Nagesh S Shewalkar

Comedy Drama


3.0  

Nagesh S Shewalkar

Comedy Drama


पंचतारांकित स्वप्न **

पंचतारांकित स्वप्न **

9 mins 1.5K 9 mins 1.5K

             

   त्या मोठ्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वसाहतीत सर्व जाती-धर्, विविध आर्थिक स्तरातील लोक राहात होत. ज्याप्रमाणे श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारती होत्या, मध्यमवर्गीयांच्या सदनिका होत्या त्याचप्रमाणे गोरगरीबांच्या झोपड्याही होत्याच. वसाहतीच्या प्रारंभी मोठमोठे हॉटेल्स होती, पंचतारांकित हॉटेल्स होती, त्याचप्रमाणे पत्र्यांच्या शेडमध्ये थाटलेली हॉटेलही होती. गरमागरम, ताजे पदार्थ देणाऱ्या हातगाड्याही असायच्या. मोठमोठाले बार होते तसेच अनेक हातभट्ट्याही होत्याच. अनवाणी शाळेत जाणारी मुले होती तशीच भरधाव आलिशान कारमधून जाणाऱ्या मुलांची संख्याही कमी नव्हती. एकूण काय तर समाजातील सर्वच स्तरांना सामावून घेणारी वसाहत अशीच त्या भागाची ओळख .

   सकाळचे अकरा वाजत होते. रविवारची सुट्टी असल्याने वातावरण तसे आळसावलेले वाटत होते. त्या वसाहतीला लागून असलेल्या एका हॉस्टेलमधून दामू(दामोदर), गोमू (गोमाजी), कमू (कमलाकर) हे त्रिकुट बाहेर पडले. खरे तर नेहमी त्यांच्या सोबत सोमू(सोमाजी) असायचा परंतु त्यादिवशी ते तिघे बाहेर पडत असताना सोमू म्हणाला,

"अरे, तुम्ही पुढे व्हा. मी दोन मिनिटात आलो."

त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि नेत्रपल्लवी करत तिघेही हॉस्टेलमधून बाहेर पडले. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये शिरले. ताटवे आणि वर पत्रं अशा हॉटेलमध्ये त्यांचा टेबलही ठरलेला होता. त्या काळ्याभोर टेबलाभोवती असलेल्या वाकड्या तिकड्या खुर्च्यांवर ते बसले. नेहमीप्रमाणे सर्वांचे लक्ष समोर असलेल्या अतिभव्य अशा पंचतारांकित हॉटेल असलेल्या इमारतीकडे गेले. त्यांची प्रत्येकाची एकमेव इच्छा अशी होती की, एकदा तरी त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त, इच्छा भोजनावर ताव मारावा. बहुतेक दररोज कुणी ना कुणी तरी ती इच्छा बोलून दाखवत असे. ते तिघे खुर्चीत टेकतात न टेकतात तोच त्यांच्यासमोरून एक कार भरधाव वेगाने त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिरली. त्या कारमधील तरुणीने त्या मुलांकडे मान वळवून पाहिले. तसा दामू रागारागाने ओरडला,

"ए भवाने, असे तुच्छतेने पाहू नको. एक दिवस आम्ही पण तुझ्यापेक्षा महागड्या आणि आलिशान कारमध्ये बसून भन्नाट वेगाने त्याच हॉटेलमध्ये जाऊ. त्यावेळी तू वेटर म्हणून मान खाली घालून उभी राहशील....."

"दाम्या, शांत हो. असा त्रागा करू नकोस. अरे, प्रत्येकाचा दिवस असतो. आज तिचा दिवस आहे. आपलाही येईल...." कमलाकर सांगत असताना सर्वांचे लक्ष हॉस्टेलमधून बाहेर पडत असलेल्या एका युवकाकडे गेले. नवीन रंगीबेरंगी कपडे, गॉगल घातलेला तो तरुण त्यांच्या दिशेने येत असलेला पाहून दामोदर ओरडला,

"च्यायला! अरे, हा तर आपला सोम्या....."

"खरेच की. याला लॉटरी लागली की काय?" कमलाकर आश्चर्याने विचारत असताना तिथे आलेला सोमाजी म्हणाला,

"हाय एवरीबडी! अरे, असे फ्यूज उडाल्याप्रमाणे काय पाहता? "

"सोम्या, हे काय? नवे कपडे? गॉगल? "

"अबे, याला काय किंवा आपल्याला काय इतके भारीचे कपडे कधी घडणार? एखाद्या इस्त्रीवाल्याकडून भाड्याने आणले असतील...."

"कम्या, नाही रे. भाड्याने नाही रे. माझेच आहेत. कालच आणले ण तुम्हाला सरप्राईज द्यायचे म्हणून दाखवले नाहीत. म्हणून आत्ता तुमच्या सोबत न येता कपडे घालून आलो."

"अबे, पण आहे काय? कुणाच्या लग्नाला जाणार...."

"दोस्तों, आज आपून का बर्थडे है और आज आपून उस बडे होटलमे खाना खाने की, तमन्ना पूरी करनेवाले है...."

"का ss य? अबे, वाढदिवस काय? महागडे हॉटेल काय?"

"सांगतो. आज माझा वाढदिवस असल्यामुळे बाबांनी नवा ड्रेस घेण्यासाठी आणि आजच्या जेवणासाठी पैसे पाठवले होते. मी कालच बाजारात गेलो. आपल्या नेहमीच्या रेंजमध्ये असलेला ड्रेस घ्यावा म्हटलं तर स्साला हा पसंत पडला. मग काय घेतला. पण एक लोच्या झाला..."

"का रे, काय झालं?"

"अरे,सारे पैसे ड्रेसमध्येच उडा यार. अब तो...."

"याने बर्थडे को भुखा सोयेगा मेरा यार....."

"भुखा? मै क्यूं? भुखा सोयेगा वो कारवाला....आज मै भी ठान आया हूँ। आज खाना खाउंगा तो उस सामनेवाले होटलमे...."

"व्वा! म्हणे त्या हॉटेलमध्ये जेवणार? खिशात नाही अडका नि मारतोय पंचतारांकित हॉटेलच्या फाटकाला धडका! मात्र तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल यार...."

"सोम्या,अरे बाप्पा, भलतीच स्वप्नं पाहू नको. जमिनीवर ये आणि बर्थडे निमित्त आम्हाला पोहे-चहा सांग लवकर."

"मलाही असेच वाटतेय की, तुम्हाला त्याच हॉटेलमध्ये वाढदिवसाचे झक्कास जेवण द्यावे पण स्साला खिशात ओन्ली वन हरी पत्ती...."

"खिशात शंभरी आणि शाही भोजन? मजाक करु नको. अरे, तिथला वेटर टीप म्हणून दिलेले शंभर रुपये असे भिरकावून देतो...."

"तरीसुद्धा मी आज त्या बड्ड्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणारच....बाय! भेटूया..." असे म्हणत सोमाजी लगबगीने त्या टपरीतून बाहेर पडला आणि कमालीच्या आत्मविश्वासाने पंचतारांकित हॉटेलच्या दिशेने निघाला. त्याचे मित्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहात राहिले. काही क्षणात तो ऐटदार चालीने हॉटेलमध्ये पोहोचला. दारात उभा असलेल्या दरबानने त्याला कडक सलाम ठोकला. त्या डोळ्यानेच उत्तर देत सोमाजी आत शिरला. क्षणभर थांबून मागे वळून पाहत मित्रांच्या दिशेने 'उडते चुंबन' फेकून तो आत शिरला. 

"अरे, स...स...सोम्या, हॉटेलमध्ये गेला की रे..."

"एवढे पैसे कुठून आणले रे त्याने?"

"त्याच्या जवळ तर शंभर रुपये आहेत."

"त्याला वेड तर लागले नाही ना? त्याच्या जवळ नक्कीच...."

"नाही रे तो खोटे बोलणार नाही."

"बाप रे! आज नक्कीच त्याला मार पडणार."

"सोम्या, पागल तर झाला नाही रे?"

"त्याला अडवायला पाहिजे. चला रे..."

"अबे, शहाण्या, आपल्याला अशा अवतारात तो वॉचमन आपणास आत जाऊ देईल का?"

"काय करावे बुवा? नाहक मार खाणार बिचारा...." दामू म्हणाला. सारे मित्र प्रचंड काळजीत पडलेले असताना तिकडे सोमाजी एका खुर्चीत जाऊन बसला. वेटरने त्याच्या पुढे एक मेनूकार्ड त्याच्या समोर आणून ठेवले. सोमाजीने बारकाईने त्याचे निरीक्षण केले. दुसरा वेटर त्याच्या समोर अदबीने उभा राहून विनयाने म्हणाला,

"ऑर्डर... सर...."

सोमाजीने भरपूर पदार्थांची ऑर्डर दिली. काही क्षणात त्याच्या समोर मसाला पापड आणि एक दोन सूप आले. त्या सर्वांचा आस्वाद घेत असताना त्याने सांगितलेले एक एक पदार्थ येत गेले. हळूहळू प्रत्येकाचा स्वाद घेत, एखाद्या पट्टीच्या खवैय्याप्रमाणे सोमाजी त्यावर ताव मारत सुटला.....

   बाहेर हॉटेलमध्ये बसलेले चिंतायुक्त अवस्थेतील त्याचे मित्र त्या हॉटेलकडे नजर लावून बसले होते. कधी एकदा सोमाजी बाहेर येऊन आपल्याजवळ बसतो अशीच अवस्था सर्वांची झाली होती. दीड-दोन तास झाले तरी सारे तिथेच बसून होते. तितक्यात त्या टपऱ्या हॉटेलचा मालक म्हणाला,

"का रे, पोरांनो,आज बराच वेळ बसलात की. तुमच्या चौकोनातला चौथा तुकडा....सोमाजी कुठे गेला आहे?"

"काका, तो समोरच्या हॉटेलमध्ये गेला आहे..."

"काय? नोकरी बिकरी लागली की एखादी श्रीमंताची छोकरी पटवली..."

"तसे काही नाही. आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून जेवायला गेलाय..."

"जेवायला? अरे, ते हॉटेल म्हणजे का तुम्हाला या काकाचे हॉटेल वाटले? आपण त्याचा बर्थडे आपल्या या फाइव स्टार हॉटेलमध्ये साजरा केला असता की....तो पण फ्री मध्ये! तिथे साधा बगर चवीचा चहा पाचशेच्या वर मिळतो. सोम्याचे काय डोळे आले रे..."

"तेच तर ना. आम्हाला त्याचीच काळजी वाटते हो. दोन तास झाले बघा त्याला जाऊन..."

"दोन घंटे? लागली सोम्याची वाट..."

"काय करावे बुवा, या सोम्याला ही काय अवदसा आठवली?"

"आपण त्याच्या घरी फोन करू या का ?"

"नको रे. त्याला बाहेर तर येऊ देत. मग बघू. उगाच त्याच्या घरी सारे टेंशनमध्ये येतील....."

   तिकडे सोमाजीने सारे पदार्थ संपवले. वेटरने विचारले,

"सर, अजून काही आणू का?"

सोमाजीने नकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने एका अत्यंत सुंदर मुलीने एका तबकात बील आणून त्याच्यासमोर ठेवले. सोमाजीने मोठ्या ऐटीत ते बील उचलले. त्यावरील आकडा पाहताच त्याला सारे हॉटेल गरगरताना दिसत होते. वातानुकुलीत वातावरण असताना काही क्षणातच तो घामाने डबडबला. त्याची तशी अवस्था पाहून त्या तरुणीने मधाळ आवाजात विचारले,

"क्या हुआ सर? मे आय हेल्प यू?"

सोमाजी काही बोलला नाही ते पाहून तिने ताबडतोब व्यवस्थापकला कळवले. काही क्षणातच हॉटेलचे अनेक कर्मचारी सोमाजीभोवती जमले.

"काय झाले? काय होतय? काही त्रास होतो का?"

"ब...ब...बील एवढे? मी नाही भरु शकत?..."

"असे आहे तर....एवढा नट्टापट्टा करून भीक मागायला निघालास का? चेहऱ्यावरून किती साधा वाटतोय पण बघा कसा लफंगा आहे तो. घ्या रे याला आत घ्या."

"सर, माझे ऐका. मी तुमची पाई ना पाई चुकवीन. वाटलेच तर व्याजासह सारी रक्कम भरेन. पण.."

"अरे, बघता काय? लुच्चा आहे ...."

"एक मिनिट! बघा. आधीच याची हालत पतली झाली आहे. घामाघूम झालाय. अशा परिस्थितीत त्याला आत घेतले आणि चक्कर बिक्कर आली. पडला. हार्टफेल झाला तर आपणास लेने के देने पडायचे. थोडे दमाने घ्या..."

"मग काय याची आरती ओवाळायची का? नाटक करतोय हा...."

"नाही. नाही. मी..मी ..सारे पैसे फिटेपर्यंत हॉटेलमध्ये पडेल ते काम करीन हो..."

"मला वाटते, या लफंग्याला पोलिसाच्या हवाली करावे."

"नको हो. पाया पडतो. अहो, पोलीस खूप मारतील हो."

"लाव रे. पोलीस स्टेशनमध्ये फोन लाव. चांगली चामडी लोळवतील या मुर्खाची. चला. लागा कामाला...." असे म्हणून व्यवस्थापक त्याच्या जागेवर जाऊन बसला. दोन धट्टेकट्टे वेटर सोमाजीवर लक्ष ठेवून होते.....

   ' हे काय केले मी? असा अविचार मी कसा केला? माझी आणि माझ्या मित्रांची या हॉटेलमध्ये जेवायची इच्छा होती. परंतु खिशात केवळ शंभर रुपयाची नोट असताना मी असे का वागलो? आता पोलीस येणार. मला पकडून नेणार. ठाण्यात नेऊन मार मार मारणार. तुरुंगात टाकणार. सर्वत्र बातमी पसरणार. लोक छीः थू करणार. कॉलेज सुटणार. मित्र दुरावणार. नोकरी नाही मिळणार. लग्न नाही होणार. आयुष्य बर्बाद होणार. बाप रे ! किती वेड्यासारखा वागलो मी. शंभर रुपयाने काय कात होणार? पोलीस येणार. खिशात शंभर रुपये. सापडेल गड्या, सापडेल. काही तरी मार्ग निघेल....' सोमाजी तशा विचारात गढलेला असताना त्याच्या कानावर आवाज आला,

"बोला. मॅनेजर, बोला. काय राडा झाला?" हॉटेलमध्ये आलेल्या पोलिसाने विचारले.

"तो बघा, साळसूद! खिशात दमडी नसताना हाद हाद हादडलाय. आता तंगडी वर करतोय."

"अच्छा! असे आहे का? बाप रे! दोन वाजले हो. सकाळी सकाळी साहेबांचा फोन आला. तस्साच निघून आलो. पोटात कावळे कोकलताहेत. जरा आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करा. पोराकडे नंतर बघू. तुमची पै नि पै वसूल करून देतो...." म्हणत हवालदार सोमाजीच्या समोरच्या खुर्चीत बसला. नाइलाजाने व्यवस्थापकाने एका वेटरला इशारा केला. तो वेटर मेनू घेऊन हवालदाराजवळ आला. त्या मेनूवर नजर टाकत हवालदार एक-एक पदार्थ सांगत गेला. ती यादी सोमाजीने बोलावलेल्या यादीपेक्षा मोठी होत गेली. 'वसुली नको, हवालदार आवरा!' अशाच अवस्थेत व्यवस्थापक त्या दोघांकडे पाहात राहिला......

   "अरे, आत काय चालले असेल? सोमाजीला मारत तर नसतील? आतापर्यंत सोमाजी बाहेर यायला हवा होता."कमलाकर म्हणाला.

"अरे, बघा तर. पोलीसही आलाय की." गोमाजी म्हणाला.

"पोलिसाचे सोड यार. जेवायला आला असेल नाही तर हप्ता मागायला..."

"काय हप्ता? एवढ्या मोठ्या हॉटेललाही हप्ता?" दामूने विचारले.

"तर मग? धंदा मोठा असो की छोटा हप्ता ठरलेलाच. एक वेळ सरकारचा कर चुकवणे सोपे पण हप्ता नाही चुकवता येत."

"पोलीस सोमाजीसाठीच बोलावले असला तर?"

"काय असेल ते असो बुवा, आपले तर डोकं चालतच नाही. मला वाटते आपण त्याच्या बाबांना कळवावे. ते येऊन करतील सोम्याची सुटका." गोमाजी म्हणाला.

"त्यांना काय सांगावे? परवाच त्यांना अटॅक येऊन गेलाय...." कमलाकर बोलत असताना त्याचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर सोमाजीच्या बाबांचे नाव दिसताच तो म्हणाला,

"बोंबला आता! सोम्याच्या बाबांचा फोन आहे. काय सांगू?"

"अरे, सांग की, सोमा सकाळी लवकर उठून गणपतीच्या दर्शनाला जाणार होता... वाढदिवस आहे ना त्याचा म्हणून..." गोमाजी म्हणाला. कमलाकरने तसाच निरोप देताच ते म्हणाले,

"त्याला आल्यावर फोन करायला सांग. त्याची आई वाट बघत आहे."

"हो काका, सांगतो. ठेवतो......" असे म्हणत कमलाकरने फोन बंद केला.

    तिकडे हॉटेलमध्ये हवालदाराने इच्छा भोजनावर यथेच्छ ताव मारला आणि नंतर सोमाजीकडे बघत म्हणाला,"खूप दिवसांपासून अशा एखाद्या हॉटेलमध्ये मनसोक्त जेवावे अशी इच्छा होती. तुझ्यामुळे ती आज पूर्ण झाली."

"साहेब, माझीही तशीच इच्छा होती हो. प्लीज! माफ करा ना, मला." सोमाजी म्हणाला.

"सर, अजून काही हवय का?" एका वेटरने विनयाने हवालदारास विचारले.

"नाही. नको. व्वा! मस्त!" हवालदार तृप्तीचा ढेकर देत म्हणाले. दुसऱ्या एका वेटरने त्यांच्या समोर एक तबक ठेवले. त्यातले बील हातात घेऊन हवालदाराने विचारले,

"साडेतीन हजार फक्त! कोण देणार?"

"त..त...तुम्ही...." तो वेटर भीत भीत म्हणत असताना हवालदार त्याच्यावर ओरडला,

"मला बील मागतोस? कुलूप लावीन या हॉटेलला..." हवालदाराचा चढलेला आवाज ऐकून व्यवस्थापकाने धावत येऊन नम्रतेने विचारले,

"क....क.... काय झाले साहेब? "

"विचारा तुमच्या या पोट्ट्याला. मला....एका पोलिसाला हा बील मागतो...जेवणाचे? तुमच्या हॉटेलच्या, स्टाफच्या विरोधात शेकडो तक्रारी आहेत. घेऊ का....."

"साहेब, चुकले त्याचे. मी क्षमा मागतो. तो नवीन आहे. त्याला काही माहिती. पण जरा या पोराकडे बघा ना..." व्यवस्थापक सोमाजीकडे पाहून म्हणाला.

"ठीक आहे. किती बील आहे याचज?"

"तीन हजार ..."

"एवढे एकट्याने खाल्ले? बाप रे! बकासूर आहेस का रे?" असे विचारत हवालदाराने गगनभेदी ढेकर दिला. जागेवरून उठत सोमाजीच्या हाताला पकडून त्याला ओढत म्हणाला,

"नालायक, जंगली एवढे खायला लाज नाही वाटली? फुकट्या, साल्या, चल. कातडी सोलून काढतो.मग समजेल. मॅनेजर, चिंता करु नका. याच्या बापाला बोलावून सारी रक्कम वसूल करतो. निश्चिंत रहा. चल रे...." सोमाजीला घेऊन हॉटेलच्या मोठ्या फाटकाजवळ येताच हवालदाराने विचारले,

"ऐ पोट्ट्या, एवढी हिंमत का केलीस बाबा? चांगल्या घरचा हुशार दिसतोस, मग असा मुर्खपणा का केलास बाळा?"

"साहेब, आज माझा वाढदिवस आहे हो...."

"बर्थडे! व्वा! वाढदिवस तुझा आणि या हॉटेलवाल्याने पार्टी दिली मला. किती रुपये आहेत खिशात? "

"क...क...का साहेब?" सोमाजीने विचारले.

"तुझ्या बर्थडेचा केक आणून कापू या. काय पण पोरग आहे? आतमध्ये वाटेल तेवढ खाल्लेस, पैसे बुडवायला पाहतोस? खरे तर तुला आत टाकायला पाहिजे पण पडला तुझा वाढदिवस... सोडतो तुला. आण किती आहेत ते...." हवालदार म्हणत असताना सोमाजीने खिशातून शंभराची एकमेव नोट काढली आणि ती हवालदाराच्या हवाली केली तसा हवालदार म्हणाला,

"जा. तिथून पान आण..."

"साहेब, मायच्यानं पैसे नाहीत हो..." सोमाजी काकुळतीला येऊन म्हणाला.

"पानासाठी पैसे लागत. जा. मी सांगतो....." असे म्हणत हवालदाराने पानवाल्यास इशारा केला. सोमाजीने त्याच्याकडून हवालदाराचे, स्वतःचे आणि मित्रांसाठी पानं घेतले. तिथूनच त्याच्याकडे पाहणाऱ्या मित्रांना त्याने 'थम्सअप्' केले आणि हवालदाराजवळ आला. 

"सोम्या, बेट्या, तू दिसतो तितका साधा नाहीस. फार डांबरट आहेस रे. हॉटेलवाल्यास आपल्या दोघांचे मिळून चांगला साडेसहा हजाराला चुना लावला आणि आता या पानवाल्यास गंडवले...पोलिसात भरती होणार आहेस का? ..." असे म्हणत हवालदाराने हसत हसत मोटारसायकलला किक् मारली. पाठीमागून आलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला उचलून खांद्यावर घेतले..........

                                        


Rate this content
Log in

More marathi story from Nagesh S Shewalkar

Similar marathi story from Comedy