गुडघ्याला बाशिंग
गुडघ्याला बाशिंग
दुपारचे दोन वाजत होते. आमदार तंटे दिवाणखान्यामध्ये सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. जणू पिंजऱ्यात बंद केलेला वाघ! रागाने, कधी निराशेने तर कधी आशेने चकरा मारीत होते ! तंटे हे राज्यातले बडे प्रस्थ होते. आमदार म्हणून निवडून येण्याची ती त्यांची सातवी वेळ होती. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तंटे यांचा पक्ष सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष ठरला परंतु स्वबळावर सत्ता सुंदरीला वरमाला घालण्यासाठी सक्षम नव्हता. अनेक तडजोडी करतांना, मंत्रिपदाची खैरात वाटताना तंटे यांना मंत्रिपदापासून दूर ठेऊन तंटेची मर्जी राखण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना नक्कीच खुर्ची मिळेल असे गाजर कायम लटकवून ठेवले होते. एकनिष्ठ म्हणून ख्यातकीर्त असलेले तंटे त्या गाजराकडे पाहूनच वाटचाल करीत होते. ते गाजर मोडताही येत नव्हते आणि खाताही येत नव्हते. कधी नव्हे तंटे विवश होवून सारे पाहत होते. विरोधकांकडून त्यांना सतत उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव येत होता. तसा मैत्रीपूर्ण दबाव वाढत होता परंतु बंड करून काहीही पदरात पाडून घ्यायचे नाही असा एक थंड विचार ते आपल्या सहकारी आमदारांना, अनुयायांना देत होते.
काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी असा एक अनधिकृत फतवा अधिकृतपणे राजकीय वर्तुळात सोडला होता, की आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या बातमीमुळे तंटे यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांना मंत्रिपद मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. तशी चर्चाही राजकीय आखाड्यात, वाहिन्यांच्या रणांगणावर, वर्तमानपत्रांच्या रकान्यांमधून सुरू झाली. ते सारे ऐकून, वाचून तंटे यांच्या समर्थकांच्या झुंडी तंटेच्या आलिशान बंगल्यावर येत होत्या. त्यांच्या जयजयकाराचे नारे गगन भेदू पाहत होते. दोन दिवसांवर शपथविधी सोहळा आलेला असताना तंटे यांना पक्षातर्फे अधिकृत निरोप आला नव्हता. इतर इच्छुकांना आणि संभाव्य यादीमध्ये ज्यांचा समावेश होता त्यांना 'तयार रहा. मुंबई आणि दिल्लीकडे डोळे लावून बसा.' असा अनधिकृत निरोप आला होता. त्यामुळे आमदार तंटे साशंकता, आशा निराशेच्या गर्तेत चकरा मारत हाते. कार्यकर्त्यांनी ती भली थोरली बैठक खचाखच भरली होती. तंटे यांचा भ्रमणध्वनी वाजताच बैठकीत 'पीन पडे शांतता' पसरत असे पंरतु दूरध्वनी दुसऱ्याच कुणाचा आहे हे समजताच जणू जखमेवर मीठ पडल्याची भावना प्रत्येकाच्या मनी उफाळून येई.
"साहेबांना यावेळी मंत्रिपद मिळायलाच हवे."
"मिळेल. नक्कीच मिळेल. कोणत्याही गोष्टीस वेळ यावी लागते. "
"कधी आणि केव्हा? हा साहेबांच्या सोशिकतेचा अंत पाहिल्यासारखे होतेय. साहेबांच्या जागी दुसरा कुणी असेल तर एव्हाना विरोधीपक्षास सत्तेवर बसवून स्वत उपमुख्यमंत्री झाले असता."
"हे मात्र खरे आहे. साहेब, थंड डोक्याचे. एकनिष्ठ म्हणजे काय याचे जितजागते उदाहरण म्हणजे साहेब! पक्षाची तनमनधनाने सेवा केलीय. दोन महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवते?"
"सीएम मॅडमला सर्दी झालेला?"
"तोच तो. राज्यात थंडीची लाट पसरली होती. अनेक शहरात शून्य अंशापेक्षा कमी तापमान होते. तशात सीएम मॅडमला सर्दी झाल्याची वर्दी येताच साहेब परेशान झाले. त्यांनी लगोलग फर्मान काढून मतदारसंघात सर्वत्र प्रार्थनांचे आयोजन केले."
"हो. अगदी तांडा, वस्ती, गावागावातून प्रार्थना झाल्या. मतदारसंघातील एकूण-एक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा इत्यादी प्रत्येक ठिकाणी विशेष प्रार्थना केल्या गेल्या. त्याचवेळी स्वत: साहेबांनी काय केले ते आठवते?"
