जगणे केले आनंदगाणे
जगणे केले आनंदगाणे


मी नर्मदा,वय वर्षे ७०. वृद्धाश्रमात आहे ,पण खबरदार माझ्याबद्दल सहानूभूती व्यक्त केलीत तर. मस्त मजेत आहे मी. स्वत:ला इथे भरती करून घेतलं तेव्हा इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं. सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर बारा वाजलेले असायचे...... म्हटलं हे काही खरं नाही. व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्था चालकांची परवानगी घेऊन, पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला.
दु:ख कुणाला नसतं? पण त्याचा गाजावाजा कशाला करत बसायचं ? माझ्या आयुष्याचा प्रवासही अनेक धक्क्याचा आहे. लग्नाला पंधरा वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करुनही मूल बाळ होत नाही म्हणून पार संसाराची घडी विस्कटली. खूप सोसलं , खूप ऐकलं, मी आणि आमच्या "ह्यानी" सुद्धा.
"नर्मदा...... असं दु:खात कितीदिवस बसायचं? स्वतःचं मूल नशिबात नाही, ठीक आहे . आपण मूल दत्तक घेऊ"... असे आमचे हे म्हणाले.पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबानं दुसरी खेळी खेळली. आमचे 'हे' हार्ट अटॅकने आकस्मिक गेले. आणि दु:खाच्या लाटेत मी बुडून गेले. पण नंतर आयुष्यासमोर धडाडीनं उभी राहीले, बघु म्हटलं किती संकट' येतायत? रडणं आणि भोगणं सोडलं, जगणं सुरु केलं. एकट्याने आनंदी रहायला शिकले. फक्त पुस्तकं वाचून नाही तर जगण्यातल्या अनुभवातून. जेवणाचे डबे पूरवून आर्थिक बाजू सांभाळली.जमेल तसं, जमेल तेवढं गरजुंना, आजूबाजूच्यांना मदत केली. जगण्यानं प्रश्न दिले आणि त्याची उत्तरं शोधता शोधता काळ सरकत गेला.
काळ कुणासाठी थांबतो? शारिरीक क्षमता कमी झाल्यावर "वृद्धाश्रम" हीच आपल्या आयुष्याची संध्याकाळ, म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायेच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्यासाठी विनंती केली, पण मी म्हणाले माझे हात पाय धड आहेत तोवर माझ्या पायानं तिथल्या वाटेवर जाऊ दे. मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला द्यायचा नाही.
वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागले. मी स्वत: निराधार असून इतरांना आधार देते हा विचारच मला स्वतःचं दु:ख बाजूला ठेवायला सांगतो. एकदा इथली एकजण मला म्हणाली "तुमचं दु:ख वेगळ.... माझं दु:ख वेगळ,मला माझ्या सख्ख्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट दाखवली. आतडी तुटतात हो..... तुम्हाला नाही कळणार". मी दु:खी झाले,मनात म्हणाले "हो मला नाही कळणार... मला मूलंच नाही ना?"
तिचंही खरंच होतं. मुलगा असुनही असं... माणसाच्या जगण्याची काय गंमत असते नाही? सुखाच्या दिवसांच्या आठवणी होतात आणि ते सुख आता नसलं की त्या आठवणी दु:खद होतात.
कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं. सगळे नियम आपणच तयार करतो. माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेलं आणि आता उसंत मिळाली आणि ते....ते.... इथले ते विधूर सावंत आजोबा मला आवडायला लागलेत. खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली.... आज आमचं भेटायचं ठरलय. काल ते मला म्हणाले," उद्या आपण सकाळी दहा वाजता भेटायचं का? थोडं काम आहे."
मला माहित होतं, कसलं काम आहे, तरी मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले , हो का? बरं सुनिला बरोबर भेटते मी.
"सुनिला"?... तू एकटी भेटशील का? तूझ्याकडेच काम आहे..... मी तयार झाले. प्रेमाला कुठे वय असतं का? मनाची दारं, खिडक्या उघडल्या की बाहेरचं सौदर्य दिसतं. जीवनाचं एक रहस्य मला कळालं, कशातही गुंतून रहायचं नाही. हे विश्वची माझे घर म्हणत आनंदाने जगायचं.
चला,खूप बोलले. सावंताना भेटायला जाण्याआधी आवरायचंय. नविन साडी नेसणार आहे. आजच प्रपोज केला त्यांनी, तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना?