शल्य
शल्य
(प्रा.नंदकुमार दखणे यांच्या सत्य अनुभवावर आधारित)
कित्येकदा कोणाला तुमच्याशी काहीतरी बोलायचे असते, पण त्याच वेळेस तुम्हाला महत्वाचे काम असल्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे समोरच्याचं ऐकून घ्यायचं तुमच्याकडून राहून गेलं आहे? असं झालंच असेल, नकळत कधीतरी किंवा खूप वेळा. माझ्याबाबतीत असं घडलेली एक घटना मी कधीच विसरू शकत नाही. वेळेअभावी समोरच्याचं न ऐकल्यामुळे जे घडलं, त्याचं शल्य मनात आजही आहे.. कायम राहील.
साधारण तीस वर्षांपूर्वी मी बीएसटीमध्ये ट्रॅफिक मॅनेजर होतो,तेव्हाची गोष्ट. तेव्हा कंट्रोल रूम माझ्या देखरेखीखाली होती. तिथे काम करत असताना तिथला एक ड्राईव्हर माझ्या थोडासा परिचयाचा झाला होता. इतर कर्मचाऱ्यांशी बोलत असताना, त्यांना मार्गदर्शन करत असताना 'साहेब समोरच्याला चांगला सल्ला देतात, चांगलं गाईड करतात' असे त्या ड्राईव्हरच्या लक्षात आले होते. एकदा मी ऑफिसमध्ये असताना दुपारी साधारण एक वाजता माझ्या चपराशी काकांनी मला तो ड्राईव्हर भेटायला आल्याचा आणि बाहेर बसल्याचा निरोप दिला.
"बोल, मला काहीतरी सांगायचे आहे तुला? " मी बाहेर जाऊन ड्राईव्हरला विचारले.
"साहेब, मला तुमचा सल्ला हवा आहे. फक्त तुम्हालाच काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. मला जरा निवांत मोकळा वेळ द्याल?" त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते.डोळ्यात माझ्याप्रती विश्वास होता.
"बरं, १५-२० मिनिटे दे ला. हातातले काम संपवून आपण बोलू.ठीक आहे? "मी त्याला म्हणालो.
"चालेल साहेब. तोपर्यंत मी इथेच बसतो." तो म्हणाला आणि मी आत जाऊन चालू काम हातावेगळे करू लागलो. इतक्यात काही वेळात मला दुसऱ्या ब्रँचवरून फोन आला आणि 'अर्जंट मीटिंग साठी २ वाजता या.' असा निरोप मिळाला. दुसऱ्या ब्रँचवर पोचण्यासाठी किमान २५ मिनिटे लागणार असल्यामुळे मी लगेच बाहेर आलो आणि ड्राइव्हरला म्हणालो,
"मला अर्जंट मिटींगसाठी इथून लगेच निघावं लागेल. हेड ऑफिसला जायचं आहे. आपण उद्या बोलू या सकाळी. "मी त्याला म्हणालो. त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्याच्या चेहऱ्यावर मात्र मला नाराजी दिसली.
"उद्या नक्की बोलू आपण. सकाळी ९ वाजता मी ऑफिसला असतो. मी वेळ काढून ठेवतो. सकाळी काही व्यत्यय आणि मीटिंग नसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. ठीक आहे ना?" मी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन विश्वासपूर्वक म्हणालो.
"ठीक आहे साहेब." तो म्हणाला आणि मी तिथून मीटिंगसाठी लगेच निघालो.
मी मॅनेजर असल्यामुळे मला दररोज सकाळी घरी सहा वाजता रात्रभराचा रिपोर्ट, अपघात वगैरे अशा काही घडलेल्या घटना सांगण्यासाठी कंट्रोल रूमवरून कॉल यायचा. तसा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी कॉल आला, समोरच्या व्यक्तीनं माहिती दिली आणि म्हणाला, "साहेब, तुम्हाला तो माणिक ड्राइव्हर माहिती आहे, जो बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस आपल्यासोबत जीपवर सोडण्यासाठी असायचा?" हा कालच मला भेटण्यासाठी आलेला ड्राईव्हर.
"हो माहित आहे ना? त्याचं काय?" मी लगेच म्हणालो.
"साहेब... काल रात्री त्याने चौथ्या मजल्यावरून आपल्या बायकोला ढकलून दिले आणि नंतर स्वतःही उडी मारून आत्महत्या केली. " ऐकून माझे कानच बधीर झाले. मी हादरून गेलो.
यांत्रिकपणे ऑफिसला पोचलो तेव्हा ऑफिसमध्येही त्याच्याबद्दलच चर्चा चालू होती. मी चपराशी काकांना बोलावले आणि अस्वस्थपणे म्हणालो,
"कालच तो मला भेटायला आला होता. त्याला काहीतरी सांगायचे होते. "
"हो साहेब. तो काल बारा वाजल्यापासूनच बाहेर बसून होता. तुमच्या मीटिंग चालू असल्यामुळे मी तुम्हाला उशिरानं सांगितलं. त्याचा काहीतरी घरगुती प्रॉब्लेम होता, तुमच्याशीच त्याला बोलायचं होतं." चपराशी काका म्हणाले आणि मी सुन्न झालो.
त्याला राहण्यासाठी क्वार्टर दिले होते, तेही खाली करावे लागणार होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, त्याला तीन लहान मुले होते. एक मुलगा आणि दोन मुली. तिघेही बेघर आणि अनाथ होणार होती. मुलाला त्याचा काका आणि मुलींना आत्या सांभाळण्यासाठी घेऊन जाणार होती. मला जास्तच बचैन वाटले. कदाचित त्याच्याशी भेट झाली असती तर पूर्ण कुटुंबाची हेळसांड टळली असती.
ह्यात माझी चूक? की नियतीला ती भेट घडवायचीच नव्हती म्हणून मला नेमकी त्याच दरम्यान महत्वाची मीटिंग आली. नेमकं काय सांगायचं होतं त्याला मला.. सगळं गूढ. नियतीला दुसऱ्या दिवशी मला भेटेपर्यंत त्याला तेवढी रात्रही तग धरू द्यायचे नव्हते. 'एका रात्रीत वाद विकोपाला गेले.' हा तर्क.
काहीवेळा संवाद हा अनेक समस्यांवरचा उत्तम उपाय असतो. जीवनात आपण प्रत्येकजण व्यस्त असतोच, पण जेव्हा कोणाला आपल्याला काहीतरी सांगायचे असते तेव्हा त्या व्यक्तीसाठी 'वेळ' देणे हे महत्वाचे असते. कधीकधी समोरच्याचे 'काहीही सल्ला न देता फक्त ऐकून घेणे' हा सुद्धा समस्यावरचा उपाय ठरतो.
त्या घटनेनंतर माझ्यामुळे कोणाचीतरी आत्महत्या टळली असती, ही सल मनात आहेच. मी कितीही व्यस्त असलो तरी कोणाला माझ्याशी काही बोलायचे असेल,तर माझ्याकडे नक्कीच 'वेळ' आहे.
जीवनाच्या प्रवासात येतात समोर चेहरे
असले आतून नाराज, तरी वरून हसरे
बोलायचे असते तुमच्याशी कधी कोणाला काही?
ऐकण्यासाठी अनमोल 'वेळ' दिल्यानेही मन समाधानी होई...