Anu Dessai

Romance Tragedy Others

4.8  

Anu Dessai

Romance Tragedy Others

प्रवास अनोख्या मातृत्वाचा..!!!

प्रवास अनोख्या मातृत्वाचा..!!!

33 mins
3.0K


 बाहेर वातावरण ढगाळ होतं..चंद्र ढगांच्या आड होता..शर्वरी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती..बाबा बोलणारच होते पण आईने इशाऱ्यानेच जेवणं उरकू द्या असं खूणावलं आणि बाबा गप्प बसले..जेवणं झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले..."शरू, जरा बोलायचयं.. "बाबांनी सुरवात केली.. " अं..हो बोला ना बाबा.." ती ही सहज म्हणाली.. "तु अचानक परतण्याचा निर्णय का घेतलास..?? " "काही नाही बाबा, अभ्यास आणि नंतर सगळी कामं नाही झेपत.. त्यापेक्षा मी इथून येऊन जाऊन करीन.. तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल.. " तिने तात्पुरतं कारण देऊन बाबांचं समाधान केलं...झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली..नेहमीप्रमाणे ठणकणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला..दुधासाठी कासावीस झालेल्या छकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यापुढे तरळला..आणि न राहून तिने फोनला हात घातला..तीन आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता.. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढली होती..समोरून कोणी उचलूच नये असं वाटत असताना त्याचा मृदू स्वर कानी आला, "बोल.... " खोल दरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तिला तो.. "झोपली...?? " ती कशीबशी बोलली.. "हो.. आताच झोपवली तिला.. रडून रडून आकांत केला होता.. नाकीनऊ आले होते माझ्या.. " तो "लहान आहे ती.. तिच्या कला-कलाने घ्या हळूहळू होईल सवय तिला ही आणि तुम्हालाही..." "हम्म.. " असा दिर्घ हुंकार आला आणि समोरून फोन कट झाला...     शर्वरीला घरी येऊन तीन महिने लोटले होते..एक दिवस काॅलेज मधून ती जरा उशीराच घरी पोहचली..संध्याकाळचे साडे सहा-सातची वेळ होती..उन्हं कलली होती, बसमधून उतरली समोर अंगणात चारचाकी उभी दिसली..यावेळी कोण आलं असावं असा विचार करत गाडीजवळ पोहचली नंबर प्लेटवर नजर जाताच जरा गोंधळली कारण ती त्याची गाडी होती..तो इथे कसा, त्याला इथला पत्ता कोणी दिला, का आला असेल अशा सगळ्या विचारांचे मोहोळ मनात उठते न उठते तोच तिची छकुली 'आई..... ' म्हणत तिला येऊन बिलगली...क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना..पण तोवर तिच्यातल्या आईला आवेग आवरला नाही.. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले..तिला घेऊन ती घरात प्रवेशली..तो आणि तिचे बाबा हाॅलमध्ये बसले होते तिने छकुलीला खाली उतरवलं..पण ती कशीच तिला सोडायला तयार होईना तिला चिकटून उभी राहिली आणि तशीच आपल्या बाबांना म्हणाली, "बाबा, आई आली आता आपण आपल्या घरी जाऊयात तिला घेऊन... " ती निरागस पोर बोबड्या आवाजात सहज म्हणून गेली.. शर्वरीला तिच्या पायांभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणवली.."हो, पण तिला येऊ तर देत आधी..आताच आलीये की नाही ती काॅलेजमधून..तिला फ्रेश होऊ दे.."तो कशीतरी त्या चिमुकल्या जीवाची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं त्या दोघी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या, बाबांकडे बघण्याची तिला हिम्मत होईना...कसंतरी त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता... 

    "बाबा, हिला झोपवते मी आणि नंतर तुम्हाला सारं सांगते प्लीज आता काही रिअॅक्ट करू नका, लहान आहे ती सहन नाही होणार तिला.. " ती धीराने उद्गारली.. बाबांनी एकदा छकुलीकडे पाहिलं ती ही किलकिल्या नजरेने त्यांच्याकडे कुतुहलाने बघत होती..ते उठले तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेले..तशी शर्वरी स्वयंपाक घरात आली मागोमाग छकुली सुध्दा धावली..तो आताच पोहचलाय आणि या गोंधळात आई त्याला चहा वैगरेचं विचारायलाच विसरलीय हे तिनं पुरतं हेरलं होतं.. तिने पटकन चहाचं आधण गॅसवर चढवलं..छकुली पायाशी कुरबुर करत होती तिला पुन्हा उचलून घेत तिने विचारलं,"पिल्लू, खाऊ हवाय का..?? " "नको... " छकुलीने नाक मुरडलं.."जा बघू मग बाहेर बाबांकडे जा.. " तिला खाली ठेवून म्हणाली.. "नाही मी कुठे कुठे जाणार नाही तुला सोडून तु पुन्हा मला आणि बाबांना सोडून गेलीस तर.. " तिचा प्रत्येक शब्द शर्वरीच्या काळजाच्या आरपार होत होता तरी ती स्वतःला सावरत म्हणाली, "नाही गं बाळा आता मी तुला सोडून कुठेही नाही जाणार आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही तु बाहेर जा मी आलेच चहा घेऊन.. "छकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ ती ही चहा आणि फराळाचं घेऊन आली.. 

   ती समोर बसली तेव्हा तिच्या हातात त्याने तिच्या हातात काही पेपर्स दिले...तिने ते वाचले तिला काही समजेनासं झालं होतं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं... त्याला तिच्याशी बोलायचं होतं हे तिला कळलं होतं पण आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं..तेवढ्यात बाहेर ताईसोबत खेळत असलेली छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली.. तिच्या झोपेची वेळ झाली होती..शर्वरीने तिला उचलून आत नेलं, बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली पण ती कशीच ऐकेना..तिचा तरी काय दोष होता तिला झोपताना आई आणि बाबा दोघे सोबत हवे असायचे..आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपण्याची सवय झाली होती तिला, शेवटी तिच्या हट्टापुढे शर्वरीने हात टेकले आणि ती दाराची कडी काढून बाहेर डोकावली.." सर, जरा आत या ना.. "तिनं अवघडून म्हटलं तो ही काही न बोलता आत आला आणि तिने दरवाजा लावला..आता बेडवर तिघे झोपले होते..छकुली सुध्दा बरीचशी शांत झाली होती, सवयीने मानेखालून वरच्या बाजूला असलेला शर्वरीचा हात शेखरच्या हातात होता.. गोष्ट ऐकता ऐकता छकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या ओठांचा शर्वरीच्या छातीला स्पर्श झाला आणि तिच्यातली आई मनोमन सुखावली..ऐरवी ओघळून जाणारं दुध आज कितीतरी काळानंतर सार्थकी लागत होतं..छकुलीने दुध ओढताच तिच्या छातीत कळ उठली आणि नकळत शेखरचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनेची तिरपी रेघ उमटली.. " काय गं ठीक आहेस ना..काय होतयं.. " शेखर घाबराघुबरा होऊन विचारत होता..."अहो घाबरू नका काही नाही झालं, खूप दिवसांनी तिला पाजतेय ना म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळ आली, आता काही नाही... होतं असं.. " हाताची पकड सैल करत ती म्हणाली... "शरू............ " त्याने आर्ततेनं हाक मारली.. पण पुढचे शब्द काही उमटलेच नाहीत त्याच्या डोळ्यातली आसवे तिला सारं सांगून गेली..... 

     छकुलीला गाढ झोप लागली होती तिला नीट झोपवून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आले आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं.. शर्वरी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले, लाथा बुक्के झाडत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.."कुलक्षणी कार्टे, काय कमी केलं होतं तुला आजवर.. रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं.. एवढा विश्वास ठेवून स्वतंत्र दिलं त्याचा असा फायदा घेतलास हे गुण उधळलेस बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस.......... " आणि बरचसं काही शर्वरी फक्त मार खात होती आई बाजूला मुसमुसत उभी होती.. शेखरला ते सहन झालं नाही आणि शेवटी तो मध्ये पडला शर्वरीला उठवून खुर्चीवर बसवलं समोरच्या ग्लासमधलं पाणी तिला पाजलं डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं ती अजून पुरती सावरली नव्हती त्याच्या मिठीत थरथरत होती त्याला ही राग आलेला त्या परिस्थितीतही हे तिला कळलं होतं म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला म्हणाली, "सर ,प्लीज आता जा तुम्ही..माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन नाही होणार जा तुम्ही..." पण तिला थांबवत बोलला,"हे बघ, आता तु आणि मी वेगळे नाही.. नाही आणि नेहमी तुच सहन करत रहाणार आहेस का..कळू दे ना सगळ्यांनी तु नेमकं काय केलयसं..ह्या सगळ्याला सामोरं जाताना कसं आणि काय काय भोगलयसं..शर्वरीचे बाबा आधी मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि नंतर ठरवा तुमच्या लेकीने तुम्ही दिलेल्या स्वतंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा..." तो सांगत होता तेव्हा शर्वरीचं मन वर्षभर मागे भुतकाळात गेलं... 

   काॅलेज सुरू होऊन दोन आठवडे उलटले...एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली, "शरू, आहेस का गं..?? " "हो.. " म्हणत ती उभी राहिली... "अगं हो काय दरवाजा उघड.. " तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला..."चल आपल्याला निघायचयं.. " तो आत येत म्हणाला.. "कुठे, कधी, का... "तिने भराभर विचारलं.. " हो हो.. हळू जरा..आता निघायचयं बाकीचं वाटेत सांगतो.." "सर, वही, पेन काही घेऊ..?? " "बाळा, बॅगच घे परत येणार नाही आपण..संध्याकाळ होईल... " "ठिक आहे सर, तुम्ही व्हा पुढे मी आलेच... " तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली.. तोच वैतागून तो म्हणाला, "अगं आता आणि कुठे जाऊ सोबत जायचयं आपल्याला शरू... " यावर हसत ती म्हणाली, "अहो राजे, मी आवरून बाहेर येते तोवर आपण आपल्या चीजवस्तू स्टाफरूम नावाच्या ठिकाणावरून आणा, थोड्याच वेळात दोघे आॅ़फिसजवळ भेटूया आणि नंतर सोबत जाऊ... चालेल ना...?? " तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत, "जशी आज्ञा राणी सरकार.."असं काही तरी म्हणत बाहेर गेला.. तिने बॅगमध्ये पुस्तकं भरली आणि ती त्या तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली तर तो तिथेच उभा होता..." हद्द झाली तुमच्या पुढे..."असं म्हणत दोघे स्टाफरूमच्या दिशेने वळले आणि त्याची बॅग घेऊन काॅलेजमधून बाहेर पडले...

    तिचा अंदाज खरा ठरला गाडी पणजीच्या दिशेने धावत होती...तो अस्वस्थ असला म्हणजे असा घाईगडबड करायचा हे तिला एका वर्षात कळलं होतं..तिने बारावीनंतर मागच्याच वर्षी काॅलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अ़भ्यासाबरोबरच इतर कला क्षेत्रातही चमकली होती...तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता असं असलं तरी त्याला नाट्य क्षेत्रात विशेष रूचि होती.. म्हणून काॅलेजमधून स्पर्धेसाठीची नाटकं, एकांकिका तोच बसवायचा.. आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून काॅलेजला बक्षिसं मिळवून दिली होती.. त्याचं नाव होतं शेखर इनामदार... मुळ मुंबई, कामासाठी गोव्यात आलेला.. तर ती मुळ गोव्याची शर्वरी दाते...दोघांचेही स्वभाव अगदी मिळते-जूळते सतत बडबड,सहज चेष्टा मस्करी करायला दोघांना आवडायचं दोघे एकमेकांना पुरून उरायचे कधी कधी आजूबाजूच्या लोकांची हसून हसून दमछाक व्हायची...सोबत काही एकांकिका नाटकांतून कामं करत होते त्यामुळे कधी कधी त्याच पात्रांचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि ऐकणाऱ्याचा भलताच गोंधळ उडायचा... 

   दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या..एरवी शर्वरी म्हणुनच तो तिला संबोधायचा..कधी मस्करीची हुक्की आली तर "शरररररर्रे...."असं लांबलचक ओढून धरायचा तिला चिडवायचा...पण तिने कधी त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नव्हतं...कितीही गंमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा अस्वस्थ व्हायचा..एखादवेळी तो त्याच्या मनाचा हळवा कोपरा तिच्यापुढे उघडायचा आणि त्याला ह्या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं...तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची..दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात कोडंच होतं पण दोघे आपापल्या मर्यादा राखून होते... 

    आज काहीतरी घडलयं हे कळायला तिला वेळ लागला नाही.. तो अगदी धीरगंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता..." काय झालयं, सांगणार आहात का आता...?? " तिने सुरवात केलीच होती..तेवढ्यात गाडी हाॅस्पिटल समोर थांबली..ती घाबराघुबरी झाली,नेमकं काय झालयं कळत नव्हतं..त्याने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालू लागली..दुसऱ्या मजल्यावर पोहचल्यानंतर तो एका खोलीत शिरला ती ही मागोमाग आत गेली..त्याने खुणेने तिला जवळच्या स्टुलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठमोरं झोपलेल्या व्यक्तिला हाक मारली तशी ती वळली, त्याने त्यांना उठवून बसवलं आणि शर्वरीकडे वळून म्हणाला, "शरू, ही माझी ताई..तिला तुझ्याशी बोलायचयं.. तुम्ही बोलून घ्या मी आहेच बाहेर.." एवढं सांगून तो निघून गेला..

    काही मिनिटे शांततेत गेली कदाचित सुरवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं म्हणून तीच बोलती झाली, "काय बोलायचयं ताई तुम्हाला... " "माझ्या लेकीची आई होशील..?? " त्यांनी अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले, साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होता त्यामुळे ती थोडीशी गोंधळली त्यांनीही ती गोंधळल्याचे भाव तिच्या डोळ्यात टिपले.."सांगते सगळं नीट सांगते.. ऐक माझं..ही माझी दुसरी लेक..पहिली तारा..ती झाली तेव्हा डाॅक्टर बोलले दुसऱ्या बाळाचा विचार सुध्दा नाही करायचा..चुकून जरी तसं झालं तर ते माझ्या जीवावर बेतू शकेल..आणि तेव्हाच माझं आॅपरेशन होणार होतं पण मी नकार दिला होता..तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं..आणि मी ही ते हलक्यात घेतलं होतं... ताराच्या बाललिलांमध्ये रमता रमता दोन वर्षे सरली पण....... "बोलता बोलता त्यांना ठसका लागला.. शर्वरीने जवळच्या टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी त्यांना दिलं..पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला त्या थोडावेळ बोलायच्या थांबल्या आणि एकवार शर्वरीला न्याहाळलं.. पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली.." माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे गं माझ्यावर..पण एका मोहाच्या क्षणी आम्ही बळी पडलो,आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले यांनी अर्बाेशनचा निर्णय घेतला पण मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारांवर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते हे माझ्यावर चिडले..अबोला धरला पण कुठेतरी मला आशा होती की सगळं नीट होईल वाटलं हवापालट झाला की नाही येणार काही अडचण म्हणून नववा लागला तसं इथं आले,इथंवर सगळं नीट होतं पण नेमक्या वेळी नियतीनं फासे पलटले... " "म्हणजे काय झालं... " न राहवून मध्येच शर्वरीनं विचारलं... "डिलीवरीच्या वेळी काॅम्प्लीकेशनस् वाढले आणि हिच्या जन्मानंतर मला पान्हाच फुटला नाही बघ... रडून रडून कासावीस झालयं गं लेकरू माझं...आईच्या कुशीसाठी आसुसलीय ती..आठवडा सरलाय बाटलीतून चमच्यातून कशातून ही दुध घेईना झालीय..नळ्या घालून पाजण्याचा प्रयत्न करतायेत डाॅक्टर पण त्यांनी ही हिच्यापुढे हात टेकलेत...आता लेकराचे हाल बघवत नाहीत बघ मला...तुझ्यापुढे हात जोडते माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे तिला आईच्या कुशीची ऊब दे म्हणजे मी समाधानने डोळे मिटेन... मला वचन दे माझ्या छकुलीला कधी दूर लोटणार नाहीस..माझ्याकडे वेळ फार कमी आहे गं... "त्या थांबल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली आणि नकळत तिच्या कुशीत शिरल्या आणि ती ही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिली... 

     आता तिला अश्रू आवरते घ्यायला हवे होते..तिने त्यांना शांत केलं..तेवढ्यात एक नर्स आत आली तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेली इवलीशी छकुली होती..तिची ती इवलीशी किर्ती,इवले इवले हात पाय झाडणारी, काळेभोर भिरभिरणारे डोळे, लालचुटूक इवले ओठ, रडून रडून निस्तेज झालेला मलूल पण गुटगुटीत चेहरा अशी ती पाहून शरूला तिच्या लहानपणीची बाहुली आठवली..नर्सने तिला शर्वरीच्या हातात दिलं आणि काय आश्चर्य तिच्या स्पर्शाने तिची कळी अगदीच खुलली कधी नव्हे ते तिची आई तिच्या छोट्या परीला हसताना बघत होती..." तिने तिची आई निवडली.. " नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले... शरूने जबाबदारी स्विकारल्यागत तिला घट्ट उराशी कवटाळले...ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिने छोटीला झोपवलं.. त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या तिने त्याला आत पाठवलं आणि ती त्या नर्सच्या मागोमाग गेली... सुमारे तीन साडेतीन तासाने ती पुन्हा रूममध्ये आली आणि ताईंकडे बघत उद्गारली, "आता सगळं नीट होईल काळजी नका करू... आणि तुम्ही आता लवकर बऱ्या व्हा.." मग त्याच्याकडे वळून म्हणाली, "चला निघायचं ना सर...??" "ताई, येतो...रात्री काही आणायचयं का..तुला, दाजींना..?? "त्याने विचारलं.. " नाही अरे नको काही, सावकाश जा आणि सावकाशीने परत ये..घाईघाईने स्वत:च्या जीवाची दगदग नको करूस.."त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या... 

    दुपार टळून गेली होती..उन्हं कलली होती.."सर, बोलायचं होतं थोडं..."त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली...दोघे गाडीतून उतरले.. मऊशार वाळूत दोघांची पावलं उमटत होती..आभाळ गच्च भरून आलेलं आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल सांगता येत नव्हतं..तो एका ठिकाणी थांबला, दोघे खाली बसले..आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं...किनारा अगदी शांत भासत होता त्याहून भयाण होती त्या दोघांमधली शांतता...त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली, "सर..." "बोल शरू, काय बोलायचयं तूला..इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तूला कळली..मनात साचून राहिलं होतं सारं, ताईचा त्रास बघवत नाही गं...डाॅक्टर सांगतात तिच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही तरीही ती तग धरून आहे कसलीशी वाट बघतेय पण तिला मला ही सांगता येत नव्हतं...तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं म्हणून तिला तुझ्याशी बोलावसं वाटलं..आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय.. सांग काय बोलली ताई.. "

     तिने एकवार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्यांच्यातला संवाद आणि त्यानंतर छकुलीचा त्याला अालेला प्रतिसाद सारं त्याला सांगितलं आणि म्हणाली, " सर, मी एक निर्णय घेतलाय..आणि त्यात मला तुमची साथ हवीय.." "कसला निर्णय..??" त्याने भांबावून विचारलं.. "सांगते....मघाशी तुम्ही आत आल्यानंतर मी त्या नर्स सोबत गेले..तिला छकुलीबद्दल विचारलं.. तिने मला सांगितलं...तिला दुध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत नाकातून नळ्या घालून सध्या तरी निभावतयं पण हे असं जास्त दिवस करणं शक्य नाही कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील आणि त्यामुळे नळ्या हलल्या तर तिलाच अपाय होईल.आणि इतर कोणत्या पध्दतीने ती दुध घेत नाही..मग मी त्यांना विचारलं.. ह्यावर कोणता दुसरा उपाय.. ?? " "मग काय म्हणाल्या त्या..??"तिला मध्येच तोडत तो म्हणाला..." इन्ˈड्यूस्‌ लॅक्टेशन... "ती म्हणाली.."म्हणजे..?? हे काय असतं..?? " त्याने विचारलं..."जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून आॅक्सीटोनिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो ज्याद्वारे तिच्या स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला सुरवात होते आणि आठ-नऊ महिन्यांच्या अखेर ती बाळाला पाजू शकते.. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे.. पण आपल्याकडे दुदैवाने हा पर्याय उपलब्ध नाहीये, दुसरा पर्याय एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छकुलीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल कदाचित पण ही शक्यता मला कमीच वाटली म्हणून मी नर्सला तिसरा काही मार्ग आहे का ते विचारलं तर त्यांनी मला इन्ˈड्यूस् लॅक्टेशन बद्दल सांगितलं.... "थोडावेळ उसासून ती पुन्हा सांगु लागली, "इन्ˈड्यूस् लॅक्टेशन या प्रतिक्रियेद्वारे आॅक्सीटोनिन शरीरामध्ये इन्जेक्ट केला जातो..औषधोपचार करून प्रोलॅक्टिन लेवल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पंपिंग, हॅन्ड एक्सप्रेसींग अशा पध्दती वापरून महिन्या दिड महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते आणि हे दु़ध आईच्या दुधा इतकेच शक्तीवर्धक असते बाळाला लाभदायक असते त्याचा बाळाला अपाय होत नाही...तर मी असा निर्णय घेतलाय की मी ह्या प्रक्रियेला सामोरी जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवीय सर...सांगा द्याल माझी साथ...?? " "अगं पण याचा तुला काही त्रास झाला भविष्यात तर... आणि तसंही बाॅटल फिडींगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे.. " तो तिच्या काळजीने कळवळून म्हणाला.. "हो पण त्याने बाळाला त्रास होतो, त्यामुळे बाळ कमजोर होतं सतत आजारी पडतं.. तुम्हाला चालणार आहे का हे आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डाॅक्टरकडे ने आण करणार आहात का.. ती हेल्दी व्हायला हवीय ना मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आणि प्राॅपर ट्रिटमेंट घेतली तर मला ही काही प्राॅब्लम नाही व्हायचा... "ती त्याला समजावत म्हणाली"तूू म्हणतेस ते पटतयं मला पण त्यासाठी तुझा असा वापर करणं खटकतयं गं मनाला...कितीतरी फायदा घेऊ.. बोट दिलं म्हणजे हात धरू नये म्हणतात आणि तू तर हे अनंत उपकार करणार आहेस.. " तो करूण स्वरात म्हणाला..तिने विश्वासाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "सर, असं काही मनात येऊ देऊ नका.. उपकार वैगरे काही नाही.. मी माझा स्त्री धर्म निभावतेय.. माझ्या पान्ह्यानं त्या कोवळ्या जीवाची भुक भागणार असेल तर मी तयार आहे थोडासा त्रास सहन करायला आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाई होण्याचं सौख्य मला लाभणारचं आहे.या सगळ्यात मला तुमची मदत लागेल.. "

    "कसली मदत..?? " "ह्या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाशी कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे..त्यामुळे आपल्याला तिला रितसर अडॉप करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्याआधी आपण पती पत्नी...." "नाही ते शक्य नाही.. " तिच्यापासून दुर होत तो म्हणाला.. "सर, एकवार विचार करा... ताईंचा आणि आईच्या कुशीला आसुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा.. आणि घाबरू नका सर..मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून नाही ठेवणार, ज्याक्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठीची माझी गरज संपली त्याक्षणी मी तुम्ही सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन..आज आपली तिला गरज आहे, एकदा विचार करा... "तिथे पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला ती ही मागोमाग आली..आणि प्रवास सुरू झाला... 

    गाडीत कोणी काही बोललं नाही..तिला बस स्टॅण्डवर सोडून तो परत गेला..तिचीही पावलं घरच्या बसच्या दिशेने वळली..बसमध्ये छान विंडो सीट मिळालं आणि तिला जरा बरं वाटलं तसही बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळा यायचा त्यात गर्दी असेल तर मग विचारायलाच नको बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झोपायचा पण त्यालाही पर्याय नसायचा...म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नसे..विंडो सीट मिळाली की ती प्रफुल्लित व्हायची कारण या सीटवर बसलं की आरामदायक वाटायचं त्या दिड दोन तासांच्या प्रवासांत तिचा लेखनाचा छंद बहरला होता.. अशीच खिडकीतून बघता बघता किती तरी कवितांनी जन्म घेतला होता..पण आज ती द्विधा मनस्थितीत सापडली होती..मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती..खिडकीतून समोर दिसणारा सुर्य जसजसा मावळतीकडे कलत होता तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा गडद होत होती...आता सगळं शेखरच्या निर्णयावर अवलंबून होतं त्यामुळे तिच्या हातात वाट पाहाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता...घरी आली,मेसेज करून त्याला पोहचल्याचं कळवलं..जेवून झाल्यावर थकलेलं अंग पलंगावर झोकून दिलं..डोळ्यावर झोप असून देखील विचार तिला झोपू देत नव्हते..त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी तिला झोप लागली...

      दुसऱ्या दिवशी सकाळी काॅलेजला आली तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, "प्रार्थने नंतर आपल्याला निघायचयं आॅफिस जवळ थांब.. " तिनं होकारार्थी मान डोलवली...प्रार्थना झाली आणि दोघे निघाले..गाडी मंदिरासमोर थांबली..त्या तिथे तिची मैत्रीण आणि आणखीन एक व्यक्ति उभी होती...ते दोघे उतरून त्यांच्या जवळ आले त्याने ओळख करून दिली तो त्याचा मित्र होता..येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितल्याचं सांगितलं..त्यावर दिर्घ चर्चा केल्यानंतर त्याला शर्वरीचं बोलणं पटलं होतं त्यामुळे आज त्या दिशेने पहिलं पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्यांचं होणारं लग्न...

