Rajesh Sabale

Tragedy

4.4  

Rajesh Sabale

Tragedy

दगडूच लग्न

दगडूच लग्न

5 mins
504


दगडूच लग्न जमलं आणि घरात आत बाहेर जाणारांची धावपळ वाढली होती. लग्न सोहळा जवळ-जवळ येत होता त्यासाठी एकेक काम उरकून घ्यावं म्हणून सर्व आटापिटा... ज्या दिवशी लग्न त्याच दिवशी सकाळी सकाळी एक पोरगा काकांच्या (काका म्हणजे नवऱ्या मुलाचे वडील) हातात एक कागदाचा तुकडा सरकवून पटकन निघून गेला. काकांना वाटलं लग्नघर आहे. घरातल्याच कुणीतरी काही मागवलं असलं त्याची ही यादी-बिदी असलं...

त्यांनी कागद तसाच कोपरीच्या खिशात ठेवून दिला. आणि आपल्या कामाला लागले...

तेव्हाची लग्न म्हणजे बैलगाडी असल्याशिवाय प्रवास नाही.. आणि त्या नसतील तर लग्नाची मजा नाही... आताच्यासारखं नव्हतं तेव्हा..एकाच दिवसात सर्व उरका अन् व्हा मोकळं...तेव्हाची लग्न तीन-तीन चार-चार दिवस चालायची आणि आज इथंही तसंच सुरू होतं... काका बाहेरची काम उरकून घरात आल्यावर काकूला म्हणाला...

"काय गं हा कागुद कशापायी धाडला मला?

काय आणायचं राहिलं का?...

काकू एकदम चमकून म्हणाली...

"या बया म्या कशाला कागुद धाडू तुम्हासनी... हाय का आता तुमचं आपलं नवीनच काहीतरी जावा तिकडं..." आज पोराचं लगीन हाय हे बी तुम्हासनी समजना की काय?..

"मंग हा कागुद कोणी दिला मला"

काका विचार करू लागला... कोण पोरगा व्हता... काकाला नीट काहीच आठवना... आता लगीनघर त्या घरातल्या प्रत्येकाचे लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी बाया माणसं पोरं आता कोणीच पोरगा कसं वळखायच बरं...


तेवढ्यात काकू काकाला म्हणाल्या..

"आ...वं असं याला त्याला ईचारण्यापरीस त्यात काय लिव्हल ते बघा की, समदं यवस्थीत व्हईल"

"आता मला लिव्हता वाचता आलं असतं तर, तुला कशापायी ईचारल असतं. म्याच वाचून काय ते आणलं नसतं व्हय..काका म्हणाला...

आ वं मंग कुणाकडून वाचून घ्यावा की, आता ही लगीनघाई.. या गडबडीत कोन हा कागुद वाचणार सारा अडाण्याचा बाजार...

पूर्वी लोक पोरा-पोरींना शाळेत पाठवतं नसतं. लहान पोरापोरीचं एकच काम.. पोरांनी गुरं-बैलं बघायचं आणि पोरींनी घरातली लहान पोरं संभाळायची.. आणि थोडं मोठं झालं की त्यांची लग्न लावून दिली जात होती... मग काय वयाच्या पंधरा सोळा वर्षात मुलं-बाळ होत...कोणाची किती पोरं हे बघायला येत होता कुणाला... देवाची देणं म्हणतं... एकेका जोडप्याला चांगली डझन-डझन पोरं होत....तेंव्हा नसबंदी नव्हती...पण एकेक घरात चांगली पन्नास साठ माणसं असतं...तसंच हे मोठं खटल होतं..घरात माणसं खंडीभर पण सर्व पिढीजात अडाणी...


तेवढयात कुणीतरी ममईहून काकांचा मेव्हणा आलाय म्हणाल... आणि काकांच जीव भांड्यात पडला. त्याच तडाख्यात काका पाहुण्याकडं गेला...

"घाई घाईन कोपरीच्या खिशातला कागुद मेव्हण्याच्या हातात देत काका म्हणाले...

"बरं झालं बाबा अगदी देवासारखा आलास जरा वाईचं हा कागुद बघ बर काय लिव्हलय त्यात"....

आलेल्या पाहुण्यांना कागदाची एकेक घडी हळूच उलगडून कागद सरळ केला आणि कागदावर फक्त नजर फिरवली आणि काकांच्या मेव्हण्याच्या हातातला कागद खाली गळून पडला....

"काय झालं रं.... काकांनी दचकून विचारलं"....

आता घरात काय चाललंय आणि हे काय नवीन झेंगाट...

पाहुण्यांने काकाला हळूच जरा बाजूला नेलं .. आणि म्हणाला..

"अहो अण्णा हे कागद कोणी दिला तुम्हाला"...काकांचा मेव्हणा काकांना घरातली इतर माणसं काका म्हणतात म्हणून तो ही काकाचं म्हणत असे..

"आ..रे पण असं काय लिव्हलय त्यात"....काका...

काय लिहिलं ते सोडा आता लग्न लावायला जायचं की, नाही ते अगोदर बघा...अन् आलेल्या घरभर पाहुण्यांचं काय करायचं"...मेव्हणा काकाला म्हणाला...

काका भडकला आणि मेव्हण्यावरचं डाफरला....

"मला कळलं असं सांग काय लिव्हलय त्या कागदात!!...

काका तापलेला पाहून मेव्हणा काकांच्या कानात काहीतरी कुजबूला... आणि काकाचा चेहरा लालबुंद झाला... पण करणार काय हे लोकांना सांगणार कसं...

काकांना वाटलं काकूला हे सांगावं पण काकांचा मेव्हणा म्हणाला...

अण्णा ताईला काही बोलू नका....

जसं चाललंय तसंच चालू द्या आपल्याला काहीच माहीत नाही असं समजायचं आणि...


झालं बैलगाड्या जोडल्या गेल्या आणि मंडळी निघाली दगडूच लग्न लावायला... दगडूची सासरवाडी दूर होती मध्ये दगडूच्या गाव आलं आणि सर्व वऱ्हाडी दगडूच्या मामाच्या घरी आल्यावर लोकांनी म्हणजे वऱ्हाडी मंडळींनी गाडीचे बैल सोडून त्यांना वैरण घालून मंडळी झाडाच्या सावलीला आरामात बसली होती...मामाच्या घरी चहापाणी घेऊन निघायचं असं सर्वाना काकांन सांगितलं होतं... अजून बरच अंतर जायचं होतं पण हे लग्न मामा-मामीनं जमवलं म्हणून काका घरात जाऊन दगडूच्या मामा-मामी सोबत बोलणी करू लागला...सोबत मुंबईहून आलेला मामाचा भाऊ होताच..त्याच्यामूळ तर, हे समजलं होतं....


तिकडं नवऱ्या मुलीकडे एकच गोंधळ उडाला होता...दुपार होऊन गेली पण नवऱ्या मुलाकडील पाहुणे मंडळी आली नाही. लग्नाचा एवढा सैपाक तयार होतोय आणि अजून कोणीच कसं आलं नाही की, निरोप नाही...निरोप कसा देणार तेव्हा आजच्या सारखी मोबाईल किंवा फोन नव्हते.. काही लोक घोड्यावर प्रवास करीत होते...एक बरं झालं नवऱ्या मुलीच्या बापाकडेही घोडा होता.. त्यांच्याकडे मेंढ्यांचा व्यवसाय मग घोडा पाहिजे... हे एक बरं झालं होतं.. मुलीच्या बापाने कोणाशी काहीही न बोलता फक्त आपल्या बायकोला म्हणजे नवऱ्या मुलीच्या आईला गुपचिप सांगून घोड्यावर टांग टाकून नवऱ्या मुलाच्या घराकडे वाऱ्याच्या वेगाने निघाला... काकाचं आणि मामाच बोलणं आता थांबलं होतं... तेवढ्यात कोणीतरी घोड्यावरून येतंय असं समजलं म्हणून काका आणि मामा-मामी घरातून बाहेर आले....


आलेला पाहुणा जरा रागातच होता पण, मुलीची बाजू पडली म्हणून.. सबुरीने घेतलं होतं.. आता नवरीचा बाप आणि मामा यांचं खलबत सुरू झालं...नाही हो करता करता चार बायकांनी पोरगी नीट पाहून मग काय ठरवू असं ठरलं आणि काकाने या प्रस्तावाला होकार दिला.. ठरल्याप्रमाणे नवऱ्या मुलाकडील तीन चार महत्वाच्या बायका नवऱ्या मुलीच्या घरात शिरल्या... आणि काही वेळाने बाहेर आल्या त्यातली फक्त काकू काकांच्याजवळ जात हळूच काहीतरी कुबुजल्या आणि काकांचा गेला मूड पुन्हा आला...


ठरल्याप्रमाणं दगडूच लग्न झालं पण आपले आई-बाप आणि सासू-सासरे यांच्यात काय खलबत झालं याचा कोणालाच पत्ता लागला नाही...

लग्न लागलं रीतीरिवाजाप्रमाणे देणं घेणं उरकलं आणि नवऱ्या मुलीला घेऊन दगडू आणि काकाकाकू आपल्या घरी आले... आणि लग्नात आलेले पै पाहुणे रावळे सर्व आपल्या घरी गेल्यावर काका काकू आणि दगडू एकत्र बसून बोलू लागले...


दगडूच्या नवरीला दगडूच्या अगोदर चांगलं मोठं स्थळ आलं होत...पण मुलगा व्यसनी असल्याने दगडूच्या बायकोच्या घरच्या मंडळींनी मुलगी देण्यास नकार दिला होता... म्हणून.... या मंडळींनी ऐन लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलीला कोड आहे.. डोळे झाकून पोराचं लग्न करता का? जरा डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा पोरगी कशी आहे ती! का नुसत्याच रूप बघून पोराचं वाटोळं करायचं ठरवलंय!!! 


आता सर्व झाल्यावर ही चिठ्ठी आली आरडून- ओरडून उपयोग काय? म्हणून सर्व कसं चुपचाप चाललं होतं. ज्यांन चिठ्ठी पाठविली तो कोण असणार....हे मुलीच्या वडिलांना माहीत होतं पण, सर्वच मंडळी नात्यांची आणि लग्नात चार लोकांत तमाशा नको म्हणून सर्व समजुतीने घेऊन हे लग्न निर्विघ्न कसं पार पडलं याची काळजी काकानी आणि नवऱ्या मुलीच्या वडिलांनी घेतली होती...आणि आता दगडू एक सुंदर मुलाचा दादला झाला होता... घर कसं आनंदात न्हाऊन निघालं होत.. लक्ष्मीच्या पावलानं दगडूच्या बायको घरात येण्या अगोदर लग्नात आणि आता घरातल्या सर्व मंडळींच्या पाया पडली होती.. पूर्वी हेच गावाकडं हे अतिशय महत्वाचा मानलं जातं होत.. सुई जाणिल तो, सोयरा अशी पद्धत होती.... नुसती शब्दावर कामं होत होती.. एवढा गाढ विश्वास होता... पूर्वी मुला-मुलींची लग्न घरातील मोठी माणसं ठरवीत असतं. मुलाने मुलगी पाहणे.. किंवा मुलीने मुलगी पाहणे ही भानगड नव्हती... मोठी माणसं सांगतील तो नवरा आणि ती बायको असं होतं... गेले ते दिवस...पण 


आज एक संस्कारी मुलगी घरात आल्याचं काका-काकूला समाधान लाभलं.. म्हणून म्हणतात कानात आणि डोळ्यात चार बोटांचं अंतर असतं.. हे काही खोटं आहे असं म्हणता येणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy