भाज्यांची मज्जा
भाज्यांची मज्जा


आपण सर्वांनाच माहिती आहे की भाजी मंडईत फक्त महाराष्ट्रातली लोकच भाजी विकतात असं नाही, त्यांच्यासोबत, भैया आणि इतर लोकही असतात. अशाच एका मंडईत एका भैयाकडे मेथी, पालक, शापू हिरवे वाटाणे, कोथिंबीर, कडीपत्ता या भाज्या असतात आणि त्याच्याच शेजारी एका घाटावरच्या मराठी माणसाकडे भोपळा, सुरण, काकडी, गाजर, वांगे, बटाटे, लसूण, अद्रक ई. फळभाज्या असतात. दिवसभर दोघेही भाजीवाले त्यांच्या त्यांच्या भाषेत गिऱ्हाईक लोकांशी संवाद साधत असतात, (पण हा संवाद जरा वेगळाच आहे आणि मनोरंजनासाठीच लिहिला आहे त्यामुळे कुणीही मनाला लावून घेऊ नका ) त्याचाच काही अंशी परिणाम या भाज्यावरही झालाय (पण तो थोडा रोमँटिक पद्धतीने मांडतोय ), कसा तो आपण पाहूया...
रात्रीची वेळ असते, भाजी मंडईत सर्वत्र शांतता असते इतक्यात भोपळा गरजतो...
भोप्या : अय सुत्तळीच्यानो झोपलीत का काय समदी?
सुरण्या : न्हाय भोप्या दादा, काय झालं तुमास्नी?
भोप्या : आरं, लेका आपलं काय ठरलं हुतं? आज रातच्याला कायतरी प्लॅन हुता क नाय?
(इतक्यात लसूण थोडंसं आळसावत विचारतो )
लसण्या : काय भोप्या दा.. जरा म्हूण डोळ लागू दित न्हायस बग.
भोप्या : अय... लसण्या.. उठतूस का आता? का खेचू तुझी पाकळी? अन त्यो गाजऱ्या, वांग्या, बटाट्या, आदऱ्या कुठं तडमडलीत रं?
(सगळी लगेच ओ देत आमी बी हितच हाय की दाद्या )
भोप्या : मंग ऐका, म्या काय म्हणतू. त्या बाजूच्या भय्याकडची मेथी हाय का नाय लयच झ्याक दिसती बगा भावानु.. तीला तुमची वैनी करायचं इचार हाय माजा, तुमी काय मनता?
(हे ऐकून सगळ्यांची आपआपसात कुजबुज सुरु झाली )
वांग्या : आयला, भोप्या दा लईच सुमडीत निगाला की र भावानु..
बटाट्या: व्हय की लगा...
लसण्या : ते असू दि की र पर ती पालक तयार हुईल का?
(गाजऱ्या अन काकडीला बी काय बोलाव सुधरत नव्हत)
(इतक्यात भोपळा पुन्हा ओरडतो )
भोप्या : अये डुचक्यानो, काय कुसूरफूसुर करताय, जोरशान बोला की..
(सगळे जण बोलू लागतात )
व्हय भोप्या दा.. तुमी मनाल तस..
भोप्या : आंग असं.. कसंस्स्स्स्स.. अस्स्स्स... ठरलं मंग.. आता समदी उठायच्या आत गाजऱ्या तू अन काकडे तू मेथीला पळवून आणायची.. बाकीची बी समदी तुमच्यासोबत इतिलच...अन कुणी दंगा केला की त्याला मंग माझा इंगा दाखवीन.. कसंस्स्स्स .. असंस्स्स्स ..
(इकडे गाजर आणि काकडी मेथीला पळवून नेण्यासाठी येतात तर, पालक आणि शापू गप्पा मारत असतात आणि बाकीचे गाढ पडलेले असतात.. मेथी आपली स्वतःकडेच पाहत हसत असते.. आणि गाणं म्हणत असते ' सजना हे मुझे सजना के लिये '.. )
पालक : अरे का हो सापू.. सकाली वो माणूस आया था ना, तो का लेणे तो गयी काहे नही बे?
शापू : अरे पालकीन बाई.. मै तो चली ही जाती मगर ई हमार मालिकवा है ना साला बुडबक, बेचे ही नाही हमका..
पालक : अच्छा अच्छा.. लेकिन वो माणूस हमका चांगला वाटला.. जास्ती भाव भी नही केला.. फिर बी मालक नही बेचला तुला.
शापू : वही तो.. बाकी सगला ठीक है ना? हमार मेथी बिटिया नही दिसत कोठेच?
पालक : अरी.. ती तर तिथेच कबसे बैठी है.. काय मालूम काय करते? थांब तिला बुलाती हैय... मेथी.. ओ बेटा मेथी तनिक इकडे आवो..&
nbsp;
मेथी : हा पालकताई आवत है, आवत है.. (मधेच मेथीला काहीतरी आठवत आणि ती बोलू लागते , वो बुलाती है मगर जाने का नई )
(हे ऐकून शापू बोलते, का हो पालकीनबाई ई मेथी का बोल रही है pजाने का नई )
पालक : अरे आता तू येणार की मै आऊ तिकडे.
मेथी : ठीक है, येते मै उधर..
शापू : मेथी बिटिया, काय कर रही थी, इतना टाइम से?
मेथी : किधर, कुछच नही करत होती.. मेरे को कशाला बुलाया.
शापू : अरे, काही नहीं, ऐसेही बोलावले तुमको.
मेथी : ठीक है अभी मै मेरे जागी जाती हू.
शापू : हा, पालकीनबाई तुम पण आराम करो आता.
पालक : हा, हा चलो.. सकाली मालक आल्यानंतर पाणी मारके उठवेल तोवर आराम करूया.
(इकडे गाजर आणि काकडी वाटच बघत असतात की कधी सगळं पुन्हा शांत होतं आणि कधी ते मेथीला पळवतात )
(दुसरीकडे भोपळा मात्र मेथीला पाहायला व्याकुळ झाला असतो, आणि चिंतीत असतो की गाजर आणि काकडी अजून कसे नाही आले )
गाजऱ्या : आयला, लगा काकडे समदं शांत झालंय बग, आता आपला डाव साधाय लागतू बग.
काकडे : व्हय व्हय गाजऱ्या... चल बिगी बिगी..
(गाजर आणि काकडी कोबीची दोन चार पाती हळूच काढतात आणि मेथीवर टाकून तिला पळवून नेतात )
बटाट्या : भोप्या दा, ओ भोप्या दा...गाजऱ्या अन काकडी वैनीला घिऊन आली बगा..
भोप्या : अरं वा रं, माज्या मर्दांनो... ये गाजऱ्या ते काय टाकलंय तिच्यावर काढ की ते मला बगु दे की वाईच तिला.
कांद्या : अरं, भोप्या दा वाईच दम खा की दिसल की वैनी..
आदऱ्या : व्हय व्हय, बग की, किती घाईव आलाय भोप्या दा.. हीहीही
(गाजर मेथीवर टाकलेले कोबीची पाती काढतो आणि मेथी ओरडायला लागते )
मेथी : अरे, भगवान, मेरे को कुठे आणले, तुम लोग कोण आहे, हे मोठा भोपळा मला इधर क्यू आणले?
भोप्या : अये मेथे.. कशापायी गोंधळ घालायलीस.. आपल्या बोलण्यावरन तुला हित आणलीया..
मेथी: पण क्यू...??
भोप्या : अग, टवळे (थोडंसं लाजत भोपळा बोलू लागतो ).. माज क नाय तुज्यावर लय म्हंजी लय म्हंजी लय पिरेम हाय.. माज्याशी लगीन करचील?
बाकी सगळे : व्हय वैनी... भोप्या दा, सारका तुमच्या इशयी बोलत अस्तु बगा .. करून टाका की लगीन..
मेथी : अरे पण, हमारी जात वेगली पडणार नही का? हम बिराम्हीन आणि तुम तांबडा पांढरावाले, कैसा चलेगा.?
भोप्या : त्याची फिकीर तू नग करुस बग, मेथे.. तू आपल्याला लय आवडती, तुजा होकार असला म्हंजी सांग, आपण फाट हुयाच्या आत लगीन करू..
मेथे : पर, पालकीनबाई का क्या?
कांद्या : वैनी.. तुम उसकी कशापायी चिंता करत्येस. आमी बगुन घिऊ की ते..
मेथी: आच्छा.. चला तर...
(भोप्या आणि इतर मंडळी आनंदाने उड्या मारत असतात पण तेवढ्यात सकाळ होते आणि दोघांचे मालक येऊन आपापली दुकान उघडतात, ते पाहून सगळ्यांच मन खट्टी होतं आणि सगळे गपचूप पडून राहतात. इकडे मालक विचार करत असतो की मेथी कशी काय माझ्याकडे आली आणि बाकी सगळे सुरण, कांद्या, बटाटा, वांगी, गाजर, काकडी गपचूप हसत असतात आणि दुसरीकडे तो भैया मेथीची जुडी हरवली म्हणून टेंशन मधे असतो.)