

"काय झाले ते स्पष्ट सांग. माझा जीव टांगणीला..."

"तुझा जीव टांगणीला लागलाय. प-प-पण...अम्या, अरे एकीने माझे काळीजच चोरलेय पण बघ ना चोराच्या उलट्या बोंबा... चोरी तिने केलीय पण त्याची शिक्षा मात्र मला आजन्म भोगावी लागणार आहे.

"सुध्या, तू असा आहेस ना...जाऊ दे. अभिनंदन! त्रिवार.. हार्दिक... मनापासून अभिनंदन! बरे, एक सांगशील तू पाहिलेली ही कितवी मुलगी आहे?"

"बरोबर सत्ताविसावी आहे म्हणूनच अगदी नक्षत्रासारखी आहे रे."

"खरेच एवढी सुंदर आहे का?"

"काय सांगू तुला? चाँद का तुकडा, रंभा, मेनका, हेमा, ऐश, रेखा, राखी, कत्रीना..."

“अरे, बाप रे! एवढ्या मुलींशी तू लग्न करणार?"

"अम्या, मुलगी एकच आहे रे, पण ब्रह्मदेवाने हिला घडवताना जगातील अति सौंदर्य सम्राज्ञींच्या शरीरातील एक एक कण घेतलाय केवळ माझ्यासाठीच. क्या बात है? वा! मी तर वेडा झालोय. देहभान विसरलोय. सारखा तिचाच देह आय मिन चेहरा समोर येतोय. तहानभूक, झोप, काम सारे सारे विसरलोय काय करू? अम्मू, तू माझा जिवाभावाचा मित्र आहेस ना मग..."

"सुधीरजी, एक सांगा ही तीच स्वयंपाक सुगरण..."

"अरे, यार ती गेली उडत! दोघींची तुलनाच होऊ शकत नाही. 'ऐरावत आणि तट्टाणी' असा फरक आहे. म्हणून तर माझी अशी वेड्यागत अवस्था झालीय. तुला अजून एक सांगू का, ही स्वयंपाकही असा मस्त करतीय ना, की तीन दिवस झाले तिच्या हातचे जेवून पण जिभेवरची सोड अजून बोटावरची चवही गेली नाही."

"एक-एक मिनिट, सुध्या, खात्री केला का रे, स्वयंपाक तिनेच केला होता की हॉटेलातून..."

"नाही रे नाही. आम्ही तिथे पोहचल्यानंतर जेवायचे ठरले त्यामुळे मुलीने स्वतःच स्वयंपाक केला त्यावेळी माझी वहिनी गप्पा मारण्याच्या निमित्ताने तिथेच होती...बसून..."

"मग काय प्रश्नच मिटला."

"प्रश्न मिटला नाही रे. आत्ता खरा

प्रश्न निर्माण झालाय. तिला भेटायची मनोमन इच्छा होते..." 

"अरे, मग जा ना...भेट कडकडून!" 

"ते का सोपे आहे? दहा तासांचा प्रवास आहे."

"आत्ताच थकलास? अरे, आजकालची पोरं डोंगर चढून रोज एकमेकांना भेटतात..."

"प्रश्न तो नाही रे पण इतके दूर गेल्यावर सर्वांना समजेल आणि ही गोष्ट माझ्या घरी आवडणार नाही. शिवाय तिच्याकडे आवडेल का नाही?"

"तो फिर लैला के मजनू सध्या फोनाफोनी चालू ठेवा. का हे ही तिला, दोन्ही घरी विचारावे लागेल? ठेव आता..." म्हणते अमितने फोन बंद केला...

     यथायोग्य, यथासांग आणि नियोजितवेळी सुधीरचे लग्न पार पडले. नवविवाहित जोडपे मधुचंद्राहून परतल्यावर एक-दोन दिवसांनी त्या सकाळी-सकाळी अमितने सुधीरला फोनकेला. “हनिमून वीर उठले का? तुमच्या सकाळच्या..."

"अम्या, आंघोळ झालीय. उपमा खातोय? येतोस? अम्मू, भ्रमणध्नीसारखी अशी एखादी व्यवस्था नाही का रे, की इकडून फराळाचा वा जेवणाचा पदार्थ टाकताक्षणी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तिच्या ताटात... "

"का रे? वहिनी फार सुगरण..."

"म्हणून तर म्हणतोय ना, तिच्या सुगरणत्वाचे चार-पाच घास तुला या क्षणी खावयास मिळाले असते. सुध्या, काय चव आहे यार, उपम्याला? आयुष्यात प्रथमच अशी टेस्ट..."

"कुणाची टेस्ट? उपिटाची की वहिनीची?"

"चूऽप! ये ना रे, उपम्याची चव चाखायला, उपमा संपला न संपला की बघ उकळलेला, वाफाळलेला, गरमागरम चहा आणून ठेवलाय. तुला सांगतो, हिच्या हातचा चहा म्हणजे जणू थेट स्वर्गातले अमृतच! वा! वा! पहिला घोट घेतोय अम्या, काय सांगू यार... अशी सुगरण बायको मिळाली हे माझे भाग्यच रे! हे बघ, मी इकडून फोनमध्ये चहा टाकतो तू टेस्ट तर कर. असे कर ना, तू आणि वहिनी दोघेही संपूर्ण एक दिवस या म्हणजे तुम्हाला माझ्या सौभाग्यवतीच्या हातच्या चहाची, फराळाची, जेवणाची मजा घेता येईल. अम्या, तू माझा सर्वात जवळचा मित्र म्हणून एक गुपित सांगतो अरे, या सर्वावर कडी म्हणजे रात्री तिचा..."

"सुऽध्या, एक-एक मिनिट थांब, तू तुझ्या पत्नीच्या साऱ्या कामाच्या प्रमोशन फंड्यामध्ये एवढा वाहवू नकोस की तिच्या हातच्या चहा- कॉफी-फराळाची, जेवणाची टेस्ट घ्यायला बोलावतोस तेवढे पुरे आहे. नाही तर..."

"म्हणजे?"

"अरे वेंधळ्या, बोलताबोलता साऱ्यांची टेस्ट घ्यायचे निमंत्रण देताना रात्रीच्या तिच्या रिस्पॉन्सची..."

"अऽम्या, थांब..." ओरडताना सुधीरने तणतणत भ्रमणध्वनी बंद केल्याचे अमितला जाणवले आणि तो खो-खो हसत सुटला...

००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy