Rahul Shinde

Comedy


4.6  

Rahul Shinde

Comedy


भूत प्रकरण

भूत प्रकरण

5 mins 794 5 mins 794

"हं.. हं.. देवा.. बापरे..", कुंदा धापा टाकतच माडीवरून खाली स्वयंपाकघरात आली तेव्हा तिची अशी विचित्र अवस्था पाहून सुनंदाने-तिच्या आईने विचारले.

"काय गं, काय झालं अगं?

"आय..आगं लय ईपरीत बघितलं मी.."

"कुंदे, ताणू नगंस, जे काय हाय ते पटदिशी सांग, काय बघितलंस?" सुनंदाला धीर धरवत नव्हता.

"आता जेवण करून मी माडीवर फिरत होते तर मला समोरच्या ढेरेंच्या माडीवर..." कुंदा हे सांगत असतानाच सुनंदा तिचं वाक्य तोडत म्हणाली..,"आलं लक्षात...ढेरेंच्या पोराला दारू पिताना बघितलं असशील.. म्या पण बघितलंय. पण  काय करणार. ढेरेबाईंना म्या हे सांगितलं तर त्या म्हणाल्या, त्याला दारूमुळं ताजतवानं वाटतं. घेतो अधूनमधून, घेऊ दे."

"काय सांगत्यास तू? मी असं काय न्हाय बघितलं...” विषय भलतीकडेच जातोय बघून कुंदा थेट म्हणाली, ”मला ना एका माणसाचे पाय दिसले ढेरेंच्या माडीवर.."

"मग? तुला मला पाय नाहीत?”

"अगं आये, पण ते नुसतंच पाय व्हतं.."

"या बया…म्हंजी?" आता मात्र सुरेखाने जरा दबक्या आवाजात विचारले.

"तेच सांगतेय.. अगं मला पाय दिसले माणसाचे ते पण उलटे. पंजे उलट्या बाजूला होते वर आणि बाकी कायच दिसत नव्हतं, नुसते पाय."

"ए..अगं त्वा नीट बघितलं नसशील. अंधारात तुला त्वांड दिसलं नसेल."

"अगं मी पहिला दचकले. मग मी नीट निरखून बघितलं तरीबी मला पायाशिवाय काहीच दिसना म्हणून मी घाबरून मग तराट पळत आले."

"पण तरीबी मला वाटतं..."सुरेखाचा अजून विश्वास बसत नव्हता म्हणून कुंदा तिचं वाक्य तोडत म्हणाली,

"तुझा विश्वास नसंल तर तू बघून ये माडीवर जाऊन..हवं तर मी तुझ्या पाठीमागं थांबन." कुंदाच्या या बोलण्यावर सुनंदा जरा घाबरली, पण या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच ठरवून ती म्हणाली, "चल! बघू तरी...पण तू ये बरं वरपर्यंत माझ्यासंगं.."

दोघीही दबक्या पावलाने माडीकडे जाण्यासाठी जिना चढू लागल्या. जिन्यात पोचल्यावर सुनंदाने हळूच आपल्या माडीचे दार उघडले, मध्ये एक घर सोडून असणारी ढेऱ्यांची माडी दिसू लागली. सुनंदा दारातून बाहेर आली आणि पाठोपाठ कुंदा. सुनंदाने धडधडत्या हृदयाने ढेरेंच्या माडीवर नजर फिरवली,

"कुंदे, कुठं काय हाय? तुला भास झाला असंल, नाहीतर कोणीतरी झोपून पाय वर केले असतील तवा.." सुनंदा जरा कंटाळून म्हणाली.

"अगं आय, कुणी झोपून पाय वर केले असते तर मला बाकीचं अंग पण दिसलं असतं ना?" कुंदाने आपला युक्तिवाद मांडला, सुनंदा पुढे काही बोलणार इतक्यात ढेरेंच्या माडीवरच काहीतरी दिसलं म्हणून दोघीपण तिकडे बघू लागल्या. सुनंदाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. समोर ढेरेंच्या माडीवर जिन्यातल्या खोलीत दोघींना पण फक्त दोन हात दिसू लागले. बाकी शरीराचा कुठलाच भाग दिसत नव्हता. दोघीपण थिजल्यासारखं तिकडे बघू लागल्या तेव्हा ते दोन हात त्यांना इशारा करून 'इकडे या' असं दर्शवत असल्याचे त्यांना जाणवले आणि दोघीही आपल्या जिन्यातून पळत खाली घरात आल्या. दोघींची भीतीने गाळण उडाली होती.

"कुंदे, पटलं पोरे तू म्हणत होतीस ते.. ढेरेंच्या माडीवर हे काय ईपरीत.. आता उशीर झालाय, झोपू गं बाय, ढेरेबाईस्नी हे प्रकरण सांगितलंच पायजे." सुनंदा खाली आल्यावर कापऱ्या आवाजात एक दमात म्हणाली.

"होय, पण आय..पण मी मोठा बल्ब चालू ठेऊन झोपते. नाहीतर मला ते हात आणि पाय दिसायचे परत स्वप्नात."

****


काही वेळाने सुनंदाचा नवरा सुशील आपली शतपावली करून घरी आला तेव्हा सुनंदा दिवाणखान्यातच बसली होती आणि कुंदाला जरा डोळा लागला होता.

"आहो, कशाला इतक्या अंधारात एवढा वेळ फिरत बसतायसा? " सुनंदा सुशीलवर खेकसली.

"आ? अगं रोज मी एवढंच फिरतो.. आणि आजच काय झालं तुला असं तापून बोलायला.." सुशील निर्विकार चेहऱ्याने म्हणाला… सुनंदानं काही वेळापूर्वी ढेरेंच्या माडीवर घडलेला प्रकार सांगितला.

"म्हणजे तुम्हाला भूत दिसलं?" सुशीलने प्रश्न विचारला.

"ओ... ते नाव घेऊ नकासा. अपशकुन अस्तूय."

"कोणतं नाव?"

"तेच ओ.."

"भूत?"

"घेतलं का पुन्हा नाव?" सुनंदा खेकसली, पुढे म्हणाली, “आम्हाला तेच दिसलं ढेरेंच्या माडीवर.”

"तुम्हाला दोघींना अंधारात नीट दिसलं नसेल. कोणीतरी असंल माणूसच. "

"म्या कुंदाला पण तशीच म्हणाली पहिला, पण म्या माझ्या डोळ्यानं बघितलं न्हवं नंतर.." सुनंदा ठामपणे म्हणाली. नंतर सुनंदाने आग्रह केला म्हणून सुशील माडीवर जाऊन बघून आले, त्यांना मात्र काही दिसले ना****ही. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण मनावर घेतलं नाही, सुनंदाला मात्र कधी एकदा याबद्दल उद्या सकाळी उठून ढेरेबाईंना सांगते, असं झालं.

दुसरा दिवस उजाडला तसा सुनंदाने कुंदासोबत लगेच आपला मोर्चा ढेरेबाईंच्या घराकडे वळवला तेव्हा त्यांना ढेरेबाईंच्या घराला कुलूप दिसले. दोघी परत कोड्यात पडल्या. तसंच पुन्हा आपल्या घरी जाऊन सुनंदाने ढेरेबाईंना फोन केला आणि याबद्दल विचारलं.

"हो आम्ही कोणीही नाही घरी कालपासून. उमेश गावातलंच ‘योग-ध्यान’च्या निवासी शिबिराला गेलाय ५ दिवस. मी भावाकडे आलेय माझ्या..." ढेरेबाईंचं हे बोलणं ऐकून सुनंदा हबकुन म्हणाली, "म्हंजी काल रात्रीपन तुमच्या घरी कोणच नव्हतं का?"

"अहो, काल सकाळपासूनच घराला कुलूप आहे, कोणी नव्हते काल रात्रीपन.. का हो विचारताय..काही अडचण आहे का? तुमचा आवाज का दचकल्यासारखा येतोय? " ढेरेबाईंनी विचारल्यावर सुनंदाला तग धरवेना. घरात कोणीच नाही आणि माडीवर फक्त अंतराळी हात आणि पाय... विचार करून मायलेकींना धडकी भरली. सुनंदाने सगळी गोष्ट ढेरेबाईंना फोनवर कथन केली.

"काय सांगताय... माझ्या कानावर माझा विश्वास बसेना.." ढेरेबाई म्हणाल्या.

"आमी आमच्या डोळ्यांनी बगितलं. तुमास्नी काय सांगू आमची अवस्था.. तुम्ही भावाकडनं कधी येणार हाय..?"

"मी अजून २ दिवसांनीच येणार होते. पन हे प्रकरण ऐकून मलापन काही सुधरेना आता... काम करते. तुम्ही आज रात्री परत एकदा आमच्या माडीवर बघा आणि तसं काय दिसलं की मला फोन करा. भावाचं घर काय लय लांब नाय. तुमचा फोन आला की अर्ध्या तासात पोचू आम्ही आणि खरंच तसलं काय असलं भुताखेताचं तर कायतर करायला पाहिजेच. मी माझ्या भावाच्या ओळखीचा इथला मांत्रिक आहे, त्यांना घेऊन येते.." ढेरेबाई म्हणाल्या आणि सुनंदाने त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

****

रात्र झाली तशी सुनंदा-कुंदा माडीवर गेले आणि एकमेकींना धरून ढेरेंच्या माडीवर बघू लागले. तर आजही परत त्यांना अंतराळी पाय दिसले. दोघी परत घाबरत माडीवरून घरात पळत आल्या आणि सुनंदानं फोन करून ढेरेबाईंना तातडीने यायला सांगण्याचं कर्तव्य पार पाडलं. सुनंदा, तिचा भाऊ सोबत मांत्रिकाला घेऊन आले. त्यांच्याकडे सुनंदा-कुंदा हजार होत्याच. ढेरेबाईच्या माडीवर सगळे दबकत दबकत वरती जाऊ लागले. मांत्रिक पुढे होते. वर जाताना जिन्याच्या बाहेर हालचालींचा आवाज सगळ्यांनाच जाणवू लागला, तसं ढेरेबाईंनी घाबरून जिन्यातील दिवा लावला.

उजेडात जिन्यातून बाहेरचे दिसले. माडीवर ढेरेबाईंचा मुलगा सर्वांगासन करत होता. दोन्ही पाय वर आणि अंग पूर्ण सपाट.

"उमेश तू तर शिबिराला गेला व्हतास ना? तुझी आय म्हणाली म्हणून विचारलं.." सुनंदाने सुचेल तसं विचारलं, तशी उमेशची तंद्री भंगली.

"काकू, तुम्ही इकडे? मामा तुम्ही आणि तुमच्यासोबत हे कोण?” गोंधळून उमेशने विचारले.

"ते सांगतो.. पन शिबीर चालू आहे तुझं, मग तू इकडे कसा? सोडून आलास?" ढेरेबाईंनी आपल्या मुलाला विचारले.

"अगं, शिबीर चालू आहे… तिथं रात्रीच्या वेळी 'शांतता तास' असतो. त्यात आम्ही कोणाशीही बोलायचं नाही. एकांतात कुठेही जाऊन तिथे शिकलेली आसनं, प्राणायाम करू शकता. शिबीर आपल्या घरापासून १ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्या घरी कोणीच नाही. म्हणून मी तो 'शांतता तास' इकडे येऊन पाळत होतो. शरीरशुद्धीसाठी आम्ही रात्रीचे जेवण करत नाही, त्यामुळे उपाशीपोटी मी आसन, प्राणायाम करत होतो." उमेश म्हणाला.

"मग त्यो काल केलेला हाताचा कसला व्यायाम प्रकार आहे, दुसऱ्या माणसाला बोलावल्यासारखा?" कुंदाने विचारले.

"माणसाला बोलावल्यासारखा? हा ती मुठीची उघडझाप, तुम्हाला कसं माहित..." यावर कोणी काहीच बोललं नाही.

कुंदा सुनंदाने माडीवरचा अंदाज घेतला. सर्वांगासन करताना अंग जमिनीवर पडल्यावर मध्ये कठडा असल्याने कुंदाला बाकी शरीर तिकडच्या माडीवरून दिसले नव्हते. त्यामुळे तिला अंतराळी पाय फक्त दिसले होते, उलटे आणि पंजा वर. तसंच हाताचे व्यायाम करताना उमेश जिन्यातल्या खोलीत अशा पद्धतीने थांबला होता की सुनंदा आणि कुंदाला समोरच्या उजेडात दरवाजात फक्त हात दिसत होते. त्यात बाकी चहूबाजूला अंधार…


आपली अशी फजिती झाल्यामुळे कुंदा-सुनंदा परत आपल्या घरी गेल्या, पण भूतप्रकरणाचा निकाल लागल्यामुळे त्यांना हायसं वाटत होतं...


नंतर ढेरेबाईंनी उमेशला आणि सुनंदाने सुशीलला हे सांगितल्यानंतर त्यांनी मात्र पुरेपूर हसून घेतलं.


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Shinde

Similar marathi story from Comedy