मायलेक
मायलेक
एकदा माय तिच्या लेकाला म्हणाली, “आज 'अ' भाजी करते, खूप खायची ईच्छा होतेय मला”.लेक माईला म्हणाला,“मला 'अ' भाजी आवडतंच नाही, तू मला 'ब' भाजीच कर.”दोन भाज्यांचा पसारा कशाला,म्हणून मायने लेकाच्या आवडीची भाजी केली.लेकाला कौतुक वाटले,'मायने आपल्यासाठी स्वतःचं मन मारलं'…….
'माय'ला कॉफीपेक्षा चहा जास्त आवडतो,पण लेक घरी असला की तीसुद्धा त्याच्याबरोबर कॉफीच पिते.लेकाला अभिमान वाटतो,’आपल्या आवडीतच आई स्वतःची आवड सामावून घेते'.एकदा हॉटेलात गेल्यावर आईला एक पदार्थ खायची इच्छा झाली,लेक म्हणाला,”हा खूपच तेलकट असतो,आपण दुसरा मागवूया.."आईचा होणार-नकार जाणून घ्यायच्या आधीच त्याने दुसऱ्या पदार्थाची ऑर्डर दिली.लेकाने मागवलेला पदार्थही आईला खूप आवडला,तेव
्हा लेकालाही समाधान वाटले.
एकदा लेक कामावरून घरी आला तेव्हा 'माय' नं पुराणपोळ्यांचा बेत रचला होता. लेकाला थोडे आश्चर्य वाटले,”मला पुरणपोळ्या आवडत नाहीत.दुसरी भाजी कर मला” लेकाने फर्मान सोडलं.
माय म्हणाली,”पोळ्या खायची लय इच्छा झाली आज,म्हणून घाट घातला. तुलाबी लय आवडतील.”…
लेकाने दुसरी भाजीच पाहिजे म्हणून तगादा लावला तवा मायचा आवाज चढला."आता मला दुसरं काय करायला न्हाय जमायचं, लय थकलीय मी.पुरणपोळी खा, नाहीतर तुझ्यापुरतं मेस-हाटेलातनं कायतर घेऊन ये."
लेकाचा चेहरा आधी लाल झाला….. आणि मग नंतर……
त्याचे डोळे आज जास्तच आनंदाने भरून आले,
'मायनं आज पहिल्यांदा आपण असताना माझ्याआधी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला म्हणून...’