ती अजूनही तिथेच होती - भाग १
ती अजूनही तिथेच होती - भाग १
दुपारचे चार वाजले होते...सवयीप्रमाणे तिचे पाय समुद्रकिनारी वळले.. नेहमी प्रमाणे तिच्या घरी काम करणार्या पारू मावशींना सांगितलं आणि त्यांनीही सवयीप्रमाणे एकवार वळुन तिच्या कडे पाहिलं अन् आपल्या कामात पुन्हा मग्न झाल्या...
तिच्या घरापासून किनारा वीस मिनिटांच्या अंतरावर होता,ती तिच्या नेहमीच्या ठिकाणी उभी राहिली.तिला ओल्या वाळुत उभ राहायला फार आवडयचं..लाटांचा ओला स्पर्श अन् लाट परत जाताना पायाशी हुळहुळणारी वाळु..एरवी गंभीर असणारी ती त्या स्पर्शाने मोहरायची अन् लकेर का असेना पण हसू तिच्या चेहर्यावर उमटत असे...
मनगटी घड्याळावर तिने एकवार नजर फिरवली. चार वीस झालेले.."अजून कसा आला नाही ?"असा विचार तिच्या मनात येतच होता की मागुन धापा टाकत कोणीतरी तिला हाका देत येत होतं...तो जवळ आला आणि म्हणाला,"अगं यार निशा साॅरी मला लेट झाला..पण काय करू आज पत्रच उशीरा आलं..आणि नितेशने फोन करून याबद्दल सांगितलं..."असं म्हणून त्याने तिच्या हाताचा तिच्या आवडीच्या जुईच्या फुलांचा गजरा अन् त्याचं नेहमीचं पत्र तिच्या हाती दिलं...तिने जुईचा ओंजळीत घेऊन सुगंध घेतला अन् डोक्यात माळला..ती यश कडे पाहून मंद हसली अन् "थॅंक्स यश येते मी.."असं म्हणून परतीच्या वाटेला लागली...
घरी आल्यावर बघितलं तर आई आल्या होत्या..त्या तिने अर्धवट ठेवलेलं विणकाम पुर्ण करत होत्या.तिने हातातलं सारं पटकन खोलीत ठेवलं अन् बाहेर आईंजवळ येवून बसली.."कधी आलात आई..कळवायचं तरी ना..तुमच्यासाठी काहीतरी बनवलं असतं.." ती म्हणाली."अगं अचानक ठरलं म्हटलं काय करत असशील पाहुन येवू जरा..तुला ही एकटं वाटत असेल ना." त्या म्हणाल्या."हो ना नितेश सुध्दा घरी नसतो.एकटी कंटाळले होतेच.." "हं" एवढं बोलून त्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्या..
ती हळुच आपल्या खोलीत आली.आणि त्याचं पत्र वाचु लागली..तो लाडाने तिला सखी म्हणत असे..आजही त्याचं पत्र तसंच होतं..सजवलेलं नीट अन् मोत्या सारखं अक्षर...
प्रिय सखी,
मी तुझ्यापाशी नाहीये
पण मन माझं तुझ्याचसाठी झुरतयं
मला राणी माफ करशील ना?
तुझ्या वेड्या राजाला समजून घेशील ना...
काय राणीसरकार रागावलात का? माफी असावी...मला माहित आहे तुझं पुढचं वाक्य पुरे झाली नौटंकी..हो ना? बरं आता खरंच सांगतो मला माफ कर..काम एवढं आहे ना की काय सांगु..थोडी सुध्दा फुरसत नाहीए..तिकडे यायचं म्हटलं तरी दुसरं एखादं काम येऊन धडकतं नाहीतर एखादी फाॅरन टुअर..हो या वरून आठवलं परवा मी लंडनला जातोय कॉन्फ्रेंस साठी..तर पुढचे दोन आठवडे नो पत्र नो गजरा..कळलं का नकटे..
आई कशी आहे? तिचा काही फोन बिन काही आला होता का??
खरचं माफ कर मला.मी यायचा नक्की प्रयत्न करेन...तो पर्यंत...आपलं नेहमीच 'मी तुझा राजा तु माझी राणी जगात कुठेही सापडणार नाहीत आपल्या सारखी प्रेमात बुडालेली जोडी..'😉
तुझाच नितु
ती पत्र व्यवस्थित आत ठेवून बाहेर आली.."आज नितुच पत्र आलेलं दिसतयं.."आई म्हणाल्या."तो पत्रच पाठवतो येतच नाही किती ते काम सहाच महिने तर झालेत लग्नाला..""काम असतं ना त्याला." हं म्हणून ती हिरमुसली होऊन चहा करायला स्वयंपाक घरात गेली..
इथे बसलेल्या तिच्या सासुबाईंच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळु लागला...ही निशा नितेश शिंदे..पुण्यात सदाशिव पेठेत लहानाची मोठी झाली..निशा आणि नितेश लहानपणी पासून जीवलग मित्र मैत्रिण..सोबतच शाळा काॅलेज अन् घरही शेजारी..दोघांचाही घरी आई बाबा अन् भावंडे असा परिवार..दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगलीच ओळखत होती..एकमेकांच्या घरी त्यांचं येण जाण होतं.
दोघे काॅलेजला असताना नितेशने तिला प्रपोज केलं होतं.या दोघांचा यश नावाचा काॅमन फ्रेंड होता.खरंतर मित्र म्हणण्यापेक्षा तो निशा वर जिवापाड प्रेम करायचा पण ते एकतर्फी..ते कुणालाही माहीत नव्हतं.तो फार छान कविता करायचा सुंदर पत्र लिहायचा..निशा
ला वाचनाची फार आवड होती..पण नितेश पॉलीटेक्निकला असल्यामुळे त्याला या साऱ्या मध्ये रस नव्हता...पण कधीतरी निशाला सरप्राईज म्हणून तो तिच्यासाठी यशकरवी पत्र किंवा कविता लिहून द्यायचा.यशलाही थोडसं समाधान वाटायचं.पण त्याने त्या दोघांच्या प्रेमाआड येण्याचा कधीही प्रयत्न केला नाही..तो आपलं लिखाण 'अजनबी' या नावानं कुणाच्या ही नकळत करायचा.कधीतरी कट्ट्यावर कॅन्टीनमधे ग्रुप स्टडीजच्या वेळी निशाच्या तोंडून त्याच्या कथा कवितांच्या
प्रशंसनीय प्रतिक्रिया ऐकून तो मनोमन सुखवायचा..
पुढे काॅलेज पुर्ण झाल्यावर दोघेही नोकरी करू लागले निशा शिक्षिका झाली तर नितेश सिव्हिल इंजिनियर झाला.पुढे एका वर्षानंतर लग्न करून दोघे पुण्याहून मुंबईला आले.सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली..
एक दिवस संध्याकाळी आॅफिसनंतर दोघेही एकत्र बाहेर जेवण करून घरी परतत असताना त्यांना यश भेटला..खूप वर्षांनी मित्र भेटले त्यामुळे तो त्यांना आपल्या फ्लॅटवर घेऊन आला..गप्पा मारता मारता कधी दिड दोन तास निघून गेले कळलेच नाही..रात्र सुध्दा बरीच झाली होती..यशने त्यांना त्या रात्री थांबून दुसर्या दिवशी जा असेही सांगितले पण आपल्याला लेट नाईट डायव्हिंगची सवय आहे आणि एक दिड तासात पोहचू असे म्हणत नितेश बाहेर पडला मागोमाग निशाही निघाली..पुन्हा भेटू असे म्हणत त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले..
नियतीने त्यांच्या नशिबी वेगळेच काही लिहुन ठेवले होते..दिवसभरच्या थकव्यामुळे निशा हवेच्या झोक्याबरोबर झोपी गेली.नितेश संथ गतीने गाडी चालवत होता.अर्धा रस्ता कापला असेल नसेल तोच पुढून भरधाव येणाऱ्या ट्रकने यांच्या गाडीला धडक दिली...व तसाच वेगाने निघून गेला....तो ट्रक रस्त्याच्या मधोमध चालत होता त्यात त्याच्या ड्रायव्हरचं वेगावर नियंत्रण नसल्यामुळे नितेशच्या बाजूने गाडीचा जरा जास्तच चेंदामेंदा झाला होता.निशाला पण बरचं लागला होतं तरीही ती कशीबशी बाहेर आली..नितेशचं बरचं रक्त गेलं होतं अजूनही रक्तस्राव सुरूच होता..ती भांबावून गेली होती..तिने यशला काॅल केला...रात्र जास्त झाल्यामुळे रहदारी नव्हतीच त्यात तो एकाकी रस्ता..ती नितेशला बाहेर काढण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती..तिच्या डोळ्यातून सतत अश्रु धारा वाहात होत्या...तिच्या जखमांतुनही रक्त वाहत होतं..
तेवढ्यात तिथे यश पोहचला..त्याने खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं तो त्याला तो त्याच्या गाडीत बसवत असताना नितेश त्याला म्हणाला,"यश,निशाला सांभाळ..तुझ्यावर तिची जबाबदारी टाकून जातोय...तिला आईबाबांना जप.." यश त्याला धीर देत म्हणाला, "मित्रा,तुला काही होणार नाही तू ठणठणीत बरा होणार आहेस..धीर सोडू नकोस..निशासाठी तुला बरं व्हायचं आहे..." शेवटचं वाक्य ऐकण्यापुर्वीच त्याची शुध्द हरपली..यशने त्यांना जवळच्या संजीवनी हाॅस्पिटलमध्ये नेलं...डाॅक्टरनी त्याला तपासून तो गेल्याचं सांगितले..हे ऐकून निशा यशच्या बाहूत कोसळली..यशने तिला अॅडमिट केल..सकाळी यशने नितेश निशाच्या आईबाबांना कळवलं...ते आले..त्यांनी नितेशचे अंतिम संस्कार केले...
नितेशला जाऊन दोन वर्ष झाली होती..अन् निशा कोमात होती..ती कधीतरी शुध्दीवर येईल या आशेने सारे सावरत होते...आणि एक दिवस ती शुध्दीवर आली.तिने पहिला प्रश्न विचारला,"नितेश कुठे आहे? "यावर कुणी काही बोलणार तेवढ्यात डाॅक्टरनी काही न बोलण्याचा इशारा केला.कोणीतरी म्हणालं की तो ऑफिसला गेलाय.ती वेळ मारून नेली.
थोड्यावेळाने सगळे बाहेर आले..तेव्हा डाॅक्टर त्यांना म्हणाले,"निशा,तिच्या आयुष्यातला तो प्रसंग पुर्णपणे विसरलीय.ज्यादिवशी तिला ते सारं स्वतःहून आठवेल ती रडेल तेव्हाच ती पुर्णपणे बरी होईल.तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर ते तिच्या जीवावरही बेतू शकतं..."एवढं बोलून ते तिथून निघून गेले..तिला आता घरी आणलं होतं..तिचं रूटीन सुरू झालं होतं..तिला नितेश कामासाठी अमेरिकेत गेल्याचं सांगितलं होतं...
आता सगळ्यांची कसोटी होती.त्यांना सार्यांना त्यांच्यात नसलेल्या नितेशला जिवंत ठेवायचं होतं निशा बरी होईपर्यंत...आता यशची परिक्षा होती.त्याला मित्राच्या वचनाला जागायचं होतं..प्रेमाला जपायचं होतं.त्याच्या लेखणीतून तिच्या प्रेमाला जिवंत ठेवायचं होतं....कारण त्या सार्यांसाठी दोन वर्षांचा काळ लोटला होता पण ती अजूनही तिथेच होती...