     चौघे बाहेर गुरूजींसाठी मंदिराच्या आवारात थांबलेले...बाहेर विजा कडाडत होत्या..सरीमागून सरी कोसळत होत्या.. वाटेत येताना दोघांनी कपडे बदलले होते.. लाल तपकिरी रंगाचा कुर्ता पांढरी पॅन्ट त्याला शोभत होती..हातातलं घड्याळ डोळ्यावरचा चश्मा अगदी हल्की शेव केलेली दाढी नेटके विंचरलेले केस त्याच्या राजबिंड्या रूपाची शोभा वाढवत होते..ती ही छान पैठणी नेसली होती..एवढ्या गडबडीतही तिचं शाॅपिंग त्याने व्यवस्थित केलेलं..अंगावर जास्त नसले तरी त्याच्याकडे असलेले त्याने जपून ठेवलेले आईचे काही ठेवणीतले दागिने तिच्यासाठी आणलेले..तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलिकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं..पाठीवर सोडलेली लांबसडक वेणी त्यावर मोगऱ्याचा गजरा..हातात चुडा,गळ्यात नाजूक हार, भुवयांच्या मध्ये लहानशा चंद्राकृतीची टिकली.. पायातली पैंजण थेंबाच्या आवाजात आवाज मिसळून वाजत होती..गुरूजी आले दोघांनी त्यांचा आर्शिवाद घेतला आणि विधींना सुरवात झाली...शास्त्रासाठी म्हणून गुरूजींनी हळदीचा विधी केला..दोघांना एकमेकांची उष्टी हळद लागली नंतर लग्नाच्या विधी सुरू झाल्या..त्याच्या हातात हात देऊन विश्वासाने ती सात पावलं चालली,त्याच्या नावाचं मंगळसुत्र तिच्या गळ्यात पडलं आणि भांगेत त्याच्या नावाचं कुंकू लेवून ती झाली होती शर्वरी शेखर इनामदार...

    सगळं आटपून ते कोर्टमध्ये गेले तिथे त्याच्या एका वकील मित्राला हाताशी धरून त्याने लग्न रजिस्ट्रेशनची आणि अडाॅपशनची कागदपत्रं बनवली..वकिल मित्रांनी दिलेल्या जरूरीच्या कागदपत्रांची यादी केली आणि नंतर ते दोघे त्याच्या रूमवर आले..तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले..येता येता त्यांनी ताईची भेट घेतली..ती माऊली कृतज्ञतेचे अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही...रूमवर पोहचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हाॅलमध्ये येऊन बसले...त्याने दोघांसाठी काॅफी करून आणली..पाऊस नुकताच थांबला होता खिडकीतून गार वारा येत होता त्याने एकवार तिच्याकडे निरखून पाहिले, जरी तिने नववधूचा सगळा साज उतरवला असला तरी ती नुकतीच फुललेल्या मोगऱ्यागत मोहक दिसत होती..तिला ही त्याची तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भासवत होती.. तिथे थंड शांतता नांदत होती शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली, "आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय आता काही दिवसात कोर्ट प्रोसिजर सुध्दा पुर्ण होईल..सो आता ट्रिटमेंट कधीपासून सुरू करायची हे तु सांग आपण त्याप्रमाणे करू... " "सर, आता जास्त उशीर नको उद्या पासूनच करू.. " ती तत्परतेने म्हणाली.."याविषयी आई बाबांना काय सांगणार आहेस..??खरंतर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं.."तो काळजीच्या सुरात म्हणाला.."हो, खरं आहे तुमचं म्हणणं पण ही ती वेळ नाही..विषय वेगळा आहे आणि माझे आई बाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत तर ते आपला हेतु समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही आणि या साऱ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते तुम्हाला चालणार असेल तर नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी लागेल कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला.. "तिने आपलं मत मांडलं त्यालाही ते पटलं... "तु इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही..आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आई बाबांना सांगितलसं तरी चालेल माझी मदत लागली तर सांग मी ही सांगेन त्यांना... " काॅफी संपवून ती ही तिथून निघाली..

     ती घरी आली तेव्हा काॅलेजच्या ड्रेसमध्येच होती गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं पण ते ही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅर्टनशी मिळतजुळतं आणलेलं म्हणजे कोणाला संशय नाही येणार...आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्वेंस करायचा,ते ही तिला तेवढं कठीण गेलं नाही..मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहाणार म्हटल्यावर त्यांनी ही परमिशन दिली..तिने सामान आवरायला घेतलं..गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहचली..कागदपत्र त्याच्याकडे सोपवली आणि सुरू झाला प्रवास त्यांच्या "अनोख्या नात्याचा "... 

    त्याच संध्याकाळी ते हाॅस्पिटलमध्ये जाऊन डाॅक्टरला भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्टस् केल्या...सुदैवानं तिचं शरीर ही प्रक्रिया पेलण्यासाठी अनुरूप होतं..डाॅक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली ज्या दिवसापासून ट्रिटमेंट सुरू होणार होती..सगळं आटपून ते दोघे त्याच्या रूमवर परतले..पावसाची रिपरिप सुरूच होती..दोघे चिंब ओले झाले होते..त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि शर्वरीला हाक मारली..ती केस कोरडे करत बाहेर आली आणि क्षणभर तो तिला न्याहाळत राहिला..तिच्या अंगावर रोजचे कपडे होते त्याने कितीतरी वेळा याहून सुंदर कपड्यात तिला बघितलेलं मात्र आज काहीतरी खास होतं आणि ते होतं तिच्या गळ्यात डौलाने मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झरणाऱ्या केसातून फिरणाऱ्या हातात किणकिणारा हिरवा चुडा, पायात छुमछुम करणारं पैजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाजणारे पावसाचे थेंब असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणारं होतं...ती येऊन खुर्चीत येऊन बसली तो हळुच तिच्या मागे गेला आणि तिचे मऊशार केस आपल्या हातात घेऊन पुसू लागला...तिने चहाचा कप हातात घेतला आणि मस्त वाफाळलेला ओठातून पोटात उतरल्यावर ती अगदी सुखावली... 

     "शरू..... " त्याने बोलायला सुरुवात केली.. "हो सांगा सर.. " "आपलं लग्न जरी झालं असलं तरी त्याचं कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे..आपण फक्त छकुलीसाठी... " तो कसेतरी शब्द गोळा करून बोलायचा प्रयत्न करत होता त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगता ही पोहचल्या होत्या त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली, "सर, नका काळजी करू मी ते कारण विसरलेले नाहीये आणि विसरणार देखील नाही.. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर आणि कारणामुळे असलं तरी लग्न आपलं विधीवत पार पडलयं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्या समोर तरी तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू द्या आणि हे मी माझ्या आनंदासाठी करतेय कारण मला तो माझा हक्क वाटतो तसंही तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्विकारायला मी घाबरणार नाही..पण तुमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचं असेल तर आताच सारा साज उतरवून ठेवते शेवटी हे सारं मला तुमच्यामुळे मिळालयं.." असं म्हणत ती खुर्चीतून उठली मोकळ्या केसांना चाफ लावला आणि समोरच्या देव्हारातल्या देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले...!!! 

    तो क्षणभर तिला पाहातच राहिला त्याला खूप कौतुक वाटलं तिचं कारण इतक्या कमी ओळखीत तिने स्वबळावर घेतलेला हा धाडसी निर्णय आणि त्यात ह्या अशा नात्याविषयी पुर्णपणे असलेली समज त्याला विश्वास देऊन गेली की त्याची निवड चुकली नव्हती...!!!तो तिच्या जवळ गेला..तुळशी वृंदावनासाठीचं छोटं निरांजन घेऊन परतली तर समोर तो होता..त्याने देव्हाऱ्यातला कुंकवाचा करंडा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या भांगेत रेखलं आणि मंद हसत म्हणाला, "हे राहिलं होतं... " तिच्या डोळ्यात आनंदाची लकेर उमटली..तिने गॅलरीतल्या तुळशीपुढे निरांजन ठेवलं आणि पाया पडून आत आली..तो जेवणाची तयारी करत होता त्याला मदत करायला ती स्वयंपाक घरात आली पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं ते ही तेवढचं महत्वाचं होतं..ती ही बसली..त्यानंतर दोघे सोबत जेवले तो आतल्या खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता तेवढ्यात ताईचा फोन येऊन गेला..सारं आवरून ती आत आली..तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपाटातली अंथरूण घेऊन बाहेर जाऊ लागला तेवढ्यात तिने टोकलं, "सर थांबा कुठे चाललात.. " "अगं असं काय करतेस..तु झोप इथे निवांत मी झोपतो हाॅलमध्ये..." तो कसाबसा म्हणाला.."नाही.. तुम्ही कुठेही जायचं नाही.. इथेच झोपा..हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत उशी ठेवू मध्ये.. पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला जिथंवर साथ आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्विकारू आपलं नातं प्लीज... मला कळतेयं तुमची तगमग पण मघाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलतं ना त्याच विश्वासाने विसावा ना.. दोघे एका अंथरूणात आहोत म्हणजे काहीतरी होईलच ही भिती काढून टाका मनातुन..आपला संयम आपण जाणून आहोतच.."हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती.."सर अजूनही नाही पटलयं का तुम्हाला...ठीक तर मग मी झोपते बाहेर माझ्यामुळे तुमची फरफट नको..झोपा निवांत.. "असं म्हणत ती बिछान्यावरून उठली.. " नको..आपण सोबत झोपतोय..चल पटकन उद्या काॅलेजला जायचयं तेव्हा लवकर पण उठायचयं.. "असं म्हणत त्याने हातातली अंथरूणं कपाटात परत ठेवली मध्ये उशी टाकली आणि दिवा मालवून पलंगावर विसावला.. तिनंही बाजूला पाठ टेकली..दोन दिवसांच्या धावपळीत आलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निद्रादेवी प्रसन्न झाली होती... 

    सकाळी मंद मंद पोह्यांच्या वासाने त्याला जाग आली तो उठून स्वयंपाक घरात आला ती पाठमोरी उभी होती तिला त्याची चाहुल लागली तशी ती पाठमोरी राहूनच ती म्हणाली, "अहो सर, इथे काय करताय आवरून या पटकन.. निघायचयं आपल्याला.." "हो आलोच.." असं म्हणत तो आवरायला गेला..त्याचं आवरून झाल्यावर तिने त्याला चहा आणि पोहे दिले.."अरे वा... आज हातात अगदी रेडीमेड चहा नाश्ता..नशीब फळफळलयं माझं.."असं म्हणत त्याने चहा पोह्यांचा आस्वाद घेतला आणि तिचं भरभरून कौतुक केलं...भाजी पोळीचा डब्बा घेऊन ते काॅलेजला निघाले आणि सारं नेहमीप्रमाणे सुरू झालं कुणाला काही माहित नव्हतं..तिच्या गळ्यात मंगळसूत्र असायचं मात्र ते ओढणी आड आणि कपाळावर कुंकू नसलं तरी ती लहानशी लाल टिकली लावयची त्यामुळे कोणाला संशय यायचा नाही.. आतापर्यंत दोघांचा चांगला जम बसला होता..घरची कामं, हाॅस्पिटलमधला ताईचा डब्बा, तिचा वेळच्या वेळी अभ्यास साऱ्या गराड्यात दोघं एकमेकांना सांभाळून घेत होते...

      दहा दिवस उलटले..सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्या होत्या..लग्न आणि अडाॅपशन कायदेशीर झाल्याची कागदपत्र एकदम त्याच्या हाती पडली...तो तिला डाॅक्टरांकडे घेऊन आला त्यांनी दोघांना प्रोसिजर समजावून सांगितली..गोळ्या आणि वॅक्सिनेशनस लिहून दिली आणि तिला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं..तिथे त्या नर्स होत्या त्यांनी शर्वरीला बेडवर झोपवलं...बाजूच्या टेबलवरची वॅक्सिन्स, मेडिकल इन्स्ट्रुमेंटस् पाहून जराशी गांगरली होती...नर्सने तिचे कपडे दुर केले आणि इन्जेक्शन तयार केलं तिने दुसऱ्या बाजूला बघत घट्ट डोळे मिटून घेतले तेवढ्यात तिचा हात कोणीतरी हातात घेतल्याचं जाणवलं ती परतणार इतक्यात सुईचा स्पर्श तिला झाला आणि पुढच्या क्षणाला तिचा हातातला हात नकळत दाबला गेला.. तिने हळूहळू डोळे उघडून पाहिलं तिचा हात शेखरच्या हातात होता आणि तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता..त्या नर्सने नंतर शेखरला हॅन्डएक्सप्रेसिंगची प्रोसेस समजावली कारण त्याने दुधाचं प्रमाण वाढणार होतं..ती एक प्रकारची एक्सरसाइज होती..दिवसेंदिवस जसं जसं दुधाचं प्रमाण वाढवायचं होतं तसचं तयार झालेलं दुध शरीराबाहेर देखील यायला हवं होतं कारण जर दुधाचा योग्य निचरा न होता तसचं स्तनांमध्ये राहिलं तर दुधाच्या गाठी होण्याची शक्यता होती आणि दुध जर गोठलं तर तिला खूप त्रास झाला असता.. सुरवातीला अगदी छोटा चमचा किंवा त्याहूनही कमी दुध येईल तरीही हलगर्जी राहू नका याचीही पुरेपूर कल्पना त्या नर्सने दोघांना दिली..बाळ जवळ असल्याने स्टीमूलेशन थेरपीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी कृत्रिम प्रसाधनांचा वापर टाळता येणार होता आणि जमेल तितक्या नैसर्गिकरित्या दुध तयार होईल याची काळजी नर्स घेत होत्या..पुन्हा एकदा स्तनांवर किती आणि कशाप्रकारे दाब देऊन दुधाचा नीट निचरा करावा लागेल हे ही त्यांनी नीट समजावून सांगितलं..

चेकअप नंतर ते ताईला भेटले, ट्रिटमेंटची सुरवात झाल्याचं सांगितलं..छकुलीला ही भेटून आले.. आता ताईची तब्येत हळूहळू सुधारतेय असं डाॅक्टर म्हणाले...शेखर दाजींना भेटला पुन्हा एकदा त्यांना समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न केला पण ते काही बधले नाहीतच त्यांना फक्त ताई ठीक होण्याशी कारण होतं आता ज्या दिवशी दत्तकपत्रावर सही केली होती त्या दिवशी त्यांचा छकुलीशी संबंध संपला होता...आजही शेखर रित्या हातानी परतला होता पण शर्वरीने या ही परिस्थितीत त्याला नीट सावरलं होतं.. 

     घरी आल्यावर ती पटकन अभ्यासाला बसली आणि तो स्वयंपाकाला लागला..आता शेखरला तिला जास्त जपावं लागणार होतं कारण डाॅक्टरांनी सांगितलं होतं या औषधांचे शर्वरीवर साईड इफेक्टस् दिसू लागतील..सुरवातीला कमजोरी येणं, अचानक चिडचिड होणं किंवा अगदीच शांत होणं, औषध घेतल्यावर कधीमधी ग्लानी येणं, वजन कमी जास्त होणं हा असा त्रास होईल पण तो सुरवातीलाच नंतर हळूहळू दुधाचं प्रमाण नाॅर्मल झालं म्हणजे सगळं पुर्ववत होईल तोवर काळजी घ्यावी लागेल असं डाॅक्टर म्हणाले होते...जेवल्यानंतर ती बाहेर गॅलरीत बसली होती आताच पावसाची सर येऊन गेली होती..गार हवेची झुळूक अंगाला स्पर्शून जात होती..त्याने तिच्या गोळ्या आणल्या..गोळ्या घेऊन ती झोपी गेली.. तो बराच वेळ जागा होता बऱ्याचवेळानंतर त्याला झोप लागली... 

    दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली तारेवरची कसरत...काॅलेज, अभ्यास, औषधं, हाॅस्पिटल आणि बाळ हे सगळं सांभाळता सांभाळता दोघे मेटाकुटीला यायचे पण एकमेकांच्या साथीने धीराने आल्या दिवसाला सामोरे जात होते..तिची औषधं नियमित सुरू होती..तिचं खाणंपिणं अगदी सगळं नीट पाहत होता..शेखरनं हॅन्डएक्सप्रेसिंग करण्याआधी शर्वरीला नीट विश्वासात घेतलं ती ही समजुतीनं तयार झाली..इतक्या जवळ आणि एकटं असूनही त्याच्या स्पर्शात तिला कधीही वासनांध भाव जाणवला नाही...हल्ली कितीतरी वेळा ग्लानीमुळे त्याच्या बाहुपाशात झोपी जायची..सुरवातीला नर्सने सांगितल्याप्रमाणे कमी दुध यायचं पण नंतर स्टीमूलेशन थेरपीला सुरवात झाल्यानंतर दुधाचं प्रमाण अगदी समाधानकारक यायला लागलं...छकुलीच्या कोवळ्या ओठांचा स्पर्श छातीला होताच तिच्यातली आई मनोमन सुखवायची..पण त्या इवल्या जीवाला पदराखाली घेताना समोर तिला नऊ मास पोटी जपलेल्या त्या निष्पाप माऊलीच्या डोळयांच्या कडा ओसंडून वाहायच्या पण ती माऊली पदरात दुःख टिपायची आणि अश्रु शर्वरीला दिसू नये याचा आटोकाट प्रयत्न करायची पण शरूच्या नजरेतून तिची घालमेल काही सुटायची नाही आणि ती पाहून तिच्यातल्या बाईचा जीव तिळतिळ तुटायचा..पण ती देखील काही करू शकत नव्हती... पण यात एक समाधान होतं ते म्हणजे दोन महिन्याऐवजी दिड महिन्यात शर्वरीच्या दुधाचं प्रमाण छकुलीची भुक भागवण्याइतपतं वाढलं होतं आता छकुलीचा तजेला,गुटगुटीतपणा परतत होता..आता तिला काचेच्या पाळण्यात न ठेवता साध्या गाडीच्या पाळण्यात ठेवलं होतं.. शर्वरीची औषधं आता पुर्णपणे बंद झाली होती आणि ती पुर्ववत होत होती फक्त छकुलीला पाजायला दिवसातून साधारण तीन ते चार वेळा तिला हाॅस्पिटलला जावं लागायचं.. शेखर तिच्या लेक्चरच्या वेळा सांभाळून तिला ने-आण करायचा...इतक्यात छकुलीला घरी आणणं शक्य नव्हतं कारण ताईची तब्बेत अजून स्थिरस्थावर झाली नव्हती..तरीही शर्वरी नि शेखर नीट सारं सांभाळून घेत होते...त्यांची छकुली आता बघता बघता दोन महिन्यांची झाली होती..त्यांनी एक महिन्याची झाल्यावर तिचं नामकरण केलं होतं..."शुभदा "... आता ती त्यांची "शुभा" झाली होती...बाबांच्या तोंडून शुभा ऐकून अगदी हरखून जायची लेक आणि बाप-लेकीचा तो खेळकर संवाद पाहून शरूला खूप आनंद व्हायचा... 

    हा हा म्हणत दिवस धावत होते आणि एक दिवस लेक्चर सुरू असताना वर्गाच्या दारावर टकटक झाली..कुणीतरी दार उघडलं समोर तो उभा होता अगदी शक्तिहीन, विस्कटलेले केस, रडून रडून सुजलेले डोळे, डोक्यात पडलेल्या खोकीतून वाहणारं रक्त... हा असा त्याचा अवतार पाहून तिला क्षणभर काही सुचेनासं झालं ती तशीच त्याच्या दिशेने धावली..तो अगदी भावनाशून्य नजरेने बघत होता..तिने अक्षरशः त्याला दंडाला धरून हलवत त्याला भानावर आणलं आणि ती बोलून गेली, "शेखर... अहो भानावर या काय झालयं.. बोला शेखर... " तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते.. पण तो बोलत नाही तोवर काही कळायला मार्ग नव्हता.. तिनं त्याला खुर्चीवर बसवलं आणि ती पाणी आणायला वळणार इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली..."ताई गेली शरू... "एवढं कसंबसं त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि पुन्हा तो हमसून तिच्या कुशीत रडू लागला...तिच्या ही डोळ्यातून अश्रुधारा गालावर उतरल्या पण आता तिला धीट राहाणं भाग होतं..त्याला सावरून आता तिला त्या इवल्या जीवाला जपायचं होतं..तिच्या आईला दिलेलं वचन पाळायचं होतं.. तिने त्याला शांत केलं, पाणी दिलं आणि डोक्यावरची जखम बांधली आणि त्याला घेऊन ती निघाली..वाटेत जाता जाता त्याने घडलेल्या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितलं..."तुला काॅलेजला सोडल्यानंतर मी ताईला नाश्ता द्यायला गेलो..त्यावेळी मी पोहचण्यापुर्वीपासून दाजी तिथे पोहचले होते..त्यांच्यात बहुतेक छकुलीवरून वाद सुरू होते मी आत गेलो तेव्हा दाजी पाळण्यातल्या आपल्या छकुलीला अपाय करताना दिसले मी त्यांना अडवलं तर त्यांनी मला ढकललं मी बाजूला पडलो माझं डोकं तिथल्या स्टूलचा कोपरा आपटला आणि रक्त वाहू लागलं.. मला सावरायला म्हणून ताई माझ्याकडे धावली त्यात तिला लावलेलं सलाइन तुटलं आणि ती तिथचं कोसळली.. मी कसाबसा स्वतःला सावरून डाॅक्टरांना बोलावलं पण आम्ही काही करेस्तोवर सारं संपलं होतं गं....... शरू माझी ताई आम्हा सर्वांना सोडून गेली आपल्या छकुलीला पोरकं करून गेली.." कसंतरी सगळं सांगितल्यावर त्याला पुन्हा रडू कोसळलं...दोघे हाॅस्पिटलला पोहचले..त्या तिथे काहीच हालचाल दिसत नव्हती फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता..ते दोघे त्या आवाजाच्या दिशेने गेले तिथे एक नर्स छकुलीला शांत करत होत्या.. शर्वरीने लगेच तिला घेतलं..शेखरने ताई विषयी विचारताच त्या नर्सने सांगितलं की पेशंट बरोबर असलेल्या व्यक्तिने रितसर कागदपत्रे दाखवून साऱ्या फाॅरमॅलिटीज पुर्ण करुन बाॅडी ताब्यात घेतली आणि या बाळाच्या उपचाराचा सगळा खर्च मागाहून येणारा व्यक्ति देईल आणि तिला घेऊन जाईल जर नाही आला तर तिला अनाथाश्रमात टाका असं सांगितलं आणि ते निघून गेले...हे ऐकताच शेखर मटकन खाली बसला त्याला तो धक्का सहन झाला नाही... तिने नर्सच्या मदतीने त्याला सावरलं आणि सगळ्या फाॅर्म्यालिटीज पुर्ण केल्या आणि बाळाला आणि त्याला रूमवर घेऊन आली.. तो अजूनही धक्क्यातून पुरता सावरला नव्हता..शुभा शांत झोपली होती..

     संध्याकाळी मुंबईहून त्याच्या मित्राचा फोन आला.. आईने गळ घालून त्याच्यासाठी विधी थांबवले असं तो म्हणाला..आधी तो जायला तयार नव्हता पण शर्वरीने त्याला समजावलं आणि तो जायला तयार झाला..तिने पटकन त्याची बॅग भरली आणि तो निघाला..त्याला यायला निदान तीन दिवस लागणार होते आणि बाळाला एकटीला सोडून जाणं शक्य नव्हतं म्हणून तिने पुढचे तीन दिवस काॅलेजला न जाण्याचा निर्णय घेतला...ताईचे अंतिम विधी आटपून तो अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी परतला..मुळ दुवाच संपल्यामुळे आता शुभा फक्त शेखर शर्वरीची जबाबदारी होती..आता त्यांना निर्णय घ्यायचा होता तिचा सांभाळ ते कसा करणार होते कारण दोघांपैकी एकालाही पुर्ण दिवस बाळाजवळ थांबणं शक्य नव्हतं...रात्री जेवणं झाल्यानंतर सगळं आवरून शर्वरी रूममध्ये आली.. आज त्यांच्यामध्ये उशी नव्हती तर आज त्यांच्यामध्ये होतं ते कारण ज्यामुळे ते एकत्र आले..त्यांची जबाबदारी आता सर्वस्वी त्यांची असलेली शुभा...दोघे तिला मध्ये घेऊन झोपले होते.. शरू तिला पाजत होती.. दोघांमध्ये दिर्घ चर्चा झाली आणि त्यांनी याचा सुवर्णमध्य काढला की ते शुभाला त्यांच्यासोबत काॅलेजला नेतील...तसंही रेस्ट रूम होतीच..तिचा तसाही कोणी वापर करत नव्हतं...आता प्रिन्सिपलची परमिशन मिळवायची होती...उद्यापासून सुरवात होणार होती एका नव्या आव्हानाची..

     दुसऱ्या दिवशी शुभाला लागणऱ्या साऱ्या गोष्टी एका बॅगमध्ये भरल्या आणि ते दोघे तिला घेऊन काॅलेजला आले...शेखर प्रिन्सिपलशी बोलला त्यांनी त्याची अडचण समजून घेत त्याला रेस्ट रूम वापरायची परवानगी दिली...तासाभरात तिथली सफाई करून शरूने बाळाला तिथे झोपवलं आणि ती लेक्चरला निघून गेली.. शेखर शुभाकडे थांबला..तिने वर्गात येऊन आपल्या सगळ्या मैत्रीणींना विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगितली,आपल्या लग्नाविषयी सारं सांगितलं आणि त्यांची साथ मागितली..त्या साऱ्याजणी उत्साहाने तयार झाल्या आणि शर्वरी सिध्द झाली हे नवं आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी...तर इथे काॅलेजभर बातमी पसरली शेखर सरांच्या मुलीची आणि काही तासात ती पुर्ण खोली रंगीबेरंगी झाली...मुलांनी वेळात वेळ काढून आपापल्या परीने खोली सजवली...दिवस सरत होते आता शुभदा शेखर शर्वरीचीच नाही तर पुर्ण काॅलेजची जबाबदारी झाली होती...सतत तिच्याजवळ कोणीतरी असायचं, तिला खेळवायला..शरूच्या वर्गाच्या अगदी समोर तिची खोली असल्यामुळे तिला सहज तिच्यावर लक्ष ठेवता यायचं...आता तर ती खोली खेळण्यांनी भरली होती,तिच्या झोपेपासून ते दुधाच्या वेळेपर्यंत साऱ्या गोष्टी अगदी कटाक्षाने पाहिल्या जायच्या..

    सहा महिने सरले...कुशीत वळणारी शुभा आता रांगू लागली होती..शरूचा पान्हा तिला लाभत होता..तिनं चांगलचं बाळसं धरलं होतं.महिन्याकाठी तिचं रूटीन चेकअप, चाचण्या सगळं शेखर जातीने बघत होता..थंडीचे दिवस होते अगदी गोठावून टाकणारी गुलाबी थंडीची रात्र होती ती...शुभदा नेहमीप्रमाणं आईच्या कुशीत विसावली होती आणि सवयीने शेखर शर्वरी हातात हात गुंफून आपल्या छोट्या परीराणीला घेऊन झोपी गेले होते...काहीशा कारणामुळे शेखरची झोप चाळवली..तो डोळे चोळत उठला..किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आणि परत येऊन पलंगावर पहुडला सहज त्याने बाजुला पाहिलं...शर्वरी शांत झोपली होती आणि तिच्या कुशीत विसावलेली शुभदा अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य होतं ते त्या चंद्रप्रकाशात... झोपेतही तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य पसरलं होतं... आणि क्षणासाठी शेखर मोहित झाला...त्याने झटकन तिच्या कपाळावर ओठ टेकवले नंतर अगदी त्याच्या ही नकळत चार ओठांच्या पाकळ्या एक झाल्या ती झोपेतही शहारली पण काही वेळाने तो भानावर आला...त्याच्या मनात अपराधी भाव दाटून आला तो दुर झाला आणि विचार करत पडून राहिला...उजाडता उजाडता त्याला झोप लागली... सकाळ झाली.. आज काॅलेजला सुट्टी होती.. शर्वरी उठली आवरून किचनमध्ये आली आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली..तो उठून किचनमध्ये आला आणि तिच्या पाठी राहून तिला न्याहाळत होता...ती म्हणाली, "आज एवढी शांतता का बरं आहे..बोला की काहीतरी..ऐरवी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तोंडाला थारा नसतो आणि आज चक्क तोंड शिवून माझ्यामागे शहाण्या बाळासारखे गपगार का उभे आहात... काय झालयं.. बरं वाटत नाहीये का...?? "ती त्याच्या दिशेने वळली..त्याने नजर चोरली..ती जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून ती पाहु लागली आणि ती इतक्या जवळ होती की त्याला हलता ही येत नव्हतं..एकमेकांचे उष्ण श्वास दोघांनाही जाणवत होते.." शरू...ते... काल... काल रात्री... " तो कसंबसं बोलण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला.."काल रात्री आपल्या नात्याला पुर्णतः मिळाली...तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अजून एक टप्पा सर केलाय..पण अजूनही आपल्या नात्यातलं कारण शेष आहे हे मी विसरलेले नाही म्हणून म्हणते विसरून जा सगळं आणि घाबरू नका आपल्यातच राहाणार आहे सारं.." असं म्हणत ती त्याच्यापासून दुर झाली आणि पुन्हा कामाला लागली.. "तु जागी होतीस..?? "त्याने हळू विचारलं.." सगळं देहस्वी अनुभवायचं नसतं शेखर काही गोष्टी सुप्तावस्थेतही अनुभवता येतात..आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणाल तर मी जागी नव्हते पण माझी झोप नेहमी सावध असते..शुभासाठी..त्यामुळे मला कळलं आणि तुमचा स्पर्श मी ओळखते अगदी झोपेतही आणि त्यातल्या भावना म्हणाल तर त्या न सांगता ही सहज उमगतात मला..." "पण अशी कशी इतकी ओळखायला लागलीस मला..आपली ओळख तर अगदीच काही महिन्यांची आहे.." तो अगदी प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.. ती मंद हसत म्हणाली, "अहो,तेच खरं सौंदर्य आहे ना आपल्या संस्कृतीचं.. आपल्या इकडची स्त्री हे डोरलं फक्त दागिना म्हणून घालत नाही तर ती त्या पुरुषाच्या अधीन बांधली जाते..त्याला आतून बाहेर अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत ते चेहऱ्यावर न उमटलेल्या भावापासून ते तोंडातून झरणाऱ्या शब्दांच्या मागच्या भावापर्यंत सारं तिच्यापर्यंत पोहचतं असतं..." आज पुन्हा एकदा तो नव्याने तिला सामोरं गेला होता..तितक्यात शुभाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती तिकडे धावली..ती सकाळ सोडता पुर्ण दिवस त्यांनी छान एन्जॉय केलं...खूप दिवसांनी ते बाहेर पडले होते...आज त्यांची परीराणी पहिल्यांदा घराबाहेर आली होती....समुद्रकिनारी...ती तुफान खुष झाली होती...काही गोड आठवांचा सडा जमवून संध्याकाळी ते आपल्या उबदार घरट्यात परतले... 

      दुसऱ्या दिवसापासून परत रूटीन सुरू झालं..ती दुसऱ्या वर्षाची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.. सुट्ट्या पडल्या खऱ्या पण शुभामुळे शर्वरीला घरी जाणं शक्य नव्हतं पण ती घरी गेली नसती तर बाबांना संशय आला असता म्हणून घरी जाणं भागच होतं... आता शुभा नऊ महिन्यांची झाली होती तसंही शर्वरीने तिला पातळ पदार्थ भरवायला सुरवात केलेली आता ती फक्त दुधावर नव्हती पण तरीही ती शर्वरी शिवाय ती राहिली नव्हती.. तरीही ती कशीबशी बाहेर पडली..दोन दिवस राहिली तरी जीव बाळामध्ये अडकलेला..ती घरी स्टडी कॅम्पसाठी जाते सांगुन आलेली म्हणजे त्यांच्या जीवाला रुखरुख नको म्हणून...लेकीला छातीशी कवटाळलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला...तो ही मे च्या दुसऱ्या आठवड्यात घरी गेला... खरंतर चार दिवसांनी येणार होता पण त्याचा मुक्काम लांबला आणि तो थेट जूनच्या पहिल्या तारखेला परतला..तसंही शर्वरीने बाळाला सांभाळलं होतं आणि असेल काही काम म्हणून झाला असेल उशीर असं गृहीत धरून तिनेही त्याला जास्त काही विचारण्याचा अट्टाहास केला नाही...आल्यापासून तो खूप शांत शांत होता हे तिला ही खटकलचं होतं पण तरीही ती गप्प राहिली...पण त्याचं असं शांत असणं तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापुर्वीची शांतता आहे याची तिला पुसटशी चाहुल देखील नव्हती... 

     चार दिवसांनी काॅलेज पुन्हा सुरू झालं..दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी लेक्चरला तो क्लासमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात कसलीशी फाईल होती.. त्याने दरवाजा लोटला आणि तिला समोर बोलावलं आणि म्हणाला, "शर्वरी....मी खूप प्रयत्न केला घरी तुला सांगण्याचा पण मला नाही जमलं म्हणून या सर्वांसमोर सांगतोय... " प्रत्येकजण प्राण कंठाशी आणून ऐकत होता...तिला वाटत होतं आज शेखर कारण नावाचा अडसर दुर करतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नातं पुर्णत्वास जाईल...पण... "हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र.. यावर सही कर.. आज मी तुला या जबाबदारीतून मुक्त करतो... माझं लग्न झालयं गेल्या महिन्यात आणि लवकरच क्षितीजा माझी बायको माझ्याकडे रहायला येणार आहे... पण मी या नात्यातून मोकळा होत नाही तोवर नवीन नात्याची सुरवात करू शकणार नाही म्हणून ही कागदपत्रे मी आज घेऊन आलोय.. यावर तुझ्या सह्या झाल्या म्हणजे तु ही मुक्त आणि मी ही..."त्याचे हे शब्द ऐकताच तिची विचार शृंखला मोत्याच्या माळेप्रमाणे विखूरली...तिने थरथरत्या हाताने पेन उचलला आणि सही केली.. कपाळावरची टिकली काढली आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणार इतक्यात तिच्या कानी शब्द आले... "आई-बाबा".. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या... त्यांची रांगणारी लेक दाराच्या आधाराने उभी होती आणि तिच्या तोंडून पहिला शब्द फुटला होता आई-बाबा... त्यांना पाहून ती त्यांच्या दिशेने झेपावली.. ती पडू नये म्हणून दोघे तिच्याकडे धावले आणि तिला पकडलं... त्या गडबडीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या गळ्यातल्या चेनमध्ये अडकलं.. ती काढण्याचा प्रयत्न करत असताना ते वाढवलं गेलं.. तसचं तिने ते तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली, "ह्या सर्वांसमोर तुमची झाले होते त्यांच्या समोरच वेगळी होतेय..शुभाला नीट सांभाळा...मी आज संध्याकाळीच निघतेय..." असं म्हणत ती तिथून निघून गेली..तो शुभाला घेऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला..मग त्या दिवशी संध्याकाळी भर पावसात ती घरी आई बाबांकडे निघून गेली ती गेल्यानंतर त्याने सही न करताच ते कागद तसेच कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर तीन महिन्यांनी आज तो तिच्या घरात तिच्यासमोर उभा होता... 

    "शरू...तु गेलीस आणि माझ्या घराचं घरपण गेलं, खेळकरपणा लुप्त झाला आणि सगळी रया जाऊन ओस पडलं माझं इवलसं घरट...तु गेलीस आणि काही दिवसांनी ती आली.. क्षितीजा.. खूप वेगळी तुझ्यापेक्षा खूप वेगळी..ती आपल्या कामाशी काम ठेवायची..त्यात स्वभाव अगदी तिरस्कारी, संशयी..जणू मायेचा ओलावा काय तो माहितच नसावा..." तो थांबला इतक्यात ती म्हणली, "मग तुम्ही अशा स्त्रीशी लग्न कसं केलतं..?? " "खरं सांगू...मी सुट्टीत घरी गेलो ते मुळी आपल्याबद्दल घरी सांगायचं म्हणून पण आईने सरळ मला शपथेवर लग्नाला तयार केलं मी सारं सांगूनही तिने काही ऐकलं नाही..वाटलं लग्नापूर्वी त्या मुलीला भेटून सारं सांगावं म्हणजे ती नकार देईल आणि हे लग्न मोडेल..तसा प्रयत्न देखील केला मी पण काही होऊ शकलं नाही आणि आमची भेट थेट बोहल्यावर झाली...सगळं पार पडलं आणि मी इथे यायच्या आदल्या रात्री तिला सगळं सविस्तर सांगितलं.. तेव्हा तिला काही प्राॅब्लेम नव्हता फक्त जाता जाता एवढंच म्हणाली तिला आता मोकळं करा..म्हणजे तिने इशारा दिला होता..म्हणून मी आल्यावर तुला.. म्हणजे... तुझ्याकडून...सही.... "तो अडखळला... " पुढे...शुभाला तर नीट सांभाळत होती ना मग... "तिने पुढचा प्रश्न विचारला आणि यावेळी तिच्या आवाजातली तीक्ष्ण धार त्याला जाणवली...तो पुढे म्हणाला, " खरी समस्या तर तिथेच निर्माण झाली..तिला मुलं अजिबात आवडत नाही..ती शुभाचा तिटकारा करायची..तिने मला आल्या आल्या सांगितलं की तिला तिच्या करीयरवर फोकस करायचयं त्यात तिला शुभाचा अडसर वाटत होता..ती नेहमी म्हणायची सवतीची पोर आणून माझ्या उरावर बसवली... कसाबसा राग गिळून मी तिची समजूत काढायचो.. पुन्हा पुन्हा समजवून थकलो होतो..यावरून आमचे खटके उडायला लागले होते..शुभा दिवसभर कशीबशी शांत असायची पण रात्री तुझ्या आठवणीने कासावीस व्हायची.. आई आई करून हैदोस घालायची.. रडत रडत घरभर तुला शोधायची पण तिच्या दगडाच्या काळजाला कधी पाझर फुटला नाही गं...कधी मायेने जवळ घेतलं नाही पोरीला..."त्याने एकवार शरूकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आसवं भरली होती... "एकीकडे घरी हे असं चाललेलं आणि काॅलेजला तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीर होत नव्हता मला..मी बोलायचा प्रयत्न करायचो पण मन धजावत नव्हतं आणि कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो..आणि असं असलं तरी तुझी तगमग, तुला होणारा त्रास आणि ओढणीच्या आड ओली झालेली छाती माझ्या नजरेतून सुटली नव्हती शरू...त्या दिवशी तर दुध गोठलं आणि तुला होणाऱ्या वेदना माझं ह्रदय भेदत होत्या..मी रेस्टरूमच्या दाराआड थांबलो होतो..मॅडमनी येऊन तु ठिक असल्याचं सांगितलं आणि मी एकदा तुला दुरूनच पाहिलं आणि तिथून मग निघून गेलो...तिने काही दिवसांची सुट्टी घेतली होती..वाटलं शुभा जवळ राहिली तर कदाचित तिला शुभा विषयी कणव वाटेल म्हणून आशेने तिला तिच्या जवळ ठेवून आलो होतो पण तीच माझी चूक झाली..मी संध्याकाळी घरी गेलो आणि तिथे जे मी पाहिलं ते पाहून मात्र माझा संयम सुटला...मी तिच्यावर हात उगारला... " त्याने उसासा टाकला... "असं काय पाहिलतं तुम्ही.. "तिने सावरत विचारलं... " आपल्या शुभाच्या अंगावर माराचे डाग होते तिचा कोवळा हात पोळला होता.. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि त्या बाईचा तोंडाचा पट्टा सुरूच होता... मी आधी शुभाला शांत केलं तिला औषध लावलं आणि भरवलं आणि झोपवलं त्या दिवशी पहिल्यांदा माझी लेक माराचे चटके सहन करत झोपी गेली होती...त्यानंतर आमच्यात खूप बाचाबाची झाली आणि त्यातून मग माझा हात उगारला गेला...मग दोन दिवसांनी सकाळी मला टेबलवर कागदपत्रे आणि चिठ्ठी मिळाली त्यात तिने लिहिलं होतं...मला आता तुमच्या सोबत राहता येणार नाही..मला माझं करियर महत्वाचं आहे.. हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र यावर मी सही केलीय तुम्हीही करा म्हणजे आपण दोघे मुक्त होऊ..यापुढे मी ही तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीही करू नये ही विनंती..असे चार शब्द लिहून ती कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली...ती गेल्यानंतर मी स्वतःला कोंडून घेतलं..आयुष्य संपवण्याचा ही विचार डोकावला होता मनात पण शुभासाठी सावरलो आणि शरू आपल्या घटस्फोटाचे कागद फाडून थेट इकडची वाट धरली.."

     तो बाबांकडे वळून म्हणाला, "बाबा आता तुम्हीच ठरवा..तुमची लेक कशी आहे ते...हे असं अनोखं आईपण अनुभवण्यासाठी ती अग्निदिव्यातून गेलीय.. हात जोडतो तुमच्यापुढे आमच्या नात्याला मान्यता द्या..." बाबा हो म्हणाले.. तसा तो शर्वरी जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, "देशील का मला एक चान्स माझी चूक सुधारण्यासाठी..." "आई हो म्हण ना.. "छकुली डोळे चोळत खोलीतून बाहेर येत म्हणाली.. त्यावर सगळे हसले...त्याने खिशातून तिचं मंगळसूत्र काढलं.. येताना त्याने ते दुरूस्त करून आणलेलं ते तिच्या गळ्यात घालत म्हणाला, " हा तुझा हक्क... "तिने लगेच देवघरातून कुंकवाचा करंडा आणला आणि त्याच्या समोर धरत म्हणाली, " हे राहिलं होतं... "तसं त्याने त्यातलं कुंकू तिच्या भाळी रेखलं...आणि पायाशी घुटमळणाऱ्या गोडुलीला उचलून दोघांनी तिचा गोड पापा घेतला आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या या अनोख्या नात्यातल्या तिच्या आईपणाच्या प्रवासाला पूर्णांकुर लाभला होता....!!!! 

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance