Rahul Shinde

Others

4.8  

Rahul Shinde

Others

शिदोरी

शिदोरी

7 mins
1.5K


प्रिय सर,


  पत्र लिहायला खूप उशीर झाला आहे का? तुम्ही रचलेल्या पायावर माझ्या आयुष्याची इमारत मजबूतपणे उभी राहत गेली.या सर्व प्रवासात तुमच्यासारख्या शिक्षकाची आठवण होत असूनही गेली कित्येक वर्षं तुमच्याशी काहीच संपर्क नाही.तुम्हाला विसरलो आहे असं अजिबात नाही, पण मी बुद्धीने जसा प्रगल्भ होत आहे, तशी माझ्या आयुष्यातील तुमच्या योगदानाची मला जाणीव जास्त होत आहे.शाळेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यावर काही वेळा तुम्हाला येऊन मी शाळेत भेटलो, पण शेवटची प्रत्यक्ष भेट होऊनही आता किती वर्षं झाली आहेत!...मग आत्ताच तुम्हाला पत्र लिहण्याचे कारण म्हणजे,नुकताच मी एका शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झालो आहे.तुमचा विद्यार्थी म्हणून मला हा आनंद तुमच्यासोबत वाटून अजूनही किती किती बोलायचंय.तुमचं मार्गदर्शन हवं आहे,तुमचं माझ्या आयुष्यातील स्थान मला खऱ्या अर्थाने अधोरेखित करायचंय .. हे सगळं फोनसारख्या माध्यमातून व्यक्त करता येईल? म्हणून पत्राद्वारे शब्दांतून मोकळा होतोय.


   उगाचच शाळेत मला सगळे इतरांपेक्षा 'वेगळा ' समजायचे. मला मठ्ठ म्हणायचे.मी पाचवीत असताना तुम्ही माझ्या आयुष्यात वर्गशिक्षक म्हणून आलात.माझी समजण्याची,वाचण्याची गती वेगळी होती हे तुम्ही ओळखलंत.सुरुवातीला एकदा वर्गात गणित शिकवत असताना मी नुसता बसून होतो.मला काही जमत नव्हते.शिकवत असताना तुम्ही माझ्या जवळ आलात तेव्हा मला वाटलं तुम्ही मला शिक्षा द्याल, मी एकही गणित सोडवलं नव्हतं.तुम्ही माझ्याजवळ येऊन माझा हात पकडलात आणि मला गणितं समजावू लागलात,पण तरी मला साधी गणितंही काही जमेना.तेव्हा तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवत म्हणालात," आता वही ठेऊन दे.काही काळजी करू नकोस.शिकशील हळूहळू." तुमच्या पाठीवरच्या हाताने किती आधार वाटला मला! नंतर जणू तुम्ही माझं बोट पकडलंत आणि किती वेगवेगळ्या गमतीशीर पद्धतीनं गणितच नव्हे तर सगळे विषय शिकवले. 

   आपल्या शाळेची गुरुकुल पद्धत.एकच वर्गशिक्षक दहावी संपेपर्यंत त्या वर्गाला असतो.तुम्ही आम्हाला किती पातळीवर घडवलंत,याची जाणीव प्रगल्भपणा वाढत असताना होत गेली ..माझ्यातला शिक्षणाबद्दलचा न्यूनगंड तुम्ही पूर्ण बाजूला केलात आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण नातं जोडलं.अभ्यासाचा न्यूनगंड तरी का निर्माण झाला होता? ते होण्यामागे माझ्या पालकांचाही वाटा होता.माझी आकलनशक्ती न बघता मला सगळ्या गोष्टी इतर मुलांप्रमाणेच जमायला हव्यात,असंच त्यांना वाटायचं.मी वाचून दाखवताना काही चुका झाल्या की माझे बाबा पाठीत फटका द्यायचे.त्यांच्यासमोर गणित करायला बसले की त्यांच्या भीतीने मला थोडंफार येणारंही मी विसरून जायचो.यामुळेच माझ्या मनात अभ्यासाबद्दल भीती निर्माण झाली होती.शाळेत पालकांसोबत होणाऱ्या भेटीतून,बोलण्यातून तुमच्या हे सगळं लक्षात आलं आणि तुम्ही माझ्या घडण्यावर काम करत असताना माझ्या पालकांनी 'माझी जशी संथ गतीने प्रगती होतेय' तशी स्वीकारून मला कसं प्रोत्साहित करायला हवं, यासाठी वेळोवेळी त्यांना भेटत राहिलात.यामुळे मला किती किती तणावांतून मुक्ती मिळाली! सर,तेव्हाच बालमनाला वाटू लागलं,.मलाही मोठं होऊन शिक्षक व्हायचंय. तुम्ही जशी मला साथ दिली तशी मलाही कित्येकांना देता येईल.


   तुमचं तेव्हाचं असणं,वावरणं आता कितीतरी वेगवेगळ्या अर्थाने समजतंय.तुम्ही दहा किलोमीटर सायकलने प्रवास करत शाळेत यायचा.वर्गात जेवण करून झाल्यावर प्रत्येकाने आपले ताट आपणच धुवायचे असा तुमचा नियम.आज वाटतंय,समतेसाठी किती साधी ही शिकवण.आज म्हणूनच मला बायकोच्या बरोबरीने स्वयंपाक करायला,भांडी धुवायला लाज वाटत नाही...


 आमच्यावेळेपेक्षा सध्याची शिक्षणाची परिस्थिती अजूनच वेगळी आहे. आता प्रत्येकाने आनंदाने आणि आपल्या गतीने शिकेपर्यंत पालकांना अजिबातच वेळ नाही,कारण स्पर्धा निर्माण केली गेली आहे. "तुला चांगलंच जमतंय रे, पण अमुक एकापेक्षा तुला जमायला पाहिजे' असा पालकांचा मुलांवर दबाव आहे.याला कारण म्हणजे आता पहिलीच्या वर्गाच्या प्रवेशासाठीही परीक्षा घेतली जाते.तुम्ही सांगितलेला कबीरांचा दोहा 'धीरे धीरे रे मना,धीरे सबकुछ होय' अशा वेळेस खुप अर्थपूर्ण वाटतो.संथ,शांतपणे अनुभवाने शरीरात मुरलेली गोष्ट स्मरणात राहते, असं तुम्ही म्हणत….उपक्रमाचा भाग म्हणून तुम्ही आम्हाला सातवीच्या वर्गात असताना पावसाळी दिवसात कित्येक वेळा भाताची पेरणी करण्यासाठी शेतावर घेऊन गेलात.अन्न-धान्य उगवून येण्याची ती प्रक्रिया आमच्या शरीरातच मुरली आहे की उगाचच अन्नाची नासाडी करायला मन धजवत नाही, तसं करताना पेरणीच्या वेळी आम्ही केलेले कष्ट आठवतात…


    सर,शाळेतून बाहेर पडल्यानंतर सुख-दुःखाचा अर्थ काही फारसा कळत नव्हताच,पण आता मोठं होत असताना तुमच्याबाबत पडलेले कितीतरी प्रश्न उगाचच अस्वस्थ करतात.शिक्षणासाठी अवघं आयुष्य झोकून देताना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा विसर पडला का?इतक्या मुलांचे फक्त गुरूच नाही तर आई-बाप झालात तुम्ही,यात तुम्हाला स्वतःचं मूल-बाळ नसण्याचं दुःख विरून गेलं की मूल न होऊ देण्याचाच निर्णय जाणीवपूर्वक घेतला होतात?


मला आठवतेय, आम्ही नववीत असताना तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली. आज विचार करताना खूप काही जाणवते,आणि विचारावेसे वाटते….. सर तुम्ही एकटे आहात का? या सगळ्याची जाणीव होऊन मला पत्र लिहायला खूप उशीर झाला नाही ना? मी काय करायला हवे ते हक्काने सांगा.एक विद्यार्थी म्हणून तेवढा हक्क आहे ना माझा? 


                                                    तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी,


                                                    अशोक


 


प्रिय अशोक,


    शिक्षणाचं कार्य हाती घेतलं आहेस,ऐकून आनंद झाला.मी दिलेल्या शिक्षणाच्या शिदोरीचा अर्थ पुढील आयुष्यातही प्रत्येकाला वेगवेगळ्या अर्थाने उमगेल,या माझ्या विश्वासावर तुझ्या पत्राने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला....तुझ्या पत्रातील सगळीच तळमळ,तुझी जिज्ञासा माझ्यापर्यंत पोचली, त्यामुळे एक आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून माझ्या अनुभवाच्या शिदोरीतून काही महत्वाच्या गोष्टी तुला सांगाव्याश्या वाटतात.


    वर्गातील प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्या कुवतीनुसार तुला त्याला मदत करावी लागेल.तुझ्या विध्यार्थ्यांपैकी कोणी डावखुरा असेल,कोणाला नीट बोलण्यास अडचण असेल,कोणाला अभ्यास लक्षात ठेवण्यास समस्या असतील,आणि अशा असण्यावरून बाहेरची व्यवस्था त्याच्यात न्यूनगंड निर्माण करेल...आणि एक शिक्षक म्हणून अशा मुलांना फक्त बळ देण्याचीच नव्हे,तर अशा व्यवस्थेशी सामना करणारा एक विद्यार्थी घडवण्याची मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे.तू कोणालाही शिकवत नसून फक्त मदत करण्यासाठी आहेस,हे विसरू नकोस.

    प्रत्येक मुलाकडे वेगळी कल्पनाशक्ती असते, तुझ्या दोन अधिक दोन चार अशा शिकवण्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीवर मर्यादा घालू नकोस...तू विचार चार म्हणजे किती?..कोणी म्हणेल एक अधिक तीन,तर कोणी दोन अधिक दोन,किंवा पाच वजा एक..सगळी उत्तरं बरोबर आहेत..तुला कळतंय ना, मला यातून काय म्हणायचंय? मुलं साच्याच्या बाहेर कितीतरी सृजनात्मक विचार करतात, पण कित्येकदा शिक्षण पद्धतच जणू त्यांना साच्यात बांधते.फक्त परीक्षेतील गुणांवरून तुझ्या विद्यार्थ्यांना तोलू नकोस...


  एक शिक्षक म्हणून तुला कितीतरी परीक्षांना सामोरे जावे लागेल..जेव्हा एखादा विद्यार्थी विचित्र वर्तवणूक करेल तेव्हा चिडून-ओरडून "तू असा का वागतो आहेस?" असं त्याला म्हणण्याऐवजी "तुला नेमकी काय मदत हवी आहे?" ही भावना ठेवशील , तेव्हा तुझं विद्यार्थ्यांशी हृदयाने नाते निर्माण होईल आणि शिक्षणाचं कार्य हाती घेतल्याची पवित्रता तुला क्षणोक्षणी उमजेल.तुला नवल वाटेल, पण खरंच.. मुलं तुझ्या स्वप्नात येतील आणि मुलांसाठी जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल, यासाठी सतत तू प्रेरित होशील.


  प्रत्येक मुलाशी जेव्हा असे नाते तयार होईल,तेव्हा त्याची आर्थिक,सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती समजून घे.एखाद्या मुलाचा तुझ्या अपेक्षेपेक्षा विचित्र वावर,वागणे असेल तर त्याची बीजे या वेगवेगळ्या गोष्टीत असतील.काही वर्षांपूर्वी शाळेतील माझी एक विद्यार्थिनी मला आठवतेय ,जी दुसऱ्या शाळेतून माझ्या वर्गात आली.ती मुलगी इतर बाबतीत खूप हुशार, पण तिला नववीत असूनही काही काम करताना कात्री अजिबात वापरता येत नव्हती,छोट्या कापडाचीही घडी घालता येत नव्हती .तिच्याशी बोलताना मला समजले की लहानपणापासून ती  अतिश्रीमंतीत वाढलेली,पालकांनी एवढे जपलेले की सगळ्या गोष्टी तिला हातात दिलेल्या,हाताचा वापर होईल अशी कामे तिने केली नव्हती.त्यामुळे तिचे 'हॅन्ड-आय कोऑर्डिनेशन' नव्हते, पण हळूहळू मी तिला तशी कामं देऊन तिच्यामध्ये बऱ्यापैकी बदल घडला.


     तू विद्यार्थी दशेत असताना मी केलेल्या कितीतरी गोष्टींची जशी तुला बाहेरच्या जगात पडल्यावर जाणीव होत गेली,तसंच तुझ्या शिक्षणाने तुझ्याही मुलांच्या बाबतीत नक्की घडेल.तुझ्या पत्रातील आजच्या काळाबद्दलची तळमळ मला जाणवते ,अनेक मुलांवर 'पिअर प्रेशर' आहे ,पण त्यांना तुझ्यासारख्या शिक्षकांच्या धीराचीच नितांत गरज आहे. जेव्हा एखादे मूल चित्र काढून आपल्या पालकाला दाखवते आणि म्हणते, 'मला हे चित्र काढताना खूप मजा आली', तेव्हा त्याचे 'सुशिक्षित' पालक म्हणतात, 'पण या चित्रांना अभ्यासात मार्क्स नाहीत.' अशा व्यवस्थेपासून तुझ्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करून त्यांच्यातील ‘मूल’ जिवंत ठेवण्याची मोठी जबाबदारी तूझ्यावर आहे. शिक्षक हा महत्वाचा आणि पवित्र पेशा, परंतु सध्याची कित्येक ठिकाणाची परिस्थिती मन सुन्न करते.ज्यांना दुसरीकडे नोकरी मिळत नाही ते शिक्षक होतात, हा समज आणि विचारसरणी सहजपणे फैलावत आहे. तुझ्यासारख्या निर्माण होणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांमुळे ही परिस्थितीही बदलेल…


माझ्या एकटेपणाबद्दल तुला उमजले ,हे वाचूनही समाधान वाटले.याचं उत्तर देतो.... या क्षेत्रात झोकून देतानाच मी आणि माझ्या पत्नीनं आपल्याला स्वतःला वेगळं अपत्य नको असा निर्णय घेतला. शाळेतील मुलांमधील ऊर्जाच आम्हाला या निर्णयापर्यंत घेऊन गेली..मुलांसाठी,शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्य झोकून दिले मी. पत्नी साथ सोडून गेली तेव्हा मात्र मी काही काळ खचलोच,नाही असं नाही..नंतर अलीकडेच मात्र उतारवय लागल्यावर मी शाळेतीलच गावात राहणाऱ्या काही मुलांवर गमतीशीर प्रस्ताव ठेवला आणि त्याबद्दल आता तुला सांगतो.शिरीष,ओंकार आणि अर्जुन या तीन विद्यार्थ्यांना माझी सतत काळजी.मी विचारले , "या म्हाताऱ्याला घ्याल का दत्तक?" प्रथम त्यांना वाटले मी गम्मत करतोय,पण नंतर या गुरूला त्यांनी वडीलही करून घेतले आहे.अभिमानाने ते माझी लेकरं म्हणून आता मिरवतात.तिघांच्या घरी आळीपाळीने राहतो. दत्तकपणाचा कसलाही कायदेशीर करार नाही…तसं तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणजेही माझी मुलंच ना? … वैयक्तिक आयुष्य म्हणून मागे वळून पाहताना मला स्वतंत्र पक्षासारखं जगल्याचं समाधान आहे. या पेशात आयुष्य वेचल्याचा आनंद आहे.मुलांना घडवताना आंतरिक प्रवासामुळे मीही घडत गेलो, त्यांच्याकडून शिकत गेलो.सगळ्यात महत्वाची शिकवण आपल्याला मुलं देतात ती म्हणजे कुठल्याही वयात आपल्यातलं मूल जिवंत असणंही किती गरजेचं आहे !


  पत्राच्या शेवटी एक गुरु म्हणून माझी अपेक्षा विचारलीस ती हक्काने सांगतो.माझ्या शिक्षणाच्या शिदोरीतील बीजांचा तुझ्या शिक्षणाच्या पेशात उपयोग होऊन त्यातून वटवृक्ष बहरू दे.त्यासाठी झोकून देशील.विश्वास आहेच...बाकी तुझ्याकडून काही नको.


                                                      


Rate this content
Log in