क्रिकेट आणि मी {विनोदी कथा }
क्रिकेट आणि मी {विनोदी कथा }
का कोण जाणे, पण वयाची चाळीशी उलटून जाईपर्यंत क्रिकेटची गोडी मला लागलीच नाही आणि त्याचे आकर्षणही कधी वाटले नाही. क्रिकेटचे आणि माझे पहिल्यापासूनच किती सख्य आहे हे माझ्या मित्रमंडळींना तसेच नातेवाईकांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे सर्वसाधारणपणे या सर्वांपैकी कुणीही माझ्यासमोर क्रिकेटचा विषय कधीच काढीत नव्हते. माझी क्रिकेटच्या ज्ञानाविषयीची ख्याती सगळीकडे पसरलेली होती.
दोन तीन उदाहरणेच तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे तुम्हालाही माझ्या क्रिकेटप्रेमाविषयी कळेल.
पहिले उदाहरण म्हणजे, माझ्या विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा भारत आणि वेस्ट इंडीज, भारत आणि श्रीलंका किंवा कुठल्याही दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने रंगत असत तेव्हा प्रत्येकाच्या कानाजवळ ट्रान्झीस्टर असायचा आणि प्रत्येक जण क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यात तल्लीन होऊन जायचा. हे सर्व पाहून मला मोठी गंमत वाटायची. मी मनातल्या मनात म्हणायचो, "लोक किती रिकामटेकडे आहेत. काम धाम सोडून खुशाल कॉमेंट्री ऐकत आहेत."
अशावेळी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वाटसरुने उत्सुकतेने चुकून मला विचारले की, "स्कोअर काय झाला?" तर त्यालाच मी प्रतिप्रश्न करायचो, " तुम्ही जर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे दिलीत, तर मी तुम्हाला स्कोअर सांगू शकेन." तेव्हा तो भाबडेपणाने मला विचारायचा, "कोणते तीन प्रश्न?"
मग मी त्याला आरामात म्हणायचो," महाशय, माझे तीन प्रश्न असे आहेत की, 'कोण कोण खेळतंय? कुठे खेळतंय? आणि काय खेळतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला सांगा. मग मी सांगतो, स्कोअर किती झालाय ते?" माझे हे उत्तर ऐकून 'कुठून अवदसा आठवली आणि या मुर्खाला स्कोअर विचारला' हे किंवा तत्सम दुसरे वाक्य मनातल्या मनात म्हणत तो काढता पाय घ्यायचा.
दुसरे उदाहरण म्हणजे, मला वाटते, १९७४ ची ही गोष्ट आहे. मी बँकेत नवीनच नोकरीला लागलो होतो आणि माझी पहिली पोस्टिंग वैजापूरला झाली होती. तिथे एक दिवस लंच टाईममध्ये स्टाफचे लोक क्रिकेटविषयी गप्पा मारत होते. मीसुद्धा बाजूला बसून ऐकत होतो. बहुदा भारतीय क्रिकेट टीम एकदिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेलेली होती आणि त्या टीमचे कप्तान अजित वाडेकर होते. प्रत्येकजण अजित वाडेकरबद्दल आणि त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दल भरभरून बोलत होता. मला त्यातले फारसे काही कळत नव्हते. इतक्यात कुणीतरी म्हटले, "अजित वाडेकरला मुलगी झाली." मी पटकन म्हणालो, "तुमच्या या सर्व क्रिकेटमधल्या गप्पांमधले मला फक्त एवढेच कळले की वाडेकरला मुलगी झाली. बाकी क्रिकेटबद्दल काहीच कळले नाही." तेव्हा सर्वजण एकदम खळखळून हसले.
आणखी एक उदाहरण सांगायचे म्हणजे, ही १९८३ किंवा ८४ ची गोष्ट असेल. नोकरीच्या निमित्ताने मी पैठणला होतो. तेव्हा तिथे गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रम व्हायचे. तिथे एका गणेशमंडळाने एकदा 'उत्स्फूर्त भाषण स्पर्धा' ठेवली. त्या भाषण स्पर्धेसाठी मीही माझे नाव नोंदविले. समोर एका बॉक्समध्ये विविध विषय लिहिलेल्या अनेक चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. ज्याचे नाव पुकारले जाईल त्याने स्टेजवर येऊन बॉक्समधून एक चिट्ठी काढायची आणि त्यात जो विषय लिहिलेला असेल त्या विषयावर पाच मिनिटे बोलायचे, अशी ती स्पर्धा होती. चारपाच स्पर्धकांची भाषणे झाल्यानंतर माझे नाव पुकारले गेले.
मी स्टेजवर जाऊन एक चिट्ठी काढली. त्या चिठ्ठीत नेमका "क्रिकेट" एवढाच शब्द लिहिलेला होता. आता आली का पंचाईत! जिथे चोराची भीती तिथेच दिवस मावळतो अशी एक म्हण मी ऐकून होतो. त्या म्हणीची प्रचीती मलाच येईल असे कधी वाटले नव्हते. मला तर क्रिकेटमधले ओ का ठो माहीत नव्हते. भाषणासाठी पाच मिनिटांची वेळ दिलेली. पण इथे तर माझी पाचावर धारण बसली. काय करावे सुचेना. पण लगेच माझ्या अंगी उपजतच असलेली समयसूचकता माझ्या कामी आली आणि मी स्वत:ला सावरले. लगेच भाषण सुरू केले. "मित्रांनो, आजकाल आपण पाहतो, जो उठतो तो क्रिकेटची महती गातो. या क्रिकेटने सर्वांना वेडे करून सोडले आहे. क्रिकेटचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामने सुरू झाले की, गल्लोगल्ली छोटी छोटी मुले, तरुण मंडळी, इतकेच नव्हे तर प्रौढसुद्धा हातात क्रिकेटची बॅट घेऊन क्रिकेट खेळायला तयार होतात. अरे, काय चाललंय काय हे! तुम्हाला माहीत आहे का? चीन, जपान, अमेरिका हे पुढारलेले देश क्रिकेटचे नावसुद्धा घेत नाही. आपल्या भारतातच आहेत हे क्रिकेटचे लाड. आपला राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे. पण तो किती दुर्लक्षित आहे! वास्तविक आपण आपली कबड्डी सातासमुद्रापार नेण्याइतके समर्थ आहोत. पण कुणी लक्षातच घेत नाही."
असे सांगत मी सगळे भाषण कबड्डीवरच केले. पाच मिनिटांची वेळ केव्हा संपली मला कळलेच नाही. वेळ संपल्याची घंटा जेव्हा अध्यक्षांनी वाजवली, तेव्हाच मी थांबलो. उपस्थितांनीसुद्धा टाळ्यांचा कडकडाट करून माझे भाषण आवडल्याची पावती दिली. म्हणजे क्रिकेटविषयी मनामध्ये नकारात्मकता असूनही मी माझे भाषण व्यवस्थित पूर्ण केले, याचे राहून राहून मलाच नंतर आश्चर्य वाटू लागले.
ते काहीही असो. पण एक दिवस मी मनाशी विचार केला की, इतरांइतके नसले तरी थोडे बहुत का होईना, स्वारस्य आपण क्रिकेटमध्ये दाखवायला काय हरकत आहे? मग मी जमेल तसा क्रिकेटचा सामना टी.व्ही. वर अगदी लक्षपूर्वक पाहू लागलो. फलंदाजी कोण करतो, गोलंदाजी कोणाकडे आहे याची माहिती घेऊ लागलो. कोणती टीम जिंकली, कोणती हरली या गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवू लागलो. पण यामुळे झाले असे की, क्रिकेटमधल्या अशा काही नवीन गोष्टी मला कळू लागल्या की, ज्या कदाचित इतर क्रिकेटरसिकांना कळतही नसतील. उदाहरणच द्यायचे झाले तर, जेव्हा एखादा गोलंदाज एखाद्या फलंदाजाला बाद करायचा, तेव्हा तो बाद झालेला फलंदाज पॅव्हेलीयनकडे जाण्यास उशीर करू लागला तर तो गोलंदाज अशा काही नजरेने त्य
ाच्याकडे पहायचा की, मला वाटायचे, आता हा गोलंदाज त्या फलंदाजाचा गळाच पकडतो की काय! किंवा अपेक्षेपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज विजयी मुद्रेने आपली बॅट स्वत:भोवती अशी गरगर फिरवायचा की, मला वाटायचे, जर गोलंदाज थोडा जवळ असता तर त्याच्या डोक्यातच याने बॅट हाणली असती की काय. फलंदाज फलंदाजीला तयार झालेला असतांना पंच गोलंदाजाला चेंडू टाकण्याचा इशारा करतो आणि लगेच गोलंदाज धावायला लागतो. त्याने धावणे सुरू करताच अचानक फलंदाज यष्ट्यांसमोरून बाजूला होऊन गोलंदाजाला थांबायला सांगतो. त्यामुळे स्वत:ची मेहनत वाया गेल्यामुळे गोलंदाज संतापाने मागे फिरतो आणि हातातील चेंडू रागारागाने जवळपासच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकून तणतणत, हातवारे करीत धावपट्टीवर परत जातो. पण हे फक्त टी.व्ही. वर सामना पाहतांना मलाच समजायचे. प्रत्यक्ष स्टेडियमवर हजर असलेल्या प्रेक्षकांना त्याचे काही सोयरसुतक नसावे बहुदा.
पूर्वी कोणताही खेळाडू मैदानावर आल्यावर आधी शांततेने मैदानाचा अंदाज घ्यायचा. मैदानावर स्वत:ला स्थिर करायचा. आपली बॅट हलके हलके मैदानावर मारून पहायचा. मग एकदा डावीकडे नजर टाकायचा. एकदा उजवीकडे नजर टाकायचा. क्रीजवर उभा राहून चेंडूची वाट पाहायचा. कधी कधी गोलंदाजाने धावायला सुरुवात केली की, हा खेळाडू क्रीजपासून बाजूला व्हायचा. गोलंदाज मग परत जायचा आणि चेंडूला थुंका लावून आपल्या पँटीला चांगला रगडायचा. नंतर तो चेंडू फेकायचा. फलंदाज त्या चेंडूचा आदर करून फलंदाजी करायचा. जर फलंदाज चेंडूच्या प्रेमात पडला तर एखादा चौकार किंवा षटकार लगावूनच थांबायचा. एखाद्या खेळाडूने दिवसभरात दोन चार चौकार किंवा एक दोन षटकार केले तरी, तो सर्व प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरायचा. पूर्वी या टीमचे खेळाडू त्या टीमच्या खेळाडूंसोबत गप्पा, गोष्टी किंवा विनोद करून वातावरण आल्हाददायक ठेवायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. 'हाय' नाही अन् 'हॅलो' नाही. आता तर मैदानावर आल्याबरोबर 'दे दणादण' सुरू होऊन जाते. स्त्रियांनी संक्रांतीचा आवा लुटावा त्याप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच धावांचे डोंगर रचायला सुरुवात होते.
या सगळ्या धामधूमीमध्ये बिचाऱ्या चिअर गर्ल्सचे खूप हाल होतात. प्रत्येक चौकारावर आणि षटकारावर त्यांना ठुमका लावावा लागतो. सौंदर्याची इतकी उघडउघड बेअब्रू कुठेही आणि कधीही झाली नसेल. फलंदाज जेव्हा एक किंवा दोन धावा काढतो तेव्हा या चिअर बालांनी हळूहळू कंबर हलवली तरी चालते. पण जेव्हा चौकार किंवा षटकार होतो तेव्हा इतक्या जोरजोरात कंबर हलवावी लागते जणू काही विजेचा झटकाच बसला त्यांना. बिच्चाऱ्या चिअर बाला. माझ्याच्याने तर त्यांचे हे हाल बघवतच नाहीत. त्या चिअर बाला चौकार किंवा षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंना मनातल्या मनात शिव्या घालीत असतील.
" स्वत: जागेवरून इंचभरही न हलता सहा धावा पदरात पडून घेतल्या अन् इकडे आम्ही कंबर हलवून हलवून बेजार झालोत. इतकीच हौस आहे धावा काढायची तर जरा मैदानावर पळत जाऊन, घाम गाळून काढ ना धावा," असे काहीसे त्या मनात म्हणत असतील. तुम्ही काही म्हणा, पण मला त्या चिअर बालांचे हाल पाहवत नाही. माझा जीव त्यांच्यासाठी तीळ तीळ तुटतो. पण मी बसल्या जागेवरून त्यांची काहीच मदत करू शकत नाही म्हणून मला अपराध्यासारखे वाटते.
या चिअर बालांना जर कुणी विचारले की, "आदर्श खेळाडू कसा असावा" तर त्या नक्कीच म्हणतील की, "सुनील गावस्करसारखा असावा." कारण सुनील गावस्करने पहिल्या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच साठ ओव्हरमध्ये नॉटआउट राहून केवळ छत्तीस धावा काढल्या होत्या.
पूर्वी स्वर्गातील अप्सरा ऋषी, मुनींना स्वत:च्या सौंदर्याने मोहित करून त्यांच्या तपश्चर्येमध्ये अडथळे आणीत असत. त्यामुळे त्या ऋषीची तपश्चर्या भंग पावत असे.
पण आमचे हे क्रिकेट खेळाडू कशाचे बनलेत कोण जाणे. चिअरबाला सुंदर असतात. नृत्यामध्ये पारंगत असतात. एकदम कमी कपडे घालतात. जीव तोडून नाचतात. पण त्यांच्याकडे हे खेळाडू ढुंकूनही पाहात नाहीत. फलंदाज असो की गोलंदाज असो, त्यांची नजर फक्त चेंडूवर. एकाग्र चित्ताने ते चेंडूकडेच पाहात असतात. या चिअर बालांशी त्यांना काहीच देणे घेणे नसते. त्यामुळे या नृत्यांगना त्यांचे चित्त विचलित करू शकत नाहीत.
मला तर कधीकधी असे वाटते की, प्रत्येक चिअरबाला क्रिकेटच्या मैदानाकडे निघण्याअगोदर देवाला प्रार्थना करीत असेल की, "अव्वल दर्जाच्या खेळाडूंना लवकर बाद होऊ दे. कारण कालपासून कंबर दुखतेय. आज तरी कंबरेला आराम मिळू दे."
किंवा, " परमेश्वरा, आज असं काही तरी कर, जेणेकरून प्रत्येक चेंडूला अंपायर तिसऱ्या अंपायरचं मत मागेल. सामना भलेही उशिरापर्यंत चालू दे. पण दोन चेंडूंच्या मध्ये भरपूर अंतर राहू दे. म्हणजे मला थोडा तरी आराम मिळेल."
देवाने सर्वांचीच प्रार्थना ऐकावी, मग तो धावा काढणारा खेळाडू असो, चेंडू फेकणारा खेळाडू असो अगर या बिचाऱ्या चीअरबाला असोत.
माझी तर देवाला अशी प्रार्थना आहे की, क्रिकेटच्या खेळामध्ये पूर्वीचे शांत दिवस पुन्हा येवोत. चिअरबालांना एवढे कष्ट करण्याची गरज न पडो. त्यांना अंगभर कपडे दिले जावेत. जेणेकरून त्यांनाही मैदानावर त्यांची कला दाखवणे सुसह्य होईल.
वाचकहो, क्रिकेटच्या खेळातील ही मी दिलेली अफलातून माहिती वाचून तुम्हीसुद्धा थक्क झालात ना! मी क्रिकेट या खेळामध्ये रस घेऊ लागलो आणि त्याद्वारे क्रिकेटमधील नवनवी रंजक माहिती मिळवू लागलो, ही गोष्ट माझ्या मित्रमंडळीमध्ये हळूहळू पसरू लागली आणि माझे मित्रसुद्धा असेच थक्क झाले. काही मित्रांनी तर माझ्या घरी येऊन माझे अभिनंदनसुद्धा केले. अलीकडेच आतल्या गोटातून मला कळलेली माहिती अशी की, आमच्या औरंगाबादच्या एका स्थानिक क्रिकेटक्लबतर्फे लवकरच माझा जाहीर सत्कार होणार आहे म्हणे. आता बोला!!