STORYMIRROR

Deepak Kambli

Inspirational

3  

Deepak Kambli

Inspirational

इस्त्रीवाला

इस्त्रीवाला

2 mins
182

लिफ्ट मधून बाहेर पडलो आणि समोर इस्त्रीवाला दिसला.

त्याच्या हातात कपड्यांचं गाठोडं होतं.

"सर तुमचेच कपडे आहेत"

आली का पंचाईत आता घरी कुणी नव्हतं म्हणजे याच्या सोबत पुन्हा वर जाण आलं. विचार करेस्तोवर लिफ्ट वर गेली होती. म्हणजे लिफ्ट येइपर्यंत थांबणं आलंच. मी निरखून त्याच्या कडे पाहिलं‌ पावणे सहा फुटाचा दणकट पण करपटलेला देह. ढगाळ पॅन्ट वर चौकडीचा शर्ट. दाढीचे खुंट वाढलेले. केस फक्त सकाळीच विंचरत असावा. तसेही कुरळ्या केसांना विंचरायची आवश्यकता कमीच‌ असते. वादळ आलं तरी हलणार नाहीत असे दाट कुरळे केस.

"तुझं शिक्षण झालय का?"

"हो सर"

"किती शिकलायस?"

"सर बीए झालोय"

"काय?'

मी जवळ जवळ ओरडलोच

"हो सर "

"मग चांगलं काम का करत नाही"

"सर चांगल म्हणजे? हे वाईट आहे का? सर मेहनतीचे काम आहे"

"तेच म्हणतो"

मी जरा सावरून बोललो

"कुठे तरी शिक्षक किंवा एखाद्या ऑफिसमध्ये"

"म्हणजे नोकरीच ना?"

"अं...हो"

मी चाचरत

"आपल्याला नोकरी नाय जमणार सर"

तो अगदी ठाम

"का?"

"किती पगार असतो शिक्षकाला?"

"सुरवातीला २० एक हजार तरी असेल "

"तो हसला "

"काय झालं?"

तो माझ्याकडे केवीलवाण्या नजरेने पहात

"सर मी एका दिवसांत कमावतो ते"

"काय ? कसं काय?"

माझ्या स्वरात अविश्वास

"सर आपली अख्खी सोसायटी माझ्याकडे आहे, शिवाय

बाजूच्या हाॅस्पिटलचं कपड्यांचं काॅन्ट्रॅक्ट आहे."

बरं

"खरं सांगू का सर, तुमची चुकी नाही पण मराठी माणूस नोकरी या एका विचाराने मागे पडलाय, सर माझ्याकडे चार कामगार आहेत. आपण नोकरी करायची नाही नोकरी देण्याचा विचार करायला हवा खरंतर"

लिफ्ट आली आणि संवाद संपला. खरंतर लिफ्टने मला वाचवलं. नाही तर सहज काही काम नसताना मी माझी किंमत करून घेतली होती. काय गरज होती कपड्यांवरून एखाद्याची किंमत करायची? त्या दिवसापासून मी त्या इस्त्रीवाल्याला टाळतोच. तो माझ्याकडे बघून सहज हसत असेल कदाचित, पण मला ते खिजवल्या सारख वाटतं.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational