Rajesh Sabale

Others Romance

2.6  

Rajesh Sabale

Others Romance

प्रेमात रंगले मी

प्रेमात रंगले मी

16 mins
20.1K


एक कथा चार वर्षांनंतरची गोष्ट

      आज ही मला तो चार-पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला, की अंगावर काटा येतो. दुपारची वेळ होती. मी, विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्याच वेळी आमच्या घराच्या दिशेने झपाझप पावले टाकीत एक व्यक्ती जाताना दिसली. क्षणभर वाटलं ते आमचे दाजी असावेत पण, सणासुदीला किंवा लग्न यात्रा या निमित्तानेच येणारा हा माणुस; आज एवढा घाईत का आले असतील?

    मनात शंकेची पाल चूकचुकली. कारणाशिवाय असे मध्येच न येणारा हा माणूस आला म्हणजे काही तरी भानगड; किंवा काही तरी, चांगलं काम असणार हे नक्की. याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले तोच आतून जोर-जोरात बोलण्याचा आवाज येत होता. आणि मी आवाजच वेध घेत आणि मनात त्यांच्या बद्दलचे विचार करीतच, पटपट कपडे वाळत घालत होते.

    हा माणूस घरात आल्या बरोबर घरचं वातावरण एकदम तणाव पूर्ण झालं होतं. तसे ते जेवढे प्रेमळ, मनमिळाऊ, कोणाच्या भानगडीत न पडणारा माणूस, खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर, कोणाचीच खैर नाही. मग समोर आई-बाप असो, की, भाऊ-बहीण, नाही तर, बायको, कोणाचाही ते मुलाहिजा ठेवत नसतं. लहानपणी अतिशय हलाखीत जीवन जगल्यामुळं त्यांना त्या त्या वेळच्या परिस्थिची चांगली जाण होती आणि आहे. दुःख, दारिद्र, अन्याय, गरिबी, अत्याचार, यातून तावून सुलाखून निघाल्याने आज समाजात, मित्र, नातेवाईक आणि परिवारात त्यांचं आदराने नाव घेतलं जातं. अशी असामी आमच्या घरी म्हणजे एकतर काही चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथम दर्शनी वाटलं, पण मी जेंव्हा धूणं धुवून अंगणात आले तेंव्हा माझ्या कानावर एक कर्णकर्कश आवाज आला.

"बाकी चर्चा नको, पहिलं तिला माझ्या समोर बोलवा. कुठं आहे ती?"

    माझी आई, भाऊ-भावजयी आणि लहान पोरं त्यांच्या या वरच्या पट्टीतल्या आवाजाने गप्प झाले. आणि माझा भाऊ जरा चाचरतच उठून अंगणात येत म्हणाला,

"ही काय आली, आताच धूणं धुवून आली आहे." 

"बर बर, ठीक आहे. ते धूणं दुसरं कोणी तरी वाळत घाला आणि तिला पहिलं इकडं माझ्या समोर आणा."

     माझी तर गाळणच उडाली. हात-पाय लटपटायला लागले. आम्हाला सुटीत गप्पा-गोष्टी कथा कविता एकविणारा माणूस एकदम जमदग्नी कसा झाला. आणि तोही माझ्यावर, माझं काय चुकलं बरं! माझं मलाच काहीच आठवत नव्हतं. मी नखशिखांत घाबरले होते. काय झालं असेल मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन आठवून पाहिलं पण, माझी काहीच चूक मला दिसली नाही. या विचारांच्या थैमानात मला आत घरात जायला जरा वेळ लागला. 

तेंव्हा पुन्हा आवाज आला, "काय झालं? घरात येण्यासाठी काय ढोल-ताशे हवेत का, मी येऊ का बाहेर राणी सरकार?" अन मी, पटकन घरात आले, कसं ते काही कळलं नाही. 

    "कापड धुवून झाली?" दाजी म्हणाले.

"नाही, हो, हो." मी, जरा गोधळून म्हणाले. "कसं चाललंय तुझं? शाळेत जातेस ना?" दाजी.

"हो, जाते." मी म्हणाले.

"तुला कोणी मित्र-मैत्रिणी आहेत?" दाजी

"हो हो आहेत ना" मी,

  माझा पार गोंधळ उडाला होता. आता काही क्षणापूर्वी हा माणूस एवढा आकांड-तांडव करीत होता आणि आता हे असं शांतपणे विचारतात म्हणजे, मला हे सर्व काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं. माझे आई, भाऊ-भावजय तर, काहीच बोलत नव्हते. त्यांच्याकडे बघितलं तर, त्यांचे चेहरे रडायचंच बाकी असल्यासारखे वाटले. एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून कशी बाहेर काढावी यातला हा प्रकार असावा. आपण आपलं विचारतील तेवढंच बोलावं. असं मनात पक्के केलं. तरी आता पुढचा प्रश्न आला.

 "मित्र-मैत्रिणीची नाव सांगता येतील? दाजी..

"हं, हं येतील." मी म्हणाले

मग सांग बघू एकेक नाव. 

    शाळेत जसं लहान मुलं पाढे म्हणतात तसं मी, एकेक नाव सांगू लागले. काही नाव पटापट आठवली तेवढी पटकन सांगून टाकली. मग पुढे एकेक नाव आठवून सांगू लागले. आणि ते फक्त हं हं असं म्हणत होते. त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे मला काही कळलं नव्हत. पण, मी जेंव्हा नाव घेण्याची थांबले, तेंव्हा मात्र पाण्यातून उसळी मारून मगर जसं सावज अलगद पकडते, तस्स खिशातला कागद काढून म्हणाले, "ही चिठी कोणाची आहे? या चिठीत असलेली नाव तर घेतलेच नाही. मग यात असलेली नाव काय माझ्या बायको पोरांची आहेत? ही चिठी नीट वाचून घे आणि आता काय ते मला खर खरं सांग! नाही तर, ...."

    मी, मनातल्या मनात म्हणाले नाही तर काय ते मला सर्व माहीत आहे. माझ्या आई-बापाचं आणि भावा-बहिणीचं आज काही खरं नाही. हे मी जाणते. हा आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्याच राशीला कसा आला हे काय कळेना झालं. मला तर, रडूच कोसळलं. अन मी, हुंदके देऊन रडू ही लागले. पण सांत्वन कोणीच केलं नाही. त्यात दाजी म्हणाले, "तू माझ्या समोर रडावं अस मी, काही केलं आहे का? तुझे जन्मदाते इथं बसले असतांना मी, पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय, वाच तो दिलेला कागद आधी वाचून झाल्यावर काय ते बघू. मग तुला काय रडायचं आहे. तेवढं मनसोक्त रडून घे हो बाय वाच आता."

   मी, कागद वाचू लागले आणि हा माणूस एक टक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचाली न्याहाळू लागला. म्हणजे या चिठीत काही तरी खास आहे. मन घट्ट करून मी, दिलेली चिठी मनातल्या मनात वाचत होते. आणि चिठ्ठी वाचता वाचता माझ्या डोळ्या समोर माझ्या गतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. माझ्या हातून जो अक्षम्य गुन्हा घडला होता. त्याचे दर्शन मला झालं होतं. ते सारं पाप माझं माझ्या समोर चित्ररुपानं उभं राहिलं, आणि पडद्यावर एखादा चित्रपट पहावा अगदी तस्स झालं.

    ती चिठी माझ्याच प्रियकराची होती. आणि या चिठ्ठीनेच आमच्या लग्नाचा विचका केला होता. आम्ही आमची नाव लोकांना कळू नये म्हणून स्वतःच वेगळी नाव धारण केली होती. पण याच चिठ्ठीने आमचं सारं गुपितच उघड केलं होतं. नुसत गुपित नाही तर, आम्ही काय काय प्रेमाचे रंग उधळले तेही यात लिहिलं होतं. दोन तीन गर्भपात केल्याचा उल्लेख होता. थोडक्यात म्हणजे आमची बेअब्रू ही आम्हीच करून. आमच्याच प्रेमाची लक्त्तर अशी चार-चौघात वेशीवर टांगली होती. ही चिठी वाचताना मलाच एवढ्या यातना होत होत्या की, याला प्रेम कसं म्हणावं, हा खरा सवाल होता. किळस येत होती. प्रियकर असून हा इतकं गलिच्छ कसं लिहितो. मला मनातून भयंकर चीड आली आणि रागही खूप आला होता. पण समोर दाजी बसले होते. नाही तर त्याचा जीवच घेतला असता. याला काय प्रेम म्हणतात. पत्रात असं लिहायचं असतं. काही तरी, लाज, लज्जा, शरम असावी की, नसावी. असला प्रेमी काय कामाचा. ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत अशी बाजारात मांडताना काहीच कस वाटलं नाही. आदर नाही. याला काय प्रेम म्हणतात. मी हे काय करून बसले होते. जर ही चिठी आणखी कोणी वाचली असेल तर... देव जाणे. पण दाजी तसं करणार नाहीत. याची खात्री होती.

    आता मला कळून चुकले होते की, आमचे दाजी एवढे का चिडले होते. अहो ते तर, नुसते रागावून बोलत होते. माझ्या आई-बापाने किंवा भावाने हे वाचले असते तर, मला विहिरीतच ढकलून दिलं असतं. कोणत्या मुलीचे आई-बाप आपल्या मुलीचा व्यभिचार असा जाहीर पत्रक काढून चार-चौघात वाचतील. नशीब माझं हे फक्त दाजींना आणि माझ्या होणाऱ्या भावी नवऱ्यालाच माहीत होतं. आणि आता मी, हे माझंच नागवं प्रेमाचं गुपित माझ्याच डोळ्यांनी वाचत होते. माझे वाचून झालं...हे आता दाजींना कळलं होतं..... कोण आहे हा?...तुमचं हे सारं खरं आहे का?

मी गप्प होते. आता सगळंच सगळ्यांना कळून चुकलं होत. लपविण्यासरखं माझ्याकडं काहीच नव्हतं. मीच माझ्या शीलाचा असा बाजार मांडला होता. अन माझीच अब्रू माझ्या प्रियकराने निलाम केली होती. मग जग तर हसणारच होत. माझं सारं भविष्य आणि आयुष्य ह्या एका चिठीत बंद होत. ते आता उघड पडलं होत.

आता घरातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं की, माझा आजारपण हे नुसतं वरवरचं नाटक होतं. ते इतक्या वर्षांनी कळलं. आजही घरात लग्नाचा विषय निघाला नसता तर हे अजून किती काळ चाललं असतं कोणास ठाऊक. मांजर चोरून दूध पिते, पण दंडुक्याचा मार त्याला माहित नसतो तस्स आमचं झालं होतं. मागील प्रेमाचा काळ डोळ्या समोरून सरकू लागला.

   आता मला कळून चुकलं होतं की, आमचं लग्न तर होणार नाहीच. वर चार गावात नाचक्की व्हायची तो झाली. आणि ज्या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं, ते होण्याची आता सुतराम शक्यता उरली नव्हती. कारण होता माझंच प्रियकर खोट्या नावाचा, सनी.

      सनीने, माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन त्या रात्री केलेला तमाशा एवढा विकोपाला गेला की, लग्नात मध्यस्थी केलेली माणसं ही हतबल झाली. नवरा मुलगा म्हणे लहान वयात शाळा-कॉलेज झालेलं प्रेम तितक महत्वाचं नसतं. तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा. मी लग्न करायला तयार आहे. आणि नवऱ्या मुलाचं बाप म्हणतो हा जळता निखारा आपल्या पदरात घेऊन आयुष्यभर मुलाच्या बायकोच म्हणजे पर्यायाने माझ्या सुनेचा व्यभिचार या उतार वयात घरात बसून नुसता बघत बसू काय? माझ्या पोराचं डोकं ठिकाणावर नाही. त्याच काही ऐकू नका! झाली तेवढी नाचक्की खूप झाली. आता तुमचा मार्ग वेग-वेगळा झाला. अहो आम्ही ही हेच म्हणतो आहोत. आता तुमच्या मुलानं या मुलीच नाद सोडून द्यावा आणि दुसरं एखादं चांगलं स्थळ शोधून लग्न उरकून घ्यावं हेच तर आम्ही म्हणतो आहोत. तुमचा मुलगा म्हणाला म्हणून प्रश्न वाढला दुसरं काय.

   काय झालं होतं. लहानपणा पासूनच एकत्र खेळले, शिकलेली, वाढलेली आणि आजू-बाजूलाच राहणारी आम्ही दोन मुलं वयात येऊ लागली होतो, आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नर मादीतला फरक ही जाणवत होता. पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी अगोदर पुढाकार घेऊन विचारावं हे आमचं आम्हालाच अनेक दिवस कळलं नाही. घरात माझां आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार सुरू झाला. वधू-वर परीक्षेचा घाट घातला गेला. एक दिवस एक मुलगा मला पाहूनही गेला आणि त्या मुलाच्या बापानं मी, सून म्हणून त्याना पसंत आहे. असा निरोपही आला. 

       पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणी सुरू होऊन हळू हळू लग्नाच्या हालचालीं वाढल्या. देण्या-घेण्याचे व्यवहार ठरले. लग्न कुठं आणि कधी करावयाचे निश्चित झाले होते. आता फक्त उन्हाळ्याची सुटी पडली की, शाळांना सुटी असते. परगावत किंवा शहरात नोकरी मिमित्ताने गेलेले लोक आपल्या बिऱ्हाड घेऊन आपल्या गावी येतात आणि मग असा लग्न किंवा इतर सोहळे रंगतदार होतात. घरच्या मंडळींनी तस्सच ठरवलं होतं पण, अनेक वर्षे रंगवलेल्या स्वप्नाला तडा जाणार हे लक्षातत आल्यावर माझ्या प्रियकराने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोखात चार-पाच टपोरी पोरं नेऊन जेवणाच्या तटावरून उठवल. आणि आड बाजूला कोपच्यात घेऊन दम दिला. तू ज्या पोरी बरोबर लग्न करतो आहेस तिचा नाद सोडून दे. नाही तर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचं ही लग्न होणार नाही अशी व्यवस्था करीन. असा सज्जड दम देऊन काही कागदाच्या चिठोऱ्या त्याच्या हाती दिल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्रीच्या काळोखात पळून गेले. म्हणा, नाही तर निघून गेले म्हणा.

   नशीब माझं की, त्या माणसानी पोलीस केस केली नाही. नाही तर आज माझी आणि माझ्या घरच्यांची रवानगी जेलमध्येच झाली असती. अन आमचे दाजी काही अंगी दोष नसताना दोषी ठरले असते. निकाल लागायचा तेंव्हा लागला असता पण, जनमानसात बेअब्रू झाली असती. त्याचीच मनात आज खंत आहे.

     असंच एका उन्हाळी सुट्टीला बाहेरगावी मुंबई, पुण्याला असलेली मंडळी नेहमी प्रमाणे आमच्या घरी आली आणि मी, चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे चाळे म्हणजे एक प्रकारचे पाप लोकांना कळू नये म्हणून पोटात जोर-जोरात पोटात दुखत असल्या सारखे केले. आरडा-ओरड करून जमिनीवर गडबड्या लोळू लागले. वरवर इतरांना तर तस्स काहीच दिसत नव्हतं पण, मी, एव्हढा जीवाचा आकांत करून ओरडते आहे म्हटल्यावर घरातली सर्वच सैरभैर झाले. कोण म्हणतं ओवा द्या. कोण म्हण गरम पाणी द्या. कोणी म्हणे राजबिंदू द्या. कोणी म्हणे पोट गरम पाण्याच्या पिशवीच्या शिकवा. असे नाना प्रकार चालू होते पण माझं पोट दुखणं काही थांबलं नाही. कोणी म्हणे डॉक्टर आना, कोणी म्हणे कशाला आणता डॉक्टर, नुसतं पोट तर दुखतंय. पोरगी वयात आली की, दुखतं असं कधी कधी, म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बगल दिली, आणि तात्पुरता पोट दुःखी हा विषय थांबला, माझ्या पोट दुःखीमुळे चाललेली धावपळ जरा स्थिर झाली. तेवढ्यात दोन तीन घर सोडून असलेला सनी नेहमी प्रमाणे तिथं आला. सनी हे त्याचं खर नाव नव्हतं. हा आमच्या प्रेमाचं कोड होता.

     आता सम वयाची मुलं-मुली एकत्र आली की, गप्पा रंगतात तश्या काही आज गप्पा रंगल्या नाहीत. लहान पोरही जरा जेमतेमच वागत होती. तेंव्हा सनी म्हणाला, "आज नाही खेळायचं का? आज असं गप्प गप्प का? चला घरामाग क्रिकेट खेळू." 

पोरं म्हणाली नको आज आमची मावशी आजारी आहे. ती येणार नाही. (मावशी म्हणजे मी) तीच पोट लई दुखतंय. शहरातून आलेली मुलगी म्हणाली. हे ऐकूण सनी म्हणाला, " पोट दुखायला काय झालं. ओवा लसूण चावून खाल्ला की, राहून जाईल."

"नाही ना थांबत. सगळं करून झालं. आजी म्हणते वयात आल्यावर दुखतं असं मुलींच्या पोटात." शहरातून आलेली मुलगी म्हणाली, "असं कसं आता घरगुती औषध देऊन पोट दुखायच थांबत नाही तर, मग डॉक्टरकड का नेत नाहीत तिला?" सनी म्हणाला, "कसं नेणार? न्यायला गाडी-घोड नको काय? काय उचलून नेणार का काय? अन उचलून न्यायाला, ती काय लहान पोरं हाय का काय? मग खांद्या-बिनद्यावर उचलून न्यायाला त्याला गाडी-बैल न गं?" माझी वहिनी म्हणाली.

"गाडी-बैलं कशाला मग आपली मोटार सायकल काय कामाची?" सनी म्हणाला.

"मग तर बरं झालं अगदी देवा सारखा आलास बघ." वहिनी म्हणाली.

     माझ्या आईला वहिनीने सांगून मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला. आई जरा आढे-वेढेच घेत होती. म्हणाली साधं पोट तर, दुखतंय राहील जर वेळानं पण, मधून मधून माझं ओरडणं ऐकूण मग आई मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी राजी झाली. 

     थोड्याच वेळातच सनी मोटार सायकल घेऊन आमच्या घरी आला. आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला. बाकीचे लोक फक्त तोंड आ वासून बघत राहिले. कोण म्हणे किती पोरगा चांगला आहे. शेजारी-पाजारी अशी मंडळी असली की, चिंता जरा कमी होतात. घरात तोंड भरून सनीच कौतुक सुरू होतं, आणि तिकडं आम्ही दोघेच दवाखान्यात गेले होते. आम्ही कोणत्या दवाखान्यात गेलो, कोण जाणे. आमच्या सोबत तिसरं कोणीच आलं नाही. खरं म्हणजे घरातल्या मंडळींपैकी कोणी तरी, सोबत जायला हवं होतं, पण तस झालं नाही. कधी कधी अति आत्मविश्वास सुद्धा धोकादायक ठरतो. म्हणतात आणि तस्सच झालं. त्यामुळं माझं खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं. आणि मग प्रत्येक मोठ्या सुट्यांच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं, तर कधी डोकं दुखणं हे नित्याचाच झालं. पण सरळ मार्गी घरातल्या माणसांना माझा अजिबात संशय आला नाही.

    त्यादिवशी मला दवाखान्यात एडमिट करून तो म्हणजे माझा प्रियकर सनी दोन तासांनी पुन्हा घरी आला. होता. सोबत मी नव्हते. घरी आल्या आल्या सनी म्हणाला, "तिला दवाखान्यात एडमिट केलंय." तिला म्हणजे मला.

"आ रे बाप रे!" हे वाक्य ऐकल्या बरोबर माझ्या आईच तर अवसानच गळालं. म्हातारी तर मटकन जाग्यावरच बसली. पार घामाघूम झाली बिचारी. आता लेकीला एडमीट केल्याचं ऐकलं आणि म्हातारी आडवी झाली. म्हातारीची सून म्हणाली. 

      "आता काय? आता पहिलं या म्हातारीला गाडीवर घाला अन तिच्या लेकी जवळ दवाखान्यात घेऊन जा वा. बाकी समदं आम्ही, पाहुण्या रावळ्यांचं बगू...जा वा बरं बिगी बिगी पहिलं." म्हातारीची सून म्हणाली. 

    आई दवाखान्यात आली होती. आता जरा घर कस शांत झाला होता. पण आतून धुमसत होतं. हे असं वर्षातून दोन वेळा नक्की होत असे. अन तेही बरोबर शाळेला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्या लागल्या की, मी, हमखास आजारी पडायची आणि माझी आई शहरातली मंडळी घरी आली की, माझ्या आजारपणाच कारण सांगून कधी मुंबईत तर कधी गावच्या दवाखान्यात माझ्या सोबत असायची, आणि आमच्या सोबत सनीही असायचा. तो का असायचा हे आजतागायत कोणालाच कळलं नव्हतं. पण या चिठीनं घात केला होता. घरी लोक आले की, मला आणि सनीला एकांत मिळत नसे आणि म्हाताऱ्या आई/वडिलांना आणि घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे. वेळी-अवेळी काही गरज पडली की, लगेच हा मुलगा धावून येतो. स्वतःच्याच खर्चाने सर्व करतो. हे सर्व तो का करतो आहे. हे कोणालाच कळले नाही. माझं ठराविक वेळीच आजारी पडणं कित्येक वर्षे घरातील मंडळींना कळलं नाही. आणि आता जेंव्हा कळलं तेंव्हा आई-वडील आणि घरातल्या मंडळींची पायाखालची जमीनच सरकली. काय करावं आणि काय नाही असं झालं. आपलीच पोटच्या पोरीन असा विश्वास घात केला. म्हटल्यावर त्या परक्या पोराला नाव ठेवून काय उपयोग होता. लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता. पत्रिकाही पोहचल्या होत्या. आता फक्त शुभमंगल सावधान म्हणायच बाकी होत. ते ही झालं असतं पण मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गावी येतात. मुलांना सुट्या असतात. म्हणून खर तर लग्न तिथी त्या पद्धतीनं सर्वानुमते ठरवली होती. लग्न ठरवून चार ते पाच महिन्याचा कालावधी होता पण, मी, कोणालाही विश्वासात न घेता असा आई-वडिलांच्या गळा केसानं कापला होता. सर्वत्र छि-थू झाली. विष खाऊन मरण की, काय अशा यातना या पोटच्या मुलीनं दिल्यावर दुसरं काय होणार होतं. प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी मदतीनं घरच्या मंडळींना सांगावं की, नाही. पण नाही. शेवटी अशी नाचक्की झाली. स्वतःची ही झोप गेली. दिवस-रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. इकड आड आणि तिकडं विहीर अशी माझी अवस्था झाली. उगाच आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखं झालं. चार-पाच महिन्यांपूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला त्यानंतर लगेच कोणाच्या तरी, मदतीनं ही गोष्ट घरात न वाद होता कशी कळेल, यासाठी मी, काहीच व्यवस्था केली नाही. करायला हवी होती. आणि प्रेम करणाऱ्या सनीनेही नीट दक्षता घेतली नाही. मग जन्मदात्या पालकांनी काय करावं म्हणजे मुलं-मुली आपलं गुपित पालकांना सांगतील की, याचीही व्यवस्था सरकारनेच करावी की काय? शेवटी काय झालं. ज्याच्या बरोबर प्रेम केलं, त्याच्या बरोबर लग्न लावून देण्यास माझे आई/बापाकडून विरोध वाढला आणि ज्याच्या सोबत प्रेम केलं त्याचा बाप मला सून म्हणून घरात घेण्यास नकार देऊन मोकळा झाला. आणि प्रेम करणारे आम्ही दोघेही हतबल झालो. प्रेम करावे तर, दोघही आपल्या परीने जगात जगायला तरी सक्षम नकोत का? प्रेम करणं सोपं आहे. पण नुसतं प्रेम पोटाला दोन वेळचे दोन घास अन्न देईल का? असं वासनिक प्रेम काय कामाच. आम्ही जीवापाड प्रेम केलं. मग आता कुठं गेलं ते? आता का आई-बापाच्या पदरा आड आम्ही लपत होतो. आता का नाही आम्ही आई-बापाला सांगत की, आम्ही प्रेम केलं आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगू द्या. आता कशाला आम्हाला आई-बाप पाहिजे होते. त्यांच्याच अब्रूची लक्त्तर वेशीवर टांगताना लाज वाटली नाही मग आता घाबरण्याचे कारणच काय? आता आम्हाला समाज मान्यता हवी होती. आई-बापाचं प्रेम आणि पर्यायाने इस्टेट हवी असते. प्रेम करतांना या गोष्टी आठवत नाहीत. आता "ये क्या हुवा तेरा वादा" किंवा "जाने क्या बात है। निंद नहीं आती।" असं म्हणायची वेळ येते. 

    आमचं एकत्र कुटुंब होतं. पण घरातली माणसं कामानिमित्ताने गावा बाहेर म्हणजे कोणी मुंबईला तर कोण आजूबाजूच्या परिसरात नोकरी निमित्ताने गेले, पण घरापासून दूर होते. आणि इथं गावी मी, माझी आई, एक भाऊ त्याची बायको आणि त्यांची दोन तीन मुलं बस एवढाच परिवार सध्या तरी तिथं होता. या गोष्टीला आता तीन चार होऊन गेला होती त्यापूर्वीची ही गोष्ट आहे. आम्ही गावी असल्याने वर्षातल्या दर मोठया सुट्टीला म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर नोकरी निमित्ताने गेलेले घरातले लोक आपापल्या मुलाबाळांना घेऊन गावी घरी येत असत आणि मग सर्व घरचे आणि पाहुणे मंडळी आणि आम्ही लहान मुलं सुट्टी मस्त मजेत घालवीत होतो. पण काही दिवसांनी मी, त्यांना टाळू लागले होते. प्रथम मी, काय करते हे माझं मलाच कळलं नाही. मी, माझ्याच मस्तीत होते आणि मी माणसांना कस फसवू शकते किंवा माणसांना मी, कसं आपल्या तालावर नाचवू शकते आणि त्यांना पुढे कसं झुलवत ठेवायचं याचे आराखडे मनातल्या मनात आखत गेले खरी पण, मी माझ्याच विणलेल्या जाळ्यात पुरती फस्त गेले तेच पाप आज माझ्यासमोर दत्त म्हणून समोर उभा राहील. आणि त्या पापाचे उत्तर म्हणजे ही दाजीने दिलेली चिठी. मी, वाचत होते. मी केल्या चुकांचे आता खिळे झाले होते. आणि मला एखाद्याला खिळे ठोकून सुळावर देतात तशा यातना होत होत्या. घटना तर घडून गेली पण त्याची सल मनात अजून ही कायम आहे.

  आता माझं आणि माझ्या मोठया बहिणीचं लग्न ठरलं होतं. दोन्ही लग्न एकाच दिवशी, एकाच तारखेला, एकाच वेळी, एकाच ठिकाणी होणार होती. हे सगळं मला माहित होतं तरी मी, माझ्या कडून झालेल्या चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या. त्या चुका मी, लपवायला गेले आणि आज त्याच फळ मी भोगते आहे.

     एवढं सर्व झाल्यावर कोणत्या मुलाचं बाप गप्प राहील. आणि तस्सच झालं आणि माझ्या लग्नाचं एका नाट्यमय सोहळ्यात रूपांतर झालं.

आणि मग माझी झोप उडाली

   माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होत. त्याचे मुलाचे वडील म्हणत लग्नात मध्यस्थी करणारानेच आम्हाला फसवलं आणि अंधारात ठेवलं आहे. या मुलीचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण असताना आणि अनेक वर्षे हे असंच सुरु असूनही मध्यस्थी करणाऱ्याना हे माहीत नाही म्हणतात म्हणजे आश्चर्यच आहे. हे कसं शक्य आहे. अशी घरात धुमश्चक्री सुरू असताना मी, शांत कशी झोपू शकते. मनाची उलाघाल सुरू होती. तिकडं सनीच्या बापानं तर हैदोस घातला होता. ज्या मुलीसोबत सनीच प्रेम आहे असं लोक म्हणतात. ती मुलगी दूरच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती. असं सनीच्या बापाचं म्हणणं होतं, आणि ज्यांच्या सहवासात आपलं कुटुंब लहानच मोठं झालं त्याच कुटुंबातील मुलीवर आपल्या मुलांन प्रेम करावे हे मला मान्य नाही. तुमच्या मुलीच ज्या मुला बरोबर लग्न ठरलं आहे. ती चांगली माणसं आहेत. तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न करा. आणि मोकळे व्हा. उगाच आमच्या पोराच्या नादी लागू नाका. चार दमड्या कमवायची अक्कल नाही आणि म्हण प्रेम करतोय. याच्या बापानं कधी प्रेम केलं हाय का? वर तोंड करुन सांगतंय म्हण प्रेम केलंय. येवू दे तर, त्याला घरी. बघतोच कस प्रेम करतोय ते! मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की, या पोराचं मी पाहतो तुमच्या मुलीच लग्न करून टाका. 

        इकडं माझी आई म्हणते, माझी मुलगी बिना लग्नाची आयुष्यभर राहिली, आणि तशीच घरात मेली तरी, या पोराला मी, माझी मुलगी देणार नाही. आणि मुलाचा बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगीच माझ्या घरात नको. आपलं नातच तस्स नाही. मुळात तुमच्या मुलीशी या मुलाचं लग्न होऊ शकत नाही. आपले पूर्वीचे संबंध चांगले आहेत. ते तसेच राहू देत. उगाच या पोरांच्या घाणेरड्या वागण्यापायी आपल्यात वितंड-वाद नकोत.

          आता सर्व बाजूनी माझी आणि सनीची कोंडी झाली होती. आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला आहे. तेंव्हा तो घोळ आम्हीच पुढाकार घेऊन सोडवला पाहीजे, बाकी कोणी ही मदतीला येणार नाहीत. हे आम्हाला पटलं होते. आता माझी तर झोपच उडाली होती. एवढे दिवस आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, यांच्या कडून सळसूदपणे लपवलेली गोष्ट आता चव्हाट्यावर आली होती. माझ्या लग्ना सोबतच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होत. त्यालाही आता गालबोट लागलं होतं. आमचे दाजीच मध्यस्थी असल्याने एवढ धुमशान होऊनही कस बस तीच लग्न झालं. पण म्हणावा तसा आनंद माझ्यामुळे कोणालाच उपभोगता आला नाही. याच आज जास्त वाईट वाटत आहे. मध्यस्थी माणसं आणि इतर पाहुणे मंडळी विश्वासू आणि सामाजिक भान ठेवणारी असल्याने अडचणी कमी झाल्या. पण माझ्या आणि सनीच्या लग्नाचा गुंता अधिकच वाढला. आई-वडील आणि घरातील मंडळींनी मी, घरी अशी मेली तरी, तिचं सनी सोबत लग्न होऊ देणार नाही बअसं माझ्याच आईन सांगितल्याने आणि सनीचा बापाला मी, त्यांच्या घरात सून म्हणून नको. असे भांडण इरेला पेटल्याने आमचा लग्न सोहळा न होताच मोडीत निघाला होता. रोज एकमेकांच्या दारा समोरून जाताना जीवभाची माणसं अचानक एकमेकाचे मोठे दुष्मन झाले. कोणीच कोणाशी बोलेना नात्यातल्या पीळ वाढू लागला. रोजच्या रोज येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून वाद होऊ लागले. एकमेकांचे विरोधक आणि हितशत्रू म्हणत होते, तेच आता आगीत तेल ओतून आमच्या लग्नाचा विषय अधिक बिघडवून ठेवला होता. यात चार वर्षे गेली. तरी तिढा काय सुटला नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं जाने क्या बात है? जाने क्या बात है?


Rate this content
Log in