Rajesh Sabale

Tragedy Others

3  

Rajesh Sabale

Tragedy Others

*अळणी कधी खारट*

*अळणी कधी खारट*

6 mins
418


      "आ व म्या काय म्हणते!!" चार बाऱ्या हाका मारून झाल्या. पण एका हाकत ऐकलं तो नवरा कसला...? म्हणून ती पुन्हा जोरात ओरडते.. आ व पप्याच्या बापा.. ऐकलं का? न राहून ती मूलला म्हणाली...

     "पप्या अ रे! तुह्या बापाला म्हणावं! आता कव्हर पसरायचय... दिस कासरभर आला की, बुडावर ऊन पडलं म्हणावं....अन तशीच तणतण करीत पुन्हा माजघरात गेली...

      हा माणूस ना... काही कामाचा नाय.. कवा गोठ्यातील बैल अंगात बांधायचा न्हाई...का येरवाळी त्यांना वैरण पाणी करायचा नाय.. समद म्याच करायचं.. आता वरच्या अंगासून खार सुटली व्हती म्हणून म्हणलं तेवढी बाजरी उफणून घेतली असती. पण हा बाबा लवकर उठायचा नाय... दिस माथ्यावर येइस्तवर हथुरणावर लोळत पडणार...

     'पदरी पडलं अन पईत्र झालं ..म्हणत्यात..अगदी तस्स झालं.... तरी म्या आईला म्हणलं व्हते.. पार गरीब सासर चाललं..पण सिरिमंत नग बया!!.. चार घरची धुणी-भांडी करीन ...मिरची भाकर खाऊन राहीन म्या.. पण, असली मागणी लग्नासाठी पाहू नग...पण माझं मेलीच कोण ऐकतय तवा.. एकतर शिकश्यान नाय..मंग हाताची घडी अन तोंडावर ब्वाट... आई-बाप म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालायची.. आणि आला दिस ढकलायचा दुसरं काय.."

    आता लगीन झालं म्हंजी प्वारं व्हानार.. पण पोरांच्या बापच काय? म्हंजी म्या प्वारं बी अन नवरा बी दोन्ही संबळायची.. अन माह्या नवऱ्यानं काय...आई-बाच्या कमाईवर उडग्या सारख उनाड पोरात हिंडायच आणि आयत रॅट खायच्या येळी घरात याचं.. आयत गिळायच अन पोळावाणी हिंडायच.... बायकू मेली की जिती... हे त्याला रातच्याला कळायचं... असलं सासर काय कामच..पण हेच माकड माह्या नशिबात मिळणार व्हत... त्याला आई-बा तरी, काय करणार म्हणा... घरची दुबळवाडी व्हती... म्हून ह्या कसब्याच्या दावणीला आई बापानं मला बांधलं व्हत.. . 

नवरा कडीच काम करीना.... पण रुबाब पाटीलकीचा... आता याची पाटील की, काय जलम भर पूरणार हाय का.. पण याला कळलं तर ना? पिऊन पडतंय कुठं त्याच त्यालाबी कळणा....म्हण मी पाटील... रस्त्याने लेझीम खेळत्यात तस्स चालत.. कधी कुठं रस्त्याच्या कडेला पडत.. बारीक-बारीक पॉर बी तोंडात मुतून बी अस्त्याल तरी याला कळायचं नाय....

     कोणी म्हण.. लगीन केल्यावर हे प्वारं सुदरलं... प्वारं म्हंजी माझा दादला... आता म्हणत्यात त्याची बायकू धड नाय... म्हंजी म्या... याला काय सुदरायचं?.. काय न्यावं हाय बघा.. पोरगा ह्यांचा अन त्याला सुद्रायचा म्या...मंग ज्यांनी जन्म दिला त्यांनी काय करायचं....ते म्हणत्यात बायकून नवरा सुदरवला पाहिजे... म्हंजी कसं...? 

काय नीती बघा...ज्यांनी जलम दिला ते त्यांनी ह्याच्या पुढं हात टेकल... अन परक्या घरची बाई म्या...यांच्या पोराला सुदरायला लगीन करून आणली म्हणायची....की, काय? हे आताच नाय बरका असं लई वारसा पासून असच चालत आलंय.. असच चालत राहणार हाय..जवर प्वार पोरी अडाणी राहणार मंग दुसरं काय व्हानार?

    लग्ना अगुदर लोक म्हणत..लई मोठं खटलं हाय म्हण... पोरीनं नशीब काढलं... मला बी नवं नवं बरं वाटलं व्हत.. पण जस जसा एकेक दिस घटत गेला..आणि सारच उघड पडलं... भरल्या घरात पोर दिल्याचं आई-बाला लई कैतिक वाटायचं..पण माझं काय?....

    सकाळीचा दिस कासरभर येई, तरी गडी हा माणूस हाथरुणात म्हणल्यावर... म्या बाई माणसं तरी काय करावं बरं... बैल वखरावर बांधायचं वैरण काडी करायची औत काठी जुपायची ....वावरत जाऊन काही कामधंदा क्याला तरच श्यातात पिकल नव्ह.....पर हा तर अजून गोधडीत उताणा पडलाय याचाच्यांन काय बी व्हानार नाय..... आता मलाच काय तरी कराय पाहे..

    आता गंगीनं कंबर कसली होती...म्हणाली..

    "काय बी व्होउ दे मलाच समद उरकाय पाहे.. नाय तर लॉक म्हणतील बाप्या तो तसला ...पण बाईबी तसलाच तिला बी अक्कल नाय? ...

    तांबडा फुटायची येळ झाली... खार (खार म्हणजे सकाळी पहाटे पहाटे उत्तरेकडून येणार थंडगार वारा) चांगलीच सुटली व्हती.. पण वावडी (वावडी म्हणजे तीन लाकडाचे पाय असलेली लाकडी फळी) लावून बाजरी उफणावी म्हणलं तर, टॉपलं भरून क्वानी द्यावं बरं..? आता म्या वावडीवर उभं राहू का!! टॉपल जाऊ? सांगा बरं... मंग उफणणार कोण? म्हून म्हणलं असला दादला नशिबात आल्यावर बाई माणसान संसार तरी कसा करावा बरं... बाई माणसाचा जलम लई वाईट..... अन आई म्हणते शहण्याचा संसार तर कोणी बी करीन...आता म्या काय बोलू.. लोकांचं हंस हुत दुसरं काय... . इकडं आड अन तिकडे हिर..... आई बाच्या इभ्रती पाई माही जिंदगीच पार वाटोळ झालं...पार व्हत्याच नव्हतं झालं पण ह्या माणसाला कवडीच लाज वाटणा ...

     कुणाला हाती धरून काही करावं म्हणलं तर, लोक काही बाही बोलत्यात...नको नको ते संशय घेतायत...दोन चार वरसात पोर बी लग्नाला ईल...डॉक पार भांबावून जात...अन मग मनात येत आपल्याच जीवच काही बरं वाईट करून घ्यावं... मंग पुन्हा मनात येतं..माझ्या मग पोरांचं कसं हुणार... देव तरी एखाद्याची एवढी परीक्षा का बगतो कुणास ठावूक...

     एक दिवस माझा बा सासरी आला होता.... घरात नवऱ्याचं पत्ता नव्हता... बानं त्याला कुठं मित्रांसोबत दारूच्या गुत्यात जाताना पाहिलं होतं...म्हणून बा रागात होता..

    अंगणातल्या वखरावर सासरे होते बैलांना वैरण घालत व्हते.. त्याच्या जवळ जात बा काहीसा ओरडलाच..

    "काय रे गंप्पा कुठाय तुझा तो दिवटा... अस म्हणया अन तेवढ्यात पलिकडून नवरा भेलकंडत येऊन अंगणात बा च्या पुढ्यात आदळला...आणि सासरे रागातच नवऱ्यावर भडकले..

     "ये सुकाळीच्या सकाळ धरण कुठं उलथला हुता? काय रं.. कुठं दिसभर उकिरडा फुंकत हुता... घरात एकटी बाई तिनं काय काय करायचं..!!

     इरजिक करायची म्हणतो अन कासरभर दिस आला तरीबी हाथरून उठत न्हाईस अन सांच्याला..कुठं जातूस ढोसाया.. थु तुझ्या जिंदगाणीवर..लोकांची पोर लगीन लावून घरी आणली.. म्हणलं लगीन केल्यावर तरी, सुदरलं पण कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच.

      मला गावात पडाळीवर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही भाड्याने... फसलो म्हणायच का काय? तुझा बाप म्हणून घायची लायकी नाही...माझी..मीच म्हणल तवा..

      'बापू तुमची पोर माह्या म्या पोराला दे, तुझी दुबळवाडी हैय.. पण तुझी पोर लई गुणांची चांगली सुगरण हैय.. म्हणून वाटलं ह्याच लगीन केल्यावर हे बेन सुदरल...अन तुझी अन माझी बी चिंता मिटल. पण झालं भलतंच.." 

      माझा बा आणि सासरे दोघबी एक जिवाच मित्र व्हते पण, माझं लगीन झालं आणि जिवाभावाचे मित्र एकमेकांना पाण्यात पाहू.. लागले... त्याला बी आता लई दिस झालं ...

     त्यानंतर बरेच दिस झालं बा सासरी आलाच न्हाई, अन म्या बी माहेरी गेले न्हाई.

     किती सपनं व्हती माही.. पण, सारी हवेत इरली .आता तर, भाऊबंधकीच्या वादात सासू-सासरेच बेघर झाले. माझे दोन्ही दिर जमिनीच्या वादात भांडत राहिले.. कोर्ट कचेऱ्या करून थकले..तिथं माझं काय? नवरा तर असून नसल्यासारखा.... आता इकडं सासू-सासरे अन तिकडे आई बा पण थकलेत... माहेरीही भावांचे जमिनीवरून वाद सुरु झालेत म्हण...

     घरोघरी मातीच्या चुली म्हणत्यात ते आता खरं वाटू लागलं व्हत..

    आता सासू-सासरे अन आई-बाच बी मलाच करावं करणार व्हत.. मला हे कळणा झालंय...ही माणसं मुलगा होण्यासाठी नवस सायास करत्यात, देव, देवलशी, पंचांग पाहून तप्पी होत्यात फकस्त मुलगाच व्हावा म्हणून जेवढं करत्यात.....तसं मुलगी हवी म्हणून कोणीच आई-बाप नवस उपवास-तपास का करीत नाहीत? एवढं करून मुलांचेच आई-बाप रस्त्यावर येतात..का बरं?... रोज बघावं तर, कुणाचे आई-बाप वृद्धीश्रमात नाही तर, हतबल होऊन जगाचा कायमचा निरोप घेत्यात..पण मुलं ..त्यांच्यासाठी काय करतात.. शेवटी बाई माणूस म्हणून मुलगीच कधी कधी सारं सावरताना दिसते.... हे कसं...तरी मुलगाच हवाच असतो... का ते मात्र माहित नाही.. कुणी म्हणत्यात वारस हवा.. पण... बऱ्याच वेळा वारसच सर्व वाट लावून मोकळा होतो.. हे कसं?

     आता बोलत बसण्यात काहीच हसील नव्हतं.. खळ्यात वावडी बी मीच लावणार..., मळलेल्या बाजरीच टॉपल बी मीच भरणार अन वावडीवर उभी राहून वारा वाहील तस्स मीच उफणणार है...... औतकाठी, नांगर, कुळव, पाभर, फराट मीच जोडणार.. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत... मोट नाडा आता माझं सोबती हायती.. देवाण चांगलं हात-पाय, डोळे दिलेत ना? आता भिकार बिनकामी नवऱ्याचं मानेवरच जू फेकून देणार आणि माझ्या मुलीला मी शिकविणार.. मोठी करणार हे हलकटासारखं जगणं लई झालं.. 

     आई-बाप अडाणी होते.. म्हणून आम्ही अडाणी राहिलो... आता शिक्षण नाही म्हणून हे सारं घडतंय हे माझ्या ध्यानात आलंय.. बाईने ठरवलं तर, काय अशक्य आहे.. सर्व जुन्या रूढी परंपरा संस्कार, संस्कृती काही चांगल्या आहेत पण ज्या चांगल्या नाहीत...ते उराशी पकडून काहीच उपयोग नाही.. त्यात पुरुषप्रधान संस्कृतीने शिरकाव करून स्त्रीला कायमची गुलाम आणि दाशी बनवलं होतं...स्रियांनी ते आजवर स्वीकारलही पण, आता नाही.. वाटेल ते झालं तरी मागे हटयचं नाही...

     लोक म्हणत्यात संसार असाच असतो... कधी अळणी तर, कधी खारट... आता अळणी आणि खारट मधला फरक मला कळला आहे.. आता मी मुक्त आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy