वेदनांतून परलोकी
वेदनांतून परलोकी


आपल्या एकुलत्या एका मुलाचा,रामचा मोठा अपघात झाला तेव्हा वंदना आणि प्रदीप हादरले होते. दिवसांगणिक दवाखान्यात उपचारांना राम हळूहळू प्रतिसाद द्यायला लागला, तेव्हा त्याला अतिदक्षता विभागातून जनरल वार्ड मध्ये हलवले, मात्र एके दिवशी त्याला स्वतःचा पाय हलवताच येईना म्हणून त्याने ओरडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं. डॉक्टर येऊन त्याची तपासणी करू लागले . वंदना आणि प्रदीपच्या चेहऱ्यावर चिंता दाटली. तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी वंदना आणि प्रदीपला स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलवले. आता डॉक्टर काय सांगणार म्हणून त्यांची छाती धडधडू लागली.
"डॉक्टर,असं अचानक काय झालं ?राम तर बरा व्हायला लागला होता." कॅबिनमध्ये जाताच प्रदीप म्हणाले.
"त्यानं जोर लावला,पण तरी त्याला पाय स्वतःहून हलवता का येत नव्हता ? "काळजीने वंदनाने विचारले.
"सांगतो.. अपघातात रामला पाठीला मार लागल्यामुळे तिथे एके ठिकाणी ब्लॉकेज,थोडासा गॅप निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या मेंदूने दिलेल्या सूचना त्याच्या पायापर्यंत पोचतच नाहीत."डॉक्टर शांतपणे म्हणाले.
"मग, यावर कुठलं ऑपरेशन..."प्रदीप.
"प्रॅक्टिकली सांगायचं तर यावर उपाय नाही..मी आता सांगेन ते मनात काहीही निष्कर्ष न काढता ऐका." आता डॉक्टर पुढे काय सांगणार म्हणून दोघांचीही नजर स्थिरावली.
"जे आज रामच्या पायाच्या बाबतीत झाले, तेच हळूहळू इतर अवयवांच्या बाबतीत होणार. त्याला कुठलाच भाग स्वतःहून हलवता येणार नाही ." हे ऐकून क्षणात दोघांच्या घशाला जणू कोरडच पडली,डॉक्टरांनी सांगितलेल्या एकेका गोष्टीचे संदर्भ त्यांच्या मनात लागू लागले.
"डॉक्टर,काहीही करून त्याला यातून बरं करा. अहो,आयुष्यभर असं अपंगत्व घेऊन कसा दिवस काढेल तो? आता फक्त सतरा वर्षाचा आहे तो. " वंदनाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या होत्या.प्रदीपने सावरण्यासाठी तिच्या पाठीवर हात ठेवला.
"शांत व्हा. आम्ही आशावाद कधीही सोडत नाही. कुठल्याही स्टेजला. मिरॅकल्स अल्सो हॅपन्स . आपण पूर्ण प्रयत्न करू आपल्यापरीने... आता रामची प्रेरणा,त्याचं जगण्याचं बळ तुम्हीच बनायला हवं. तुम्ही दोघांनी आता खंबीर राहायला हवं."डॉक्टरांनी त्यांना समजावलं.
भेदरलेल्या अवस्थेत वंदना आणि प्रदीप रामजवळ गेले आणि लांबूनच रामला पाहून त्यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रामच्या रूपाने एक हरहुन्नरी,सतत चांगले मार्क मिळवणारा,कलेची आवड जोपासणारा मुलगा लाभला म्हणून त्यांना त्याचा खूप अभिमान वाटायचा. त्याच्या भविष्याबद्दल,आयुष्याबद्दल त्यांनी किती स्वप्नं रंगवली होती. पण वास्तवात नियती जणू म्हणत होती,"तुम्ही ठरवल्याप्रमाणे आयुष्य मी कधीच चालू देणार नाही, ते मी माझ्याप्रमाणेच चालवणार.".
***********************************************************************
डॉक्टरांनी रामच्या अवस्थेबद्दल जे सांगितलं, ते वंदना आणि प्रदीपने प्रथमतः रामला कळू दिले नाही, पण कालांतराने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रामचा एक एक भाग अर्धांगवायूच्या अवस्थेत जाऊ लागला,त्याला शरीराचा कुठलाच भाग हलवता येईना. त्याला सगळं असह्य होऊ लागलं, तो चिडचिड करू लागला. 'तू नक्की बरा होशील' असंच वंदना आणि प्रदीप त्याला समजावीत होते. या अवस्थेचं सत्य त्यांनीच अजून संपूर्णतः स्वीकारलं नव्हतं.
घरी न नेता दवाखान्यातच रामची व्यवस्थित सुश्रुषा व्हावी,या प्रदीप-वंदनाच्या विनंतीवरून रामला दवाखान्यात स्वतंत्र खोलीत हलवण्यात आलं. एकटं असताना रामच्या मनात विचार यायचा , 'फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्व ती हरवल्यानंतर समजतं.. आतापर्यंत आपण शरीराला गृहीतच धरत होतो. नियोजित केल्याप्रमाणे गोष्टी जिथे घडत नसतात ,ते म्हणजे आपलं जीवन .आयुष्य म्हणजे समुद्र... शिंपले,वाळू आणि तिथल्या सौंदर्यात आपण कितीही मग्न असलो, तरी लहरी लाट कधी येईल ते सांगता येत नाही. आपलं कॉलेजचं शिक्षण बंद झालं,पण खऱ्या आयुष्याचं शिक्षण चालू झालं. '
**************************************************************************
दिवसांमागून दिवस गेले,राम तिशीत पोचला, पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. रोज उगवत्या सूर्याबरोबर मनात निर्माण झालेला आशेचा अंकुर मावळत्या सूर्यकिरणांबरोबर नष्ट होताना वंदना आणि प्रदीप हतबल व्हायचे. स्वप्नांवर जगण्याची त्यांची मर्यादा आता संपत चालली होती.
"आता सत्याचा स्वीकार करायलाच हवा."घरी दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेल्या प्रदीपची नजर शून्यात गेली होती.
"कुठल्या सत्याचा?" वंदनाने विचारले.
"राम आता कधीच हालचाल करू शकणार नाही. " प्रदीप.
"माझा अजूनही विश्वास आहे, तो बरा होईल." वंदना आशावाद एकवटून, पण खंबीरपणे म्हणाली.
"वंदना,डॉक्टर म्हणाले तसा आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा. तो यातून ... कधीच बरा होणार नाही असं गृहीत धरून आपण पुढचं नियोजन करूया. आपल्या पश्चात रामच्या आयुष्याचं नियोजन. आपण आहोत म्हणून त्याचं सर्वकाही करू शकतो,पण आता आपलंही वय होत आलं आहे. त्याला आपण कायमस्वरूपी नाही पुरणार. आपल्या पश्चात त्याची सोय करून ठेवायला हवी. डॉक्टरांशी बोलायला हवं.आपल्या पश्चात रामचा व्यवस्थित सांभाळ करणारं कोणीतरी शोधायला हवं. " प्रदीप म्हणाले.
"या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नव्हता मी.. एकुलत्या एका मुलाच्या भविष्याबद्दल किती स्वप्नं रंगवली होती.. सगळं आयुष्य उरलं आहे त्याच्यापुढे आणि नियतीनं असला कसला विपरीत खेळ खेळला." परिस्थितीमुळे खंबीर बनलेल्या वंदनाला हे बोलताना मात्र हुंदका आवरता आला नाही.
नंतर रामला हॉस्पिटलमधून घरी हलवण्यात आलं, त्याच्या सुश्रुषेसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आली.
*************************************
घरी रामच्या खोलीत राम आणि वंदनाची शून्यात नजर लागली होती.
"दुर्दैव ...दुसरं काय..."रामची नजर स्थिरावलीच होती.
"असा त्रास करून घेऊ नको रे..." वंदना शांतपणे म्हणाली.
"त्रास नको करू?स्वतःच्या वडिलांना अग्नी देण्यासाठीही हे हात उपयोगाला नाही आले. ..पप्पा आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये होते, ते जग सोडून गेल्यावर त्यांना घरी आणलं तेव्हा मला या खोलीत बाहेरून रडण्याचे आवाज ऐकू आले.. मला उचलून कोणीतरी बाहेर नेलं, पप्पांच्या बाजूला ठेवलं आणि माझ्या कानावर शब्द पडले,'राम, तुझे पप्पा आपल्याला सोडून देवाघरी गेले. क्षण दोन क्षण काहीच कळालं नाही. वाटलं ... वाटलं सगळी शक्ती एकवटून उठावं आणि मनमोकळं रडावं...पण,शेवटी हे मृत शरीर.."राम हतबलपणे म्हणाला. सगळी संकटं झेलून धीट झालेली वंदना रामला धीर देत थोपटू लागली.
"माझी आणि पप्पांची सेवा करताना तुझी किती तारेवरची कसरत झाली असेल, पण तू कधीच काही जाणवू दिलं नाहीस. कसं सहन केलंस एकटीनं इतकं?" रामने सावरून विचारले.
"काही प्रश्नांना उत्तरं नसतात राम. असली तरी ती शोधत बसायची नसतात. माणूस स्वार्थी असतोच.. आपल्या माणसांसाठी तो सर्वस्व देतो. काही झालं तरी ती माणसं दुरावता कामा नयेत, हाच त्याचा स्वार्थ असतो. "वंदनाच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते.
"माझा स्वार्थ मात्र वेगळा आहे. या आजारानं तो माझ्यापुरताच सीमित केलाय. बेडवर वीस वर्षं झाली मृतावस्थेत जगतोय मी. .. श्वास फक्त शिल्लक आहे, म्हणून जिवंत... मला मरण देशील?" रामने ठामपणे विचारले.
वंदनाला हे ऐकून धक्का बसला, राम आतापर्यंत हतबल झाला होता,पण मरणाची भाषा प्रथमच करत होता.
"राम, काय बोलतोयस तू हे?" वंदनाच्या बोलण्यात काळजीही होती आणि रागही होता.
"आयुष्य संपलेलंच आहे. .. फक्त शारीरिक वेदना आणि त्रास शिल्लक आहे. जीवनावर माझी नितांत श्रद्धा आहे. . म्हणूनच इतकी वर्षं जिद्दीनं, आशेवर जगलो. आयुष्य चढ उतारांचं असतं,पण माझ्या बाबतीत तसं काहीच उरलं नाही आता. 'मरण' हे जगातलं मोठं सत्य आहे आणि ते स्वीकारायला नको का?शरीराचा कुठलाच अवयव हलत नसताना आणि शरीर कधीच पूर्ववत होणार नाही, हे माहित असताना फक्त 'शारीरिक वेदना' घेऊन जगणं, यापेक्षा 'मरणच' सुंदर नाही का?"राम अगदी समजावणीच्या सुरात बोलत होता. ऐकून वंदनाची द्विधा मनस्थिती झाली,पण शेवटी तिचं 'मातृहृदय' हे मान्य करत नव्हतं.
"आईला इतकं अवघड काहीतरी सांगू नको... मी असं काही कधीच घडू देणार नाही. " ती म्हणाली.
....."मी तुला कधीच मरू देणार नाही आणि तुझा शेवटपर्यंत सांभाळ करीन" असं रामला म्हणणारी वंदना काही वर्षानंतर स्वतःचं मरण मात्र टाळू शकली नाही. .. तिच्या मरणानंतर रामच्या आयुष्यातील एकमेव भला आधारवडही निघून गेला.
नंतर त्यावेळी रामच्या वतीने एका सामाजिक संस्थेनं त्याच्या 'इच्छामरणासाठी' न्यायालयाकडे अर्ज केला,पण न्यायालयाने तो मंजूर केला नाही.
***************************************************************
वारा, ऊन,निसर्ग,सौंदर्य,झाडे,पाने,फुले या सर्वांनी परिपूर्ण असलेल्या बाहेरच्या जगाचाही रामला आस्वाद घेता येत नव्हता. एका बंद चौकटीत, बंद पडलेलं शरीर घेऊन तो दिवस ढकलत होता. त्याला सूर्योदयाने उजळलेली सृष्टी मनभरून पाहावीशी वाटायची.पावसाचं पाणी अंगावर घेऊन चिंब भिजावंसं वाटायचं. .. तेही स्वावलंबीपणानं... पण यातलं काहीच करता येत नव्हतं. आंघोळीला ,शौचाला,जायचं असेल,तरी परावलंबीपणाच.. कधी कधी शौचाला आल्यावर जवळपास कोणी नसलं की सगळं पलंगावर होऊन घाणीत लोळावं लागलं त्याला. जीवन विविध रंगानी बहरलेलं असतं, पण त्या रंगांची उधळण करण्यासाठी शरीराची साथ हवी असते. ती साथ त्याला अजिबातच नव्हती. त्याला मनमुराद नाचावंसं वाटायचं,सिनेमाला जावंसं वाटायचं. आकाशाच्या छताखाली स्वतःच्या हिंमतीवर उभं राहावंसं वाटायचं ... पण यातलं काहीच करता यायचं नाही.एका विशिष्ट वयात त्याला शारीरिक बदल जाणवले, कुणावर तरी प्रेम करावंसं वाटलं. पण त्याच्या 'विश्वात' कोण होतं? मनातल्या फुलपाखरासारख्या मोहरणाऱ्या भावना मनातच मरून गेल्या.
...... एक दिवस मात्र चोरपावलांनी मृत्यानेच रामला गाठले. 'मृत्यू' रामला सर्व वेदनांतून परलोकी घेऊन गेला. संपूर्ण आयुष्य बेडवर घालवलेल्या रामसाठी मृत्यू एक वरदानच होतं. मानवी वेदनेतून मुक्त होण्याचा सन्मानच होता. त्याचं जिवंतपणीचं मरण संपलं आणि मृत्युनंतरचं नवीन जीवन चालू झालं. धरतीला उन्हाने तप्त आणि बेजार केल्यावर तिला सुखावण्यासाठी मेघ बरसतातच... तसंच त्रासाने पोखरून काढलेल्या रामचा पुढचा प्रवास मात्र परिपूर्ण असेल... नक्की असेल.