अपूर्ण
अपूर्ण
तिच्या खांद्यावर मान टाकून तो इवला जीव निवांतपणे विसावला होता...तेवढ्यात बेल वाजली..."हो आले..." ती बेडवरून तशीच लगबगीने उतरली आणि तिनं दार उघडलं.. "अरे, ही झोपली का...साॅरी आज मला यायला उशीरच झाला..द्या नेते मी तिला..." मिसेस जगताप म्हणाल्या..."हो हो..शु...श्श्श्श...आताच झोपलीय ती उठेल...आणि आत तर या कपभर चहा घेऊन जा.."ती म्हणाली... "नाही नको..आधीच उशीर झालाय,स्वयंपाकाची तयारी करायला हवी..हिचे बाबा येतीलच इतक्यात...येते.. " असं म्हणत त्यांनी तन्वीला तिच्याकडून घेतलं..."थांबा मी तिचं बास्केट आणते..."असं म्हणत ती आत जायला वळली.."अहो, नको नको..राहू दे तसंही हल्ली आमच्याकडे फक्त रात्री झोपायलाच येते नाही तर दिवसभर तसंही इथेच असते...सकाळी पोहचवेन आणून...बरं येते..."त्या म्हणाल्या.. "हम्म..." हुंकार देत त्यांच्या पाठीमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली..आपल्या आईच्या खांद्यावर विसावलेलं ते इवलं तोंड डोळ्याआड होईपर्यंत ती त्या दिशेने बघत होती...
भरल्या डोळ्यांनी ती आत आली, दार लावून घेतलं आणि आतल्या दिशेला वळली...आतापर्यंत तन्वीच्या बाललीलांनी गजबजलेल्या घरातलं या क्षणाचं सुनंपण तिला खायला उठत होतं..ती खोलीत आली, बेडजवळ बसली आणि कधीपासून रोखून धरलेला हुंदका बाहेर आला,असे कितीतरी हुंदके या चार भिंतीत विरले होते..ती तशीच बसून राहिली आणि डोळ्यातून असंख्य आसवं वाहत राहिली...रात्रीचे नऊ वाजले होते..घरात अंधार झाला होता पण त्याचं ही तिला भान नव्हतं..तो आत आला, त्याने हाॅल आणि किचनमधले लाईट्स पेटवले आणि तो बेडरूमच्या दिशेने गेला..तिथे जमिनीवर बेडलगत बसलेली गौरी त्याला दिसली तो तिच्या जवळ पोहचला खाली बसला तशी ती त्याच्या कुशीत शिरली..त्याला ही क्षणभर काही सुचेना, ती आवेगाने थरथरत होती..तरीही त्याने स्वतःला सावरत कसाबसा बोलायचा प्रयत्न केला कारण आता त्याला धीर सोडून चालणार नव्हतं..त्याने अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, "ए वेडाबाई, अशी रडतेस काय..??कोणी काही बोललं का..?? " "नाही.. " ती लहान मुलीसारखी निरागसपणे म्हणाली.."मग काय झालं..?? सांगशील का..??तु सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं मला.. " तो तिला समजावत म्हणाला, ती एव्हाना शांत झाली होती..त्याने तिला उठवलं आणि उशी पाठी ठेवून तिला बसवलं आणि तो ही शेजारी बसला..
"गिरीश, एक विचारू..??" तिने विचारलं.. "हो, विचार ना.." तो म्हणाला.."तू माझं नाव गौरी का ठेवलंस..?? " "अगं माझं नाव गिरीश म्हणजे शंकर..तेच गुण ही माझ्यात आहेत..शीघ्र कोपी तसाच चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा..आई लहानपणापासून म्हणायची तुला सांभाळायला गौराईच हवी..तेव्हा काही ते कळायचं नाही पण ज्यादिवशी तुला पाहिलं त्या दिवशी क्षणार्धात त्या शब्दांचा अर्थ उमगला आणि वाटून गेलं 'हिच माझी गौराई' म्हणून मी तुझं नाव गौरी ठेवलं...समजलं का वेडू.. " त्याने गोड स्पष्टीकरण दिलं.. "अरे पण गौराई का फक्त शंकराला सांभाळायला असते का..शिवाला शक्ति पूर्णत्वास नेते पण इथे मीच स्वतः अपुर्ण आहे, तुला काय पुर्ण करणार.. " ती रडवेल्या स्वरात म्हणाली.. "अगं तु असं का विचार करतेस, आपण प्रयत्न करतोय ना आणि डाॅक्टर्स पण म्हणालेत ना उशिरा का होईना पण होप्स आहेत आणि हा वेडा विचार मनातून काढून टाक तु आयुष्यात येताच मला पुर्णत्व प्राप्त झालं..थोडा धीर धरावा लागेल ना राणी..." "किती...किती धीर धरू सांग ना..थोडी थोडकी नाही पाच..पाच वर्ष...थांबलीय रे..आता नाही धीर धरवत,लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्ष सगळे पिच्छा पुरवायचे..अगदी तुझ्या मामा-मामींपासून ते माझ्या मावशी आत्यापर्यंत...आणि आज गेल्या दोन वर्षांत यांच्यातलं कोणीतरी फिरकलयं का आपल्याकडे..?? साध्या फॅमिली गेटुगेर मधून ही वगळलं जातं आपल्याला..चुकूनमाकून भेटलोच तर नजर बोचते रे सगळ्यांची..माझी माणसं..माझ्या सख्खी वहिनी तिच्या बाळाला हात नाही लावू देत रे...वांझोटी म्हणून वाळीत टाकलयं मला आणि माझ्यामुळे तुला सुध्दा विनाकारण भोगावं लागतयं..नाही आता सहन होत.."तिचा बांध आज फुटला होता..ती कितीतरी वेळ गिरीशच्या कुशीत रडत होती..तो ही हतबल होता किती आणि काय समजावणार होता तो तिला..त्याला आठवत होता तो पाच वर्षापासूनचा जीवघेणा प्रवास...
गिरीश फडते...मुंबईत गिरगावला राहायला, नुकताच एमबीए करून कंपनीत नोकरीला लागला होता..आई बाबा आणि मोठी बहिण असा कुटुंब कबीला, तसा गोतावळा खूप मोठा..ताईचं पावसाळ्यात लग्न होतं सगळी पाहुणे मंडळी झाडून लग्नाला हजर झाली..लग्नसराई सुरू झाली. तळकोकणातून त्याची आत्या आणि तिची मुलं आली होती त्यांच्या बरोबर आली होती राधिका..आत्याच्या दिराची मुलगी..आधी कुणाचीच ओळख नसलेली ती अलगद सगळ्यांच्यात मिसळली, इतकी की आईपासून ते ताईपर्यंत कोणाचच तिच्याशिवाय पान सुध्दा हलत नव्हतं..साहाजिकच त्याची ही तिच्याशी मैत्री घट्ट झाली..हसत खेळत कधी महिना उलटला कळलचं नाही..ताईची पाठवणी झाली, हळूहळू पाहुण्यांनी भरलेलं घर खाली होत होतं..आत्या सुद्धा जाणार होती दोन दिवसांनी कारण एकदमच सुनं सुनं नको वाटायला म्हणून आईने आग्रह करून ठेवून घेतलं..दोन दिवस म्हणत म्हणत मुक्काम आठवडाभर लांबला..तो शनिवार होता, सगळ्यांची जेवणं आटोपली वामकुक्षी घेऊन झाली आणि गिरीश आत्याच्या मुलांना आणि राधिकाला घेऊन चौपाटीवर गेला..
सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि आत्याची मुलं समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद घेऊ लागली, गिरीश राधिकाला घेऊन दुरवर चालत राहिला... "बोलणार आहेस का काही..?? " न राहून ती म्हणाली.. "काय बोलू..??सुचतच नाहीये काही, फक्त दिसतयं उद्या तु गेल्यानंतरचं भकास सुनं घर आणि माझं आयुष्य सुध्दा.." तो खिन्नपणे म्हणाला.. "ये वेड्या काय बोलतोयस..?? मी काही कायमची नाही चाललेय..येईन की पुढच्या सुट्टीत..नाहीतर तुझ्या लग्नाला.. " ती असं म्हणत असताना त्याने तिचा हात धरला.. "तुला अजून ही वाटतं तू सोडून दुसरी कोणी माझ्या आयुष्यात येईल..?" ती लाजली आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं...सगळे घरी आले..घरी आई बाबा आणि आत्या हाॅलमध्ये बसले होते.."आलेच बघा..ये बाळ अशी समोर बस.. "असं म्हणत आत्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवलं,आणि बाबांनी गिरीशला समोर बसवलं.आत्याची मुलं आत कपडे बदलायला गेली..आईने दोघांना पाणी दिलं आणि बोलायला सुरुवात केली, " वन्स, तुमची राधिका माझ्या गिरीश साठी हवीय मला..बोला देणार ना..??" "अगं वहिनी माझ्या अगदी मनातलं बोललीस..यांचा जोडा लक्ष्मी नारायणाचा शोभतो, मी बोलते तिच्या बाबांशी,भावजी काही मला नाही म्हणायचे नाहीत.. " आत्या उत्साहाने म्हणाली.. "काय मग गिरीश पसंत आहे का मुलगी..?? " बाबांनी गिरीशकडे बघत डोळा मारला.. "बाबा मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही.. " असं म्हणत तो बाहेर गेला.."काय गं तुला आहे ना पसंत मुलगा..? "आत्याने राधिकेला छेडलं.. " इश्श..काकू तु पण ना.. "म्हणत ती आत्याच्या कुशीत शिरली..त्यावर सगळे हसले..दुसऱ्या दिवशी आत्या गावी परत गेली, तिथे गेल्यावर बोलणी झाली..होकाराचा निरोप कळवला आणि सहा महिन्याच्या आत लग्न धुमधडाक्यात पार पडलं आणि लक्ष्मीच्या पावलांनी गिरीशची गौरी घरात आली..
लग्नाच्या दोन महिन्यानंतरच गिरीशला बढती आणि बदली दोन्ही मिळाली..गिरीशने बढती स्विकारण्याबाबत घरी विचारलं..गौरीचा चांगला पाय गुण समजून आई बाबांनी परवानगी दिली..पुण्याला बदलीच्या ठिकाणी जाण्याआधी गौरी माहेरी जाऊन आली आणि वर्षभरात सगळं नीट सेटल झालं..बदली झाली असली तरी गौरी आणि गिरीश घरी येऊन जाऊन होते सगळे सणवार मुळ घरीच साजरे व्हायचे..पुण्यात कंपनीने दिलेला फ्लॅट होता, गाडी होती..सगळा आनंद होता..मे महिन्यात दोन आठवड्यांची सुट्टी टाकून दोघे आई बाबांकडे आले होते कारण ही तसं खासच होतं, गिरीशच्या ताईकडे गोड बातमी होती तिचं डोहाळे जेवण होतं..गौरीने झटून सगळी तयारी केली..डोहाळे जेवणाच्या संध्याकाळी बायका जमल्या..ताईला फुलांची वाडी घालून झुल्यावर बसवलं सगळा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी ओटी भरण्याची वेळ आली तेव्हा आई म्हणाल्या, "गौरी तु भरून घे ओटी.." ती पुढे सरसावणार तोच कुणीतरी कुजबूजलं, "तिला नको..मुलबाळ नसलेल्या बाईने भरायची नसते गर्भार बाईची ओटी.." हे शब्द कानावर पडताच हातात
घेतलेली ओटी तिच्या हातून निसटली आणि ती तशीच रडत आतल्या खोलीत गेली..आईनी कसाबसा कार्यक्रम आटोपला..इथे तिच्या मनावर पहिला आघात झाला..
त्यानंतर पुण्याला आल्यावर सुरू झाल्या दवाखान्याच्या वाऱ्या, टेस्ट्स, चेकअपस्,औषध, गोळ्या..प्रत्येक वेळी डाॅक्टर्स सांगायचे की, "होप्स आहेत, पण कदाचित थोडा उशीर होईल.."त्या आशेवर गौरी जगत होती...कधीकाळी हसत खेळत असलेली, सुंदर गोऱ्या रंगाची, कमनीय बांध्याची,मऊ रेशमी केसांची, पाणीदार डोळ्यांची, कोमल मनाची ती पोर अगदी मलूल झाली होती पार तिची रयाच उडून गेली होती..तिला सांभाळता सांभाळता गिरीश ही पुरता मेटाकुटीला आला होता..त्याचा देखणा तरणाबांड साज कधीच उतरला होता..वरवर हसत असला तरी आतून तो पार खचून गेला होता..सुरवातीला कुठेही गेलं की सर्वांचे तेच प्रश्न, "पाळणा कधी हलवणार...आम्हाला आजी आजोबा, काका काकू, आत्या, मामा मामी, मावशी कधी बनवणार..?? " यामुळे गौरी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अजूनच खचत होती म्हणून गेली दोन वर्ष गिरीशने कुणाकडे येणं जाणं, सण-समारंभ सगळचं कमी केलं होतं..मुंबईला आणि तिच्या माहेरला यायचं जायचं पण कमीच झालं होतं..पुण्यात तिच्या बिल्डींगमध्ये जगताप नावाचं कुटुंब राहायचं त्या जोडप्याला एक वर्षाची लेक होती तन्वी.ती दोघे दिवसभर कामाला त्यामुळे तन्वीला दिवसभर तिच्याकडे ठेवूनच ते जायचे..तिला सुध्दा गौरीचा लळा लागला होता..तिच्यामुळे आताशी कुठे गौरी सावरत होती...सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत तन्वीच्या मागेमागे धावताना तिला दिवस पुरायचा नाही..पण संध्याकाळी तन्वी गेल्यानंतर मात्र ते घर तिला खायला उठायचं, ती गिरीश येईस्तोवर रडत राहायची, कोपऱ्यात एकटक पाहत राहायची,तिच्या आतड्याला पीळ पडायचा..तिच्यातली आई धायमोकलून रडायची..
आजही ती तशीच रडत होती..त्याने तिला शांत केलं, किचनमधून दुध गरम करून आणलं कसंबसं ते तिला पाजलं आणि झोपवलं,स्वतः मात्र तसाच उपाशी विचार करत झोपी गेला..काही दिवस रूटीन सुरू राहिलं आणि एक दिवस उगवला तोच मुळी आशेचा किरण घेऊनच..सकाळी गिरीशचा डब्बा बनवत असताना तिला एकदम मळमळून आलं, तिला वाटलं पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं...पण गिरीशला दारात उभी राहून बाय करत असताना तिला भोवळ आली..ते पाहून गिरीश माघारी फिरला, आँफिसमध्ये येत नसल्याचं कळवलं आणि ताबडतोब गौरीला हाॅस्पिटल मध्ये नेलं..तिला चेक केल्यानंतर डाॅक्टरांनी ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आणि गिरीशच्या आनंदाला पारावार नाही राहिला..गौरी शुध्दीत येताच तिलाही त्याने बातमी दिली आणि गौरी भरून पावली..घरी आल्यावर आई बाबांना कळवलं, तिच्या माहेरी कळवलं..सगळ्यांना आनंद झाला...
जसजसे दिवस सरत होते गिरीश तिला फुलासारखं जपत होता,तिच्या खाण्या-पिण्यापासून ते औषध पाण्यापर्यंत सगळं जातीने बघत होता..त्याचं कारण ही तसचं होतं..डाॅक्टरांनी त्याला सांगितलं होतं, "गौरीने मातृत्वाचा ध्यास घेतलाय..हे गर्भारपण तिला झेपेलच असं नाही कारण शारीरिकदृष्ट्या ही अवस्था तिला पेलवण्यासारखी नाहीये पण असं असूनही तिला हे समजावण्या पलिकडे आहे त्यात अबॅाशन किंवा गर्भपात तिच्यावर मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या परिणाम करू शकेल ज्यातून ती सावरणं कठीण होईल त्यापेक्षा आपण तिच्या गर्भावस्थेत जपणं सोयीस्कर ठरेल..याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल,दिवसागणिक काॅम्प्लिकेशनस् वाढतील त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.. " डाॅक्टरांच्या या वक्तव्यामुळे गिरीश आणखीन धास्तावला होता,पावसाच्या सरींमध्ये दिव्याची वात जपावी तसं तो गौरीला जपत होता..गौरी मात्र खूप खूष होती..ती वांझोटी नाही हे सिद्ध झालं होतं, तिचा गोतावळा तिच्याभोवती पुन्हा जमला होता..गिरीशच्या आईला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं..तिच्या माहेरहून आणि इतर ठिकाणहून खूप सल्ले येत होते,कोणीतरी भेटायला येत जात होतं, रेलचेल वाढली होती.. सातवा लागला आणि आईने आग्रहाने तिला मुंबईला नेलं..डोहाळे जेवण छान पार पडलं,रितीनुसार ती माहेरी देखील गेली पण गिरीशने चान्स नको म्हणून तिला परत पुण्याला आणलं..तिथे त्याची आई आणि तिची आई दोघी हट्टाने हजर झाल्या..नववा लागल्या पासून तिला कंप्लीट बेड रेस्ट सांगितली होती..
शेवटी ती वेळ येऊन ठेपली..गौरीला लेबररूममध्ये अॅडमिट केलं..सोबत गिरीश होताच,तिचा हात हातात घेऊन तो तिला धीर देत होता..तिला कळ येताच त्याचं ह्रदय पिळवटून जात होतं पण त्याला काहीच करता येत नव्हतं शेवटी त्यासाठी बाईपण आणि आईपण असावं लागतं..शेवटची एक कळ आली आणि तिची किंकाळी आणि बाळाचा आवाज एकदमच आसमंतात घुमला आणि गौरी बेशुद्ध झाली..नर्सने बाळाला आंघोळ घालायला नेलं..गौरीला मुलगी झाली होती..डाॅक्टर आले त्यांनी गौरीला चेक केलं आणि गिरीशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "मन घट्ट करा, खूप कमी वेळ आहे तिच्याकडे शेवटचं भेटून घ्या.." "डाॅक्टर..काहीच करू शकत नाही का आपण, प्लीज डाॅक्टर वाचवा माझ्या गौरीला..गरज आहे हो तिची मला..माझ्या बाळाला.."तो कळवळून म्हणाला.. " साॅरी मिस्टर फडते, आता माझ्या हातात काही नाही..आय एम एक्सट्रिमली साॅरी.. "असं म्हणून डाॅक्टर निघून गेले..गौरीला थोड्या वेळाने शुद्ध आली, त्याने तिचा थरथरता हात हातात घेतला..नर्सने बाळाला तिच्या कुशीत ठेवलं तिनं त्या गोड छबीला डोळे भरून न्याहाळलं. अगदी मातृमुखी होती तिची लेक.." तुला माहीत होतं ना....मग का फसवलसं मला..बोल ना..माहित होतं ना,हे गर्भारपण तुला माझ्यापासून कायमचं दुरावेल.."असं म्हणत तो रडत होता.. पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं.. "ए वेडू, रडतोयस काय...बाबा झालास तू..बघ आपली छकुली कशी हसतेय..लबाड...आणि मागचं सारं विसर आता..वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते..हो..हो मला माहीत होतं की मी यातून नाही वाचणार पण मला तुला खऱ्याअर्थाने पुर्णत्व बहाल करायचं होतं, तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकायचं होतं..आज मी खऱ्याअर्थाने तुझी गौराई सिध्द झाले..येते मी..फक्त माझ्या या काळजाच्या तुकड्याला सांभाळ..नऊ महिने तिला माझ्या उदरात जपलं आता हिची जबाबदारी तुझ्यावर टाकून निर्धास्तपणे मी जातेेय..सांभाळ माझ्या बाळाला.... " असं म्हणत त्याच्या मिठीत तिने प्राण सोडला.."गौरी..................... " तो ओरडला पण त्याचा चित्कार ऐकण्याआधीच ती त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती...
तिचे शेवटचे विधी आटोपले..आज तिचं बारावं होतं, गौरीच्या हार घातलेल्या फोटोसमोर गिरीश गुडघ्यात मान घालून बसला होता रडून रडून गालावर अश्रू सुकले होते..पाहुणे येत होते गिरीशचं सांत्वन करत होते..बरीच मंडळी जमली होती.इतक्यात झोप मोड झाल्यामुळे छोटी रडू लागली, तिला घ्यायला गिरीशची आई पुढे झाली तोच मागून कोणीतरी म्हणालं, "जन्मदात्या आईला खाल्लं, आता का रडतेय पांढऱ्या पायाची सटवी.. " आणि आईने हात आखूडता घेतला..तोच गिरीश उठला त्याने हळुवारपणे बाळाला उचललं,तिला शांत केलं आणि वळून तो सगळ्यांना म्हणाला, "बस्स..आता बस्स झालं..या तुमच्या भाकड समजूतीनी माझी गौरी माझ्यापासून कायमची दुरावली आता माझ्या बाळाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही..मी जातोय कायमचा अशा ठिकाणी जिथे माझ्या मुलीवर ह्या भोळसट समजूतीचं सावट पडणार नाही..माझ्या गौरीने तिच्या या चिमुकल्या छबीची जबाबदारी माझ्यावर दिलीय..मी निघतो.. " "गिरीश थांब ना रे आम्ही काय केलयं, ती गेली त्यात आमचं काय चुकलं...आमच्या माथी का हे पाप..?? " तोंडाला पदर लावत आई म्हणाली.."आई अगं हेच चुकतंय ना तुमचं, तुम्ही या रूढी परंपरा मध्ये इतके गुरफटला आहात ना की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून निसर्ग नियमानुसार झाली नाही की तुम्ही लोक त्या व्यक्तीला अशा तुच्छतेने वागवता की तो जिवाला कंटाळून तो पणाला लावून मोकळा होतो अगदी मागचा पुढचा विचार न करता..माझी गौरी सुध्दा अशीच तुमच्या या तुसडेपणाला आणि टोमण्यांना बळी पडली आणि जिवावर बेतेल हे माहीत असूनही या गर्भारपणाला सामोरी गेली..असो..आता मला जुन्याची पुनरावृत्ती नकोय..निघतो मी... "असं म्हणत त्या तान्हुलीला घेऊन तो त्या बरबटलेल्या विश्वातून बाहेर पडला कधीही न भरून निघणारं अपूर्णत्व घेऊन कायमचा..