"का नाही ? इतर नेते आदेश काढून सारी कामे कार्यकर्त्यांकडून करवून घेतात परंतु साहेब स्वतः रणांगणावर उतरतात. 'तुम लढो हम कपडे संभालते' अशी भूमिका साहेबांची कधीच नसते."
"तो प्रकार आठवला, की आत्ताही अंगात थंडी भरून काटा येतो. सीएम मॅडमची सर्दी कमी व्हावी म्हणून साहेब तशा कडाक्याच्या थंडीमध्ये कम्प्लीट अठ्ठेचाळीस तास गणपती मंदिरासमोरच्या तळ्यामध्ये उभे होते..."
"इतके करूनही सीएम मॅडम सिग्नल देत नाहीत..."
"का...य?"
"अहो, मंत्रिपदाचा सिग्नल म्हणतोय मी..." तंटे यांच्या बैठकीत, इमारतीच्या बाहेर आणि मतदारसंघात जागोजागी तीच एकमेव चर्चा होती, की संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात तंटेना संधी मिळेल का ?
"मी सांगतो, जर यावेळी साहेबांना डावलले ना तर साहेबांनी वेगळा निर्णय घेऊन स्वतःची शक्ती दाखवून द्यावीच. असे हातावर हात देवून 'थांबा पहा' हे धोरण सोडून द्यावे, नखे काढलेल्या वाघासारखे वागून उपयोग नाही, शेंडी तुटो वा पारंबी याप्रमाणे एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. साहेबांनंतर पक्षात आलेले लोक वर्षानुवर्षे मंत्रिपदाची खुर्ची उबवताहेत. तितकेच कशाला स्वतः सीएम मॅडम सहा महिन्यांपूर्वी विरोधीपक्षातून आपल्या पक्षात आल्या. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत अगोदर होत्या तेवढ्याही सीट निवडून आल्या नाहीत तर बाईला सीएम पद ? हा काय न्याय झाला?"
"हे पक्षश्रेष्ठी म्हणजे अवघड जागेचे दुखणे असते."
"अहो, श्रेष्ठी असे वागतात म्हणून लोक आपल्याबद्दल काहीही बोलतात. आजचा पेपर वाचला? एक कविता आलीय. ऐका..." म्हणत त्यांनी बॅगेतून वर्तमानपत्र काढले आणि ती चारोळी वाचली,
"आमदारांचा मूलभूत अधिकार डावलून
जनतेच्या बोकांडी नको तो मुख्यमंत्री --
लावणारी व्यक्ती म्हणजे हायकमांड ! "
"खरे आहे हो."
"मी म्हणतो, हीच वेळ आहे, दिल्लीकरांना खरे रूप दाखविण्याची. आजही स्वबळावर सत्ता ही आपल्या पक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. जे काही ३८-४० आमदार निवडून आले आहेत त्यापैकी पंधरा आमदार नक्कीच साहेबांसोबत यायला तयार आहेत... एका पायावर ! साहेबांनी केवळ इशारा करायची गरज हे सरकार एका क्षणात गडगडेल, बाईच्या डोक्यावरचा मुकुट उतरायला वेळ लागणार नाही."
"सीएम पदी बाई आहेत आणि शिरस्त्याप्रमाणे दिल्लीश्वरांचा निर्णय शिरसावंद्य म्हणून चाललेय सारे."
"साहेबांचा एवढा दरारा, आदर असूनही साहेब शांत का?"
"अहो, जुनजाणते, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत."
"साहेबांपेक्षा जुने असलेले मोडे गेल्यावेळी फुटलेच ना?"
"पण त्यांच्या पदरात काय पडले. दोन महिने आधी मंत्रिपदाची खुर्ची सोडली आणि कालच्या निवडणुकीत सपशेल तोंडावर आपटले."
"आपल्या नेत्याचे तसे नाही. मतदारसंघातील माणसा-माणसाची त्यांना ओळख आहे. कार्यकर्त्याचे प्रचंड जाळे आहे. प्रत्येकाच्या अडी-अडचणीस धावून जातात."
दिवाणखान्यात येरझारा घालणाऱ्या तंटेंचा भ्रमणध्वनी वाजला. तशी तंटे यांची पावले थबकली. त्यांनी भ्रमणध्वनीवर नाव पाहताच त्यांचा चेहरा खुलला.
"अरे, थांबा, सीऐम मॅडमचा फोन आहे..." कार्यकत्यांना आनंदाने ओरडून सांगत तंटे मोबाईलवर म्हणाले,
"मॅडम, नमस्कार.."
"तंटे, मी मॅडमचा पी.ए. बोलतोय. उद्या सकाळी अकरा वाजता मॅडमनी तुम्हाला भेटायला बोलावले आहे."
"वा ! वा! आभारी आहे. शपथविधी परवा आहे ना?"
"हो. बहुतेक. वेळेवर या. ठेवतो." म्हणत पीएने फोन ठेवताच तंटे आपल्या भल्याथोरल्या पलंगवजा खुर्चीवर जावून बसताच एका कार्यकर्त्याने ललकारी दिली...
"बोला, तंटे साहेबांचा..."
"विजय अऽसो..." त्यास जोरदारसाथ मिळाली.
"देवून देवून देणार कोणास..."
"तंटेसाहेबांशिवाय दुसरे कोण?"
बैठकीत अशी घोषणाबाजी सुरू असताना एक-दोन माणसे बाहेर आली आणि त्यांनी आनंदातिशयाने हाताची दोन बोटे 'व्ही' या प्रमाणे दाखवून बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना संदेश देताच तिथे आनंदाचे उधाण आले. सर्वत्र घोषणांचा महापूर आलेला असताना तंटे यांनी हाताच्या इशाऱ्याने शांत केले. लगेच एक समर्थक उठले. त्यांच्या हातात नेहमीच असणाऱ्या बॅगमधून शाल आणि सूताचा हार काढून त्यांनी तंटेचे स्वागत केले. इतरांनीही त्यांचे अनुकरण केले. ज्यांच्याजवळ शाल, हार नव्हते त्यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना बाजारात पिटाळून व्यवस्था केली. कुणी तरी लांबसडक, मोठ्या आवाजाच फटाक्याची माळ लावली. सर्वत्र भ्रमणध्वनी वाजू लागले. त्यावर संदेश जाऊ लागले.
"साहेब आपल्या एकनिष्ठेस फळ मिळाले."
"जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे प्रेम यामुळेच हे शक्य झाले."
"आता शांत बसायचे नाही. श्रेष्ठींना स्वतःच्या एकनिष्ठत्वाचा इंगा दाखवूनच द्यायचा. जनता आणि हायकमांडही सीएम मॅडमवर तसे नाराजच आहेत. त्यांचेजवळ पर्याय नव्हता म्हणून बाईंची सत्ता टिकून आहे. तुमच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळालेय. मॅडमच्या आजारपणाचा फायदा घेवून बाईंना लोळवायचे म्हणजे खुर्चीवरून उतरावयाचे..."
"थांबा. थांबा. भिंतीलाही कान असतात. भिंतीला लागूनच वाहिन्यांचे जाळे असते तेव्हा आत्ताच भविष्याची चर्चा नको..." तंटे बोलत असताना शहरातील बडे नेते अगदी विरोधी पक्षाचेही, व्यापारी, बिल्डर्स इत्यादींचे आगमन सुरू झाले. काही तासातच शहराच्या दुकानातील शाली, हार, पेढे-मिठाई, फटाके संपले. मतदारसंघातून दूरवरून लोकांचे जत्थेच्या जत्थे निघाल्याचे संदेश मिळाले. अनेक आमदार मित्र तंटेसोबत शपथविधी सोहळ्यास जाण्याच्या तयारीने आले होते. गावागावातून कार, जीप आणि स्पेशल ट्रॅव्हल्स गाड्या भरभरून निघत होत्या.
"साहेब अभिनंदन आता पुढले पाऊल ?" वाहिन्यांच्या सागरातील एका पत्रकाराने विचारले.
"पाऊल काय असणार मी कुठेही असलो तरी माझे ध्येय एकच... जनसेवा! जनतेने मला वारंवार संधी दिलीय त्यामुळे त्यांची कामे हे माझ्या जीवनातील एकमेव उद्दिष्ट आहे आणि पुढेही असणार आहे. मंत्रिपद कायम नसते. जनतेचे प्रेम, साथ कायम असावी हेच माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षाही मोठे आहे."
"मंत्रिपदी झालेली निवड याचे श्रेय कुणास द्याल."
"अर्थातच जनतेला शिवाय पक्षश्रेष्ठींच्या विश्वासास!"
"तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी अनेक पक्षांच्या टेकूंमुळे ते चालू आहे. अशा परिस्थितीत तुमचे प्राध्यान्य..."
"जनतेची कामे. शेवटी सरकार ते सरकार! पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक पक्षाला सरकार टिकावे असेच वाटत असणार ना ? शेवटी सत्ता ही सत्ताच असते. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही."
"गेली अनेक वर्षे तुम्ही सातत्याने निवडून येताहात, अत्यंत अडचणीच्या काळातही तुम्ही पक्ष सोडला नाही त्याचे फळ तसे उशिरा..."
"मुळीच नाही. 'इंतजार का फल मीठा होता है।' सगळ्या गोष्टींना एक वेळ येवू द्यावी लागते. म्हणतात ना, 'वक्त से पहले और तकदीर से ज्यादा मिलता नही।"
"विरोधीपक्षासोबत संबंध कसे राहतील?"
"आज जसे आहेत तसेच. ठीक आहे. लवकर निघायचे आहे. तेव्हा आपण नंतर बोलूया. नमस्कार..." असे म्हणत तंटेनी सर्वांचा निरोप घेतला...
कार्यकर्त्यांचे सत्कार स्वीकारून आमदार घरात गेले त्यांच्या सौभाग्यवती हातामध्ये ओवाळण्याचे ताट घेवून त्यांची वाट पाहत होत्या. त्यांनी ओवाळताच तंटेंनी विचारले,
"बोला बाईसाहेब, काय हवय ? ओवाळणी द्यावी लागेल ना?"
"आता आणिक काय देणार ? सम्दं तर देलय. आता तर आम्हासनी मंत्रिणबाई बनवलं. अव्हो, पर येक सांगा, तुमच्या मंत्रिमंडळात येकच बाई हाय आन ती बी मुख्यमंत्री मग इतर बायांचं काय?
"अहो मॅडम, काय विचार आहे ? आमची खुर्ची तर पटकावयाची नाही?"
"छे हो! मला त्यातलं काय कळतं? पर म्या काय म्हन्ते, म्या बी येते की तुम्ही शपथ कशी घेता ते पाहायला."
"आत्ताच नको. मंत्री झाल्यावर बंगला मिळेल, गाडी मिळेल आणि एक सेक्रेटरी पण मिळते. "शेक्रेटरी बी ? बी बाईच आसती की काय?"
"असे काही नाही पण जास्त करून बाईच असते."
"त्ये काय न्हाई. बाई नग म्हंजी नग. बाई म्हन्लं की तुमची जीभ आणि खिसा लईच ढिला सुटतो..." "बरे झाले, बाईचा विषय काढला..."
"गप ऱ्हावा. चांगल्या कामाला चालल्यात तर बाई बाई करू नका. तुमास्नी सांगत्ये, त्या शीएम्म मड्डमच्या बी जास्त मांघ-माघं फिरू नका. शेहरातली बाई हाय..."
"अहो मंत्रिणबाई, तिथे आम्ही काम करायला चाललोत. उगाच.."
"तुमच काम मला चांगलं माहिती आहे..." तंटेबाई बोलत असताना तिथे आमदार तंटेंचा खास माणूस, उजवा हात, पीए अशी सारी पदे भुषविणारा खोडे आला.
"साहेब, खूप जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. मी सारे लिहून ठेवलेय. शिवाय मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून माणसं स्वखर्चाने शपथविधीसाठी येत आहेत."
"अहो. पण..."
"साहेब, जनतेचा जीव आहे तुमच्यावर. येवू द्या. त्यामुळे श्रेष्ठींना आपली किंमत, वजन सारे सारे कळून चुकेल. कदाचित उद्या मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यासाठी..."
"वा! खोडे, शाब्बास ! मग गावोगावी जीप पाठवा. झालेच तर एस.टी. बुक करा. भरपूर माणसे नेवू या."
"साहेब, आता मंत्री झाल्यावर तुम्हाला चार-पाच सेक्रेटरी, कारकून, शिपाई भेटतील. मग माझे काम असणार..."
"खोडे, असे कसे होईल ? अहो, कितीही झालं तरी ती सगळी सरकारी माणसं. ते पेनने बोलतात म्हणे. केव्हा, कशी पेनने खुंटी मारून ठेवतील समजणार नाही. एक खाजगी पीए असतो..."
"व्वा ! साहेब, वा ! मी मंत्रीसाहेबांचा पीए होणार. साहेब, केलेल्या कष्टाचे चीज झाले बघा. तुमचे उपकार..."
"खोडे असे काय म्हणता ? अहो, तुम्ही माझे उजवे हात आहात. तुमच्याशिवाय त्या तिथे विश्वासू माणूस कोण असणार आहे?"
"साहेब, तुम्ही आता मंत्रिपदाची शपथ घ्यायला जाणार. मी भटजींशी बोललो. त्यांनी सांगितलयं, की साहेब घरातून बाहेर पडतील तेव्हा दोन्ही बाजूस एकवीसशे बायका उभ्या करा. त्यांच्या हातात ओवाळायचे ताट असू द्या."
"अहो, पण खोडे, एवढ्या बायका जमविणे म्हणजे?"
"हे काय साहेब ? बायकांची काय कमी आहे ?"
"तर मंग ? बाया जमविण्यात खोडेंचा आन् नाचविण्यात, खेळविण्यात
तुमचा हातखंडा हाय की."
"वैनीसाब, तुमचं आपलं काहीतरीच..."खोडे लाजत म्हणाले.
"खोडे, तुम्हा दोघास्नी मी आज वळखत न्हाई."
"पण एवढी तयारी होईल?"
"साहेब, झाली पण असेल. बाहेर तीन येक हजार माणसं जमली होती. तुम्ही तयार होवून येईपर्यंत एकवीसशे म्हणतानी अडीच हजार बाया येतील."
"बरे, शहरात आणि मतदारसंघात पेढे, साखर वाटायची "
"तयारी झाली साहेब, माणसे कामालासुध्दा लागली आहेत."
"व्वा ! खोडे, तुमचे नियोजन म्हणजे ना बरे, त्यासाठी पैसा.."
"साहेब, तुमच्या कामासाठी आणि अशा आनंदाच्या कामासाठी का माणसे पैसे घेतात ? स्वतःचा पैसा खर्च करून लोक पेढे वाटून फटाके वाजवताहेत. बाया-माणसे नुसती नाचताहेत."
"का नाही नाचणार ? बायकांचे आवडते कैवारी आता मंत्री होणार म्हटल्यावर सम्द्यांचा आनंद ओसंडून वाहत असणार."
"बरं ते जावू द्या. आमची बॅग..."
"चार बॅग गाडीत जावून बी बसल्यात."
"वा ! वा ! गृहमंत्री, वा ! तुम्ही अशा कर्तव्यदक्ष आहात म्हणून आम्हाला आजचा दिवस बघायला मिळतो."
"साहेब एक आठवलं, मंत्रिपद मिळाल्यावर गृहखातेच घ्या. तुम्हाला शोभून दिसेल ते. तुमचं आन् पोलिसाचं लय जमते. सर्वांना अगदी गुन्हेगारांनाही सांभाळून घेणारा माणूस दुसरा कोणी नाही."
"बघू. चला. बरे, मंत्रिणबाई, आम्ही येतो शपथ घेऊन..."
"मग जाणार कोठ ? कुठे बी गेलात तरी आखरीला माझ्याकडेच याव लागणार. या लवकर. मी वाट बघते."
आमदार तंटे घराबाहेर पडताच घरासमोर जमलेल्या हजारो लोकांमध्ये उत्साहाचे उधाण आले. घोषणांना ऊत आला. खोडे म्हणाल्याप्रमाणे हजारो स्त्रीया हातात ताट घेवून दुतर्फा उभ्या होत्या. सुरूवातीच्या अकरा बायकांकडून तंटेंनी ओवाळून घेतले. सर्वांकडून ओवाळून घेण्याएवढा वेळ नव्हता म्हणून हात जोडलेल्या अवस्थेत तंटे कारकडे निघाले असताना इतर स्त्रियांनी जागेवरूनच त्यांच्या दिशेने हळद-कुंकू-अक्षता फेकून त्यांना ओवाळले. तंटेसोबत शहरातून शेकडो वाहनातून दीड-दोन हजार कार्यकर्ते निघाले. मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते निघाल्याच्या बातम्या येत होत्या. विविध वाहिन्यांनी तंटे यांच्या मंत्रिपदाचा शक्यतोवर विशेष वार्तालाप, खास चित्र, तंटेंचा जीवनपट असे विविधांगी कार्यक्रम दाखविण्यास सुरुवात केली..
'तटे यांचा विजनवास संपला...'
'तंटे यांचे पक्षश्रेष्ठी समोर आव्हान !'
'मुख्यमंत्रीपदाकडे तंटेची पावलं !'
'तंटेसोबतची पाहनी गर्दी, कोणास झाली सर्दी?'
अशा नानाविध शीर्षकांतर्गत कार्यक्रमांची रेलचेल होती. राजधानीत तंटे समर्थक आमदारांनी आपापल्या कार्यकर्त्यांकडून शहरात जागोजागी बॅनर्स, तंटे यांचे कटआऊटस् लावून सारे शहर तंटेमय करून टाकले. तिकडे विरोधकांनी तंटेच्या शपथविधीवरून रान पेटविले, तंटेची मंत्रिपदी निवड करून श्रेष्ठींनी विरोधकांच्या शिडातील हवाच काढून घेतली. तंटे हे मंत्री नसताना सर्व विरोधी नेत्यांना एक कायम आशा होती की, स्वत:वरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी तंटे आपल्या समर्थकांसह विरोधी तंबुमध्ये येतील. सरकार गडगडेल आणि सरकार स्थापनेसाठी विरोधकांना संधी मिळेल. परंतु तंटे मंत्रिपदी विराजमान होणार या बातमीने विरोधकांची जणू बोलती बंद झाली. विविध वाहिन्यांवरील चर्चेमध्ये सहभागी होताना विरोधीपक्षांच्या प्रतिनिधींनी होऊ घातलेला विस्तार कसा अनावश्यक होता हे पटवून देताना तंटे ऐवजी सरकार पक्षातील इतर काही नेते मंत्रिपदासाठी कसे लायक होते हे घसा खरडून सांगतांना त्या आमदारांना स्वत:कडे वळविण्याचा प्रयत्न केला. संभाव्य विस्तारामध्ये स्त्री आमदारास स्थान न दिल्याबद्दल सरकार पक्षावर टीकेचे आसूड ओढले. सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या पक्षांनीही आमच्या पक्षास सत्तेत यावेळी वाटा न मिळाल्याबाबत दुःख व्यक्त केले. सत्तेतील प्रमुख पक्ष मंत्रिमंडळ विस्तार करून स्वत:चे स्थान बळकट करू शकतो तर इतर पक्षांनाही सत्तेमध्ये अधिक वाटा हवा आहे हे प्रत्येकाने अधोरेखित केले.
सकाळी साडेआठ वाजता तंटे यांचे राजधानीमध्ये आगमन झाले. त्यांच्या समर्थक आमदारांनी जागोजागी त्यांचे स्वागत केले. वर्तमानपत्रातील रकाने तंटे यांच्याच बातमी भरभरून वाहत होते. जवळपास दहा हजारांच्या आसपास तंटेसमर्थक पोहचल्याचे वाहिन्यांनी वारंवार दाखविले. सोबत समर्थकांच्या प्रतिक्रिया दिल्या.
"राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस."
"खऱ्या अर्थाने आता राज्याचे विकासपर्व सुरु होईल."
"तंटेसाहेबांनी थांबू नये. मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे."
"येणारी लोकसभा जिंकून दिल्लीवर वारी करून पंतप्रधानपद मिळवावे." स्त्री-पुरुषांच्या मुलाखतींचे रवंथ सुरू असताना तंटे काही खंदे समर्थक आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले.
"या बसा. मॅडमची पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु आहे. तुम्हाला बोलावतील." मुख्यमंत्र्यांचे पी.ए. म्हणाले.
"दिल्लीहून श्रेष्ठी आले आहेत?"
"होय. सकाळीच. दोन तासांपासून त्यांची बैठक सुरु आहे."
"उद्या शपथविधी किती वाजता आहे ?" एका आमदाराने विचारले.
"होईल. बाईसाहेब सांगतील." म्हणत पी ए. आत गेले.
"पक्षश्रेष्ठी अचानक कसे आले म्हणावे ?"
"तंटेसाहेब, पक्षश्रेष्ठींचे आगमन आणि आपणास आमंत्रण याचा अर्थ लागत नाही हो. मला एक शंका येते "
"कोणती ?" अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला.
"नाही. तसे नाही. मला वाटते, मॅडमचा राजीनामा घेण्याची तयारी सुरु असावी."
"म्हणजे ? उद्या तंटेबसाहेबांचा शपथविधी होणार नाही?"
"तो तर होणारच पण मुख्यमंत्री म्हणून होईल अशी चिन्हे दिसतात."
"तुमच्या तोंडात साखर पडो. तंटेसाहेब, अॅडव्हान्स अभिनंदन ! यावेळी आमची आठवण ठेवा. मंत्रिमंडळातले तेच तेच चेहरे थोडे कमी करा. नव्या दमाची, ताजीतवानी टीम मदतीला द्या." "तंटेभाऊ, तेहतीस टक्के सोडा पण किमान दहा बारा टक्के महिला घ्या बरे..." एक महिला आमदार आर्जवी स्वरात म्हणाल्या. बैठकीतल्या चर्चा रंगत होत्या मात्र तंटे यांचे 'ठोके' वाढले होते. तिथे पोहचून दोन तास होत होते. अधूनमधून पी.ए. डोकावयाचा पण सांगत काही नव्हता. पक्का आतल्या गाठीचा होता. चेहऱ्यावरील रेषाही हलू देत नसे. मुख्यमंत्र्यांचा अत्यंत विश्वासू म्हणून त्याची गणना होती. बरे तसेच आत जावे तेही योग्य नव्हते.
"तंटेसाहेब, अस्वस्थ असतात ? काही विशेष?"
"काही नाही. पण आत बराच वेळापासून बैठक चालू आहे "
"जावून पाहू काय? हा पीए की नाही असा आहे ना... कधी कधी असा राग येतो ना याचा पण करणार काय? बाईसाहेबांच्या तळहातावरचा फोड आहे."
"थांबा. असा त्रागा करू नका. आपण म्हणतो तसे नसेलही..."
"आत कोण आहे तेही समजत नाही. आपला कुणी हस्तक असला तर फोनवर बाहेर बोलावून माहिती मिळवली असती."
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर थांबलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या बातम्या देवून राज्यात साशंकता पसरवली.
"तंटे यांचा घोर अपमान."
"तंटेंना अनेक तासापासून ताटकळत ठेवलेय."
"तंटेंच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह ?"
"बंद खोलीमध्ये काय घडतेय ?"
"मुख्यमंत्र्यांची गच्छंती होणार काय?"
"आगामी मुख्यमंत्री तंटे की अजून कुणी?"
"तंटे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर इतर सहभागी पक्षांना रूजेल का?"
"काही महिन्यांपूर्वीचे सीएम अस्थिर का?"
"मुख्यमंत्र्यांना होणारी सर्दी तंटेंच्या पथ्यावर पडली का?"
"राज्यात नेतृत्व बदलाची दाट शक्यता." अशा नानाविध चर्चा रंगत असताना तंटेसमर्थकांनी
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी सुरु केली.
"तंटसाहेबांचा अपमान खपवून घेणार नाही."
"आम्ही भीक मागत नसून आमचा हक्क मागतोय."
"तंटेसरांची योग्यता आणि अधिकार जाणून घ्या." तंटे यांनी इशारा करताच काही आमदार बाहेर धावले. त्यांनी लोकांना शांत बसण्याचे आवाहन केले. दो मनाने जमाव थंडावला.
दुपारचे तीन वाजत होते. तंटेसमर्थक प्रतिक्षालयात तासनतास बसून होते. तितक्यात बाहेर आलेले पी.ए. म्हणाले,
"या. तंटेजी, या..." तंटेसोबत इतर व्यक्ती उठल्याचे पाहून ते पुढे म्हणाले,
"बाकी कुणीच नाही. फक्त तंटेनांच बोलावलयं."
हाताच्या इशाऱ्याने सर्वांना थांबवून तंटे आत गेले. तिथे दिल्लीकर नेत्यांसह राज्यातले काही वरिष्ठ नेते बसले होते₹
"या. तंटेसाहेब, या." कुणीतरी म्हणाले. नमस्काराच्या देवाणघेणीनंतर तंटे खुर्चीवर बसताच एक दिल्लीकर म्हणाले,
"हे चाललय ? एवढे शक्तीप्रदर्शन कशासाठी?"
"नाही, तसे नाही. हा आनंदोत्सव आहे. लोक स्वखुशीने, स्वयंस्फूर्तीने आणि स्वखचनि आले आहेत. "आनंदोत्सव ? तंटे, तुमच्यामुळे सरकार जाण्याची वेळ आलीय."
"तुमच्यासारख्या जुन्या, जाणत्या, एकनिष्ठ व्यक्तिकडून ही अपेक्षा नव्हती. कशासाठी बोलावले
"अहो, काय झाले ? मला कशासाठी बोलावले आहे? शपथविधी..."
"तो होईलच. तुम्हाला कोणत्या खात्याची अपेक्षा आहे?"
"कोणतेही चालेल, परंतु मला महसुलाची आवड असली तरी लोकांचा आग्रह गृहखाते घ्यावे..."
"महसुलच का ? स्मशानभूमी..."
"थांबा. थांबा. तंटे, मला एक सांगा तालुक्याच्या गावी तुमचा एक आलिशान बंगला आहे म्हणे."
"हो, हो आहे. हजारो एक्कर जमिनीवर सर्व सोयींनी युक्त असा बंगला आहे. उद्या शपथविधी झाला, की आपणा सर्वांना नेणारच आहे. साहेब, वडिलोपार्जित श्रीमंत आहे. सात पिढ्या बसून खातील
अशी दौलत आहे. जाऊ सगळे बंगल्यावर."
"बंगल्यावर की स्मशानभूमीत ?"
"म्हणजे?" तंटेंनी अविश्वासाने विचारले.
"मिस्टर तंटे, त्या बंगल्याची जागा कुणाची आहे?"
"कुणाची म्हणजे ? माझीच. दुसऱ्या कोणाची असणार?"
"काय विश्वासाने बोलता ? ती जागा स्मशानभूमीची नाही का?"
"कोण म्हणतेय ?"
"ही कागदपत्रं बोलतात. पहा..." म्हणत मॅडमने एक पंजिका तंटेंच्या दिशेने सरकावली आणि म्हणाल्या,
"बरे झाले. ही कागदपत्रे माझ्या माणसांनी माझ्याकडे दिली. ही जर विरोधकांकडे गेली असती तर त्यांच्या हातात कोलितच सापडले असते..."
"अच्छा! सी.एम. मॅडम असा डाव आहे का? माझ्या मतदारसंघात माणसे सोडली होती का?"
"हे खोटे आहे का? जागा स्मशानभूमीची नाही का?"
"असेल हो. त्यात काय एवढे ? तुमच्यापैकी कुणी काहीही बळकावलेले नाही का? माझी माहिती मिळण्यापूर्वी जरा स्वतःचा कारभार तपासला असता तर? मुख्यमंत्री झाल्यावर आपण घेतलेला निर्णय आठवतोय?..."
"तो मामला आणि निर्णय माझा आहे म्हटलं..."
"काय तर म्हणे सौंदर्य प्रसाधनाच्या अभावामुळे खेड्यातील मुली सुंदर दिसत नाहीत म्हणून मॅडम, तुम्ही ग्रामीण भागातील मुलींना लिपस्टीक आणि इतर साहित्यासह खेड्यामध्ये ब्युटीपार्लरची खास प्रशिक्षणे घेतली होती. कोट्यावधी रूपये मातीत गेले. फायदा शून्य ! आपले हे जुनेजाणते क्रमांक दोन म्हणून मिरवणारे नेते. यांनी काय केले ? आरोग्य केंद्रामध्ये निरोध वाटण्याचे टेंडर देतांना..."
"शांत व्हा. तंटे संयमाने घ्या."
"मला येथे कशासाठी बोलावले आहे ? शपथविधी..."
"तंटेसाहेब, मी तुम्हाला 'या' असे म्हणालो. बाकी काही बोललोच नसताना तुम्हीच ध चा मा करून, गुडघ्याला बाशिंग बांधल्याप्रमाणे वाजतगाजत, बॅनर लावून आलात..."
"पी.ए. स्वत:च्या औकातीत राहून बोला."
"तंटे, शांत राहा. आपण हे जे काही केलेय ते आम्हास बिल्कुल आवडलेले नाही. तुम्ही जी लगीनघाई दाखवलीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मशानभुमीसारखी संवेदनशील जागा आपण हडपलीत त्यामुळे आपणास पक्षातून सहा वर्षांसाठी..."
"परंतु आपण जुने, पक्षनिष्ठ, एकनिष्ठ असे आमदार आहात. शिवाय तुम्ही आज जी जनशक्ती दाखवून दिलीत त्याचा विचार करता आपणास तूर्त मंत्रिमंडळात घेणे शक्य होणार नाही. आपले हे स्मशानभूमी प्रकरण इथेच दफन केले जाईल. आपण आपल्या समर्थकांसह पाच वर्षे शांत राहावे. पुढल्या निवडणुकीत पक्षास बहुमत मिळाले तर आपला अग्रक्रमाने विचार होईल..."
"तोपर्यंत अनधिकृतपणे तुम्हाला पक्षातून अर्धचंद्र दिला आहे असेच समजावे. समर्थकांसह आपण इथून शांतपणे प्रयाण करावे. ही पंजिका पक्षाकडे सुरक्षित राहील." श्रेष्ठी निर्वाणीचे म्हणाले. तसे तंटे थकल्या पावलांनी बाहेर आले. बैठकीतले समर्थक काही विचारण्यापूर्वीच तंटे म्हणाले,
"चला. बाहेर बोलावेच लागेल."
ते बाहेर येताच टपून बसलेल्या पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तसे ते शांतपणे म्हणाले,
"तुम्हाला खरे सांगू का? मंत्रिपद वगैरे मध्ये रमणारा माणूस मी नाही. मला आपलं जनतेमध्ये मिसळून लोकांची कामे करायला..."
"याचा अर्थ तुमचा सरकारमध्ये समावेश होणार नाही?
"तसे नाही. पक्षश्रेष्ठी सहर्ष तयार आहेत. पण मीच अशी इच्छा प्रदर्शित केली, की अजून काही महिने, वर्षे मी पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला माहिती आहे, सध्याच्या विधानसभेमध्ये आमचे फार कमी आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे श्रेष्ठींना मी तसे स्पष्ट सांगितले. तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेस असे आवाहन... विनंती करतो, की सर्वांनी माझा स्वयंस्फूर्त निर्णय शांतपणे स्वीकारून अशीच सेवा करण्याची संधी यावी..." म्हणत आमदार तंटे तिथून घाईघाईने बाहेर पडले...
००००