Rahul Shinde

Inspirational

4.3  

Rahul Shinde

Inspirational

प्रवाहाविरुद्ध

प्रवाहाविरुद्ध

18 mins
1.8K


हेमंत मुंबईत पोहचला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. रात्रभराच्या प्रवासामुळे त्याची हवी तशी झोप झाली नव्हती. मात्र तरीही त्याच्या मनात प्रचंड उत्सुकता होती, अनेक भावनांची खळबळ चालली होती.त्याला कारणच तसे होते.हेमंतला पहिल्यांदा टेलिव्हिजन मालिकेमध्ये एका भागासाठी छोटीशी भूमिका मिळाली होती आणि त्या चित्रीकरणासाठीच तो मुंबईला आला होता. अभिनय क्षेत्रात काम मिळावे म्हणून गेले काही वर्षे तो धडपडत होता. त्याच्या गावापासून चार तासांवर असणाऱ्या मुंबईमध्ये यापुर्वीही तो काहीवेळा 'ऑडिशनसाठी' आला होता, पण या शहरात त्याच्या ओळखीचं कोणी नसल्यामुळे आधी कधी त्याने मुक्काम केला नव्हता. आता मात्र दोन दिवसांचं सलग चित्रीकरण असल्यामुळे त्याला इथं राहणं भाग होतं . त्याच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्याला सकाळी आठचा 'कॉल टाईम'असल्याने त्याने रात्रीच प्रवासाला सुरवात केली आणि पहाटे मुंबईत पोहचला.

तो बसमधून दादरला उतरला,तिथून चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अजून एक लोकल ट्रेन आणि बस असा प्रवास होता. लोकलच्या दिशेने रस्त्याने चालताना त्याला वाटेत काही कचरा कुंड्या लागल्या. त्यातून ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्याला अचानक ओकारी आल्यासारखे वाटले. तसाच वेगाने पावलं टाकत,नाकावर हात धरून तो स्टेशनजवळ आला. थोड्या वेळाने त्याने हवी असणारी लोकल पकडली. उजाडायचे होते तरी लोकलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. 'या क्षेत्रातले दिसणारे ग्लॅमरचे स्वप्न आणि तिथपर्यंत जाण्यासाठी हे वाटेतलं सत्य यात कितीतरी अंतर आहे' मनात आलेला हा विचार त्याने बाजूला केला.

दिवसभराचं चित्रीकरण जवळपास बारा-तेरा तास चाललं आणि हेमंतला दुसऱ्या दिवशीची हजर राहण्याची वेळ(कॉल टाईम) सकाळी सातची दिली गेली. दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाचं ठिकाणही चालू दिवसाच्या चित्रीकरणापासून बऱ्यापैकी लांब,साधारण पंधरा किलोमीटरवर होते. आज चित्रीकरणादरम्यान ओळखीच्या झालेल्या दोन सहकलाकारांनी त्याला त्यांच्या घरी राहायला येण्याबद्दल आमंत्रण दिले,पण त्या दोघांचंही घर लांब,ट्रॅफिकमधून जायला दोन-तीन तास लागतील एवढ्या अंतरावर होतं. शिवाय त्या दोघांचेही दुसऱ्या दिवशी 'नाईट सीन्स' असल्यामुळे त्यांचा कॉल टाईम उशिरा होता. 'आपला सकाळचा लवकर कॉल टाईम आहे, त्यांच्यापैकी कोणाकडे गेलो तर जाण्यायेण्यातच उरलेला अर्धा वेळ जाईल,उगाच जास्तच दगदग होईल' या विचारानं हेमंतनं कोणाच्या घरी जाण्याऐवजी 'आज रात्री दुसऱ्या दिवसाच्या शूटिंगजवळच्या भागात लॉज किंवा हॉटेलवर राहू' असा निर्णय घेतला. 

चालू दिवसाच्या चित्रीकरणाच्या जागेपासून जवळच्याच बसस्टॉप पर्यंत चालत जाताना त्याचं शरीर त्याचं लक्ष वेधू लागलं. कंबर,पाय दुखू लागले होते.शरीराला आज अती काम दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. तीनशे मीटर चालत जातानाही आपण खूप चालत आहोत,असं त्याला वाटू लागलं. रस्त्यावरून चालत जाताना घामानं भिजलेलं शरीर,रात्रीच्या वेळीही गाड्यांचा येणारा प्रचंड आवाज,क्वचितच दिसणारं झाड आणि देहाला साधा वाऱ्याचा स्पर्शही होत नाही,या सगळ्यामुळे त्याच्या मनात चीड आली.माणसांची चीड. एकंदरीत संपूर्ण परिस्थितीची चीड. त्याचं आजचं चित्रीकरण बऱ्यापैकी मनासारखं पार पडलं होतं,पण 'रीळ' मधून 'रिअल लाईफ' मधलं वास्तव त्याला नकोसं वाटू लागलं.

बस आणि लोकलचा प्रवास करून तो दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाच्या स्थळाजवळच्या भागात आला,तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. त्याला आता राहण्यासाठी जागा शोधायची होती,पण पोटातली भूक त्याला छळू लागली.'आधी जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये खाऊन घेऊ आणि मग बऱ्यापैकी स्वस्तातल्या लॉजचा शोध घेऊ' असा विचार करून तो हॉटेलमध्ये गेला. 

हॉटेलमध्ये गेल्यावर आधी हेमंतने त्याचा घामाने भिजलेला चेहरा वॉशबेसिनमध्ये धुवून घेतला आणि मग 'राईस प्लेट'ची ऑर्डर देऊन अन्नाचे घास पोटात ढकलले.जेवण झाल्यावर त्याने हॉटेलच्या मालकाला 'जवळ कुठे लॉज किंवा राहण्यासाठी हॉटेल आहे?' असं विचारून माहिती मिळवली. तिथून परत एका लॉजपर्यंत जाताना त्याला चालणे नकोसे वाटत होते. लॉजवर जाऊन तिथल्या मालकाला त्यानं आजच्या एका रात्रीपुरतं राहण्याबद्दल विचारलं,तर त्या मालकानं त्याला 'सिंगलबेड' असणाऱ्या रूमचं भाडं दोन हजार रुपये सांगितलं. 

'क्या? सिर्फ एक रात का दो हजार?'त्याला आश्चर्य वाटलं. पुढे तो म्हणाला,'ठीक से बोलो,मुझे सिर्फ पांच-छे घंटे सोना है| सुबह जल्दी जाना है. "

"देखो,एक तो आज दो ही रूम बचे है.मैं उसमे कुछ कम नही करुंगा।लेना है तो लो, नही तो इस शहर में आबादी की कोई कमी नही है।कोई ना कोई ले लेगा।" लॉज मालक वैतागून म्हणाला. हे ऐकून हेमंतला राग आला,तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला. त्याने घड्याळात बघितले तर रात्रीचे बारा वाजत आले होते. अजून पायपीट करून नवीन राहण्याची जागा शोधण्याचे बळ त्याच्यात राहिले नव्हते.

'चार-पाच तासासाठी लॉजवर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जवळच असणाऱ्या बस स्टॉप वर झोपू' त्याच्या मनात विचार आला. मुख्य प्रश्न होता, सकाळच्या प्रातर्विधीचा .त्यासाठी जवळच पन्नास रुपये देऊन आंघोळ करण्याची आणि शौचालयाची सोय आहे,हे त्याला विचारपूस करताना एकाकडून कळाले,त्यामुळे तोही प्रश्न सुटला. 

तो बस स्टॉपवर गेला. सोबतची सामानाची बॅग बाजूला ठेऊन खाली बाकडावर बसला. दिवसभर आपण शरीराला अती परिश्रम दिले,याची त्याला पुन्हा एकदा जाणीव झाली.त्याने सोबतची बॅग उशाला घेतली आणि तो बाकडावर आडवा झाला.मात्र इतकं थकूनही अनोळखी जागा असल्यामुळे त्याचा डोळ्याला डोळा लागेना. त्याला इथल्या अती प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येची चीड आली. 'इस शहर में आबादी की कोई कमी नही' त्याला लॉज मालकाने मघाशी बोललेले हे शब्द आठवले. 'तब्बल करोडो लोकांची वस्ती असलेल्या या महानगरात माणसांची मशीनं झाली आहेत. इतक्या गर्दीतही कितीतरी जण एकटेच असतील.काय उपयोग असल्या गर्दीचा?'त्याच्या मनात हा विचार आला आणि अचानक त्याला त्याच्या गावातल्या कॉलेजच्या दिवसांत सामान्य ज्ञानाच्या विविध विषयावर बोलणाऱ्या दवे सरांच्या एका व्याख्यानाची चर्चा आठवू लागली. 

**************


ब्रह्मचर्य स्वीकारलेल्या दवे सरांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम हाती घेतलेले.प्रत्येक विद्यार्थी आचारांनी,विचारांनी समृद्ध असला पाहिजे म्हणून ते नेहमीच आग्रही असायचे. दवे सर त्यांच्या तासाला 'लोकसंख्या'या विषयावर चर्चा करू असं म्हणाले तेव्हा 'आपल्या देशाची किंवा जगाचीही लोकसंख्या वाढते आहे' याशिवाय या विषयावर चर्चा करण्यासारखे काय आहे असं विध्यार्थ्यांना क्षणभर वाटलेही,पण दवे सर आहेत म्हटल्यावर ही चर्चा रंगणार याची विद्यार्थ्यांना खात्री होती. 

"अठराशेच्या काळापर्यंत आपल्या देशाची किंबहुना संपूर्ण जगाचीच लोकसंख्या खूप कमी होती,पण त्यानंतर म्हणजे 'औद्योगिक क्रांतीनंतर' लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. खासकरून आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे,याला अनेक कारणं आहेत. पूर्वीच्या काळात तर अनेक अंधश्रद्धा होत्या. देवदयेमुळे मुलं होतात तर होतील तेवढी होऊ देत, या विचारामुळे एका जोडप्याला पाच-सात मुलं होत असत. आधी विज्ञान फार प्रगत नसल्यामुळे यापैकी दोन-तीन मुलंच जिवंत राहत,मात्र नंतर विज्ञान प्रगत झाल्यामुळे बहुतांश जन्माला घातलेली सर्वच बालकं जिवंत राहू लागली आणि म्हणून अठराशेच्या काळानंतर लोकसंख्या वाढीला झपाट्याने सुरुवात झाली. गेल्या काही दशकांत अनेक जोडपी दोन-तीन अपत्यांनाच जन्म देत आहेत,परंतु आधीच एकंदरीत लोकसंख्या वाढल्यामुळे दोन-तीन अपत्यांचा जन्म होऊनही ती वाढतच राहिली." दवे सरांनी पार्श्वभूमी सांगितली आणि पुढे म्हणाले" लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर तुमच्या आणि यापुढच्या पिढयांना अनेक समस्या उद्वभवणार आहेत याची तुम्हाला जाणीव असेलच,पण आजच्या घडीला अनेकजण आपली जीवनयात्रा संपवतात,त्यालाही काही वेळेस ही लोकसंख्या कारणीभूत असते."दवे सरांच्या या विधानावर मात्र विद्यार्थी अवाक झाले. 'लोकसंख्येचा आत्महत्येशी कसा संबंध' विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच्या ह्या साहजिक प्रश्नाची नोंद घेऊन सर म्हणाले," "आज तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी खंबीर बनावं,जिद्दीनं अभ्यास केला की यश निश्चित असे उपाय सांगितले जातात. हे खरंच आहे, पण आत्महत्या  होण्यामागचं कारण पाहिलं तर बऱ्याचदा 'वाढत्या लोकसंख्येमुळं प्रचंड स्पर्धा निर्माण होत आहे आणि अनेकांची पात्रता असूनही संधी मात्र मर्यादित असल्यामुळे त्यांना न मिळालेले यश त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करत आहे आणि त्यातून आत्महत्या वाढत आहेत.'असं आहे. यात कॉलेज तरुण तर आहेतच,शिवाय चांगले गुण मिळवूनही बेरोजगार असलेले,प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षा देऊनही यश न मिळालेले आहेत. "

**************

सरांचं हे बोलणं आठवून हेमंतला त्याचा मित्र विशांत डोळ्यासमोर आला. विशांतलाही अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये कारकीर्द करायची होती.त्याला यात आवड होती,पण त्याहीपेक्षा यातलं 'ग्लॅमर' त्याला खुणावत होतं. विशांतच्या घरच्या मंडळींचा त्याला फारसा पाठिंबा नव्हता, तरीही तो घर सोडून याच महानगरात काही पैसे घेऊन आला. इकडे आल्यावर त्याने जगण्याची शैली बदलली. बाह्य सौंदर्यात 'ब्रँडेडपणा' आणला. काही वर्षं प्रयत्न करूनही विशांतला हवं तसं यश मिळत नव्हतं,आणि अपयशी चेहऱ्यानं घरी परत जायचंही धाडस होत नव्हतं. तेव्हा त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. 

'दवे सर म्हणाले ते किती खरं ठरलं विशांतच्या बाबतीत..'हेमंतच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याला आठवलं ,'आपण ज्या खाजगी कलासमध्ये प्रशिक्षण घेतलं,तिथे कितीतरीजण परिस्थिती नसतानाही केवळ या क्षेत्रातल्या प्रसिद्धीसाठी भरमसाट फी भरून आले होते..त्यांचीही चूकच,पण ‘आमचा क्लास केला म्हणजे तुम्ही यशस्वी झालातच’ अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून दिशाभूल करणाऱ्यांचीही चूक. आपल्या कित्येक मित्रांनी यात पैसा,वेळ वाया घालवला.आर्थिक परिस्थिती नसताना केवळ भूलथापांना बळी पडून, स्वतःची खरी आवड,क्षमता न ओळखून वर्षानुवर्षे वाया घालवलेले कितीजण असतील असे?' 

अचानक बाकडावर पडलेल्या हेमंतच्या उघड्या हातावर डासाने जोरात चावा घेतला आणि तो विचारचक्रातून बाहेर आला. त्याला पुन्हा चीड आली. फार जमत नसतानाही महत्वाकांक्षेपायी नको तिकडे धाव धाव धावून स्वतःचं आयुष्य उध्वस्त केलेल्या मित्रांची चीड. मार्केटिंग करून दिशाभूल करणाऱ्या खाजगी संस्थांची चीड. त्याने उठून बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि दोन घोट घशात उतरवले. त्याने बाजूला पाहिले.मोठ्या बाकडावर दोघेजण येऊन झोपले होते. अगदी रात्री उशिरापर्यंत दमटपणामुळे घाम येत असलेल्या त्याला रात्र पुढे सरेल तशी थंडी जाणवू लागली. बॅगेतून आणलेली छोटी शाल काढून अंगावर घेऊन तो पुन्हा आडवा झाला. काही वेळात तो निद्रेच्या अधीन गेला,तेव्हा त्याला स्वप्न दिसू लागले.,'तो प्लॅटफॉर्मवर उभा आहे. लोकल आल्यावर तो त्यात चढू लागतो.धक्काबुक्की चालू असताना त्याला माणसं मुंग्यांच्या रांगांसारखी झालेली दिसतात. थोड्या वेळात त्याला त्याचा लोकलचा डबा भरून वाहतोय असा दिसतो . इतक्यात डब्यातील वीज जाते आणि सगळे पंखे बंद होतात. तो प्रचंड घाबरतो. गर्दीच्या मध्यभागी असलेल्या त्याला, वारा येत नसल्यामुळे श्वास घेताना खूप अडचण व्हायला लागते. तो ओरडू लागतो, गुदमरून मरून जाऊ असं त्याला वाटू लागतं. पण सगळेजण आपापल्या नादात आहेत. कोणी काही करू शकत नाही.मला श्वास घेऊ द्या असं तो ओरडतोय, पण त्याचा आवाजच बाहेर निघत नाही.' 

'मला श्वास घेऊ द्या' अस्वस्थ होऊन असं म्हणतच तो स्वप्नातून दचकून उठला. चेहऱ्यावर घाम आल्याचं जाणवून त्यानं तो पुसला. वेळ पाहिली.पहाटेचे तीन वाजले होते. .त्याच्या पायाच्या मांड्या दुखू लागल्या होत्या. त्याला जाणीव झाली,'इतकं थकूनही ना अजून आपल्याला नीट झोप लागली,ना त्यामुळे शरीराला नीट विश्रांती मिळाली. आता आपल्याकडे जेमतेम दोन-अडीच तास विश्रांतीसाठी वेळ आहे.'त्याने पुन्हा डोळे मिटले. त्याला थोडीशी झोप लागते तोच बाकडावर झोपलेला मध्यमवयाचा पुरुष हेमंतच्या शेजारी येऊन बसला आणि त्याचे डोळे झाकलेले पाहून त्याच्या उघड्या अंगावर स्पर्श करू लागला. अर्धवट निद्रेत असलेल्या हेमंतला जाग आली आणि 'हे काय करताय' असं आश्चर्यानं त्या पुरुषाला विचारेपर्यंत तो पुरुष पळून गेला. हेमंत परत डोकं बॅगवर ठेऊन आडवा झाला आणि आताच्या माणसाच्या वागण्याचा संदर्भ लावत असताना त्याला डोळ्यासमोर पुन्हा दवे सरांची चर्चा दिसू लागली.

**************


"माझ्या अभ्यासावरून तुम्हाला सांगतो,साधारण तीन-चार टक्के लोकांचा लैंगिक कल नसतोच,म्हणजे त्यांचं कोणाकडेही शारीरिक किंवा मानसिक आकर्षण नसते. काहींना समान लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षण असते,म्हणजे पुरुषाला पुरुषाकडे आणि स्त्रीला स्त्रीकडे,तर काहींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षण असते.असे वेगळे लैंगिक कल अस्तित्वात असूनही आपल्याकडे कोणी त्यावर खुलेपणाने बोलत नाही."दवे सर लैंगिक कलाबद्दल माहिती देत असताना सर्व विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते. 

"सर,मग त्यांनी काय करायचे?अविवाहितच राहायचे का?" एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर सरांनी अर्थपूर्ण स्मितहास्य केले. 

"गंमत म्हणजे या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीच्या कुटुंबाला,समाजाला किंबहुना त्याला स्वतःलाही नीटसे माहीत नसते,आणि बऱ्याचदा निर्णय घेण्याची क्षमता नसतानाच त्याचे लग्न लावले जाते." दवे सर म्हणाले.  

"मग त्यांना मुलं होऊ शकतात?" उत्सुकतेपोटी एका विद्यार्थ्याच्या तोंडातून हा प्रश्न निघाल्यावर वर्गात सगळे हसू लागले. 

"होऊ शकतात... कारण मुलं होणं जणू आपल्याकडे सामाजिक जबाबदारीच असते, त्यामुळे ईच्छा नसताना,मनाविरुद्ध जोडीदारासोबत संबंध प्रस्थापित केला जातो. असा वेगळा लैंगिक कल असणाऱ्या कित्येकांना भिन्नलिंगी व्यक्तीसोबत विवाहबंधनात अडकायचे नसते,पण कौटुंबिक आणि सामाजिक दबाव त्यांना बंधनात अडकवतो. परत दुसरं कारण म्हणजे मानवी स्वभाव. एकटं राहण्याची,सामाजिक रीत मोडण्याची भीती. 

माझं तर ठाम मत आहे, अशा लोकांनी 'आपल्याला खरंच विवाहबंधनात काही अंशी तरी रस आहे का?' याचा आणि आपल्या परिस्थितीचा विचार करून मगच निर्णय घ्यायला हवा. समाजानेही वेगळा लैंगिक कल असणाऱ्यांचा,लग्नात रस नसणाऱ्यांचा, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा स्वीकार करायला हवा. मुळात आपल्याकडे अविवाहित व्यक्तीच्या जगण्याला काही अर्थ नाही, असे मानले जाते. इथेच ज्याने त्याने सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन विचार करायला हवा. उलट मला तर वाटते, जो पूर्ण विचारांती अविवाहित राहण्याचा निर्णय घेतो, तो लोकसंख्येत स्थिरता आणतो. मला जाणीव आहे,मी बोलतोय ते थोडंसं टोकाचं आहे आणि तितकं सोपं नाही, पण शक्य नक्कीच आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती एकटं न राहता 'कम्युनिटी लिविंग' म्हणजे समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन राहण्याचा पर्याय निवडू शकतात.. "

"पण सर, असा निर्णय कोणी घ्यायचा ठरवला तर त्यामुळे त्याच्या जवळची माणसं दुखी होतील?" सरांना विद्यार्थ्याकडून प्रश्न आला.

"आपल्या निर्णयासोबत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची,समजावून सांगण्याचीच भूमिका असावी,परंतु त्याने जर उद्दिष्ट साध्य होत नसेल तर कदाचित जवळच्या माणसांच्या दुखावल्या जाण्याला पर्याय नाही. समाजात बदल घडवण्यासाठी असा विरोध,संघर्ष करावा लागतो."

"घराण्याची पिढी पुढे चालू राहिली पाहिजे,असं मानलं जात. त्या व्यक्तीच्या निर्णयाने जर त्याची पिढी पुढे चालू राहिली नाही, तर ते पाप ठरेल का?"

"तुम्हाला सांगू, कितीतरी पाप-पुण्याच्या व्याख्या मनुष्याने चुकीच्या बनवल्या आहेत. ज्या व्यक्तीला खरंच लग्नात किंवा मुलं होऊ देण्यात रस नसतो, तो पिढी न वाढवून कुणाला काय इजा पोहचवतो?मुलं नसणारे म्हणजे 'अपात्र' असं काही नाही.पुरुष असणं म्हणजे असं, स्त्री असणं म्हणजे तसं अशा अलिखित सामाजिक नियमांनी आणि भंपक कल्पनांनीही अपेक्षेपेक्षाजास्त अपत्यं जन्माला घालायला भाग पाडलं. मुळात हा लिंगभेदच चुकीचा आहे.'मुलांना घडवून मिळणारा सृजनात्मक आनंद, त्यांना सजग बनवणं' आदर्शदृष्ट्या या कारणांसाठी अपत्याला जन्म द्यायला हवा, पण वास्तवात या कारणांशिवाय कितीतरीजणांना वेगवेगळ्या कारणांसाठी मूल हवे असते.लोकांना विशिष्ट वयानंतर आपल्या हक्काचं माणूस स्वतःच्या 'ईमर्जनसी' ला हवं असतं. अपघात, अनिश्चितता अशा प्रसंगी आपल्या मदतीला आपलं अपत्य हवं अशी भावना असते. 'म्हातारपणाची काठी' म्हणून मूल हवं अशी भावना कित्येकांच्या मनात असतेच. स्वतःचा सामाजिक स्वीकार,असुरक्षितता या कारणांसाठीही बऱ्याचदा नको असतानाही मूल जन्माला घातले जाते. अजून एक सांगतो, नीट ऐका, माणसाला आपलं अस्तित्व कायमसाठी संपणं मान्य नसतं, म्हणून तो आपला अंश म्हणजे आपलं अपत्य,असं समजतो. एक गूढ गमतीची गोष्ट म्हणजे जोडप्यांना मुलं होण्याच्या काळात जेव्हा त्या जोडप्यांपैकी कोणाची आई अथवा वडील निर्वततात, तेव्हा त्यांचा पुनर्जन्म आपल्या पोटी व्हावा म्हणून दोन मुलं असली तरी तिसरं मूल जन्माला घातलं जातं. लोकसंख्या वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे ,विशेषतः आपल्याकडं बहुतांश जोडप्यांना एक तरी वंशाचा दिवा,मुलगा हवाच असतो, अगदी सुशिक्षित लोकांनासुद्धा. मग सुरुवातीला मुली झाल्या तर मुलगा होईपर्यंत अपत्यांना जन्म दिला जातो. " दवे सरांनी समजावून सांगितले.

**************

हेमंत भानावर आला. दवे सरांच्या तेव्हाच्या बोलण्यातलं मर्म त्याला आता उमजत होतं . त्याने वेळ बघितली तेव्हा त्याला जाणवले, आता उठून तयारीला लागलं पाहिजे. उठताना त्याला आपल्या शरीरात जास्तच अशक्तपणा आल्याचे जाणवले. 'शूटिंग आणि मालिकेत काम मिळाल्याबद्दलचा काल आणि आधी असणारा उत्साह अनेक कारणांमुळे आज आपल्यात उरला नाही' हे त्याच्या लक्षात आले. चित्रीकरणाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी त्याने आवरायला सुरुवात केली. 


त्याचे चित्रीकरण अपेक्षेपेक्षा थोडे लवकर संध्याकाळीच संपले.बाहेर पडताना त्याच्या मनात पुन्हा विचार आला,'आपण या प्रक्रियेत जेवढं 'ग्लॅमरचं' स्वप्न बघतो, प्रत्यक्षात त्याच्या उलट आहे. आज दिवसभर आपल्या मनात उत्कंठा नव्हती,गेल्या दोन रात्री झोप न झाल्यामुळे नुसता आळस आणि अशक्तपणा वाटत होता.'स्टेशनकडे जाण्यासाठी त्याने पकडलेली बस रस्त्यावरील भयानक गर्दीमुळे चालणाऱ्या माणसांच्या गतीनं चालली होती. बसमध्ये त्याला बाहेर भरमसाट वाहनं बघून पुन्हा वर्गातली चर्चा आठवू लागली.

**************


"सर,आपण फक्त 'लोकसंख्येबद्दल' बोलतो आहोत, पण त्याच बरोबर वाहनांची संख्याही कमी व्हायला हवी,कारण त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे अनेक आजार पसरत आहेत. "एका विद्यार्थिनीच्या बोलण्यावर दवे सर म्हणाले," तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे. वाहनांच्या वापरावर मर्यादा यायलाच हव्यात. सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर होण्यासारखी स्थिती निर्माण व्हायला हवी...पण नीट विचार केला तर याचाही थेट वाढत्या लोकसंख्येशी संबंध आहे. जितकी माणसं जास्त,तितकी वाहनं जास्त. वाढत्या व्यवस्थेचा ताण हा एकंदरीतच पूर्ण व्यवस्थेवर आहे, वैयक्तिक मुक्त भटकंतीशी आहे.नैसर्गिक साधनांच्या वापरावर मर्यादा येत आहेत. इमारती,मॉल यांच्या मागण्यांमुळे तर झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे.व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले की त्यात जबाबदारी असते. तीच जबाबदारी आता प्रत्येकाने उचलून एकच अपत्य जन्माला घालण्याचा निर्धार करायला हवा. एकच मूल एकलकोंडे राहू नये म्हणून शाळेत,समाजात इतर मित्र-मैत्रिणींसोबत वावरण्याचा पर्याय असेल. अजूनही थोडा मोठा विचार केला तर मूल दत्तक घेण्याचाही पर्याय आहे. यासाठीही परत कुटुंब आणि समाजाशी संघर्ष करावा लागू शकतो . याचसोबत जे अशिक्षित किंवा रस्त्यावर राहणारे लोक कुठलाही विचार न करता मुलं जन्माला घालतात आणि जन्म झाल्यावर नंतर त्याला वाऱ्यावर सोडून देऊन बेवारस करतात, मुळात ते होऊच नये यासाठी प्रयत्न व्हायला हवा. "

"सर,आज अनेक धर्मगुरू त्या त्या धर्मामध्ये जास्त मुलांना जन्म देण्याचा प्रसार करतात,त्यांचं काय?"

"ते पूर्ण अयोग्य आहे. त्या त्या धर्मातील लोकांची संख्या वाढावी म्हणून लोकांनी जास्त अपत्यांना जन्म द्यावा,ही समजूत पसरवली जात आहे, ती पूर्ण चुकीची आहे. पुढची पिढी म्हणून तुम्हाला मी सांगतो,तुम्ही याला भुलू नका. सर्व धर्म एकच मानून, प्रत्येक धर्मातील ज्यानं त्यानं अशा प्रसाराला जुमानु नये. उगाच गर्दी वाढवून आजारपणात, दुखात जगण्यापेक्षा कमी संख्येने गुण्यागोविंदाने,आनंदाने,समाधानाने जगणे महत्वाचे नाही का? ही वाढ अशीच होत राहिली तर माणसंच माणसाच्या जीवावर उठतील."सर स्पष्टपणे म्हणाले.

**************


हेमंत अजूनही स्टेशनला पोचला नव्हता. बसमधून रस्त्यामधल्या गर्दीकडे बघत असताना त्याला सरांचे महत्वाचे शब्द आठवले,"नक्की किती कमवायचं हे तुम्हीच ठरवायचं, कारण चंगळवादानेही आपलं भरपूर नुकसान केलं आहे. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तिथला फक्त पैसा आणि प्रसिद्धी बघू नका,तर त्यातून कुणाच्यातरी जीवनात आदर्श निर्माण करायची आस बाळगा.शहरांसारख्या ठिकाणी महत्वाकांक्षेपायी जाणाऱ्यांची संख्या भयानक वाढतच आहे. तुम्ही भविष्यात असं काही करताना जरूर विचार करून निर्णय घ्या. महत्वकांक्षा जरूर असावी, पण कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी हेतू अतीप्रामाणिक हवा,तरच तिकडं जाऊन लोकसंख्येत भरती करा स्वतःची, हेच मी स्पष्टपणे सांगेन. "

दचकून तो भानावर आला. 'सरांचं सगळं म्हणणं योग्य ,त्याची झळ आपण दोन दिवस अनुभवली.तरीही आज आपल्याला एकाने शूटिंगदरम्यान इकडे येऊन स्ट्रगल करण्यासाठी सुचवलं आणि आपणही तेच करणार आहोत. आपल्याला याची आवड आहे,पण त्याहीपेक्षा प्रसिद्द्धीची , मोठं होण्याची जास्त हाव आहे.. म्हणून कालपासून होणारा त्रास, अनुभव, झळ सगळं सोयीस्कररीत्या विसरून आपण काही दिवसात इकडेच येऊन राहणार आहोत. स्ट्रगल करणार आहोत. " त्याला स्वतःच्या या निर्णयाचं, स्वार्थीपणाचं आश्चर्य वाटलं.

        ******************************************

"तुला टीव्हीवर बघताना काय भारी वाटलं ! एक नंबर झालं तुझं काम."हेमंतचा चित्रित

झालेला भाग बघितल्यानंतर काही दिवसांनी हॉटेलमध्ये कॉफी घेताना त्याच्या मित्राने,विनयने दाद दिल्यावर शांतपणे हेमंतने 'थँक यू' म्हणून स्वीकार केला.

"आता लवकर जा मुंबईला..स्ट्रगल कर..म्हणजे रुळावर येईल तुझी गाडी."आपल्या या बोलण्यावर हेमंतच्या चेहऱ्यावर फक्त निर्विकार स्मितहास्य बघून विनयने त्याला विचारलं,"असं काय हसतोयस नुसता? बोल काहीतरी.तुला स्वतःला नाही आनंद झाला का स्वतःचं टीव्हीवरचं काम बघून? "

"झाला रे मलाही आनंद ऑफकोर्स...पण मी वेगळाच विचार करतोय गेले काही दिवस झाले...आपण धावतोय नुसतं.धावताना निसर्गावर घाला घालत आहोत आपण."

"हे तूझे कुठले नाटकातले पाठ केलेले डायलॉगज ऐकावतोयस का?"हेमंतचं बोलणं असंबद्ध वाटून विनयने त्याला विचारले.

"नाही रे, हे मी स्वतःचे अनुभवाचे बोल सांगतोय मित्रा. मुंबईला गेलो तेव्हा दोन दिवसात खूप काही अनुभव घेतला.खूप सहन केलं.दमट वातावरण, कामाचे अतिरिक्त तास,तिथलं भयंकर प्रदूषण,नुसता गाड्यांचा गोंगाट,पुरेशी झोप नाही, उत्साह मावळलेला, अती लोकसंख्येमुळे लोकलमधील धक्काबुक्की."

"अरे यालाच तर स्ट्रगल म्हणतात ना.."विनय समजावत म्हणाला.

"मला नाही वाटत असं.किमान माझ्याबाबतीत तरी.प्रेस्टिज किंवा सो कॉल्ड ग्लॅमर कमावण्यासाठी शरीराविरुद्ध बंड पुकारून जगणं याला स्ट्रगल कसं म्हणायचं?हे मला तरी स्वतःला ते अनैसर्गिक जगणं वाटतं, जे मला नाही जगायचं."

"असं काय विचित्र बोलतो आहेस? नक्की काय ठरवलं आहेस मग?" विनयनं विचारलं.

"खूप जणांनी सुचवलं, कर तिकडे जाऊन स्ट्रगल आणि मीही त्याच निर्णयापर्यंत आलो होतो.पैसा, प्रसिद्धी यापासून कोणाची हाव सुटते?पण मग गेल्या काही दिवसांत खूप विचार केला...माझ्या शरीर-मनाची ओळख फक्त मला आहे..म्हणून मी निर्णय घेतला आहे, मला नाही तिकडे जाऊन राहायचं.अपेक्षेप्रमाणे संधी नाही मिळाली तरी चालेल.मी योग्य नाही तिथल्या वातावरणाला":हेमंतचे आतले विचार बाहेर येत होते.

"याला पळपुटेपणा म्हणतात..."हेमंतच्या निर्णयावर आश्चर्य वाटून विनय हताशपणे म्हणाला..

"माझ्यामते याला योग्य विचार करून निर्णय घेणं म्हणतात,,,सोपं नाही हे..कितीतरीजण वर्षानुवर्षे अशा बाबतीत तळ्यात मळ्यात राहतात.निर्णय घेतल्यावर खूप शांत वाटतंय मला.तुला सांगू, नको त्या गोष्टीला संघर्ष समजून त्या शहरात गावं सोडून आलेले कित्येकजण वाया गेले आहेत.सशासारखं नुसतं धाव धाव धावतात ते आणि हवं ते नाही मिळालं की आत्महत्या करतात.. सगळं कसं इंस्टंटली हवं असतं .. आणि 'काहीही अशक्य नाही ' हे सांगण्यासाठी त्यांनाही  त्यांचे मित्र ,आप्तेष्ट अशा लोकांची उदाहरणं देतात, ज्या लोकांनी घरदार सोडून वर्षानुवर्षे संघर्ष केला,आणि ते स्टार झाले. सकारात्मकतेसाठी अशी उदाहरणं ठीक आहेत, पण ती उदाहरणं देताना तुम्ही चार-पाच वर्ष नाही कमावले तरी तुमचा घरचा आर्थिक भार चालू शकेल का, हे आपल्याला कितीजण सांगतात?.. किंवा कोणी कितीही सकारात्मकता ठेवली तरी त्यातील लाखोंपैकी शे लोकांनाच संधी मिळणार,ही वस्तुस्थिती कितीजण समजून घेतात. यामुळे आज ज्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाही,ज्यांना ती वाट किती आवडते हे ठरवता येत नाही,ते सर्रासपणे घरदार सोडून,इतकेच नव्हे तर शिक्षणही अर्धवट सोडून मुंबईसारख्या शहरात जाऊन वाया जातात. या लाखो मुलांपैकी कितीतरीजण यापेक्षा इतर क्षेत्रात खऱ्या अर्थाने निपुण होऊ शकतात, पण 'ग्लॅमरस क्षेत्रांबाबत' भूरळ पडल्यामुळे ते त्यापासूनही दूर राहतात.अशीच गत आज दुसऱ्या काही क्षेत्रांबाबतही आहे." 

" अरे,पण तुला मी किती वर्ष झाली ओळखतोय, तुला यात आवडही आहे आणि तू मेहनतही करतो आहेस." विनयनं त्याला समजावलं. 

"त्याचाच खूप विचार केला तेव्हा जाणवलं, मला आवड आहे,पण त्याहीपेक्षा मलाही यातलं 'ग्लॅमर' जास्त प्रिय होतं म्हणून मी मेहनत करत होतो. मी आताचाच अनुभव सांगतो,मी मुंबईमध्ये जितका वेळ घालवला, त्या मानानं मला तेवढं समाधान मिळालं नाही तिथं. मान्य मला प्रसिद्धी मिळाली,माझं कौतुक झालं .. पण माझं कौतुक अनुभवायला मीच शरीर-मनाने सक्षम नको का?...सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मी हे सगळं,ही कला करायचं सोडणार असं कुठे म्हणतोय? हे बघ, आपण जे करतो, आपली कला लोकांपर्यंत पोहचणं जास्त महत्वाचं ना,मग त्यासाठी आज अनेक माध्यमं आहेत. मी नक्की ही कला चालूच ठेवणार, फक्त उतावळेपणा करणार नाही. कुठलीही गोष्ट लहान किंवा मोठी न मानता करणार. ह्या निर्णयापर्यंत पोचण्यासाठी माझा पूर्ण विचार आहेच,पण आता शूटिंगच्या दिवसांत मला, मी कॉलेजमध्ये असताना आमच्या दवे सरांनी दिलेलं एक लेक्चर आठवलं. त्यामुळे मला निर्णय घेताना काही विचारांवर ठोस राहणं सोपं पडलं. सर म्हणाले होते,'कुठल्याही क्षेत्रात नुसतंच ग्लॅमरच्या मागे धावण्यापेक्षा आधी मूलभूत शिक्षण, स्वयंपूर्ततेसाठी वाचन हे जास्त महत्वाचं आहे. आयुष्यात डाउन फेज मध्ये याच गोष्टी जास्त उपयोगी पडतात.' मला पटलं ते...आणि मी ज्या विषयामध्ये, 'एम.बी.ए' चं शिक्षण घेतलं आहे, त्यात मला जास्त आवड आहे,..आणि त्यात मी जे काम करणार आहे ते माझ्या आवडीचंच आहे." 

"तू एवढं सगळं ठरवलं आहेस.. यापुढे मी काय बोलणार?:" विनय म्हणाला पण हेमंतचं मनापासूनचं बोलणं त्याच्यापर्यंत पूर्णपणे पोचलं नव्हतं. हे लक्षात येऊन काही क्षणांच्या शांततेनंतर हेमंत म्हणाला,

"कुणास ठाऊक... नशिबाचं काय सांगता येतं ... वेगळ्याच मार्गानं अपेक्षेपेक्षा चांगली संधीही मिळू शकते." पुढे विचार करून हेमंत म्हणाला,"अनेक समस्या काही समस्यांशी जोडलेल्या आहेत, त्याच्यावर काहीतरी व्हायला हवं."

"कुठल्या समस्यांबद्दल काहीतरी व्हायला हवं?" विनयनं सहजपणे विचारलं 

"सर्वात महत्वाची तर लोकसंख्या . ."हेमंत ठामपणे आणि सहज म्हणाला. 

"ती एक मोठीच समस्या आहे, पण तू त्याचा संबंध इथे का जोडतोयस?" विनय बुचकळ्यात पडला. 

"खूप जवळचा संबंध आहे. अनेक समस्यांचं मूळ हेच आहे. महानगरांना तर अतिलोकसंख्येचा पूर आला आहे... एकाच संधीसाठी शेकडो,हजारो अर्ज,हे कशामुळे? अजून एक समस्या म्हणजे चंगळवाद. शिक्षण क्षेत्रातला वाढलेला बाजार,औषध-उपचारांचा वाढलेला खर्च याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत.आपल्यालाच आता सगळ्या 'ब्रँडेड' गोष्टींची सवय लागली आहे. महानगरात दोन दिवसातच खूप काही अनुभवलंय मी. हव्यासाच्या मागे लागून आरोयग्यदायी,समाधानी जगणं विसरायचं हे चुकीचं आहे. महानगरं ज्येष्ठ,अनाथ,अपंग यांच्यासाठी योग्य राहिली आहेत का?" "हेमंतच्या पुन्हा मनापासूनच्या बोलण्यावर क्षणभर थांबून विनय म्हणाला, 

"आहेच ही सगळी वस्तुस्थिती.. पण जे होतंय त्यावर आपण काय करू शकतो?फक्त चर्चा आणि विचार.. त्यातून काय साध्य होणार आहे?"

"त्यातूनच तर मार्ग निघतात.. जर ते फक्त चर्चेपुरतं नाही ठेवलं तर. गोष्टी आमलात आणायच्या."बोलताना हेमंतची नजर स्थिरावली होती. 

"म्हणजे काय करायचं?काय करू शकतो आपण?"

हे ज्यानं त्यानं ठरवावं.. मी माझ्यापुरतं ठरवलं आहे. "

"म्हणजे, काय ठरवलं आहेस?"विनयनं विचारलं . 

" अविवाहित राहण्याचा मी निर्णय घेतलाय... मला लग्नाच्या बंधनात अडकण्यात रस नव्हता आणि नाही. मला स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे. " 

काही वेळ विनय हेमंतकडं फक्त आश्चर्यानं बघत राहिला. 

"तू मला आज शाब्दिक शॉकच द्यायचं ठरवलं आहेस का? तू याबाबतीत नक्कीच पूर्ण विचार नाही केलास. हे सोपं नाही.तुझ्या घरचे यासाठी तयार होणार नाहीत."

"सोपं नाहीच.. पण कुणीतरी धाडस दाखवायलाच हवं ,बदल घडवण्यासाठी ."

"कसला बदल? आतापर्यंत बोलत होतास ते सगळं ठीक आहे, but this is not practical.म्हतारपणाबद्दल काय?"

"एवढा पुढचा नाही विचार केला मित्रा . कोणीतरी येईल तेव्हा सोबतीला, किंवा गरजच भासली तर काही वर्षांनी गरजू मूल दत्तक घेऊन एकेरी पालक बनण्याचा विचार आहे, नाहीतर हे 'विश्वची माझे घरे' ...बदल घडवण्यासाठी कुठलातरी त्याग कारणीभूत ठरायलाच हवा. करेन मी.. या निर्णयासोबत घेईन आई-वडिलांना,घरच्यांना सोबतीला. सकारात्मकतेसाठी लढेन, हरणार नाही. वर्षानुवर्षे आपण महापुरुषांचे दाखले देतो,पण खऱ्या अर्थानं त्यांच्यातलं धाडस प्रत्येकानं काही प्रमाणात वेगवेगळ्या कारणांसाठी स्वतःत आणलं, तरी या जगाचं नंदनवन होईल.. "

हेमंत बोलत असताना विनयला आता तो वेगळ्याच रूपात दिसत होता. आतापर्यंत असा कधीही न भेटलेला हेमंत. जणू स्वयंप्रकाशानं उजळल्यामुळे अशा निर्णयापर्यंत पोहचलेला आणि कोणी कितीही समजावले तरी आता मागे हटू न शकणारा.

                 ****

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational