Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

पाऊस माझा सोबती

पाऊस माझा सोबती

8 mins
166


       पाऊस! सर्वांनाच आवडतो. पाऊस आवडत नाही असे कुणी शोधून सापडणार नाही. आबालवृद्ध, प्राणी, लतावेली, वृक्ष इत्यादी सर्वांनाच हमखास पाऊस आवडतो! पावसाळा सुरु झाला की, अगदी लहानपणापासून ते आता साठी ओलांडलेपर्यंत अनुभवलेल्या पावसाच्या काही आठवणी पावसाळ्यातील ढगांप्रमाणे गर्दी करतात. सुरुवात करुया... लहानपणीच्या धम्माल पावसाच्या आठवणीपासून...

      सकाळी सकाळी जाग यायची ती बाहेर कोसळणाऱ्या पावसाने! सोबत आई आवाज देताना म्हणायची,

"अरे, उठ. बघ तर रात्रभर पाऊस पडतोय. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे..."                       कानावर येणाऱ्या आवाजाने अंगातील सुस्ती झटकन पळून जाई. अंगावरील पांघरूण एका झटक्यात दूर करून दारात जाऊन बाहेर डोकावले की, दारासमोरुन वाहत असलेले पावसाचे पाणी आणि दूरवर साचलेले पाणी बघितले की, असा आनंद होत असे की विचारुच नका. तितक्यात काही तरी आठवायचे आणि घरात येऊन शोधक नजरेने पाहताच बाबा एका कोपऱ्यात अंगावर पांघरूण घेऊन बसलेले असत. ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच असे. कारण माझे बाबा आमच्या शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात शिक्षक होते. दररोज सकाळी ते सात वाजता जात आणि सायंकाळी सहा वाजता घरी येत. त्यांना नोकरीच्या गावी जाताना दोन ओढे लागायचे. धो- धो पाऊस पडला की, ते दोन्ही ओढे दुथडी भरून वाहत त्यामुळे बाबांना सुट्टी असायची. त्यामुळे मीही शाळेत जात नसे. मग दिवसभर घरी बाबांकडून गोष्टी ऐकायच्या, गाणी, अभंग म्हणायचे. धावत येऊन बाबांच्या पांघरुणात शिरले की, ती मायेची उब खूप छान वाटायची. काही क्षण बाबांच्या मांडीवर बसले की पुन्हा काही तरी लक्षात यायचे. त्याकाळी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलो की, आधीची पुस्तके अर्ध्या किमतीत विकून त्या पैशातून नवीन इयत्तेची पुस्तके आम्ही घेत असू. वह्या मात्र कुणाला न देता जपून ठेवत असू. त्या वह्यांची आठवण आली की बाबांना सोडून धावत जाऊन त्या वह्यांची पाने फाडून आणायची आणि बाबांकडून त्या पानापासून होडी बनवून घ्यायची आणि धावत, नाचत जात ती होडी अंगणातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावर सोडून द्यायची. ती होडी हेलकावे घेत पुढे जाताना होणारा आनंद टाळ्या पिटून मी साजरा करीत असे. ती होडी बरीच दूर गेली की, पुन्हा घरात येऊन बाबांनी तयार केलेली दुसरी होडी नेत असे.

     इतक्यात शेजारी राहणारे मित्र पावसात आणि पावसाच्या पाण्यात नाचायला आले की, मग मीही त्यांच्याकडे पाणी उडवत जात असे. मग काय धम्माल मस्ती! एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, चिखल फेकणे. पाण्यात कुस्ती खेळणे. वरतून बरसणाऱ्या पावसाच्या धारा आणि खाली साचलेल्या पाण्यात दंगामस्ती करताना तहानभूक विसरल्या जात असे. घरातून कुणीतरी सातत्याने आवाज देताच घरी गेल्यावर आई म्हणायची,

"चल. पटकन आंघोळ करून ये. गरमागरम भजी करीत आहे..." पावसाळी वातावरणात बाबा घरी असले की आमच्या घरी भजी ठरलेलीच. मग काय झालेल्या अवर्णनीय आनंदात गडबडीने आंघोळ आटोपून गरमागरम भज्यांवर ताव मारायचा आनंद काही वेगळाच. पावसाळा संपेपर्यंत असे योग अनेकदा यायचे परंतु पहिल्या पावसात केलेली धम्माल, झालेला आनंद काही वेगळाच असे. अनेकदा अशी मस्ती केल्यामुळे सर्दी होई, ताप येई परंतु पावसात केलेली मजा अविस्मरणीय असे.

          कित्येक वेळा शाळेत जाताना पाऊस नसे परंतु शाळा सुटताना मुसळधार पाऊस सुरू असायचा. काही क्षण पाऊस थांबण्याची वाट पाहायची परंतु तो थांबत नाही हे दिसताच पावसाची दिशा पाहून दप्तर कधी शर्टच्या आत पोटावर किंवा मग पाठीवर अडकावयाचे आणि पावसात भिजत भिजत, एकमेकांच्या अंगावर पाणी, चिखल उडवत. प्रसंगी मारामारी करीत चिंब भिजलेल्या अवस्थेत घरी पोहचले की, आई रागारागाने ओरडून म्हणायची,

"बघ. आलास ना भिजून? अरे, अशा पावसात कशाला भिजायचे? थोडावेळ थांबला असतास तर असा भिजला नसताना..." आईच्या दरडावण्याचे काही वाटायचे नाही कारण एकतर भिजताना केलेली मज्जा काही वेगळीच असायची. दुसरे म्हणजे आई आपल्या काळजीपोटी ओरडतेय आणि दुसऱ्या क्षणी खसकन ओढून टॉवेल शोधायच्या भानगडीत न पडता पदराने अंग पुसायची तो मायेचा ओलावा, ती उब बरेच काही सांगून जायचे आणि भिजण्याचा आनंद द्विगुणित होई. बरे, एखाद्या दिवशी पाऊस थांबेपर्यंत म्हणजे किमान हलका होईपर्यंत थांबून मग घरी निघालो तरी थोडेबहुत तरी शरीर भिजायचे. घराजवळ जाताच आई दारात थांबलेली आहे आणि आपल्या वाटेकडे काळजीने बघत आहे हे पाहून कसेतरीच होत असे. दाराजवळ जाताच आई म्हणायची,

"आलास ना भिजून? थोडा वेळ थांबला असता तर पाऊस थांबलाच असता. बरे, भिजायचेच होते तर मग तेव्हाच का नाही आलास? डोळ्यात जीव येतो, प्राण कासावीस होतो. ये आत. किती भिजलास ते बघ..." असे म्हणत आई खसकन आत ओढून घेई आणि पदराने डोके खसखस पुसून काढत असे...

       दहावी उत्तीर्ण होईपर्यंत दरवर्षी एकदा तरी असे प्रसंग ठरलेलेच असायचे. नंतर डी.एड्. ला प्रवेश घेतला. घरापासून कॉलेज तीन किलोमीटर अंतरावर होते. त्यापैकी दोन किलोमीटरचे अंतर शेतातून पार करावे लागायचे. अशावेळी पाऊस सुरू झाला की मग भिजण्याशिवाय पर्याय नसायचा. एखाद्या मोठ्या झाडाखाली थांबावे तर नेमकी वीज त्याच झाडावर कोसळली तर या भीतीने कुठेही न थांबता सरळ घर जवळ करावे लागायचे. अशा पावसात भिजत निघाले की, आमच्या वर्गातील दोन-तीन मुली हमखास आमच्या समोर असायच्या. तशाही अवस्थेत त्यांचे भिजलेले शरीर पाहिले की मनात काही तरी संचार करायचे आणि मुद्दाम आम्ही दोन तीन मित्र रेंगाळत त्यांच्या मागे मागे जात असू. एखादे वेळी मुली पडत्या पावसात आमच्या मागे असल्या तर काही तरी निमित्त काढून आम्ही त्यांना पुढे जाण्याची संधी देत असू... त्यांचे भिजलेले शरीर पाहता यावे म्हणून. असो ते एक वय असते, काही समजत नसले तरीही जाणिवा शांत बसू देत नाहीत. त्या भावना नैसर्गिक, साहजिक असतात.

       डी. एड्. झाले. शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. नोकरीचे गाव एक आडवळणी खेडे होते. म्हातारी आई आणि तरुण बहिणीला घेऊन त्या खेड्यात राहणे शक्य नव्हते म्हणून मग तालुक्याच्या ठिकाणी घर केले आणि इतर दोन शिक्षकांप्रमाणे मीही सायकलवर जाणे-येणे करु लागलो. चौदा किलोमीटरचे अंतर तेही कच्चा, खडकाळ रस्ता! अशा रस्त्याने सायकलवर जाणे येणे करताना जीव मेटाकुटीला येत असे. श्वासाने छाती भरुन जात असे. हातापायाला गोळे येत असत. त्यातच

पावसाळा म्हटला की मग होणारा ञास भयंकर असे. पाऊस पडला की, सायकल रूसून बसे. चिखलाचे गोळे दोन्ही मडगारमध्ये शिरून चाके जाम होत असत. त्यामुळे सायकलचे दोन्ही मडगार काढून टाकण्याचा विचार केला आणि एका रविवारी दोन्ही मडगार काढून टाकले. सोमवारी सकाळी फार मोठा तीर मारल्याप्रमाणे सायकलवर शाळेत पोहोचलो. दुपारी तीनच्या सुमारास धुवाँधार पाऊस सुरु झाला. चार वाजता शाळा सुटेपर्यंत सर्वञ पाणीच पाणी सोबत चिखलच चिखल! सोबतच्या शिक्षकांनी सायकली शाळेत ठेवल्या आणि नऊ किलोमीटर अंतर असलेल्या कच्च्या रस्ताने निघाले. मलाही चला म्हणाले. मी म्हणालो, मडगार काढले आहेत आणि पाऊसही थांबलाय. चिखलाचा त्रास होणार नाही. मी सायकलवर टांग मारली नि निघालो. केलेल्या प्रयोगाची फलश्रुती लगेच समोर आली. जो चिखल मडगार अडवून ठेवायचे तोच चिखल आता जोराने दोन्ही बाजूने शरीरावर मारा करीत होता आणि कपड्यांचे रंग बदलत होता. कपडे सारे चिखलाने भरून गेले. आश्चर्य म्हणजे जसा राष्ट्रीय महामार्गावर आलो तसे पावसाचे नामोनिशान नव्हते. सारा परिसर कोरडाफट होता. आजूबाजूने जाणारे माझ्या अवताराकडे बघून हसत होते. शहरालगत एक ओढा होता. तिथे सायकल धुतली. कपड्यांचा चिखलही धुतला. चिखलाची माती बरीच निघाली परंतु डाग आणि रंग तसाच राहिला. लोकांच्या डोळ्यातील विविध भाव अनुभवत घरी पोहोचलो. स्नान करून, स्वच्छ कपडे घालून सायकलला पुन्हा मडगार बसवून घेऊन आलो. 

      काही दिवसानंतर वेगळाच अनुभव आला. शाळा सुटायला काही वेळ बाकी असताना अचानक जोराचा पाऊस आला. एक शिक्षक हसत मला म्हणाले,

"तुम्ही तर सायकलवर येणार असाल ना?"

"कसची सायकल हो. आता कानाला खडे लावले. मडगार बसवले आहेत. आता तुमच्यासोबत पदयात्रा..." असे म्हणत त्यांच्यासोबत सायकल शाळेत ठेवली आणि निघालो. गावाच्या बाहेर पडलो. पाहतो तर काय गावालगत असलेला ओढा ओव्हर फ्लो होऊन धों.. धों... आवाज करीत वाहत होता. तो आवाज आणि जोराने वाहणारे पाणी पाहताच अंगावर काटा आला, भीतीने अंग थरथर कापू लागले. माझी अवस्था ओळखून एक वयस्कर शिक्षक म्हणाले,

"तुम्हाला पोहणे येत नाही ना? हरकत नाही. माझा हात धरा. हात सोडू नका. वाहत्या पाण्याकडे न पाहता समोर बघा. पाणी जास्त नाही."

त्यांच्या बोलण्याने बराच धीर आला. त्यांच्याप्रमाणे पायातल्या चपला हातात घेऊन, जीव मुठीत धरून निघालो खरा पण हिंमत होत नव्हती. शेवटी त्या शिक्षकाचा हात घट्ट धरला आणि पुराच्या पाण्यात पहिले पाऊल टाकले आणि भीतीची एक थंडगार लहर शरीरात पसरली. तसाच पुढे निघालो. जसजसा पाण्यात शिरत होतो तसतशी त्या शिक्षकांच्या हातावरची पकड घट्ट होत होती. पाण्याची उंची आणि प्रवाह वाढत होता. एक वेळ तर अशी आली की, पाणी चक्क कमरेच्या वर आले. तितक्यात हातात धरलेली चप्पल पाण्याच्या जोरामुळे मला सोडून गेली. ते शिक्षक सातत्याने धीर देत म्हणत होते,

"घाबरु नका. झालेच आता. बघा. आपण अर्ध्यापेक्षा पुढे आलो आहोत. आता झालेच..."

असे करता करता आम्ही पडत्या पावसात, पुराच्या वाहत्या पाण्यात ओढ्याचा पैलतीर गाठला आणि जीव भांड्यात पडला. घरी पोहोचताच आईने गरमगरम पाण्याने आंघोळ करायला लावून सुंठ-मीरे घातलेला चहा प्यायला दिला. रात्री झोपतांना छाती, डोके, गळ्यावर व्हीक्स चोळून दिले. थकव्याने म्हणा, भीतीने म्हणा बरीच शांत झोप लागली.

       त्या गावाहून बदली झाली परंतु मला मात्र अनेक वर्षे सायकलवर जाणे-येणे करावे लागले. कधी जाण्या-येण्याचे अंतर अठ्ठावीस किलोमीटर, कधी वीस किलोमीटर तर कधी बारा किलोमीटर! त्यामुळे पावसात भिजण्याशिवाय पर्याय नसायचा. पण त्यावेळी एक जोश होता, एक स्फूर्ती होती, आगळेवेगळे चैतन्य होते.

         दरम्यान लग्न झाले. पत्नीही शिक्षिका होती परंतु एकदाही दोघांना एकाच शाळेत काम करण्याची संधी मिळाली नाही. दोघांच्या नोकऱ्या दोन गावी. बदल्या करीत करीत दोघांच्या शाळेचे अंतर सहा किलोमीटरवर आले. एका मध्यवर्ती गावी घर करून आम्ही दोघे आमच्या शाळा करीत असू. तो काळ खाजगी वाहनांचा नव्हता सारी मदार महामंडळाच्या गाड्यांवर! पत्नी बसने जाणे-येणे करीत असे परंतु मी मात्र सायकलवरच जाऊन येऊन करीत असे. नंतर मोटारसायकल घेतली आणि जाण्यायेण्याचा प्रवास सुसह्य झाला. पत्नीला अगोदर तिच्या शाळेवर सोडून मी माझ्या शाळेत येत असे. मोटारसायकलचा आमचा हा दररोजचा प्रवास साठ किलोमीटरचा होता. पावसाळ्यात हमखास अनेकदा भिजावे लागे. कुठे थांबता येत नव्हते कारण रस्त्याने शेताशिवाय काहीही नसायचे. झाडखाली थांबावे तर वीज पडण्याची भीती आणि झाडाखाली उभे राहिले तरी कमी प्रमाणात का होईना भिजावेच लागे. पावसाला न जुमा निघायचे. पाऊस नेहमी तोंडावर असायचा. त्यामुळे पावसाच्या थेंबांचा मारा जणू दगडांचा मारा असल्याप्रमाणे लागायचा. अंगात हुडहुडी भरायची पण प्रवास थांबला नाही, थांबवला नाही. साठ किलोमीटर दररोज जाणे येणे करण्याचे चांगले फळही मिळाले. ज्यांच्यासाठी जाण्यायेण्याचा आटापिटा केला ती मुले आज चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत...

     एके वर्षी पंधरा ऑगस्टला एक भयंकर प्रसंग घडला. मी पत्नीला तिच्या शाळेत सोडून माझ्या शाळेवर परतत असताना ध्यानीमनी नसताना अचानक पाऊस सुरू झाला. काही क्षणात पावसाने उग्र रुप धारण केले. रस्त्यावर कुठे थांबायलाही जागा नव्हती. थांबावे तर मी मुख्याध्यापक असल्याने ध्वजारोहणाची सारी जबाबदारी माझी होती. तसाच भिजत निघालो. दहा मिनिटाच्या मोटारसायकल प्रवासात चिंब भिजलो. माझी शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला. सारे गाव ओलांडून शाळेत जावे लागे. तसाच शाळेत पोहोचलो. पाऊस सुरू होण्यापूर्वी सहकारी शिक्षक शाळेत पोहोचले होते. पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच एक पोशाख गाडीच्या डिकीत ठेवलेला असे. तो पोशाख घालून होईपर्यंत मुसळधार पडणारा पाऊस पूर्णपणे थांबला. चक्क ऊन पडले. हळूहळू एक- एक विद्यार्थी आणि पालक शाळेत येऊ लागले. योग्य वेळी ध्वजारोहण झाले. गावचे सरपंच अचानक म्हणाले,

"गावकऱ्यांनो शाळेला मुख्याध्यापक आणि शिक्षक कसा असावा तर आपल्या हेडमास्तर आणि शिक्षकांसारखा! माझे दुकान शाळेच्या रस्त्यावर असल्याने मी रोजच पाहतो, आपले शिक्षक बरोबर वेळेवर येतात. आज तर हेडमास्तरांनी कमालच केली. धो धो पडणाऱ्या पावसात हेडमास्तर नखशिखांत भिजून आले. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले..." असे म्हणत सरपंचांनी स्वतःसोबत आणलेली शाल माझ्या अंगावर टाकली. त्या शालेच्या नव्हे तर सरपंचाच्या कौतुकाच्या उबेने चिंब भिजल्यानंतर नकळत माझे डोळे पाणावले. दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, यापेक्षा अजून कोणता मोठा पुरस्कार असू शकतो?

                           ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy