नवी सकाळ
नवी सकाळ


एका वेश्येची खोली. दहा बाय दहाची. भिंतींचा रंग उडालेला. रंगांचे पापुद्रे निघालेले. एक खिडकी त्यावर पट्टया पट्ट्यांचा पडदा. ती खिडकीपाशी उभी होती.
तिचं वय वर्षं असावं साधारण ३५-४०. तिने टाईट टी शर्ट, घातला होता आणि खाली जीन्सची पॅन्ट होती. एवढ्यात दरवाजा ढकलला जातो. एक काळा कुट्ट बलदंड माणूस, एका कोवळ्या तरूणीच्या बखोटीला धरून घेऊन येतो, आणि आत ढकलतो. ती मुलगी धडपडते. ती वेश्या तिला हात धरून आधार देते. ती तिला घट्ट धरून रडू लागते. तो माणूस दात विचकत हसतो. त्याच्या काळया चेहऱ्यावर ते पांढरे दात एखाद्या कसायाच्या सु-या सारखे चमकतात.
"ए सोनी आता ही तुझ्या ताब्यात आहे. तिला इथले सगळे रूल समजवून सांग. हाहाहा! अरे आमचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे"
असे म्हणून तो निघून जातो
"हं भडवा साला"
ती मुलगी रडतच असते.
"रड पोरी रड आता तुझ्या आयुष्यात तेच बाकी आहे"
"नाही ताई मी इथे राहणार नाही. मी पळून जाईन. नाहीतर जीव देईन"
"हं पहिला पर्याय तुला शक्य नाही. दुसऱ्या पर्यायाची शक्यता आहे. पण त्याने काय होणार आहे? तू गेलीस तर दुसरी कुणी येईल. हे कालचक्र आहे ते असंच फिरत राहणार. जगाच्या अंतापर्यंत"
हळूहळू त्या मुलीचा रडण्याचा आवाज मंद झाला
"ताई तू मला मदत कर ना! पळून जाण्यासाठी"
"अगं वेडे ते माझ्या हातात असतं, तर मीच नसते का पळून गेली? आणि तुला खरं सांगू इथून पळून गेलेल्या मुलीही परत इथेच येतात"
"पळून गेलेल्या मुलीही? का?"
"बाहेर लोकांना जेव्हा कळतं की त्या मुली इथून आलेल्या आहेत तेव्हा इतर लोकं त्यांना त्यांच्या बापाचा माल असल्या सारखच वागवतात. त्यांच्याकडे त्याच नजरेने बघतात. त्यांच्या घरची माणसं सुद्धा त्यांना घरात घेत नाहीत. अगं एका मुलीचा सख्खा भाऊ. ज्याला गेली कित्येक वर्ष ती राखी बांधायची, भाऊबीजेला ओवाळायची, तो भाऊ तिला म्हणाला 'ताई तू या घरात राहू नकोस. आमच्याकडे लोकं तिरस्काराने बघतात. पुढे माझं लग्न व्हायचं आहे. मला कोण आपली मुलगी देईल? तू इथून निघून जा"
ती म्हणाली
"अरे पण मी कुठे जाऊ"
"कुठेही जा जिथून आलीस तिथेच परत जा" काय वाटलं असेल त्या बहिणीला? ज्याला मी राखी बांधत होते तो माझं रक्षण करायचं सोडून मलाच तिथे परत जायला सांगतोय?"
हातावर गुद्दा मारत
"साला मला कधी भेटला ना तर चामडीच सोलून काढीन, त्याची तू रडून घे "
"ताई तू सुद्धा इथे आलीस तेव्हा रडलीच असशील ना?"
"हो मीही रडली. तुझ्या सारखच मलाही बखोटीला धरून अगदी याच खोलीत ढकलल होतं. तेव्हा माझ्या जागेवर एक अशीच मुलगी होती. मला कसलं तरी गुंगी चढली होती. काही समजत नव्हतं. त्या मुलीने मला आधार दिला. मी भानावर आले आणि या खिडकीतून खाली पाहिलं. तेव्हा खाली माझा बाप या लोकांकडून पैसे घेऊन खुशीत नोटा मोजत होता. ते जेव्हा मी पाहिलं तेव्हाच माझे अश्रू सुकले. मला आठवलं माझ्या बापाने मला कोल्ड्रींक प्यायला नेलं होतं. त्यात त्याने काहीतरी टाकलं असावं. पुढे मला काहीच माहीत नव्हतं. कुणीतरी माझ्या तोंडावर पाणी फेकलं तेव्हा मी डोळे उघडले. हाच काळा कभीन्न माणूस तेव्हा दात विचकून हसला होता. त्याच माणसाने मला या खोलीत ढकलली आणि तेव्हा पासून मी या गटारात खितपत पडले आहे"
"म्हणजे तुझ्या सख्ख्या वडीलांनी तुला..."
"हो माझ्या सख्या वडिलांनी मला विकलय"
"बाप रे असे किती पैसे दिले असतील या लोकांनी ज्याच्यासाठी एका वडीलांनी स्वतःच्या मुलीला विकलं? का त्यांनी असं केलं असाव? त्यांना काही अडचण होती का?"
"हं अडचण स्वतःचं दारूचं व्यसन एंजाॅय करण्यासाठी त्या भडव्याने मला विकले"
"ताई"
"हो मी माझ्या वडिलांना तेव्हा पासून भडवाच म्हणते. अरे काय फरक त्याच्यात आणि या काळ्यामध्ये दोघंही भडवेच ना?"
"ते जाऊदे! तू कशी आलीस इथे? तुझं नाव काय? आता त्या नावाचा काय उपयोग म्हणा. आता मुन्नी बाई तुझं बारस करणारच. म्हणजे तुझं धंद्यातील नाव बदलणारच"
"माझं नाव बदलणार?"
"पोरी आता तुझं नाव काय, तुझं लाईफच बदलणार"
"अरे देवा'
"हा! हा! हा! देवा, कुठं असतो हा तुझा देव? आणि जर तो असलाच तर आता तुझ्या मदतीला का नाही आला? अशा आपल्या सारख्या मुली फसवल्या जातात, तेव्हा तो काय क्वार्टर मारून झोपलेला असतो? तीन महिन्याच्या मुलीवर बलात्कार होतो, तेव्हा तो काय वरून बीपी बघत असतो? हं म्हणे देव. त्या कृष्णाने म्हणे द्रौपदीची अब्रू राखली. मग आता हे नराधम एवढे माजलेले असताना तो कुठे लपून बसलाय? म्हणे देव च्या मारी त्या देवाच्या'
"ताई नको असं बोलू"
"का तो कोपेल माझ्यावर? आणि आणखी काय वाईट करू शकतो तो? माझा जीव घेईल? मग बरं आहे ना. हे असलं जीण जगण्या पेक्षा जीव घेतलेला बरा"
"ताई देव असतो आणि मला खात्री आहे. तो येईल मला मदत करायला"
एवढ्यात खाली गडबड गोंधळ चालल्याचा आवाज येतो. दोघी खिडकीतून वाकून पहातात.
"अरे एवढ्या सकाळीच पोलिसांची गाडी? काय भानगड हाय"
"तो बघ त्या काळयाला कसला मारतायत आणि त्याला गाडीत टाकला. अरे ती बघ मुन्नी बाय त्या लेडी काॅन्सटेबल ने पार झिंज्याच उपटल्या आहेत तिच्या. तिला पण घेऊन चाललेत गाडीत"
इतक्यात दारावर टकटक होते.
राणी दरवाजा उघडते. एक रूबाबदार इन्स्पेक्टर आत येतो.
"तुम्ही खाली चला. आजपासून तुमची सुटका झाली असं समजा"
"पण साहेब आम्ही आता कुठं जाणार"
"तुम्ही काही काळजी करू नका. शासन तुमची रहायची खायची व्यवस्था करणार आहे. तुम्हाला ट्रेनींग देऊन तुम्हाला कामही देणार आहे.
"साहेब मी आजच इथे आली आहे.
"हो साहेब मला अजून हिचं नावही माहीत नाही. तिला तिच्या घरी पोहचवा"
"अच्छा ठिक आहे. तसं करू या. तुम्ही चला माझ्या सोबत"
"ताई मी म्हणाले ना माझा देव येईल मला सोडवायला बघ आला हाच माझा देव"
असं म्हणून ती इन्स्पेक्टरच्या पायावर डोकं ठेवायला जाते.
"अरे बेटा हे काय करतेस"
"सर तुम्हीच आमचे देव आहात"
"नाही बेटा आम्ही तर सामान्य माणसं आहोत. तो आम्हाला आदेश देतो आणि आम्ही त्याचं पालन करतो"
"खरंच ग बाई देव आहे. मी मघाशी खूप बोलले देवाला. तुझ्या देवाला सांग मला माफ कर"
"नक्की करणार ताई"
"चला आता वेळ घालवू नका. चला तुमचं सामान घ्या सोबत"
"नाही सर इथलं काहीच मला घ्यायचं नाही. मला पुन्हा नव्याने सुरूवात करायची आहे. माझ्या साठी ही सकाळ एक नवी सकाळ आहे. नवी सकाळ!'