ती अजूनही तिथेच होती...(भाग २)
ती अजूनही तिथेच होती...(भाग २)


खोलीतला टेबल लॅम्प कोपऱ्यात जळत होता, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेने टेबलावरचे कागद फडफडत होते आणि ती बाल्कनीत उभी होती तिच्या हातातला कागद सुध्दा फडफडत होता, आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहत होतं...ती सारी पत्र होती नितेशनं तिला लिहिलेली..आज पुरं वर्ष लोटलं होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आज.. तिला वाटत होतं आज तरी तो येईल पण तिची निराशा झाली होती आणि आजही यशकरवी त्याचं पत्र आलं होतं..शुभेच्छा होत्या त्या पत्रात आणि इतर मजकूर रोजचाच, ती आज खूपच दुखावली होती एरवी पत्रातून जाणवणारा नितेश आज तरी तिला जवळ हवा होता तिने उन्हं कलेस्तोवर डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहिली होती...
आता अकरा वाजत आले होते अवघा एक तास राहिला आणि तिच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस साजरा न होताच संपणार होता. दुखावलेल्या मनाने तिने लॅम्प बंद केला आणि बेडवर येऊन पडून राहिली तेवढ्यात दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला,एवढ्या रात्री कोण असा विचार करत असताना तिला वाटलं नितेशच असेल आपल्याला सरप्राईज द्यायला आला असेल, आता चांगलीच रूसते मग मनवू देत अशा सगळ्या विचारांनी तिने हसत दरवाजा उघडला आणि गुलदस्त्याआडून आवाज आला, "हॅप्पी अॅनवसरी मॅडमजी..!! " आणि गुलदस्ता दुर झाला.. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि ती वळून आत जात म्हणाली, "यश तू आहेस.. मला वाटलं... " "तुला वाटलं नितेशच आला.. अगं हे सगळं त्यानेच सांगितलयं मी फक्त कुरिअर सर्वीस आहे नेहमीप्रमाणे..चल पटकन केक कट कर.. तुझ्या आवडीचा चाॅकलेट फ्लेवरचा आॅर्डर केलाय नितूने.. " तो उत्साहाने आत येत म्हणाला.."नको अरे आता तसंही दिवस संपल्यात जमा आहे, मग काय उपयोग.. " "अरे असं कसं अजून तास बाकी आहे, त्यात आपलं सेलिब्रेशन होऊन जाईल थांब आलोच.. " असं म्हणत त्याने केक टेबलवर ठेवला आणि किचनमध्ये सुरी आणायला गेला.. पटकन टेबल सजवून त्याने तिच्या हातात सुरी दिली.. केक कापून त्यांनी एकमेकांना भरवला.. "इतकं करण्यापेक्षा स्वतःच आला असता तर मला पण बरं वाटलं असतं ना.. " ती निराशेने म्हणाली... "हो अगं, तोच येणार होता आगाऊ सुट्टी पण घेतली होती त्याने तुला सरप्राईज द्यायचं होतं त्याला पण ऐन निघायच्या वेळी महत्त्वाचं काम आलं आणि सुट्टी कॅन्सल करावी लागली त्याला.. म्हणून मग फोन करून मला सांगितलं त्यानं हे सगळं पोहचवायला.. " तो केविलवाण्या स्वरात तिला समजावत म्हणाला.. "बायकोपेक्षा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापेक्षा सुध्दा कामच महत्त्वाचं आहे का.. बरं आपण त्याला विडियो काॅल करायचा आता दिवस असेल ना तिथे..??? " ती उत्साहाने म्हणाली.. "अं.. हो दिवस असेल पण मगाशीच त्याचा फोन आलेला तेव्हा तो म्हणाला की महत्वाची काॅन्फर्न्स आहे त्याची तर तीन तास तरी फोन बंद राहील.. तसे तुझे फोटोस् पण काढायला सांगितलेत.. मिटींग आटोपल्यानंतर करेल तुला तो सावकाशीने मेसेज.. " " हम्म.. ठीक आहे.. तसंही रात्र सुध्दा बरीच झालीय.. तुला ही पोहचायचं असेल ना घरी.. "ती उठत म्हणाली.. " हो अगं, निघतो मी पण.. भेटू.. वन्स अगेन हॅप्पी अॅनवसरी.. " असं म्हणत तो तेथून निघाला आणि तिने दरवाजा लावून घेतला आणि आवरून झोपायला गेली..
त्याने मात्र गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली..तो अनेकदा इथे यायचा निशाला कित्येक पत्र त्याने इथेच बसून लिहिलेली.. साधारण साडेबारा पर्यंत तो किनाऱ्यावर पोहचला.. मुंबई म्हटल्यावर अगदीच सामसूम शक्य नव्हती काहीजण होते आणि अगदीच तुरळक रहदारी होती..तो आपल्या नेहमीच्या जागी बसला तिकडे तसं आसपास कोणी नव्हतं.. समुद्राची शांत गाज त्याच्या कानी येत होती...आज नितेशची त्याला खूप आठवण आली, राहून राहून निशाचा बावरलेला चेहरा येत होता..तो बराच वेळ तिथं बसून राहिला वेळेचं भानच राहिलं नाही..दीडच्या दरम्यान तो घरी पोहचला...
दुसऱ्या दिवशी केक घेऊन ती काॅलेजला गेली.. स्टाफ रूममध्ये सगळ्यांना दिला आणि लेक्चरला निघून गेली..पाऊणतास उलटला आणि ती स्टाफ रूमच्या दिशेने निघाली स्टाफ रूमच्या आधी एक लहान पॅसेज होता तिथे दोघी शिक्षिका उभ्या होत्या,बहुतेक पेंडसे आणि कदम मॅडम असाव्यात..त्यांचं पुसटसं बोलणं तिच्या कानावर पडलं.."नवरा तीन वर्षांपूर्वी गेलाय आणि ही अॅनवसरीचा केक वाटत फिरते.. "एक म्हणाली" तिचा स्मृतिभ्रंश का काय ते झालाय ना मेमरी लाॅस.. तिला आठवत नाही ती घटना.. "दुसरी.. " ते नुसतं नावापुरतं हो..तो तिचा मित्र नाही का नुसत्या घिरट्या घालतो गजरे काय, पत्र काय..मी बघते ना.. तिच्या बाजूच्याच अपार्टमेंटमध्ये राहाते न मी.. "पहिली नाक मुरडत म्हणाली.. " असतात अश्याही निर्लज्ज बाया.. जाऊ दे.. मला लेक्चर आहे आता निघते मी... " असं म्हणत दोघीही तिथून निघून गेल्या.. निशा भिंतीच्या कडेला उभी होती त्यामुळे त्यांची नजर तिच्यावर पडली नाही...
त्यांचं ते संभाषण गरम तेल कोणी कानात ओतावं तसं निशाच्या कानात शिरलं होतं...जग तिच्याभोवती फिरत असल्याचा भास तिला क्षणभर झाला.. ती कशीबशी स्टाफ रूममध्ये आली.. बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि तशीच बाहेर येऊन जायला निघाली..तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण शितल आत आली आणि तिचा तो तसा अवतार पाहून तिला ही कळलं काहीतरी झालयं.. ती निशाला विचारत होती.. मला बरं वाटत नाही म्हणून मी घरी जातेय असं सारवासारवीचं उत्तर देत निशा तिथून बाहेर पडली... तिला काही कळत नव्हतं पुन्हा पुन्हा त्यांचे ते शब्द आठवत होते.. रिक्षा करून ती घरी पोहचली.. इथे शितलला गडबड वाटली म्हणून तिने यशला फोन करून झाला प्रकार कळवला तो ही तातडीने निशाच्या घरी जायला निघाला...
त्याने डोरबेल वाजवली तेव्हा त्याला दरवाज
ा जरासा उघडा दिसला त्याने तो हलकेच लोटला आणि तो आत शिरला समोर घर सगळं अस्ताव्यस्त दिसत होतं.. हाॅलमधले शो पिसेस जमिनीवर पडलेले, फोटोफ्रेमस् फुटलेल्या.. तो उभा होता तिथे एक फोटो पालथा पडला होता, त्याने तो उचलला..तो निशा आणि नितेशच्या लग्नाचा फोटो होता त्याच्या फ्रेमच्या काचेला तडे गेले होते. . त्याने तो टेबलवर ठेवला आणि त्या पडलेल्या वस्तू बाजूला सारत आत गेला आतल्या बाथरूम मधून शाॅवरचा आवाज येत होता...तो आत गेला बाथरूम बाहेर पाणी सांडलं होतं आत शाॅवर चालू होता रूमभर पाणी पाणी झालं होतं अन् निशा ओलेत्याने कुडकुडत कोपऱ्यात बसून एकटक कुठेतरी बघत होती...तो तिच्याजवळ गेला तिला अलगद उठवलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं टाॅवेल आणला आणि तिचे केस कोरडे करू लागला..
तिने त्याला झिडकारलं ती त्याच्यापासून दूर झाली, पुन्हा आवेगानं त्याची काॅलर पकडून त्याला म्हणाली, "का केलसं असं.. का फसवलसं मला..माझा नितेश गेला होता तर सांगायचं होतसं मला ते दुःख सहन केलं असतं पण मित्र म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला... आज कळतयं मला रोजची ती पत्र, ते गजरे, प्रत्येक गोष्टीसाठी तुझं हजर असणं..... म्हणजे तुला माझा विश्वास जिंकून माझा फायदा घ्यायचा होता... शी.... आठवलं तरी किळस वाटते मला... बोल ना गप्प का आहेस आता...??? "
"झालं बोलून..आता ऐकून घे माझं एकवार आणि मग जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल त्यानंतर मी तुला नको असेल तर कधी माझी सावली देखील तुझ्या आयुष्यात पडणार नाही..तीन वर्षांपुर्वी त्या रात्री नितेशला हाॅस्पीटलमध्ये नेत असताना त्याचं शेवटचं वाक्य होतं, " यश, माझ्या निशाला सांभाळ तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय.. " मी माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळत होतो, तुला जेव्हा शुध्द आली तेव्हा तुला काही सांगायचं नाही असं डाॅक्टरांनी बजावलं होतं.. आई बाबांना धीर देत तुझ्यासाठी नितेशचं अस्तित्व टिकवून ठेवणं भाग होतं मला त्यात काही अंशी माझी लेखणी माझ्या कामी आली...नाही तरीही मी मान्य करतो कधी काळी माझं प्रेम होतं तुझ्यावर.. अगदी काॅलेज पासून...पण तुमचं लग्न झालं मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलो पण त्यानंतर तु माझ्यासाठी माझ्या मित्राची बायको होतीस आणि त्या रात्री नंतर माझी जबाबदारी...एवढे दिवस आपली सोबत आहे आठवून बघ कधी माझ्या डोळ्यात वासनांध भाव टिपले का तुझ्या मनाने, माझ्या स्पर्शातून वासना जाणवली का तुला...मी फक्त तू ठीक होण्याची वाट बघत होतो, त्यानंतर आल्या पावली मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार होतो..आज ते ही झालयं..काळजी घे...कधी गरज लागली तर सांग कधीही..निघतो मी.. "
निशा आता बरचसं सावरली होती ती काहीशी निश्चयाने म्हणाली, "थांब यश, असं जबाबदारीतून नाही तुला मुक्त होता येणार..मला बोलायचयं तुझ्याशी, पण आता नाही...काही दिवसांनी.." "तु सांग कधी बोलावसं वाटेल तेव्हा मी येईन.. " तो बोलला पण अजूनही त्याच्या डोळ्यात असमाधान होतं.. "घाबरू नकोस मी स्वतःला काही इजा करून घेणार नाहीये..भेटू लवकरच.. " तिने त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते.. "ओलेती राहू नकोस, साडी बदल आणि केस नीट पुसून घे.. " तो जाता जाता बोलला...
तो गेल्यावर निशाने सारं आवरलं...काही दिवस शांतपणे या सगळ्याचा विचार करायचा होता तिला तिने काॅलेज मधून सुट्टी घेतली...आणि आठवड्यानंतर यशचा फोन खणखणला... "बोल निशा.. " "आज संध्याकाळी भेटूया आपल्या नेहमीच्या वेळी नेहमीच्या जागी... " पलीकडून आवाज आला.. "हो.. " म्हणत त्याने फोन ठेवला..संध्याकाळचे तीन वाजत आले.. तिने आवरायला घेतलं...गेल्या महिन्यात त्याने ड्रेस दिला होता.. सुंदर हलक्या मेहंदी रंगाचा होता तो.. काॅलेजला असताना नेहमी म्हणायचा, "निशा, मेहंदी रंग तुला फार खुलून दिसेल घालत जा कधीतरी..." तेव्हा सगळे टिंगल करायचे त्याची.. हो नाही करता करता राहून गेलेली त्याची इच्छा आज ती पुर्ण करत होती..काळेभोर केस पाठीवर सोडून, हलकासा मेकअप करून आरशात बघून टिकली नीट लावली आणि निघाली समुद्राच्या दिशेने त्याच्या ओढीने...........
"अरे बापरे, आज वेळेआधी साहेब हजर.. " असं म्हणत तिने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला पण ऐरवी खेळकर असणारा यश आज गंभीर दिसत होता..इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली, "यश सगळ्यात आधी तर मी तुझे मनापासून आभार मानते आणि त्या दिवशीच्या शब्दांसाठी तुझी माफी मागते..कारण तु जे केलसं ते खरचं शब्दांनी त्याची गणती होणं अशक्य आहे.. तुझ्यामुळे माझ्या एवढ्या मोठ्या दुःखाची मला कमीत कमी झळ बसली ते पचवण्याची ताकद मला तु तुझ्या शब्द रूपाने दिलीस...त्यामुळे मी तुला विचारू इच्छिते, नितेशने दिलेली जबाबदारी तू मित्रत्वाच्या नात्याने पार पाडलीस आजपासून माझा साथीदार म्हणून या जीवन प्रवासात माझी साथ देशील का..?? " तिनं मोकळा निश्वास सोडला...
तिचा हात हातात घेऊन त्याने एकवार आभाळाच्या दिशेने पाहिलं आणि तिच्या पाणीदार डोळ्यात बघत म्हणाला, "आज जबाबदारी सोबत माझा हक्क दिल्याबद्दल तुझे आभार...
आयुष्यभरच्या सुख दुःखात कधीही हा हात सुटणार नाही हे वचन आज तुला या रत्नाकराच्या साक्षीने तुला देतो...माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर आज या सांजवेळी पूर्ण झालं.. तुझ्या आगमनाने आज माझ्या अस्तित्वास पुर्णता मिळाली.. " असं म्हणत त्याने अलगद तिला मिठीत घेतलं अन् संध्यासमयी अथांग रत्नाकर बुडत्या रवीला आपल्यात सामावून घेताना त्या दोघांचं अस्तित्व सुध्दा एकरूप होतं गेलं...आणि दूर दूर पोर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या लाटांवरती उतरत होतं...