Uddhav Bhaiwal

Romance Tragedy

4.8  

Uddhav Bhaiwal

Romance Tragedy

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

11 mins
1.4K


                                                                                                                                                


दारावरची बेल वाजली तशी "आल्ये. आल्ये" म्हणत आशा दाराकडे गेली अन तिने दार उघडले. दारात अविनाश उभा होता. त्याला पाहताच आशाने विचारले,

"आज का बरं उशीर केलात ऑफिसातून यायला? अन् हातात हे कसलं पुडकं आहे? तुमच्यासाठी शर्टचं कापड वगैरे आणलंत की काय? बघू..."

"अगं, अगं, किती प्रश्न विचारणार आहेस? मलाही काही बोलू देशील की नुसता प्रश्नांचा भडिमारच करीत राहशील?" असे म्हणत अविनाश आत आला आणि सोफ्यावर टेकला. तशी आशा सोफ्याजवळची खुर्ची ओढून त्या खुर्चीवर बसली. "बरं बाई! मी आपली इथे खुर्चीत बसून राहते. तुम्ही असे समोर बसा अन् सांगा सगळं." आशा म्हणाली.

"अगं आशू, नेहमीप्रमाणेच आजसुद्धा ऑफिसातून अगदी वेळेवर म्हणजे बरोब्बर साडेपाचलाच बाहेर पडलो. पण आमची एक जमाडी जम्मत होती ना! म्हणून वेळ लागला घरी यायला." अविनाश म्हणाला.

"आता तरी उघड उघड सांगाल की असंच कोड्यात बोलणार आहात?" आशाची उत्सुकता शिगेला पोचली होती.

"जरा सबूर. असं एकदम पटकन सारं सांगितल्यावर त्यातली गंमत निघून जाईल. आधी माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मग सांगतो." अविनाश असे म्हणताच आशाने एका ग्लासात पाणी आणून त्याच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. पाणी पिऊन झाल्यावर अविनाश पुढे बोलू लागला, "प्रथम मला एक सांग. आमचा मकरंद उर्फ पिंटू सध्या कुठे आहे? आणि काय करतोय?"

"तुमचा मकरंद उर्फ पिंटू सध्या पाळण्यात आहे आणि तो गाढ झोपलाय. फक्त सहा महिन्याचं पोरटं, पण अशी मस्ती करतंय की विचारू नका. हसतो तेव्हा तर अगदी तुमच्यासारखाच चेहरा दिसतो त्याचा. घरात कामं पडली होती म्हणून बळजबरी झोपवलाय आत्ताच."

"बरं, बरं, पुरे झालं आपल्या लाडक्या बाळाचं कौतुक. आता मला सांग, आज तारीख किती?"

अविनाशचा हा प्रश्न ऐकताच आशा विचारात पडली आणि मग म्हणाली, "आज तारीख आहे सोळा जून. पण तारखेचं काय?"

"म्हणे तारखेचं काय? अजूनही काही प्रकाश पडला की नाही डोक्यात?" अविनाशने स्मित करीत विचारले. "मला नाही बाई कळत तुमचं असलं कोड्यात बोलणं. पटकन सांगा काय ते. माझी कामं पडलीत अद्याप घरात. मकरंद उठला तर राहून जाईल सारं तसंच." आशा म्हणाली.

"अगं, आज सोळा जून म्हणजे आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. आठवतं का, तीन वर्षांपूर्वी बरोब्बर याच तारखेला आपण दोघं विवाहबद्ध झालो होतो आणि त्यानंतरच्या वटसावित्री पौर्णिमेला तू देवाला विनवणी केली होतीस की देवा मला जन्मोजन्मी हाच पती लाभू दे." अविनाशने उलगडा केला.

"बरं, पुरे झाली तुमची गंमत. या पुडक्यात काय आहे ते सांगा आता. नाहीतर आणा इकडं ते पुडकं. मीच बघते." असे म्हणून आशाने त्याच्या हातातील पुडके जवळजवळ हिसकावले आणि उघडून बघितले.

"अगं बाई… साडी! अबोली रंगाची!!" आशाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.

"होय. साडी. आणि तीही अबोली रंगाची. या माझ्या लाडक्या राणीसाठी."

अविनाशच्या तोंडून हे शब्द ऐकताच आशा लज्जेने चूर झाली.

अविनाश पुढे बोलू लागला, "आशू, तुला आठवतं? लग्नाच्या आधी मी तुला मागणी घालायला आलो होतो तेव्हा तू अशीच अबोली रंगाची साडी नेसून चहा, पोहे घेऊन समोर आली होतीस. किती सुंदर दिसत होतीस तू त्या साडीत! आणि त्या अबोली रंगाच्या साडीमुळेच एकदम मी तुला पसंत केली आणि लवकरच आपण दोघं एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून विवाहबद्ध झालो. त्यामुळे आजही तुला मी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त याच रंगाची साडी आणली. आशू, मला असं वाटतं, तू ही साडी नेसून नुसती माझ्यासमोर बसून राहावीस." अविनाश बोलता बोलता भावूक झाला होता.

"बरं आशू, आता फर्मास चहा कर. आपण दोघं चहा घेऊ आणि त्यानंतर तू ही साडी नेसून तयार हो. मीही वॉश घेतो. मग आपण दोघंही बाहेर पडू. आधी पिक्चर. मग बाहेरच हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण. Let us enjoy our wedding anniversary." असे म्हणत अविनाशने आशाला जवळ ओढले.

"पुरे झालं. बाहेर जाण्यासाठी तुमच्या राजकुमाराचंही आवरावं लागेल मला." असे म्हणून आशा आवरण्यासाठी निघून गेली.


* * *


दारावरची बेल वाजली तशी किचनमधून बाहेर येत आणि पदराला हात पुसत आशाने दार उघडले. दारात विजयला पाहून आशाला आश्चर्याचा धक्का बसला.

"कोण? विजय! तू!! इथे कसा आलास?' आशा म्हणाली.

"पाहुण्याला ‘आत ये’ वगैरे म्हणशील की दारातच बोलत उभी राहशील?" विजयने हसत विचारले.

"अरे हो, विसरलेच की. ये ना. आत ये. बैस ना. इकडे कसं काय येणं केलंस?" आशा म्हणाली.

"इथे औरंगाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून माझी पोस्टिंग झालीय." विजय म्हणाला.

"अरे वा! छानच झालं. म्हणजे तू डॉक्टर झालास! "

" हो. डॉक्टर झालो हे खरंय." विजय म्हणाला.

"कधी आलास इथे?"

"झाले चार पाच दिवस. तुझी भेट घेण्याची फारच इच्छा होती. पण घर माहित नव्हतं. आज मात्र ठरवलं होतं की घर शोधायचंच आणि तुझी भेट घ्यायचीच. शेवटी पत्ता काढीत शोधलं घर. दारावर पाटीही आहे, अविनाश कुलकर्णी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर."

"हो, माझे मिस्टर जे. के. अँड जे. के. कंपनीमध्ये आहेत. बरं बैस. मी तुला पाणी आणते." असे म्हणून आशा आतमध्ये गेली. दरम्यान विजयने हॉलमध्ये सगळीकडून नजर फिरवली. हॉलमधली सगळी टापटीप पाहून विजयला खूप बरे वाटले.

आशाने आणलेले पाणी पीत पीत विजयने आशाला विचारले, "तुझे मिस्टर कुठेयत?"

"ते ऑफिसमधून आले नाहीत अजून." आशाने उत्तर दिले. इतक्यात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आशा म्हणाली, "थांब हं. पिंटू उठला वाटतं. आलेच आत्ता."

आत जाऊन आशाने मकरंदला थोपटले आणि पुन्हा झोपवले. आशा बाहेर येताच विजय म्हणाला,

"चिरंजीव आहेत वाटतं?"

"हो, मकरंद नाव आहे त्याचं. झोपला पुन्हा."

"आशा, किती दिवसांनंतर पाहतोय मी तुला. तीन वर्षांपेक्षाही जास्त दिवस झालेत तुझ्या माझ्या ताटातुटीला."

"हं!" आशाने सुस्कारा सोडला.

"तुला आठवतात आशा ते दिवस? कॉलेजातले? आपण दोघंही मेडिकलच्या फर्स्टइयरला होतो. प्रथम तुझी माझी ओळख झाली. पुढे परिचय वाढत गेला. नकळत आपल्या दोघांच्या हृदयात एकमेकांविषयी प्रेम उमलू लागलं. त्यानंतरच्या भेटीगाठी – आणाभाका – विसरलीस का हे सारं?" विजयने विचारले.

"कशी विसरेन मी?" आशा म्हणाली.

"जन्मभर एकमेकांना साथ देण्याची शपथ खाल्ली होती आपण. आठवतं?"

"हं."

"मी वेडा. मला खरं वाटलं हे सारं. आणि तू? तू मात्र तुझ्या वडिलांच्या हट्टापुढं नमलीस. मागणी घालायला आलेल्या पहिल्याच स्थळाला होकार भरलास. शिक्षण अर्धवट सोडलंस. नाहीतर आज चित्र कसं दिसलं असतं. मी जसा आज डॉक्टर बनून कॉलेजच्या बाहेर पडलो, तशीच तूही डॉक्टर झाली असतीस आणि मग आपण दोघंही एकमेकांची सुखदु:खं जपत, एकमेकांचे अहंकार जपत मोठ्या उमेदीनं नव्या जोमात आपल्या संसाराला सुरुवात केली असती. हो की नाही?" विजय त्वेषाने म्हणाला.

"विजय, ते सारं एक स्वप्न होतं असं समजून तू ते सर्व विसरून जायला हवं होतंस. जीवनात कधीकधी माणसाला तडजोड करावीच लागते. वृद्ध वडिलांची मी एकुलती एक पोर. आई लहानपणीच वारलेली. पपांची फारच इच्छा होती की त्यांच्यादेखतच माझे दोनाचे चार हात व्हावेत. वडिलांच्या इच्छेखातरच मी मेडिकलला प्रवेश घेतला आणि त्यांच्या इच्छेखातरच शिक्षण अर्धवट सोडून लग्नसुद्धा केलं. ज्या वडिलांनी आईच्या माघारी तळहाताच्या फोडाप्रमाणं मला जपलं, लहानाचं मोठं केलं, त्यांच्यासाठी हे सारं करणं हे माझं कर्तव्यच होतं. असं जर मी नसतं केलं तर ती प्रतारणा ठरली असती, असं नाही का तुला वाटत?" आशा म्हणाली.

"वाटतं ना. मी मात्र आजपावेतो स्वत:च्या लग्नाचा विचारही केला नाही. मेडिकलच्या प्रथम वर्षापासूनच मी ठरवलं होतं – आणि मला वाटतं, मी तुला सांगितलंही होतं की डॉक्टर होऊन कॉलेजच्या बाहेर पडल्याखेरीज विवाहाचा विचारच मनात आणायचा नाही; आणि नंतरही विवाह करायचा तो फक्त तुझ्याशीच. पण आता तेही शक्य नाही. तू विवाहित आहेस. कुण्या दुसऱ्या पुरुषाची पत्नी बनून आनंदाने संसार करीत आहेस. मी मात्र आता कधीच विवाह करणार नाही. आजन्म अविवाहीतच राहीन." हे सांगतांना विजयच्या चेहऱ्यावरची उद्विग्नता स्पष्ट दिसत होती. विजयचे हे बोलणे ऐकून आशा अस्वस्थ झाली. ती म्हणाली,"नको अशा डागण्या देऊस रे, विजय. फार यातना होतात बघ मनाला. मी इतकं सारं सांगूनही मीच अपराधी आहे, असं तुला वाटतं. त्यावेळच्या परिस्थितीचा सर्व विचार तू का करीत नाहीस? मला तर वाटतं, हे सारं विसरून तू कुण्या चांगल्या मुलीशी विवाहबद्ध होणं हेच आपल्या दोघांच्या हिताचं आणि तुझ्यासाठी सुखाचं आहे. मृगजळ कधी हाती लागतंय का? मग त्यासाठी निराश होण्याचं कारणच काय?”

"तू म्हणतेस ते सर्व खरं आहे, आशा. मीही याबाबतीत मनाला कौल लावला. पण मन नकोच म्हणतंय. बरं आशा, आता होऊन चुकलेल्या घटना बदलता थोड्याच येणार आहेत? या विषयावर कितीही बोललं तरी तोडगा थोडाच सापडणार आहे? मी निघतो आता. येईन पुन्हा केव्हातरी असाच." असे बोलून विजय जायला निघाला. तेव्हा त्याला थांबवून आशा म्हणाली, "वा! विजय, असा बरा जाशील! थांब, मी तुला कॉफी करून आणते. साखर कमी आणि कॉफीपूड जास्त अशीच ना! की बदलली सवय आता?"

"अरे वा! आशा, मला कॉफी कशी लागते हे बरोब्बर लक्षात ठेवलंस मात्र तू. सवय तीच आहे. बदलली वगैरे नाही." विजय म्हणाला.

"विजय, काही गोष्टी विसरू म्हटलं तरी विसरता येत नसतात. तुला सांगू, विजय? माझं लग्न झालं त्या दिवसापासून मी चहा पिणं सोडून दिलंय."

"खरं?"

"आणि त्याऐवजी मी आता कॉफी घेतेय… कमी साखर आणि जास्त कॉफीपूड घालून!"

हे त्यांचे बोलणे चालू असताना अविनाश ऑफिसमधून आला. आशाने त्याला विजयची ओळख करून दिली. ती म्हणाली, "हा विजय, माझा मेडिकलचा क्लासमेट. आणि विजय, हे माझे मिस्टर. यांचे नाव तर तुला माहित झालेलेच आहे." ती असे म्हणताच तिघेही खळखळून हसले. नंतर आशाने सर्वांसाठी कॉफी बनवली. कॉफीचे घोट घेत घेत अविनाश आणि विजय गप्पा मारू लागले.


* * *


आठ दिवसांपूर्वी अविनाश कंपनीच्या कामासाठी दिल्लीला गेला होता. आज दुपारीच आशाला त्याचा फोन आला होता की, तो ट्रेनने दिल्लीहून निघालेला आहे आणि उद्या दुपारपर्यंत औरंगाबादला पोचणार आहे. त्यामुळे आशा खूप आनंदात होती. "उद्या पिल्लूचे बाबा येणार," असे ती वारंवार तिच्या बाळाला जवळ घेऊन सांगत होती. पण उद्याची सकाळ काय बातमी घेऊन येणार याची तिला अजिबात कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र आले ते ती धक्कादायक बातमी घेऊनच. अविनाश ज्या ट्रेनने निघाला होता, त्या ट्रेनला दिल्लीहून निघाल्यावर काही तासांतच अपघात झाला होता. ट्रेन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात शंभराच्या वर लोक ठार झाले होते आणि कित्येकजण जखमी झाले होते. ती बातमी वाचताच आशाला चक्कर आली. ती धायमोकलून रडू लागली. शेजाऱ्यांनी येऊन तिचे सांत्वन केले. कुणीतरी अविनाशला त्याच्या मोबाईलवर फोन लावला. पण तो स्वीच ऑफ येऊ लागला. तितक्यात आशाला विजयची आठवण झाली. तिने त्वरित त्याला फोन लावला. पण फोनवर तिला बोलताच येईना. ती सारखी रडत होती. कसेबसे ती विजयशी बोलली. तेव्हा तो म्हणाला, "काळजी करू नको. अविनाशला काही झाले नसेल. मी येतो. धीर धर."

थोड्याच अवधीत विजय आला. त्याने आशाला सावरले. मकरंदला जवळ घेतले. वर्तमानपत्रातील रेल्वेचे संपर्क क्रमांक पाहून त्याने एक-दोन फोन केले. अविनाश ज्या ए. सी. च्या डब्यातून प्रवास करीत होता. त्या डब्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. त्यातील एकही प्रवासी वाचण्याची शक्यता नव्हती. हे विजयला फोनवर कळल्यानंतर त्याने मन कठोर करून आशाला सारे सांगितले. तरीही दोघांनाही अविनाश जिवंत असेल अशी खात्री वाटत होती. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काय आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये रेल्वेतील मृतांची नावे प्रसिद्ध झाली होती. त्यात दुर्दैवाने अविनाशचेही नाव होते.

पुढे या दु:खातून सावरायला आशाला बरेच दिवस लागले. विजय अधूनमधून येऊन तिला धीर देत असे.

एके दिवशी विजय आशाला भेटायला आला, तेव्हा आशा अविनाशने लग्नाच्या वाढदिवशी आणलेली अबोली रंगाची साडी जवळ घेऊन रडत बसलेली दिसली. विजयने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत असतांना ती विजयला म्हणाली, "आम्हा दोघांचा संसार ऐन बहरात असतांना मला ते अचानक सोडून गेले. भर सागरात नाव असताना वल्हवणारा जर अचानक सोडून गेला तर त्या नावेचं काय होतं हे माहित आहे विजय तुला? बुडण्याशिवाय तिला गत्यंतर नसतं."

"खरंय तुझं. पण जिवाचा आकांत करून किनारा गाठण्यासाठी धडपडत असतात त्या बुडणाऱ्या नावेतील प्रवासी, हेही माहित असेल तुला." विजय म्हणाला.

"पण सर्वांनाच किनारा गवसतोच असं नाही. माझ्यासारखे काही अभागी जीव गुदमरून अर्ध्या सागरातच आपले प्राण सोडतात, प्रवाहाबरोबर वाहत जातात आणि बेपत्ता होतात. त्यांचे नावनिशाणही उरत नाही नंतर." आशा म्हणाली.

"पुरे आशा आता. जास्त विचार करून स्वत:च्या जीवाला त्रास करून घेऊ नकोस. स्वत:चं पुढील आयुष्य सुखी कसं होईल याचा विचार करणंच आता श्रेयस्कर होईल." विजय आपल्या परीने आशाची समजूत काढू लागला.

"तू म्हणतोस ते सारं खरं आहे. पण त्यांना विसरून जाऊन मी जगूच शकत नाही. मनातून तर त्यांचे विचार जात नाहीतच. पण घरातील प्रत्येक वस्तू त्यांची आठवण करून देत असते. आता ही साडी बघ, अबोली रंगाची. आमच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला त्यांनी हौसेने मला गिफ्ट दिली. हा रंग त्यांचा खास आवडता. आणि हा बघ आमच्या लग्नातल्या फोटोंचा अल्बम. किती सुंदर फोटो आहेत हे. असं वाटतं की, या फोटोतील त्यांची प्रतिमा जिवंत होऊन माझ्याशी बोलू लागेल." हे बोलतांना आशा भावविवश झाली.

"फारच हळवी आहेस आशा तू. एवढं भावनाप्रधान राहून या जगात जगणं कठीण असतं. मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा ही साडी आणि हा अल्बम एवढंच घेऊन बसलेली असतेस तू. किती दिवस बसणार आहेस अशी? अशाने नक्की वेडी होशील तू." विजय म्हणाला.

"विजय, काय करू मी? सांग ना!" आशा विषण्णतेने म्हणाली.

"चार महिने झाले अविनाशला जाऊन. तेव्हापासून अशीच विचारमग्न बसलेली असतेस. जरा डोळे उघडून जगाकडे बघ. मनातील विषण्णता काही काळ बाजूला ठेवून या खिडकीतून बाहेर बघ. हे निळं आकाश. ही थंडगार वाऱ्याची झुळूक. आसपास पसरलेली ही हिरवीगार पर्णराजी! किती मोहवून टाकतात आपल्या मनाला या साऱ्या गोष्टी. आशा, आपले कॉलेजमधले ते दिवस आठव. बागेमध्ये तास न् तास आपण भान विसरून बसत असू. किती गप्पा मारीत असू आपण !" विजय सांगू लागला.

"हो ना," आशा म्हणाली.

"कुठलाही एक ठराविक विषय नसतांना कितीतरी वेळ बोलत बसलेलो असायचो आपण. आठवतं ना? आणि ती गंमत आठवते का कॉलेजजीवनातली! 'स्वस्तिक'ला चांगला चित्रपट लागला होता. तुझं नि माझं त्या पिक्चरला जायचं ठरलं. मी आतुरतेनं तुझी वाट पाहत चित्रपटगृहापाशी रस्त्याच्या कडेला उभा होतो. नेटकाच पाऊस पडून गेला होता. तू लवकर येईनास म्हणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून वेड्यासारखा उभा होतो मी. तेवढ्यात कुण्या टारगट पोराची स्कूटर माझ्याजवळून गेली आणि रस्त्यात तुंबलेलं पाणी कारंज्यासारखं माझ्या कपड्यांवर उडालं. सर्व कपडे भरले. त्यामुळे माझा चेहरा पार उतरून गेला अन् एकदम पाठीमागून तुझं खट्याळ हसणं कानावर आलं."

विजयचं हे बोलणं ऐकताच आशा खळखळून हसली.

"हे असंच होतं तुझं तेव्हाचं हसणं. आणि तुला आठवतं? तुझ्या हट्टाखातर तशाच अवतारात मी तुझ्यासोबत तो पिक्चर पाहिला." विजय म्हणाला.

"Really, it is a fantastic reminiscence." आशा उत्साहित होत म्हणाली.

"आशा, माणसानं झाल्या गोष्टीचं दु:ख उराशी कवटाळून बसण्याऐवजी भविष्यातील सुखाच्या स्वागतासाठी तयार राहायला हवं. तू आणखी एकवार चांगला विचार कर आशा. 'झालं गेलं, ते सारं स्वप्न होतं असं समज.' असं तू एकदा मला म्हणाली होतीस आशा. आठवतं ना? आज तेच शब्द मी तुझ्यासाठी वापरणार आहे. काल काय झालं – म्हणजेच गेल्या तीन वर्षांमध्ये तुझ्या जीवनात काय घडामोडी झाल्या, ते सारं एक स्वप्न होतं असं समजून तू विसरून जा. आपण दोघं पुन्हा एका नव्या उमेदीनं संसाराला सुरुवात करू, आशा. मला ती कॉलेजमधली अल्लड आशा पुन्हा हवी आहे."

"नाही विजय. स्त्रीच्या भावना – विशेषत: भारतीय स्त्रीच्या भावना तुम्हा पुरुषांना सांगून नाही कळायच्या. तिने एकदा ज्या पुरुषाला देवाब्राह्मणासमक्ष पती म्हणून स्वीकारलं, त्याचीच बनून राहण्यात तिला धन्य वाटतं विजय. आणि पतीच्या निधनानंतरही त्याच्याच आठवणीत व्रतस्थ जीवन जगणं हे तिचं कर्तव्य ठरतं, विजय."

"आशा, तू अजून जगाच्या शंभर वर्षे मागे राहिलीस निदान या बाबतीत तरी. तुझ्यासारख्या सुशिक्षित स्त्रीला तरी हे सांगण्याची माझ्यावर वेळ येणार नाही असं वाटलं होतं. तू थोडा विचार करून बघ. ऐन तारुण्यात तुझ्यावर असं आकाश कोसळलेलं. कसं कंठणार आहेस इथून पुढचं आयुष्य तू त्या छोट्या बाळाला सोबत घेऊन? वेलीला झाडाचा आधार हवाच असतो, आशा. नाहीतर वादळात वेल कोलमडून पडते. कुणाच्या आधारानं काढणार आहेस हे पुढचं वैराण आयुष्य?”

"पुरे विजय. जीव कासावीस होतोय रे माझा. तू म्हणतोस ते साSSरं कळतं रे मला पण वळत नाही. मी तरी काय करू?" असे म्हणून आशा विजयच्या खांद्यावर डोकं टेकवून रडू लागली. 

"आशा, मी कुणी परका नाही. तुझा प्रियकरच तुला मागणी घालीत आहे – कुणी तिऱ्हाईत माणूस नाही. आणि हो, तुझ्या बाळाची काळजी नकोस करू. तुझं बाळ ते माझं बाळ. नीट विचार कर. निघतो मी आता." असे म्हणून विजय जाऊ लागला. तितक्यात त्याचा हात पकडून आशा म्हणाली, "थांब विजय, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. तू गेल्यावर मला खूप एकटं एकटं वाटतं रे. पटलं मला तुझं म्हणणं. मला आता या जगात तुझ्याशिवाय कुणीच नाही. आता इथून पुढे जिथे तू, तिथे मी. माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम माझ्या सुखासाठी माझ्याकडं धावून आलं, याचा मला किती आनंद झालाय म्हणू सांगू, विजय!" असे म्हणून आशाने विजयला घट्ट मिठी मारली.


         

कॉलेजजीवनातील प्रियकर आणि प्रेयसी यांची तीन चार वर्षांनंतर अचानक भेट होते. तोपर्यंत प्रेयसीचे लग्न झालेले असते. तरीही प्रेयसीच्या जीवनात आलेल्या संकटात प्रियकर कशी मदत करतो आणि नंतर दोघे कसे एकत्र येतात हे कथेत सांगितले आहे.. शेवटी जीवनातील पहिले प्रेमच प्रेयसीच्या सुखासाठी धावून येते हे या कथेत चांगल्या प्रकारे सांगितले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance