प्रेमाचा सुगंध
प्रेमाचा सुगंध
पक्याने ऑफिमधून येताना ब्लेझर इस्त्री करून आणला होता. उषानेही आपली ठेवणीतली साडी प्रेस करून आणली होती. निमित्त होते पिंट्या म्हणजे अजिंक्यचा तो दहावीत शाळेत पहिला आला म्हणून सत्कार करण्यात येणार होता आणि त्या सोबत पालकांचाही सत्कार होता.
उषाने गोडाचा शिरा करून देवापुढे ठेवला बाकीचा स्वयंपाक आईने म्हणजे सासुबाईंनी नेहमी प्रमाणे आधीच केला होता. जेवायला सगळे एकत्र जमले तेव्हा पिंट्या म्हणाला
"मला तुम्हाला काही सांगायचंय"
"अरे बोल बिंधास्त. उद्या तुझा सत्कार आहे त्या निमित्ताने आमचेही कौतुक होणार आहे बोल तू"
"मला त्याबद्दलच बोलायचं आहे पप्पा उद्या पालकांचा सत्कार आहे. आई वडिलांचा नाही"
"म्हणजे?"
पक्या आणि उषा एकत्रच म्हणाले.
"माफ करा पप्पा, मम्मी, माझे खरे पालक तर आजी आणि आजोबा आहेत. माझे बालपणापासूनचे संगोपन त्यांनीच केले आहे. दहावीच्या परीक्षेवेळी आजी माझ्या सोबत रात्री जागायची. मला काॅफी करून द्यायची. आजोबा सेंटर शोधण्यापासून माझ्या सोबत होते. माझ्या यशाचे खरे हक्कदार तर ते आहेत म्हणून उद्या माझ्या सोबत ते असायला हवे असे मला वाटते"
आजी,आजोबा, पक्या, उषा, सगळे थक्क झाले होते. कुणी काहीच बोलत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. शेवटी आजोबा म्हणाले.
"अरे वेड्या, ते दोघं नोकरी करतात ते तुझ्याचसाठी ना? म्हणून त्यांना वेळ देता येत नाही. खरा त्यांचाच हक्क आहे तू त्यांना घेऊन जा"
"हो बरोबर आहे"
आजी म्हणाली
"नाही पप्पा पिंट्या म्हणतो ते योग्यच आहे"
"हो पप्पा तेच योग्य आहे. आई तुम्ही आणि पप्पाच जाणार उद्या फायनल"
उषाने डिक्लीअर केलं
पिंट्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला
आजी आजोबांच्या डोळ्यात अश्रू होते.
"पप्पा पुढची पिढी नेहमीच हुशार असते" पक्या म्हणाला आणि सगळेच हसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पक्याने स्वतः ब्लेझर पप्पांना चढवला थोडासा सईल होता पण छान दीसत होता. उषाने आणलेला मोगऱ्याचा गजरा आईला माळला मोग-या बरोबर प्रेमाचा सुगंध सगळ्या घरात दरवळला.....
